अंजनानं घाम पुसत हातातली पिशवी दाणकन् जमीनीवर आदळली. मॅडम कडे कामाला लागून पाच सहा वर्षं झाली होती. मॅडम काम जास्त व पैसे कमी देणारी निघाली. शिवाय रोज वेडंवाकडं बोलणारीही निघाली होती पण अंजनामध्ये ती नोकरी सोडण्याचं धाडस नव्हतं आणि दोन कामाची घरंही होती पण ती खूप लांब होती. मॅडमचं घर अगदी जवळ होतं.
पाचवी व सातवीत असलेली दोन मुलं होती. दारू पिणारा सदा कुठे तर्र होऊन पडलेला असे..पण नवरा म्हणून त्याला सांभाळणं जरूरीचं होतं. लहानशा पत्रे लावलेल्या जागेला घर म्हणावं लागतं होतं. तीन घरचं काम, गरीबी आणि दारूबरोबर झगडताना तिची शक्ती संपली होती. मुलं हुशार होती आणि सदा प्यायलेला नसताना मनानं चांगला होता एवढीच काय ती जमेची बाजू! सदावर चोरीचा आळ आला अन तो मोडून गेला. पोलिसांनी खूप बडवलं व आत टाकलं. तिथून बाहेर पडताच दारू मागे लागली. नाहीतर तो बरा पैसा मिळवत होता. आता एकटीने संसार ओढताना मात्र ती थकून गेली होती.
आज मॅडमनी तिला सारं अंगण साफ करायला सांगितलं होतं. घरातली साफ सफाई संपली नव्हती आणि उद्या एवढं मोठं अंगण रणरणत्या उन्हात साफ करायच्या कल्पनेनेच तिची चिडचिड झाली होती. घरी येऊन तिनं चार भाकऱ्या बडवल्या व मॅडमनं टाक म्हणून सांगितलेसं वांग्याचं भरीत न टाकता ती घेऊन आली होती. ते बाहेर काढलं. मुलांनी शाळेच्या ट्रीपला जाऊ का विचारलं आणि तिचा बांध फुटला.
“अरं इतं विष प्याया पैका न्हाई.. कुटून द्येवू मी टरीपसाठी पैसं?”
मुलगी भावाला म्हणाली,” दाद्या, ही ट्रिप एवडी चांगली न्हाई म्हनतात सगळे. फुडच्याला जाऊया आपन.”
त्याने होकारार्थी मान हलवली व डोळे पुसलेले बघून हिच्या काळजात तुटलं. वस्तीत कमळा, रखमा, अनुसुया वगैरे सात आठ मैत्रीणी होत्या. त्यांच्या कानावर ही बातमी जाताच त्या ट्रीपसाठी थोडे पैसे घेऊन आल्या.
“पाठव लेकरांना टरीप ला.. हे घे पैसं..त्यांनला आत्तापासून मनं माराया का लावायचं?”
अंजनानं त्यांचे आभार मानून पैसे घेतले नाहीत. वस्तीतले सगळेच संसार ठिगळं लावलेले ! या ना त्या फरकानं तिच्यासारखेच. या मैत्रीणी जीवाला जीव देतात हे महत्वाचं म्हणत तिनं त्यांना च्या व चुरमुरे दिले. हात जोडले व पैका नको म्हणाली.
त्या जाताच तिनं मुलांना खायला घातलं. सदा दारू पिऊन आडवा पडला होता. तिनं गणपती म्हणून ठेवलेला छोटासा केशरी दगड. ज्याला तिच्या लेकानं डोळे, सोंड काढली होती. तो उचलला व नदीत भिरकावून देण्यासाठी ती तिन्हीसांजेच्या वेळी तरातरा चालू लागली.
“माजं आयुक्ष कर अजून कठीन. सदाची दारू सोडव म्हनून इनंत्या केल्या तू काय बी केलं नाईस. लेकरं हुशार हायेत पन त्यानला मी काय बी देऊ शकत नाय. आसवं गिळून तुज्यापुडं पदर पसराया मी यायची न्हाई आता. तू श्येवटी दगडच निगालास. म्या तुला द्येव मानलं. इतच चूक झालीया.”
नदीकडे अनवाणी चालत असताना ती एकदम थबकली. एक नवं कोरं लॅाटरीचं तिकीट समोर पडलं होतं. त्याकडे दुर्लक्ष करून ती तरातरा पुढं गेली पण परत मागे वळली. तिनं ते तिकीट उचललं व समोरच्या दुकानात दाखवायला नेलं. साठे मास्तर तिथचं बसले होते. दुकानदार ते तिकीट बघून चाट पडला. ऐंशी लाखाची लॅाटरी लागलेली ऐकून ती रडायला लागली. मध्येच हसायला लागली. हातातील गणपतीला दगड म्हटल्याने स्वत:च्या थोबाडीत मारून घेत. आकाशाकडे बघून हात जोडत. रडत ओरडत ती घरी परतली.
“पोरांनो जा टरीपला. आडव्या पडलेल्या सदाची दारू सोडवण्यासाठी दारूमुक्ती केंद्राची चौकशी करायला ती बाहेर पडली. वाटेत परत मास्तर भेटले.
“काय अंजनाबाई, गजानन प्रसन्न झाला म्हणायचा ! आता काळजी संपली तुझी ! का जमीनजुमला घेणार का आता?”
मास्तर, काय बी घेणार न्हाय. या माज्या सात मैत्रीणी हायेत नव्हं कमळा, रखमा, अनुसुया, कुसुम. त्यानला परत्येकी धा लाख द्यावं म्हनते. मला धा लाख पुरेत. त्या मैत्रीनी हिच माजी शिरमंती हाय. कमळाला ते आपरेशान करता येईल, अनुसुयाचं छप्पार तुटलया, कुसूमचा न्हवरा लय आजारी हाय. रखमाचं पोरगं येडं झालंय. हातातील केशरी गणपती घट्ट पकडून. आकाशाकडे बघत. त्याला ह्रुदयाशी धरून ती आनंदाने चालत राहिली.
मास्तर अवाक् होऊन त्या परमेश्वराने बनवलेली ही सर्वात श्रीमंत व्यक्ती बघत राहिले.
©® ज्योती रानडे
2025 JyotiRanade. All rights reserved.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा