शनिवार, २५ जुलै, २०२६

3002. परत आलेला घास

 विवेकला लहानपणापासून एक गोष्ट अजिबात आवडत नव्हती.
त्याचे बाबा.
नाही. बाबा वाईट नव्हते.
त्यांचा  प्रत्येकाला जेवण करून जाण्याचा आग्रह. त्यांची ही एक सवय विवेकला खूप त्रासदायक  वाटत असे 
घरी कोणीही आलं.
ओळखीचं असो वा अनोळखी.
बाबा एकच वाक्य म्हणायचे -
“अहो, काहीतरी खाऊनच जा. असेच जाऊ नका !”
आणि मग सुरू व्हायचा त्यांचा आग्रह.
“थांबा ना… पोळी-भाजी आहे… चहा तरी घ्या… काहीतरी घ्या…”
विवेकला राग यायचा.
तो आईला कुजबुजायचा -
“कशाला एवढा आग्रह करायचा? सगळेच लोक आपल्या घरचे आहेत का?”
“ तुला किती त्रास होतो या सर्वांचा..”
आई फक्त हसायची.
आणि बाबा?
ते काहीच न बोलता... प्रेमाने पुन्हा एखादा घास वाढायचे.
वर्षं गेली…
विवेक मोठा झाला…
नोकरीसाठी बाहेर गेला…
आणि आयुष्याच्या धावपळीत बाबांची ती सवय…
हळूहळू त्याच्या आठवणींतून धूसर होत गेली.
एकदा कामानिमित्त त्याला दूरच्या डोंगराळ भागात जावं लागलं.
रस्ता लांब…
आजूबाजूला काहीच नाही…
मोबाईल नेटवर्क नाही…
माणसांची चाहूल नाही…
निघण्याच्या गडबडीत काही खाल्लं नव्हतं.
सुरुवातीला वाटलं—
“ठीक आहे… पुढे काहीतरी मिळेल…”
पण दुपार सरली…
संध्याकाळ जवळ आली…
आता मात्र पोटात आग धगधगू लागली होती.
घसा कोरडा पडला होता…
डोकं जड झालं होतं…
विवेकने आसपास नजर टाकली—
निर्मनुष्य… शांत…
जणू काही जग इथे संपलंच होतं.
त्या क्षणी…
त्याला बाबांचा आवाज आठवला
“रिकाम्या पोटी जाऊ नका…”
विवेकच्या डोळ्यांत पाणी आलं…
तो हळूच म्हणाला—
“बाबा… आज समजतंय… भूक काय असते ते…”
तो थोडं पुढे चालत राहिला…
पाय जड झाले होते…
शरीर साथ देत नव्हतं…
आणि अचानक…
दूरवर एक लहानसं घर दिसलं.
जणू काही त्या निर्जन शांततेत…
एक आशेचा दिवा.
विवेकला विश्वासच बसत नव्हता.
तो धडपडत त्या घरापाशी गेला…
दारावर हलकेच टकटक केली…
दार उघडलं.
एक वृद्ध जोडपे समोर उभे होते .
त्या  दोघांनी विवेककडे पाहिलं…
त्याच्या चेहऱ्यावरची थकवा, भूक, आणि असहाय्यता एका क्षणात ओळखली…
तो काहीच न बोलता…
हसला…
आणि आजोबा म्हणाले 
“या… आधी काहीतरी खाऊन घ्या…”
विवेक थबकला.
तेच शब्द…
तेच भाव…
जणू काही बाबा त्याच्यासमोर उभे होते.
त्या वृद्धाने त्याला आत बसवलं…
 आजीने, गरमागरम भाकरी…
ताजी भाजी…
थोडंसं भात…
आणि पाण्याचा एक तांब्या…
अनोळखी ठिकाणी हे खावे की नको हा विचार सुद्धा त्याच्या डोक्यात आला नाही . इतर वेळी बाहेर बिस्लेरी पाणी पिणारा विवेक आज आनंदाने त्या ताटाकडे बघत होता जणू पंचपक्वाने त्यात भरली आहेत 
विवेकच्या हातात थरथर होती…
पहिला घास तोंडात टाकला…
आणि त्याच्या अंगावर शहारा आला…
तो फक्त जेवत नव्हता…
तो प्रत्येक घासात… बाबांचं प्रेम चाखत होता.
डोळ्यांतून अश्रू ओघळत होते…
जेवण झाल्यावर…
विवेकने विचारलं—
“काका… इथे कोणी येत नाही… तरी तुम्ही इतकं सगळं का करता?”
आजोबा हसले…
आणि शांतपणे म्हणाले—
“बाळा… कुणीही भुकेलं जाऊ नये… एवढंच…”
त्या क्षणी…
विवेकला सगळं समजलं.
घरी परतल्यावर…
त्याने बाबांच्या  फोटोकडे पाहिलं…
 त्याला भास झाला बाबा नेहमीप्रमाणेच…
कोणालातरी म्हणत होते—
“काहीतरी खाऊनच जा…”
आणि पहिल्यांदाच विवेकला या शब्दाचा अर्थ कळला 
कारण आता त्याला कळलं होतं—
आयुष्य म्हणजे प्रतिध्वनी आहे…
तुम्ही दिलेला प्रत्येक घास…
प्रत्येक प्रेम…
प्रत्येक भावना…
कधीतरी… कुठेतरी…
तुमच्याकडे परत येतेच…
कदाचित वेगळ्या रूपात…
पण तितक्याच ऊबदारपणे…
आणि त्या दिवशी…
विवेकच्या मनात एकच वाक्य घुमत होतं—
“मी जे इतरांना देतो 
तेच आपल्याला परत मिळत असते ”
Return theory म्हणजे असाच काहीसा प्रतिध्वनी. पण हा आवाजाचा नाही, आपल्या कृतींचा, विचारांचा, आणि सर्वात महत्त्वाचं… आपल्या भावनांचा.
आपण एखाद्याला बहाल केलेला हसरा क्षण, त्याच व्यक्तीकडून परत येणार नाही कदाचित..… पण एखाद्या अनोळखी चेहऱ्यावर उमटलेल्या स्मितहास्यातून तो आपल्याला परत मिळेल.
आपण कुणाला तरी दिलेली वेदना सुद्धा तशीच.. ती जशीच्या तशी परत येईल असं नाही; पण एखाद्या नात्यात, एखाद्या प्रसंगात, ती आपल्याला अनुभवावी लागेलच.
हे ऐकताना थोडं भीतीदायक वाटतं, नाही का?
पण खरंतर, ही भीती नाही तर एक जाणीव आहे.. जबाबदारीची जाणीव.
कारण return theory आपल्याला सांगते.
“तू जे काही करतेयस , ते फक्त त्या क्षणापुरतं मर्यादित नाही. ते एक बीज आहे  आणि त्या बीजाचं फळ तुला कधीतरी चाखावंच लागणार आहे.”
मग विचार करायला लावणारा प्रश्न असा उभा राहतो.
आपण आपल्या आयुष्यात कोणती बीजं पेरतोय?
रागाची?
अहंकाराची?
की प्रेमाची, समजुतीची, आणि शांततेची?
कारण पेरिले ते उगविले... अस आपण म्हणतोच की...
खरं सांगायचं तर, आयुष्य म्हणजे एक विशाल शेत आहे…
आपण नकळत रोज काही ना काही पेरत असतो... शब्दांनी, नजरेने, स्पर्शाने, आणि कधी कधी आपल्या शांततेने सुद्धा.
आणि मग काळ, अगदी शांतपणे, त्या बीजांना अंकुरायला मदत करतो.
काही बीजं लगेच उगवतात.
काही वर्षानुवर्षं मातीत दडून राहतात. हं,पण ती नष्ट होत नाहीत.
Return theory इथेच आपलं खरं रूप दाखवते.
🙏🌷🌹🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...