शनिवार, २५ जुलै, २०२६

3086. उंबरठा

  ऑफिसमधून कविता बाहेर पडली. आपल्या कायनेटीकवर बसता बसता मनात म्हणाली. या महिन्यात तरी ते 'चार दिवस' येऊ नयेत. गेली अठरा वर्षे आपण हेच म्हणतोय.. पण ते 'चार दिवस'पाठ सोडतं नाहीत.. आता आपला धीर सुटत चाललंय.. किती वर्षे वाट पहायची?
लग्न होऊन एकोणीस वर्षे झाली. आता एकेचालीस वर्षे संपली. घरी सासू, नणंद माहेरी आईबाबा वाट पहातायत. काही बातमी येईल म्हणूंन.. पण महिन्याचे चार दिवस पाठ सोडतं नाहीत. डॉक्टरसल्ला घेऊन झाला. उपाय करुंन झाले.. सासूबाई नवस बोलतात.. पण व्यर्थ.   गाडी घरासमोर उभी करून ती घरात आली.. वॉशरूम मध्ये गेली.. पण ती आलीच. कविता निराश झाली.. या महिन्यात सुद्धा.  पुण्याच्या डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरु होती.. सहा महिने झाले, पण उपयोग नाही. आपण कधी आई होऊ याची शक्यता तिला वाटेना. आणि यानंतर मूल झाल्यावर त्याला मोठं कधी करणार? त्याच शिक्षण, नोकरी, लग्न.. तोपर्यंत आपण असू किंवा नसू. काहीतरी निर्णय घ्यायला हवा. निरंजनशी बोलायला हवे.. त्याची आई.. ती तर डोळे लाऊन बसलेली. तिला पण विश्वासात घयायला हवे..
रात्री जेवणे झाली. कविता बेडरूममध्ये आली.. निरंजन लॅपटॉपवर काम करत होता.. त्याच्या बाजूला कविता बसली.. एक नजर कविताकडे टाकून तो म्हणाला 
'आज चेहेरा का पडलेला?
'आज 'पाळी 'आलीच. मुंबईच्या विरचंदणी डॉक्टरची ट्रीटमेंट सुरु होती सहा महिने. पण उपयोग होत नाही. खांदे उडवून निरंजनने डोके लॅपटॉपमध्ये घातले.
'निरंजन.. नुसते खांदे उडवून नाही चालणार. काहीतरी निर्णय घयायला हवा. तुझी आई.. बहीण.. माझे आईबाबा वाट पहात आहेत.. नातवंडाची आणि आपण त्याना निराश करतोय.
"मग काय करायच म्हणतेस? उपाय तर करतोय ना..
"उपाय झाले.. गेली अनेक वर्षे उपाय करतोय.. उपयोग नाही.. आता पुढे पहायला हवे.
'काय पुढे पहायला हवे?
"माझी चाळीशी दोन वर्षांपूर्वी संपली. आणखी पाच वर्षांनी मोनॉपोज येईल. आता मूल होण्याची शक्यता नाही रे..
'मग?
'आपण मूल दत्तक घेऊया का? छानसा मुलगा. आत्ता घेतला तर आपली साठी येईल तेंव्हा तो विशीत असेल. जास्त काळ थांबून नाही चालणार. आपली वये पण वाढतायत ना? ती आपण थांबवू शकत नाही.निर्णय तातडीने घयायला हवा.
'दत्तक? पण आईला ते नाही पटणार.
', आणि तुला?
'मलाही.. पण काही इलाजच नसेल तर..
'इलाज नाही म्हणूनच. एखाद मूल असावं घरात असे प्रत्येकाला वाटतं. मला पण वाटतं ना. आयुष्य पुढे पुढे जातंय..तू पंचेचालीस क्रॉस केलीस. मी बेचाळीस. अजून वाट पहात राहिलो तर काय म्हातारपणी दत्तक घेणार? आईच पण किती आयुष्य राहिलंय. त्याना पण पाहूदे ना मूल मोठे होत असताना..
'पण दत्तक म्हणजे.. कोण कुणाच... कुणाच्या रक्ताचे असेल कोण जाणे?
'रक्त्नाचे कुणाच्या पण असुदे.. पण आपले संस्कार महत्वाचे.
'पण आईला कस सांगणार?
'सुरवातीला सांगायचेच नाही.. घरी आणल्यावर पाहूदे..
'बर. तुझा हट्टच आहे तर होउदे तूझ्या मनासारखे.
'माझा हट्ट अस म्हणू नकोस. आपल्या सर्वासाठी.
'बर.. मग कुठे शोधायचं बाळ?
'पुण्यात एक अनाथाश्रम आहे.. खुप मोठा आहे.. माझी मैत्रीण सांगत होती, तिथे बरीच मूल असतात. तिथेच जाऊ..
'पण मुलगा की मुलगी बघायची?
'मुलगा.. तुमच्या आईला.. माझ्या आईला नातूच हवा असणारं.. म्हणून मुलगा बघू.
"ठीक. शनिवारी रविवारी जाऊ..आपल्याला दोघांनाही रजा असते..
'चालेल.
कविताने आनंदाने उशीवर मान टेकली. निरंजनने गाडी काढली आणि दोघे पुण्याला पोहोचले. सकाळी दोन अनाथाश्रम पाहिले पण हवा तसा मुलगा दिसेना. दुपारनंतर एका अनाथाश्रमात एक गोरा मुलगा दिसला. तिथल्या बाईने त्याला दाखवताच तो गालातल्या गालात हसला.. कविताला तो आवडला.. तिने त्याला उचलून घेतले आणि निरंजनकडे पाहिले.. त्याला पण तो आवडला. त्याला घेऊनच कविता ऑफिसमध्ये आली. तिने तिथल्या मुख्य बाईंना विचारले..
'हा मुलगा आम्हाला द्याल का?
'देऊ शकते.. पण तुम्ही दोन ओळखी आणा. कारण आम्हाला खात्री वाटायला हवी की मुलगा योग्य घरी जातोय. नाहीतर मुलांची विक्री करणारे पण असतात. दुसऱ्या दिवशी त्यानी निरंजनचा मित्र डॉ. सुमित आणि त्याची पत्नी डॉ. माया यांना घेऊन गेले. मग व्यवस्थित फॉर्म भरून आणि सुमित आणि माया यांच्या खात्रीवरुन मुलाला कविताच्या आणि निरंजनच्या ताब्यात दिले. त्या चार महिन्याच्या बाळाला घेऊन कविता आणि निरंजन घरी आले. निरंजनाच्या आईला धक्काचं होता..तिला हे अजिबात आवडल नव्हतं. ती न बोलता आपल्या घरात निघून गेली. कविताने पण छोटया बाळाला प्रेमाने घरात घेतलं. ऑफिस मधून सहा महिने रजा घेतली. आपल्या आईला बोलावून घेतलं. तिची आई पण आली.. घरातल्या घरात बारसं केल.. नाव ठेवलं आशू.
      आशू गुणी होता. कुणा अभागी आई त्याला सोडून गेली होती कोण जाणे. पण तो कविताला त्रास देत नव्हता. रात्री व्यवस्थित झोपत होता. खातपीत होता. घरात त्याची जाग होती. कविताची नाराज सासू पण त्याला मांडीवर घेत होती. भरवत होती. निरंजनला कधी घरी जातो आणि आशूला घेतो असे वाटतं होते. त्याला सोडून ऑफिसला जाताना जीवावर येत होते. निरंजनची बहीण पण दर रविवारी भाच्याला बघायला माहेरी येत होती. आशू म्हणजे सर्वांच्या गळ्यातला ताईत झाला होता.
    कविताची रजा संपली पण आता तिला काळजी वाटतं नव्हती.. एक बाई होतीच लक्ष द्यायला. शिवाय सासूबाई पण होत्याच. आपण योग्य वेळीच निर्णय घेतला याचे तिला समाधान वाटतं होते. निरंजन सुद्धा तिला तुझ्यामुळेच आपण योग्य निर्णय घेतला, हे वारंवार सांगत होता. आशू दोन वर्षाचा झाला. वयाच्या मानाने तो मोठा वाटतं होता.. सर्व काही छान होते. आणी.
    स्वातंत्र्यदिन होता. कविताला ऑफिसमध्ये झेंडावंदनाला जायचं होत. ती सकाळी लवकर उठली आणि बाथरूममध्ये जाताजाता तिला मळमळल्या सारखे झाले आणि उलटी झाली. तिने तोंड स्वच्छ धुतले पण तिचे पेटके कमी होईनात. भिंतीला धरून धरून ती बेडपाशी आली. आज आपल्याला अचानक काय झाले तिच्या लक्षात येईना.. तिने नवऱ्याला उठविले. पित्त झाले असणारं म्हणून त्याने जेलूशीलची गोळी दिली. पण काही कमी वाटेना. तिला काही तरी चमत्कारीक वाटतं होते. निरंजनने तिला ऑफिसमध्ये सोडले आणि तो बाहेर वाट पहात गाडीत बसुन राहिला.. एक तासात ती बाहेर पडली आणि गाडी डॉ. साने यांच्या हॉस्पिटलमध्ये. डॉ. मिसेस साने यांनी तिला तपासले आणि म्हणाल्या..
'कविता.. गेली कित्येक वर्षे तू ज्या साठी आसूसली होतीस.. तेच तूझ्या पदरी येतंय... या महिन्यात पाळी होती?
'नाही बहुतेक. मी मुलगा दत्तक घेतलाय आशू.  त्याचे करता करता माझ्या लक्षातच राहत नाहीत या गोष्टी..
'अस कस.. स्त्रीने या नैसगिक क्रिया लक्षात ठेवायच्या असतात. तू युरीन दे चेकिंगला. पण माझा अंदाज चुकायचा नाही. आशूला भावंड पाठवलंय देवाने..
'काय? अरे देवा.. या वयात?
'त्यात काय? जोपर्यत पाळी येत असते. तोपर्यत दिवस राहण्याची शक्यता असतेच. तूझ्या बाबतीत फार उशिरा होतंय हे.
'पण डॉक्टर.. एवढे प्रयत्न झाले पण यश येत नव्हते म्हणून मी मुलगा दत्तक घेतला आणि आता हे?
'दत्तक मुलगा चांगल्या पायगुणाचा म्हणायचा.. त्याला पण भावंड हवं का नको? तू बाहेर युरीन सॅम्पल दे.
खात्री करूया.
कविताने लॅबमध्ये जाऊन युरीन सॅम्पल दिले आणि बाहेर बसलेल्या नवऱ्याला डॉक्टरांचे म्हणणे सांगितले.
"अग असू दे ना. आपल्याला काय कमी आहे? दोघेही नोकरी करतो. स्वतः चे घर आहे..आईला दोन नातवंडे होतील. खेळवील ती दोन मुलांना.
कविता आई होणार हे सर्वाना कळले.
     सासूबाई खूष. गेली कित्येक वर्षे ज्याची त्या वाट पहात होत्या. तेच होणार होते. कविताला बाळ व्हावे म्हणून त्यानी किती नवस बोलले होते. पूजा केल्या होत्या. निरंजन खूष होता. त्याला आपल्या अंगामासाचे बाळ हवं होते. खूष नव्हती ती कविता. तिला पुढील पेच दिसत होते. तिला आशुची काळजी वाटतं होती. त्यात करून मुलगी झाली तर बरे असे तिला वाटतं होते. म्हणजे स्पर्धा होणार नव्हती. दर महिन्याला व्यवस्थित तपासणी सुरु होती.. नऊ महिने झाले आणि कविता प्रसूत झाली.. मुलगा झाला.
     घर बेहद्द खूष झाले. कविताची सासू अनेक नवस बोलली होती. ते फेडू लागली. निरंजन बेहद्द खूष होता. आशू भांबवला होता.. हे नवीन बाळ घरात येणार.. म्हणून खूष पण झाला होता. शेजारी पाजारी हा आशूचा पायगुण बर.. अस सांगत होते. कविताची सासू पण आशुची पाठ थोपटत होती. नवीन बाळाचा बारसा हॉलमध्ये नातेवाईकांना, शेजाऱ्यांना बोलावून केला.. मुलाचे नाव ठेवले  अधीर.
========सात वर्षानंतर =====
         आशू नऊ वर्षाचा आणि अधीर  सहा वर्षाचा. दोघे भाऊ एकमेकांशिवाय रहात नसतं. आशू शाळेत जाताना अधीरला संभाळून नेई..त्याचा डबा उघडून देई. कविताला छान वाटे. असेच दोन्ही भावांचे एकमेकांवर प्रेम असावे असे तिला वाटे.. पण मोठ्यांच्या प्रेमात फरक जाणवत होता.
 आजी अधीरला जवळ घेऊन खाऊ देई आणि आशूच्या हातावर टाकी.निरंजन साफ बदलला होता.आशुचा स्कॉलरशिप निकाल लागला आणि तो तालुक्यात पहिला आला.. कविताला रिजल्ट कळला तेंव्हा ती हरकून गेली. तिने नवऱ्याला फोन केला आणि ही आनंदाची बातमी सांगितली.
तिला वाटले होते.. नवऱ्याला पण आपल्यासारखा आनंद होईल.
पण त्याने शांतपणे रिजल्ट ऐकला आणि फोन ठेवला. संध्याकाळी ती पेढे घेऊन घरी गेली, तिने आशूला सांगितले.. आजीला पेढे दे आणि नमस्कार कर. आशू नमस्कार करायला गेला तेंव्हा तिने पेढे घेतले आणि बाजूला ठेवले.. किती मार्क्स.
वगैरे काही विचारलं नाही. आशू हिरमूसला. रात्री बाबा आल्यावर त्याने बाबांना पेढे दिले..
त्याने पण पेढे शांतपणे बाजूला ठेवले. पण अधीर दुसरी पास झाला तर त्याच्या बाबांनी गुलाब जामून वाटले बिल्डिंग मध्ये.
कविताला हे जाणवत होते, ती नवऱ्याला सांगत होती..हे बरे नव्हे.. आशू आणि अधीर यात भेदभाव असता कामा नये.. पण तो होतच होता. आशू सायकल शिकत होता.. त्याने अधीरला पुढे घेतले आणि प्याडल मारत होता.. सायकल स्लिप झाली आणि दोघे पडले. अधीरच्या पोटावर सायकल पडली आणि त्यावर आशू. अधीरला खुप लागले. गुढगे फुटले.. हात मुरगूळला.. आशू वर पडल्याने त्याला काही लागले नाही... दोघांना शेजाऱ्यांनी घरी आणले. आशूला काही लागले नाही आणि अधीरला बराच मार लागला हे पाहून त्याची आजी चिडली.. काय वाट्टेल तसे आशूला बोलायला लागली..'तू मुद्दाम पाडलंस अधीरला.. तुला तो नकोच असतो.. वेगळे रक्त ना तुझे.. कोण कुणाचे कोण जाणे.. छळ आहे नुसता.. कविता नुकतीच घरी येत होती.. आशू धावत तिला सांगायला आला.. तिने आशूला जवळ घेतले आणि ती अधीरकडे गेली.. त्याला डॉक्टरकडे घेऊन गेली.. गुढग्याला पट्टी मारून आणि गोळया घेऊन आली. रात्री निरंजन लवकर घरी आला.. त्याला बहुतेक त्याच्या आईने तिखटमीठ लाऊन सर्व सांगितले असणारं.. त्याने आशुच्या दोन थोबाडीत दिल्या. आशू रडतरडत कविताकडे आला.. कविता चिडली 
"का मारलस तू आशूला? तू त्याचा बाप आहेस म्हणून?
'मी बाप नाही त्याचा.. मी फक्त अधीरचा बाप आहे.. माझ्या मुलाला मुद्दाम पडलेलं मला आवडणार नाही.
'तू आशचा बाप नाहीस? अरे आशू शाळेत बाप म्हणून तुझं नाव लावतो.
', मला आवडत नाही ते.. कोण कुणाच्या पाप्याचे रक्त असेल कोण जाणे.. माझं नाव लावू नकोस म्हणावे..
"निरंजन.. एवढा बदललास.. का आणलं आपण आशूला? तो आपणहून आला नाही इथं.. त्याला दत्तक मुलगा म्हणून आणलंय.. त्या वेळी बरा सांगत होतास.. आपण योग्य निर्णय घेतला म्हणूंन.
"त्याला दत्तक घेण्याचा निर्णय तुझा होता.. मला नकोच होत हे पोर..
'मग पुण्याला अनाथाश्रमात कोण गेलं होत? बाप म्हणून कुणाची सही केली?
'मी केली असेल.. पण तूझ्या हट्टसाठी..
"ठीक आहे.. योग्य वेळी मी उत्तर देईन.
कविता आणि निरंजन यांच्यात अबोला आला.. जेवढ्यास तेवढे बोलणे होत होते.. ती अधीर आणि आशू यांना सारखेच खाऊ, कपडे, बूट आणायची. पण तिच्या लक्षात आले अधीरची आजी आता जास्त आपल्यकडे ओढायला लागली आहे.
          आशूला कांजण्या आल्या.. कांजण्यांनी तो फुलला.. ती त्यावर घरगुती आणि वैद्यचे उपचार करत होती. एक दिवस निरंजन चिडला 
'त्याचे इन्फेकशन अधीरला होईल.. त्याला दुसरीकडे ठेव नाहीतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिय कर.. पण अधीरला काही होता कामा नये...
 कविता चिडली 'होऊदे ना इन्फेकशन.. भावाचे भावाला होणारच.. तुला मागे कांजण्या आलेल्या, त्या मग मला नाही का आल्या?
'पण अधीरला..
'हो हो अधीरला.. तो माझाच मुलगा आहे.. मी त्याला जन्म दिलाय.. त्याची काळजी मला आहेच.. पण आशुची पण आहे कारण तो पण मुलगाच आहे माझा..
  त्या दिवसापासून अधीर आजीसोबत झोपू लागला. आजी अधीरची जास्त काळजी घेत होती.
त्यामुळे असेल पण अधीर जास्तीतजास्त वेळ आजीच्या खोलीत राहू लागला.
कविताची कुचम्बणा होत होती. केंव्हा केंव्हा तिच्या मनात यायचे.. आपण घाई केली का दत्तक घेण्याची.. पण दुसरे मन सांगत होते.. केली म्हणूनच आशु सारखा मुलगा मिळाला.
भाऊबीजेला निरंजनची बहीण सर्वाना बोलवी.. तिची छोटी मुलगी होती.. पियू.. बहीण निरंजनला ओवाळी आणि पियू या दोघांना. दरवर्षी पियू अधीरला किमती वास्तू देई आणि आशूला पेन किंवा पेन्सिल. लहान होते तेंव्हा आशुच्या हे लक्षात येत नव्हते पण आता त्याच्या लक्षात येऊ लागलेले.
या भाऊबीजेला पियूने अधीरला महागडी क्रिकेट बॅट दिली आणि आशूला बॉलपेन. आशुने अधीरच्या हातातील बॅट पाहिली... आपल्याला दिलेले पेन पाहिले आणि पेन फेकून दिले. निरंजनच्या बहिणीने हे पाहिले आणि ती आशूला मारायला धावली.
"भिकारड्या.. पेन फेकतोस..
दुसऱ्या क्षणी कविता नणंदे वर ओरडली
' खबरदार.. माझ्या मुलाला भिकारड्या म्हणालीस तर..
'तुझा मुलगा? कविता.. कोण कुठल्या बेवारशी मुलासाठी माझ्यावर चिडतेस.. दादाला सांगावे लागेल मला..
'अग जा.. दादाला सांगणारी.. अधीर व्हायच्या आधी आशुचेच लाड करायचीस ना.. माझ्या दादाचा कुलदीपक म्हणायचीस.. अधीर झाल्याबरोबर एवढी बदललीस.. या पुढे तूझ्या घरची पायरी चढणार नाही लक्षात ठेव..
अधीरला आणि आशूला घेऊन ती बाहेर पडली.
कविताला झोप येईनाशी झाली.. सासू, नवरा, नणंद सारीच बोलींनाशी झालीत.. काही तरी निर्णय घ्यायला हवा.. हे तिच्या लक्षात आले. आशु साठी तिचा जीव तडफडत होता.. या पोराला बापाचे, आजीचे प्रेम मिळतं नाही आहे.. जसजसा तो मोठा होईल तसे त्याला जास्त कळायला लागेल....
एक दिवस शाळेतून दोघेही एकदम आले. कविता रजेवर होती. आशु आईला म्हणाला..
"आई, मी तुझा मुलगा नाही काय?
तिला धक्काचं बसला..
"अरे कोण म्हणत अस? तू आमचाच मुलगा..
'अग ती शेजारची जांभळेकाकू सांगत होती... तू कविताचा मुलगा नाहीस.. तुला विकत घेतलंय तूझ्या आईबाबांनी.. अधीर त्त्यांचा मुलगा.. म्हणूंन त्याची आजी अधीरचे लाड करते.. तुझे नाही..
तिने आशूला जवळ ओढले "नाही रे बाळा.. लोक दुष्ट असतात.. काहिबाही सांगतात माझ्या बाळाला..
 एवढ्यात अधीर म्हणाला "होय आई.. मला पण रिक्षावाले मामा सांगत होते.. हा तुझा खरा भाऊ नाही म्हणूंन.. याला आश्रमातून आणलाय..
तिने अधीरला पण जवळ घेतले...
'लोक लबाड असतात माझ्या पिल्लानू.. लोकांना बरे बघवत नाही.. मी विचारते त्या जांभळे काकूंना आणि रिक्षा वाल्याला..
  मूल खेळायला गेली पण कविता खुप रडली. आपल्यामुळे आशूला अस ऐकावे लागते आणि यापुढे जास्त जास्त ऐकावे लागेल.. त्या मुळे या दोन भावात..
नको नको.. माझी मुले.. माझ्या मुलात दुरावा नको.. त्यासाठी मलाच उंबरठा ओलांडवा लागेल.
     आशु सहावीत गेला तसा तिने त्याचे नाव पुण्याच्या शाळेत घातले. आपली बदली पुण्यात करून घेतली.. पुण्यात भाडयाने लहानसा प्लॅट पाहिला.
घरी हे कुणाला माहित नव्हते.. तिने भरलेल्या बॅग पाहून निरंजन म्हणाला
'कुठे जाते आहेस काय? एवढ्या बॅगा?
", मी आशुचा हात पकडून घर सोडतेय?
"काय? डोके फिरलं का तुझं?
"डोके जाग्यावरच आहे.. निर्णय घेतलाय मी.. आशूला तुम्ही आपला मानत नाही... त्याच्यातील रक्त तुमचे नाही.. यात त्याचा काय दोष? त्याला आपण आणले नसते तर कुणी दुसऱ्याने गरजवंताने नेले असते.. पण तुमची गरज संपली कारण अधीर जन्मला.. मग काय.. गरज सरो अन वैद्य मरो.. पण मी त्याला टाकू शकत नाही कारण जसा अधीर माझा मुलगा आहे तसाच आशु पण माझाच मुलगा...
अधीर आता आजीकडेच असतो.. त्याला बाबा आहे.. आते आहे.. आशूला कोणच नाही आहे..आणि आता घरची तसेच आजूबाजूची लोक आशूला सांगायला लागली आहेत.. तू अधीरचा भाऊ नाहीस.. तुला विकत घेतलंय म्हणून.. काय परिणाम होत असेल त्याच्या मनावर? त्याने जर मला विचारले.. का घेऊन आलीस मला अनाथाश्रमातून, मी तेथेच बरा होतो.. तर काय उत्तर देऊ मी?
  निरंजन.. मी आशूला घेऊन पुण्याला शिफ्ट होतेय.. माझी बदली पुण्याला झाली आहे.. छोटे घर घेतलंय मी आम्हा दोघांपुरते.. मी या घराचा उंबरठा ओलांडतंय..
"म्हणजे कायमची चाललीस तू? आणि अधीर.. मी.. आई..
'नाही.. कायमची नाही.. येत जात असेन.. सणासुदीला येईन पण पाहुण्यासारखी... गरज असेल तेंव्हा मध्यरात्री हाक मार.. धावत येईन.. पण माझ्या आशुसाठी मला हा निर्णय घायलाच लागला..
   मी आणि आशू उद्याच पुण्याला जातोय.

 प्रदीप केळूसकर 9307521152/9422381299

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...