शनिवार, २५ जुलै, २०२६

3033. तेव्हा आणि आता

     तेव्हाच्या सगळ्याच गोष्टी वेगळ्या होत्या. तेव्हा छातीत सुभाषबाबू नि सावरकर भरलेले असत. हृदयाच्या स्पंदनातून सुभाषबाबू, सावरकर ऐकू येत. रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले?  हा दाहक सवाल तेव्हा तनामनाला बेचैन करीत राही नि 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूँगा' ही घोषणा ऐकली की पेटून उठलेले तरुण स्वतःच्या जीवनाची रक्तबंबाळ होळी करुन घ्यायला आतुर होत.
     काळ बदलला, 'तुम मुझे चुन दो, मैं तुम्हारा खून पीऊँगा' अशी नवी घोषणा वातावरणात निनादली आणि नेतारुपी गब्बरसिंग प्रजारुपी बसंतीचे हाल करत आपल्या हृदयातले 'शोले' शमवू लागला.  
     तेव्हाची गोष्टच वेगळी होती. आपल्याला धनुर्विद्या द्यावी, म्हणून द्रोणाचार्यांना एकलव्याने खूप विनविले. तथापि आचार्यांनी त्याला धनुर्विद्या दिली नाही. तेव्हा तो अतिशय मानी असलेला आदिवासी तरुण वनात परतला. त्याने द्रोणाचार्यांचा एक पुतळा बनविला आणि त्याने पुतळ्याला साक्षी ठेवून आपले धनुर्विद्येचे शिक्षण सुरु केले. तो त्या विद्येत पारंगत झाला आणि त्याने आपले धनुर्विद्येतील प्रभुत्व द्रोणाचार्यांपुढे सिद्ध केले आणि मग गुरुदक्षिणा म्हणून त्याने आपला अंगठा द्रोणाचार्यांना अर्पण केला.
     काळ बदलला.  आमच्याच एका मित्राकडे इंग्रजीचे इयत्ता बारावीचे पेपर्स तपासायला आले. त्याच्याकडे पेपर्स तपासायला आले की, आमचा हा मित्र आपल्या सासुरवाडीस मुक्काम ठोकतो. त्याचा सासरा पहेलवान आहे.  सासूबाई जावयाचा मानपान करण्यात 'वस्ताद' आहेत.  सासरा पहेलवान आहे हे सांगण्याचा मतलब असा की, सासऱ्याच्या संपूर्ण संरक्षणात याचे काम चालते. आमच्या मित्राची पत्नी म्हणजे आदरणीय वाहिनी मुख्यालयी असतात, म्हणजे आमच्याच गावी असतात आणि हा आमचा मित्र अन्यत्र त्याच्या सासुरवाडीस मुक्कामी असतो. आलेल्या गिऱ्हाईकांना वाहिनी आपल्या माहेरचा पत्ता देतात.  तुमचे काम तिथे गेल्यावर निश्चितपणे होईल, असा दिलासाही देतात.  तिथेच काम करुन घ्या व तिथेच 'पेमेन्टही' करा असा सल्लाही त्या गिऱ्हाईकाला देतात. असाच एक पालक यावर्षी वाहिनीसाहेबांच्या माहेरी पोहचला तेव्हा आमच्या मित्रात व त्या पालकात झालेला संवाद नम्रपणे नमूद करीत आहे-
पालक- नमस्कार सर.
आमचा मित्र- नमस्कार, नमस्कार या.
पालक- मी कशासाठी आलोय हे आपण ओळखलं असेलच.
आमचा मित्र- वा!  वा!  का नाही ओळखणार?  ईश्वर भक्ताच्या मनातले का कधी ओळखणार नाही?
पालक- पण सर माझी एका अडचण आहे.  माझ्याजवळ खरोखरच पैसे कमी आहेत.
आमचा मित्र- (विद्यार्थ्याच्या हातातील अंगठीकडे पाहत) काही हरकत नाही. माझ्यातली मानवता अद्याप मेली नाही.  तुमच्या मुलाच्या हातातील ही अंगठी सोन्याचीच तर दिसते. ती मला देऊन टाका नि थोडेसे पैसे आहेत म्हणता तर तेही देऊन टाका.  तुमचे काम करुन देण्याची जबाबदारी माझी.
पालक- पण सर, ती अंगठी त्याच्या जन्माचा आम्ही नवस बोललो होतो, त्याची आहे.  म्हणजे त्याच्या नवसाची आहे.  ती आम्ही कशी देणार?
आमचा मित्र- अहो, तुम्ही मला ईश्वर मानून इथे आलात ना?  आलात की नाही?  मग माझा नवस तुम्ही फेडायला नको का?  तुम्हाला एकलव्याची गोष्ट माहित असेलच. द्रोणाचार्यांनी एकलव्याला आपला अंगठा मागितला तरी एकलव्याने तो कापून दिला.  मी तर तुम्हाला मुलाचा अंगठा न मागता केवळ अंगठी मागतो आहे.  माझं काही चुकत असेल तर बोला.
     सरांनी दिलेल्या एकलव्याच्या दृष्टांताची पालकाने मग कदर केली. त्याने मुलाच्या बोटातली अंगठी काढून ती सरांच्या हातात ठेवली आणि सरांच्या युक्तिवादाबद्दल त्याने आपल्या मनातच सरांना चार मार्क्स अधिक देऊन टाकले.
     काळ बदलला.  माझी अत्यंत आवडती अभिनेत्री कै. नूतन हिच्याबद्दलचा हा किस्सा आहे.  बहुधा 'देवी' (1970) या चित्रपटाच्या सेटवरचा.  'शादी के लिए रज़ामंद कर ली, मैंने इक लड़की पसंद कर ली' हे त्या चित्रपटातलं मोहम्मद रफ़ीचं गाणं आजही अनेकांना आठवत असेल.  या चित्रपटाच्या सेटवर एकदा अभिनयसम्राट संजीवकुमार मद्यप्राशन करुन आला नि नूतनच्या अंगचटीला येऊ लागला. आपल्या नायकाची कदर म्हणून नूतनने त्याला योग्य शब्दात समज दिली. तरीही तो ऐकेना. तेव्हा तिने त्याच्या मुस्कटात दिली. वास्तव जीवनात तर काय पण चित्रपटात देखील तिने ओंगळवाणे अंगप्रदर्शन केले नाही. आपल्या शालिन अभिनयाची शाश्वत अशी छापमुद्रा तिने सिनेसृष्टीच्या कलदार रुपयावर उमटविली.
     काळ बदलला. सिनेसृष्टीपासून आपल्या घराण्यातील पोरींना दूर ठेवणाऱ्या कपूर घराण्यातील कपूरांविरुद्ध करिष्मा कपूर बंड करुन उठली नि 'राजाबाबू' मध्ये 'सरकाई लो खटिया जाड़ा लगे' अशी उत्तान तक्रार ती गोविंदाच्या अंगचटीला येत करु लागली. नूतनचा तेव्हाचा शालिन अभिनयाचा काळ मागे पडलाय, हे मायबाप प्रेक्षकांनी ओळखले आणि हिंदी सिनेसृष्टीत आता चांगल्या सिनेमाचे युग येणे हे केंद्रात काँग्रेसचे सरकार येण्याइतके कठीण आहे, याची खूणगाठ त्यांनी आपल्या मनाशी बांधली. 
 
✍️हेमंत देशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...