शनिवार, २५ जुलै, २०२६

3005. इंद्रजिताच्या ‘निकुंभला’ यज्ञाचे ते गूढ रहस्य

 इंद्रजिताच्या ‘निकुंभला’ यज्ञाचे ते गूढ रहस्य आणि बिभीषणाच्या एका निर्णयाने बदललेला इतिहास.
रामायणातील सर्वात गुप्त आणि भयावह स्थान कोणते होते, हे तुम्हाला माहिती आहे का? अशी एक यज्ञभूमी जिथे यज्ञ पूर्ण झाला असता तर कदाचित लंकेच्या युद्धाचा इतिहासच बदलला असता आणि जिथे पोहोचण्यासाठी प्रभू रामांच्या सैन्यालाही एका अतिशय गुप्त रहस्याचा आधार घ्यावा लागला! आश्चर्याची गोष्ट म्हणजे रामायणातील हा प्रसंग अनेकांना माहिती असला, तरी त्या यज्ञभूमीमागील रहस्य, तिथे घडलेला भावनांचा संघर्ष आणि नियतीचा तो विलक्षण खेळ फार कमी लोकांना माहीत आहे.
श्रीलंकेच्या मध्यभागात पसरलेल्या अक्राळविक्राळ पर्वतरांगा आणि आजच्या 'नुवारा एलिया' किंवा 'मुन्नेश्वरम' परिसरातील ती घनदाट अरण्ये आजही एक अनाकलनीय गूढ स्वतःमध्ये दडवून आहेत. आज हा परिसर जरी हिरवागार आणि निसर्गरम्य वाटत असला, तरी त्रेतायुगात इथली भौगोलिक परिस्थिती अत्यंत भयावह आणि दुर्गम होती. उंचच उंच काळ्याभिन्न खडकांवरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे, जिथे भर दुपारीही सूर्याचा एकही किरण जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही अशी दाट, अभेद्य झाडी आणि विषारी सर्प व हिंस्त्र श्वापदांनी वेढलेला तो मायावी मार्ग.
याच भीषण एकांतात आणि एका अंधाऱ्या, खोल गुहेच्या पोटात लपलेली होती ती मृत्यूची सावली 'निकुंभला'. 
अनेकांचा असा गैरसमज असतो की निकुंभला हे केवळ देवीचे नाव आहे, पण वास्तवात ती लंकापती रावणाच्या साम्राज्यातील एक अशी अत्यंत गुप्त आणि अभेद्य यज्ञभूमी होती, जिथे साक्षात मृत्यूही प्रवेश करायला घाबरायचा. या यज्ञशाळेचा रस्ता इतका गुंतागुंतीचा होता की लंकावासीयांनाही त्या स्थानाबद्दल नेमकी माहिती नव्हती.
पण इथेच एक प्रश्न उभा राहतो.
इतक्या विशाल साम्राज्याचा युवराज असलेल्या इंद्रजिताने हा यज्ञ लंकेतील एखाद्या भव्य मंदिरात किंवा राजप्रासादात करण्याऐवजी या अंधाऱ्या आणि दुर्गम गुहेतच का सुरू केला असेल?
त्या गुहेत असे कोणते रहस्य दडले होते, ज्यासाठी लंकेचा सर्वात पराक्रमी योद्धा वारंवार इथे येत होता?
कदाचित याचे उत्तर काळाच्या पडद्याआड हरवले असेल. पण अनेक प्राचीन परंपरांमध्ये असे संकेत आढळतात की निकुंभला हे केवळ यज्ञस्थळ नव्हते, तर अत्यंत शक्तिशाली साधना आणि उपासनेचे केंद्र मानले जात असे. म्हणूनच कदाचित इंद्रजिताने आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा यज्ञ याच ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला होता.
याच रहस्यमयी आणि दुर्गम निकुंभलेच्या अंधाऱ्या गाभाऱ्यात रावणपुत्र इंद्रजित आपला सर्वात शक्तीशाली यज्ञ करत होता.
तांत्रिक वनस्पती एकमेकांत मिसळून एक गुदमरून टाकणारी हवा त्या गुहेत तयार झाली होती. अंगावर काटा आणणारा मंत्रांचा अस्पष्ट घोष त्या ओल्या, शेवाळलेल्या भिंतीं आणि त्यावर रिफ्लेक्शन (यासाठी मला मराठी शब्द सुचत नाहीये ) होऊन पुन्हा परत येणारा तो आवाज.
त्या काळोख्या गुहेत प्रकाशाचा एकमेव स्रोत म्हणजे मध्यभागी धगधगणारे अग्निकुंड!
त्या ज्वाळांच्या प्रकाशात उजळून निघत होती एक भयंकर पण तेजस्वी आकृती लालबुंद विस्फारलेले डोळे आणि अत्यंत रौद्र रूप असलेली साक्षात भद्रकाली.
तिच्यासमोर गुडघे टेकून बसला होता तो त्रैलोक्याला सळो की पळो करून सोडणारा इंद्रजित.
पण आज त्याच्या चेहऱ्यावर क्रौर्य नव्हते.
कपाळावरून घामाच्या धारा ओघळत होत्या आणि डोळ्यांत एकच आर्त हाक होती आपल्या पित्याचे रक्षण करण्याची. (आपल्यासाठी ही भावना थोडी विपरीत असू शकते परंतु तो त्याच्या वडिलांसाठी हे करत होत आहे हे विसरता येणार नाही )
त्याच्या डोळ्यांसमोर आपले काका कुंभकर्ण आणि इतर शूरवीर भावांचे युद्धभूमीवर वीरगती प्राप्त झालेले देह तरळत होते. आपल्या अजेय पित्याच्या, रावणाच्या चेहऱ्यावरील पराभवाची ती चिंता त्याला आतून खात होती. इतिहासाने इंद्रजिताला रावणाचा पुत्र म्हणून लक्षात ठेवले, पण त्या क्षणी तो फक्त एक योद्धा नव्हता. तो आपल्या साम्राज्याला वाचवण्यासाठी झगडणारा एक पुत्र होता.
म्हणूनच आज त्याने स्वतःच्या प्राणांची बाजी लावून ही अत्यंत कठोर तपस्या आरंभली होती.
हा यज्ञ पूर्ण होणे म्हणजे साक्षात प्रभू रामचंद्रांच्या सैन्यासाठी मोठे संकट तयार होणे. कारण या यज्ञाच्या आहुतीतून इंद्रजिताला असा एक अजेय रथ आणि दैवी अस्त्रे मिळणार होती, जी त्याला युद्धभूमीत जवळजवळ अजेय बनवणार होती. आणि इथेच या संपूर्ण कथेला सर्वात मोठे गूढ वळण मिळते...
कल्पना करा...
जर त्या क्षणी हा यज्ञ पूर्ण झाला असता तर?
जर भद्रकाली प्रसन्न झाली असती आणि इंद्रजिताला तो दिव्य रथ प्राप्त झाला असता तर?
काही क्षण उशिर झाला असता तर?
कदाचित लंकेच्या रणांगणावर इतिहासाने वेगळीच दिशा घेतली असती. कदाचित युद्ध आणखी प्रदीर्घ झाले असते. कदाचित रामायणातील सर्वात भीषण युद्धप्रसंग त्यानंतर घडले असते.
काळे तीळ, जास्वंद आणि विशिष्ट वनस्पतींच्या आहुती अग्नीत पडत होत्या आणि भद्रकालीची ती रौद्र मूर्ती जणू आपल्या या लाडक्या भक्ताची कठोर परीक्षा घेत होती.
आजूबाजूच्या किर्रर्र जंगलात पानांची सळसळही थांबली होती.
जणू संपूर्ण निसर्ग एखाद्या निर्णायक क्षणाची वाट पाहत होता.
देवी आता प्रसन्न होणार आणि रथाची प्राप्ती होणार...
इतक्यात काळजाचा ठोका चुकवणारी एक गर्जना झाली !
तो आवाज वानरसेनेचा होता. प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेने आणि बिभीषणाने दिलेल्या त्या गुप्त भौगोलिक मार्गाच्या माहितीमुळे, लक्ष्मणाने आणि मारुतीरायाने तो दुर्गम मार्ग पार करून थेट निकुंभलेत प्रवेश केला होता. यज्ञाचे पावित्र्य भंग केल्याशिवाय इंद्रजिताला हरवणे शक्य नाही, हे ओळखून वानरसेनेने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. डोळे मिटून, पूर्ण एकाग्रतेने आणि नि:शस्त्र अवस्थेत आहुती देणाऱ्या इंद्रजिताच्या कानावर जेव्हा यज्ञमोडाचे ते भीषण आवाज पडले, तेव्हा त्याच्या काळजात चर्रर्र झाले.
मारुतीरायाने आणि इतर वानरांनी तो सुरू असलेला तांत्रिक यज्ञ कसा बंद होईल याचा बंदोबस्त केला. शस्त्रांच्या खणखणाटाने आणि वानरांच्या त्या विध्वंसक हल्ल्याने निकुंभलेचे ते गूढ वातावरण एका क्षणात विस्कळीत झाले. ज्या संकल्पाने त्याने यज्ञ सुरू केला तो तिच्याच समोर त्याच्या तपस्येचा असा क्रूर भंग झाला. इंद्रजिताच्या डोळ्यांतून त्यावेळी जो संताप, हतबलता आणि वेदना उसळून आली असावी. पण कदाचित त्याहून मोठी वेदना दुसरीही असू शकते.
यज्ञ मोडल्याची नव्हे..
तर संकल्प पूर्ती न होणे.
त्या क्षणी इंद्रजिताच्या मनात नेमके काय चालले असेल?
संताप?
हताशा?
वेदना?
की नियतीपुढे हतबल झालेल्या एका पुत्राचे मौन?
याचे उत्तर आज कोणाकडेही नाही.
भद्रकाली शांत होती.
कारण तीच या विश्वाची चित्कला आहे ? 
आज हजारो वर्षांनंतरही श्रीलंकेत या परंपरांची आठवण काही मंदिरांमध्ये जिवंत असल्याची श्रद्धा आढळते. पूर्व किनाऱ्यावरील त्रिंकोमाली येथील पाथिराकाली अम्मान मंदिर आणि चिलाव परिसरातील मुन्नेश्वरम मंदिर संकुल यांचा उल्लेख अनेकदा या संदर्भात केला जातो. स्थानिक परंपरा, लोकश्रद्धा आणि रामायणाशी जोडल्या गेलेल्या कथा या परिसराला एक वेगळेच गूढत्व प्रदान करतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे निकुंभलेचे नेमके स्थान आजही निश्चितपणे ज्ञात नाही. श्रीलंकेतील अनेक प्रदेश स्वतःला त्या आख्यायिकेशी जोडतात.
पण सत्य नेमके कुठे दडले आहे?
ती गुहा नेमकी कुठे होती?
इंद्रजिताचा यज्ञ जिथे झाला, ते स्थान आजही अस्तित्वात आहे का?
की काळाच्या ओघात ते कायमचे हरवून गेले?
या प्रश्नांची निश्चित उत्तरे आजही काळाच्या उदरात लपलेली आहेत.
कदाचित म्हणूनच निकुंभलेचे रहस्य आजही जिवंत आहे.
कारण ती फक्त एका यज्ञाची कथा नाही.
ती श्रद्धा, कर्तव्य, नातेसंबंध, विश्वास आणि नियती यांच्या संघर्षाची कथा आहे.
आणि म्हणूनच हजारो वर्षांनंतरही रामायणातील हा प्रसंग लोकांच्या मनात तितक्याच उत्कंठेने जिवंत आहे.
तुम्हाला काय वाटते, निकुंभलेचा गुप्त मार्ग आज शोधता येईल काय? निकुंभला एक गुफा होती? एखादी प्राचीन रसशाळा....

@topfans श्री चित्कला विमर्शन पीठम् Shri Chitkala Vimarshna peetham Rajiv Bonde



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...