ती फक्त दहा वर्षांची होती. स्मिथ फॅमिली मधे जन्मलेली एक लहान मुलगी! नाव होतं टिली स्मिथ! इंग्लंड मधील सरे नावाच्या गावांत ती रहात होती. टिली नेहमीप्रमाणे त्या दिवशी शाळेत गेली. टिलीचे भूगोलाचे शिक्षक मिस्टर कार्नी वर्गात आले. भूगोलाचा तास सुरू झाला. सर सुनामी म्हणजे काय हे मुलांना शिकवत होते.
सरांनी १९४६ मध्ये हवाईला उद्ध्वस्त करणाऱ्या भयानक सुनामीचं कृष्णधवल फुटेज मुलांना दाखवलं.
सुनामी येण्यापूर्वी समुद्रात काय काय बदल दिसतात हे उलगडून सांगितलं.
समुद्र अनैसर्गिकरीत्या कसा मागे मागे जातो, त्याचं पाणी कसं फेसाळतं, आणि समुद्राचं वर्तन कसं विचित्र होत जातं हे सगळं सर उत्तम प्रकारे शिकवत होते.
आणि टिली जीवाचे कान करून ऐकत होती.
दोन आठवड्यांनी ख्रिसमसची सुट्टी सुरू झाली. टिली अतिशय आनंदात होती कारण तिचे आई बाबा तिला सुट्टी साठी थायलंडला घेऊन गेले होते. हा तिचा पहिलाच परदेश प्रवास होता.
ते फुकेट मध्ये पोचले. फुकेट हे थायलंड देशाच्या दक्षिण भागातील एक अतिशय सुंदर आणि लोकप्रिय बेट आहे. तेथील पांढऱ्या वाळूचा समुद्रकिनारा आणि निसर्गरम्य अशा माई खाओ नावाच्या बीचवर ते पोचले.
साधारण शंभर लोकांना सामावून घेईल असा तो बीच होता व पूर्णपणे भरला होता.
हवा अतिशय छान होती.
पण टिलीला काहीतरी बरोबर नाही असं वाटू लागलं.
तिच्या लक्षात आलं.
समुद्राचं पाणी अजिबात शांत नव्हतं.
ते आत-बाहेर न करता फक्त आत आतच जात होतं.
समुद्र फेसाळला होता.
“बिअरवर जसा फेस येतो तसा समुद्र फेसाळला आहे..” ती आई बाबांना म्हणाली..समुद्र अनैसर्गिकरीत्या मागे जाणं, फेसाळ पाणी, समुद्राचं विचित्र वर्तन सारं काही ती दोन आठवड्यांपूर्वीच भूगोलाच्या वर्गात नुकतीच शिकली होती..
“सुनामी येणार आहे…सुनामी येणार आहे” ती जोरजोरात ओरडू लागली..
पण तिच्या आई-बाबांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही कारण त्यांना समुद्रात एकही लाट दिसत नव्हती. आकाश स्वच्छ होतं. बीच शांत होता.
“मी जाणार आहे इथून.. सुनामी येतय..” टिली घाबरून गेली होती.
तिच्या कापऱ्या आवाजातील भीती तिच्या बाबांना जाणवली व त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवण्याचे ठरवले. शिवाय तिथे बीचवर एक जपानी माणूस उभा होता त्याने टिलीचे बोलणे ऐकलं. तो बाबांना म्हणाला, “तुमची मुलगी बरोबर सांगते आहे ! सुमात्रामधे भूकंप झालाय ही बातमी मला नुकतीच मिळाली आहे!”
टिलीच्या बाबांनी ते ज्या हॅाटेलमधे रहात होते त्या स्टाफला सुनामीबद्दल सांगितलं. त्यांनी लगेच बीच रिकामा करायला सुरुवात केली.
सारे बीचवरून बाहेर पडण्यासाठी धावू लागले..
आई, बाबा, टिली पण धावत होते..
टिलीची आई मागे पडली होती. पाणी तिच्या मागून प्रचंड वेगाने येऊ लागलं तेव्हा तिला पळू लागली..आपण आता मरणार असं वाटत होते पण ती पळत राहिली..
नशीबानं ते त्या हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचले.
आणि मग ती प्रचंड लाट आली…३० फूट उंच.
बीचवरील सारं काही..खुर्च्या, नारळाची झाडं, कचरा..सारं काही वाहून गेलं.
२६ डिसेंबर २००४ च्या सुनामी मध्ये १४ देशांतील २३०,००० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले.
फुकेटच्या प्रत्येक बीचवर हजारो लोक मरण पावले.
पण
माई खाओ बीचवर एकही जीव गेला नाही…
कारण
एका दहा वर्षांच्या मुलीने भूगोलाचा धडा वर्गात लक्ष देऊन ऐकला होता.
टिलीला “एंजेल ऑफ द बीच” म्हणून गौरवण्यात आलं. तिला मरीन सोसायटीचा थॉमस ग्रे स्पेशल अवॉर्ड, “चाइल्ड ऑफ द इयर” घोषित केलं. युनायटेड नेशन्स मध्ये तिचं भाषण ठेवलं गेलं.. आज टिली ३० वर्षांची आहे. ती लंडनमध्ये राहते आणि याट चार्टरिंगमध्ये काम करते.
ती आजही तिच्या भूगोलाच्या सरांचे आभार मानते. “मिस्टर कार्नी नसते तर मी आणि आई बाबा आज जिवंत नसतो.”
दोन आठवडे..
एक धडा..
शंभर जीव..
हे वर्गात लक्ष देऊन ऐकण्यातलं सामर्थ्य आहे. शिक्षणातील सामर्थ्य आहे..
शाळेतला एक साधा धडा..
जीवन आणि मृत्यू साठी कारणीभूत ठरला..
“वर्गात लक्ष दे” माझी आई मला रोज शाळेला जाताना सांगायची. वर्गात शिकवलेलं किती लक्षात आहे ते पण नेहमी विचारायची..
आपणही मुलाबाळांना “वर्गात लक्ष दे” सांगण्यास विसरू नका !
©® ज्योती रानडे
2026JyotiRanade. All rights reserved.
सत्य घटना
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा