रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

9. थोडसं तुमच्या जीवनसाथीविषयी

     बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट असावी. चारचौघीत उठून दिसावी अशी तमाम नवरेमंडळींची इच्छा असते. यासोबत तिने "गृहकृत्यदक्ष" आणि "आदर्श सून" असणंही सक्तीचं असतं. पण तीही आपल्यासारखीच एक माणूस आहे. तिच्या भावभावना, इच्छा-आकांक्षा, तिची परिस्थिती कशी असू शकते याकडे मात्र या नवरेलोकांचं दुर्लक्ष होतं. नवऱ्याचा बायकोकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा असावा?
     उद्या कदाचित तुझं नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न होईल त्यावेळी जरा हे वास्तवही लक्षात घे. ती तुझ्याएवढीच शिकलेली असेल. तुझ्याएवढाच पगार कमवत असेल. ती देखील तुझ्यासारखीच व्यक्ती असेल, त्यामुळे तिचीही स्वप्न असतील, आवडी असतील. तिनेही आतापर्यंत किचनमध्ये पाऊल टाकलं नसेल, अगदी तुझ्यासारखं किंवा तुझ्या बहिणीसारखं. तीसुध्दा अभ्यासात व्यस्त असेल आणि मुलगी म्हणून कसलीही सवलत न देणाऱ्या या स्पर्धेच्या युगात पुढे जाण्यासाठी धडपडत असेल, अगदी तुझ्यासारखीच ! तिनेही तुझ्याप्रमाणेच वयाची २०-२५ वर्षे आई, बाबा, बहीण, भाऊ यांच्या प्रेमाच्या सान्निध्यात घालवली असतील आणि तरीही हे सारं मागे सोडून तिचं घर, प्रेमाची माणसं यांना दूर करुन ती तुझं घर, तुझं कुटुंब, तुमच्या रितीभाती स्वीकारायला आली असेल.
     पहिल्याच दिवशी तिने मास्टर शेफप्रमाणे स्वयंपाक करावा अशी सगळ्यांची अपेक्षा असेल. नेहमीच्या बेडवर तुम्ही डारडूर झोपले असताना ती मात्र सर्वस्वी अनोळख्या असलेल्या वातावरणाशी, अनुभवांशी आणि किचनशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असेल. सकाळी उठल्याबरोबर तिने चहाचा कप हातात द्यावा आणि रात्रीचं जेवणही तिच्याच हातचं असावं अशी अपेक्षा असेल. तिलाही ऑफिसच्या कामाच्या डेडलाईन पाळताना उशीर होत असेल. तीसुध्दा कंटाळली असेल, कदाचित तुमच्यापेक्षा थोडी जास्तच, तरीही तिने तक्रारीचा सूर लावू नये, असे तुम्ही म्हणाल. नोकर, स्वयंपाकी, बायको यापैकी तिला एखादी भूमिका करायची नसली तरीही आणि त्यातही तुमच्या तिच्याकडून काय अपेक्षा आहेत हे देखील शिकण्याचा ती प्रयत्न करीत राहील.
     ती सुध्दा थकते, कंटाळते पण सतत टुमणं लावू नये आणि तुझ्यापेक्षा पुढे जाऊ नये या अपेक्षाही तिला माहिती असतात. तिचा स्वत:चा कंपू असतो. त्यात मित्रही असतात आणि तिच्या ऑफिसमधले पुरुष सहकारीही. तरीही इर्ष्या, अनावश्यक स्पर्धा आणि असुरक्षिततेच्या भावनेने तुमच्या मनात घर करु नये म्हणून ती बालमित्रांपासूनही दूर राहते. कदाचित तिलाही लेट नाईट पार्टीत जायला, धमाल करायला आवडत असेल पण तुम्हाला आवडणार नाही म्हणून तू सांगितलेलं नसतानाही ती तसं करत नाही.
     आपल्या या अनोळखी घरात केवळ आपण एकच तिच्या ओळखीचा, जवळचा असतो. त्यामुळे आपली मदत, संवेदना आणि सर्वात जास्त महत्वाचं म्हणजे समजून घ्यावं आणि प्रेम मिळावं अशी तिची अपेक्षा असेल. पण अनेकजण हे समजूनच घेत नाहीत. स्वत:कडून पूर्ण प्रयत्न करुन ती हे नात सुंदर करील, तुम्ही मदत केली आणि विश्वास ठेवला तर हे नातं जीवनातलं सर्वाधिक यशस्वी शिखर गाठू शकेल.
 
लेखक : अज्ञात 
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील 

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...