गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०२३

265. सोसायट्यांना आधार मोबाईल अप्लिकेशनचा...

     तेजस सोसायटीत एकट्या राहाणा-या आजीबाई खोलीत कोंडल्या गेल्या होत्या. दाराची कडी निघत नव्हती. विस्मरणामुळे लँण्डलाईन असूनही मुलाला फोन लावता येत नव्हता.  सांभाळणारी परिचारिका रजेवर होती. मुलगा बंगलोरला. आजीबाई कंटाळल्या होत्या. वैतागल्या होत्या. दिवसभर खोलीत बसून राहिलेल्या  आजींच्या मुलाने ख्यालीखुशाली विचारण्यासाठी रात्री फोन केला. पावसामुळे लँण्डलाईन खंडित झालेल्या. आता काय करायचे ? मुलगा चिंताग्रस्त झाला. त्याच्या मोबाईलमध्ये सोसायटीचे एक अँप होते. ते त्याने उघडले. सदस्यांना सूचना देणा-या फोल्डरमध्ये तो गेला.  घरात आईचा प्रतिसाद मिळत नाही.  कृपया मदत करावी. असा संदेश त्याने लिहीला. क्षणार्धात हा निरोप सोसायटीत पोहोचला. काही जागरुक सदस्य आजीबाईंच्या घराशी धावून गेले. कोंडल्या गेलेल्या आजीबाईंची त्या सदस्यांनी शिताफीने सुटका केली.  पुण्यामध्ये गेल्या आठवड्यात उघडकीस आलेली ही घटना मोबाईल अँपचे महत्व अधोरेखित करणारी ठरली,   सोसायटी सदस्यांच्या मदतीला धावून जाणारी अशी कितीतर अँपस सध्या विनामूल्य म्हणजे अगदी फुकट उपलब्ध आहेत.  डिजिटल व्यवस्थापनाकडे वळणा-या देशभरातील हजारो गृहनिर्माण संस्थांना ही मोबाईल अँप्स म्हणजे वरदान ठरल्याची अनेक उदाहरणे सध्या वर्तमान पत्रातून वाचालयला मिळत आहेत.
 गूगल सर्चमध्ये गेल्यास
1 सोसायटी मँनेजर,
2 माय सोसायटी,
3 सोसायटी फंडा, 
4 अपार्टमेंट अड्डा,
5  ट्र् इन ( true in )
6  क्लाऊड सोसायटी,  टीजेएसबी, 
7 स्मार्ट सोसायटी, 
8  सोसायटी टेक,
9  सोसायटी नाऊ 
        अशी कितीतरी अँप सध्या पाहायला मिळतात. परंतु तांत्रिक अज्ञानामुळे सदस्यांना अथवा सोसायट्यांना ती सहजपणे वापरात आणता येत नाहीत. असे आत्मसात करता येत नाहीत. असा अनुभव अनेकांना येतो. त्यासाठी त्यातील सुविधांची माहिती घेऊन थोडा अभ्यास करावा लागतो. थोडा सरावही करावा लागतो. हे लक्षात घेतले तर ही अँप्स एखाद्या देवदूताप्रमाणे धावून येतात असा अनुभव अनेकांना आला आहे.  संगणक साक्षरतेचे प्रमाण अधिक असलेल्या पुण्यातील किमान शंभर तरी सोसायट्या सध्या अशा अँपचा सुलभतेने वापर करतांना आढळतात. त्याचा फायदा घेतात. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांमध्ये मोबाईल अँप्सची चळवळ आता रुजू लागली आहे असे लक्षात येते.  विशेष म्हणजे आता बँकांनीही सोसायट्यांसाठी मोबाईल अँप डिजिटल बाजारपेठेत आणली आहेत. कोटक आणि टीजेएसबी या बँकाची अँप्स सध्या कमालीची लोकप्रिय ठरत आहेत.  या बँका सोसायटीच्या व्यवस्थापन समितीला विनामूल्य ही संगणक प्रणाली उपलब्ध करून देतात.  सदस्यांकडून मेन्टेनन्स वसून करून देतात. धनादेश आणि खाते उतारा  या सुविधा निशुल्क उपलब्ध करून देतात.  सोसायटीच्या ठेवींवर इतरांपेक्षा अधिक आकर्षक व्याज देतात.  शिल्लक रकमेवरही व्याज देतात.  या अँप्सवर बहुतेकांनी सदस्यांसाठी तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित केली आहे.  मेन्टेनन्स भरल्याचा संपूर्ण तपशील पाहाण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे.  व्यवस्थापन समितीच्या मासिक सभा किवां वार्षिक सर्वसाधारण सभा यांच्या नोटीसा आँनलाईन पाठविण्याची व्यवस्था या अप्समध्ये करण्यात आली आहे. हरवलेले वाहन, पार्किंगचा तपशील, एखाद्या विषयावर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ, त्यावरील मतदान , आवारात येणारे दूधवितरक, पेपर टाकणारी मुले, घरकाम करणारा सेवकवर्ग, सफाई सेवक, पोष्टमन, फुलं, भाजी विक्रेते अशा सर्वांचा तपशील या अँपमध्ये उपलब्ध असतो. वाहनाचे पंक्चर काढणारे,  प्लंबर, वायरमन, सर्पमित्र , टाक्या धुणारे यासारख्या सेवा देणा-या व्यक्ती व संस्थांचे फोन क्रमांक पत्ते इत्यादी उपयुक्त माहिती हे या अँप्सचे आगळेवेगळे वैशिष्ठ्य ठरले आहे,  पुण्यामध्ये सध्या सोसायटी नाऊ नावाचे मोबाईल अँप कमालीचे लोकप्रिय होत आहे.  असे आढळून आले आहे. त्यामध्ये सोसायटीने उपलब्ध करून दिलेल्या सुविधा, सुरक्षारक्षकांचे व्यवस्थापन, मेटेनन्ससह गंगाजळी  इत्यादीचा जमाखर्च व परिसरात मिळणा-या सेवा असे चार भाग सोसायटी नाऊ या अँपमध्ये करण्यात आले आहेत. त्याशिवाय एखाद्या उपक्रमाची घोषणा करणे. मदतीसाठी हेल्प डेस्क, दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगचे व्यवस्थापन. क्लबहाऊस अथवा क्रिडांगणाचे आगाऊ बुकिंग, पिझा हटस, झोमँटो यासारख्या भोवतालच्या परिसरातील सेवा. लाँन्ढ्री किराणा दवाखाना यासारख्या सेवांशी थेट संपर्क. मेटेनन्स किंवा भाडे वसुली व त्याचा तपशील.  वीज टेलीफोन बिल भरण्याचे व्यासपीठ. येणा-या पाहुण्यांची नोंद. त्यांचे सोसायटीतील लोकेशन, फोटो. सोसायटी सेवकांची हजेरी, सुरक्षा रक्षकांची हजेरी. गेटपास. अशा अनेक सुविधा विनामूल्य मिळत असल्याने सोसायटी नाऊ या अँपला सध्या सोसायट्यांकडून मागणी आहे. 
जगभर तुम्ही कुठेही फिरत असलात तरी तुमच्या मोबाईलवर सोसायटीचे कँमेरे जोडलेले असतात. त्यामुळे घराकडे तुम्हाला सहजपणणे लक्ष देता असे असा नवा प्रयोग या अँपमध्ये सुरु झाला आहे.  त्यामुळे डिजिटल साक्षरतेचा पुढचा टप्पा म्हणून या सुविधेकडे प्रगतशील समाज पाहात आहे.  अँन्ड्राईड सेंट्रल नावाचे एक पाक्षिक आहे. त्यात या अँप्सची अभ्यासपूर्ण माहिती देण्यात आली आहे. त्याचे संपादक फिल निकीन्सन म्हणतात की “ Your  mobile device has Quickly become the easiest portal into your digital self.”
 सोसायट्यांमधील मोबाईलचे जग झपाट्याने बदलते आहे असाच त्याचा मतितार्थ आहे.
-----------------------------------------------------------------------------
विकास वाळुंजकर
ज्येष्ठ पत्रकार
vikasvalunjkar@gmail.com
सोसायटी साठी उपयुक्त माहिती आहे. आपणांस याचा उपयोग करून घेता येऊ शकतो.

शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०२३

264. भगवंताची मिठी

            भगवंताचं होणं ....... सोप्प नसतं हो भगवंताचं होणं... प्रचंङ निरागसता लागते... स्वच्छ मन लागतं. तुम्ही कधी भगवंताला मिठीत घेतलय का? नाही ना..... कधी सहज म्हणुन कुणाला निरपेक्ष मदत केलीय का? करून बघा.... भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल. अतिव दुःखात कुणाला आधार दिलाय का? देऊन बघा..... भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल. कुणाच्या उत्कर्षाचं कारण व्हा....... कुणाच्या यशात भक्कम साथ द्या....... भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल. कुणी कुणाचं नसतं हो..... तरीही कुणाचंतरी व्हायला काय हरकत आहे? आई नसलेल्याची आई व्हा..... कुणाची ताई व्हा...... कुणाचा बाप व्हा तर कुणाचा भाऊ.... मग बघा.... भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल. कुणाच्या चेहऱ्यावरचं हास्य बना..... कुणाचे अश्रूंनी तुङुंब भरलेले डोळे पुसा.... मग बघा.. भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल.  वार्धक्याने थकलेल्या पायांना तुमच्या हातांची ऊब द्या..... थरथर कापणारे हात समाधानाने आशिर्वाद देतील..... मग भगवंताने स्वतःहुन मिठी मारल्यासारखं वाटेल. आज प्रत्येक जण पैसे कमवायच्या मागे लागलाय..... स्वतःच स्टेटस वाढवायचय प्रत्येकाला.... कुणाच्यातरी आयुष्यात आपल्या वाटणीचा ओंजळभर आनंद देऊन तर बघा.... खात्रीने सांगतो त्यांच्या मनातलं तुमचं स्टेटस खुप ऊंचावर असेल.... अन् त्याच वेळेस भगवंताच्या मिठीची चाहुल लागेल.... व्याकुळ नजरेने पाहत असलेल्या मुक्या जनावरांना पाणी द्या.... अन्न द्या.... ते आमरस नाही हो मागत.... तुम्ही दिलेल्या शिळ्या पोळीतच ते खुष असतात...... कधी स्वतः जवळची ताजी पोळी देऊन तर बघा...... भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल. आपल्याकङे आपलं असं काय आहे? .... भगवंतानीच दिलेल्याचा आपण तोरा मिरवतो...... मग त्यानी दिलेलं ..... कघी कुणाला मनापासुन द्या....... मग बघा ..

"भगवंत मिठी मारल्याशिवाय राहणार नाही"
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

263. प्रारब्ध व संगत ....

        एका भुंग्याची शेणातल्या किड्याशी गट्टी जुळली. पुढे त्यांच्यातली मैत्री खूप गाढ होत गेली. एके दिवशी किडा भुंग्याला म्हणाला, " अरे तू माझा सर्वात आवडता आणि जवळचा मित्र आहेस. तर उदया तू माझ्या घरी जेवायला ये." भुंगा दुस-या दिवशी तडक त्याच्याकडे गेला पण नंतर विचारात पडला की मला चुकीची संगत लाभली म्हणून आज शेण खायची सुद्धा वेळ आली. आता भुंग्याने किड्याला त्याच्या स्थळी येण्याचं आमंत्रण दिलं की तू उदया माझ्याकडे ये.
           दुस-याच दिवशी सकाळी किडा भुंग्याकडे गेला. भुंग्याने येताच क्षणी त्याला उचलून गुलाबाच्या फुलात बसवलं. किड्याने परागरस चाखला.किती भाग्यवान मी!...अस म्हणून तो मित्राचे आभार मानतच होता इतक्यात शेजारच्या मंदिरातील पुजारी आला. ते गुलाब तोडलं आणि मंदिरातल्या देवाच्या चरणांवर अर्पण केलं. किड्याला भगवानाचे दर्शन झालं. तो धन्य झाला कारण त्यांच्या पायाजवळ बसण्याचं सौभाग्य लाभलं. संध्याकाळी पुजा-याने सगळी फुलं एकत्र करून गंगेत विसर्जित केली. आता किडा स्वतःच्या नशीबावर हैराण होता. इतक्यात भुंगा उडत उडत किड्याजवळ आला आणि म्हणाला. "भाऊ, काय चालू आहे मनात?.." किडा म्हणाला, "बंधू , जन्मोजन्मीच्या पापांची मुक्ती झाली. प्रारब्धातून सुटलो एकदाचा..हे सर्व चांगल्या संगतीचं फळ आहे.
            सांगायच तात्पर्य हेच की कोणालाच जीवनाच्या कोणत्या वळणावर आपली कोणाशी गाठभेट होणार आहे याची पूर्वकल्पना नसते. प्रत्येकाशी आपलं रक्ताचं नातं असू शकत नाही म्हणून ईश्वरी कृपेने काही माणसं अद्भुतरित्या आपल्या जवळ येतात जसं की नदीच्या प्रवाहात वाहताना दोन ओंडके अचानक एकत्र येतात. सोबत कुठपर्यंत असेल ते काहीच निश्चित नाही पण काही काळ एकत्र प्रवास होऊन पुढे वेळ आल्यावर विलग होतात. अशी नाती खरंच अद्भुत असतात पण फक्त ती जपण्याची जाणीव आणि आस्था आपल्यात असायला हवी. नात्यांमध्ये आस्था असावी पण आसक्ती नाही कारण कोणीही सोबत जन्माला येत नसतं. आपण एकटेच जन्माला आलो आणि एकटेच जाणार हे कायम लक्षात असू द्यावं मग आसक्ती निर्माण होत नाही. मूळात आपला जन्म कशासाठी झाला आहे हे गूढ उकलता आलं तर पुढचा सर्वच प्रवास सुखकर होतो आणि 'ते उकलण्याचा एकमेव मार्ग ध्यान साधना.' प्रारब्धात ठरल्याप्रमाणे कोणाकडून काही घेण असेल किंवा आपण कोणाचं देण लागत असू तर वेळ आल्यावर त्या प्रत्येक जीवाच्या भेटीच प्रयोजन कळतं म्हणून फक्त आपण कर्म करत राहावं इतकंच...
फळ म्हणजे प्रारब्ध ते तो बघून घेतो.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

262. विश्वाचे आर्त...

           जगाचा मालक स्वतः विठुराया समोर भेटल्यावर माऊलींना विचारतोय, "ज्ञानोबा...काय हो द्यायचं तुम्हाला ? किती किती केलंत इतक्या कमी वयात. रुक्मिणीदेवी सारख्या म्हणीत असतात की तो ज्ञाना काही मागायचा नाही कधी, पण मुक्ताईला पाठीवर घेऊन भावांबरोबर दर आषाढीला तुम्हाला भेटायला येतो पायी चालत चालत, त्याला काहीतरी द्या हो केव्हातरी हातावर. देवाचं बोलणं ऐकून माऊली फक्त हसतायंत. मुक्ताईंकडे पाहतायंत. निवृत्तीनाथही सुचक हसतायंत. देव विचारतोय, "काय झालं ज्ञाना ? काय विचारतोय मी ? काय द्यायचं तुला ?" माऊलींनी हात जोडले,  कौतुकानं देवाकडे पाहिलं आणि म्हणाले, 
"दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥"
           ज्या जगाने त्यांच्या आईवडिलांना मृत्युदंडाची शिक्षा केली त्या जगातल्या ज्याला ज्याला जे जे म्हणून हवंहवंसं वाटत असेल त्याला त्याला ते ते मिळावं, विश्वाला सूर्याची झळाळी लाभो असं म्हणणाऱ्या माऊलीचं काळीज किती मऊ असेल हो...किती मऊ असेल.  अशी माऊली निघाली.  देवाच्या परवानगीविना या देहाने श्वासही घेतला नाही हो कधी तर इतका मोठा निर्णय त्याला विचारल्याविना ? नाहीच. परवानगी मागितली देवाकडे. देवांनीच आठवण करुन दिली त्यासाठीच्या जागेचीही. आळंदीच्या सिध्देश्वर मंदिराच्या समोरील नंदीखाली असणारे समाधिविवर. हीच ती जागा. नामदेव महाराजांच्या म्हणण्यानुसार ही १०९ व्वी वेळ होती, याआधी १०८ वेळा माऊलींनी इथेच संजीवन समाधी घेतली होती. देवाच्या इशाऱ्यानुसार नंदी हलवताच तिथलं विवरं मोकळं झालं. स्वतः नामदेव महाराज आणि त्यांच्या मुलांनी मोठ्या जड मनाने आज्ञेचं पालन करीत सगळी तयारी केली. मृगाजिन घातलं, सिद्धता केली.  कार्तिकातल्या कृष्ण त्रयोदशीचा दिवस ठरला. द्वादशीला म्हणे देवानी स्वतः अन्न रांधून ज्ञानोबांना जेऊ घातलं. तेच अमृत म्हणून समाधीवेळी त्याच्या देहात टिकून राहिलं. हा गोतावळा जमला इंद्रायणीपाशी. कुणी फुलं आणली, कुणी हरिपाठाचा कागद वाचायला घेतला, कुणी बसून राहिले वाटेतच माऊलीला देहरुपात आणखी एकदा तरी पाहायला, कुणी टिपं गाळीत होते, आयाबाया विठोबाला हाका मारीत होत्या की का रे लेकाराला असं वागू देतोस, पोराटोरांना काही कळत नव्हतं फारसं पण आपल्याच वयाचा हे काय करतो ते पाहून तीही कावरीबावरी झाली होती. माऊली ध्यानस्थ झाली. पूजा झाली. पंचखाद्याचा नैवेद्य द्रोणात वाढून ठेवला होता. एका बाजूने श्री निवृत्तिनाथ आणि एकीकडून स्वतः श्रीभगवंतानी हाताने धरून माउलींना त्या समाधिविवराच्या आत नेलं. तिथल्या आसनावर विराजमान होऊन माऊलीने तीन वेळा नमस्कार केला, मुद्रा लावली आणि "संजीवन समाधी"त गेली.  पृथ्वीतत्त्वाचा जलतत्त्वात, जलाचा अग्नीत, अग्नीचा वायूत व वायूचा आकाशतत्त्वात लय झाला. आकाशतत्त्वाचा मात्र कशातच लय होत नसल्याने ते भगवंताच्या आकाराशी लगडून राहते. असं म्हणतात, पृथ्वी आणि जलतत्त्वाचा लय झाल्यावर देह दिसेनासा झाला. तेज दिसू लागलं मूर्त आकारात. तेजही लय पावल्यावर केवळ नाद उरला.
"रामकृष्णहरि रामकृष्णहरि रामकृष्णहरि रामकृष्णहरि"
               असं सांगितलं जातं की, हे समाधीविवर असं आहे की जिथं काळ काम करु शकत नाही. म्हणून ७ शतकांपूर्वी वाहिलेली फुलं तिथे जशीच्या तशी आहेत. पंचखाद्याचा नैवेद्य होता तसाच्या तसा आहे. त्याक्षणी तिथे उपस्थित असणाऱ्या नामदेवांनी या प्रसंगाचं वर्णन लिहून ठेवलंय. ते म्हणतात...
देव निवृत्ति यांनी धरिले दोन्ही कर । 
जातो ज्ञानेश्वर समाधीसी ॥१॥
नदीचिया माशा घातलें माजवण । 
तैसें जनवन कलवलें ॥२॥
दाही दिशा धुंद उदयास्ताविण । 
तैसेंचि गगन कालवलें ॥३॥
जाऊनि ज्ञानेश्वर बैसले आसनावरी ।
पुढें ज्ञानेश्वरी ठेवियेली ॥४॥
ज्ञानदेव म्हणे सुखी केलें देवा । 
पादपद्मीं ठेवा निरंतर ॥५॥
तीन वेळां जेव्हां जोडिलें करकमळ । 
झांकियेले डोळे ज्ञानदेवें ॥६॥
भीममुद्रा डोळा निरंजनीं लीन । 
जालें ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव ॥७॥
नामा म्हणे आतां लोपला दिनकर । 
बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ॥८॥
          असं कळलं की बा.भ. बोरकरांचीही एक कविता आहे याविषयीची कल्पना करणारी. तिच्या प्रत्येक ओळीत लिहिलंय 'ज्ञानदेव गेले तेव्हा'...इथे चिकटवावीशीही वाटली. पण मग वाटलं की ज्ञानदेव गेलेले नाहीतच ना! आहेत. त्यांची माऊली ज्या जगानं हिरावून घेतली त्याच जगाची माऊली होऊन पुन्हा पुन्हा येत राहतात. नुसतेच येत नाही, कधी परततही नाहीत. इथेच भरून राहतात.  खरं तर वयाची पंचविशीही न पाहिलेला पोर... पण समज उमज किती मोठी बघा... 
      "जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत" इतकं मोठ्ठं तत्त्वज्ञान तुमच्या आमच्या हातावर ठेऊन इंद्रायणी काठी समाधिस्थ झाली माऊली आज २०२२ मध्ये ज्ञानेश्वरीच्या दोन निरनिराळ्या प्रति मिळाल्या. एक अर्थ निरुपणासह. एक पारायणाची. पारायणाची प्रत स्वतः पावसच्या स्वामी स्वरुपानंदांनी विरामचिन्हांकित केलेली आहे आणि सार्थ प्रत वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची यांची, जिच्या २००६ साली सुधारित प्रथमावृत्ती येण्यापूर्वी पाच दशकांत २ लाखाहून अधिक प्रति लोकांपर्यंक पोहोचलेल्या होत्या. इतके दिवस धजावत नव्हतो वाचायला कारण स्वतःच्या ढिसाळपणाची, आळसाची पूर्ण कल्पना असते ना आपल्याला. देव इतकं चांगलं, इतकं तेजानी भारलेलं काही आपल्या हातात का देतो कुणास ठाऊक ? पण आज सुरुवात करतोय. समजेल तेवढं आत ओतायचं, समजणार नाही ते वेळोवेळी माऊली स्वतः अनुभवातनं शिकवील असा विश्वास वाटतो. असं म्हणतात ज्ञानेश्वरी तुमचे सगळे प्रश्न सोडवते. आजही वर मनात आलेल्या पहिल्याच प्रश्नाचं उत्तर सहज फोटोसाठी प्रत उघडली तरी त्यातल्या चित्राखाली सापडलं बघा.  अध्यात्माच्या अनुभवाविणा ज्ञान कसं व्यर्थ आहे ते भगवान स्वतः अर्जुनाला सांगतानाचा प्रसंग. मोराच्या प्रत्येक पिसावर  डोळा आहे. तरी त्यांना दृष्टी देहावर एकाच ठिकाणी. पिसावरच्या डोळ्यांचा शून्य उपयोग. तसंच बाकी जगातलं सगळं ज्ञान तुमच्या देखण्या पिसाऱ्यावरचे डोळे होईल, वैभव वाढवेल, मानमरातब देईल पण दृष्टी हवी असेल तर अध्यात्म हाच उपाय. त्याविषयीच माऊली म्हणते...
मोराचां आंगीं असोसें । पिसें आहाति डोळसें । 
परी एकली दिठी नसे । तैसे ते गा ॥

कौस्तुभ अरुण

261. म्हातारपण काय आहे?

      समर्थांनी दासबोधात फार सुंदर वर्णन केलं आहे. त्यांनी ऋणानुबंध हा शब्द घातलेला हे आहे. ऋण म्हणजे कर्ज आणि बंध म्हणजे  संबध कींवा बांधला गेलेला. तर महाराज याच्यावर सांगायचे की तुमचं देणंघेणं असतं म्हणून तुम्ही एकमेकांच्या संबधात येता आणि जोपर्यंत तुमचं एकमेकाविषयी ऋण फीटत नाही तोपर्यंत आपली सुटका नाही. आपलं एकमेका विषयी काहीतरी देणंघेणं असल्या मुळे एकमेकांना मदत करुन ऋण फेडता._
म्हातारपण फार चमत्कारिक आहे. तुम्ही काहीतरी अध्यात्म करीत असाल तर तुम्हाला पुढे त्रास होणार नाही. परंतु तेच जर आपण व्यवहारातच जर राहीला तर अवघड आहे. नामस्मरण कींवा काही साधन जर तुम्ही तारुण्या पासूनच करत असाल तर पुढे तुम्हाला त्याची सवय लागते आणि मनाला एक वळण लागतं मग पुढे सुखदुःखात त्याला नामाचीच/त्या साधनाचीच आठवण राहील. म्हातारपण सहन करणं फार कठीण आहे. शरीरातील  जीवन शक्ती कमी होते. बसलेले उठवत नाही. उठलेले झोपवत नाही. अंगातली कर्मशक्ती क्षीण होते. बरोबरचे लोक मरण पावतात. तेव्हा माणूस विचलित होतो. म्हातारपणी जर तुम्हाला साधनेची काही सवय नसेल तर फार अवघड आहे. कारण जीवनाचा अभ्यास केला तर असे आढळते की नामसाधनाची आवड असेल तर मन लगेच नियंत्रणात येतं. तेच जर काही साधन नसेल मनावर अंकुश येणं फारच कठीण आहे.
      म्हणून  भगवान श्रीरामकृष्ण नेहमी म्हणायचे एखादी कपड्याची फॅक्टरी आहे आणि त्यात कपड्याला कलर लावायला एक माणूस पूर्वी असायचा. त्याला डायिंग मास्टर म्हणतात. त्याने एकदा कपडा रंगवला की संपलं. परत तो कपड्याचा रंग बदलता येत नाही. तसे माणसचे वय एकदा पंन्नास पंच्चावन्न च्या पुढे गेलं की संपलं. या वयाच्या पुढे त्याला समजून पण सुधारणा करता येत नाही. आणि म्हणून लहानपणा पासूनच कींवा तारुण्यात च साधनेची आवड पाहीजे नाहीतर कठीण आहे. माझ्या मते तारुण्याचे कींवा समजायला लागलेल्या वया पासूनच्या कर्माचं रीझलटंन्ट म्हणजे म्हातरपण आहे. कारण जर तुम्ही नीट वागला, चांगल्या कामाची सवय कींवा साधनेचा व्यासंग जर असेल तरच शेवटी जीवन व्यवस्थित जातं. जास्त कष्ट पडत नाहीत. म्हणून जीवनात शिस्त, चांगुलपणा, साधनेची आवड, परिश्रम करण्याची वृत्ती आणि तत्परता हे गुण कामी येतात. आपण म्हणतो म्हातारपणी पैसा असल्यावर कींवा समाजात मान असल्यावर घाबरण्याचे कारण नाही पण खरं तसं नाहीये.
             याचं उत्तम उदा. पुढे देत आहे. एकदा लोकमान्य पुण्याला  बंडगार्डन मध्ये फीरायला गेले होते. तेथे डॉ.भांडारकर पण आले होते. सकाळची वेळ होती. दोघांची एकमेकां कडे दृष्टादृष्ट झाली. लोकमान्यांना ते पुर्वी शिकवायला होते. लोकमान्य त्यांच्याकडे जाऊन त्यांचे पाया पडले. तेव्हा भांडारकरांनी त्यांना लगेच ओळखलं नाही. कोण रे तू असे त्यांनी विचारल्यावर मी बाळ गंगाधर टिळक असं टिळक म्हणाले. तेव्हा भांडारकर म्हणला अरे तु अत्ताच थकलास. लोकमान्य त्यावेळी ५९-६० वर्षाचे होते. ते शांत उभे राहिले. व म्हणाले आपण भाग्यवान अहात. की आपल्याला येवढं जीवन मिळालं. तेव्हा भांडारकर म्हणाले की तु चुकतोयेस. अरे म्हातारपण सुखाचं नाही. शाररीक दुःख, मानसिक दुःख व आपल्या पोरबाळांची दुःख पण सहन करावी लागतात. आणि म्हणून महाराज नेहमी म्हणायचे की आपल्या समजत्या वयातच आपलं ध्येय ठरलेलं असावं. म्हणजे मग त्या ध्येयाच्या दृष्टीने पावलं टाकली जातात. मग त्यामुळे माणूस सुखदुःखात पण दुःखीकष्टी होत नाही. म्हणूनच खरंतर आपणच आपले चांगले मित्र वा शत्रू आहोत. उगीच मुलाबाळांसह बायको कींवा नातेवाईकांवर आवलंबून राहणे उपयोगाचे नाही. माझा गुरु हेच माझं धेय्य असावं व त्यांनी सांगितलेले साधन हा मार्ग. मग काय सर्व अलबेल होईल यात शंकाच नाही. भगवदगीतेत भगवंतांनी तेच सांगितलेले आहे की सतत चांगले कर्म करत रहा कींवा, तुमच्या कर्मात मला घाला म्हणजे नामात रहा म्हणजे तो खरा कर्मयोगी होय. आता निवृत्त झाल्यावर चांगले कर्म म्हणजे काय असणार तर साधन आणि जमेल तशी लोकसेवा कींवा समाज जागृती. ती कशी करायची हे ज्याच्या त्याच्या स्वभावा नुसार ठरवावे. निंबाळ सांप्रदायाचे हे गुरुदेव रानडे होते ना, त्यांना एकाने विचारले की तुम्ही नुसते नाम घेत बसता त्यापेक्षा समाजकार्य का करीत नाही. तेव्हा ते म्हणाले की मी येवढे एका खोलीत बंदिस्त राहून जे नाम करतोय त्यामुळे माझ्या आसपास एक चांगले आवरण तयार होते व त्यामुळे लोकांच बर होत असणारच. या माझ्या साधनेने कुठे वा कुठे तरी फायदा होत असणारच. तो कुणाला व कुठे हे मात्र मी सांगू शकत नाही. पण समाजाचं भलं होत असलंच पाहीजे.
खळांची व्यंकटी सांडो, "सत्कर्मे रती वाढो"    
ज्याचा अंतकाळ नामात झाला त्याने जिंकलं. असं महाराज म्हणायचे.
           कोणावरही आलेली वाईट वेळ निघून जातेच पण जाताना चांगल्या चांगल्या लोकांच खरं रूप दाखवून जाते . कपडे कितीही साफ व चकाचक असले तरी वाईट आणि मळलेले चारित्र्य लपू शकत नाही.  जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा . मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात . म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा .काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते . म्हणून शब्दाला धार नको आधार हवा.  आयुष्यात एखाद्याला रडवून कितीही पूजा - पाठ , होम - हवन केले तरी काही एक फायदा होणार नाही पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले तर साधी अगरबत्ती सुद्धा लावायची गरज पडणार नाही.

संग्राहक विजय दत्तात्रय सुवर्णकार

260. 'चॅटजीपीटी' आणि आपले भविष्य

     सॅम आल्टमान यांच्या 'ओपनएआय' या कंपनीने विकसित केलेल्या 'चॅटजीपीटी' या 'व्हर्चुअल रोबो' किंवा 'चॅटबॉट'ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स - 'एआय') क्षेत्रातील ही प्रणाली बाजारात येऊन दोन महिनेही उलटले नाहीत तोवर तिला 'गुगल किलर' असे संबोधले जाऊ लागले आहे. तिच्या आगमनाने गुगलच्या शेअर्सच्या किंमतींवर यापूर्वीच परिणाम होऊ लागला आहे. भविष्यात मानवी जगतात आमूलाग्र आणि तुफान बदल घडवण्याची क्षमता तिच्यात आहे, असे मानले जात आहे.  सहज गंमत म्हणून गेल्या आठवड्यात 'चॅटजीपीटी' वापरून बघण्याची संधी मिळाली. तेव्हाच तिच्याबद्दल प्रथम ऐकले आणि अधिक माहिती घेत गेलो. जे समजले आणि करून पाहिले त्याने थक्क होत गेलो.  शाळा-कॉलेजात असताना माहितीसाठी त्या-त्या विषयांतले तज्ज्ञ, पुस्तके-विश्वकोश-ग्रंथालयांवर अवलंबून होतो. नंतर ती जागा गुगलने घेतली. गुगल म्हणजे आपल्या स्मरणशक्तीचे 'एक्स्टेंन्शन'च बनले होते. त्यामुळे पूर्वी ज्या गोष्टी हमखास लक्षात असायच्या त्या साध्या-साध्या गोष्टी आता लक्षात ठेवल्या नाहीत तरी चालू लागले. गरज भासेल तेव्हा गुगल ती माहिती क्षणार्धात सादर करत होते. 
         मात्र गुगलची मर्यादा अशा होती की, ते केवळ उपलब्ध साठ्यातील माहिती काढून देऊ शकते. त्याच्याजवळ असलेल्या माहितीवर प्रक्रिया करून ती वेगवेगळ्या स्वरूपांत सादर करू शकत नाही. म्हणजे, गुगलला निबंध लिही किंवा कविता कर, असे सांगितले तर ते करू शकत नाही. त्यासाठी संगणकाकडे किंवा यंत्रमानवाकडे कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स - 'एआय') असणे गरजेचे होते. नेमके हेच काम 'ओपनएआय' या कंपनीने 'चॅटजीपीटी'च्या माध्यमातून केले आहे. त्याला २०२१ सालापर्यंतचा डेटा फीड करण्यात आला आहे. त्या आधारावर 'चॅटजीपीटी' अनेक कामे करू शकते. सुरुवातीला केवळ माहिती देण्यासंबंधी काही प्रश्न 'चॅटजीपीटी'ला विचारून पाहिले. त्याने त्यांची उत्तरे अगदी लीलया दिली. मग थोडे अवघड प्रश्न विचारले. ते ही त्याने पटकन सोडवले. संगणक किंवा यंत्रमानव सहसा 'रिपिटिटीव्ह टास्क्स' सहजपणे करतात. त्यांना 'क्रिएटिव्ह' किंवा मानवी भावभावनांसंबंधी कामे जमत नाहीत. म्हणून त्या गोष्टी करून पाहिल्या. तर 'चॅटजीपीटी'ने तेही काही सेकंदांत करून दाखवले.  सचिन तेंडूलकरसंबंधी कविता कर म्हटल्यावर २-३ सेकंदांत ती करून दाखवली. आता ती कविता शशी थरूर यांच्या शैलीत कशी करशील म्हटल्यावर तेही केले. मग म्हटले की, ही कविता शेक्स्पिअरने कशी केली असती, तर तेही केले.  एका विषयावर निबंध लिहून दाखवला. त्याचे काही ओळींमध्ये संपादन कर म्हटल्यावर तेही केले. मग म्हटले आता जरा जास्त क्रिएटिव्ह काम सांगून बघू. समज, एका आईस्क्रीम ब्रँडसाठी जाहिरातीची कॉपी लिहून दाखव म्हणून सांगितले. तर त्याने ते पण केले. आता ही कॉपी पश्चिम महाराष्ट्रासाठी 'कस्टमाइज' कर म्हटल्यावर त्यात त्याने मसाला फ्लेवर्ड आईस्क्रीम यांसारखे अस्सल कोल्हापुरी शब्द टाकले. मग त्याला तीच कॉपी पश्चिम बंगालसाठी 'कस्टमाइज' कर म्हटले तर त्याने त्यात मिष्टी, रोशोगुल्ला असे शब्द घालून मजकूर लिहून दाखवला. 
        मग म्हटलं की, आता जरा भावना आणि डोक्याचं काम देऊन बघू या. 'चॅटजीपीटी'ला विचारलं... समज, गावाकडे माझी आई अगदी शेवटच्या टप्प्यात आजारी (टर्मिनली इल) आहे. मला शहरातील नोकरीतून अर्जंट रजा घेऊन गावाला जायचं आहे. बॉस रजा द्यायला काचकूच करतोय. अशा परिस्थितीत नोकरीचा राजीनामा देऊन गावाकडे जाऊ का....तर 'चॅटजीपीटी'ने एकदम समंजसपणे उत्तर दिले - आई आजारी आहे ही गंभीर समस्या आहे. पण नोकरीही महत्त्वाची आहे. त्यासाठी राजीनामा देण्याचा आततायीपणा करण्याची गरज नाही. बॉसबरोबर बोलून काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. सोबत काही शक्यतांची यादीही दिली. बरं, रजेचा अर्ज लिहून दे म्हटलं तर तेही केलं. त्यात कारणांनुसार बदलही करून दाखवले. आता जरा धीर चेपला. मग त्याला सर्दी-खोकला अशा सामान्य आजारांवर औषधे काय घ्यावीत ते विचारलं. तर त्याने तेही सांगितलं. इतकेच नाही, तर सध्या अनेक सॉफ्टवेअर इंजिनिअर्स चॅटजीपीटीवर काही प्रोजेक्ट्ससाठी कोड्स लिहून घेत आहेत आणि त्याने लिहिलेले कोड्स वापरून बघितल्यावर ते प्रोजेक्ट्स काम करत आहेत, अशीही माहिती समजली. 
         सुरुवातीला गंमत वाटत होती. पण आता मात्र हे प्रकरण अवघड असल्याचं लक्षात आलं. म्हणजे लक्षात घ्या. हे कोणा-कोणाला घरी पाठवू शकते. कारकून, लेखक, कवी, पत्रकार, संपादक, शिक्षक, वकील, जाहिरात क्षेत्रातील कॉपी-रायटर्स, संगणक क्षेत्रातील कोड रायटर्स, लहानसहान डॉक्टर्स (जीपी - जनरल प्रॅक्टिशनर्स) इ. इ.... जाणार सगळे घरी. जातील त्यांची कामे भविष्यात. 
         सध्या 'चॅटजीपीटी'ला केवळ २०२१ पर्यंतचा डेटा दिला आहे. भविष्यात त्याला थेट गुगलसारख्या डेटाबेसला लाइव्ह जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या 'चॅटजीपीटी' केवळ शब्द प्रोसेस करू शकते. भविष्यात ते चित्रे, ऑडिओ, व्हिडिओ आदी प्रकारची माहिती प्रोसेस करू लागेल आणि त्या स्वरूपांत माहिती सादर करू लागेल. म्हणजे आज केवळ लेखक, कवी घरी जातील. उद्या चित्रकार, संगीतकार, दिग्दर्शक घरी जाऊ लागतील.  तसं पाहिलं तर हा काही अचानक बसलेला धक्का नाही. गेली अनेक वर्षे अनेक शास्त्रज्ञ, विज्ञान लेखक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यातील वापरासंबंधी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भल्या-बुऱ्या शक्यतांविषयी लिहित-बोलत होते. संगणक आणि यंत्रमानवांना कृत्रिम बुद्धिमत्ता प्रदान केली, ते आपले आपण शिकू लागले (डीप लर्निंग, मशिन लर्निंग वगैरे) तर ते त्यांची निर्मिती करणाऱ्या मानवालाच डोईजड बनतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. जिथे फारशी बुद्धी वापरावी लागत नाही, अशी रिपिटिटीव्ह कामे, कारखान्यांतील धोकादायक किंवा घाण कामे संगणक आणि यंत्रमानवांकडे जातील हे माहीत होते. पण आजवर तो धोका दूर कोठेतरी क्षितिजावर असल्यासारखा वाटत होता. 'चॅटजीपीटी'ने ती शक्यता उंबरठ्यावर आणून ठेवली आहे.  'सेपियन्स', 'होमो डिऑस' यांसारख्या गाजलेल्या पुस्तकांचे लेखक युवाल नोआ हरारी यांनी आणि तशा अनेक जणांनी याबद्दल लिहून ठेवले आहे. आज माणूस करत असलेली अनेक प्रकारची कामे भविष्यात संगणक आणि यंत्रमानव करू लागतील. अगदी उच्च कोटीची बुद्धिमत्ता, भावना आणि क्रिएटिव्हिटी आदी गोष्टींची गरज असलेली कामेच माणसांकडे राहतील. सर्वसामान्य माणसे ती कामे करू शकणार नाहीत. मग हजारोंच्या संख्येने लोकांच्या नोकऱ्या जातील. बेकारांच्या झुंडीच्या झुंडी तयार होतील. सामान्य परिस्थितीतच 'युथ सरप्लस इज इक्वल टू पीस डेफिसिट' - बेरोजगार तरुणांची भाऊगर्दी म्हणजे शांततेचा अभाव - असे म्हटले जाते. त्यात अशा लाखो बेरोजगारांची भर पडली तर काय होईल, याची कल्पनाच केलेली बरी. या बेरोजगारांना नीट हाताळले नाही तर ते हिंसक होऊ लागतील. समाजाचे स्वास्थ्य बिघडेल. समाजाची संपूर्ण घडीच विस्कटली जाईल. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय, कायदा-सुव्यवस्था यंत्रणांवर प्रचंड दबाव येईल. आपल्या सर्वच नेत्यांची  आणि या यंत्रणांची आजची स्थिती पाहता त्यांना हे आव्हान झेपेल, असे वाटत नाही.  देशोदेशी निदर्शने, आंदोलने, उठाव इतकेच नव्हे तर क्रांती होऊ लागतील. ऑल्वीन टॉफलरसारख्या भविष्यवेधी लेखकांनी म्हटले होते की, मानवी इतिहासात केवळ तीनच क्रांती झाल्या - शेती, उद्योगधंदे आणि आधुनिक तंत्रज्ञान.  प्रत्येक क्रांतीने मानवी जीवन आमूलाग्र बदलले. शिकार करणाऱ्या आणि फळे-कंदमुळे गोळा करून खाणाऱ्या माणसाला शेतीचा शोध लागला आणि नद्यांच्या किनाऱ्यांनी संस्कृती बहरल्या. ही व्यवस्था शेकडो वर्षे टिकली. नंतर औद्योगिक क्रांतीने जग बदलले. आणि आता गेल्या ५०-६० वर्षांत संगणक, जैवतंत्रज्ञान, नॅनोतंत्रज्ञान, रोबोटिक्स, आर्टिफिशियन इंटेलिजन्स, व्हर्चुअल रिअलिटी, इंटरनेट ऑफ थिंग्ज आदी बाबींनी तिसरी क्रांती घडवली आहे. आता दर पाच-दहा वर्षांनी जग बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  पहिली अग्रेरियन रेव्होल्युशन, दुसरी इंडस्ट्रिअल रेव्होल्युशन आणि तिसरी नॉलेज-बेस्ड रेव्होल्युशन. या तिन्ही क्रांतींनी माणसाची जगण्याची पद्धत मुळापासून बदलली. प्रत्येक वेळी उत्पादनाची साधने (फॅक्टर्स ऑफ प्रॉडक्शन) बदलत गेली. शेतीवर आधारित अर्थव्यवस्थेत जमीन, पाणी, श्रम (माणसे किंवा जनावरे) आदी उत्पादनाची प्रमुख साधने होती. औद्योगिक जगतात त्यात कोळसा, लोखंड, वीज, भांडवल आदींची भर पडली. आता ज्ञानाधिष्ठित समाजात उच्च तंत्रज्ञान आणि मानवी बुद्धिमत्ता यांना अपार महत्त्व लाभले आहे. 
          उत्पादनाची साधने आणि पद्धती बदलल्या तशा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय व्यवस्थाही बदलल्या. शेतीवर आधारित व्यवस्थेत एकत्र कुटुंब पद्धती होती. राजेशाही आणि सरंजामी राज्यव्यवस्था होती. औद्योगिक क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणावर कामगारवर्ग तयार झाला. खेड्यांतून शहरांकडे स्थलांतर वाढले. चौकोनी कुटुंबे तयार झाली. सामाजिक व्यवस्थेप्रमाणे राजकीय व्यवस्थाही बदलली. लोकशाही, भांडवलशाही आणि साम्यवादी-समाजवादी राजकीय व्यवस्था निर्माण झाल्या. आता पुन्हा उत्पादनाची साधने आणि आर्थिक व्यवस्था बदलत आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढणार आहे. हाताला काम नसणाऱ्या जनतेचे प्रश्न हाताळण्यास कदाचित जुनी शासनव्यवस्था कुचकामी ठरणार आहे. त्यातून बहुतेक नवीन, पूर्णपणे वेगळी राजकीय प्रणाली निर्माण होऊ शकते.  नव्या जगाचे प्रश्न नवे आहेत. जुन्या राजकीय व्यवस्थेला ते समजून घेऊन सोडवता येतीलच याची काही खात्री देता येत नाही. देश जेवढा अधिक तंत्रज्ञानावर अवलंबून असेल तेथे तितक्याच लवकर ही परिस्थिती निर्माण होईल. अन्य जगात हळूहळू ही परिस्थिती पाझरत जाईल. पाश्चिमात्य जगात लोकशाही आली ती शिक्षणाचा बऱ्यापैकी प्रसार आणि सामाजिक जाणीवा प्रगल्भ झाल्यानंतर आली. जिथे साम्यवादी व्यवस्था आल्या तिथे जुनी सरंजामी व्यवस्था नष्ट केली गेली. 
         पण काही देशांमध्ये  ना सामाजिक जाणीवा प्रगल्भ झालेल्या दिसतात, ना जुनी सरंजामी व्यवस्था पूर्णपणे नष्ट झालेली दिसते. पूर्वी गावोगाव जे सरंजामदार, धनदांडगे होते तेच आजचे नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री-संत्री झालेले दिसतात. त्यामुळे जुनी सरंजामी व्यवस्था न संपता तिचे केवळ स्थित्यंतर (ट्रान्सफॉर्मेशन) झालेले दिसते. ही बाब लोकशाहीसाठी घातक आहे. त्या अर्थाने काही देशांमध्ये जी काही राजकीय व्यवस्था आहे तिला खरी लोकशाही (डेमोक्रसी) न म्हणता 'इलेक्टिव्ह क्लेप्टोक्रसी' (मतपेटीतून आलेली झुंडशाही) म्हणता येईल. आणि ही बाब आज झालेली नाही. स्वातंत्र्यापासून तीच यंत्रणा चालत आलेली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे हे सर्वपक्षीय राजकारणी अजूनही जात-धर्म-भाषा-प्रांत-अस्मिता असल्या नादान राजकारणात गुंतलेले आहेत. त्यातील एकालाही नव्या जगाच्या या प्रश्नांची किमान जाण असल्याचे दिसत नाही. त्यांची सोडवणूक करणे फार दूरची गोष्ट झाली. तेव्हा आपल्या भविष्याचा नुसता विचार केलेला बरा.

- सचिन दिवाण

259. वयपरत्वे लक्षविचलीत वृत्ती : A.A.A.D.D. {Age-Activated Attention Deficit Disorder}

 वयपरत्वे लक्षविचलीत वृत्ती : A.A.A.D.D. {Age-Activated Attention Deficit Disorder}
           आता ही वृत्ती म्हणजे काय ते माझ्याच उदाहरणाने पाहू या. एकदा मी बागेला पाणी घालायचे ठरविले. रबरी नळी नळाला जोडून ती उलगडत बागेकडे जातांना माझं लक्ष माझ्या कारकडे गेलं आणि ठरवलं. कार धुवायला हवी. म्हणून मी माझा मोर्चा गॅरेजकडे वळवला तोच माझं लक्ष जिन्याजवळच्या टपाल पेटीकडे गेलं. म्हटलं आता आधी काय टपाल आलंय ते आधी पाहूया आणि मग कार धुवूया. टपालपेटीवर कारची चावी ठेवून, टपालपेटीतले सर्वच टपाल दोन्ही हातात घेऊन मी घरी आलो. सर्व पाकिटे एक एक करुन उघडीत, निरुपयोगी कचरापेटीत टाकायची पत्रे एका बाजूला टेबलावर ठेवली. ती टेबलाखालच्या डब्यात टाकण्यासाठी बघतो तर तो डबा कागदपत्रांनी तुडूंब भरलेला. मग टाकायची पत्रं टेबलावर ठेऊन तो डबा प्रथम कचराकुंडीत रिकामा करायला खाली जिन्याजवळ जायचं ठरवलं. आता खाली जातोच आहे तर तिथे जवळच बिलांचे चेक टाकायची पेटी आहे, त्यात आताच चेक टाकावे असं ठरवलं.चेक लिहायला घेतल्यावर एकच चेक शिल्लक असल्याचे कळले. दुसरे चेकबुक घ्यायला कपाटाकडे वळलो तर टेबलाकडे नजर गेली आणि बरेच दिवसांपासून शोधत होतो तो माझा वाचायचा चष्मा दिसला. तो उचलून जागेवर ठेवणार, इतक्यात त्याच्याजवळ फ्रीजमध्ये ठेवायची पाण्याची बाटली  रिकामी पडलेली दिसली. तेव्हा आताच ती पाणी भरुन फ्रीजमध्ये टाकावी म्हणून उचलून मी स्वयंपाकघरात गेलो. तिथे ओट्यावर कुणी टी.व्ही. चा रीमोट ठेवला होता. मनात विचार आला की संध्याकाळी टी.व्ही. लावतांना रीमोट कुठे आहे ते आठवणार नाही. तेव्हा आताच तो टिपाॅयवर ठेवावा. पण तत्पुर्वी बाटली पाण्याने भरावी. तेव्हढ्यात ती काचेची बाटली माझ्या हातातून सटकली आणि खाली लादीवर पडून फुटली. लादीवरचे काचेचे तुकडे गोळा करुन लादी पुसतांना विचार करायला लागलो.  मी बागेला पाणी घातलं नाही.कार धुतली नाही. डबा कचराकुंडीत रिकामा केला नाही.बिलांचे चेक टाकले नाहीत. वाचायचा चष्मा, रीमोट जागेवर ठेवले नाहीत. कारची चावी कुठे ठेवली तेही आठवत नाही. माझा सगळा दिवस कामाच्या घाईगडबडीत गेला आणि माझी खूपच दमछाक झाली. तरी एकही काम धड झालं नाही, असं का.? 
           अशी धरसोड वृत्ती वयपरत्वे सर्वच व्यक्तींना येईल असे नाही. खालील गोष्टींचा अवलंब केल्यास ती बऱ्याच प्रमाणात कमी होईल.
१. शारीरिक व मानसिक द्दष्टीने सक्रीय रहावे.
२. कामाचे नियोजन करावे. करावयाच्या कामांची यादी करुन कामांचा प्राधान्यक्रम लावावा. 
३. प्राधान्यक्रम लावतांना केवळ तातडीची कामेच नव्हे तर महत्वाची कामेही लक्षात घ्यावी.
४. खिशात/पर्समध्ये आणि घरात हाताशी मिळेल अशा जागी, एक छोटी वही व पेन ठेवावे आणि कधीकधी अचानकपणे एखादी गोष्ट करायची आहे ते डोक्यात येते, तेव्हाच त्याची नोंद करावी. कधीकधी अशा गोष्टीचे थोड्याच वेळात विस्मरण होते आणि आठवण्याचा खूप प्रयत्न करुनही अाठवत नाही, म्हणून मन अस्वस्थ होते.
५. एका वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न करु नये. एकच काम हाती घेऊन, ते पूर्ण केल्याशिवाय दुसरे काम हाती न घेण्याची सवय करावी.
६. स्वयंशिस्त बाळगावी.
७. वय वाढते तसे 'मन धावते,  पण शरीर धावू शकत नाही' याचेही भान ठेवावे. शारिरीक हालचाली झेपतील अशाच गतीने कराव्या. 
८. सर्व कामे स्वतःच करण्याचा हट्ट धरु नये. काही कामे दुसऱ्या व्यक्तींवर सोपवावयास मनाची तयारी करावी. 
९. कामे उरकायची आहेत, हा विचार ताणतणाव निर्माण करतो. मात्र प्रत्येक काम करण्यातील आनंद घेत काम केल्यास वेळ मजेत जाईल. 
१०. प्राणायाम व ध्यानधारणा यांचा मन स्थिर ठेवण्यास उपयोग करा.
तुमच्या मित्रांसाठी, आप्तेष्टांसाठी जरुर पुढे पाठवा.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०२३

258. आंधळी मावशी

        दोन मावश्या परिस्थितीमुळे याचना करत भिकेवर जगतात. दोघींची वयं साधारण सत्तरीच्या पुढे. दोघींनाही पूर्वी दिसायचं, परंतु दहा-बारा वर्षांपासून अचानक दृष्टी गेली. दोघी कायम एकत्र असतात. समदुःखी लवकर जवळ येतात म्हणे. दोघींना काही म्हणजे काहीही दिसायचं नाही. शंभर टक्के अंधत्व. सर्व लोक यांना "आंधळी मावशी" म्हणूनच हाक मारतात...
        डोळे तपासणीसाठी आम्ही दरवेळी अनेक याचकांना घेऊन जात असतो. या दोघी सुद्धा दरवेळी अजिजीने म्हणायच्या, आमाला बी घेऊन चला जी दवाखान्यात. माझ्यातला डॉक्टर मनात म्हणायचा, 'ज्यांना दहा-बारा वर्षांपूर्वीच पूर्ण अंधत्व आले आहे, अशांचं आता काय होणार ? काय करणार ??  काहीही करता येणं आता शक्य नाही... डॉक्टर म्हणजे काय जादूगार आहे का ??? सायन्स कितीही पुढे गेलं, तरी निसर्गाच्या नियमाविरुद्ध ते जात नाही. दरवेळी मी नाईलाजाने यांना टाळायचो. 30 जानेवारीला डोळ्यांची एक बॅच ठरवली... ज्यांना न्यायचे ठरले होते, त्यांना एके ठिकाणी जमा होण्यास सांगितले. ऍम्ब्युलन्स घेऊन गेलो. आमच्या याचक कुटुंबीयांना गाडीत बसवले. आमच्याच मंडळींपैकी कोणीतरी बोलले.'गाडीत  आजुन दोन शीटा बाकी हायत्या.. या आज्यानी ते ऐकलं असावं. मग या दोन आज्या चाचपडत.... मला शोधत.... माझ्याजवळ आल्या आणि माझा गाल शोधत, गालावरून हात फिरवत म्हणाल्या, 'ल्येकरा आमी बी येतो रे... गाडीत शीटा हायत जणु ...'  मी जरा वैतागून, तरीही मायेनं त्यांना म्हणालो, मावशे तुला किती वेळा सांगितलं... बारा वर्षांपूर्वी गेलेले तुमचे डोळे ...आता काहीच करता येणार नाही त्याचं... सोड मला, जावूंदे उशीर होतोय.... चल...
        गालावरचा हात काढत, मी गडबडीने निघतो....तरीही 'थांब रं माज्या सोन्या.... माज्या बाळा.... आमालाबी घिवून चल रे.... आसं नगो करु रे.... ' म्हणत त्या माझे पाय शोधत , चाचपडत खाली वाकतात....मला अवघडल्यासारखं होतं...  एवी तेवी गाडीत दोन जागा रिकाम्या होत्याच... यांना घेऊन जावे आणि डोळ्यांच्या डॉक्टरांकडूनच तुमचे आता काहीही होणार नाही, हे त्यांना ऐकवावे, म्हणजे या दोन आज्यांचे समाधान होईल आणि माझ्या मागे त्या सारखी कटकट करणार नाहीत, हा विचार करून मी त्यांना गाडीत हात धरून बसवले... ! 
जवळपास पंधरा लोक डोळे तपासणीसाठी आणले होते... आता या दोन "आंधळ्या मावश्यांची" तपासणी माझा मित्र डॉ. समीर रासकर याने सुरू केली... तपासणीला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागला....  दोघींच्या तपासणीनंतर त्याने मला हाक मारली, 
' आब्या ऐक ना... ' 
मला माहित होतं... 'आता यांचं काहीच करता येणार नाही रे...असंच तो मला सांगेल...
त्याची वाक्य गृहीत धरून मी म्हणालो, 'तू काय सांगणार आहेस ते माहित आहे मला...' 
अत्यानंदाने तो बोलला, ' अरे नाही, बरं झालं तू यांना घेऊन आलास रे ... यांना दिसू शकतं... आपण प्रयत्न करून बघूया का ?'
'माझ्या प्रयत्नात जर मला यश मिळालं तर यांना कदाचित दिसू शकेल, पण मी जर अपयशी ठरलो, तर या कायमच्या अंध म्हणूनच जगतील.... तू सांग.... तुझी तयारी असेल, तर पालक म्हणून मला सही दे..! 
माझे "डोळे चमकले"... अशाही या आज्या अंध म्हणूनच जगत आहेत.... एक "डाव" खेळायला काय हरकत आहे ? असा विचार करून मी पालक म्हणून चटकन सही केली आणि यांना ऑपरेशन साठी पाठवले....  30 जानेवारीच्या सोमवारी ऑपरेशन झाले.... 
          आज 6 फेब्रुवारी च्या सोमवारी पुन्हा या आज्यांना भेटायला गेलो. मनात धाक धुक होती.  नेहमीच्या भीक मागायच्या त्यांच्या जागेवर मी गेलो आणि तिथे जल्लोष झाला. दोघीही आज्या न चाचपडता ....कोणाचाही आधार न घेता .सरळ एका रेषेत माझ्यापर्यंत दुडूदुडू चालत आल्या. आतापर्यंत रांगणार पोर, आज चालायला शिकलंय.... हे प्रथमच पाहताना, एका बापाला काय वाटत असेल हे मी शब्दात कसं सांगावं ?  यावेळी न चाचपडता त्यांनी डायरेक्ट माझ्या गालावरून हात फिरवला....  आणि स्वतःच्या डोक्याशी नेऊन बोटं कडाकडा मोडली.... 
कोणीतरी भिकेमध्ये दिलेले शेंगदाण्याचे तीन चार लाडू कुस्करून त्यांनी माझ्या तोंडात कोंबले.... ते ही न चाचपडता. तोंडातला तो बुकणा सावरत मी त्यांना बोबड्या भाषेत विचारले, 'म्हातारे नेमकं झालंय काय ?'
त्या म्हणाल्या, 'आमाला आता दिसायला लागलंय... आता रस्ता दिस्तूय.... आमी घातलेल्या लुगड्याचा रंग दिस्तूय... ज्या शंकराच्या मंदिरा भायेर इतके दिस भीक मागिटली त्यो शंकर पण दिस्तूय, आन ज्या शंकरानं तुला  दर सोमवारी हितं पाटवला.  आज तू पन आमाला दिस्तूय....!' 
         त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दात मांडणे, मला या जन्मात शक्य नाही...इतका अफाट . समुद्रासारखा अमर्यादित आनंद यापूर्वी मी कधीही पाहिला नव्हता. हा सुरकुतलेला चेहरा माझ्यासाठी अख्खा समुद्र होता. 
चेहऱ्यावरची प्रत्येक सुरकुती , म्हणजे माझ्यासाठी एक अफाट लाट होती. आता माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं.. 
हे पाणी होतं, या आज्यांना इथून पुढे कोणीही "आंधळी मावशी" म्हणणार नाही या आनंदाचं..
हे पाणी होतं, या आज्यांना मी यापूर्वीच डोळ्यांच्या दवाखान्यात तपासणीसाठी घेऊन गेलो नाही, या दुःखाचं.. 
मी त्यांना गृहीत धरले नसते... दोन-चार वर्षांपूर्वीच त्यांना तपासणीसाठी घेऊन गेलो असतो, तर खूप पूर्वीच यांचे ऑपरेशन झाले असते आणि या दोन-चार वर्षात त्यांना जो त्रास सहन करावा लागला, तो त्रास त्यांना सहन करावाच लागला नसता. आता, मी स्वतःला अपराधी समजायला लागलो. डोळ्यातले पाणी घेऊन मी या दोन्ही आज्यांच्या पायाला हात लावून म्हणालो, 'मी तुमचा अपराधी आहे... तुम्ही सांगत असताना सुद्धा मी तुम्हाला डोळ्यांच्या ऑपरेशन साठी या अगोदर घेऊन गेलो नाही... नाहीतर या आधीच तुम्हाला दिसायला लागलं असतं....मला माफ करा... तितक्याच सहजपणे माझी या पोक्त आज्यांनी समजूत काढली... 
'त्या म्हणाल्या, 'ये बाबा, येडा का खुळा तू ? आरं परतेक गोष्टीला टायम लागीतो... तांदुळ शिजाय घातलं मंजी त्याजा काय लगीच भात होतु का ? बीज पेरलं की लगीच जवारी ची कणसं दिस्त्यात का ? बाईला दिस राहिलं की लगीच पोर हुतंय का ? नऊ म्हहीने तर टायम द्याला नगो का ?'
'तसाच आमचा बी टायम हुता.समदं काय टायमावर होत आस्त बग. ज्येला जवा जी गोष्ट मिळायची असती तवाच ती  मिळती.. तू काय बी मनाला लावून घिवू नगोस...आमचा टायम आला ... आमाला मिळालं...
             समाधानाचं हसू त्यांच्या चेहऱ्यावर होतं. समय से पहिले और नसीब से ज्यादा किसी को कुछ नही मिलता" हे वाक्य खूप लहानपणी मी कुठेतरी वाचलं होतं...आज त्याची प्रत्यक्ष प्रचिती आली... वर वर भीक मागणाऱ्या या आज्यांनी मला विचारांचं दान दिलं होतं. 'आय आन बाप पोरास्नी दुनिया दाकिवत्यात.... आज तूच  आमाला दुनिया दाकवली या म्हातरपणात बापा... 
आज तूच आमची माय आनि तूच आमचा बाप झालास रे बाळा...'
"आज तूच आमची माय आनि तूच आमचा बाप झालास रे बाळा...." किती पराकोटीची हि कृतज्ञता... 
             वय विसरून, झटकन मुल होवुन, दुसऱ्याला बापाचा दर्जा देवून, स्वतः लहान व्हायला, मुळात मोठं असावं लागतं... गरीब कोण... ?  श्रीमंत कोण...?  लहान कोण... ? खरंच मोठं कोण... ?  विचारातून शिकवलं होतं त्यांनी.
 'निघू मावशी'?  मी निरोप घेतला...
'व्हय बापा संबळून जा... संबळून जा...संबळून जा... आशीर्वाद रे बाळा तुला...
सत्तर वर्षातल्या या दोन माझ्या म्हाताऱ्या"लेकींचे" "आशीर्वाद" घेऊन नुकताच मी "बाप" झाल्याच्या आनंदात... निघालो होतो मस्त शिट्टी वाजवत.... एक नवीन "दृष्टी" घेऊन... 

६ फेब्रुवारी २०२३
डॉ अभिजित सोनवणे
डॉक्टर फॉर बेगर्स
सोहम ट्रस्ट

257. इलेक्ट्रिक_वेहीकल्स (E.V.)

 नमस्कार ,
       मी बापा, बाळासाहेब पाटोळे, एक समुद्री विद्युत अभियंता आहे, गेली 27 वर्षे जहाजात इलेक्ट्रो टेक्नो ऑफिसर म्हणून कार्यरत आहे, या काळात बऱ्याच तांत्रिक गोष्टी पाहत आलो आहे आणि त्याबरोबरच कालानुरूप झालेले बरेच तांत्रिक बदल ही पाहिले आहेत. गेली 9 वर्षे मी ज्या जहाजात काम करत आहे ते जहाज ही विद्युत मोटारीवर चालते हे विशेष. प्रत्येकी 12 मेगा वॅट पावर (ताकद) असणाऱ्या दोन मोटारी आहेत, म्हणजे जहाज पूर्ण ताकदीने चालवायचे असल्यास आम्हाला इतर विद्युत गरजा सोडून 24 मेगा वॅट पावर ही फक्त जहाज चालवण्यासाठी द्यावी लागते. इतकी अफाट पावर तयार करण्यासाठी आमच्याकडे प्रत्येकी 11 मेगा वॅट ची 3 जनरेटर आणि 5.5 मेगा वॅट चे एक असं एकूण चार जनरेटरचा 38.5 मेगा वॅट चा संपूर्ण पावर प्लांट आहे. आणि हे सगळं (पूर्ण विद्युत विभाग) एकहाती मला सांभाळावे लागते ही माझ्यासाठी अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. ही माझी सविस्तर ओळख मी मुद्दामच देतो आहे जेणेकरुन मी पुढं देणारी माहिती ही कांही अभ्यासानंतर देत आहे याची नवीन वाचक मित्रांना खात्री पटेल. चला आता मूळ मुद्द्यावर येऊ.
------------------------------------------------------
पारंपरिक असणारी डिझेल, पेट्रोल वर चालणारी वाहने यांना पळतं ठेवण्यासाठी आपल्याला त्यांच्या इंधन टाकीत वेळोवेळी इंधन भरावे लागते तरच त्या गाड्या पळू शकतात, पण ही इंधन वापरून पळवली जाणारी वाहने पळताना मात्र हवेत / वातावरणात भरपूर प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड CO2 सोडून पर्यावरणाची हानी/ नुकसान करतात यात कोणाचेही दुमत असणार नाही. आणि याच पर्यावरणाला वाचवण्यासाठी आजकाल "शून्य वायू उत्सर्जन" करणारी म्हणजेच विद्युत प्रवाहावर चालणारी वाहने (E.V.) बाजारात येऊ लागलीत.
        जगभरातील जवळपास सर्व देशांनी या गोष्टीचे स्वागत करत पुढील कांही वर्षात फक्त विद्युत वाहनेच रस्त्यावर चालवण्यास परवानगी असेल अशी पॉलिसी सुद्धा  तयार केली आहे. इलेक्ट्रिक कार(किंवा दुचाकी) वाहने ही विद्युत पावर वर चालतात हे मी वेगळं सांगायची गरज नाहीय. मग हा विद्युत ऊर्जा प्रवाह येतो कुठून? तो येतो त्या वाहनात असलेल्या बॅटरी मधून. त्या बॅटरी मध्ये तो विद्युत प्रवाह साठवलेला असतो आणि वाहन चालवून ती बॅटरी डिस्चार्ज झाली की पुन्हा तिला चार्ज करावी लागते हे ही आपल्याला माहीत आहे. आणि ती बॅटरी पुन्हा चार्ज करण्यासाठी आपल्याला चार्जिंग स्टेशन वर किंवा आपल्या घरी जिथं चार्जर असेल तिथं जाणं आवश्यक असते. यात चार्जिंग खर्च इतर इंधनाच्या मानाने अगदीच नगण्य असतो, वाहन चालवताना आवाज येत नाही की वातावरणात अतिरिक्त कार्बन डाय ऑक्साईड सोडला जात नाही (?), आणि म्हणूनच बरेच लोक हे विद्युत वाहनांना पसंती देत आहेत. 2017 या वर्षामध्ये जागतिक लेव्हल वर 10 लाख विद्युत वाहने विकली गेली, 2030 पर्यत हा आकडा वार्षिक सव्वा ते दीड करोड (कार खप) इतका अपेक्षित आहे. विद्युत वाहन बनवताना बॅटरी हीच अत्यावश्यक अशी वस्तू आहे, आणि त्याशिवाय विद्युत वाहन बनवणे किंवा ते वाहन चालणे अशक्य आहे. आपण आजकाल जे स्मार्ट मोबाईल वापरतो त्यामध्ये जी बॅटरी असते अगदी तशाच प्रकारची पण मोठ्या आकाराच्या बॅटरी विद्युत वाहनात वापरल्या जातात. सध्या इंधनावर चालणाऱ्या वाहनात ज्या ऍसिड असणाऱ्या बॅटरी असतात त्यापेक्षा या विद्युत वाहनात वापरल्या जाणाऱ्या बॅटरी फार वेगळ्या असतात. यांना "मेंटेनन्स फ्री, ड्राय बॅटरी" म्हटले जाते. 
1) या बॅटरी मध्ये कोणतेही ऍसिड वापरले जात नाही.
2) या बॅटरीची कोणत्याही प्रकारची देखभाल करावी लागत नाही.
3)बॅटरी लिथियम पासून बनवलेल्या असतात. 
4)बॅटरी मध्ये कोबाल्ट ही वापरले जाते.
5) यांचे सरासरी आयुष्य किमान 2 ते कमाल 4 वर्षे असते.
आता मी मूळ मुद्द्यावर येतो.
विद्युत वाहने खरंच पर्यावरण प्रेमी आहेत का??
यासाठी खालील मुद्दे सविस्तर बोलू;
१. विद्युत वाहनात इंधन थेट जळत नाही म्हणून यातून कार्बन डाय ऑक्साईड CO2 बाहेर येत नाही. हे जर खरं वाटत असेल तर तुम्ही कांही प्रमाणात चुकत आहात. कसं?? चला सांगतो, हे मान्य की ही वाहने थेट CO2 हवेत सोडत नाहीत, पण आपण जेव्हा बॅटरी चार्ज करतो त्यासाठी विद्युत ऊर्जा प्रवाह वापरतो, तो विद्युत प्रवाह कुठून येतो?? जगभरात जास्तीत जास्त प्रमाणात विद्युत निर्मिती ही कोळसा वापरून केली जाते, तो कोळसा जळताना हवेत काय सोडत असतो? याचं उत्तर आहे CO2. बरं हा कोळसा उत्पन्न कोठून होतो?  कोळस्यासाठी पुन्हा जमिन उत्खनन केली जाते, त्या उत्खननात पृथ्वीच्या पोटातून प्रचंड प्रमाणात CO2 आणि मिथेन वगैरे असे गॅस बाहेर पडतात आणि ते थेट वातावरणात मिसळतात.  धरण बांधून पाणी अडवून उत्पादित केलेली आणि आजकाल परमाणू शक्तीवर तयार होणारी वीज ही अगदीच अल्प प्रमाणात उत्पादित होत असते कारण विद्युत ऊर्जेचा डिमांड भयानक आहे. 
२) आता येऊ विद्युत वाहने उत्पादन या मुद्द्यावर. बॅटरी तयार करण्यासाठी लिथियम हा पदार्थ मिळवण्यासाठी पुन्हा धरणी उत्खनन करावे लागते आणि हेच उत्खनन करताना जमिनीतील जलसाठा गायब होणे, पृथ्वीच्या पोटातील अनेकविध गॅस वातावरणात मिसळणे हे अखंडपणे चालू असते. 1 टन लिथियम मिळवण्यासाठी जवळपास 50 टन माती उत्खनन करावी लागते. 
३) एखादी विद्युत कार उत्पादित करण्यासाठी (बॅटरी उत्पादन,सगळे पार्टस, रंग असं सगळं कांही गृहीत धरून) किमान 5 ते कमाल 18 क्यूबिक मीटर टन कार्बन डाय ऑक्साईड तयार होतो तो थेट हवेत सोडला जातो. (एक क्यूबिक मीटर म्हणजे 1 घन मीटर आकाराच्या चौकोनी ठोकळ्यात सामावू शकणारा गॅस /किंवा द्रव) इतकं सगळं कमी की काय म्हणून आणखी एक जीवघेणी समस्या म्हणजे या लिथियम बॅटरी आजही 100 सुरक्षित आहेत असं कोणतीही कंपनी छातीठोकपणे सांगू शकत नाही, कारण यात ओव्हर हिटिंग (अतितापमान वाढ ) होऊन आग लागण्याचे प्रमाण आजही लक्षणीय आहे. दुसरी अडचण म्हणजे जुन्या बॅटरी पुनर्वापर करण्यासाठी आजही कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाहीय. म्हणजे प्रत्येक विद्युत वाहनाबरोबर येणारी बॅटरी ही पूढील 2, 4 वर्षात नवीन कचरा करणार आहे हे गृहीत धरावे. आणि तो ही असा कचरा जो नष्ट करणे किंवा पुनर्वापर करणे अशक्य आहे. इंधन कार आणि विद्युत कार यांच्या दरात ही अगदी किमान 50 ते कमाल 90 टक्के इतका वाढीव फरक आहे. इंधनावर चालणाऱ्या 10 लाखाच्या कार सारखी विद्युत कार आपल्याला किमान 15 ते 17 लाख देऊन घ्यावी लागते. इंधन वापरणाऱ्या कार ही वातावरणात घातक वायू जरूर सोडतात, त्यांच्या उतापदनात ही CO2 हवेत सोडला जातो पण विद्युत कार च्या उत्पादनाच्या मानाने ते उत्सर्जन कमी असते. सध्या वार्षिक कांही लाख उत्पादन होणाऱ्या विद्युत कार जेंव्हा वार्षिक करोडो ने उत्पादन चालू होईल तेंव्हा हवेत दर वर्षी किती करोड टन CO2 हवेत सोडला जाईल याची नुसती कल्पना करून बघा. दुर्दैवाने आपण विद्युत गाडी वापरताना मात्र भलते खुशीत असणार की आपण पर्यावरण प्रेमी आहोत.
           म्हणजे मी फक्त इंधन कार वापरा असं म्हणतो आहे का?? नाही, अजिबात नाही. विद्युत कार हेच भविष्य आहे यात वाद नाही, पण ही यंत्रणा सध्या बाल्यावस्थेत आहे. बॅटरी अजून म्हणाव्या तश्या विकसित आणि सुरक्षित नाहीत. बॅटरीचा पुनर्वापर आणि त्यांची विल्हेवाट हे विषय आजही अनुत्तरित आहेत. बॅटरी चार्जिंग साठी विद्युत प्रवाह हा नैसर्गिक साधनातून निर्मित असणे जरुरी आहे, जसे की सोलर पावर, पवनचक्की पावर, अणुऊर्जा पावर वगैरे. यावर जेंव्हा केंव्हा काम होईल आणि विद्युत ऊर्जा नैसर्गिकरित्या मिळवली जाईल ती नैसर्गिक विद्युत ऊर्जा वापरून E.V. वाहने जेंव्हा चार्ज केली जातील तेंव्हाच विद्युत वाहने खऱ्या अर्थाने "पर्यावरण पूरक" बनतील.

बापा
बाळासाहेब पाटोळे
इलेक्ट्रो टेक्नो ऑफिसर
के लाईन शिपिंग कंपनी
टोकियो, जपान.

256. असा ही व्हॅलेंटाईन

 मित्राची घट्ट मिठी
तोंडातून प्रेमापोटी कच्चकन शिवी
आणि पाठीवर बुक्की
गच्च दोस्ती, घट्ट प्रेम.
व्हॅलेंटाईन ........ ❤️

बाबांची घट्ट मिठी
ऐकायचे त्यांचे काळीज ठोके
न बोलताही ऐकू येते ते प्रेम.
व्हॅलेंटाईन ........ ❤️

संध्याकाळी दिवेलागणीला ओसरीवर आज्जीसोबत
करुणाष्टके म्हणून झाल्यावर तिला नमस्कार करताना
तिचा खरबरीत सुरुकुतलेला हात माझ्या डोक्यावर विसावतो
केसांमधून फिरतो दाट मऊसर ते कापूसप्रेम.
व्हॅलेंटाईन ........ ❤️

आईची साद येते मी कुठे तरी आपल्याच तंद्रीत
लक्षातच येत नाही आईची साद घरी पोहोचायला उशीर होतो
पेंगुळल्या डोळ्यांची आई असते उंबरठ्यावर बसलेली
पेंगुळल्या आवाजातच म्हणते, 
आलास तू. किती वाट बघायला लावतोस रे, काळजी वाटते बघ
पेंगुळल्या डोळ्यातले प्रेम उंबरठ्यावर सडा पसरलेले.
व्हॅलेंटाईन ........ ❤️

बहिणीचा फोन दादा, कुठे आहेस ? 
अरे गाढवा काल येतो म्हणालायस आणि अजून येतोयस ? 
बावळट आहेस तू. झरझरुन फोनवर तिचे हसणे. 
मी मारलेल्या थापा ओळखणे. आणि दुसऱ्या दिवशी भेटल्यावर घट्ट मिठीत घेऊन, 
दाद्या, तू आहेस म्हणून मी आहे रे ... 
पाणावलेले डोळे हळूच पुसत हसताना 
माझ्या अंगभर पसरणारे तिचे प्रेम.
व्हॅलेंटाईन ........ ❤️

मुलाशी भांडण मग न बोलता जेवण पान लावून सुम्म बसणं.
 बातम्या संपल्या की झोपायला जाणं झोपल्यावर रात्री कधीतरी जाग येते. 
अंगावर शाल पसरलेली असते. पायावर कुणाचा तरी हात असतो. 
उठून बघतो तर मुलगा तसाच बसून माझ्या अंगावर हात ठेवून गाढ झोपलेला असतो. 
डोळ्यातले पाणी गालावर सुकलेले. मी त्याच्या केसांत हात फिरवून त्याला जागं करतो. 
तो जागा होतो. आणि घट्ट मला मिठी मारतो. 
हुंदक्यांना आवरत तो म्हणतो," बाबा, आय ॲम सॉरी. माझ्याकडून परत असं होणार नाही. 
पण बोल रे माझ्याशी " मी ही त्याला म्हणतो, "आय ॲम सॉरी मित्रा. माझंही जरा चुकलंच रे " 
घट्ट मिठीत आश्वासक प्रेम.
व्हॅलेंटाईन ........ ❤️

मुलीचा कॉलेजमधे कसला तरी सत्कार असतो.  
बाबा, तू यायलाच हवायस हं " मी आणि बायको जातो. 
मुलगी तिच्या तिच्या मित्र मैत्रिणींच्या गोतावळ्यात असते. 
आमच्याकडे बघते आणि तिच्या नजरेत हसरी चमक उठते. 
कार्यक्रम सुरु होतो. ती स्टेजवर असते. बक्षिस मिळते. ती माईक हातात घेते. 
"माझ्या या बक्षिसाचे खरे मानकरी आहेत माझे आई-बाबा." 
आमच्याकडे खूण करते. सगळे ऑडिटोरियम  आम्हां दोघांकडे बघायला लागते. 
टाळ्यांचा आवाज वाढत असतो. स्टेजवर असलेली ती आमच्याकडे बघत आपले डोळे पुसत असते. 
आमचेही डोळे भरलेले. भरुन भरुन ओसंडणारे प्रेम.
व्हॅलेंटाईन ........ ❤️

सिग्नलला गाडी थांबलेली... सोनचाफ्याची फुले विकणारी ती 
झिप्र्या केसांनी विस्कटलेली गाडीच्या काचेजवळ. 
मी गाडी बाजूला घेऊन थांबवतो. बाहेर येऊन तिच्याकडून दोन पाकिटे फुले घेतो. 
पन्नासच्या ऐवजी शंभर देतो. आणि फुलांची पाकिटे उघडून ती सगळी फुले तिच्याच ओंजळीत ओततो. 
ती श्वासभरुन गंधाळली होते. सोनचाफी गंधाळ हसत हसत निघून जाते. 
ती गेलेल्या वाटेवर पसरलेले असते ते सोनचाफी गंधाचे निर्व्याज अनामिक प्रेम.
व्हॅलेंटाईन ........ ❤️

वृध्द ओणव्या झालेल्या वडाच्या पारावर संध्याकाळी 
ती काळपट म्हातारी बसून असते. काळ्याशार अंधारात मिसळलेली. 
डोळ्यांतले दिवे मंदावलेले. गार वाऱ्यात थरथरणारी. 
रात्री तिच्यासाठी पारावर जेवणाचे ताट येते. 
ताट विस्कटत ती कशीबशी चार घास खाते आणि तशीच लवंडते.
 कुणीतरी तिच्या अंगावर धाबळी ठेवतंय. ती झोपेतच गालातल्या गालात हसते. 
सकाळी पारावरुनच ती अनंताच्या प्रवासाला निघून गेलेली असते. 
रात्रीचे हसू तिथेच पारावर त्या वृध्द ओणव्या झालेल्या वडाला भेट देऊन.
व्हॅलेंटाईन ........ ❤️
     असा ही व्हॅलेंटाईन ...

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

बुधवार, १५ फेब्रुवारी, २०२३

255. मैफल म्हाताऱ्यांची

        एका संध्याकाळी आजोबांची मैफल जमली. एक आजोबा सांगत होते.. "आमच्या मुलानं जुना टीव्ही विकला, आणि भला मोठा नवा टीव्ही आणला. तुम्हाला म्हणून सांगतो, मला जरा वाईट वाटलं. जुन्या काळी पै पै साठवून, मी तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही घेतला होता. पोरानं शब्दानं तरी विचारायचं ना.       
        म्हातारं झाल्यावर कोण काय विचारतो म्हणा ! आपल्याला कारभाराच्या सवयी लागलेल्या. खरं म्हणजे हळूहळू सगळे अधिकार सोडून, शांतपणे जगायला पाहिजे; पण लहान पोरांत आणि म्हाताऱ्या माणसांत तसा काही फरक नसतो असं म्हणतात, ते काही खोटं नाही. सगळं कळतं, पण वळत नाही. तर मुलगा म्हणाला, 'बाबा, तुम्हाला कमी दिसतं म्हणून, मोठा टीव्ही आणला.  मी म्हणालो, 'बापाची काळजी असणारी अशी मुलं आजकाल दुर्मिळ झाली आहेत.' तेव्हा तो छानपैकी हसला. त्याला वाटलं की आपण म्हाताऱ्याला फसवलं. मात्र, त्याची बायको महिन्यापासून मोठ्या टीव्हीसाठी मागं लागली होती, हे मला माहित होतं, पण आपण कशाला बोलायचं तसं !"       
     दुसरे आजोबा सांगत होते..... "म्हातारे म्हणजे परावलंबी; पण आपण असे तरुण असल्यासारखे जोमानं राहायला जातो, ते काय खरं आहे का गड्यांनो शेजारचा सीतारामभाऊ नाही का, गात्रं शिथिल झाली तरी, काठी न घेता फिरायला गेला, आणि आदळला डांबरी रस्त्यावर. नवा खुबा टाकावा लागला. पुन्हा आम्हाला फोन करून सांगतो, 'या घरी, नव्या खुब्याचा चहा पाजतो !' अशी गंमत !"     
      "आमच्या पलीकडचा शांताराम काल मला म्हणत होता, चहा देताना माझी सून डोक्‍यावर पदरच घेत नाही. मी त्याला सांगितलं, माझी सून मला चहाच देत नाही, आता बोल ! अरे, तुला चहा मिळतोय ना, मग तुला पदराचं काय घेणं आहे, बाबा ! तिच्या नवऱ्याला जसं आवडतंय तशी ती राहते. अहो, घरातल्या म्हाताऱ्या माणसांना आवडेल असं राहणारी सून दाखवा, अन् माझ्याकडून हजार रुपये घेऊन जा ! काळाबरोबर बदलायला पाहिजे ना आपणही !"        
        तिसरे आजोबा सांगत होते... "माझे एक जोडीदार रामभाऊ म्हणतात, पेन्शनमुळं आपलं म्हातारपण बरं आहे. कसलं खरच बरं आहे. अहो, पेन्शन ठेवली पाहिजे ना आपल्याजवळ. ज्यांना पेन्शन आहे, त्यांची वीस-पंचवीस तारखेपासून चांगली सेवा सुरू होते. विशेष म्हणजे, महिनाभर म्हाताऱ्याकडं पाहायला वेळ नसलेल्या कुटुंबाला, एक तारखेला त्याच्यासाठी भरपूर वेळ असतो. एकदा पेन्शन कुटुंबाच्या पदरात पडली, की पुन्हा म्हातारा वीस-तीस तारखेपर्यंत कुचकामी.  अहो, तो आपला नानाभाऊ नाही का, तो तर पेन्शन मिळाली की, काही पैसे पायमोज्यात दडवून ठेवायचा. सुनेच्या हे लक्षात आल्यावर, ती आता त्याचे पायमोजे रोज धुवायला मागते. एरवी, भूल देण्याइतपत वास मोज्यांना यायचा, तरी धुतले जात नसायचे."        
        चवथे आजोबा सांगत होते... "आपण कुणाला काही समजावण्याच्या भानगडीत पडायचं नाही. काही माणसं मरताना देहदान करतात. मग रुग्णालयात त्यांच्या शरीरावर प्रयोग होतात. तसे आपल्या म्हाताऱ्या माणसांवरही मरण्याच्या अगोदर कुटुंबा कुटुंबात प्रयोगच सुरू असतात. रुग्णालयातला तो देह तक्रार करतो का ? नाही ना ! तशी आपणही कुटुंबात करायची नाही. घरात हक्क गाजवायचा नाही. कर्तेपणा सोडून द्यायचा. कुणाला उपदेश करायचा नाही. घरातल्यांना आवडेल इतकंच त्यांच्यावर प्रेम करायचं. घरात कुणी नवीन आला, की लगेच त्याच्या पंचायती सुरू करायच्या नाहीत. कुणाची निंदा करायची नाही. ताटात भाजी धडाची येत नसेल, तर आपलंच तोंड म्हातारपणामुळं बेचव झालं आहे, असं समजायचं.  निसर्ग म्हाताऱ्यांची गात्रं शिथिल करतो, ती शिक्षा नव्हे; तर वरदान समजायचं ! घरातील न पटणाऱ्या गोष्टी दिसू नयेत, म्हणूनच डोळे अधू झाले आहेत, असं समजायचं. मग कुणी केलेलं भडक मेकअपही सौम्य दिसू लागतं. ऐकायला येत नाही तेही बरंच म्हणायचं. नाहीतरी, आपल्या म्हातारपणाविषयी जे बोललं जातं, ते ऐकण्यासारखं नसतंच.         
        पाचवे आजोबा सांगत होते... "हात-पाय चालतात तोवर सकाळ-संध्याकाळ फिरायला बाहेर पडत जा. आपण सारे म्हातारे एकत्र आलो, की कशा छान गप्पा होतात. शिवाय, घरच्यांनाही जरा मोकळेपणा मिळतो. सकाळी जागीच जमेल तेवढा योगा केलेला बरा. चला, आज मी एकटाच बोलतोय, म्हणून तुम्ही कंटाळला असाल. इतका का बोललो, तर आता पंधरा दिवस आपली भेट होणार नाही म्हणून. आमचा थोरला मुलगा तिकडं दूर राहतो, म्हणजे आमच्या तीन पोरांनी मला पंधरा पंधरा दिवस वाटून घेतलेलं आहे.सकाळीच इथल्या सुनेने पिशवी भरली, आणि आठवण करून दिली, की इथले पंधरा दिवस संपले. निघा हवा बदलायला. आता मी ज्या घरी जाणार आहे, त्या घरातल्या सुनेला पंधरा दिवस अमावास्या वाटणार. त्यांना नावं ठेवण्यात अर्थ नाही. सुना पडल्या परक्‍या. आपलंच रक्त धडाचं असलंं पाहिजे ना.        
           सहावे आजोबा सांगत होते.... "अहो, घराघरातल्या म्हाताऱ्यांच्या गमती सांगायला लागलो, तर मोठा ग्रंथ तयार होईल. त्यापेक्षा मी काय सांगतो ते नीट ऐका, आधी हे लक्षात घ्या की, आपला काळ आता गेला. आता ही पिढी आपल्याला बिघडलेली वाटते, पण, ती तिच्या जागी बरोबर आहे. पुढची पिढी यापेक्षा आधुनिक असेल. आपण तरुण असतानाच्या काळात मोबाईल फोन, स्मार्ट फोन असते, तर आपणही हेच केलं असतं की नाही ! अहो, इतकं वय झालं, तरी आपण व्हाट्‌सऍप, फेसबुक वापरतोच ना. मग ती तर तरुण पोरं आहेत. काळ घडवतो आणि बिघडवतोही.  मोबाईलने डोळे जातील, डोकं चक्रम होईल, तेव्हा माणसाचा मोबाईलचा नाद आपोआप बंद होईल.  सकाळी सूर्य आभाळात लाली पसरतो. मावळतानाही तो तक्रार न करता, आकाश रंगवूनच बुडतो ना बस्स, आपली आयुष्याची संध्याकाळ अशीच घालवायची. सूर्यासारखी... भोगाची सारी उष्णता पोटात दाबून..
      आयुष्यभर नोकरी, करियर, पैसा याच्यामागे धावणारा पुरूष, कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. निवृत्त झाल्यावर त्यांच्याकडे वेळच वेळ असतो. पण कुटुंबाला आता त्यांना द्यायला वेळ नसतो. त्यांच्याशिवाय जगण्याची कुटुंबियांनाही सवय झालेली असते. त्यामुळे आता मिळालेल्या वेळेचे करायच काय ? असा प्रश्न निर्माण होतो आणि मग तो अस्वस्थ होतो. हल्ली उतारवयातील बहुतेक कुटुंब दोनच माणसांचे आहे आणि तेच जर एकमेकांना समजून घेण्यात कमी पडले तर आयुष्याची संध्याकाळ सुंदर कशी होणार? हातात वेळ असतो तेव्हाच आपल्या जोडीदारासाठी वेळ द्यायला हवा. अन्यथा नंतर आपल्याला वेळ असेल, तेव्हा आपल्या जोडीदाराला वेळ नसेल आणि गैरसमज वेळीच दूर झाले तरच आयष्याची संध्याकाळ सुंदर होत असते. आपल्या संसाराच्या जोडीदाराला जपूया. काळजी घेऊ या, सुखसमाधान देऊ या. आपल्या त्या जोडीदाराशिवाय आपले जीवन एका वाळवंटासारखं असतं, हे विसरून कसे चालेल?
        चला आता आपआपल्या घरी, आपली सवंगडी (नातवंड) आपली वाट बघत असतील."

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

254. SSC बॅच

 प्रत्येकाची SSC ची बॅच असते,  कोण कुठे आहे माहिती नसलं
 कधीच भेटणं होत नसलं तरी ती प्रत्येकाच्या मनात असते.

SSC च्या बॅचची एक गंमत असते
 पन्नाशी पार केलेला तो  सासरा झालेला असतो,
पन्नाशी पार झालेली ती  सासू झालेली असते,
तरी सुद्धा SSC च्या बॅचमध्ये 
 अजुनही तो मुलगा असतो आणि ती मुलगी असते

 SSC च्या बॅचमधल्या आठवणी  सुखद असते त्यांची उजळणी
 तीने त्याच्याकडे पाहिलेलं असतं,  त्याने तीच्याकडे पाहिलेलं असतं
 बस्स इतकच, बघण्या बघण्यातच  वर्ष सरलेलं असतं
 SSC चा निकाल लागतो,  नवीन प्रभा घेऊन सूर्य उगवतो
 प्रत्येकाचं विश्व वेगळं होतं, 
त्याचे मित्र बदलतात, तीचेही मित्र बदलतात 

 एका गोष्टीची सुरूवात होण्यापुर्वीच  तिला विराम येतो
 नवीन वयात, नवीन विश्वात, नवीन मित्रांत, गप्पांच्या ओघात,
पुसटशा स्पर्शात, प्रेम म्हणजे काय  समजू लागलेलं असतं
 आता ओढही असते  आणि सहवासही असतो
 त्याला कुणीतरी आवडते, तीला कुणीतरी आवडतो, 

कुणी सहजीवनाची शिडी एकत्र चढतो, 
कुणी पडतो, कुणी धडपडतो
 पुढच्या आयुष्यात प्रत्येकाची  आपली बाग असते
 त्याच्या बागेत तो झाड होऊन जगतो,
तीच्या बागेत ती वेल होऊन जगते
 वेलीवर कळ्या येतात  त्यांची फुले होतात
 झाडाचा वृक्ष होतो  सावली देत ताठ उभा असतो
 पण त्या उभं रहाण्यातही खरं तर  वेलीचाच त्याला आधार असतो
 
वर्ष सरत असतात, कळ्यांची फुले होतात.
 वाऱ्यावर डुलत असतात, बहरत असतात. 
 कधी वाऱ्याचं वादळही होतं,  सगळ्या बागेला हलऊन जातं
 झाड मात्र ताठ असतं, कसं हलल पण नाही  म्हणून ताठरपणे पहात असतं
 पण तीच ती वेल असते, स्वतः वाकते  म्हणून झाडाला  मोडण्यापासुन वाचवते 
 
आता आयुष्याच्या सायंकाळी फेसबुक व्हाट्सॲप्
 हाच विरंगुळा असतो.
फेसबुकवर शोध घेता घेता  व्हाट्सॲपवर
 SSC च्या बॅचचा ग्रुप तयार होतो

 इतकी वर्षे बंद असलेला  कोनाडा हळूच उघडतो
 हृदयाच्या कुपीत बंद ठेवलेल्या  अत्तराचा सुगंध
 अजुनही तसाच असतो  आता मात्र गप्पांच्या मैफिलीत 
 जुन्या मित्र मैत्रीणींच्या  आठवणींना उजाळा येतो
 कारण त्या अत्तराच्या  कुपितला सुगंध  पुन्हा हवाहवासा वाटतो

 मनोमन मन म्हणत असतं  अशी वेळ यावी
 केव्हातरी कुठेतरी ती ओझरती तरी दिसावी
 तेव्हाची ती नजरानजर  एकदा तरी व्हावी,
ती एकच नजर  पुढील जीवनाची  शिदोरी बनुन जावी
 त्यातच एक आशेचा किरण दिसतो
 
SSC चा  भेटण्याचा दिवस ठरतो.
 त्या दिवशी प्रत्येकजण नव्यानं  जुनंच दिसण्याचा प्रयत्न करतो
 प्रत्येक मुलगा मुलगी मला ओळखेल  हा भाबडा विश्वास असतो 
 त्याच वर्गात, त्याच बेंचवर प्रत्येकजण पुन्हा एकदा  बसणार असतो
 आणि आठवणींच्या झऱ्यांचा महासागर होणार असतो

 भेटीगाठी होत असतात  जुन्या आठवणी निघत असतात 
 त्यातच तीची त्याची नजरानजर होते आणि
 एका क्षणात सर्व काही सांगून जाते
 त्याला आणि तीलाही नवीन भेटीत  खुप काही बोलायचं असतं
 पण उजाळा देण्यासारख  SSC या वर्षात  काही घडलेलच नसतं

 तो तीला तिच्या  टोपण नावाने हाक मारतो,
ती अवघडते पण आक्षेपही नसतो.  
कारण एकच दिवसाचा सहवासही
 पुढच्या संपूर्ण प्रवासाचा  साथी होणार असतो
 
निरोप घ्यायची वेळ येते दोन समांतर रेषा
 काही क्षणांकरता एकत्र होऊन  पुन्हा एकदा समांतर जाऊ लागतात
 पुढील जन्मी नक्की भेटण्याची  नजरेनेच ग्वाही देतात.
 हीच ती SSC ची बॅच  कायमचं घर करून रहाते
 आयुष्याच्या भैरवीला  साथीला गात रहाते ...
SSC ची बॅच....

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

253. अंजली कुल्थे : 20 मुलांची आई

        26/11/2008 च्या रात्री नराधम अतिरेकी 'अजमल कसाब' त्याच्या एका सहकाऱ्यासोबत 'कामा हॉस्पिटल'च्या आवारात शिरला आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरु केला.. हॉस्पिटलचे दोन्ही सेक्युरिटी गार्ड्स जागीच ठार झाले.. ते दोघं रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.. जरा पुढे एक नर्स जखमी अवस्थेत पडली होती.. कसाब व त्याचा साथीदार पोर्च ओलांडून पहिल्या मजल्याचा जिना वेगानं चढत होते...'अंजली कुल्थे' नावाची 50 वर्षांची नर्स, हे भयानक दृश्य पहिल्या मजल्यावरून पहात होती... 26/11 ला ती 'नाईट शिफ्ट'ला होती.. ती 'प्रसूती कक्षाची इन-चार्ज' होती.. तिच्या वॉर्ड मध्ये 20 गर्भवती महिला होत्या....
          ... हातात बंदूका घेतलेले दोन अतिरेकी जिन्यावरून आपल्याच वॉर्डच्या दिशेनं येतायत हे पाहून अंजली जिवाच्या करारानिशी पुढे सरसावली.. आणि तिनं तिच्या वॉर्डाचे दोन जाडजूड दरवाजे कसेबसे बंद केले..
सर्व 20 महिलांना आणि त्यांच्या काही नातेवाईकांना तिनं त्या मजल्याच्या टोकाला असलेल्या छोट्या 'पॅन्ट्री'च्या खोलीत हलवलं.. वीस गर्भवती महिलांना अशा आणीबाणीच्या वेळी शिफ्ट करणं ही किती नाजूक आणि जोखमीची गोष्ट होती...कसाब व त्याचा साथीदार हॉस्पिटलच्या टेरेसवर गेले होते व तिथून खाली जमलेल्या पोलिसांवर गोळया झाडत होते.. ग्रेनेड टाकत होते... ते पाहून अंजलीनं, बाहेर येऊन, 'जखमी होऊन पडलेल्या नर्सला' कॅज्युअल्टी मध्ये नेलं आणि तिच्यावर योग्य उपचार सुरु झाले..
               इतक्यात वीस पैकी एका महिलेला प्रसववेदना सुरु झाल्या.. अंजलीनं तिला हाताला धरून, भिंतीला चिकटून चालत चालत डिलिव्हरी रूम मध्ये नेलं आणि तिथल्या डॉक्टरच्या साहाय्यानं प्रसूती सुखरूप पार पाडली..हल्ल्याचा हा थरार संपल्यावर अनेक दिवस अंजली झोपेतून घाबरून उठत असे.. एका महिन्यानी तिला पोलिसांनी पाचारण केलं.. कसाबची ओळख पटवण्यासाठी... नंतर त्याच्या खटल्यात तिला साक्षीला बोलावण्यात आलं.. तिनं कोर्टाला एक विनंती केली... "माझा 'युनिफॉर्म' घालून येण्याची परवानगी मिळावी."..'कारण, त्या भीषण रात्री या युनिफॉर्म वर असलेल्या जबाबदारीची मला जाणीव झाली आणि त्यामुळेच मी हे धाडस करू शकले..' असं तिचं म्हणणं होतं...
          अंजली कुल्थे यांनी त्या रात्री फक्त वीस महिलांचेच नव्हे तर, 'ही दुनिया पाहण्याआधीच मृत्युच्या जबड्यात पोहोचलेल्या' वीस बालकांचेही प्राण वाचवले. आज ही मुलं थोडी मोठी झाली असतील ... त्यांना कदाचित ठाऊकही नसेल की त्यांच्या 'दोन जन्मदात्री' आहेत... त्यांना नऊ महिने पोटात वाढवून  प्रत्यक्ष जन्म देणारी एक आई आणि  अंजली कुल्थे ... जन्माआधीच जीवदान देणारी दुसरी आई..
अंजलीताई तुमच्या अतुलनीय धैर्याला आणि प्रसंगावधानाला सविनय प्रणाम!

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

252. श्री. संत ज्ञानेश्वर यांचे काही विचार

 संत ज्ञानेश्वर महाराजांना समाजाबाहेर काढले तेव्हा त्यांनी लिहलेले काही विचार :-
१) माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो.             
२) मी स्त्री व्हावे की पुरूष, काळा की गोरा, माझ्या शरिराची ठेवण, सर्व अवयव ठिकठाक असणे, हे देखील माझ्या हाती नव्हते. मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे.              
३) माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव, हे देखील माझ्या हाती नव्हते. त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे. 
४) सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दु:खं असणारच आहेत. ती दु:खं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दु:खांचे भांडवल न करता, मी त्या दु:खांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन.
५) माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी, माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे.
६) माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्या वेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे.
७) हे विश्व मी निर्माण केलेले नाही. किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, या माझ्या मताला देखील काही किंमत नाही. तेव्हा, हे असे का? ते तसे का? असे का नाही? वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्या ऎवजी, जे चूक आहे, अयोग्य आहे, ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल. हे ही नसे थोडके !
८) कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दु:ख मिळणार आहे याची जाणीव ठेवून, मी माझ्या आसपासच्या दु:खी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे. 
९) आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेवून, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे.
१०) मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत रहाण्या ऐवजी, जे काही मिळाले आहे, त्या बाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार  लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये.

- संत ज्ञानेश्वर
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

सोमवार, १३ फेब्रुवारी, २०२३

251. कांही कळलंच नाही

 कां कुणास ठाऊक, कांही कळलंच नाही,   
मन मात्र म्हणतंय तरुण आहे मी.
कसा संपला ०६ पासून ६० वयापर्यंतचा हा प्रवास,
कांही कळलंच नाही.

काय मिळवलं, काय कमावलं,काय गमावलं,कांही कळलंच नाही.
संपलं बालपण,गेलं तारुण्य,केव्हा आलं ज्येष्ठत्व,कांही कळलंच नाही.
काल मुलगा होतो, केव्हा बाप आणि नंतर सासरा झालो, कांही कळलंच नाही.

केव्हा 'बाबा' चा'आबा' होऊन गेलो,कांही कळलंच नाही.
कोणी म्हणतं साठी बुद्धी नाठी,कोणी म्हणतं हाती आली काठी,
काय खरं आहे, कांही कळलंच नाही.

पहिले आई बापाचं चाललं, मग बायकोचं चाललं, मग चाललं मुलांचं, 
माझं कधी चाललं,  कांही कळलंच नाही.
बायको म्हणते, आता तरी समजून घ्या , 
काय समजू, काय नको समजू,  कां कुणास ठाऊक,  कांही कळलंच नाही.
        
मन म्हणतंय तरुण आहे मी, वय म्हणतंय वेडा आहे मी,
या साऱ्या धडपडीत केव्हा गुडघे झिजून गेले, कांही कळलंच नाही.
झडून गेले केस, लोंबू लागले गाल, लागला चष्मा, 
केव्हा बदलला हा चेहरा कांही कळलंच नाही.

काळ बदलला, मी बदललो, बदलली मित्र-मंडळीही.
किती निघून गेले,  किती राहिले मित्र, कांही कळलंच नाही.
कालपर्यंत मौजमस्ती करीत होतो मित्रांसोबत,
केव्हा सीनियर सिटिझनचा  शिक्का लागून गेला, कांही कळलंच नाही.

सून, जावई, नातू, पणतू, आनंदीआनंद झाला.
केव्हा हासलं उदास हे जीवन, कांही कळलंच नाही.
भरभरून जगून घे जीवा मग नको म्हणूस की,
मला कांही कळलंच नाही.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

250. पुस्तकांनी काय शिकवलं?

    तुमच्याकडे दहा रुपये असतील तर आठ रुपये स्वतःच्या खर्चासाठी ठेवा. उरलेल्या दोन रुपयांपैकी एक रुपयाचं गुलाबाचं फुल घ्या आणि एक रुपयांचं पुस्तक घ्या अशी एक म्हण आहे. का जगायचं ते गुलाबाकडे पाहून कळेल आणि कसं जगायचं ते पुस्तक शिकवेल. पुस्तके अत्यंत मोलाची आहेत. त्यात मराठी साहित्य ही तर न संपणारी दौलत आहे. जितकी जास्त लुटाल तितकी ती वाढत जाते. एक ज्ञानेश्वरी जरी पुन्हा पुन्हा वाचली तर प्रत्येक ओवीचा अर्थ नव्याने कळतो. आपण मराठी माणसे खरोखर नशीबवान, आपल्याला जसा थोर इतिहास लाभला तशी साहित्याची मोठी परंपराही लाभली.
      मी पुस्तके वाचायला सुरुवात केली तेव्हा काय वाचायचं हे ठरवलं नव्हतं. सार्वजनिक वाचनयालात जे समोर येईल ते वाचत गेलो आणि हळहळू मराठी साहित्याचा मोठा खजिना हाती गवसला. सुरुवात झाली होती पॅपिलॉन नावाच्या पुस्तकापासून. हेन्री शॅरीयर नावाच्या एका फ्रेंच गुन्हेगाराने हे पुस्तक लिहिलं. हेन्रीला गुन्हेगारी जगतात पॅपिलॉन नावाने ओळखत असत. तो फार मोठा गुन्हेगार नव्हता. पण त्याच्यावर खुनाचा खोटा आळ आला आणि त्याला फ्रेंच गियानामधील कुप्रसिद्ध जेलमध्ये धाडण्यात आलं. तिथे त्याला कठोर कारावास भोगावा लागला. आपल्यावर खोटा आळ टाकणार्यांना धडा शिकवायचा, त्यासाठी जेलमधून पाळायचं आणि पुन्हा फ्रान्सला जायचं हे त्याने ठरवलं. त्याचा प्रवास सोपा नव्हता. तरीही अत्यंत जिद्द, धाडसाच्या बळावर तो पळाला. ही सगळी कथा त्याने स्वतः लिहिली आणि रवींद्र गुर्जर ह्यांनी ती मराठीत आणली. ह्या पुस्तकाने शिकवलं की जीवनात केव्हाही अडचणी येऊ शकतात आणि त्याला तोंड द्यायला साहस, दुर्दम्य आत्मविश्वास ह्याची गरज असते. संघर्ष हा दर पावलाला येत असतो आणि त्याला तोंड देत जिद्दीने लढायचं असतं.
      साहस आणि दुर्दम्य आत्मविश्वासाचा विषय निघतो तेव्हा सावरकरांचं ''माझी जन्मठेप'' पुस्तक विसरता येत नाही. सावरकरांना दोन जन्मठेपीच्या शिक्षा सुनावण्यात आल्या. एक जन्मठेप होती २५ वर्षांची. म्हणजे सावरकर ५० वर्षानंतर जेलमधून बाहेर येणार होते. थोडक्यात जिवंत बाहेर येण्याची शक्यता नव्हती. तरीही शिक्षा ऐकून ते डगमगले नाहीत. त्यांनी ब्रिटिश सरकारला ऐकवले. तुम्ही फार काळ भारतात राहू शकणार नाही. त्यामुळे माझी शिक्षा लवकर संपेल. इतका दुर्दम्य आत्मविश्वास फक्त तेच दाखवू शकतात. अंदमानच्या सेल्युलर कारागृहात गेल्यावर त्यांची कठोर बारीशी गाठ पडली, शारीरिक-मानसिक यातनांना सुरुवात झाली. दिलेल्या भांड्यात संडास करावी लागे. स्वतःच्या कोठडीत लघुशंका केल्यावर त्याचा वास घुमत राही. इतकी भयंकर प्रतिकूलता असूनही ते हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याचं स्वप्न पाहत होते. जगताना आपल्यावर संकटे येऊ शकतात आणि आपण त्यांवर मात करू शकतो हे शिकायचं असेल तर 'माझी जन्मठेप' वाचायलाच हवे. क्रांतिकारकांनी जे भोगले त्या तुलनेत आपल्या वाट्याला जर काही प्रतिकूल परिस्थिती आली तर ती काहीच नाही हे जाणवू लागते.
            जगायला शिकवणाऱ्या पुस्तकांची अनेक उदाहरणे आहेत. त्यातील मी वाचलेलं एक आहे- डेझर्टर! गंथर बाहनमन हा जर्मन सैनिक होता. त्याची लिबियामध्ये नेमणूक झाली होती. हिटलरसाठी तो लढत असताना त्याच्या वडिलांना नाझी सैनिकांनी फासावर चढवले. म्हणून त्याने सैन्य सोडण्याचे ठरवले. जर्मनीला जाऊन आईला भेटायचे त्याचे स्वप्न होते. पण त्याचा प्रवास सोपा नव्हता. सैन्यातून पळाल्यामुळे त्याला ठार केले जाऊ शकत होते. तरीही तो जर्मन आणि त्यांचे दोस्त असलेल्या इटालियन सैन्याला झुकांड्या देत पळत राहिला आणि अखेर शत्रूच्या म्हणजे ब्रिटिशांच्या तावडीत सापडला. ब्रिटिशांच्या कैदेत असताना तो इंग्लिश शिकला आणि त्याने हे पुस्तक लिहिले.
          विजय देवधरांनी अनेक पुस्तकांचा अनुवाद केला. त्यापैकी बरीच पुस्तके साहसावर आधारित आहेत. ही सगळी पुस्तके आपल्याला धाडस करायला उद्युक्त करतात. रवींद्र गुर्जरांनी अनुवादित केलेल्या 'सत्तर दिवस' पुस्तकाचाही आवर्जून उल्लेख करायला हवा. एक विमान दुर्गम पर्वतामध्ये कोसळले आणि त्यात जिवंत राहिलेल्या प्रवाशांनी जगण्यासाठी जी धडपड केली ती ह्या पुस्तकात दिली आहे. ह्या प्रवाशांनी बर्फाळ प्रदेशात स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी मेलेल्या सहप्रवाशांचे मास कापून खाल्ले. अखेरीस त्यांचा शोध लागला आणि त्यांची सुटका झाली. ज्यांना जीवनात अपयश आल्यामुळे आत्महत्या करावीशी वाटते त्यांनी जगण्याचा टोकाचा प्रयत्न कसा असतो हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचावे. ही सत्यकथा आपल्याला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीही जगण्याची प्रेरणा देतं. जगण्यासाठी अनेकांची कशी धडपड चालते हे जाणून घ्यायचे तर 'मला निसटले पाहिजे' हे पुस्तकही वाचावे. रशियाने काही ब्रिटिश सैनिकांना बंदी बनवले होते. ह्या सैनिकांनी पळून जाण्यासाठी जे प्रचंड धाडस केले तो ह्या पुस्तकाचा विषय आहे. कैदेतून पाळल्यावर हे सैनिक रशियापासून भारतापर्यंत चालत आले. इथे ब्रिटिशांची सत्ता होती. भारतात आल्यावर ब्रिटिश आपल्याला पुन्हा इंग्लंडला पाठवतील हे ओळखून त्यांनी अत्यंत थंड प्रदेशातून उपास तापास सहन करून भारतापर्यंत चालत प्रवास केला. भारताच्या सीमेवर ते ब्रिटिश सैन्याकडे आले आणि त्यांना इंग्लंडला पाठवण्यात आले. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी माणूस प्रसंगी जीवावर उदार होतो, असंख्य अडथळे पार करतो हे या पुस्तकातून शिकता येते. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य किती बहुमोल आहे ते कळते. तसेच एक सैनिक देशासाठी किती झटत असतो तेही कळते.
           भारतामध्येही अनेक चरित्रकथा लिहिल्या गेल्या. 'लंडनच्या आजीबाई' हे पुस्तक त्यापैकी एक आहे. इंग्रजांच्या काळात विदर्भात राहणारी राधाबाई वनारसे ही विधवा दारिद्र्य भोगत होती. मुलींचं पोषण करणं अशक्य झालं होतं. ती दुसरा विवाह करून इंग्लंडला राहायला गेली. दुर्दैवाने दुसऱ्या पतीचेही निधन झाले. पुन्हा दारिद्र्य आले. इंग्लिश भाषा येत नव्हती. ती अशिक्षित होती. तरीही इंग्लंडमध्ये राहून तिने खानावळ चालवली आणि लंडनमध्ये चार इमारती विकत घेतल्या. पु.ल. देशपांडे, अत्रे, यशवंतराव चव्हाण लंडनला गेले की तिच्या खानावळीत जात असत. अत्रेंनी तर तिचे कौतुक करताना म्हटले की त्यांच्यामुळे लंडनही महाराष्ट्राचा भाग व्हायला पाहिजे. हे पुस्तक वाचकाला आशावादी बनवते, संघर्ष करण्याची प्रेरणा देते. कितीही संकटे आली तरी श्रम करून संकटे दूर करता येतात, यश मिळवता येते हे या पुस्तकातून शिकता येते.
           कांही पुस्तके जगायला शिकवतात तर काही पुस्तके का जगायचं हे शिकवतात. जीवनातील विसंगतीकडे पाहून हसता येते हे पु.ल. देशपांडेची पुस्तके शिकवतात आणि असे दिलखुलास हसता येते हाच जीवनातील मोठा आनंद आहे हे या पुस्तकातून कळते. " चाराणे खाल्ले तर चौकटीची टोपी घालून डिस्ट्रिक्ट जेलात घालतात आणि लाखो रुपये खाल्ले तर लोकनियुक्त प्रतिनिधी बनवतात'' हा त्यांचा विनोद अनेक वर्षे उलटली तरी अजूनही खरा ठरतो. ''असामी असामी'' आजही सामान्य माणसाचे प्रतिबिंब आहे. आचार्य अत्र्यांची पुस्तकेही अशीच हसवतात. द.मा. मिरासदार, रमेश मंत्री यांचीही पुस्तके करमणूक करतात. शं.ना. नवरे, व.पु. काळे छोट्या कथेमधून खूप काही सांगून जातात. व्यंकटेश माडगूळकर आणि रवींद्र पिंगे ह्यांचे ललित लेख तर फार वाचनीय असतात. माडगूळकरांनी त्यांच्या गावाचे खुमासदार वर्णन केले आहे आणि पिंगेंनी स्वतः केलेल्या भटकंतीवर विपुल लेखन केले आहे. हे लेखन आपल्याला आसपास पाहायला प्रवृत्त करते. जीवन चहूबाजूने खूप काही दाखवत असते. आपण आपल्या छोट्या समस्या, रोजचे रडे बाजूला सारून हा आनंद घ्यायला हवा हे त्यांची पुस्तके शिकवतात.
कथा, चरित्रकथा अनेक शब्दातून व्यक्त होतात. पण कविता मोजक्या शब्दातून खूप मोठा अर्थ सांगून जाते. आशावाद, सकारात्मकता कशी असावी हे मंगेश पाडगावकरांच्या ' या जन्मावर, या जगण्यावर' च्या शेवटच्या कडव्यातून शिकता येते. पाडगावकरांनी लिहिले आहे,
या ओठानी चिंबून घेईन हजारदा ही माती,
अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी,
इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे,
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
आपण जगताना अनंत यातना सोसतो. प्रसंगी मरणही झेलून घेतो. तरीही पाडगावकर लिहितात की ज्याप्रमाणे श्रीकृष्ण पुरामध्ये पिंपळ पानावरुन तरून गेला तसे हे विश्वही तरणार आहे. आसपास अनेक नकारात्मक प्रसंग घडताना हा आशावाद मनाला खूप उभारी देतो. आपल्या मनाला उभारी देण्यासाठी आणखी एक गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या पाठीशी उभं राहणं. एखाद्याने नुसता धीर दिला तरी मोठ्या संकटांवर मात करता येते. कुसुमाग्रजांची 'कणा" कविता हेच शिकवते. कुसुमाग्रजांकडे त्यांचा एक विद्यार्थी आला आहे. त्याच्या घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे त्याचं घर उध्वस्त झाले आहे. तो येतो आणि म्हणतो,
"ओळखलत का सर मला?’ - पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’
त्याच्या घरात पुराचं पाणी शिरलं. पण त्या पाण्याला नाव न ठेवता तो त्याला गंगामाई म्हणतो आणि पुढे सांगू लागतो.
" माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे,
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे"
कुसुमाग्रजांनी त्याला मदत म्हणून काही पैसे देण्याचा विचार केला. पण त्याने ते नाकारले. कुसुमाग्रज लिहितात,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा’!
              पूरग्रस्त झालेला हा विद्यार्थी खूप मानी आहे. त्याला पैसे नकोत, फक्त सरांकडून धीर हवा आहे. सरानी पाठीवर हात ठेवून फक्त लढा म्हणावे इतकीच त्याची इच्छा आहे. कुसुमाग्रजांची ही कविता अनेकांच्या स्मरणात राहिली ती फक्त हव्या असलेल्या धीरासाठी. मराठी पुस्तकांची ही खासियत आहे. ही पुस्तके जगायला बळ देतात. जणू पाठीवरती हात ठेवून लढ म्हणत असतात. म्हणून आपल्या संग्रही पुस्तके असावीत. आपल्या पुढच्या पिढीला संपत्ती देण्यापेक्षा पुस्तके द्यावीत. कारण संपत्ती मिळालेली पिढी पंगू होते तर पुस्तके मिळालेली पिढी सक्षम बनते.  पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित करणारी पाब्लो नेरुडाची कविता आहे,
If you do not travel, 
If you do not read,
If you do not listen to the sounds of life,
You start dying slowly

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

249. सकारात्मक नि नकारात्मक विचार

     एकदा दोन मैत्रिणींची मुलं झाडावर चढली होती, मुलं झाडावर उंच पोहचल्यावर अचानक जोराचं वादळ आलं. ते झाड वाऱ्यानं गदागदा हालू लागलं. पहिल्या मुलाची आई तिच्या मुलाला म्हणाली, "पडशील." तर दुसऱ्या मुलाची आई म्हणाली, "सांभाळ, घट्ट पकडून ठेव." खरंतर दोन्ही मैत्रिणींना आपापल्या मुलांना पडण्या पासून वाचवायचं होतं. परंतु त्यांच्या मुखातून निघालेल्या संदेशांमध्ये मात्र विरोधाभास होता. परिणामी पहिल्या स्त्रीचा मुलगा फांदीवरुन घसरून खाली पडला. मात्र दुसऱ्या स्त्रीच्या मुलानं फांदी घट्ट धरून ठेवली आणि तो अलगद उतरून खाली आला. काय बरं असेल या मागचं कारण? पहिल्या स्त्रीच्या शब्दामध्ये नकारात्मकता होती. जी तिच्या मुलानं ग्रहण केली आणि तो पडला. या उलट दुसऱ्या स्त्रीनं उच्चारलेल्या शब्दांमध्ये सकारात्मकता असल्याने तिच्या मुलानं ती ग्रहण केली आणि तो फांदीवर आपले पाय घट्ट रोवून बसला होता. म्हणून, नेहमी सकारात्मक बोला. सकारात्मक कल्पनाचित्रे निर्माण करा. म्हणजेच सकारात्मक बदल घडून येईल.
        आपल्या प्रार्थनेवर आणि आदेशांवर नेहमी पूर्ण विश्वास असायला हवा. योग्य आदेश देण्याची कला आत्मसात करा. "Think Positive, Be Positive" कधी कोणाच्या परत येण्याची वाट पाहू नका, कारण ते हरवलेले अजिबात नसतात.. तर ते मनापासून बदललेले असतात. आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते, पण आयुष्यभर कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावाच ठरवतो.  घर रस्त्यावर असेल तर त्याची किंमत येते. शेती रस्त्यावर असेल, तर त्यालाही भाव  असतो... पण माणूस रस्त्यावर आला, की त्याची किंमत  संपते. काही माणसं लाखात एक असतात, आणि काहींकडे लाख असले, तरी ते माणसात नसतात. दु:खाच्या दिवसांमध्ये आनंदाची आशा ठेवणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. एखादी वस्तू न वापरता गंजते, आणि जास्तच वापरली तर झिजते. काहीही झालं, तरी शेवट तर ठरलेलाच आहे. मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा, इतरांच्या सुखासाठी झिजणे केंव्हांही उत्तमच. तुमच्यात काही चांगलं करण्याची योग्यता हे तुमचं जन्म नव्हे, तर तुमचं कर्म ठरवत असते, कारण जन्मतः प्रत्येक व्यक्ती शून्यच असतो, त्याला त्याचं कर्मच योग्य दिशेला घेऊन जात असतं आणि शून्यातून तो घडत जातो.            
         सर्वप्रथम आपण व आपल्या कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा. एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका. खोट्या राजकारणी लोकांपासुन दूर रहा. अफवानवर विश्वास ठेवण्या आधी खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा. प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदी जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी कुणावर येईल हे सांगून शकत नाही हे लक्षात ठेवा.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

248. काळ जुना होता

काळ जुना होता..
अंग झाकायला कपडे नव्हते,
तरीही लोकं शरीर झाकण्याचा प्रयास करायचे, 
आज कपड्यांचे भंडार आहेत. 
तरीही जास्तीत जास्त शरीर दाखवायचे प्रयत्न सुरु आहेत...
समाज सुसंस्कृत झाला आहे.. असं  काही वाटत नाही.. 

काळ जुना होता..
रहदारीची साधने कमी होती. 
तरीही कुटुंबातील लोक भेटत असत,
आज रहदारीचे साधने भरपूर आहेत.
अजूनही लोकांना न भेटण्याच्या सबबी सांगत आहे...
समाज सुसंस्कृत झाला आहे..असं  काही वाटत नाही.. 


काळ जुना होता..
घरची मुलगी अख्ख्या गावाची मुलगी होती. 
आजची मुलगी ही शेजाऱ्यापासूनच असुरक्षित आहे...
समाज सुसंस्कृत झाला आहे..असं  काही वाटत नाही.. 


काळ जुना होता..
लोकं गावातील वडीलधार्‍यांची
चौकशी करायचे, आज पालकांनाचं
वृद्धाश्रमात ठेवले जाते...
समाज सुसंस्कृत झाला आहे..असं  काही वाटत नाही.. 

काळ जुना होता..
खेळण्यांचा तुटवडा होता. 
तरी शेजारची मुलं एकत्र खेळायचे.
आज खूप खेळणी आहेत, 
मात्र मुले मोबाईलच्या कचाट्यात अडकलेली आहेत...
समाज सुसंस्कृत झाला आहे..असं  काही वाटत नाही.. 

काळ जुना होता..
रस्त्यावरील प्राण्यांना सुध्दा भाकरी दिली जायची, 
आज शेजारीचं मुलंही भुकेली झोपी जातात...
समाज सुसंस्कृत झाला आहे..असं  काही वाटत नाही.. 

काळ जुना होता..
शेजारच्या व आपल्या घरी नातेवाईक भरलेले असायचे, 
आता परिचय विचारला तर आज मला शेजारचे नावही माहीत नाही...
समाज सुसंस्कृत झाला आहे..असं  काही वाटत नाही.. 

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

247. मोबाईलचा वापर करताना...

         विद्युत डिजीटल कॅमेऱ्याच्या फ्ल्याश लाईट मधून आपल्या शरीरात प्रवेश करू शकते   का ..??? हो 100% करू शकते....!!! ... हि एक खरी घटना आहे, एका 19 वर्ष वयाच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकीमध्ये शिकणाऱ्या मुलाबरोबर घडलेली. त्याचा मृत्यु केशवानी हॉस्पिटल, मुंबई येथे झाला. त्याला हॉस्पिटल मध्ये जळालेल्या अवस्तेत दाखल करण्यात आलं होतं.   कारण ...???????
तो अमरावतीला स्टडी टूर साठी गेला होता, परत येताना तो मित्रांसोबत रेल्वे स्तानकावर रेल्वेची वाट पाहत होता. बरेचजण मोबाईल आणि डिजीटल कॅमेऱ्यातून ग्रुप फोटोज काढतहोते. त्यात हाही मुलगा होता, तो जिथे उभा होता तिथून डिजीटल कॅमेऱ्यात संपूर्ण ग्रुप फोटोत येत नवता म्हणून पूर्ण ग्रुपचा फोटो काढण्यासाठी तो मुलगा थोडा मागे झाला. (सचिन गमे) तो उभा असलेल्या जागेच्या वर 40,000 व्होल्ट विद्युत क्षमतेची तार होती. त्याने फोटो काढण्यासाठी डिजीटल कॅमेऱ्याचं बटन दाबताक्शनी 40,000 व्होल्ट क्षमतेची विद्युत कॅमेऱ्याच्या फ्ल्याश लाईट मधून कॅमेरा, कॅमेऱ्यामधून त्याच्या हाताच्या बोटांमध्ये आणि तेथून त्याच्या शरीरात घुसली. हे सर्व एका सेकंदापेक्षाही खूप कमी वेळात घडलं आणि त्याचं आर्ध शरीर जळालं. त्याचं आर्ध जळालेलं शरीर केशवानी हॉस्पिटल, मुंबई येथे रुग्नवाहीनीतून आणण्यात आलं होतं. तो दीड दिवस बेशुद्ध अवस्तेत होता. 50% शरीर जळालेलं असल्यामुळं डॉक्टरांना त्याच्या जगण्याच्या आशा कमीच वाटत होत्या. नंतर त्याचा मृत्यु झाला. आपल्यापैकीकिती जणांना असे तांत्रिक धोके घडू शकतात हे माहित आहे...????? आणि माहित असतील तरी किती जण काळजी घेतात...???? खरच आपण शिकलेलो आणि समजदार आहोत का ...?
        पेट्रोल पंप च्या ठिकाणी मोबाईल फोन चा वापर टाळा. वाहन चालवत असताना मोबाईल फोन चा वापर टाळा. काही नाही होत रे  असं म्हणायची वाईट सवय बदला. मोबाईल फोन चार्जिंग चालू असताना फोन वर बोलू नका, मोबाईलची चार्जिंग पिन आधीकाढा आणि मगच बोला. मोबाईल फोन चार्जिंग चालू असताना बेडवर किव्वा लोखंडाच्या फार्निचरवर ठेवू नका.     मोबाईल फोन/डिजीटल कॅमेरा - फ्ल्याश यांचा वापर रेल्वे स्तानकावरील किव्वा अन्य कुठल्याही  ठिकाणावरील उच्च क्षमतेच्या विद्युत तारांपाशी अजिबात करू नका. तुमच्या हितासाठीच आहे, वाचून  झाल्यावर शेअर अवश्य करा. यामुळे कुणाचा तरी जीव वाचेल. . कृपया शेयर करा इतराना पण सांगा.
 
         कैलास चव्हाण
पोलीस निरीक्षक (मुंबई पोलिस)

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०२३

246. देवाचे गणित

      एकदा दोघेजण एका मंदिराबाहेर बसून गप्पा मारत होते. अंधार पडू लागला होता आणि ढग जमा होऊ लागले होते. थोड्या वेळाने तेथे आणखी एक माणूस आला आणि तोही त्या दोघांबरोबर बसून गप्पा मारू लागला.  थोड्या वेळाने तो माणूस म्हणाला त्याला खूप भूक लागली आहे, त्या दोघांनाही भूक लागायला लागली होती. पहिला माणूस म्हणाला माझ्याकडे ३ भाकर्‍या आहेत, दुसरा म्हणाला माझ्याकडे ५ भाकर्‍या आहेत, आपण तिघे मिळून वाटून घेऊ आणि खाऊ.
        आता प्रश्न आला कि ८ (३+५) भाकर्‍या तिघांमध्ये कशा वाटायच्या ? पहिल्या माणसाने सुचविले कि प्रत्येक भाकरीचे ३ तुकडे करुया, अर्थात ८ भाकर्‍यांचे २४ (८ x ३) तुकडे होतील आणि आपल्या तिघात ८ - ८ तुकडे समसमान वाटले जातील. बाकी दोघांना त्याचे मत पटले आणि ८ भाकर्‍यांचे २४ तुकडे करुन प्रत्येकाने ८ - ८ तुकडे खाऊन भूक शांत केली आणि मग पावसामुळे मंदिराच्या आवारातच ते सारे झोपी गेले. सकाळी उठल्यावर तिसर्‍या माणसाने पहिल्या दोघांचेही आभार मानले आणि भाकरीच्या ८ तुकड्यांबद्दल प्रेमाची भेट म्हणून त्या दोघांना ८ सुवर्णमुद्रा देऊन तो आपल्या घरी गेला.  तो गेल्यावर दुसरा माणूस पहिल्या माणसाला म्हणाला की आपण दोघे ४ - ४ मुद्रा वाटून घेऊ. पहिल्या माणसाने याला नकार दिला आणि म्हणाला की माझ्या ३ भाकर्‍या होत्या आणि तुमच्या ५ भाकर्‍या होत्या, म्हणून मी ३ मुद्रा घेईन आणि तुम्ही ५ मुद्रा घेतल्या पाहिजेत. यावर दोघांची वादावादी चालू झाली. यातून समाधानकारक मार्ग काढण्यासाठी ते दोघे मंदिराच्या पुजार्‍याकडे गेले आणि त्यांनी आपली समस्या सांगितली व ती सोडविण्याची प्रार्थना केली. हे दोघेही दुसर्‍याला जास्ती देण्यासाठी भांडत आहेत हे पाहून पुजारीपण चक्रावून गेला. त्याने त्या दोघांना सांगितले की या मुद्रा माझ्यापाशी ठेवून जा आणि मला विचार करायला वेळ द्या, मी उद्या सकाळी उत्तर देऊ शकेन.
        पुजार्‍याला खरेतर दुसऱ्या माणसाने सांगितलेली ३ - ५ ची वाटणी ठीक वाटत होती, पण तरीसुद्धा तो खोलवर विचार करीत होता. विचार करता करता त्याला गाढ झोप लागली. थोड्या वेळात त्याच्या स्वप्नात देव प्रगट झाला, तेव्हा पुजार्‍याने देवाला सर्व घटना सांगितली आणि सुयोग्य मार्गदर्शन मिळावे अशी प्रार्थना केली. माझ्या दृष्टीने ३ - ५ अशी वाटणीच उचित आहे असेही त्याने देवाला सांगितले. देवाने स्मित करुन म्हटले, "नाही, पहिल्या माणसाला  १ मुद्रा मिळाली पाहिजे आणि दुसऱ्या माणसाला ७ मुद्रा मिळाल्या पाहिजेत." देवाचे म्हणणे ऐकून पुजारी चकीत झाला आणि त्याने आश्चर्याने विचारले, "प्रभू, असं कसं ?"
देव पुन्हा एकदा हसला आणि म्हणाला:- यात काही शंका नाही की पहिल्या माणसाने आपल्या ३ भाकर्‍यांचे ९ तुकडे केले, परंतु त्या ९ पैकी त्याने फक्त १ वाटला आणि ८ तुकडे स्वतः खाल्ले. म्हणजेच त्याचा त्याग भाकरीचा फक्त १ तुकडा एव्हढाच होता. म्हणून तो फक्त १ मुद्रेचा हक्कदार आहे. दुसऱ्या माणसाने आपल्या ५ भाकर्‍यांचे १५ तुकडे केले, ज्यातले त्याने स्वतः ८ तुकडे खाल्ले आणि ७ तुकडे वाटून दिले. म्हणून न्यायधर्मानुसार तो ७ मुद्रांचा हक्कदार आहे.. हेच माझे गणित आहे आणि हाच माझा न्याय आहे. देवाच्या न्यायाचे हे अचूक विश्लेषण ऐकून पुजारी नतमस्तक झाला.
गोष्टीचे तात्पर्य : आपली परिस्थितीकडे बघण्याची, ती समजण्याची दृष्टी आणि ईश्वराचा दृष्टीकोन हे एकदम भिन्न असतात. आपण ईश्वराची न्यायलीला जाणण्यात, समजण्यात अज्ञानी आहोत. आपण आपल्या त्यागाचे गुणगान करतो, परंतु ईश्वर आपल्या त्यागाची तुलना आपले भोग आणि कर्म याच्याशी करून यथोचित निर्णय घेत असतो.  आपण श्रीमंत आहोत हे जितके महत्त्वाचे आहे तितके हेसुद्धा महत्त्वाचे आहे कि आपल्या सेवाभावी कार्यात त्याग किती आहे. 

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...