शनिवार, ४ फेब्रुवारी, २०२३

213.अंधानुसरण

      वैज्ञानिकांनी एक प्रयोग केला तो याप्रमाणे.... एका खोलीमध्ये आठ-दहा माकडांना ठेवण्यात आले. त्या खोलीच्या मध्यभागी एक शिडी सरळ उभी ठेवली आणि त्या शिडीच्यावर केळीचा एक गुच्छा लकटत ठेवण्यात आला. थोड्याच वेळात एका माकडाचे लक्ष त्या केळीच्या गुच्छाकडे जाते आणि ते माकड शिडी चढून केळीकडे जाण्याचा प्रयत्न करते. तोच त्याच्या अंगावर पाणी पडते व इतर उरलेल्या माकडांवरसुध्दा पडते आणि शिडी चढणारे माकड खाली परत येते.
     दुसऱ्या दिवशी दुसरे एक माकड असाच प्रयत्न करते. तेंव्हासुध्दा त्याच्या अंगावर आणि इतर माकडांवर थंड पाणी पडते. असे सतत 3-4 दिवस घडते. त्यामुळे याचे कारण माकडांना लक्षात येते की, केळीकडे धाव घेतल्यामुळे आपल्यासोबत असे होत आहे. मग पाचव्या दिवशी जेंव्हा पुन्हा एक माकड केळीसाठी शिडी चढण्यासाठी प्रयत्न करते, इतर सगळी माकडे मिळून त्याला झोडतात. त्यामुळे ते माकड परत येऊन कोपऱ्यात बसते. त्यामुळे त्या दिवशी कोणावरही पाणी पडत नाही. पुढील 3-4 दिवस असेच घडते. जो कोणी माकड शिडीकडे वळला की इतर सर्व माकड मिळून मारायचे. अशाप्रकारे सर्व त्या माकडांपैकी कोणीही केळीकडे बघायचासुध्दा नाही.  तेंव्हा मग वैज्ञानिकांनी पाणी घालणेच बंद केले.
     मग वैज्ञानिकांनी त्या माकडांपैकी एक माकड बाहेर काढले आणि दुसरे एक नवीन माकड आत टाकले. या नवीन माकडाने केळी नजरेत पडताच शिडी चढण्याचा प्रयत्न केला तोच जुन्या सर्व माकडांनी त्याला झोडले.  दुसऱ्या दिवशी वैज्ञानिकांनी जुन्या माकडांपैकी एक माकड बाहेर काढून नवीन एक माकड आत टाकले. हा माकड देखिल केळी बघून शिडी चढण्याचा प्रयत्न करताच इतर सर्व माकडांनी त्याला झोडले. पण यात विशेष असते की काल आलेला नवीन माकडसुध्दा या झोडणाऱ्या माकडांत सहभागी असतो ज्याच्या अंगावर कधीही पाणी पडलेले नसते. या नंतर वैज्ञानिक दररोज एक जुने माकड काढून नवीन माकड आत घालतात आणि रोज तोच प्रकार घडतो. नवीन माकड केळीसाठी शिडीकडे वळला की, उर्वरीत सर्व माकडं त्याला मारतात. मारणाऱ्या माकडांमध्ये जुने माकड ज्यांना माहित होते की आपण का मारत आहोत त्यांच्यासोबत नवीन माकडेही सहभागी असतात ज्यांनी कधीही पाणी अंगावर झेलले नव्हते. अशाप्रकारे दररोज एक-एक करुन सर्व जुने माकड बाहेर काढून नवीन माकड आत घालण्यात येतात. प्रत्येक नवीन येणाऱ्या शिडी चढण्याचा प्रयत्न केल्यास मार पडत असे. आता मात्र खोलीमध्ये सर्व नवीन माकडे असतात ज्यांनी कधीही त्या खोलीत पाणी पडण्याचा प्रकार पाहिलेला नसतो. पण जर कोणी एखाद्या माकडाने शिडी चढण्याचा प्रयत्न केला की इतर सर्व माकडं त्याला मारतात. कारण आता ही प्रथा तिथे रुढ झालेली असते. आपण का मारत आहोत याचे मूळ कारण माहित नसूनसुध्दा फक्त कोणी त्या शिडीकडे वळला की त्याला मारायचे. बस्स !!!
     माणसाचेही असेच आहे. आपण अनेक रुढी परंपरा मानतो. पण आपल्याला त्याचे मूळ कारणही माहित नसते. कारण त्या रुढी परंपरा सुरु झाल्या तेंव्हा आपण नव्हतो, म्हणून आपण इतर लोक करतात म्हणून करतो. त्यामागची कारणे, हेतू आम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. बरं, जी कारणे आम्हाला सांगण्यात येतात तीही निसर्गनियमानुसार, विज्ञानाच्या नियमानुसार पटनारी नसतात. शिवाय तर्काधिष्ठित तर अजिबात नसतात. तरी सुध्दा आम्ही त्या माकडांसारखे "अंधानुसरण" करतो आणि स्वत:ला 21 व्या शतकातील, विज्ञान युगातील सुशिक्षित समजतो. कोणतीही गोष्ट, रुढी, परंपरा यांच्यामागचे कारण नीट समजून ते वैज्ञानिकदृष्ट्या, तार्किकदृष्ट्या खरे आहेत किंवा नाहीत हे जाणून घेतल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये. फक्त इतर लोक असे करतात म्हणून आपणही करतो तर मग धिक्कार आहे आपण घेतलेल्या शिक्षणाचा...   मग माकडंच बरी...

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...