मासे पाण्यात उत्तम पोहतात पण हत्तींना पोहता येत नाही. म्हणून माशांच्या
तुलनेत हत्ती मठ्ठ ठरतात का? गरुडाला उडता येतं पण माशाला उडता येत नाही. पाण्याबाहेर माशाच्या
पोहण्याचं काहीच कौतुक नाही म्हणून मग गुणवत्तेच्या स्पर्धेत गरुड सरस ठरतात का?
सिंहाला शिकार करता येते. मात्र त्याला हत्तीसारखं अजस्त्र ओंडकं
वाहण्याचं काम करता येत नाही, बैलासारखं औताला जुंपता येत नाही, गायीसारखं दुध
देणं जमत नाही. म्हणून मग स्पर्धेच्या जगात सिंहाचा काही उपयोगच नाही का? आणि फुलपाखरं, मैना, पोपट, बुलबुल यांसारख्या सुंदर दिसणाऱ्या पक्षांचं
काय? की त्यांचा कामाला उपयोग नाही. म्हणून त्यांची काही
किंमतच नाही? सगळ्याच प्राण्यांना एकाच परीक्षेत बसवून
त्यांना 'पास' आणि 'नापास' 'गुणवान' आणि
'नालायक' ठरवणं जसं चूक, तसंच सगळ्याच मुलांना गुणांच्या तागड्यात तोलणं आणि
ज्यांना कमी मार्क मिळाले, त्यांच्या बाकीच्या गुणांवर कंडम म्हणून फुल्या मारणं
कितपत योग्य आहे? नसतील मिळाले दहावीत जास्त मार्क,
भूमितीतला पायथागोरस, इतिहासातल्या सनावळ्या, भूगोलातली ग्रहणं आणि गणितातले
एक्स-वाय नसतील टाळक्यात शिरत. पण चित्रकला आवडते, पीटी आवडते, हस्तकौशल्य
चांगलंय, भाषा आवडतात, गाता येतं, नाचता येतं, पळता येतं सुसाट. पोहता येतं. या
साऱ्याला गुणांच्या स्पर्धेत काहीच किंमत नाही? आजकाल तर
मुलांना शंभरपैकी एकशे दहा टक्के वगैरे मार्क पडतात म्हणो ! नव्वद
टक्के तर कमीतकमी. कटऑफच जिथे पंच्यान्नवच्या पुढे असतो त्यांना म्हणे भारी
कॉलेजेस आणि त्यात ज्यांना प्रवेश मिळतो तेच खरे गुणवान ! या
गुणवानांच्या गर्दीत पन्नास-पंचावन्न टक्केवाले बिचारे दिसतही नाहीत. पण असतात ना
ते !! कुठे असतात? काय चालतं त्यांच्या
जगात? आणि काय होतं त्यांच्या करिअरचं? ज्यांना पोहता येत नाही असे गरुड, ज्यांना उडता येत नाहीत असे मासे.
टक्केवारीच्या शर्यतीत मागे पडले, तरी आयुष्याच्या स्पर्धेत हरत नाहीत ते !
त्यांच्या सिक्रेट जगात काय चालतं यांच्या बातम्या कोण छापणार?
पण म्हणून ते सिक्रेट जग इंटरेस्टिंग नसतं असं थोडंच आहे.
एक पिढी शिक्षण घेऊन गाढव बनली आणि
नवीन पिढी शिक्षण घेऊन रेसचा घोडा बनत आहे. परीक्षेत 100 टक्के मार्क मिळाले पाहिजेत, कराटे
क्लासमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवायचा आहे. त्यानंतर डान्स क्लास अटेंड करायचा.
भगवतगीता स्पर्धेत जायचं आहे. श्लोकांचा अर्थ नाही कळाला तर ते तोंडपाठ करायचेच.
कारण पहिलं बक्षीस मिळालंच पाहिजे. मग चित्रकला स्पर्धा असते. तिथून बाहेर निघाला की चालला तबला वाजवायला, संगीत विशारद
बनायला. Albert Einstein बनवून देणाऱ्या Multi-National
School आल्या. पण Albert हा Einsetin बनण्यासाठी शाळेत गेला
नव्हता. एक अमिताभ बनला तर हजारो Acting School उभ्या
राहिल्या. पण अमिताभ अभिनेता बनण्यासाठी कोणत्याही School मध्ये
गेला नव्हता. आता लवकरच मोदी तयार करणाऱ्या शाळा उभ्या राहतील आणि पालक लाखो रुपये
खर्च करुन त्या शाळेत आपल्या मुलांना पाठवतील. जेवढा खर्च एका वर्षाला होतो, तितके
रुपये त्याच्या पालकांना संपूर्ण शिक्षण घेण्यासाठीसुध्दा लागले नाहीत.
आता शाळा सुरु केल्या आहेत Investor नी मागणी तसा पुरवठा या तत्वावर.
पालकांना आपल्या मुला-मुलींना रेसचा घोडा बनवायचा आहे. ही मागणी पाहून जास्तीत
जास्त अभ्यास मुलांच्या डोक्यात कोंबायला सुरवात केली. दप्तरांचं आणि पालक, शिक्षकांचं
अपेक्षाचं ओझं वाहणारी मुले म्हणजे चालती-बोलती प्रेतं बनत चालली आहेत. जरा
शुध्दीवर आली की, "What is the square of १२?" असं विचारुन त्यांचं बालपण चिरडून टाकतात. श्री मोदी यांनी मुलांना
एक प्रश्न विचारला होता, " तुमच्यापैकी कितीजण घाम गळेपर्यंत खेळतात?" तेंव्हा एकाही मुलाने हात वर केला नाही. कारण आता मुले AC मध्ये जन्म घेतात. AC मध्ये वाढतात, चिप्स खातात.
सॉफ्ट ड्रिंक्स पितात आणि मोबाईलवर गेम खेळत बसतात. ऊन, पाऊस, वारा यांच्याशी
संबंध येत नाही. पडणं, लागणं, खेळात हरणं माहितच नाही. School Bus आली नाही तर शाळेपर्यंत चालत जाण्याची ताकद मुलांमध्ये नाही. वय वर्षे 6
पार होत नाही तर डोळ्याला चष्मा लागतो. हातापायांच्या एकतर काड्या
होतात नाहीतर लठ्ठपणा वाढतो. कारण शारीरीक कष्ट संपले आणि Modified Food
Starch, Maltodextrin, hydrolyzed Corn Gluten, Disodium Insosinate, Guanylate,
Yeast Extrac, Hydrolyzed Soy Protein मिसळलेले पदार्थ खाणे सुरु
झाले. ह्या Ingredients ची खासियत म्हणजे ते मुलांच्या पोटात
शिरुन जास्त काळ टिकतात आणि पोटातील पोषके शोषून घेतात. मुलांची Hormonal आणि जैविक वाढ रोखतात. ज्यामुळे मुले दुबळी होत जातात. हे घटक पिझ्झा,
बर्गरमध्ये असतात. म्हणून भारत लवकरच सर्वात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण असलेला देश
बनणार आहे. सोबत इतरही विकार येत आहेत.
शेंगदाणे, चणे, रवा, तांदूळ,
बाजरी, सुका मेवा आणि फळे ह्यात घातक Ingredients नसतात. लपाशी, सातू, शिरा, पाहे किंवा अंड्याचे घरी
बनवलेले पदार्थ मुलांना उत्तम पोषण पुरवतात. ते मिळत नसल्यामुळे मुलांची शारिरीक
वाढ नीट होत नाही. प्रतिकार क्षमता संपते. मग Vitamis, DHA, minerals देणारे प्रॉडक्ट विकत आणून खायला देतात. वास्तविक शरीर हा जगातील सर्वात
मोठा कारखाना आहे. ह्याच शरीराला योग्य आहार, कष्ट मिळाले तर कुठेही तयार होऊ न
शकणारं रक्त तयार होतं. साध्या भाज्या, अस्सल भारतीय जेवण मिळालं की शरीराची
यंत्रणा स्वत: काम करते. म्हणून ताज्या भाज्या, भाकरी खाणारी आणि Minerals,
Calcium, Proteins माहित नसलेली माणसं 100 वर्षे
जगली. हे माहित झालेली माणसे 60 वर्षे जगतात तेही अनेक रोग
सोसत, औषधे घेऊन !!! खेळ, व्यायाम, भटकंती आणि दर्जेदार वाचन न
केल्यामुळे मुलांना मानसिक कमतरता जाणवते. संघर्ष माहित नसतो आणि Team Work
कळत नाही. मित्र फक्त Whats App, Facebook वर भेटतात. प्रत्यक्ष भेट नाही.
सुख-दु:खांची जाणीव नाही आणि मित्राचा-मैत्रिणीचा मानसिक आधार नाही. दिलखुलास हसणे
आणि ओक्साबोक्शी रडणे, मानसिक आरोग्यासाठी चांगले असते. ह्या दोन्ही क्रिया
मुलांना करता येत नाहीत. आपोआपच, जरा मनाविरुध्द घडलं की, लहान मुले-मुली आत्महत्या
करतात. बरीच एकुलती एक मुले दुसऱ्याशी जमवून घेण्याची सवय नसल्यामुळे पुढे लग्न
झाल्यावर वर्षभरात घटस्फोट घेतात. ज्या मुलांना बहीण नसते, चांगली मैत्रिण नसते
त्यांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन संकुचित बनतो. ह्या उणिवांचा शिक्षणात
विचार केलेला नाही.
भारतीय शिक्षण पध्दत सर्वांगिण
नाही हे शिक्षण तज्ञ सांगत होते तोवर शिक्षणाचा धंदा सुरु झाला. मोठे उद्योजक,
पुढाऱ्यांनी शाळांमधून गुंतवणूक करुन शिक्षण संकल्पनेला धूळ चारली. एखादी स्त्री
गरोदर राहिली तर जन्माला येणाऱ्या जीवाच्या Admission ची तयारी सुरु होते. आता मुलाने बोलायला सुरु केले की
थेट E= mc2 म्हणायचं बाकी राहिलंय. अशी मुले सर्व
सूत्रे पटापट म्हणून दाखवतील पण स्वत:चे सूत्र कधीही शोधू शकणार नाहीत. गिटार
शिकतील पण स्वत:ची संगीत रचना कधीही करु शकणार नाहीत. कारण त्यांना फक्त अनुकरण
करायला शिकवलं जातं. जगण्याची कला, गीत संगीतातील आनंद, निसर्ग संपदेची भव्यता,
नव्या संकल्पनांची निर्मिती, जुन्या विचारांचा आधार, साहित्य ह्याला बाजारी किंमत
नसल्यामुळे फक्त जे विकलं जातं तेच ज्ञान मुलांना मिळतंय. त्यात ते पारंगत होत
आहेत. काही जणांना कॅम्पसमध्ये दर महिन्याला 4 लाखापेक्षा
जास्त पगार असणारी नोकरी मिळतेय. पण त्यात देशाचं नाही, भांडवलदाराचं हित साधलं
जातंय. पुढची पिढी पदवी मिळवेल पण न स्वत: जगण्याचा आनंद लुटू शकतील, न दुसऱ्याला
जगण्याची मजा मिळू देतील. अगदी हाच धोका ओळखून जपानमध्ये शाळेत AC लावत नाहीत. तिथं मुलांना घोकंपट्टीपेक्षा प्रात्याक्षिकवर (Practical) भर देतात. वृक्ष-वेली स्वत:च अन्न स्वत:च तयार करतात या प्रिक्रियेला
काय म्हणतात? असे प्रश्न विद्यार्थ्यांना न विचारता शाळेत व
बाहेर भाजी लावायला शिकवतात. त्या रोपांची वेलीची जोपासणी करायला शिकवतात.
"निप्पोन टेक्नोलॉजी" ने केलेल्या तपासणीत म्हटलं आहे की, शाळेच्या
आवारातील वेलींमुळे तापमान चार अंशने कमी झालं आहे आणि मुले-मुली फुलांसोबत भावनिक
नातं जोडू लागली आहेत. जर्मनी मुलांना Transference शिक्षण देते. तिथे लहान मुलांची
बोटं नाजूक असतात हे लक्षात घेऊन दुसरीपर्यंत लेखन करु देत नाहीत. पाचवीपर्यंत
प्रात्यक्षिक (Practical) चालतं आणि त्यानंतर विद्यार्थी बँक
कर्मचारी बनेल की हवाई सेविका, प्रशासन सांभाळेल की कुशल कामगार होईल ह्याची सतत
तपासणी होते. दहावीनंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्राचं प्रशिक्षण देतात. सगळे
एकदम Science मध्ये भरत नाहीत. अनावश्यक विषय शिकवत नाहीत.
चीन हा Cycle प्रेमी देश 4 वर्षांच्या
मुलांना Cycle चालवण्याचं प्रशिक्षण देतो. त्यानंतर थेरी कमी
प्रत्यक्ष कृती जास्त शिकवतात. प्रत्यक्ष विद्यार्थी उद्या देश चालविणार ह्याचा
विचार नेदरलँडसारखा देशही करतो. एकाच विद्यार्थ्यांवार सगळ्याच विषयांचा मारा करत
नाहीत. चारही दिशांनी अनेक विषय आणि क्लासचा मारा सोसण्याचे काम भारतीय
विद्यार्थ्यांना करावे लागते.
शिक्षण काय असतं? रविंद्रनाथ टागोर काय म्हणतात ते पहा.
टागोरांची "शांतीनिकेतन" शाळा झाडाखाली भरत असे. पक्ष्यांची किलबिल ऐकू
येई. एकदा टागोर झाडाखाली बसले होते. चार विद्यार्थी त्यांच्यासमोर पुस्तकात डोकं
खूपसून बसली होती आणि उरलेली बरीच मुलं खेळत-बागडत होती. कोणी झाडावर चढला होता.
कोणी फुलाचा सुगंध घेत फिरत होता. तेवढ्यात एक पालक तिथे आले. पाहतात तर काय?
गुरुदेव शांतपणे बसले होते आणि फक्त चार मुले पुस्तकात डोके खूपसून
बसली होती व इतर मुले हसण्यात -नाचण्यात रमली
होती. सुटा-बुटातील पालक महाशय टागोरांना म्हणाले, "या नाचणाऱ्या
-बागडणाऱ्या मुलांच्या भवितव्याची तुम्हाला चिंता वाटत नाही का?" टागोर म्हणाले, "चिंता वाटते, पण नाचणाऱ्या-बागडणाऱ्या
मुलांची नाही तर पुस्तकात तोंड खूपसून बसलेल्या मुलांची. ही मुले लहान वयात प्रौढ
झाली आहेत. प्रौढ तर मीसुध्दा अजून झालेलो नाही. खरंतर मलाही झाडावर चढावं असं
वाटतं. पक्ष्यांशी बोलावं वाटतं. भरपूर खेळावसं वाटतं. पण माझं शरीर आता साथ देत नाही."
टागोर जगण्यासाठी शिकवत होते. आता शिकण्यासाठी जगावं लागतं. जास्त ज्ञान, जास्त
कला घेऊन मुले धावत असतात आणि पालक त्यांच्यावर पैसे लावतात. मग एक शर्यत सुरु
होते आणि जगायचं राहून जातं.
- अभिनेते नाना पाटेकर यांचा ब्लॉग
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा