सोमवार, १२ जून, २०१७

6. तिच्या आठवणी जपायच्यात...

सुंदर नि स्मार्ट संकल्प... 
माझ्या आयुष्याचा आणि भविष्याचा, 
आहे तिच्या आठवणी जपण्याचा... 
ती... 

सुंदर, सालस, सोजळ माझी पत्नी,
नशिबाने घाला घातला आणि 
तिला देवघराचं बोलावणं  आलं, 
दिल्या घेतल्या साऱ्या वचनांना,
विसरून ती दूर गेली. 

पाण्यात जशी साखर मिसळावी,
तशी ती माझ्यात मिसळली होती. 
थिजून गेलेल्या अश्रूंच्या सागरांनी, 
डोळ्यात माझ्या गर्दी केली. 
त्या सागरांना आलेली भरती,
 आजही ओसरायला तयार नाही. 
आजही माझ्या डोळ्यांच्या खाचांत,
शिरत जातो काळोख, 
पण त्या काळोखाचा मी तिला
स्पर्शही होऊ दिला नाही. 

माझ्या व माझ्या प्रेमाचे पंख, 
त्या नराधमांनी क्षणात छाटले. 
कसलीच दयामाया नाही आली त्यांना,
तिच्याशिवाय जगताना. 

मोठ्याने ओरडून म्हणावं वाटतं,
"निर्दयहो, तुडवा माझी वेदना,
कुरतुडून टाका माझी संवेदना, 
आणि संपवा रे माझं दुर्दैवी आयुष्य..."
कारण तिच्याशिवाय मला, 
क्षणभरही जगावं वाटत नाही. 
तिच्याशिवाय जगताना,
स्वतःचीच घृणा वाटते मला. 

पण तरीही मला जगावं लागेल... 
केवळ आणि केवळ तिच्यासाठीच. 
पण मारून पडलाय सारा आज
डोळ्यावर चिखल थापलेला घातक  प्रवास. 
लुप्त होत चालल्यायत,
घायाळ आठवणींच्या करूनक्रांत किंकाळ्या.  

ती तर माझी जीवन होती. 
ती गेली आणि माझा प्रत्येक 
अवयव निर्जीव झाला. 
दुनियेने तर कहरच केला आणि 
माझ्याच जीवाचा जीव घेतल्याचा 
हीन  आरोपही माझ्यावर केला. 

तरीपण आज मी स्थिर आहे,
हो... स्थिरच आहे मी... 
जगतोय तिच्या आठवणीत, 
कारण तिच्या आठवणीच तर,
माझ्या जगण्याचं कारण बनल्यात, 
माझा श्वास बनल्यात. 

मला मी संपण्याची मुळीच भीती नाही. 
पण मी संपल्यावर मात्र, 
तीही संपण्याची भीती वाटते मला. 
पण मी संपणार नाही... 

म्हणून माझा संकल्प हाच आहे की,
शेवटच्या श्वासापर्यंत मी,
तिच्या आठवणी जपणार आहे. 
तिच्या अदृश्य अस्तित्वाला सोबत घेऊन, 
रंगवणार आहे परत एकदा स्वप्न... 

मी आजही तिथेच थांबलोय,
जिथून ती गेली होती... 
मी आजही तिच्या जवळ आहे,
आणि जगतोय तिच्यासोबत,
भूतकाळातल्या त्याच प्रत्येक क्षणात,
ज्या क्षणात होतो फक्त मी आणि तीच,
आणि आमच्यातही होता तोच क्षण,
त्या क्षणांनाच जिवंत ठेवण्यासाठी, 
तिच्या आठवणी जपायच्यात मला... 
आणि मी जपणार आहे.... 
जपतच  राहणार आहे.... !

                                                                                                                                                                       लेखक : राजेंद्र शंकर राऊत, नाशिक. 

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...