शनिवार, २० सप्टेंबर, २०२५

2300. बाप पनापासून

 एक अखंड प्रवास !.. *आजच्या त्रिकोणी वा चौकोनी कुटुंबातला आईचा एक कोन निखळला, तर ती जागा भरून काढणं कठीण असलं तरी अशक्य नसतं. अनेक बाबांनी आव्हानांना सामोरं जात,..‼️🌻❣️🏵️🌀🌺🌹🙏
सर्वांनीच वाचूया साहित्य उत्सववर माहिमा...
आजच्या त्रिकोणी वा चौकोनी कुटुंबातला आईचा एक कोन निखळला, तर ती जागा भरून काढणं कठीण असलं तरी अशक्य नसतं. अनेक बाबांनी आव्हानांना सामोरं जात, अनेक तडजोडी करत, नव्या गोष्टी शिकत, स्वत:ला विसरत, मुलांच्या भावविश्वात जागा निर्माण केली आहे. अशाच या काही एकल बाबांची ही कहाणी…
अनंत काळापासून मुलं वाढवण्याचं गौरवस्थान मातेला मिळत आलेलं आहे, पण हळूहळू आपला समाज या चौकटीतून बाहेर पडू लागला. आजकालचे वडील हे बदलत्या काळासोबत स्वत:ला जुळवून घेणारे जास्त दिसतात. कर्ते पुरुष म्हणून नोकरी-व्यवसाय करत तटस्थपणे घर चालवणारे, एवढ्यापुरतं आता त्यांचं बापपण मर्यादित राहिलेलं नाही. ते आपल्या मुलांच्या प्रत्येक टप्प्यावर सक्रियपणे, त्यांच्या भावविश्वाशी समरसून सहभागी होत असतात. आणि जेव्हा हे बाबा एकल पालक असतात तेव्हा?
विशेषत: जेव्हा घटस्फोटानंतर मुलांचा ताबा वडिलांकडे जातो, तेव्हा अनेकांना वाटतं की, हे बाबा एकल पालक म्हणून कदाचित मागे पडतील. पण वास्तवात, आज अनेक बाबा असे आहेत जे मुलांना त्यांच्या आईच्या मायेची उणीव जाणवू न देता योग्य संस्कार देतात, भावनिक आधार देतात, त्यांच्या आयुष्याचा आधार बनतात. बदलत्या समाजरचनेमध्ये आता विवाह-भेद झाल्यानंतर मुलांचे पालकत्व वडिलांकडे येण्याचं प्रमाणही वाढताना दिसत आहे. पती-पत्नी विभक्त झाल्यानंतर स्त्रीला स्वत:च्या आयुष्याची घडी नव्याने बसवताना राहण्यासाठी व्यवस्था करणं, नोकरी नसल्यास उत्पन्नाचं साधन शोधणं, आजूबाजूला वावरणाऱ्या माणसांची डोळसपणे पारख करणं, इत्यादी अनेक आघाड्यांवर त्या ‘घटस्फोटित’ स्त्रीला सामना करावा लागतो. अशा वेळी आपल्याबरोबर आपल्या मुलांचीही ससेहोलपट होऊ नये म्हणून मुलांवर आंधळं प्रेम न दाखवता मुलांच्या भावविश्वाचा विचार करून त्यांच्या सर्व आर्थिक व सामाजिक गरजा पूर्ण व्हाव्यात याचा आणि काही वेळा स्वत:च्या करिअरचा प्राधान्याने विचार करणाऱ्या स्त्रिया घटस्फोटानंतर मुलांचं पालकत्व पतीकडे सोपवताना दिसून येत आहेत.
‘फादर्स डे’च्या निमित्ताने अशाच काही एकल पालक असलेल्या बाबांशी बोलणं झालं. प्रत्येकाचे अनुभव वेगळे होते. संजय कुलकर्णी आर्किटेक्ट आहेत. म्हणाले, ‘‘घटस्फोट झाला त्या वेळी मुलं माझ्याकडेच होती. मुलगी ७ वर्षांची आणि मुलगा १३ वर्षांचा होता. मुलांना न्यायालयात एकदाही न नेता परस्पर संमतीने आम्ही घटस्फोट घेतला. माझ्या घरी माझे आई-वडील होते, परंतु ते वयस्कर असल्याने मुलांची जबाबदारी खऱ्या अर्थाने माझ्यावरच होती. मानसिक दडपण आलेलं होतं, पण मुलांसाठी कुठंही कमी पडायचं नाही असं ठरवलं. त्यासाठी माझ्या करिअरमध्ये अनेक तडजोडी कराव्या लागल्या. अनेक दिव्यातून जावं लागलं. माझ्या पालकत्वाचा अक्षरश: कस लागला. अनेक गोष्टी शिकून घ्याव्या लागल्या. तरीही एक जाणवत राहायचं, आपण मुलांची कितीही काळजी घेतली तरी मुलांच्या मनात अनेक वादळं चालू असतात.
मुलं बोलली नाहीत तरी त्यांच्या वर्तनातून अनेक गोष्टी समजतात. इतर मुलांचे आईबाबा एकत्र असतात, आपल्याकडे तसं नाही म्हणजे आपण इतर मुलांपेक्षा वेगळे आहोत, या विचारांचा पुढे जाऊन मुलांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ नये म्हणून मी वेळीच पावलं उचलली आणि कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशकांच्या मदतीने माझ्यासारख्या एकल पालकत्व निभावणाऱ्या अनेकांना- त्यात पुरुषही होते आणि स्त्रियाही, एकत्र करून एक सपोर्ट ग्रुप तयार केला. त्यामुळे आम्ही सगळे जण महिन्यातून एकदा तरी मुलांसह भेटायचो,फिरायला जायचो, वेगवेगळ्या विषयांवर, अडीअडचणींवर चर्चा करायचो, मार्ग सुचवायचो. त्यामुळे अनेक कुटुंबं आपल्यासारखी आहेत हे मुलांनाही समजलं. आणि एकट्याने मुलं वाढवताना येणाऱ्या नव्या आव्हानांना सामोरं जाणं शक्य झालं. माझा मुलगा आर्किटेक्ट झालाय आणि मुलगी डॉक्टर आहे, मी समाधानी आहे.’’
एकल पालकत्व स्वीकारून ते निभावणं वाटतं तेवढं सोपं नाही आणि पुरुषांना तर ही जबाबदारी पेलवणं हे एक प्रकारचं आव्हानच ठरतं. निखिल म्हणाले, ‘‘माझ्या मुलीचा जन्म झाल्यापासूनच माझी तिच्यामध्ये खूप गुंतवणूक होती. ती लहान असताना तिला माझ्या दोन पायांवर घेऊन तेल लावून न्हाऊ-माखू घालण्याचा आनंदही मी घेतला होता. तिच्या जन्मापासूनच आमच्यात दृढ बंध निर्माण झाले होते. पण पुढे माझे आणि पत्नीचे वैचारिक मतभेद तीव्र झाले आणि जेव्हा एकमेकांबरोबर राहाणं अशक्य आहे हे लक्षात आलं तेव्हा आमचा घटस्फोट झाला. मुलगी माझ्याकडेच राहिली. माझे आई-वडील हयात नव्हते, त्यामुळे संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावरच होती. मुलीच्या वेण्या कशा घालायच्या इथपासून सर्व शिकलो.
स्वयंपाक शिकण्यासाठी कुकिंग क्लास लावला होता. तिची शाळा- अभ्यास- विविध उपक्रम हे तर नियमित होतंच; परंतु तिच्याबरोबर खेळताना तिच्या छोट्या विश्वातील गमतीजमती वाटून घेण्यात मी रमू लागलो. माझ्या मुलीला सर्व सुखं मिळावीत यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करत होतो, पण एक दिवस मला प्रचंड दडपण आलं. एक दिवस ती शाळेतून घरी आली तेव्हा तिच्या गणवेशावर रक्ताचा डाग पडला होता. ती माझ्या जवळ आली. माझ्याभोवती घुटमळत राहिली. तिच्या चेहऱ्यावर मला प्रचंड गोंधळ दिसत होता. तिला काही तरी बोलायचं आहे हे मला कळत होतं, पण ती बोलत नव्हती. खरं तर तिच्या अगदी लहानपणापासून प्रेम आणि शिस्तीचा एक छान तोल आमच्यामध्ये होता. ती सर्व गोष्टी माझ्याशी बोलायची, पण तरीही त्या दिवशी ती मूक होती. शेवटी मीच, ‘‘तू माझ्याशी बोलत का नाहीस, काय झालंय?’’ असं म्हणत जवळ घेतलं तेव्हा तिचा बांध फुटला. ती हमसून हमसून रडू लागली. मी अस्वस्थ. अखेर तिचा आवेग ओसरल्यावर ती म्हणाली, ‘‘बाबा, आज टीचरनं सांगितलं की, तुझ्या युनिफॉर्मवर रक्ताचा डाग पडला आहे, हे घरी जाऊन फक्त आईला सांग. इतर कुणालाही सांगायचं नाही. बाबा, माझी आईसुद्धा तूच आणि बाबासुद्धा तूच आहेस, तरीही मी तुला काही सांगायचं नाही का?’’ तिच्या या प्रश्नाला काय उत्तर द्यावं, हेच मला कळत नव्हतं. तो दिवस माझ्यासाठी खूप अवघड होता. दुकानात जाऊन सॅनिटरी नॅपकिन आणायलाही मला संकोच वाटत होता. हे निसर्गचक्र तिला कसं समजून सांगायचं याचं दडपण आल्यावर मी समुपदेशकांची मदत घेतली. पण प्रामाणिकपणे सांगतो, माझी मुलगी आता मोठी झाली हे पचवणं मला खूप अवघड गेलं होतं.’’
संतोष सांगतात, ‘कावेरी फारच लहान होती. नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं असेल. न्यायालयातील अनेक प्रक्रियांनंतर मुलीचा ताबा माझ्याकडे आला. ती माझ्याकडे यायलाच तयार नव्हती. रडून गोंधळ घालायची नुसती. ‘तिची जबाबदारी मी पेलवू शकेन का?’ अशी भीती माझ्याही मनात होती. इतक्या लहान मुलीला माझ्याकडे सोपवताना स्त्री न्यायाधीशांच्या डोळ्यांतही अश्रू आले होते. माझी आई घरात असली तरीही ती व्यवसाय करणारी असल्याने मुलीची संपूर्ण जबाबदारी मीच घेतली होती. सुरुवातीच्या काळात खरंच खूप त्रास झाला. रात्र रात्र जागून काढाव्या लागल्या. हळूहळू तिला माझी सवय झाली. मला बिलगून माझा हात घट्ट पकडून झोपू लागली, तेव्हा मला माझ्या जबाबदारीची खरी जाणीव झाली. घरातील प्रत्येक गोष्ट मी तिच्यासाठी शिकलो, तिचे कुरळे केस विंचरणं मला जमायचं नाही, तिच्या बोबड्या सुरात मला म्हणायची, ‘‘काय बाबा, एव्हल शुद्द्धा तुला येत नाही? जला हलू हलू केलश की तुला येईल, मी दुखलं तली ललनार नाही, तुला खलचं येईल.’’ ती छोटीशी ठामाकाकू तेव्हा माझीच आई व्हायची. मीही तिला काहीही कमी पडू दिलं नाही. त्या काळात व्यवसायाकडे थोडं दुर्लक्ष झालं, पण तिच्यासाठी वेळ काढत राहिलो. आता माझी कावेरी मोठी झाली आहे. आठवीत गेली आहे. आता प्रत्येक गोष्टीत तिला तिचा बाबा लागतो. हा प्रवास दमवणारा, पण समाधान देणारा आहे.’’
पत्नी नोकरीच्या निमित्तानं दीर्घकाळ परदेशात असताना वडील म्हणून जबाबदारी घेणारे महेश मुंडे म्हणाले, ‘‘पत्नीला ऑफिसच्या प्रोजेक्टसाठी अमेरिकेला जावं लागलं त्या वेळी मुलगा चार वर्षांचा होता. मला एकट्यालाच त्याला घेऊन राहावं लागलं. सकाळी घरचं सगळं आवरून, मुलाला डबा तयार करून देऊन ‘डे केअर सेंटर’मध्ये ठेवावं लागे. मुलाचं आजारपण, शाळेच्या ‘पेरेंटस् मीटिंग’, घरातील नित्य उपयोगी वस्तूंची खरेदी, स्वत:च्या नोकरीतील आव्हाने एकट्याने सांभाळताना जीव मेटाकुटीला यायचा. दोन्ही देशांच्या वेळेत फरक असल्यानं बऱ्याचदा पत्नीशी बोलणं व्हायचं नाही. जेव्हा मुलाला आई हवी असायची तेव्हा तिला फोन करता यायचा नाही, जेव्हा तिला त्याची आठवण यायची तेव्हा तो झोपलेला असायचा. त्यामुळे दोघांचं बोलणं व्हायचं नाही. अशा वेळी पत्नीही तिकडे अस्वस्थ असायची. तिची मन:स्थितीही मला सांभाळावी लागे. सुट्टीच्या दिवशी जेव्हा तो आईशी व्हिडीओ कॉलवर बोलायचा तेव्हा त्याच्या डोळ्यातील चमक पाहण्यातच मला धन्यता वाटायची. औटघटकेचं ते एकल पालकत्व मला खूप काही शिकवून गेलं. तो पाच वर्षांचा काळ खूपच परीक्षा घेणारा होता, पण मुलाचं आणि माझं नातं भावनिकरीत्या दृढ झालं. त्याला मी एकट्याने सांभाळू शकलो आणि पत्नीला तिच्या करिअरमध्ये विशिष्ट उंची गाठता आली हे मला महत्त्वाचं वाटतं.’’
काही वेळेला पत्नीचं आजारपण किंवा अपघाती मृत्यू झाल्यास पित्याकडेच मुलांची जबाबदारी येते. संसार मध्यावर आला असताना पत्नी अचानक गेल्यावर मुलांचा आधार झालेले व्यास कुलकर्णी स्वत:चे अनुभव सांगत म्हणाले, ‘‘पत्नी कांता हिचं अचानक निधन झाल्यानंतर माझ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यात मुलांची जबाबदारी एकट्याने पेलवण्याचं आव्हान जास्त मोठं होतं. त्यामुळे दोन्ही मुलांकडे बघून पत्नीवियोगाचं दु:ख बाजूला सारलं. मुलांचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांची लग्नं लावून दिली. रितीभातीनुसार जावयाचे पाहुणचार केले. इतकंच नाही तर घरात नवीन आलेल्या सुनेला स्वयंपाक, पारंपरिक रीतीरिवाज, कुळधर्म, सण, उत्सावांतल्या परंपरा जे जे सासू शिकवते ते ते मी सुनेला शिकवलं.’’ हे सांगताना खूप मोठी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याचं समाधान त्यांच्या हुंदक्यांतून बाहेर पडलं.
आयुष्याच्या अर्ध्या वाटेत पत्नीची साथ सुटल्यानंतर मुलांना एकट्याने वाढवणारे शंकररावही आपले भावुक अनुभव सांगताना म्हणाले, ‘‘मुलीच्या लग्नात सगळे विधी मी एकट्यानेच केले. गौरीहार पुजून सासरी निघताना आईने मुलीची ओटी भरायची अशी प्रथा आहे. हे गुरुजींनी सांगितलं तेव्हा माझी लेक रडू लागली. ‘आई नसेल तर एका सवाष्णीने तिची ओटी भरावी,’ असं गुरुजी म्हणाले तेव्हा आश्वासक नजरेनं तिनं फक्त माझ्याकडे पाहिलं. तिच्या नजरेतील भाव मी ओळखले. हा मान तिला इतर कुणालाही द्यायचा नव्हता. तिची ओटी मी भरली तेव्हा माझ्या मिठीत येऊन ती मनसोक्त रडली. तिच्या आयुष्यातल्या प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी तिला तिचा बाबा सोबत हवा होता, एवढं मात्र मला यानिमित्तानं कळलं.
‘आई आहे ना घरी, सगळं पाहते ती. काळजी नको’ हे वाक्य आपण आत्तापर्यंत खूप ऐकलं आहे. पण जेव्हा आई नसते तेव्हा? आजचे वडील केवळ कमवणारे, कर्ते पुरुष राहिलेले नाहीत, तर घरातली माया, ऊब आणि अखंड सोबतही देणारे पालक बनले आहेत. खरं तर बापपण हे फक्त जन्म देऊन येत नाही, ते नातं आयुष्यभरासाठी निभवावं लागतं. थोडक्यात, बाबा असणं हे फक्त नातं नसतं, तो एक अखंड प्रवास आहे…
(लेखातील काही व्यक्तींची नावं बदललेली आहेत. लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

शब्दांकन : डॉ. स्मिता प्रकाश जोशी
आपल्या कुटुंबातील सर्वांच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्याला संकटकाळी उपयोगी पडलेल्या माणसांना कधीही विसरू नका. समाजातील अहंकारी, स्वार्थी, विश्वासघातकी, लबाड,  चुगलीखोर, गर्विष्ठ माणसांपासून नेहमीच सावध राहा, अफवानवर विश्वास ठेऊ नका. आपण स्वतः खात्री करा. सरकारला सहकार्य करा, सरकारी सुचनांचे पालन करा. नेहमी सुखी समाधानी आनंदी राहा, तसेच नेहमी सावध सुरक्षित, व सतर्क राहा.

2299. चर्चा स्त्रीमुक्तीची

 नवरा सहजच म्हणून गेला, "उद्या मैत्रीणीसोबत चार दिवस फिरायला चाललोय. नाहीतरी सुट्टीच आहे. जाऊन येतो मस्तपैकी."
बायको हसून सहजच म्हणाली, " जाऊन या, एकतरी मैत्रीण असावी आयुष्यात."
पहाटे लवकर उठून नवरा बँग भरू लागला. बायकोही मदत करत होती आणी आपलेही ड्रेस बाहेर काढत होती.    नव-याला समजेना की ही आपलेही ड्रेस कपाटातून का काढत आहे. पण ते न विचारता बँग भरत भरत सहजच म्हणाला , "मुलांकडे लक्ष दे , फार बाहेर राहू देवू नको."
बायको हसतच म्हणाली, " नका हो काळजी करू मुलांची, आई लक्ष देईल व्यवस्थित मुलांकडे. नाहीतरी आईच्या घरातून मुलं बाहेर पडतच नाहीत, अन् आपण दोघेही नाही म्हटल्यावर टिव्ही सोडून हालणारच नाहीत."
नवरा चमकला, म्हणाला , "म्हणजे तुही सोबत येतीयेस की काय आमच्या? "
बायको खळखळून हासली, म्हणाली ," नाही हो, मी कुठे तुमच्यात येवू. तुम्ही मस्त जाऊन या. मीही मुले आईजवळ ठेवून दोन दिवस फिरून येते."
"एकटीच ....?" नव-याने आश्चर्याने विचारले ..
बायको पुन्हा हासली अन् म्हणाली, " काय हो तुम्ही, एकटेच फिरायला जाते का कोणी? आहे एक मित्र. तो सोबत यायला लगेचच तयार होईल. हल्ली तोही मोकळाच घरी बसलाय."
"लोणावळ्याला पाऊस फार छान आसतो म्हणे, तोच पाहून येईन दोन-तीन दिवस. बरं, मला सांगा. तिथले लाँज आँनलाईन बुक करावे लागेल की तिथे जाऊनच केले तर चालेल?"
नव-याने बँग भरणे थांबवले आणि विचारले, " कधी प्लँन ठरला? आणी कोणी सांगितले तु जाऊ शकतेस कोणाबरोबरही?"
बायको लाडाने जवळ आली आणि म्हणाली ,"असे काय करता, तुम्ही चार दिवस चाललात. मलाही कंटाळा आलाय म्हणून मीही दोनच दिवस तर जाऊन येणार. आणी कोणासोबतही नाही हो मी जाणार . माझा चांगला मित्र आहे. त्याच्या सोबत जाणार. तुम्ही यायच्या आधी येईन मी."
          पुरुष संस्कृतीत वाढलेलो आम्ही, स्त्रीमुक्तीवर भरभरून व्याख्याने देणारे आम्ही या प्रश्नावर बायकोला काय उत्तर द्यायला हवं ?
      😃 मित्र मैत्रीणीनो व्यक्त व्हा. खरंच आपण संस्कृती रक्षक आहोत की स्त्रियांना मुक्त आयुष्य जगू देणारे पुरोगामी आहोत हे समजेल.

2298. तयारी

जोशीकाकूंना आठ दिवस गावाला जायचं असेल, तर त्याची तयारी एक महिना आधी सुरू व्हायची आणि सतराशेसाठ सूचना वासंतीला पुन्हा पुन्हा ऐकाव्या लागायच्या.
किती वेळा जुनी यादी रद्द होऊन नवी यादी करावी लागायची आणि या व्यापाला वासंतीशिवाय कुणी त्यांच्या समोर नसायचं. या वेळी तर जोशीकाकू गणपतीला एक महिन्यासाठी गावाला जाणार होत्या.
शेजार पाजारचे वासंतीला म्हणायचे, “तू कशी सहन करतेस?”
‘कशी सहन करते?’ याचं उत्तर, ‘हसतमुखानं सहन करते’ हे ती स्वतः कृतीतून सिद्ध करत होती… पण ‘का सहन करते?’ याचं उत्तर सोळा सतरा वर्षात तिलाच धड कळलं नव्हतं.
कितीदा काम सोडावसं वाटायचं. किती वेळा, ‘मी उद्यापासून येणार नाही’, हे वाक्य तिनं निकरानं ओठातून परतवलं होतं.
काकूंच्या काटेकोरपणाला आणि सततच्या सुचनांना त्यांचा मुलगाही कंटाळला होता आणि नोकरीच्या निमित्तानं पुण्याला पसार झाला होता. सूनबाई फोनवरूनच खैरीयत विचारायची. नातवंड तर आजीच्या वाऱ्यालाही उभी रहायची नाहीत. शेजारी तर दारं लावून बसल्यासारखे असायचे.
पण जोशीकाकूंना कश्शानं फरक पडायचा नाही. त्यांचा दिवस योगासनानं सुरू व्हायचा आणि गीतेच्या एका अध्यायाचं वाचन करून संपायचा.
गणपतीसाठी गावाला जायचं निश्चित झालं आणि आधी एक महिना वासंतीला तारीख सांगितली गेली. मग वासंतीला कळलं, आता महिनाभर सुचनांसाठी पंधरा मिनिटं रोज वेगळी काढून ठेवायला हवीत.
त्यात गणपतीची तयारी गावाला जाऊन करायची ठरली, तरी त्या ‘तयारी’ची तयारी त्या इथूनच घेऊन जाणार होत्या… कारण मुलगा त्यांच्या शब्दाला मान देऊन गणपतीच्या दिवशी उगवणार होता. सुनेनं तेवढंही महत्त्व दिलं नव्हतं. त्यातून मुलगा वेळेत नाही पोहोचला, तर पूजा स्वतः करायचीही जोशीकाकूंची तयारी होती.
दिवाळीची झाडलोट परवडली पण ही गणपतीला गावाला जायची तयारी नको…! वासंती मनातून कावून जायची पण उत्साहापुढं जोशीकाकूंच्या ते लक्षातच यायचं नाही.
गाडी बुक केली की कपाटावरून दोन बॅग्ज काढायला लावायच्या. मग त्या स्वतः डेटॉल वापरून त्या पुसून दिवसभर उन्हात ठेवायच्या. त्यात दोन तास पुढल्या दारात आणि पुढचे तीन तास मागल्या दारात नेऊन ठेवायला लावायच्या. त्यातही सूचना असायच्याच… ‘जरा उजवीकडे ठेव, मागं ठेव, पुढं सरकव, मागं सरकव…’ वासंती निमूटपणे ते अमलात आणायची. 
मग गावाला न्यायची पांघरूणं काढायची. ती रीठ्याच्या पाण्यानं धुवायची. नीट वाळवायची. मग त्या बॅग भरणार. बॅग स्वतः भरत असल्या तरी सूचना वासंतीलाच ऐकाव्या लागायच्या. 
असं मजल दरमजल करत गावाला जायच्या आधीचा दिवस उगवायचा, तेव्हा वासंतीची खरी परीक्षा असायची… कारण त्या दिवशी फ्रीज बंद केला जायचा. त्या निमित्तानं तो स्वच्छ केला जायचा आणि त्यासाठी तो रिकामा केला जायचा. अर्थात बरेचसे जिन्नस, बरेचसे पदार्थ वासंतीलाच दिले जायचे… पण त्यासाठी भरमसाठ सुचनांचा भडीमार वासंतीला झेलावा लागायचा.
रामदासांनी संसार नेटका कसा करायचा याबद्दल जे विश्लेषण दासबोधात मांडलंय, त्याच्या दूप्पट जोशीकाकूंकडे ते अलिखीत स्वरूपात आहे आणि ते फक्त वासंतीलाच ऐकावं लागतं! 
पिशव्या किती आण? कशा आण? डबे किती आण? दूध नेशील, त्याचा विनियोग कसा कर? भाजीपाला त्या संपवायचा प्रयत्न करायच्या पण फ्रिज बंद करतांना काहीतरी हाताशी लागायचंच… 
टॉमेटो, मिरच्या, पनीर, ताक, दही, पावभाजीचा मसाला, हे असे जिन्नस जोशी काकूंना हळवे करून टाकायचे. त्याप्रमाणात सूचना असायच्या. 
लोणची, मोरंबा, गुळांबा, असे पदार्थ दीर्घकाळ टिकू शकतात म्हणून ते काकूंच्या करड्या नजरेतून सुटायचे. 
सापडायची ती वासंती. 
‘किती पिशव्या आणल्यास?’ ‘ही कशाला आणलीस?’ ‘डोशाचं पीठ देणार होते, सांगितलं होतं ना?’ ‘कांदे कशात घेशील?’ ‘तुझ्यासाठीच घेतले होते.’ ‘माझ्याकडून पिशवी मिळणार नाही हं!’ ‘आणि दिली तर नीट धुवून आणावी लागेल…’ 
दरवेळचा हा प्रसंग जशाच्या तसा घडायचा. पण यावेळी त्यात भर पडली म्हणजे, सांगितलेली वेळ टळूनही गेली होती आणि अजून ती आली नव्हती. 
सूचना करत एक एक पदार्थ काढायचा म्हणजे सफिशियंट वेळ लागायचा. घाई करून चालायची नाही. त्यापुढे फ्रीज पुसून काढायचा आणि मग बंद करायचा. बसल्या बसल्या त्या पदार्थ फ्रीज मधून काढायला उतावळ्या होत होत्या, ‘ही पण मला कंटाळली की काय?’ अशा शंकेनं जास्त बेचैन होत होत्या.
थोडी थोडकी नाही, सतरा वर्ष वासंती त्याच्या तालमीत तयार झाली होती. ‘उद्याच्या उद्या ये आणि तुझा पगार घेऊन जा… मग तू मोकळी आणि मी मोकळी!’ हा डॉयलॉग मारून सुध्दा दशक उलटलं होतं. छोटी मोठी कुरबुर झाली तरी तसा दोघीत छान संवाद होता…
‘मग आज यायला एवढा उशीर का केलाय? किंवा का उशीर झाला? निदान फोन तरी करायचा ना, मी काय खाणार होते? भजन मंडळात सुध्दा बायका बोलायला लागल्या होत्या तुमची वासंती तुमच्या तालमीत अगदी छान तयार झालीय… पण त्यामुळे ती आम्हाला झेपत नाही…’ 
जोशीकाकूंनी विचार थोपविण्यासाठी फ्रीजपाशी घुटमळणं थांबवलं आणि मन शांत करण्यासाठी त्या बाल्कनीचं दार उघडून बाहेर येऊन बसल्या. नुकती पावसाची मोठी सर बरसून गेली होती. ‘उद्या प्रवासात पाऊस नाही लागला म्हणजे मिळवली’, असं म्हणत त्यांनी चिंब भिजलेल्या बागेकडे पाहिलं. 
…आणि बघतात तर तगरीच्या झाडाखाली वासंती मुटकूळं करून बसलेली! सोबत पिशव्या नव्हत्या, डबे नव्हते,
पण भरलेली पिशवी होती. 
तिला असं बघून जोशीकाकूंच पाणी पाणी झालं. त्या़ंच्या नकळत त्या तिच्याकडे धावल्या आणि वासंती बोलायला लागल्यावर तर त्या हतबुद्धच झाल्या. 
फ्रीज रिकामा करायचा म्हणून वासंती येणार होती… पण दुपारीच तिच्या सुनेनं तिला फर्मावलं, “माझ्या माहेरचे लोक गणपती बघायला चार दिवस यायचे आहेत… म्हणून तेवढे दिवस मुलीकडे जा.”
पण मुलीकडे तिची नणंद बाळंतपणासाठी आली होती. त्यात मुलीकडे सुध्दा अकरा दिवसांचा गणपती! कोणत्या तोंडानं तिच्या दोन खोल्यात ‘येऊ का’ विचारणार?
वासंती ला नको नको झालं होतं… नवरा गेल्यावर भाडेपावती थेट मुलाच्या नावावर फाडली जाऊ लागली आणि वासंतीला आज जोशीकाकूंच्या बागेत तगरी खाली बसायची वेळ आली. 
काटेकोर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जोशीकाकूंनी आपला गावाला जायचा बेत पुढे ढकलला. पार्थीव मूर्तीसाठीच जायचंय ना? त्याची तयारी तो करून घेईल… पण या माझ्या सोबतीणीची सोय मला आधी बघायला हवी.
…आणि अचानक जोशीकाकूंनी एक काम तातडीनं पार पाडलं ते म्हणजे, वकीलाला गाठून आपलं मृत्यूपत्र तयार केलं… तेव्हाही सतराशे साठ सुचना होत्याच… पण वकील तरबेज होता आणि त्यांचाच विद्यार्थी होता. त्यामुळं अगदी स्पष्ट आणि पध्दतशीर मृत्यूपत्र तयार झालं.
आपल्या पश्चात सगळी मालमत्ता मुलाच्या नावावर करताना काकूंनी ही महत्त्वाची अट घातली… ‘मी असेन-नसेन… पण वासंती हयात असेपर्यंत तिची जबाबदारी संपूर्णपणे मी घेतेय. त्यामुळे ती या घरात मानानं आणि आनंदानं राहील’, याची जबाबदारी मुलगा या नात्यानं मुलालाही घ्यायला सांगितली.
गजाननला श्रध्देनं मखरात बसवायच्या आधी जोशीकाकूंनी वासंतीला घरात हक्काचं स्थान दिलं.
आपण जोशीकाकूंना का सहन करतो, याचं उत्तर मला वाटतं, वासंतीला मनोमन मिळालं. जोशीकाकू गणपतीला गावाला जायचा बेत रद्द करायला तयार असताना वासंतीनं जाण्याचा आग्रह धरला आणि जोशीकाकूंच्या सतराशे साठ सुचनांसह ती तयारीला लागली.

- चंद्रशेखर गोखले

2297. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

      वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी एका ज्येष्ठ मित्राला फोन केला. तो आता निवृत्त झाला आहे. एकुलता एक मुलगा परदेशी असतो. मित्राची पत्नीही काळाच्या पडद्याआड गेली आहे. त्यामुळे थोडेसे एकाकीपण त्याच्या वाट्याला येणे अगदीच स्वाभाविक. त्याचा एकूण टोन थोडासा निराशेचा. आता काय उरलेय आयुष्यात, अशा प्रकारचा ! 
     असा प्रश्न पडलेला तो एकटा नाही. निवृत्तीनंतर काय करायचं, हा एक अफाट प्रश्न अनेकांसमोर उभा आहे. प्रकृती धडधाकट आहे, पण करायचं काय? नोकरी संपलेली आहे. मुलं आपापल्या पायावर उभी आहेत. त्यांना आपली फारशी गरज नाही. जोडीदार गेलेला असेल, तर हा प्रश्न आणखी अक्राळ-विक्राळ स्वरूप धारण करतो. आपल्याकडे मुळात आपलं आयुष्य आपण कुटुंबाशी जोडून टाकतो. मुलं रांकेला लागली की आपला कार्यभाग आटोपला. बाकी आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे! महिलांना तर घर-कुटुंबाच्या पलीकडे काही दिसूच नये, अशी व्यवस्था आपण करून टाकली आहे. खरे म्हणजे, अशा अनेक गोष्टी असतात की ज्या नोकरी आणि संसाराच्या धबडग्यात करता आलेल्या नाहीत. त्या करण्याची संधी निवृत्तीच्या काळात मिळते. पण, तशी संधी घेणारे फार कमी ज्येष्ठ नागरिक दिसतात. सध्या ज्येष्ठांची संख्या प्रचंड मोठी आहे. पुण्यासारख्या शहरात तर ज्येष्ठांच्या तीन-चारशे संघटना आहेत. प्रत्येक संघटनेत हजारेक जेष्ठ नागरिक आहेत. सध्या भारत हा तरुणांचा देश असला, तरी आणखी काही वर्षांनी ज्येष्ठांची लोकसंख्या वाढणार आहे. प्रामुख्याने शहरांमधील, सोसायट्यांमधील जे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे. बहुतेकजण चांगल्या नोकरीमध्ये होते. त्यांना चांगले निवृत्तीवेतन मिळते. मुलंही ठीक-ठाक कमावत आहेत. यांच्याकडे पुष्कळ वेळ आहे. आरोग्य उत्तम आहे. या वेळेचं करायचं काय, एवढाच प्रश्न आहे. मग हे म्हातारे सोसायटीच्या बागेमध्ये चकाट्या पिटत बसतात. कुठल्यातरी हास्य क्लबात मोठमोठ्याने हसत सुटतात. एखाद्या गुरु-बाबाच्या नादी लागून त्या बैठकांना जात राहतात. दिवसाच्या चोवीस तासांचं करायचं काय, याशिवाय त्यांच्यासमोर फार मोठी आव्हानं नसतात. एकूणच या ज्येष्ठांच्या वेळेचं काय करायचं, हा एक मोठाच प्रश्न आहे. येणाऱ्या काळात ज्येष्ठांची बाजारपेठ प्रचंड प्रमाणात विस्तारणार आहे. आयुर्मान वाढत चालले आहे. अशा वर्गाला साधारणपणे आरोग्य सुविधाही ठीक मिळत आहेत. अशा वेळी, ज्येष्ठांनी म्हातारपणात प्रवेश करण्याऐवजी ‘सेकंड इनिंग’ सुरू केली पाहिजे. आर्थिक गरज नाही, पण नवं काही करायची इच्छा आहे. वेळ पुष्कळ आहे आणि अनुभव त्याहून अधिक आहे. अशा ज्येष्ठांच्या भरवशावर कित्येक सामाजिक कामं उभी राहू शकतात. चळवळच उभी राहू शकते. ज्येष्ठांना एकत्र बांधून काहीतरी ठोस करता येणे शक्य आहे. तशी एक कल्पनाही माझ्या डोक्यात आहे. ती नंतर सांगतो. 
     मला आज आठवलं, त्याला एक कारण आहे. तुम्हाला विश्वेश्वरय्या माहिती आहेत? सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या. त्यांची आठवण आज मला आली ती ‘इंजिनिअर्स डे’मुळे. आज ‘अभियंता दिन’ आहे. विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हा ‘इंजिनिअर्स डे’ साजरा केला जातो. गंमत म्हणजे, भारत- श्रीलंका आणि टांझानिया अशा तीन देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. 
       विश्वेश्वरय्यांविषयी बोलताना मला एक मुद्दा फार महत्त्वाचा वाटला. हे विश्वेश्वरय्या इंग्रज सरकारकडे नोकरी करत होते. निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी पन्नास वर्षे काम केलं! हा माणूस जगला १०१ वर्षं. प्रकृतीची फार छान काळजी त्यांनी आयुष्यभर घेतली. ते मिताहारी होते. आयुष्यात ना कधी तंबाखू खाल्ली, सिगारेट ओढली, ना दारू प्यायली. दररोज व्यायाम. त्यांनी स्वतःला खूप जपलं. त्यांना विचारलं की, तुम्ही प्रकृतीची एवढी काळजी का घेत आहात? तेव्हा ते म्हणाले, कारण शेवटच्या क्षणापर्यंत मला कार्यरत राहायचं आहे. मला खूप काम करायचं आहे. आणि, अक्षरशः या माणसानं अखेरच्या क्षणापर्यंत वेड्यासारखं काम केलं. इंजिनिअर म्हणून सरकारी सेवेतून १९०९ ला ते निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी ठरवलं की, माझ्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग करून मी आता वेगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर करणार. मग ते म्हैसूर संस्थानाचे दिवाण झाले. आज जे म्हैसूर आहे, त्यावर विश्वेश्वरय्या यांचा ठसा आहे. या माणसाला इंग्रज सरकारने ‘सर’ हा किताब दिला आणि भारत सरकारनेही ‘भारतरत्न’ दिले. 
      मला फार गंमत वाटते. पुण्यामध्ये एक काळ असा असेल की, जेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रातले चार अभ्यासक एकत्र छान चहा पीत असतील! अर्थात तेव्हाच्या पुण्यात हॉटेलात जाऊन चहा पिणं एवढं सोपं नव्हतं. हॉटेलमध्ये जाऊन चहा प्यायला म्हणून खुद्द महादेव गोविंद रानडे यांना प्रायश्चित्त घ्यावं लागलं होतं. पण ते असो. चार अभ्यासक एकत्र बसून गप्पा मारताहेत, असं दृश्य. बरं हे चार अभ्यासक कोण? डॉ. भांडारकर, नामदार गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या! रानडे, गोखले आणि विश्वेश्वरय्या हे तसे समकालीन. मात्र, रानडे अठ्ठावन्नाव्या वर्षी गेले. गोखलेंनी तर पन्नाशीही पूर्ण केली नाही. पण, हे चौघेही चांगले मित्र होते. विश्वेश्वरय्या यांचा जन्म १८६१ चा. ते गेले १९६२ मध्ये. त्यामुळे काळाचा खूप मोठा तुकडा त्यांच्या वाट्याला आला आणि त्यावर त्यांनी ठसा उमटवला.  
     विश्वेश्वरय्यांचा जन्म म्हैसूरचा. ते वारलेही तिकडेच. पण, दरम्यानच्या काळात त्यांचे महाराष्ट्राशी एक वेगळे नाते तयार झालेले होते. आता पुण्यात ‘सीओइपी’ आहे, त्याच कॉलेजमधून ते इंजिनियर झाले. इंजिनिअर झाल्यावर लगेचच ते सरकारी नोकरीत गेले. त्यांचे पहिले पोस्टिंग होते धुळे. त्या नोकरीच्या काळात त्यांनी धुळे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी धुळ्यापासून सात मैलावर तिखी गावाला लागून असलेल्या डेडरगाव येथे एक नाला अडवून तलाव बांधला. आजही तो डेडरगाव तलाव याच नावाने प्रसिद्ध आहे. नद्यांचे पूर रोखायचे कसे, हा मोठा प्रश्न तेव्हा सगळ्यांच्या समोर आ वासून उभा होता. त्यावर त्यांनी खूप काम केले. हैदराबादला पूरमुक्त करण्यात त्यांचा वाटा फार मोठा. दूर कशाला, आपल्या पुण्यातही त्यांच्या खाणाखुणा दिसतात. खडकवासला धरण तुम्ही कधी पाहिले आहे? तिथं त्यांनी ‘फ्लड गेट्स’ म्हणजे पूरनियंत्रक दरवाजे बसवले. पावसाळ्यातील पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी ही यंत्रणा खूपच उपयुक्त ठरली. नंतर ही योजना जगभर राबवली गेली. 
     असं बरंच सांगता येईल. भारतातच काय, जगभर त्यांनी काम केले. कावेरी नदीवर कृष्णसागर धरण उभारण्याची योजना मांडली गेली, तेव्हा अनेकांनी ती अशक्य असल्याचं म्हटलं. तांत्रिक साधनं, यंत्रसामग्री मर्यादित होती. निधीची कमतरता होती. बर्‍याच अधिकाऱ्यांनी थेट सांगितले, “हे धरण उभारता येणार नाही. इतका पैसा, इतके परिश्रम वाया घालवू नका.” पण सर विश्वेश्वरय्या शांतपणे म्हणाले, “हे धरण उभारलं गेलं नाही, तर या प्रदेशाचं भविष्य कायमचं अंधारात जाईल. हे बांधायचंच !” १९३१ मध्ये हे भव्य धरण उभारलं गेलं. त्यावेळी लोकांना विश्वासच बसत नव्हता. हे धरण बांधून पूर्ण झालं, तेव्हा महात्मा गांधींनी ते पाहिलं. गांधीजी प्रचंड प्रभावित झाले. विश्वेश्वरय्या यांना ते म्हणाले, “हे एवढंच एक काम तुम्ही केलं असतं तरीही तुम्ही अजरामर झाला असतात!”
      गंमत बघा. ज्या म्हैसूर संस्थानाचे दिवाण म्हणून विश्वेश्वरय्या यांनी काम पाहिले, त्या संस्थानाचा राजा किती मोठा माणूस असेल ! म्हणजे आपल्या राजर्षी शाहू महाराजांची किंवा बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांची आठवण यावी, असाच हा राजा. कृष्णराज वोडेयार असे त्याचे नाव. हा राजा गेला, तेव्हा त्याची व्यक्तिगत संपत्ती तेव्हा काही हजार कोटींच्या घरात होती. जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसांपैकी एक असा हा राजा. अत्यंत प्रगल्भ आणि पुरोगामी. खुद्द महात्मा गांधींनी त्यांचे अनेक वेळा कौतुक केले होते. त्यांच्यामुळेच म्हैसूर, बंगळूर ही शहरे उदयाला आली. १९०२ ते १९४० अशी जवळपास चार दशके हा राजा सिंहासनावर होता. त्या कालावधीमध्ये अधिकृतपणे अस्पृश्यता उच्चाटन करणारा, बालविवाहावर बंदी घालणारा आणि बालविधवा मुलींसाठी शिष्यवृत्ती सुरू करणारा हा संस्थानिक. नोकरीमध्ये २५ टक्के जागा या ब्राह्मणेतर मुलांसाठी राखीव असाव्यात, असा कायदा त्याने १९१८ मध्ये केला. इंग्लंड आणि अमेरिकेत जेव्हा महिलांना मताचा अधिकार नव्हता, तेव्हा तो अधिकार देणारे जे राजे भारतामध्ये होते, त्यापैकी एक सयाजीराव गायकवाड आपल्याला ठाऊक असतात. दुसरा हा मैसूरचा राजा. १९११ मध्ये ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ बंगळुरूमध्ये सुरू झाले, त्यासाठी आपली ३७१ एकर जागा त्याने दिली आणि मोठा निधीही दिला. एकीकडे बँक सुरू केली. दुसरीकडे कृषी विद्यापीठ स्थापन केले. तिसरीकडे कन्नड साहित्य परिषदेची स्थापना केली. कृष्णराज हे बनारस हिंदू विद्यापीठाचे पहिले कुलगुरू. सर सी. व्ही. रामन यांच्या संस्थेसाठीही त्यांनी दहा एकर जागा दिली. 
      असा हा द्रष्टा राजा. म्हणून त्याने विश्वेश्वरय्यांना दिवाण म्हणून पाचारण केले. काही वर्षे विश्वेश्वरय्या तिथे राहिले. त्या पदावर रमले. त्यांनी फार महत्त्वाचे काम केले. आरक्षणाला विरोध म्हणून विश्वेश्वरय्या यांनी दिवाणपद सोडले, असा एक आरोप त्यांच्यावर होत असतो. धक्कादायकच आहे हे. पण, विश्वेश्वरय्या एकूणच मोठ्या उंचीचा माणूस. त्यांना ब्रिटिशांनी ‘सर’ म्हटले. गांधींनी कौतुक केले. नेहरूंनी ‘भारतरत्न’ दिले. कृष्णराजाने दिवाण केले. १९६२ ला विश्वेश्वरय्या गेले. त्यांचे शेवटचे पुस्तक १९६० ला आले. ते गेले, तेव्हाही त्यांच्या टेबलवर काही अप्रकाशित लेख दिसत होते.  
     मित्राला मी विश्वेश्वरय्यांची गोष्ट सांगत होतो. निवृत्त झाल्यानंतर पन्नास वर्षे वेगळे काम करणारा असा हा माणूस. निवृत्तीनंतर प्रशासन, राजकारण यातही ते रमले. स्टेट्समन, लेखक, अध्यापक, प्रशासक अशा स्वरूपाचं काम करत राहिले. ज्या सीओईपीमध्ये ते शिकले, ते कॉलेज आता बदलले आहे. ‘सिव्हिल इंजिनिअरिंग’मध्ये विश्वेश्वरय्या यांनी डिप्लोमा मिळवला. आता एआयपर्यंत जग पोहोचले आहे. पण तरीही विश्वभरातल्या इंजिनिअर्सना या मोक्षगुंडमचे नाव घेतल्याशिवाय आजही मोक्ष मिळत नाही, ही खरी गंमत आहे ! 
 
- संजय आवटे

2296. चांदीचा रुपया

     प्रिन्सिपल बाईंच्या दारावर टकटक झाली. चष्मा सावरत, हातातील, पेपरांच्या चळतीवरुन नजर न हटवता, गद्रे बाईंनी म्हटले "कम इन." मान वर करुन त्यांनी पाहीले तो स्वच्छ आणि फॉर्मल कपड्यातील २२-२३ वयाचा, एक तरुण दारात उभा होता. हातात पुष्पगुच्छ आणि कसलेसे पुडके. महादूने त्या व्यक्तीला आत सोडले व तो निघून गेला. हा मुलगा कोणाचा पालक नसावा कारण तेवढा वयस्क नव्हता तो. सकारात्मक होती त्याची देहबोली. आल्याआल्या छानसे तोंडभर स्मितहास्य करुन, त्याने नमस्कार केला. आणि बाईना त्याने विचारले - "बाई ओळखलत?" हा कोणी माजी विद्यार्थी होता तर. बाईंनी, त्याला समोर खुर्चीवरती बसण्याची खूण केली. तो स्थानापन्न झाल्यावर, बाई म्हणाल्या, "कोण?" त्यावर हसून तो म्हणाला "बाई, "२००८ बॅचचा उमेश साळुंके मी." बाईच्या हाताखालून इतके विद्यार्थी जात की त्यांना पटकन आठवेना. ते जाणून उमेश म्हणाला "बाई तुम्हाला नाही आठवणार मी कदाचित, मराठी शिकवायचात तुम्ही मला." "तुम्हाला धन्यवाद म्हणायला आलो आहे. माझ्या नशीबाची रेखाच बदलून टाकलीत तुम्ही." असे म्हणून तो पाया पडण्याकरता पुढे झाला आणि बाई म्हणाल्या 'अरे असू दे. काय करता तुम्ही?" यावर उमेश म्हणाला "बाई अरे-तुरे करा मला. मी सातार्‍याला, वाहतूक-नियंत्रण विभागात आहे. माझ्या हाताखाली बरेच अधिकारी आहेत. पण तुमचा आजन्म विद्यार्थीच आहे मी आणि अभिमान आहे मला त्याचा." बाईंना आता चेहरा थोडा थोडा आठवु लागलेला होता, नाव ऐकल्यावरती तर खात्रीच पटली. आणि त्यांना आठवण आली -
        शिपाई महाददेव, २ वांड पोरांना, घेउन आलेला होता. बाईंना नेहमीचे 'ड्रिल' माहीत होते. पोरांना, जरब द्यायची - पालकांना चिठ्ठी पाठवून बोलवून घ्यायचे. त्याउपरांत वर्गशिक्षकांकडे त्या मुलांबद्दल चौकशी मुलांची प्रगती, मुलांचे अभ्यासातील लक्ष, वर्तणूक, रेड फ्लॅग्स, समग्र माहीती गोळा करुन, पालकांपुढे खरे चित्र उभे करायचे. ७ वर्षे मुख्याध्यापिका होत्या त्या. मुलांना कसे सुधरवायचे, अतिवांड, वासरांना कसे वठणीवर आणायचे ते त्या पक्के जाणून होत्या. परंतु वरवर काटेरी दिसणार्‍या या फणसाच्या गाभ्यात अतिगोड गरेही होते. बाई वरुन कितीही कठोर भासल्या तरी त्यांचे हृदय लोण्यासारखे मऊ होते. वात्सल्याचा जिवंत झरा त्यांच्या हृदयात होता. बाईं मुलांच्या आयुष्यातील, शिक्षकाचे महत्व जाणून होता. तारु भरकटणारच पण शिक्षकांनी दीपस्तंभ व्हायचे असते. "ह्म्म्म!! काय महादेव, आज काय प्रताप केला आहे पोरांनी?" असे म्हणणार तोच त्या चमकल्या कारण एका पोराच्या कपाळाला मोठी खोक पडून रक्त भळभळत होते तर दुसरा मुलगा मान खाली घालून उभा होता. तो दुसरातीसरा कोणी नसून, आठवी ड मधला, उमेश साळुंके होता. गेल्या ३ महीन्यातील ही ४ थी तक्रार घेऊन, महादू हजर होता. वर्गशिक्षिका बाईंनीदेखील उमेशबद्दल रिपोर्टात हेच सांगीतलेले होते की - उमेश वर्गात मारामार्‍या करतो, इतर मुलांना त्रास देतो, कागदाची विमाने उडविणे, शिक्षकांना उलट उत्तरे देणे हे तर सर्रास होते. या वेळी, चिठ्ठी मिळाल्यावर उमेशची आई शाळेत आली. त्यांची परिस्थिती बरी नसावी असे त्यांच्या कपड्यांवरुन, रहाणीवरुन वाटत होते. उमेशची आई घाबरुन विचारत होती "बाई, माझ्या मुलाला शाळेतून काढणार तर नाही ना? त्याला सुधरायची, एक संधी द्या. बाई याचे वडील वारले ३ वर्षांपूर्वी त्यानंतर हा ऐकत नाही माझं. उमेशला बाहेर जायला सांगून, बाईंनी आईला विचारले बोला - आई ४ घरचा स्वयंपाक करुन पोट भरत होती. एकंदर, संध्याकाळी नाक्यावर टोळकं करुन उभे रहायचे आणि सिगरेट ओढणे, गोट्या, तीन पत्ती खेळणे हा उमेशचा दिनक्रम होता. बाईंनी उमेशच्या आईला दिलासा दिला व सांगीतले -बघते मी काय करायचे ते. समजावते उमेशला. उमेशची आई गेल्यानंतर दुसर्‍या दिवशी बाईंनी उमेशला ऑफिसात, बोलावणे धाडले. तो आल्यावर त्या म्हणाल्या "बस बाळ!" ते ऐकून उमेश चमकला कारण त्याला वाटत होते आजही पट्टी मिळणार हातावर नाहीतर ओरडा. पण बाई त्याला म्हणाल्या "उमेश काल बोलले मी तुझ्या आईशी. आईच्या डोळ्यात पाणी दिसलं मला. तुझे बाबा, ३ वर्षांपूर्वी गेले ना. मग आता घरातील कर्ती व्यक्ती कोण होणार, कोण त्यांची जागा घेणार? तुझ्यावर जास्त जबाबदारी आहे पोरा. आई चार घरी स्वयंपाक करते आणि तू जुगार खेळतोस- तुला तरी बरोबर वाटतं का? मला सांग शाळेकडून तुला काय मदत हवी. हवी ती मदत करायला मी तयार आहे." हळूहळू उमेशचे डोळे पाण्याने भरुन आले आणि बाईंची खात्री पटली - हा निर्ढावलेला गुन्हेगार नाही. लवकर सुधरु शकतो. उमेश म्हणाला - "बाई माझं शाळेत लक्ष लागत नाही. मला शाळा सोडावीशी वाटते. मला पैसे कमवायचेत. बाई म्हणाल्या "तीन पत्तीतून? असे मिळतात का पैसे? जुगाराने कोणाचे भले झालेल आहे का - याचा विचार करावास तू. तू जर शिकलास तर चांगली नोकरी आणि मान मिळेल." बराच वेळ बाईंनी त्याला समजावुन सांगीतले. आईला बोलावुन - आर्थिक मदत देऊ केली. पण त्याच्या आईने ती नाकारली. बाईंनी जातीने लक्ष घालून, शाळेनंतर तासभर त्याला गणिताची विज्ञान विषयाची शिकवणी लावु केली. हळूहळू उमेशला चांगले मार्कं पडू लागले, त्याच्या वागणुकीत, प्रगती दिसू लागली. त्याच्यामधील उर्जेला सकारात्मक दिशा मिळाली..
      बाईंना, हे सारे आठवत गेले, बाईना आज कृतकॄत्य झाल्याची भावना झाली. एखाद्या विद्यार्थ्याने समोरून येउन, आभार मानणे, त्यांच्या व्यवसायातील हा कृतार्थते, सन्मानाचा क्षण होता. बाई म्हणाल्या " उमेश, चांदीचा रुपया मातीत पडला तरी तो रुपया असतो आणि घाणीत पडाला, म्हणुन कोणी तो टाकुन देत नाही. रुपया उचलून, पुसून घेतो. पण मूळात त्याला रुपया असावे लागते. तसा तू होतास. चांदीचा रुपया. यात मी काही केले नाही." यावर उमेशचे डोळे ओलावले आणि त्याने पुष्पगुच्छ आणि पेढ्याचे पुडके बाईंना देउन, त्यांच्या पाया पडून त्यांचा निरोप घेतला. आज तो ताठ मानेने जगत होता आणि हेही जाणून होता की कधीकधी आपल्याला कोणाच्या तरी नजरेत आपल्या-स्वतःच्या, लायकीचे व्हॅलिडेशन लागते, विश्वासाची पोच लागते आणि त्या क्षणी फक्त तेवढी मिळाली सुद्धा की आयुष्य सावरते.

बा स कुलकर्णी

मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५

2295. पितृदोष

    मोबाईलच्या स्क्रीनवर मुलाचं नाव चमकताच सावित्री दचकली. वर्षानुवर्षे उलटली होती. मुलाने फक्त औपचारिक फोन केले होते. तेही तेव्हा, जेव्हा त्याचे वडील रुग्णालयात मृत्यूशी झुंजत होते आणि त्यांची अंतिम यात्रा सुद्धा त्याने फक्त फोनवरच आटोपली होती.
सावित्रीबाईंनी कॉल उचलला -
“हॅलो बेटा...”
“हॅलो आई, कशी आहेस?”
“मी ठीक आहे दीपक.. तू सांग, कसा आहेस?”
“कुठे आई... सगळं ठीक कुठं आहे...” त्याच्या आवाजात थकवा होता.
“काय झालं रे?”
“आई, हे पितृदोष काय असतं?”
सावित्री चकित झाली-
“पितृदोष? तुला लंडनमध्ये हे कुठून आठवलं? तिकडे पण पंडित असतात  का?”
“अगं आई, तू पण ना... कायम जुन्याच गोष्टी करत बसतेस.” दीपकच्या आवाजात चिडचिड होती.
सावित्री हलक्या स्मिताने म्हणाली -
“हो बेटा, खरं आहे. जसा तू मला सोडून गेलास तशीच आहे मी. तुझ्या जाण्यानंतर त्याच भिंती, तेच अंगण, आणि तेच शांत रिकामेपण माझे साथीदार झालेत.”
“पण अचानक हा प्रश्न का?”
“आई, पप्पा गेल्यापासून बिझनेसमध्ये सतत नुकसान होतंय. मुलांच्या अभ्यासाचंही वाईट चाललंय. मन सतत अस्वस्थ असतं. इंटरनेटवर एका पंडिताशी बोललो. ते म्हणाले आमच्या घरावर पितृदोष आहे. उपाय काशीला होईल आणि त्यांनी खूप मोठी रक्कम मागितली. म्हणून विचारावंसं वाटलं तुला.”
सावित्रीच्या डोळ्यांत पाणी आलं. हळू आवाजात ती म्हणाली -
“बेटा, खरं पितृदोष तो नाही जो ज्योतिषी सांगतात. खरं पितृदोष तो आहे जेव्हा वडील आपलं सगळं आयुष्य मुलांच्या इच्छा पूर्ण करत करत स्वतःला संपवतात. या आशेने की कधीतरी हीच मुलं त्यांचा आधार होतील. त्यांच्या एकटेपणात सोबत उभी राहतील. पण जेव्हा वेळ येते, तीच मुलं डोळे वटारू लागतात. वृद्ध आई-वडिलांना आजारपणात एकटं सोडून देतात. इतकंच नाही, ज्या खांद्यावर बसून त्यांनी लहानपणी आकाश पाहिलं होतं, त्याच खांद्यांना शेवटच्या यात्रेत खांदा द्यायलाही येत नाहीत आणि मग एखादा परका त्यांचा देह स्मशानापर्यंत पोहोचवतो.”
इतकं बोलून ती शांत झाली. फोनच्या दोन्ही टोकांना शांतता पसरली.
“आई… आई…” दीपकचा गळा भरून आला होता.
सावित्रीने डोळे पुसले आणि म्हणाली -
“उपाय विचारलास ना बेटा? याचा एकच उपाय आहे. आपल्या मुलांना फक्त सुख-सुविधा देऊ नकोस, तर वेळ आणि संस्कारही दे. नाहीतर उद्या तेच तुला पितृदोषाबद्दल विचारतील. लक्षात ठेव.”
सावित्री हुंदक्याने रडू लागली आणि दुसऱ्या बाजूनेही हुंदक्यांचे आवाज येऊ लागले. कदाचित उशिरा का होईना, पण त्या दिवशी दीपकला जाणवलं की वडिलांना गमावणं म्हणजे आयुष्याची सर्वात मोठी हानी आहे आणि त्या पोकळीची भरपाई कधीच कुणी करू शकत नाही.
 “आपण आपल्या आई-वडिलांना खरा आधार देतो आहोत का की फक्त सुविधा?”
“आपण आपल्या मुलांना संपत्तीपेक्षा संस्कार देतो आहोत का?”

श्री स्वामी समर्थ 🙏🙏

2294. मैत्री म्हणजे नक्की काय ?

 मैत्री म्हणजे नक्की काय? किंवा जिवलग मित्र म्हणजे नक्की कोण? असा प्रश्न अनेकदा अनेकांना पडतो. हल्ली काय आहे ना माणसांच्या गर्दीत असूनही कधी कधी खुप एकटं एकटं वाटतं, का कुणास ठाऊक एकांतात बसून रडावंसं वाटतं ना तेव्हा आपल्याला आठवतो तो हक्काचा खांदा जो आपल्या साठी कायमच आपल्या सोबत असतो तो खरा मित्र.
रक्ताची नाती जिथे साथ सोडतात तिथे आपली परिस्थिती,दिसणं राहणं न बघता आपल्या सोबत खंबीरपणे उभी राहते ती खरी मैत्री बाकीचे सगळं मिथ्य आहे. त्यामुळेच हक्काने ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडावंसं वाटतं ना तोच आपला खरा जिवलग.
आपल्या मनातील घुसमट भाव भावना व्यक्त व्हायला जिथे अजिबात संकोच वाटतं नाही. आपल्या सुखात दुःखात सगळ्यात अगोदर जो आठवतो तोच खरा जिवलग.
आयुष्य म्हणजे ऊन सावलीचा खेळ आहे. बऱ्याचदा आयुष्यात अनेक चढ उतार येतात. कधी खडतर प्रवास देखील करावा लागतो पण वेळ काळ आणि बदलेली परिस्थिती बघून जी दूर निघून जातात ना ती कधीच आपली नसतात. आपल्यावर प्रेम करणारी माणसं कधीच आपल्याला आपल्या डोळ्यात अश्रू असतांना आपल्याला एकटं सोडून जात नाहीतं.
रोज सोबत असावं, रोजच भेट व्हावी बोलणं व्हावं असं काहीच नसते. खऱ्या मैत्रीमध्ये पण जेव्हाही भेटू ना तेव्हा कडकडून मिठी मारून डोक्यात नकळतपणे पाणी येत ना तोच खरा जिवलग असतो आपला.
म्हणतात की कोणाकडून कसलीही अपेक्षा ठेवुच नये पण विश्वास आपुलकी हक्क जिव्हाळा आणि प्रेमाच्या बदल्यात आपल्याही परत तेच मिळावं हा जिवलग मैत्रीचा अलिखित नियम असतो. तो मात्र दोन्ही बाजुनी समान निभावल्या गेला तरच मैत्री शेवटपर्यंत टिकते आणि तो ठरवून जाणूनबुजून नाही निभावू शकतं आपण त्यासाठी एकमेकांसाठी प्रेम जिव्हाळा आपुलकी मनातूनच निर्माण व्हायला हवी.
ज्याच्या फक्त खांद्यावरील हाताने लढायला बळ येत मी सोबत आहे तु लढ हे शब्द जगायला बळ देतात. जो आपल्याला दुःखात हक्काने डोकं टेकवायला आणि आनंदात उचलून नाचवायला हक्काचा खांदा देणारा माणूस म्हणजे जिवलग मित्र तोच खांदा अगदी आपल्याला आयुष्याच्या शेवटी स्मशानापर्यंत खांदा देऊन अलविदा करणारा मित्र म्हणजे सच्चा यार.
आणि असा एक तरी जिवलग मित्र प्रत्येकाला असतो किंबहुना असावा.
तुमच पद प्रतिष्ठा रुबाबदार राहणं बघून तुमच्या आजूबाजूला कायम गर्दी असते ती म्हणजे मित्र असतातच असं नाही ना??
तुमच मन भावना तुमचा सहवास ज्यांना मनापासून आवडतो ना तीच खरी तुमची जिवलग मित्र असतात जी तुम्हाला तुमची परिस्थिती कशीही असो कधीच एकटं पडू देतं नाही.
 म्हणून आपल्या आजूबाजूला असणाऱ्यां आपल्या मित्रांशी बोलत रहा त्याला एकटं पडू देऊ नका तो बोरिंग सतत निगेटिव्ह बोलतो रडगाणं करतो म्हणून त्याला इंगोर नका मारू त्याला सकारात्मक करा त्याच्याशी संवाद साधा मी सोबत आहे ही शाश्वती द्या मित्र फक्त हशी मजाक पार्ट्या औटिंग टिंगलटवाळी पर्यंत मर्यादित नसतात तर जिथे तुला एकटं वाटेल तिथे तु न बोलता न मागता मी तुझ्या सोबत असेल तुला कधीच एकटं पडू देणारं नाही ह्या भावना आपल्याप्रति ठेवतो ना तोच खरा जिवलग असतो बाकी सगळा सुखातील फापट पसारा.
काय आहे ना असा हक्काचा खांदा प्रत्येकाला नक्कीच असावा.
ह्या जगात कोणीही एकटं पडू नये कारण एकटेपणा खूप वेदनादायी असतो.

2293. जीवनातील दहा सर्वसामान्य किंबहुना कठीण सत्य.

 👉🏽 जीवनातील दहा सर्वसामान्य किंबहुना कठीण सत्य जी प्रत्येकालाच ( साहजिकच हुशार, सुशिक्षित, सुसंस्कृत व्यक्तींनाच) मोठ्या मनाने मान्य करावीच लागतीलच, तरच आपले हे सुंदर आयुष्य तुम्ही आनंदमय, सुखमय वातावरणात जगु शकता आणि आनंदी  राहु शकतात, जीवनातील खरी श्रीमंती अगदी सहजपणे अनभवु शकता.✌🏼" 
👉🏽 काही गोष्टी ऐकायला खूप खूप कठीण वाटतात किंबहुना फारचं सोप्या वाटतात.‌ पण एकदा का त्या सकारात्मक पणे, मोठ्या मनाने स्वीकारल्या, तर त्या आपल्या आनंदाचं, वाढीचं, प्रगतीचं, ऐश्वर्याचे खरं कारण नक्कीच ठरतात, आणि आपले जीवन खरर्या अर्थाने आनंदमय नक्कीच होते.👍🏼

1️⃣ सगळ्यांना खूष ठेवणं कधीही शक्य नाही. 😴, एक निर्विवाद सत्य. 
तुम्ही कुठेही कितीही चांगलं काम केलं तरी, मोठ्या मनाने वागलात तरी किंबहुना सर्वांनाच प्रेमाने, आपुलकीने वागवलात तरी....😷, परंतु कुणीतरी टीका - टिपण्णी करणारच, चुका काढणारच, हे चालायचंच नाही का.‌‌ नैसर्गिक आहे हे, माणसाचा स्वभाव आहे हा.‌.., अज्ञानामुळेच....😷, त्यात विशेष असे काहीच नाही, सर्वदूर आहे हे.. हे चालायचंच....😎 म्हणूनच, सर्वच लोकांना खूष करण्यापेक्षा स्वतःशी खुप खुप प्रामाणिक राहा, स्वतः वर भरभरून प्रेम करा, स्वतःला फारच महत्व द्यावे आणि आपल्या आवडत्या, जवळच्या ( हक्काच्या ) व्यक्तींना जपा, बाकी सर्वांनाच सकारात्मक पणे....🙏🏻
2️⃣ अपयश हीच खरी शिकवण आहे.. अपयश जे शिकवते, ते कुठलाही गुरू प्रभावी पणे शिकवू शकत नाही, फक्त तुम्ही सकारात्मक आणि अभ्यासू, मेहनती पाहिजे....👍🏼
कधी कधी अपयश टाळलं जातं नाही, त्यावेळी त्यातूनच हमखास पणे अभ्यासु पणे, मेहनतीने शिकलेच पाहिजे.
यशापेक्षा अपयश आपल्याला जास्त शिकवते, परीपुर्ण पणे घडवते....👍🏼
3️⃣ वेळ कोणासाठी थांबत नाही. स्वतःच्या, दुसऱ्यांच्या वेळेला ही प्रचंड महत्त्व द्यायला शिका....😴, वेळेचं योग्य नियोजन करा.
तुम्ही तयार असाल किंवा नसाल, वेळ आपला वेग घेऊन पुढेच जात राहते. म्हणून “योग्य क्षण” ची वाट पाहणं सोडा जे करायचं आहे ते आज, आता पासूनच सुरू करा. स्वतःहा वर सकारात्मक पणे लक्ष केंद्रित करा, स्वतःला सर्वोत्तम घडविण्यासाठी / व्यक्तिमत्त्व बनविण्यासाठी प्रयत्न करा....👍🏼, जो वेळेला प्रचंड महत्त्व देतो, तो जीवनात यशस्वी होतो असे इतिहास सांगतो....👍🏼
4️⃣ बदल अपरिहार्य आहे...., त्यामुळेच काळाप्रमाणे सकारात्मक पणे बदलतं रहा, हिचं खरंतर काळाची गरज आहे....✌🏼, चुकीच्या विचारांपासून, व्यक्तीं पासून लांब रहा, व्यवस्थितपणे अंतर ठेवा, कारण कर्माचा हिशोब तर होणारच आहे, त्यामुळेच, नेहमीच योग्य ती काळजी घ्या....👍🏼
तुम्हाला आवडो वा न आवडो, परिस्थिती सातत्याने बदलणारच आहे. कारण सध्याचं जग हे मायावी जग आहे ते कोणाचेही कोणीही नाही परंतु प्रत्येक जण आपलाच आहे. प्रत्येकजण आपापल्या इच्छा आकांक्षा साठी जगत आहेत. त्यामुळेच नेहमीच सशक्त, सतर्क आणि जागरूक रहा.. काळजी घ्या. बदलाशी लढण्या पेक्षा त्याला सकारात्मक पणे स्वीकारा, त्यातुनच सकारात्मक सर्वोत्तम विश्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा....👍🏼
5️⃣  कधीही, कुठेही सर्वकाही ( बरेचसे ) तुमच्या नियंत्रणात नसतं....😎
जगातील बरेचशे विषय, तुमच्या हातात नसतात, तुम्ही फक्त आपल्या कृतींवर नियंत्रण ठेवू शकता. एक महत्त्वाचा विषय नेहमीच लक्षात ठेवा - आपण ह्या जगातील पाहुणे आहोत, त्यामुळेच, नेहमीच नियोजन बद्ध, मर्यादित रहा. आहे त्या वातावरणात, परिस्थितीत, आहे  तो पर्यंत खुपचं सकारात्मकपणे, मनमोकळेपणाने जगाचा आनंद घ्यायचा, आनंदात सन्मानपूर्वक जगायचे, नेहमीच  सकारात्मक, आनंदी  राहण्यासाठी प्रयत्न करायचा आणि चुकीच्या विचारांकडे, भिकारी व्यक्ती ( वैचारिक दृष्टिकोनातून ), दुःखी, मुर्ख, लाचार व्यक्ती कडे जास्तीत जास्त दुर्लक्ष करा. त्यांना  सरळसरळ टाळावे आणि आपल्या सर्वोत्तम ध्येया साठी सकारात्मक पणे पुढे चालत रहा. फक्त आणि फक्त यशस्वी, तेजस्वी होण्यासाठीच....👍🏼 
6️⃣ लोकांचे जास्तच मनावर घ्यायचे नाही. कारण हल्लीच्या काळात, व्यव्हारीक जगात तुमच्याबद्दल ( कोणीही, कोणा बद्दल ) सहसा कोणीही सकारात्मक पणे विचार करत नाहीत....😎, त्यामुळेच चांगल्या समाजात स्वतःची उंची, ज्ञान, आत्मसन्मान कसे वाढेल ह्यासाठी सातत्याने प्रयत्न करा ( certificate, हे कागद म्हणजे उंची नसते, हे नेहमीच  लक्षात ठेवा. तुमचं  ज्ञान, संस्कार, सुसंस्कृत पणा हा तुमच्या  बोलण्यातून, वागण्यातून, संभाषणातून लिहीण्यातून जाणवलाच पाहिजे, तरच तो खरर्या अर्थाने सुशिक्षित, सुसंस्कृत.... )
लोक काय म्हणतील, नावे ठेवतील का.  या विचारात आपण ( काही व्यक्ती ) बराच काळ घालवतात, पण खरं म्हणजे, हल्लीच्या काळात प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त असतात. आपण समस्त समाजात वावरताना पाहतोय की कोणालाही कोणासाठी तसा वेळ नसतो, प्रत्त्येक जण आपलं पोट भरण्यासाठी उठसूठ पळत असतो. त्यामुळेच सर्वप्रथम आपल्या वर लक्ष केंद्रित करा. दुनियादारी पासून नेहमीच दूर रहा. आपलं सुंदर जग निर्माण करा. आपल्या जगाची काळजी नित्यनेमाने, काटेकोर पणे घ्या कारण....✌🏼

7️⃣ वाढीसाठी, प्रगती साठी जोखीम स्वीकारायची तयारी ठेवावीच  लागते...✌🏼
साध्या सोप्या वातावरणात राहुन, सोयीच्या चौकटीत राहून बहुतांश वेळा प्रगती होत नाही. जोखीम घेणं आणि भीतीला सकारात्मक पणे सामोरं जाणं गरजेचं आहे. समस्त समाजात, व्यव्हारीक जगात वावरताना चांगले-वाईट अनुभव येतात किंबहुना आलेही पाहिजेत. त्यामुळेच व्यक्ती घडतात हे माझं ठाम मत आहे. अनुभवातूनच व्यक्ती घडते, शिकते आणि एक कर्तुत्ववान नेतृत्व ही निर्माण होते....✌🏼
8️⃣ कष्टाला, दुरदृष्टीला कधीही, कुठेही पर्याय नाही....😴
हल्लीच्या काळात शॉर्टकट आकर्षक वाटतात, पण टिकणारे यश अभ्यासु पणे परंतु नेहमीच कष्टातूनच मिळतं.👍🏼, ह्या धावत्या जगात दुरदृष्टी असणे आवश्यक आहे, कारण आपलेच भविष्य आणि भवितव्य....👍🏼

9️⃣ कुणीतरी नेहमीच तुमच्यापेक्षा चांगला असेलच, म्हणूनच तुम्ही सर्वोत्तम होण्यासाठी प्रयत्न करा....😴
तुम्ही खरंच हुशार असाल तर तुम्हाला स्पर्धा करायची असेल तर कालच्या स्वतःशी करा, इतरांशी स्पर्धा तर बिलकुल करायची नाही, कारण....😴,  स्वतःवर प्रचंड विश्वास ठेवा, स्वतः वर खुप खुप प्रेम करा, कारण नेहमीच यशस्वी, तेजस्वी होण्यासाठी प्रयत्न करायचाच, विजयी होण्यासाठीच जगायचं....👍🏼

🔟 आनंद हा आतून ( मनापासून, मनातून ) निर्माण होतो....💕
पैसा, वस्तू, माणसं — हे सगळं महत्त्वाचं आहे, परंतु काहीही कामाचं नाही. ते म्हणजे शाश्वत सुख न्हवे....👎🏿
खरंतर समाधानाची भावना आपल्या मनातून निर्माण होते, मनातून येते. त्यामुळेच नेहमीच मायावी जगात न जगता शाश्वत जगात जगा. खुपचं सर्वसामान्य माणूस म्हणूनच जगा. खुपचं नैसर्गिक पणे विचार करा. सदैव माणुसकी जपा आणि आपल्या सुंदर जीवनात अगदी सहजपणे, सदैव अनुभवा आनंद, सुख काय आहे ते.💕

एक महत्वपूर्ण विषय. - आपण व्यव्हारीक जगात, समस्त समाजात शांतपणाने, जबाबदारीने, सकारात्मक पणे वागत असताना, वावरताना आपली तब्येत ही चांगलीच ( उत्कृष्ट, सडसडीत - hit and fit, very flexible ) ठेवली पाहिजे. तरच आपणं आपली स्वप्ने, उदिष्ट सहजपणे, लवकरात लवकर पुर्ण करु शकतो आणि ती पुर्ण झाल्यावर त्यांचा मनापासून उपभोग घेऊ शकतो, त्यांचा आनंद घेऊ शकतो. 
🩷  एक नेहमीच लक्षात ठेवा - आजच्या काळात, ह्या  जगातील सर्वात अमूल्य, सर्वोत्तम संपत्ती हे तुमचे शरीर आहे, तुमची तब्येत आहे, त्याची मनापासून काळजी घ्या, कारण तुमचेच शरीर, तब्येततच तुम्हाला भरभरून ( अर्धवट प्रमाणात नाही....👎🏿 ) सुख, शांती, आनंद आणि समाधान देते, बाकी सर्व पानी कम चाय आहे, हे तुम्हाला तुमच्या अनुभवानेच सहजपणे समजेल. मी वेगळं सांगण्याची तशी गरज नाही....👍🏼
👉🏽👉🏽  तुम्ही आणि तुमचे अती सुंदर भविष्य, भवितव्य....😴, हे सर्व फक्त आणि फक्त " श्री....🙏🏻 " च्यांच हातात आहे. त्यामुळेच आपल्या देवासाठी नेहमीच सच्या मनाने, मनापासून समर्पण योगदान द्यावे. नेहमीच  तुमच्या कर्तुत्वा मधून, कर्मातुन देवपण दिसलं पाहिजे ह्याची काळजी घ्यावी, तरच....🙏🏻, एक नेहमीच लक्षात ठेवा - देवाल नमस्कार करणं म्हणजे देवाची सेवा, प्रार्थना करणे नाही. त्यासाठी तुम्हाला समर्पित होऊन योगदान द्यावेच लागेल. तुम्हाला आपापल्या देवांवर मनापासून प्रेम करावेच लागेल. मनापासून निस्वार्थी पणाणे निष्ठा ठेवावीच लागेल, तरच....🙏🏻

👉🏽👉🏽👉🏽  नेहमीच लक्षात ठेवा, ह्या सर्वसामान्य परंतु असामान्य विषय साध्य  करण्यासाठी, अनुभवण्यासाठी तुम्हाला " श्री...🙏🏻 "  साथ हवीच, आशिर्वाद पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला काही विषयापासून, काही व्यक्तीं पासून, चुकीच्या विचारांपासून, चुकीच्या सवयींपासून, मोहमाया पासून अंतर हे ठेवावेच लागेल, तरच....🙏🏻
धन्यवाद.

2292. व्यवहारी माणसं

 मित्राबरोबर हॉटेलात चाळीस रुपयांची कॉफी पिली आणि निरोप देऊन घराकडे निघालो.
कराडात रिमझिम पाऊस पडत होता.
पन्नाशितला माणूस ओल्या भुईमुगाच्या शेंगा ढीग घालून रस्त्यावर विकत होता.
मी गाडीवरून थांबलो आणि विचारलं — “शेंगा कश्या दिल्या ?”
तो म्हणाला — “100 रुपये किलो.”
मी म्हटलं — “कमी करा की जरा…”
तो हसला — “पाच कमी द्या.. घ्या.”
मी पुन्हा म्हणालो — “80 ने दया.”
तो शांतपणे उत्तरला — “नाही वो… 90 द्या अन न्या.”
मी म्हणालो — “नको, 80 ने परवा नेल्या होत्या.”
बरं, म्हणत त्यानं वजनकाटा हातात घेतला आणि शेंगा पिशवीत भरल्या. वजन केलं.
मी दोन शेंगा खात विचारलं — “घरच्या आहेत का?”
तो म्हणाला — “नाय, विकायला अनल्या. पोटासाठी कायतरी करायचं...सकाळपासन पाऊस हाय… त्यामुळं विक्री कमी झाली. नाहीतर 90 च्या आत कुणाला नायत दिल्या.”
मी 2 किलो शेंगा घेतल्या आणि 200 रुपये दिले.
त्याने खिशातून चाळीस रुपये माघारी द्यायला हात पुढे केला.
मी म्हणालो — “नको राहू द्या.”
तो हळू दचकत म्हणाला —
“काय? नको नको… हे घ्या सुट्टे हायत की…”
मी थांबवायचा प्रयत्न केला,
“नको अहो, तुम्हाला असू दया.
मला कशाला? मी शेंगा 80 ने दिल्यात तुम्हाला…”
तो हट्टाने पुढे आला, माझा हात धरला आणि पैसे देत म्हणाला
मी म्हणलो
“नको, मला 100 नेच पाहिजेत.”
तो हसला… पण त्यांचा आवाज कापरा झाला.
“नको वो… धरा पैसे…”
मी हातात पैसे घेतले आणि पुन्हा त्यांच्या वरच्या खिशात ठेवले.
क्षणभर थांबून तो म्हणाला —
“काय रजेव… ही कसली पद्धत…?”
त्यांचे डोळे पाणावले.
घ्या वो तुमच्या कष्टाचे आहेत.. मी म्हणालो.
“सकाळपासन बसलुय… पावसामुळं शेंगात पाणी… गिऱ्हाईक नाय… आता साडेसात वाजले,..गाराठलोवतो...
घरी जायचं म्हणून चहा घेतला...तेवढ्यात तुम्ही आला… खोटं बोलत नाय...मी 70 नं घेतल्यात... पण गिऱ्हाईक नाय…उद्या परत तेवढच विकत बसायचं....तुम्ही 80 न मागितल्या… म्हणलं 10 अन् 10 रुपये मिळून 20 मिळत्याल...तेव्हडीच दुधाची पिशवी घिऊन घरी जाईन... म्हणून 80 न दिल्या… अन् तुम्ही आशी आयडिया किली व्हय....!
जेवढं मिळालं तेव्हड्यात समाधान होतं की मला… कशाला तुम्ही 100 न घेताय…”
त्यांचे शब्द ऐकून माझं मन चटका लागल्यासारखं झालं.
कारण त्या चाळीस रुपयांची खरी किंमत काय असते ती लहानपणापासून मी भोगलीय...!
हॉटेलात नुसत्या दोघांच्या कॉफीसाठी पाच मिनिटात 40 रूपये घालवणारे आणि 20 रुपयांचे दुध नेऊन त्यात दोन दिवस चहा करून पिणारे घर यातला फरक प्रत्येकाला मोजता आला पाहिजे.
अश्या 10,20,30,40 रुपयांत अख्ख्या घराला मिळणारा आनंद…तो मी माझ्या घरात अनुभवत मोठा झालोय...!
आपण कुणाची तरी वेळ काढतो.त्याला अर्थीक मदत करतो पण आपल्याला धडा शिकवणारी आपली जवळचीच माणसं असतात.
अर्थीक व्यवहारात आपल्यालाच फसवून जवळचीच माणसं आपला घात करतात. असं असताना 
फुकटच नको व्यवहाराने ठरलय तेच घेणारी मोठया मनाची व्यवहारी माणसं आता सहजासहजी बघायला मिळत नाहित.
✍️ लेखक : अमोल अ. पवार उंब्रज
9970773576
writer.amolpawar@gmail.com
©️ copyright ™️

#मनाचेरत्न 💎 #मानवतेचीकिंमत ❤️ पावसातलीकथा 🌧️ #AmolPawar ✍️
हि कथा चाळीस रुपयाची नाही. एका व्यवहारी प्रामाणिक मनाची आहे. स्वाभिमानाची आणि प्रामाणिक पणाची वात अशीच तेवत राहीली पाहिजे. 🙏

2291. दाम्पत्य दिन

 60 वयाच्या पुढील सर्व भाग्यवान जेष्ठ नागरिक जोडप्यांना खूप खूप हार्दीक शुभेच्छा* 🌹🙏   
🙋  🙋‍♂
 दांपत्य दिनच्या निमित्ताने एक सुंदर कविता. प्रत्येकाला आवडेल.

💝💝💝
प्रत्येकाच्या नशिबात,
एक बायको असते.
आपणास कळतही नसते,
डोक्यावर ती केव्हा बसते.
💝💝💝
बायको इतरांशी बोलताना,
गोड, मृदू स्वरात बोलते.
अजून ब्रह्मदेवालाही कळाले नाही,
नवऱ्याने काय चुक केलेली आहे.
💝💝💝
ज्ञानेश्वराने भिंत चालवली,
बायको त्यांचं कौतुक करते.
सालं नवरा अख्खं घर चालवितो,
तेव्हा मात्र बायको गप्प असते.
💝💝💝
वस्तू कुठे ठेवली हे,
बायको विसरते.
दिवसभर नवऱ्यावर,
उगीचच डाफरते.
💝💝💝
लग्नात पाचवारी बायकोला,
खूप होत होती मोठी.
आता नऊवारी गोल नेसतानाही,
बायकोला होतेय खूपच छोटी.
💝💝💝
बायकोच्या प्रेमाची गड्यांनो,
तर्‍हाच खूप  न्यारी असते.
पाहिजे तेव्हा रेशन लागते,
नको तेव्हा उतू जाते.
💝💝💝
वयाच्या साठीनंतर,
एक मात्र बरं असतं.
बायको ओरडली तरी,
नवऱ्याला ऐकू येत नसतं.
💝💝💝
 काट्याकुट्याच्या रस्त्यातून,
 नवरा किती मस्तीत चालतो.
 याला कारण खरं बायकोचा,
 मस्त, धुंद सहवास असतो.
💝💝💝
 बायको गावाला गेली की,
 देवाशपथ, करमत नसतं.
 क्षणाक्षणाला रुसणारं,
 घरात कुणीच नसतं.
💝💝💝
नवरा-बायकोचं,
वेगळंच नातं असतं.
एकमेकांचं चुकलं तरी,
एकमेकांच्याच मिठीत जातं.
💝💝💝
बायकोवर रागावलो तरी,
तिचं नेहमी काम पडतं.
थोडावेळ जवळ नसली तर,
आपलं सर्वच काही अडत असतं
💝💝💝
अव्यव्यस्थित संसाराला,
व्यवस्थित वळण लागते.
त्यासाठी अधूनमधून,
बायकोचं ऐकावंच लागते.
💝💝💝
बायकोशी भांडताना,
मन कलुषित नसावं.
दोघांचं भांडण,
खेळातलंच असावं.
💝💝💝
नाती असतात पुष्कळ,
पण कुणी कुणाचं नसतं.
खरं फक्त एकच,
नवरा  बायकोचं "नातं असतं.

🙏💑सर्व दांपत्याना समर्पित💑🙏!





2290. काफ्का, हरवलेली बाहुली आणि ती छोटी मुलगी

 Everything you love will probably be lost, but in the end, love will return in another way.
फ्रांत्स काफ्का हा 20 व्या शतकातील जर्मन भाषेतील एक प्रसिद्ध ज्यू झेक लेखक आणि कादंबरीकार.
एकदा बर्लिनमधील एका उद्यानातून चालत असताना काफ्काला एक लहान मुलगी दिसली. जी तिची आवडती बाहुली हरवल्यामुळे रडत होती. काफ्काने त्या मुलीला शांत करण्याचा प्रयत्न केला. दोघांनी मिळून त्या लहानगीच्या बाहुलीचा शोध ही घेतला. पण त्यांना ती बाहुली मिळाली नाही.
काफ्काने त्या मुलीला दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथे भेटायला बोलावले. दुसऱ्या दिवशी, जेंव्हा काफ्फा तिथे आला तेंव्हा त्याच्या हातात एक पत्र होते.  त्याने सांगितले की तो त्या मुलीच्या बाहुलीला भेटून आलाय. तिची बाहुली आता जग पाहण्यासाठी सहलीला गेलीय पण तीथून ती त्या मुलीसाठी दररोज एक पत्र पाठवणार आहे. त्याने सोबत आणलेल्या पत्रात ही तेच लिहले होते, त्या लहान मुलीचा काफ्कावर पूर्ण विश्वास बसला.
अशा प्रकारे काफ्का स्वतः एक एक पत्र लिहून रोज त्या मुलीला देवू लागला ज्यात त्या बाहुलीची प्रवास वर्णन आणि साहसाच्या कथा असत. ही गोंडस पत्र त्या लहान मुलीला खूपच आवडली. असेच कित्येक दिवस गेले आणि मग एक दिवस काफ्काने एक नविन बाहुली आणून त्या मुलीला दिली.
"ही तुझी जगप्रवासाला गेलेली बाहुली परत आलिये." त्याने त्या लहान मुलीला सांगितले.
"पण ही तर माझ्या बाहुलीसारखी अजिबात दिसत नाही," मुलगी म्हणाली.
काफ्काने तिला आणखी एक पत्र दिले ज्यामध्ये बाहुलीने लिहिले होते, "माझ्या जगप्रवासाने मला बदलून टाकले आहे." हे वाचून त्या लहान मुलीने आनंदाने त्या नवीन बाहुलीला मिठी मारली आणि तिला घरी आणले.
यानंतर एका वर्षाने काफ्काचा मृत्यू झाला.
बऱ्याच वर्षांनंतर, आता प्रौढ झालेल्या मुलीला बाहुलीच्या आत एक पत्र सापडले. काफ्काने स्वाक्षरी केलेल्या त्या छोट्या पत्रात लिहिले होते,
 "तुम्हाला जे आवडते ते सर्व कदाचित हरवले जाईल पण शेवटी प्रेम दुसऱ्या मार्गाने परत येईल."

2289. संपुर्ण स्त्री खूप कमी लोकांना मिळते

 खरंतर पुरुषाला स्त्री अजून कळलीच नाही .म्हणूनच 'अमृता प्रीतम ' सारख्या लेखिका लिहीतात '' संपुर्ण स्त्री खूप कमी लोकांना मिळते '' तिच्यातल्या त्या आवेगासह, त्या उर्मीसह, त्या उत्कट भावनांसह. या अलंकारांनी अलंकृत स्त्री नाही झेपत साध्या पुरुषत्वाला. त्यासाठी त्या पुरुषाजवळ ही धीराची, संयमाची, बुद्धिची जोड असावी लागते. तिला तोलुन धरण्याचे सामर्थ्य असावं लागतं. तिच्या लैंगिकतेच्या, सेक्सच्या कल्पना खूप वेगळ्या आहेत. तिचे भावविश्व, तिचे भावबंध खूप निराळे आहेत.
    पुरुष हा स्त्रीच्या शरीराशी संभोग करतो पण स्त्री ही भावनांशी संभोग करते. म्हणूनच तर पोट भरण्यासाठी वेश्याव्यवसाय करणारी एखादी स्त्री शंभर माणसासोबत शय्यासोबत करून ही स्वतःला पवित्र मानते कारण तिथे तिचे शरीर तिचं भांडवल असतं त्यात मन आणी भावना नसतात. पण पुरुषाला दिसतं फक्त शरीर आणी त्याची ईच्छापूर्ती इतकंच. स्त्रीच्या बाबतीत भावना आणी मन महत्वाचे .
     एखादा नग्न पुरूषी देह बघून तिच्या भावना नाही चाळवल्या जात  नाही होत ती उत्तेजित. पण कधी कधी एखादया पुरुषाची एक नजरच तिच्या मनात उलथापालथ घडवून आणते. एखादया पुरुषाचे दिलखुलास हास्य तिला घायाळ करून जाते. एखादया आवडत्या पुरूषाचे आजुबाजुला असणे ही तिला मनातून मोहरून टाकते.
    एखादया पुरुषाची बुद्धिमत्ता, वाक्चातुर्य तिला त्याच्या सहवासात घेवुन जाते. किती तरी वेळा ती अशा काल्पनिक संभोगात रमते. स्वतःला हवं तसं. पण हे सारं मनात. आणी हे मनातलं ती कधीच बोलून दाखवत नाही. कारण तितकं स्वातंत्र्य आपण तिला कधी उपभोगुच दिलं नाही. तिला ही तिच्या भावाचे मित्र, कॉलेजचे मित्र आवडत असतात. कुणाचं टॉल, डार्क, हॅण्डसम असणं, कुणाची बुद्धिमत्ता, कुणाचं हीरो असणं, कुणाचं माचो दिसणं, कुणाचा खट्याळ स्वभाव, कुणाचे बोलके डोळे, कुणाचा टपोरीपणा सुद्धा तिला आकर्षित करतो. तिला नुसताच पुरूषी देह नाही तर त्यातील भावना ही हव्या असतात. तिला जाणुन घेण्याचा, समजून घेण्याचा तो हळवा प्रवास हवा असतो. तिला ते रोमांचित करणारे शब्द हवे असतात. डोळ्यांतील मुग्ध भाव हवे असतात. नुसत्या नाजुक स्पर्शाने ही खुलते ती. तिला फक्त शब्दांनी,स्पर्शानी उमलविण्याचि गरज असते. तिच्या स्त्रित्वाला जागृत करण्याची गरज असते . तिला उन्मुक्त व्हायला आवडते पण त्यासाठी आधी ती मुक्त व्हायला हवी.
     ती स्वतःच पुरुषाला दैहिक सुखाच्या त्या विलक्षण स्वर्गात नेवू शकते. जिथं असते फक्त उन्माद, आवेग, प्रेम, स्पर्श, ती विलक्षण अनुभूती, ती उत्कटता, ती मादकता. तेव्हाच गवसेल तो तृप्तीच्या उत्कटबिंदुचा वरदहस्त. तेव्हाच सजीव होईल त्याच्या डोळ्यात आणी तिच्या देहात ती खजुराहोची शिल्प. तेव्हाच अनुभवता येते तो स्त्री पुरुष मिलनाचा अलौकिक सोहळा. फक्त तिच्यात, फक्त तिच्यातच मिळेल तुला तुझा पुर्ण पुरुष असण्याचा मान. पुरुषोत्तम असल्याचा अभिमान.

सपना

2288. विश्वनाथ

     सदानंद माने एक सामान्य माणूस. डॉक्टरी पथ्याचे लेबल लावून बिनसाखरेचा चहा पिणारा, शेजाऱ्याचे वर्तमानपत्र अगदी सकाळी सकाळी ढापून अथपासून इतीपर्यंत वाचणारा.
सावित्री ही सदानंदांची पत्नी. मला शंभर मुलांनी मागणी घातली; पण नशीबच फुटकं, या सदानंदाशी लग्न केलं, असं दिवसातून दहा वेळा म्हणणारी.
रविवारची सकाळ, घड्याळाचे काटे बरोबर ९० अंशावर. हातात शेजाऱ्याचा ढापलेला पेपर आणि समोर बिनसाखरेचा चहा. 
तेवढ्यात फोन वाजला. नमस्कार सर, मी विश्वनाथ बोलतोय. पुढच्या आठवड्यात माझ्या एका पुस्तकाचे प्रकाशन करायचे आहे आणि त्या कार्यक्रमाला मी तुम्हाला चीफ गेस्ट म्हणून इन्व्हाईट करतोय. पुढच्या रविवारी सकाळी नऊ वाजता मी तुम्हाला रिमाइंड करण्यासाठी फोन करीन असे म्हणत सदानंदांना बोलण्याची कोणतीही संधी न देता विश्वनाथने फोन ठेवला.
सावित्री, अगं पुढच्या आठवड्यात एका कार्यक्रमाला मला चिफ गेस्ट म्हणून बोलावलं आहे, सदानंदांनी सावित्रीबाईंना सांगितले. 
सदा अरे तुला आणि चिफ गेस्ट म्हणून बोलावलंय? माझा नाही विश्वास बसत याच्यावर. कदाचित त्यांना दुसरे कोणी सदानंद माने हवे असतील आणि त्यांनी फोन चुकून तुला लावला असेल, सावित्रीबाईंनी त्यांचा संशय व्यक्त केला. आपल्या माहितीत विश्वनाथ कोण आहे? सदानंदांनी विचार सुरू केला. त्यांच्यापुढे दोन नावं आलीत. एक म्हणजे गुंडप्पा विश्वनाथ, भारताचा माजी क्रिकेटपटू आणि दुसरे म्हणजे त्यांचे काका. 
आता गुंडप्पा विश्वनाथ, ज्याला मी कधीच भेटलो नाही, तो मला कसा बोलवेल त्याच्या पुस्तकाचे प्रकाशन करायला? पहिला विश्वनाथ सदानंदांच्या यादीतून बाद झाला.
सदानंदांनी त्यांच्या विश्वनाथ काकांना फोन लावला. काका, कसे आहात तुम्ही? हल्ली काही लिहिणं वगैरे? सदा, अरे गेले सहा महिने मी अंथरुणाला खिळून आहे. काय लिहिणार मी? दुसरा विश्वनाथ देखील बाद झाला. 
सावित्री म्हणते तेच खरं असावं. सदानंद माने नावाचा कुणीतरी प्रख्यात माणूस असावा आणि नांवातील साधर्म्यामुळेच तो फोन आपल्याला लागला असेल, सदानंदानी चीफ गेस्ट प्रकरण मनातून काढून टाकले.
पुढच्या रविवारी सकाळी बरोबर नऊ वाजता विश्वनाथचा फोन आला, सर मी तुम्हाला घ्यायला संध्याकाळी सहा वाजता गाडी पाठवतो, तुम्ही तयार रहा असे म्हणत विश्वनाथने फोन कट केला. 
माने साहेब जायचं ना तुम्हाला चीफ गेस्ट म्हणून? 
म्हणत सावित्रीबाईंनी चहाचा कप सदानंदांच्या समोर ठेवला. 
सावित्री मला खूप भीती वाटते गं, विश्वनाथच्या मनातील सदानंद माने मी नक्कीच नसणार आणि त्यामुळे माझी फजिती होईल, सदानंद म्हणाले.
सदा, अरे, घाबरू नकोस आणि हो जाताना हे नवीन कपडे घालून जा, बरोबर सहा वाजता गाडी घेणार आहे, तू तयार रहा म्हणत सावित्रीबाईंनी सदानंदांचा आत्मविश्वास वाढविला.
काय वर्णावा आजचा सदानंदांचा रुबाब! सावित्रीबाईंनी दिलेले नवे कोरे कपडे, विश्वनाथने पाठविलेली आलिशान गाडी आणि गणवेशधारी ड्रायव्हर.
सदानंद कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचले. श्रोत्यांनी भरलेला मोठा हॅाल. भले मोठे व्यासपीठ आणि त्या व्यासपीठावरील मधली खुर्ची सदानंदांची. सदानंदांना गरगरल्यासारखे झाले. तोल जाऊन पडू नये म्हणून ते नाईलाजानेच खुर्चीवर बसले. 
सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. सदानंद माने सर यांचे स्वागत करते, एक सुंदर तरुणी बोलत होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वनाथ सरांचे आणि त्यानंतर माने सरांचे भाषण होईल. नंतर माने सरांच्या हातून विश्वनाथ सरांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन होईल आणि त्यानंतर विश्वनाथ सर माने सरांचा सोन्याचे कंगण देऊन सत्कार करतील. विश्वनाथचा चेहरा ओळखीचा वाटत होता पण ओळख अजिबातच लागत नव्हती. विश्वनाथच्या बोलण्यावरून हे स्पष्ट होत होते की विश्वनाथ म्हणजे एक बडी असामी. भरपूर गाड्या, बंगले आणि भारतातच नव्हे तर परदेशात देखील व्यवहार. विश्वनाथला हवा असलेला सदानंद माने मी नक्कीच नाही याची सदानंदांना खात्री पटली. आता माझे आदरस्थान असलेल्या सदानंद माने सरांना मी विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावेत. विश्वनाथच्या या वाक्याने सदानंदांच्या पल्स रेटने  सेंच्युरी तर ब्लड प्रेशरने डबल सेंच्युरी मारली. त्यांना गरगरू लागले. मी एक सांगायला विसरलो, विश्वनाथ म्हणाला. माझ्या करिअरची सुरुवात मी सातारा येथील मोल्डेड लगेज कंपनीतून केली. विश्वनाथच्या या वाक्याने जादू केली आणि सदानंद क्षणात नॉर्मल झालेत. विश्वनाथ अर्थात् विशीची ओळख त्यांना पटली होती.
     विशी साताऱ्या जवळील एका छोट्याशा गावातला. अतिशय हुशार परंतु बिकट आर्थिक परिस्थितीमुळे डिप्लोमा नंतरचे शिक्षण घेऊ न शकलेला. विशी डिप्लोमा केल्यानंतर साताऱ्या जवळील एका मोल्डेड लगेज कंपनीत डिस्पॅच सेक्शन मध्ये कामाला लागला. बरा पगार आणि रोजचा दोन ते तीन तासांचा ओव्हरटाईम असे दुहेरी इनकम त्याला मिळायचे. लग्नानंतर बायकोच्या ओढीमुळे की काय पण विशीचा ओव्हरटाईम मधील रस कमी झाला. सुरुवातीला कधी कधी आई, वडील, बायको आणि स्वतःला आळीपाळीने आजारी पाडून विशीने ओव्हरटाईम पासून स्वतःची सुटका करून घेतली. परंतु हे किती दिवस चालणार? तो विचार करू लागला आणि त्याच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली.  लोडिंग करताना प्रथम लहान आकाराच्या बॅग्स, नंतर मध्यम आकाराच्या बॅग्ज आणि त्यानंतर मोठ्या आकाराच्या बॅग्ज लोड करण्याची त्यांची पद्धत होती. 
विशीच्या मनात आलेली आयडिया अशी होती की, मोठ्या आकाराच्या बॅगमध्ये मध्यम आकाराची बॅग टाकली आणि मध्यम आकाराच्या बॅगमध्ये लहान आकाराची बॅग टाकली तर लोडिंग चा टाईम बराच कमी होईल. आता ही आयडिया राबवायची तर ती मॅनेजर साहेबांना सांगावी लागणार होती आणि विशीची तर मॅनेजर साहेबांकडे जाण्याची हिंमत नव्हती. त्याने ही आयडिया त्याच्या एका सीनियर कलीग मार्फत मॅनेजर साहेबांकडे पोहोचवली. स्वतःची आयडिया म्हणून नव्हे तर विशीची आयडिया म्हणून त्या प्रामाणिक माणसाने सांगितलेली आयडिया मॅनेजर साहेबांना खूप आवडली. 
    यामुळे कंपनीचा दुहेरी फायदा होणार होता. एक म्हणजे डिस्पॅच सेक्शनचा ओव्हरटाईम कमी होणार होता आणि दुसरा म्हणजे कंपनीचा ट्रान्सपोर्टर बरोबरचा कॉन्ट्रॅक्ट हा व्हॉल्युम बेसिसवर होता आणि बॅग मध्ये बॅग टाकल्यामुळे कंपनीची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट मोठ्या प्रमाणात कमी होणार होती. मॅनेजर साहेबांनी विशीची ही आयडिया वरिष्ठांपर्यंत पोहोचवली आणि कंपनीने विशीला ५०००/- रुपयांचे बक्षीस देण्याचे ठरविले. हे बक्षीस एका वेगळ्या पद्धतीने द्यायचे असे एच आर मॅनेजर साहेबांनी ठरविले. 
दुसऱ्या दिवशी सकाळी विशी कंपनीत आला आहे याची खात्री केल्यानंतर पाच हजार रुपये कॅश, आणि प्रशस्तीपत्र घेऊन एच आर ऑफिसर कंपनीच्या गाडीने विशीच्या साताऱ्यापासून साधारणतः १०-१२ किलोमीटर अंतरावर असलेल्या गावी जायला निघाले.  गाडी गावात शिरल्यावर विश्वनाथ मराठेंचे घर कुठे आहे? आपल्याला सांगता येईल का? आम्ही त्यांच्या कंपनीतून आलोय, ड्रायव्हरने चार-पाच मुलांच्या घोळक्याला विचारले. हो साहेब, पण काय झालं?मुलांनी उत्सुकतेने विचारलं. ड्रायव्हरने त्यांच्यापैकी एकाला गाडीत घेतलं, उरलेले मित्र विश्वनाथच्या घराकडे पळालेत. विशीच्या कंपनीतून साहेब लोक आलेत, गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली. अनेक लोक विश्वनाथच्या घराजवळ गोळा झालेत. हे सर्व बघून विश्वनाचे आई-वडील धावत धावत बाहेर आलेत. साहेब काय झालं? आमच्या मुलाने काही चूक केली का?  प्लीज त्याला काही शिक्षा करू नका म्हणून ते साहेबांना विनवू लागले. विश्वनाथच्या बायकोने तर साहेबांचे पायच धरलेत. साहेब, विश्वनाथ ओव्हरटाईम करत नाही ते माझ्यामुळे परंतु मी तुम्हाला वचन देते मी त्याला आडवणार नाही पण तुम्ही त्याला कंपनीतून प्लीज काढू नका.
      नक्कीच विश्वनाथने कंपनीत काहीतरी घोटाळा केला असणार,  जमलेल्या लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. एकंदरीत वातावरण खूपच भावूक झाले होते. एच आर ऑफिसरने पुढे येऊन सांगितले, तुम्ही अजिबात काळजी करू नका. विश्वनाथने कोणताही घोटाळा केलेला नाही उलट त्याने कंपनीला एक अतिशय उपयुक्त सूचना दिली आहे जीच्यामुळे  कंपनीचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि म्हणूनच पाच हजार रुपये कॅश आणि प्रशस्तीपत्र घेऊन आम्ही येथे आलो आहोत असे म्हणत त्यांनी कॅश आणि प्रशस्तीपत्र विश्वनाथच्या आई-वडिलांना सुपुर्द केले. आपणा सर्वांना एक विनंती आहे की या बक्षीसाबद्दल विश्वनाथ घरी येईपर्यंत त्याला काहीही सांगू नका, हे सर्व त्याच्यासाठी आश्चर्यच राहू द्या. संध्याकाळी विश्वनाथ बसमधून उतरला आणि तीन-चार मित्रांना बस स्टैंड वर बघून त्याने विचारले, अरे मित्रांनो कुठे निघाला तुम्ही? विशी अरे तुलाच घ्यायला आलो आम्ही. मला आणि घ्यायला? का? कशासाठी? माझ्या घरी सगळे ठीक आहे ना? विशीने विचारले. विशी तू घरी चल, मग तुला सांगतो. विश्वनाथच्या प्रत्येक प्रश्नाला तेच ते उत्तर,  तू घरी चल मग तुला सांगतो. विश्वनाथला खूप मोठे टेन्शन आले होते. घरापाशी खूप गर्दी जमली होती. आपले आई वडील ठीक असतील ना? आपली बायको ठीक असेल ना?असे अनेक प्रश्न त्याच्या मनात निर्माण झालेत. 
तेवढ्यात विशी आला, विशी आला, कोणीतरी ओरडले. विश्वनाथचे आई वडील आणि बायको बाहेर आलेत. आई-बाबा आणि बायको ठीक आहे मग काय झालं? विश्वनाथला समजत नव्हते.
काय झालं? कोणी मला सांगेल का? विशीने विचारले. कोणीही काहीही बोलत नव्हते. तेवढ्यात शेजारचे साने काका पुढे आलेत आणि त्यांनी सर्व वृत्तांत विशीला  सांगितला. कंपनीने दिलेले इतकं मोठं बक्षीस आणि तेही इतक्या अलौकिक पद्धतीने, विश्वनाथ कृतकृत्य झाला. त्यानंतर विश्वनाथने कंपनीत उत्तरोत्तर प्रगतीच केली. 
आणि त्या दिवशी माझी आयडिया मॅनेजर साहेबांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले होते सदानंद माने सरांनी. आज मी जो काही आहे तो केवळ सदानंद माने सरांमुळेच. दुर्दैवाने एका अपघातामुळे माने सरांनी कंपनी सोडली आणि मी पुढे त्यांच्या मार्गदर्शनाला मुकलो. विश्वनाथाच्या त्या वाक्यामुळे स्वतःला झिरो समजणारे सदानंद माने सर क्षणात हिरो झाले होते, माने सरांची मान ताठ झाली होती. कार्यक्रमाचे चीफ गेस्ट, पुस्तकाचे प्रकाशन आणि त्यानंतर सोन्याचे कंगण, खरोखरच आजचा दिवस सदानंदांचा होता. आपल्या या सत्कारावर सावित्रीचा विश्वास बसेल का? सदानंदांच्या मनात शंका निर्माण झाली. तेवढ्यात विश्वनाथ म्हणाला, सर मी तुम्हाला घरी सोडतो. 
थोड्याच वेळात ते दोघेही सदानंदांच्या घरी पोहोचलेत. सावित्रीने विश्वनाथचे मोठ्या आत्मीयतेने स्वागत केले. सावित्रीने लगबगीने सदा आणि विश्वनाथ यांच्यासाठी चहा आणला, थोडी जास्त साखर टाकलेला. अगं चहात साखर जास्त झाली सदानंद म्हणाले. असू द्या हो, विशीला जरा गोड चहाच आवडतो, सावित्रीबाई म्हणाल्यात. तू विशीला ओळखतेस? आश्चर्याने सदानंदांनी विचारले. सावित्री आणि विश्वनाथ दोघेही गोड हसलेत.
सर, खरं तर खूप वर्षांपासून मी तुम्हाला शोधत होतो. मागच्या महीन्यात वहिनींचा आणि माझ्या बायकोचा परिचय झाला. वहिनी आमच्या घरी आल्यात, त्यांच्याकडून तुमच्याबद्दलची सर्व माहिती मिळाली. आजच्या कार्यक्रमाला चीफ गेस्ट म्हणून तुम्हाला बोलवायचं हे मी वहिनींना सांगितलं, तुम्हाला काहीही न सांगण्याच्या अटीवर. रात्री सदानंदांना छान झोप लागल्यामुळे उठायला थोडा उशीरच झाला. आज शेजाऱ्यांचा पेपर ढापता येणार नाही याची मनात खंत होती. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. चार शेजारी हातात पेपर घेऊन उभे होते आणि प्रत्येक जण सदानंदांना सांगत होता, सर आमचा पेपर घ्या. 
आजच्या पेपर मध्ये फ्रंट पेजवर सदानंद आणि विश्वनाथ यांचा फोटो होता आणि त्याखाली बातमी होती. सदानंद मानेंची विश्वनाथ ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मध्ये जनरल मॅनेजर पदावर नेमणूक, भरपूर पगार, गाडी आणि बंगल्यासह.

2287. पितृपंधरवड्यात कावळा शिवण्याची आपण वाट का पहातो?

 १) गाईला मागुन  नमस्कार का करतात?
२) माणसाच्या १० वा १३ व पितृपंधरवड्यात   कावळेच का यावे लागतात?
 ३) यमुनेच्या तीरी श्राध्द का करतात.का करावे?
    दशरथ महाराजांचे निधन झाले तेव्हां राम, सिता, लक्ष्मण वनवासंत होते. त्यामुळे रामाला आपल्या वडीलाचे कोणतेच कार्य करवयास मिळाले नाही. रावणवध करुन राम राज्यवर बसला तरी सुध्दा रामाने वडीलांचे  केले नव्हते. एकदा राम व सिता जंगलांतु जात असताना एका तळ्यामधे आकाशातुन फारमोठी वस्तु त्या तळ्यात पडते. राम जवळजाउन बघतो तर तो स्वर्गातुन पडलेला य़क्ष असतो. तो रामाला सांगतोकी दशरथ महाराजांना मुक्ती मिळालेली नाही कारण त्याचे क्रियाकर्म व्यवस्थीत झालेले नाही. रामघरी येतो व  वडीलाचे श्राध्द घावयाचे आहे त्याची तयारी करणाची आज्ञा देतो. ही गोष्ट जेव्हां राजपुरोहीताच्या कानावर जाते तव्हां ते पुरोहीत सांगतात की स्वकमाईच्या पैशाने क्रियाकर्म केले तरच महाराजांना मुक्ती मिळेेल. राम व सिता महाराजंचे क्रियाकर्म करण्यासाठी यमुना नदीच्या किनारी येतात. सकाळीराम सितेला जमुना किनारी बसवुन गावांत काही मिळते का बघण्यास जातो. दुपारची बाराचीवेळ होते तरी राम परत येणंयाची कोणतीच चिन्हे दिसत नसतात. मघ्यान्ह टळायला  लागते या चिंतेत, सिता व ब्राम्हण बसलेले असतात त्याच वेळेला नदीतुन दशरथ महारांजांचे दोन्ही हाताची ओजंळ बाहेर येते. सिता म्हणते माझ्ाजवळ देण्याारखे काहीाही नाही. महाराज तिला सांगतात तु ज्याठिकाणी बसी आहेस तेथील वाळु झ्या हतावर दिली तरी चालेल सिता त्याप्रमाणे करते व तातकाळ हात अदृष होतात. त्याच वेळेस राम तिथे येतो व सितेला म्हणतो तु हे काय केलेस, माझ्या वडीलाच्या हातावर वाळु ठेवलीस ति म्हणते असे करण्यास महाराजांनीच सागीतले. ह्याला हा झाडावरचा कावळा, ही गोमाता साक्ष आहे. हे भिक्षुक साक्षआहेत. यमुना माता साक्ष आहे.  राम प्रथम कावळ्याला विचारतो हे खरे आहे का? कावळा भगवान रामा पुढे काहीही न बोलता गुपचुप बसतो. भिक्षुक,गोमाता, यमुना नदीसुध्दा शांत बसते. सर्व काही यांच्चा समोर झालेले असताना सुध्दा रामाच्या भिती पोटी गुपचुप बसतात. सिता संतापते व म्हणते सत्य  माहीत असुन सागायला तुम्ही कचरतात. मला खोटी पाडतात. मी तुम्हा सर्वंना शाप देते. 
कावळ्या तु बाहेरुन तसा आतुन सुध्दा काळा आहेस आज पासुन लोक तुला अवलक्षणी समजतील तुझे दर्शन अपशकुन समजतील. 
गोमाते तु एवढी पवित्र तु पण तशीच, तुला शाप देते तुझ्या पवित्र तोडांने घाण खाशील  तुला लोक अपवित्र समजतील. 
भिक्षुक तु ब्राम्हण असुन सुध्दा असा वागला तु आयुष्य भर भिकारी रहाशील. 
जमुने माते तुझ्या उदरातुन माझ्या ससुरांचे हात आले होते तरी तु गप्प बसली मी तुला शाप देते डाव्या बाजु पर्यंत  व उजव्या बाजु पर्यत माझी नजर पोचेल तीतपर्यत तुझे पात्र केोरडे पडेल.
एवढे सर्व होइ पर्यंत राम शांत बसलेला असतो. सितेने  संतापुन एवढे जळजळीत शाप दिल्याचे  पाहुन रामाला वाटते सितेचे म्हणने खरे आहे. मग तो कावळा, गाय, भिक्षुक व नदीला विचारतात तुम्ही सर्वजण असे का वागलात. चौघे म्हणतात भगवंता तुमच्या समोर आम्ही काय बोलणार म्हणुन आम्ही गप्प बसलो. राम म्हणतो केवळ माझ्यामुळे तुम्हाला शाप मिळाले आहेत ते मी सितेला परत घेण्याची विनंती करतो पण सिता शाप परत घेण्यास साफ नकार देते.शेवटी राम म्हणतो यावर उशाप दे.
◼️ सिता कावळ्याला म्हणते जरी लोक तुला अवलक्षणी समजत असतील  तुझे दर्शन अपशकुन समजतील मी तुला उशाप देते तरी सुध्दा लोक १० ,१३ व व वर्ष श्राध्दाला पितृपंधरवड्यात पितरांच्या नावानी नेवेद्याचे ताट ठेवतील  तुुला आग्रहाचे आमंत्रण देतील,या दिवशी तु जेवल्या शिवाय ते जेवणार नाहीत म्हणुन आपण १० ,१३,  वर्ष श्राध्दाला  व पितृपंधरवड्यात  कावळा शिवण्याची वाट पहातो.
◼️ सिता गाइला  म्हणते जरी तु तोडांनी घाण खाशील .मी तुला उशाप देतेकी तरी सुध्दा लोक तुझी पुजा करतील पण पाठी मागुन. म्हणुन  गाइची पुजा किंवा नमस्कार पाठी मागुन करतो.
◼️ सिता भिक्षुकाला म्हणते  तु आयुष्य भर भिकरी रहाशील पण मी तुला उशाप देते ज्या वेळेस तुझ्या घरांत लग्न वगैरे कार्य निघले त्या वेळेस तुला धर्मकार्याचे काम मिळेल व तुझ्या घरांतले कार्य पुर्ण होइल.
◼️ सिता यमुनेला म्हणते उजव्या व डव्या बाजु पर्यंत माझी नजर पोचते तितपर्यंत तुझे पात्र कोरड्च राहील पण मी तुला उशाप देते की जी लोक तुझ्या तटावर य़ेउन क्रिया कर्म करतील त्यांना परत क्रिया कर्म करण्याची गरज भासयणार नाही.आज  आपण पहातो की यमुना नदीचे पात्र मध्य भागी कोरडे आहे

2286. लिव्ह इन @ नात्यांचा गोंधळ

 1) ती आणि तो गेल्या आठ वर्षांपासून लिव्ह इन मध्ये रहात होते. हळूहळू त्याचं तिच्यावर स्वामित्व गाजवणे सुरू झाले. तो आपली काळजी करतो बघून सुरवातीला तिला ते आवडलंही होतं पण नंतर नंतर मात्र त्याचा होणारा अतिरेक तिला नकोसा झाला. त्यामुळे त्यांच्यात वरचेवर भांडणं  होऊ लागली. शेवटी कंटाळून तिने त्याच्यासोबत ब्रेकअप केलं. आठ वर्षांचा सहवास क्षणात मोडला. कुठलेही कायद्याचे झंझट,पैशांचे देणंघेणं न करता दोघं वेगळी झाली. पटलं तर सोबत रहायचं नाहीतर वेगळे व्हायचे. आजकालच्या तरूणाईमध्ये हा सिंपल फंडा जोर धरू लागलाय.
2) त्या दोघांनी लिव्ह इन मध्ये रहायचे ठरवले या अटीवर की आपण जर एकमेकांच्या पसंतीवर उतरलो तर लग्न करू अन्यथा नाही. दोन वर्ष सोबत राहिले. एकमेकांना समजून घेतले(?) आणि शेवटी लग्न केले. लग्नानंतर मात्र सहा महिन्यांत वेगळे व्हायचा निर्णय घेतला कारण  लग्नानंतर आलेली बंधनं दोघांनाही नको होती. 
3) ती आणि तो एका कार्यक्रमात भेटले. तो तिच्या सौंदर्यावर तर‌ ती त्याच्या गलेलठ्ठ पगारावर भाळली. बंधनात अडकण्या अगोदर आपण सोबत काही महिने रहावे असे ठरले. हा तिचा तिसरा पार्टनर तर ती त्याची चौथी पार्टनर. सात महिने सोबत राहिल्यानंतर दोघांनी वेगळे व्हायचे ठरवले कारण त्याला तिचं इतर पुरुषांसोबत बोलणे आवडायचे नाही तर तिला त्याचे इतर स्त्रियांशी फ्लर्ट करणे आवडायचे नाही. दहा ठिकाणी तोंड मारण्याची लागलेली सवय सोडणे दोघांनाही जमणार नव्हते.
4) दोघेही उच्चशिक्षित. भरगच्च पगार कमावणारे. पाहूनदेखून लग्न करणे म्हणजे आउटडेटेड समजणारे. आईवडिलांपेक्षा आपल्याला जास्त कळते हा टेंभा मिरवणारे. आईवडीलांनी सगळं त्यांच्यावर सोडलं. दोघं सोशल‌ मिडियावर भेटले.ओळख झाल्यावर लिव्ह इन मध्ये आले. ती प्रॅक्टीकल तर तो इमोशनल. एकदम विरोधाभासी समिकरण.  टिकणे अशक्य. झाले ब्रेकअप. ती त्यांच्या भाषेत मुव्ह ऑन झाली तर‌ तो मनातून कोसळला. वर्षभर मनोविकार तज्ञांकडे खेटा घातल्या तेव्हा डोकं जागेवर आलं. आईवडिलांनी शोधून दिलेल्या मुलीसोबत लग्न केलं आज सुखात आहे.
5) दोघे एकाच कंपनीत. ती हसरी, खेळकर, भावनिक तर‌ तो आत्मकेंद्रित आणि मुलखाचा प्रॅक्टीकल. रोज भेटता भेटता एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे काही कमिट करण्याअगोदर आपण चार पाच महिने सोबत राहू असा त्याचा आग्रह तर तिचा त्याला नकार. शेवटी त्याने तिला जळविण्यासाठी ऑफिस मधल्या दुसरी सोबत सुत जमवले. आपण याच्यासोबत लग्न करून आपल्या आयुष्याशीच प्रताडणा केली असती. बरे झाले पहिलेच कळले म्हणून आपण वाचलो तिने मनोमन आपल्यावर झालेल्या संस्कारांचे आभार मानले. ती बदली मागून दुस-या ठिकाणी गेली. आज एका गोजिरवाण्या मुलीची आई आहे.

वैशाली गोस्वामी 

कधी कधी कोणाचा स्वभाव आयुष्यभर त्याच्यासोबत राहूनही कळत नाही मग एकमेकांना समजून घेण्याच्या नावावर लिव्ह इनमध्ये रहाण्याचा जो गोंधळ घातला जात आहे तो कितपत योग्य आहे. 

2285. कारणावाचून काहीच घडत नसतं

 ९/११ च्या हल्ल्यानंतर वर्ल्ड ट्रेड सेंटर मधे कार्यालय असलेल्या एका कंपनीने त्या दिवशीच्या हल्ल्यातून  सुदैवाने वाचलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे अनुभव मनमोकळेपणाने कथन करता यावे यासाठी एक कार्यक्रम आयोजीत केला.
ती माणस सुखरुप असण्यामागची छोटी, छोटी  कारण स्तिमीत करणारी होती. 
*  चिरंजीवांचा बालवाडीतील पहिला दिवस असल्यामुळे त्या कंपनीचा प्रमुख त्या दिवशी उशिरा आला होता.
*  एका रस्ते अपघातामुळे झालेल्या प्रदीर्घ ट्रॅफिक जाम मधे अडकून एक जण उशिरा आला होता.
*  एका महाशयांची नेहमिची बस चुकली होती.
*  कार्यालयात यायला निघाले, आणि कार स्टार्टच होईना, असे एकाच्या बाबतीत घडले.
*  एक सदगृहस्थ इमारतीत प्रवेश करतानाच फोनची बेल वाजली.  बोलण्यासाठी बाहेर थांबले, त्यामुळे त्यांना उशिर झाला.
*  एक सकाळी सकाळीच बाप झाला.
*  एकाला त्यादिवशी लवकर टॅक्सीच मिळाली नाही.
*  आणि सगळ्यात मजेदार वाटावी अशी गोष्ट म्हणजे एकाने त्या दिवशी नवीन कोरे बुट पायात घातले.  त्याच्या एका पायाला नवीन बुट चावला म्हणून तो बॅंड एड पट्टी घ्यायला औषधांच्या दुकानात थांबला आणि म्हणून तो आज जीवंत होता. 
तेव्हापासून जेव्हा मी रहदारीत अडकतो ;
माझी लिफ्टची फेरी चुकते ;
फोन घेण्यात माझा वेळ जातो ;
आणि अशा अनेक गोष्टी जेव्हा मला अस्वस्थ करतात तेव्हा मी एकच विचार करतो तो म्हणजे...
"बेटा, तु या क्षणी जिथे असायला हवा त्या योग्य जागीच आहेस...!!"
ह्या नंतर कधी एखाद्या सकाळी तुमच्या तयारीत घोळ झाला असेल, मुल शाळेचा गणवेश घालायला त्रास देत असतील, वेळेवर कारची किल्ली सापडत नसेल, रस्त्यात सगळे सिग्नल लाल भेटत गेले असतील....
तर रागावू नका,
त्रागा करु नका...
ध्यानात ठेवा....
तुम्ही योग्य वेळी योग्य जागी आहात..!!
     एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात कितीही वाईट प्रसंग अथवा घटना घडू दे, जर तुम्ही त्यावेळी तुमचा दृष्टिकोन चांगला ठेवला तर तुमचे चांगलेच होणार. मग तुमचे वाईट चिंतणाऱ्यांना कितीही वाईट वाटू दे अथवा तुमचे पाय ओढणाऱ्यांना कितीही पाय ओढू देत, तुमच्यावर त्याचा काहीही परिणाम होऊ शकणार नाही. कारण तुम्ही परिस्थितीने आणि अनुभवाच्या प्रसंगाने भक्कम झालेले असता. 

2284. थ्रिल

 ऑफिसमधून घरी येतांना कोपऱ्यावरच्या पानटपरीवरुन मी वळलो तेव्हा सुऱ्या मला तिथे उभा असलेला दिसला. मी गाडी थांबवली आणि त्याच्याकडे गेलो. त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं.
"काय सुऱ्या कसं काय चाललंय?"
मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हंटलं तसा सुरेश उर्फ सुऱ्या एकदम गडबडला. हातातली सिगरेट त्याने पाठीमागे लपवली. मला त्याच्याकडे बघून एकदम गंमत वाटली. टाईट जिन्सची फाटलेली पँट, इन केलेला लालभडक शर्ट, डोळ्यावर काळा सडकछाप गाॅगल. टपोरी व्याख्येला एकदम साजेसा होता त्याचा अवतार.
"नको लपवू सिगरेट. मी पाहिलंय तुला पितांना." मी म्हंटलं तशी त्याने हातातली सिगरेट दूर फेकून दिली आणि माझ्याकडे ओशाळवाणं हसून म्हणाला.
"साॅरी प्रशांतदादा.प्लिज घरी सांगू नका ना."
" नाही सांगणार." 
मी असं म्हंटल्यावर तो कसंनुसं हसला. पण मग त्याने खिशातून विमल गुटख्याची पुडी काढली आणि फाडून तोंडात पुर्ण रिकामी केली.
"अरे काय हे सुऱ्या? सिगरेट झाली, आता गुटखा? कशाला करतो हे सगळं? मधूकाकांना कळलं तर किती वाईट वाटेल त्यांना !"
" थ्रिल ! थ्रिल असतं त्यात दादा. तुम्हांला नाही कळणार त्यातलं !"
"हे असलं थ्रिल काय कामाचं? शरीराची नासाडी करणारं ? तुला असली थ्रिल अनुभवायचंय?"
"असली थ्रिल?? ते काय असतं? दारु पिणं तर नाही ना? ते असेल तर आपल्याला माहितेय ! सगळ्या प्रकारची दारु प्यायलोय दादा आपण. गांजा, अफू सगळं झालंय आपलं."
तो ज्या अभिमानाने सांगत होता ते पाहून मला धक्काच बसला. मधूकाका म्हणत होते ते खरंच होतं. पोरगं वाया गेलं होतं.
"नाही त्यापेक्षा वेगळं आहे. तू शनिवारी संध्याकाळी मला घरी येऊन भेट मी सांगेन तुला."
" बरं दादा तुम्ही म्हणता तर येतो."
मी निघालो पण घरी येईपर्यंत सुऱ्याचेच विचार डोक्यात होते. सुऱ्याचे वडिल ज्यांना आम्ही मधूकाका म्हणायचो, माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये शिपाई होते. वडिलांची आणि त्यांची चांगली घसट. सुऱ्या त्यांचा धाकटा आणि लाडाचा मुलगा. इनमीन अठरा वर्षाचा. अति लाड आणि वाईट संगतीमुळे तो बिघडला. काॅप्या करुन  दहावीत कसाबसा पास झाला पण बारावीत त्याची गाडी अडकली. ऑक्टोबरमध्येही नापास झाल्याने त्याचं अभ्यासावरचं लक्ष उडालं. दिवसभर पानाच्या टपऱ्यावर सिगरेट पित, गुटखे खात, येणाऱ्या जाणाऱ्या पोरींची छेड काढण्यात त्याचा दिवस पार पडायचा. त्याला समजावण्याचे सगळे प्रयत्न त्याने हाणून पाडले होते. कुणी समजावलं की तो एका कानाने शांततेने ऐकायचा आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा. या व्यसनांना पैसा हवा म्हणून तो स्वतःच्या घरातही चोऱ्या करायचा असं ऐकण्यात आलं होतं.
    दोनतीन दिवस सुऱ्याला काय थ्रिल असलेलं काम सांगावं या विचारात असतांनाच एकदिवस मधूकाका घरी आले. सुऱ्याने एका पोरीवरुन कुठंतरी माऱ्यामाऱ्या केल्या होत्या. पोलिसांनी त्याला पकडून नेलं होतं.
"तुमच्या पोलिसखात्यात खुप ओळखी आहेत. सुऱ्याला सोडवा साहेब." अशी ते वडिलांना विनवणी करत होते. सुऱ्याच्या या नेहमीच्याच भानगडी होत्या म्हणून वडिल नाही म्हणत होते. मग मीही वडिलांना आग्रह धरला. सुऱ्याच्या चांगल्या वर्तणूकीची ग्वाही दिली. शेवटी वडिलांनी सुऱ्याला सोडवून आणलं. शनिवारी सुऱ्या मला भेटायला आला.
"काय दादा कसलं थ्रिल सांगणार होते तुम्ही मला?"
"तुझ्याकडे सायकल आहे ना? तिच्यात हवा भर, ऑईलिंग कर. उद्या आपल्याला अजिंठ्याला जायचंय सायकलने"
तो एकदम चमकला
" काय?सायकलने? आणि अजिंठ्याला? काय चेष्टा करता दादा? आजकाल कुणी सायकल चालवतं का? आणि तेही इतक्या दूर? त्यापेक्षा बाईकने जाऊ ना"
"काय सुऱ्या ! कसा रे तू इतका लेचापेचा? बाईकने जाण्यात कसलं आलं थ्रिल? तसं तर कुणीही जाऊ शकतं.आणि तुझ्यापेक्षा आमच्या काॅलेजच्या मुली चांगल्या ! पाच मुली आणि पाच मुलंही येणार आहेत आपल्या सोबत." 
ही मात्रा बरोबर लागू पडली. मुली आपल्यापेक्षा वरचढ आहेत हे सुऱ्याला कदापिही सहन होणार नव्हतं.
"बरं येतो मी. पण मला जमेल का दादा?"
तो जरा अनिच्छेनेच म्हणाला.
"मुलींना जमू शकतं तर तुला का नाही जमणार?"
तो तोंड वाकडं करुनच गेला. रविवारी पहाटेच आम्ही निघालो. सुऱ्याच्या पँटचे खिसे सिगरेट्स आणि गुटख्याच्या पुड्यांनी भरलेले आहेत हे माझ्या लक्षात आलं. मी त्या मुलामुलींना अगोदरच सुऱ्याबद्दलची सर्व कल्पना देऊन ठेवली होती. मात्र प्रत्यक्षात मी सुऱ्याची ओळख सामाजिक कार्यकर्ता अशी करुन दिली. सुऱ्या खुष झाला. खरं तर माझ्यासोबतची मुलं सायकलिंग एक्सपर्ट होती. त्यांच्या सायकलीही महागड्या पण वजनाने हलक्या आणि चांगल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या वेगाने चालवणं सुऱ्याला जड जाऊ लागलं. तो मागे पडू लागला की मी त्याला हळूच म्हणायचो "बघ तू सिगरेट पितोस ना त्याचे परिणाम आहेत हे "त्याला ते पटायचं. त्याचबरोबर " मुलींसमोर गुटखा खाऊ नको त्या तुझा तिरस्कार करतील. पुन्हा कधी ट्रिपला तुझ्यासोबत येणार नाहीत."असं सांगून मी त्याला गुटख्यापासून लांब ठेवत होतो.
रात्री आम्ही परतलो तेव्हा सुऱ्या जाम थकून गेला होता. आधी ठरवून दिल्याप्रमाणे सगळ्या मुलामुलींनी "साधी सायकल असूनही तू खुप चांगली सायकल चालवली. काय स्टॅमिना आहे यार तुझा !" असं म्हंटल्यावर सुऱ्या चांगलाच खुष झाला. सगळे गेल्यावर मला म्हणाला
"मजा आली दादा. काहीतरी वेगळंच थ्रिल होतं यात. पुन्हा काही असं असेल तर जरुर सांगा "
" अरे हीच मुलं पुढच्या महिन्यात अष्टविनायक यात्रेला जाताहेत सायकलने. जायचं का तुला?"
" दादा जायची तर खुप इच्छा आहे पण खुप खर्च येईल ना !"
" काही नाही फक्त ४-५ हजार रुपये. तू जमव काही. उरलेले मी देईन तुला"
"धन्यवाद दादा."
" ते सोड. एक गोष्ट मात्र लक्षात ठेव तिथंही तुला दारु, सिगरेट पिता येणार नाही. गुटखा खाता येणार नाही. मुलींसमोर तुझी इमेज खराब करु नकोस."
"तुमची शपथ दादा. मी हातही लावणार नाही" तो गळ्याला हात लावत म्हणाला.
     पुढच्या महिन्यात सुऱ्या अष्टविनायक यात्रेला गेला. त्याअगोदर मी या सायकल सफरीची बातमी आणि सहभागी तरुणांचे फोटो वर्तमानपत्रात दिले होते .आपलं नांव आणि फोटो पेपरमध्ये पाहून सुऱ्याला आनंदाचं उधाण आलं. आपल्या सगळ्या टपोरी मित्रांना ते तो दाखवत सुटला. 
 अष्टविनायक सफर करुन परत आल्यावर सुऱ्या मला भेटायला आला. जाम खुष होता. किती सांगू किती नाही असं त्याला झालं होतं. सुसंस्कृत मुलामुलींमध्ये राहिल्यामुळे त्याच्या वागणूकीत प्रचंड फरक पडला होता. बोलण्यात, वागण्यात सभ्यपणा आला होता.
" दादा आता यापुढे काय करायचं?"उत्साहानं त्यानं विचारलं.
" यापेक्षाही चांगलं थ्रिल तुला पाहिजे असेल तर तुला हिमालयात ट्रेकिंगला जावं लागेल"
" ट्रेकिंग? काय असतं हे?"
मी त्याला सविस्तर सांगितलं. राॅक क्लायंबिंग आणि रॅपलिंगचीही माहिती दिली. तो रोमांचित झाला
"पण याकरीता खुप पैसा लागतो. त्याच्यासाठी तुलाच काम करुन तो जमवावा लागेल."
" कोणतंही काम सांगा दादा. मी काहीही काम करायला तयार आहे"
" माझे एक वकील मित्र आहेत. त्यांना ऑफिसकामासाठी एका मुलाची गरज आहे. तू जाशील? महिन्याला पाच हजार देतील ते."
" जाईन दादा.असाही टपोरीगिरी करण्यापेक्षा पैसे कमवले तर घरचेही खुष रहातील."
" हो पण तिथे गेल्यावर असं तोंडात गुटखा ठेवून काम नाही करता येणार. नाहितर ते वकीलसाहेब पहिल्याच दिवशी तुला हाकलून देतील."
" नाही दादा. ड्युटी संपल्यावरच मी गुटखा खाईन "
 सुऱ्या देशमुख वकीलांकडे जायला लागला. देशमुख वकील खुप हुशार, इमानदार पण कडक स्वभावाचे होते. सुऱ्याचं आयुष्यच तिथे बदलणार होतं.
     ५-६ महिने काम करुन पैसे जमवल्यावर मी सुऱ्याला ट्रेकिंगला हिमालयात पाठवलं. तिथलं साहस, निसर्गसौंदर्य पाहून तो वेगळी दृष्टी घेऊनच परत आला. आयुष्यातलं खरं थ्रिल पाहून तो दारु, सिगरेटमधलं थ्रिल विसरला. आमची भेट झाल्यावर ट्रेक पुर्ण केल्याचं सर्टिफिकेट दाखवत तो मला म्हणाला.
"प्रशांतदादा खुप छान वाटलं. सगळे माझं कौतुक करताहेत. आता आयुष्यात काहीतरी असंच वेगळं करत रहावं असं वाटतंय पण काहीच सुचत नाहीये."
"सुऱ्या अरे तू रोज देशमुख वकीलांकडे जातो. निरपराधी लोकांना गुन्ह्यातून सोडवणं, न्याय मिळवून देणं आणि अपराधी लोकांना सजा देणं हे काम ते नेहमीच करत असतात. त्यात तुला थ्रिल वाटत नाही का?"
त्याचा चेहरा उजळला
" हो वाटतं ना ! पण माझा त्याच्याशी काय संबंध?"
"सुऱ्या अरे तू वकील झालास तर हे थ्रिल तुला स्वतःला अनुभवता येईल."
त्याचा चेहरा गोंधळलेला आणि केविलवाणा दिसू लागला.
"दादा मी आणि वकील...?"
"हो सुऱ्या. काहिच कठीण नाही. तू मनावर घेतलं तर तेही होईल. पण त्याअगोदर तुला बारावी पास व्हावं लागेल."
"बघतो दादा. विचार करतो"
गोंधळलेल्या अवस्थेतच तो गेला. बारावीच्या परीक्षा जवळच होत्या. मी त्याला फाॅर्म भरायला लावला. त्याने परीक्षा मात्र मनापासून दिली. निकाल लागला. आश्चर्य म्हणजे सुऱ्या चांगल्या मार्कांनी पास झाला. सुऱ्याच काय त्याच्या कुटुंबातले सर्वच जण आनंदले. सुऱ्याला मी लाॅ काॅलेजला प्रवेश घेऊन दिला. सुऱ्या देशमुख वकीलांकडे काम करता करता काॅलेजातही जाऊ लागला.
      या घटनेला आता पाच वर्ष  होऊन गेली होती. मी माझ्या विश्वात रमलो होतो. दरम्यान माझंही लग्न झालं. दीड वर्षात मुलगीही झाली. सुऱ्याची आणि माझी भेट आता क्वचितच होत होती. अर्थात देशमुख वकीलांकडून मला सुऱ्या चांगलं काम करत असल्याचं कळत होतंच. अधूनमधून मधूकाकाही येऊन सुऱ्याची ख्यालीखुशाली कळवत होते. पोरगा चांगल्या लाईनला लागला म्हणायचे. त्याचं गुटखा खाणं आणि दारु पिणं बंद झाल्याचं ते आनंदाने सांगायचे.एका बापाला मुलाकडून अजून काय हवं असतं?
  एक दिवस संध्याकाळी मोबाईल वाजला.सुऱ्या बोलत होता.
"प्रशांतदादा घरी आहात का? येऊ का भेटायला?"
"का रे काही प्राॅब्लेम?"
" नाही दादा. प्राॅब्लेम नाही. गुड न्युज आहे. मी वकील झालो. मला सनद मिळाली."
"वा वा सुऱ्या ग्रेट आणि काॅग्रॅट्स् !ये लवकर मी वाट पहातोय."
तो वकील झाल्याचा मलाच खुप आनंद झाला. आनंदाने डोळे भरुन आले. संध्याकाळी मधूकाकांसोबत तो आला. आल्याआल्या माझे पाय त्याने धरले. मी त्याला उचलून जवळ घेतलं तर ढसाढसा रडायला लागला.
"दादा तुमच्यामुळे हे सगळं होऊ शकलं. तुम्ही दिशा दाखवली नसती तर आजही मी तसाच टपोरी राहीलो असतो."
"अरे मी काहीच केलं नाही सुऱ्या ! मी फक्त तुला आयुष्यातलं खरं थ्रिल काय असतं ते दाखवून दिलं. तू मनाने चांगला होताच फक्त संगतीने बिघडला होतास. तू मेहनत घेतली, कष्ट करुन शिकलास. बघ त्याचे किती चांगले परिणाम झाले."
"खरंय दादा"
त्याने डोळे पुसत पुसत मला पेढा दिला.
"आता सुऱ्या मला तुझ्याकडून एकच अपेक्षा आहे. तुझ्यासारखे अनेक तरुण, त्यात तुझे काही मित्रही असतील, व्यसनांना थ्रिल समजुन वाया जाताहेत. त्यांना योग्य मार्गावर आणायचं काम तुला करायचं आहे."सुऱ्याने माझ्याकडे विश्वासाने पाहिलं आणि म्हणाला
"नक्की दादा. आजपासूनच त्याची सुरुवात करतो"
तो गेला आणि अशा बिघडलेल्या मुलांना सुधारण्यातही एक वेगळंच थ्रिल असतं याची जाणीव मला झाली.

© दीपक तांबोळी
    9209763049

शनिवार, १३ सप्टेंबर, २०२५

2283. सक्सेस, कामयाबी

"कामयाब होने के लिए 'Comfort Zone' छोड़ना पड़ता हैं।"
काल VLCC Femina Miss India runners up ( 2020) चा 'Interview' बघत होते. मान्या सिंग तिचे नाव. या आधी तिची ओळख म्हणजे एका ऑटो रिक्षा चालकाची मुलगी, अशी होती. खास ओळख नव्हतीच. आपल्या सारख्या सामान्य 'status' च्या लोकांना काही जणच ओळखतात. त्यांच्या आजूबाजूला राहणारे किंवा त्यांचे नातेवाईक. बाहेरच्या जगात त्यांना मान मिळतोच असं नाही. परंतु टिंगल उडविणारे लोक खूप असतात. आपल्या चौकटीतून बाहेर निघायची जणू काही त्यांना परवानगीच नसते. थोडं काही वेगळं केलं की लगेच बोलणाऱ्यांचे आक्रमण होते. कुठे काही तरी मोठी इच्छा बोलून दाखवायचाच अवकाश, की लगेच पाय ओढणारे एकत्र होतात. बाहेरचे‌ व‌ घरचे पण. बाहेरचे तर जणू काही आपला जन्मसिद्ध  हक्कच समजतात.
     'असं कसं शक्य आहे ? एवढी मोठी झेप घ्यायची लायकी/ऐपत तरी आहे का‌??" एखाद्याला आपल्या चौकटीतून बाहेर निघायचा प्रयत्न करताना बघीतले की आजूबाजूच्या माणसांचा 'ego hurt' होतो. 
"आपली क्षमता समजावी. चादर बघून पाय पसरावे. स्वप्न बघावे पण काय ?? आणि किती झेपेल ?? तेही बघून घ्यावे. वेड बीड लागलंय की काय ??".....
म्हणजे आपला 'ego' शांत करायला काही ही बोलायला ‌सर्व तयारच असतात.
माझ्या जवळ सर्व असुनही, मी तेथेच उभी आहे. आणि काही ही नसताना ही कशी काय माझ्या पूढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे ?? असा विचार करणारे शोधून तर बघा, एक नाही, शंभर मिळतील. कौतुक, सपोर्ट तर खूप दूरची गोष्ट आहे. साथ, प्रोत्साहन देणे पण जमत नाही.. कौतुक खूप छोटा शब्द असला तरी कौतुक करायला मन खूप मोठं लागत. जे खूप कमी जणांजवळ असतं.
स्वतः आपल्या चौकटीतून बाहेर निघायचे नाही व कोणी प्रयत्न केला तर ते सहन होत नाही. घरचे, आपली सांपत्तिक स्थिती, परिस्थिती बघून आपल्या मुलीला पूढे काय काय अडचणी येऊ शकतात ???ती ते सहन करू शकेल का ? आपल्या गरीबीचा लोक मजाक उडवतील. श्रीमंत लोकांच्यात आपल्याला कोण विचारेल ??? या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्या अनुभवांवरून, सावधगिरी बाळगावी असे समजून, घरचे कसं जमेल तुला ?? अशी काळजी व विचार करत असावेत.
      मान्या कडे पण हेच झाले. तिची आई म्हणालीच... 
"अपनी चद्दर देख के पैर फैलाने चाहिए। नहीं तो पैरोंको ठंड लगेगी।"...
यावर मान्या ने दिलेले उत्तर, "पैरों को ठंड लगेगी तो, चद्दर अपने आप बड़ी हो जाएगी।"
दिवसभर 'audition' द्यायचे. तेथेच इतर मुलींना बघून शिकायचे. रात्री कॉल सेंटर मधे काम करायचे. ते सर्व करत असताना आपले स्वप्न जिवंत ठेवायचे. ते पूर्ण करायला धडपडायचे. मान्याचे कौतुक असे की तिला तिच्यात काय आहे ??? हे माहीत होते. बहुतेक तेवढे पूरे होते, तिला आपले स्वप्न पूर्ण करायला. तिला स्वतः चा मार्ग शोधायचा होता. तिचे ध्येय तिला गाठायचे होते. रस्ता कठीण होता.
म्हणतात ना. "रस्ता कठीण असला, रस्त्यावर काटे, दगड असले, तर आपली पावले भरभर पडतात. काटेरी रस्त्यावर उन्हाचे ही खूप महत्व आहे." ध्येयाकडे वाटचाल करणारे लोक आपल्या मेहनतीचा वेग एवढा वाढवतात की रस्त्यात येणाऱ्या अडचणी केंव्हा येतात ??? आणि जातात???? हे त्यांना लक्षातही येत नाही.
असेच होते  मान्याचे. मान्याचे कौतुक याकरिता की तिने तिच्या रेंजच्या बाहेर चे खूप मोठे स्वप्न बघायचे धाडस केले. ते स्वप्न बघण्यात येणाऱ्या अडचणींकडे दुर्लक्ष केले. माझ्या जवळ काय नाही ??, त्यापेक्षा माझ्या जवळ काय आहे??? मी काय करू शकते ??? यावर तिने लक्ष केंद्रित केले. तिचा प्रवास सोपा नक्कीच नसेल. कारण जे क्षेत्र तिने निवडले होते तेथे वेगळ्याच प्रकारचे ट्रेनिंग लागते. एक 'grace' असावी लागते. येथे 'Brain With Beauty' ची परीक्षा असते. 'Stylish English 'बोलणे यावे लागते. उठणे, बसणे, चालणे, सर्वच शिकावे लागते. थोडक्यात हे सर्व मोठ्या श्रीमंत पैसेवाल्या लोकांचे शौक असतात असा सर्वसाधारण माणसांचा समज आहे. एक रूप सोडले तर बाकी सर्व तिला शिकायचे होते. तेही पैसे नसताना....
     कितीदा तरी तिचा अपमान झाला असेल. कितीदा तरी तुच्छतेने, उपहासाने तिच्या कडे बघीतले गेले असेल. त्या 'so called high status fashionable', फर्राटेदार इंग्लिश बोलणाऱ्या मुलींमध्ये तिचा जीव घाबरला असेल. असं खूप काही झालं असेल, जे सहन करायला धाडस लागतं. खरं तर अशा लोकांचे आपल्या ध्येयापूढे, या गोष्टींकडे लक्षच जात नाही. ते आपली एनर्जी व वेळ वाया घालवीत नाहीत. हे सर्व ते स्वतःच शिकतात. स्वकर्तृत्वाने प्रत्त्येक गोष्ट मिळवतात. मान्या  म्हणजे, "एक बार मैंने ठान ली, तो मैं अपने आप की भी नहीं सुनतीं" असं व्यक्तिमत्व असावं.
     साधारण समज, वय व संकल्प एकाच वेळेस हातात हात घालून एकत्र फिरताना दिसत नाही. पण मान्या नशीबवान आहे तिला सर्व गोष्टी एकाच वेळेस मिळाल्या व तिने त्याचे सोने केले. आज मान्या ने मिडिलक्लास मुलांसमोर एक उदाहरण सेट केले. आदर्श ठेवला. प्रोत्साहन दिले. मोठी स्वप्न बघणे फक्त श्रीमंत लोकांचाच अधिकार आहे हा गैरसमज दूर केला. मेहनत, आत्मविश्वासाच्या जोरावर कोणी ही गरूडझेप घेऊ शकतो.
     आजकाल अशी बरीच उदाहरणे समाजात दिसतात. भाजी विक्रेत्याचा मुलगा IAS झाला. पोलिस हवालदार ची मुलगी IPS officer झाली. वडिलांच्या जागेवर बस कंडक्टर ची नोकरी करणाऱ्या आईचा मुलगा इंडियन क्रिकेट टीम मधे सिलेक्ट झाला, वगैरे वगैरे. हा बदल कौतुकास्पद आहे. प्रगतीची नवीन चाहूल लागली आहे. सर्व साधारण माणसाचा आत्मविश्वास जागृत झाला आहे. ही एक प्रकारची क्रांति आहे. लोकांमधे इच्छा शक्ती जागृत झाली आहे. आपल्या चौकटीतून बाहेर पडायला तो तयार झाला आहे. हा एक चांगला संकेत आहे.
      सर्व सामान्य परिस्थितीतून बाहेर निघून प्रगती करणे कौतुकास्पद आहे. आपला दर्जा वाढविणे आपल्या हातात असतं. त्याकरिता खंबीर मन असावं लागतं. किती ही सर्वगुणसंपन्न असले तरी आत्मविश्वास हा सर्वात मोठा गुण आहे. मी काय आहे ??? आणि मी काय करू शकतो ???? यातील अंतर ज्याला समजलं, गपॅ भरता आली, तो पूढे वाढतो. मान्या म्हणजे 'self made' व्यक्तिमत्त्व. ज्या दिवशी तिला Miss India Runners up चा Crown मिळाला, तो सोहळा तिच्या घरच्यांनी घरी TV नसल्याने मोबाईल वर बघीतला. ही मुलं म्हणजे "Real Life Real Hero' आहेत. यांच्यात काय विशेष आहे ??...
    त्यांना कळलंय, "कामयाब होने के लिये अपना 'Comfort Zone' छोडना पडता हैं। आपल्या घरट्यातून बाहेर निघणे गरजेचे आहे‌"
"I can do it " हा आत्मविश्वास  वाढला आहे....
Well done मान्या, धन्यवाद..
You have set an example for  others....
म्हणतात ना.... Success is not free, It comes at cost.

© ® संध्या बेडेकर.
वारजे, पुणे, 7507340231

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...