भाद्रपद कृष्ण पक्ष हा पितृपक्ष म्हणून समजला जातो. आपल्या पितरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण वर्षामध्ये हे पंधरा दिवस राखून ठेवलेले असतात. आपल्या मृत आप्तेष्टांचे आत्मे या पंधरा दिवसात पृथ्वीलोकात येतात अशी श्रद्धा आहे. म्हणून भाद्रपद कृष्ण पक्षाला पितृपक्ष असे म्हटले जाते. पितृपक्षाचा हा काल वाईट असतो हा एक गैरसमज आहे. आपल्या पूर्वजांचे आत्मे जर या दिवसात पृथ्वीतलावर येत असतील तर पितृपक्षाचा हा काल वाईट कसा असेल ? हा, जर ती माणसे जिवंत असतांना आपण त्यांचा नीट सांभाळ केला नसेल , त्यांना त्रास दिला असेल तर मात्र त्यांचे आत्मे पृथ्वीलोकात आल्यामुळे त्यांची भीती वाटणे साहजिकच आहे. पण जर जिवंतपणी आपण त्यांचा नीट सांभाळ केला असेल, त्यांना त्रास दिला नसेल तर पितरांचे आत्मे पृथ्वीलोकात आल्यामुळे आपणास आनंदच वाटायला पाहिजे नाही का ? म्हणून मी म्हणतो की पितृपक्ष वाईट नसतो. अशुभ नसतो. हे पंधरा दिवस खास श्रद्धेने पितरांचे स्मरण करण्यासाठी राखून ठेवल्यानेच इतर कोणतीही कार्ये या पंधरा दिवसात करू नयेत असे सांगण्यात आले असावे.
श्राद्धकर्म करण्यासाठी अपराण्ह काळाला विशेष महत्त्व आहे. अपराण्हकाळ म्हणजे दिनमानाला (म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या) कालाला पाच या संख्येने भागावे. जे पाच भाग येतील, त्या पहिल्या भागाला प्रात:काळ, दुसर्या भागाला संगवकाळ, तिसर्या भागाला मध्यान्हकाळ, चौथ्या भागाला अपराण्हकाळ आणि पाचव्या भागाला सायंकाळ असे म्हणतात. यावर्षी बुधवार, दि. २ सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमा सकाळी १० वाजून ५१ मिनिटांनी संपते. नंतर भाद्रपद कृष्ष्ण प्रतिपदा सुरू होते. या दिवशी अपराण्हकाळी भाद्रपद कृष्ण प्रतिपदा असल्याने प्रतिपदेचा महालय याच दिवशी करावयाचा आहे. सुलभ भाषेत सांगायचे तर त्या दिवशी अपराण्हकाळी जी तिथी असेल त्या तिथीचे श्राद्ध त्या दिवशी करावयाचे आहे. मग त्यादिवशी सूर्योदयाला कोणती तिथी आहे हे पाहण्याचे कारण नाही. सूर्योदयकालीन तिथीचा श्राद्धतिथी निर्णयाशी काहीही संबंध नाही.
श्राद्ध हे श्रद्धेने करावयाचे आहे. ते कसे करावयाचे हे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतू मूळ हेतू पूर्वजांची आठवण काढून त्यांच्याविषयी आदर व कृतज्ञता व्यक्त करणे हा आहे. श्राद्ध भीतीने करावयाचे नसते. ते प्रेमानेच करावयाचे असते. श्रद्धापूर्वक करावयाचे आहे.
आत्मा म्हणजे काय ?
आत्मा म्हणजे चैतन्य ! ईश्वर म्हणजेच चैतन्य ! हे चैतन्य चराचरात भरलेले आहे. सुलभ भाषेत सांगायचे तर मुंगी चालते आहे. ती जर चिरडली गेली तर त्यातून काय निघून गेले तेच चैतन्य ! जिवंत माणूस वजा मृत माणूस काय निघून गेले, तेच चैतन्य ! तोच आत्मा ! आत्मा- चैतन्य हे निराकार, निर्गुण असते. सामान्य माणसाला निराकार - निर्गुण चैतन्याची पूजा करणे कठीण असते म्हणून प्रतिकरूपी साकार सगुण मूर्तीची आपण पूजा करीत असतो. माणूस त्याच्यामध्ये आत्मा-चैतन्य असेपर्यंत माणूस म्हणून त्याच्या नावाने ओळखला जातो. त्याच्या शरीरातून आत्मा - चैतन्य निघून गेले की मग ते ‘ पार्थिव - बाॅडी ‘ म्हणून ओळखले जाते. माणसाचा आत्मा-चैतन्य सृष्टीतील चैतन्यात विलीन झाला की मृत माणसाच्या आत्म्याला सद् गती मिळाली असे समजले जाते. म्हणूनच माणूस मृत झाल्याचे ऐकल्यावर आपण ‘ मृताच्या आत्म्यास सद् गती लाभो ‘ अशी प्रार्थना करतो. माणसाने आयुष्यात वाईट काम केले असेल तर मृत झाल्यावर त्याच्या आत्म्याला सद् गती मिळत नाही अशीही श्रद्धा आहे. सर्व माणसांनी जिवंत असतांना चांगले कार्य करावे, माणसाने माणसांशी व निसर्गाशी माणसासारखे वागावे हा त्यामागचा हेतू असावा. भाद्रपद कृष्ण पक्षात, शरद ऋतूमध्ये शेतातील धान्य घरात येते. पहिल्या धान्याचा नैवेद्य आपल्या पूर्वजांच्या आणि सृष्टीतील चैतन्याच्या रूपामध्ये असलेल्या आत्म्यांना श्राद्धाच्या रूपाने अर्पण केला जातो. कावळा आत्मा- चैतन्य पटकन दिसते अशी श्रद्धा आहे. माणूस मृत झाल्यावर भाताचा पिंड करतात. मृत माणसाचा आत्मा जर त्या पिंडामध्ये असला तर तो कावळ्यालाच दिसतो. त्यामुळे कावळा पिंडाला स्पर्श करीत नाही. पण जर मृत माणसाच्या आत्म्याला सद् गती मिळाली असेल तर तेथे आत्मा दिसत नसल्यामुळे कावळा त्या पिंडाला स्पर्श करतो. कारण कावळ्याला तेथे फक्त भाताचाच गोळा दिसतो. (ही सर्व श्रद्धा आहे. विज्ञान नाही.) पितृपक्षामध्ये कावळ्याने जर आपण ठेवलेले अन्न खाल्ले तर आपल्या मृत व्यक्तीच्या आत्म्याला सद् गती मिळाली आहे असे समजले जाते. माणूस हा श्रद्धाळू असतो. माता-पिता जिवंत असतांना मुले कदाचित त्यांना घाबरत नसतील, पण तेच मरण पावल्यानंतर त्यांचा आत्मा आपणास त्रास देईल याची भीती जास्त वाटत असते. पण आपले माता-पिता जिवंत असतांना जर आपण त्यांचा मान राखला असेल, त्यांचा नीट सांभाळ केला असेल, त्यांची नीट सेवा केली असेल तर मग घाबरण्याचे कारण उरत नाही. भाद्रपद कृष्ण पक्षात पूर्वजांचे आत्मे जरी पृथ्वीतलावर आले तरी ते आपणास शुभाशीर्वादच देतील असा विश्वास वाटत असतो. अशांना मग पितृपक्ष हा वाईट वाटत नाही.
आधुनिक काळात..
आधुनिक काळातही अनेक लोक श्रद्धेने श्राद्ध करतांना दिसतात. कोणी धार्मिक विधी करून श्राद्ध करतात. कोणी कावळ्याला अन्न देऊन श्राद्ध करतात. कोणी भुकेलेल्या गरीबांना अन्न देऊन श्राद्ध करतात. कोणी दुष्काळी भागातील तृषार्तांना पाणी देऊन श्राद्ध करतात. कोणी सामाजिक- शैक्षणिक- अनाथाश्रम इत्यादी संस्थांना अर्थ सहाय्य देऊन श्राद्ध करतात. कोणी रक्तदान करून श्राद्ध करतात. कोणी समाजकार्य करून श्राद्ध करतात. कोणी अन्न- वस्त्र दान करून श्राद्ध करतात. कोणी हाॅस्पीटलमधील पेशंटना फळे वाटून श्राद्ध करतात तर कोणी शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके व शैक्षणिक साहित्य देऊन श्राद्ध करतात. पूर्वजांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावयाची असते. कशाप्रकारे श्राद्ध करायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. हा विषयच श्रद्धेचा आहे. श्रद्धा जरूर असावी परंतु ती अंधश्रद्धा नसावी. यासाठी त्यामागचा कार्यकारणभाव समजून घेण्याची जरूरी आहे.
एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी की आपल्याच श्रद्धेबद्दल, आपणच न्यूनगंड किंवा अविश्वास बाळगू नये. दुसऱ्या कुणीतरी पंचपक्वान्ने दान केली आणि आपण फक्त साधे पदार्थ वाढतोय, अशी तुलना मुळीच करू नये. मात्र श्रद्धा ठेवतांना काही काळजी घेणे आवश्यक असते. या श्रद्धेचा कुणी गैरफायदा घेऊन आपल्याला फसवत नाही ना, याबद्दल सावध असावे. भरमसाठ विधी, विविध प्रकारचे अप्रस्तुत दानधर्म कुणी सांगितल्यास त्याची आवश्यकता,सत्यता अन्य कुणाकडून तपासून घ्यावी. सुवर्णदान, रौप्यदान, उंची वस्त्रे दान इत्यादी गोष्टी सामान्यांच्या आवाक्या बाहेरच्या असतात. मुुळातच पूर्वी सुवर्णदान, भूमीदान ही दाने फक्त राजाच करीत असे. त्यामुळे अशी मोठी दाने आपण करण्याच्या भानगडीत पडू नये. कर्ज काढून दानधर्म करू नये. त्याची काहीही गरज नसते. स्वकमाईतून जे आपण दान करतो ते कितीही छोटे वाटले तरी श्रद्धेमुळे ते बहुमोल ठरते. आपल्या कर्मकांडामध्ये कांही चूक झाली तरी काळजी करू नये. कारण देव आणि पूर्वज म्हणजे तुमच्या चुकीबद्दल सूड घ्यायला टपलेली " माणसे "नव्हेत. अधिकाधिक चांगले करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत राहावे.
आपल्या धर्मामध्ये अगदी निर्धन आणि खायला अन्न नसलेल्या माणसालासुद्धा पितृऋणातून मुक्त होण्यासाठी विशेष श्राद्ध करता येते. जंगलात जाऊन ( म्हणजे अन्य कुणाला त्याच्या निर्धनतेची अवस्था कळत नाही ). दक्षिणेकडे तोंड करून, दोन्ही हात वर करून काखा दाखवून, देवाला आणि पितरांना केलेली प्रार्थना, हा सुद्धा एक श्राद्धाचा प्रकार, आपल्याकडे आपल्या धर्मात सांगितलेला आहे.( यावरूनच कफल्लक होणे याला मराठीत काखा वर करणे, असा वाक्प्रचार रुळलेला आहे ).
आपल्या धर्मात असे मानले गेले आहे की पितरांना श्राद्धातील अन्न, तर्पण यामुळे शांती लाभते. त्यामुळेच आपल्या पितरांना, पृथ्वीवर जाऊन आपल्या माणसांकडून अन्न, तर्पण स्वीकारण्यासाठी, देव या काळात त्यांना मुक्त करून तशी मुभा देतो. एक कथा अशी आहे की दानशूर कर्ण हा मृत्यूनंतर स्वर्गात गेल्यावर त्याला अन्न म्हणून सोनेनाणे, जडजवाहीर, हिरे माणके देण्यात आली. त्याने जेव्हा याबद्दल विचारले तेव्हा त्याला सांगण्यात आले की तू पृथ्वीवर आयुष्यभर याचेच दान करीत आला आहेस. तू कधी कुणाला अन्नदान केलेच नाहीस. तेव्हा आपली चूक कळून, देवाच्या परवानगीने त्याने पितृपंधरवड्यात पृथ्वीवर येऊन अन्नदान केले. याचा आज आपण असा अर्थ घेऊ शकतो की इतक्या मोठमोठ्या दानापेक्षाही भुकेल्या माणसाला अन्न देणे सर्वात महत्वाचे दान आहे.
इतक्या कोट्यवधींच्या संख्येने जन्म घेणारे आत्मे येतात तरी कुठून, या प्रश्नाचे उत्तर recycling असेच वाटते. किंबहुना पृथ्वीवर अचाट वाढणाऱ्या लोकसंख्येचे कारणही तेच असावे. कारण आपण जर बारकाईने निरीक्षण केले तर असे दिसते की पशुपक्षी, जीवजंतू हे परमेश्वराने नेमून दिलेल्या नियमानुसार आचरण करतात. एखादा क्रूर प्राणी त्याला भूक लागल्यावरच, दुसरा प्राणी मारून खातो. पण उद्या परवा लागणाऱ्या भुकेसाठी तो आधीच आठ दहा प्राणी मारून फ्रिजमध्ये ठेवत नाही. त्यामुळे त्यांचे अपग्रेडिंग होत होत ते यथावकाश मनुष्य जन्माला येतात. पण मनुष्य जन्मातील अनेक आत्म्यांनी केलेल्या असंख्य चुकांबद्दल त्यांना परत मनुष्य जन्म घेऊन ते सगळे निस्तरावे लागते. त्यामुळे भुईभार वाढतच चालला आहे. आपण जेव्हा पितरांना अन्न नैवेद्य अर्पण करतो तेव्हा म्हटली जाणारी पितृ स्तोत्र आणि पितृ सूक्त सर्वांच्या माहितीसाठी खाली देत आहे. कांही पुरोहित / गुरुजी ऋग्वेदातील अन्न सूक्ताचे पठण करतात.
१) पितृ स्तोत्र -- गरुड पुराणातील उल्लेखानुसार पितृ स्तोत्र हे महर्षी रुची यांनी रचलेले आहे. रुद्रपठण करतांना जशी रुद्राची तुलना आणि अस्तित्व अनेक वस्तूंमध्ये कल्पिलेले आहे तसे या स्तोत्रामध्ये विविध रुपांमध्ये कल्पिलेल्या पितरांना वंदन केले आहे. त्यांची स्तुती करून आपल्यावर कृपा ठेवण्याची प्रार्थना केलेली आहे. हिंदी भाषिक लोकं याला पितरांची आरती असेही म्हणतात. श्राद्धाला पितरांसाठी वाढलेल्या पानाचा नैवेद्य दाखविल्यावर, पितर जेवत आहेत असे समजून तेथे उभे राहून ( त्यांच्या समोर बसू नये ) हे स्तोत्र म्हणावे. नंतर पितरांना मनोभावे प्रार्थना करावी.
२) पितृ सूक्त - हे ऋग्वेदामधील आहे. पौर्णिमा, अमावस्या आणि श्राद्ध तिथीला, संध्याकाळी देवापुढे तेलाचा दिवा लावून हे सूक्त म्हटले जाते. यामुळे पितृदोष आणि सर्व बाधा दूर होऊन शांती लाभते. यश मिळते, असे सांगितले आहे.
३) पितृअष्टक -- ज्यांना संस्कृत जमणार नाही असे वाटते त्यांच्यासाठी मराठीतून हे पितृ अष्टक दिलेले आहे.
अत्यंत महत्वाचे -- वरील संस्कृत स्तोत्रे / सूक्ते म्हणायची असल्यास काही दिवस त्याचा सराव करावा. संस्कृत भाषा ही ( हिंदूंच्या ) देवांची भाषा ( गीर्वाण भारती ) आहे म्हणूनच ती प्रत्येक हिंदूचीही आहे. पण जर हे म्हणायला जमलेच नाही तर उगाचच अपराधी वाटून घेऊ नये. मनोभावे हात जोडून केवळ प्रार्थना करावी.
खाली ही स्तोत्रे आणि सूक्ते देत आहे ---
१) ।। पितृ स्तोत्र पाठ ।।
अर्चितानाममूर्तानां पितृणां दीप्ततेजसाम्।
नमस्यामि सदा तेषां ध्यानिनां दिव्यचक्षुषाम्।।
(ते तेजस्वी तेजस्वीतेच्या अमर पूर्वजांची पूजा करत असत.
मी नेहमीच दिव्य डोळ्यांनी ध्यान करणाऱ्यांना नमस्कार करतो.)
इन्द्रादीनां च नेतारो दक्षमारीचयोस्तथा।
सप्तर्षीणां तथान्येषां तान् नमस्यामि कामदान्।।
(आणि इंद्र आणि इतरांचा, दक्ष आणि मारीचचा नेता.
मी त्या सात ऋषींना आणि इच्छा प्रदान करणाऱ्या इतरांना नमस्कार करतो.)
मन्वादीनां च नेतार: सूर्याचन्दमसोस्तथा।
तान् नमस्यामहं सर्वान् पितृनप्युदधावपि।।
(मनू आणि इतरांचे नेते सूर्य आणि चंद्र आहेत.
मी त्या सर्व पित्यांना आणि समुद्राला नमस्कार करतो.)
नक्षत्राणां ग्रहाणां च वाय्वग्न्योर्नभसस्तथा।
द्यावापृथिवोव्योश्च तथा नमस्यामि कृताञ्जलि:।।
(तारे आणि ग्रह, वारा, अग्नी आणि आकाश.
मी स्वर्ग आणि पृथ्वीला हात जोडून नमस्कार करतो)
देवर्षीणां जनितृंश्च सर्वलोकनमस्कृतान्।
अक्षय्यस्य सदा दातृन् नमस्येहं कृताञ्जलि:।।
(आणि सर्व जग ज्यांची पूजा करतात अशा देव आणि ऋषींच्या पित्यांना.
मी नेहमीच अक्षय देणग्या देणाऱ्यांना हात जोडून नमस्कार करतो.)
प्रजापते: कश्पाय सोमाय वरुणाय च।
योगेश्वरेभ्यश्च सदा नमस्यामि कृताञ्जलि:।।
(कश्पा, निर्माता, सोम आणि वरुण यांना.
मी नेहमीच योगाच्या गुरुंना हात जोडून नमस्कार करतो.)
नमो गणेभ्य: सप्तभ्यस्तथा लोकेषु सप्तसु।
स्वयम्भुवे नमस्यामि ब्रह्मणे योगचक्षुषे।।
("सात यजमानांना आणि सात लोकांनाही नमस्कार.
मी योगाचे नेत्र असलेल्या ब्रह्म, स्वयंभूव यांना नमस्कार करतो.)
सोमाधारान् पितृगणान् योगमूर्तिधरांस्तथा।
नमस्यामि तथा सोमं पितरं जगतामहम्।।
(आणि चंद्र आणि योगाच्या मूर्ती धारण करणाऱ्या
पूर्वजांच्या यजमानांनाही नमस्कार करतो.
त्याच प्रकारे मी जगाचा पिता सोम यांना नमस्कार करतो.)
अग्रिरूपांस्तथैवान्यान् नमस्यामि पितृनहम्।
अग्रीषोममयं विश्वं यत एतदशेषत:।।
(मी अग्नीच्या रूपात असलेल्या पूर्वजांना आणि इतरांना नमस्कार करतो.
ज्यांच्यापासून हे संपूर्ण विश्व अग्रीशोम बनले आहे.)
ये तु तेजसि ये चैते सोमसूर्याग्रिमूर्तय:।
जगत्स्वरूपिणश्चैव तथा ब्रह्मस्वरूपिण:।।
(पण जे तेजस्वी आहेत आणि जे चंद्र आणि सूर्याच्या मूर्ती आहेत.
ते विश्वाच्या रूपात आणि ब्रह्माच्या रूपात देखील आहेत.)
तेभ्योखिलेभ्यो योगिभ्य: पितृभ्यो यतामनस:।
नमो नमो नमस्तेस्तु प्रसीदन्तु स्वधाभुज।।
(ज्या सर्व योगी आणि पूर्वजांचे मन नियंत्रित आहे.
हे स्वधाभुज, तुला नमस्कार, नमस्कार, नमस्कार.)
२) ।। पितृ-सूक्तम् ।।
उदिताम् अवर उत्परास उन्मध्यमाः पितरः सोम्यासः।
असुम् यऽ ईयुर-वृका ॠतज्ञास्ते नो ऽवन्तु पितरो हवेषु ॥१॥
(चंद्राच्या मध्य पित्याच्या उगवत्या ग्रहाचे खालचे उत्तपरा.
आमच्याकडे आलेले लांडगे, ऋतू जाणून, यज्ञांमध्ये आमचे रक्षण करोत.)
अंगिरसो नः पितरो नवग्वा अथर्वनो भृगवः सोम्यासः।
तेषां वयम् सुमतो यज्ञियानाम् अपि भद्रे सौमनसे स्याम् ॥२॥
(आमचे पूर्वज अंगिरस म्हणजे नऊ गायी, अथर्व, भृगु आणि सोम्यस.
हे सौम्य, यज्ञ करणाऱ्यांपैकीही आपण त्यांच्यापैकी सर्वोत्तम असू.)
ये नः पूर्वे पितरः सोम्यासो ऽनूहिरे सोमपीथं वसिष्ठाः।
तेभिर यमः सरराणो हवीष्य उशन्न उशद्भिः प्रतिकामम् अत्तु ॥३॥
(आमचे पूर्वज, सोम्य, वसिष्ठ, ज्यांनी सोम-पीठ आणले.
अग्नीचा देव यम, तुला नैवेद्य दाखवो आणि तुझ्या इच्छा पूर्ण करो.)
त्वं सोम प्र चिकितो मनीषा त्वं रजिष्ठम् अनु नेषि पंथाम्।
तव प्रणीती पितरो न देवेषु रत्नम् अभजन्त धीराः ॥४॥
(तू चंद्र आहेस, निरोगी मन आहेस, तू राजिष्ठाच्या मार्गाचे अनुसरण करतोस.
तुम्हाला जन्म देणाऱ्या देवतांपैकी रत्नाची निश्चयी पूर्वजांनी पूजा केली नाही.)
त्वया हि नः पितरः सोम पूर्वे कर्माणि चक्रुः पवमान धीराः।
वन्वन् अवातः परिधीन् ऽरपोर्णु वीरेभिः अश्वैः मघवा भवा नः॥५॥
(कारण, हे चंद्र, आमचे पूर्वज, स्थिर वारा, तुझ्याद्वारे भूतकाळात त्यांची कर्मे केली.
हे इंद्र, तुझ्या वीर घोड्यांसह, वाऱ्याच्या वर्तुळाला व्यापून टाक.)
त्वं सोम पितृभिः संविदानो ऽनु द्यावा-पृथिवीऽ आ ततन्थ।
तस्मै तऽ इन्दो हविषा विधेम वयं स्याम पतयो रयीणाम् ॥६॥
(तू, हे चंद्र, जो पूर्वजांना ओळखतो, स्वर्ग आणि
पृथ्वीचे अनुसरण करतो आणि त्यांना पसरवतोस.)
बर्हिषदः पितरः ऊत्य-र्वागिमा वो हव्या चकृमा जुषध्वम्।
तऽ आगत अवसा शन्तमे नाथा नः शंयोर ऽरपो दधात ॥७॥
(हे प्रभू, ते शांतीने आमच्याकडे आले आहेत आणि
त्यांनी आम्हाला शांतीचे पाणी दिले आहे.)
आहं पितृन्त् सुविदत्रान् ऽअवित्सि नपातं च विक्रमणं च विष्णोः।
बर्हिषदो ये स्वधया सुतस्य भजन्त पित्वः तऽ इहागमिष्ठाः॥८॥
(मला विष्णूचे सुप्रसिद्ध पिते, पतन आणि पराक्रम माहित आहेत.
जे पुजारी त्यांच्या पुत्राची स्वतःच्या यज्ञांनी पूजा करतात ते येथे आलेल्या पित्यांपैकी सर्वोत्तम आहेत.)
उपहूताः पितरः सोम्यासो बर्हिष्येषु निधिषु प्रियेषु।
तऽ आ गमन्तु तऽ इह श्रुवन्तु अधि ब्रुवन्तु ते ऽवन्तु-अस्मान् ॥९॥
(सोम्यांच्या वडिलांना त्यांच्या प्रिय यज्ञसंग्रहात आमंत्रित करण्यात आले होते
त्यांना येथे येऊन ऐकू द्या आणि वर बोलू द्या आणि आपले रक्षण करू द्या.)
आ यन्तु नः पितरः सोम्यासो ऽग्निष्वात्ताः पथिभि-र्देवयानैः।
अस्मिन् यज्ञे स्वधया मदन्तो ऽधि ब्रुवन्तु ते ऽवन्तु-अस्मान् ॥१०॥
(आमचे पूर्वज, सोम्य, जे अग्नीने भस्मसात झाले आहेत, ते देवांच्या मार्गावर यावेत.)
अग्निष्वात्ताः पितर एह गच्छत सदःसदः सदत सु-प्रणीतयः।
अत्ता हवींषि प्रयतानि बर्हिष्य-था रयिम् सर्व-वीरं दधातन ॥११॥
(हे अग्नीच्या पित्यांनो, येथे जा आणि नेहमी सज्ज राहा.
हे अत्तरा, तू यज्ञ अग्नीला यज्ञ अर्पण केले आहेत आणि
सर्वांचा नायक सूर्याला तू स्वर्गाच्या मध्यभागी ठेवले आहेस.)
येऽ अग्निष्वात्ता येऽ अनग्निष्वात्ता मध्ये दिवः स्वधया मादयन्ते।
तेभ्यः स्वराड-सुनीतिम् एताम् यथा-वशं तन्वं कल्पयाति ॥१२॥
(स्वर्गाच्या मध्यभागी जे अग्नि-श्वास घेणारे आहेत आणि
जे अग्नि-श्वास घेणारे नाहीत ते त्यांच्या यज्ञांनी मादक आहेत.)
अग्निष्वात्तान् ॠतुमतो हवामहे नाराशं-से सोमपीथं यऽ आशुः।
ते नो विप्रासः सुहवा भवन्तु वयं स्याम पतयो रयीणाम् ॥१३॥
(आम्ही त्यांना ऋतूंच्या अग्निपासून आणि निराशेपासून अर्पण करतो -
ती चंद्राची वेदी आहे, जी जलद आहे.)
आच्या जानु दक्षिणतो निषद्य इमम् यज्ञम् अभि गृणीत विश्वे।
मा हिंसिष्ट पितरः केन चिन्नो यद्व आगः पुरूषता कराम ॥१४॥
(आचार्याच्या उजव्या गुडघ्यावर बसून, ब्रह्मांडात या यज्ञाचे पठण करा.
ज्या पित्यांनी आपल्याला पुरुषत्वाने अग्नी म्हणून ओळखले आहे त्यांना त्रास देऊ नका.)
आसीनासोऽ अरूणीनाम् उपस्थे रयिम् धत्त दाशुषे मर्त्याय।
पुत्रेभ्यः पितरः तस्य वस्वः प्रयच्छत तऽ इह ऊर्जम् दधात ॥१५॥
॥ ॐ शांति: शांति: शांति: ॥
(अरुणाच्या सान्निध्यात बसून, मर्त्य माणसाला सूर्य दे.
वडिलांनी त्याच्या मुलांना वास दिला आणि त्यांनी त्याला येथे ऊर्जा दिली.
॥ ॐ शांती, शांती, शांती.)
३) ll पितृअष्टक ll
जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला
पुढे वारसा हा सदा वाढविला
अशा नम्र स्मरतो त्या पितरांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || १ ||
इथे मान सन्मान सारा मिळाला
पुढे मार्ग तो सदा दाखविला
कृपा हीच सारी केली तयांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || २ ||
मिळो सद् गती मज पितरांना
विनंती हीच माझी त्रिदेवतांना
कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ३ ||
जोडून कर हे विनंती तयांना
अग्नि वरूण वायु आदी देवतांना
सदा साह्य देवोनी उध्दरी पितरांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ४ ||
वसुरूद्रदित्य स्वरूप पितरांना
सप्तगोत्रे एकोत्तरशतादी कुलांना
मुक्तीमार्ग द्यावा ऊध्दरून त्यांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ५ ||
करूनी सिध्दता भोजनाची तयांना
पक्वान्ने आवडीनें बनवून नाना
सदा तृप्ती होवो जोडी करांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ६ ||
मनोभावे पुजूनी तील, यवाने
विप्रास देऊन दक्षिणा त्वरेने
आशिष द्या हो आम्हा सकलांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ७ ||
सदा स्मृती राहो आपुलीच आम्हा
न्यून काही राहाता क्षमा कराना
गोड मानुनी घ्यावे सेवा व्रतांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ८ |।
दा. कृ. सोमण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा