बुधवार, १० सप्टेंबर, २०२५

2269. क्लिनिक

     स्कुटीची धडक लागून राजच्या हाताला दुखापत झाली. स्कुटी चालविणाऱ्या तरुणीने स्कुटी बाजूला लावली आणि तिच्या ओढणीने राजची जखम घट्ट बांधून रक्तस्त्राव थांबविला. बाजूच्याच क्लिनिकमध्ये तिने राजला नेले. डॉक्टर यांना खूप लागले आहे पटकन बघा तिने डॉक्टरांना विनवणी केली. ठीक आहे मॅम, मी बघते, तुम्ही थोडावेळ बाहेर बसा, डॉक्टरांनी सांगितले.
जखम फारशी खोल नव्हती, डॉक्टरांनी ड्रेसिंग करून एक इंजेक्शन दिले. 
हं, आता बोलवा त्यांना, डॉक्टर म्हणाल्या.
बाहेर कोणीही नव्हतं हे बघून राज म्हणाला, त्या गेल्यात. 
अशा कशा गेल्या? कोण आहेत त्या तुमच्या? डॅाक्टरांनी विचारले. 
मी नाही ओळखत त्यांना. 
कसे शक्य आहे? अहो त्यांच्या ओढणीने त्यांनी तुमची जखम बांधली. 
डॉक्टर त्यांच्या स्कुटीने मला धडक दिली आणि म्हणूनच त्यांनी माझी जखम बांधून मला तुमच्याकडे आणले इतकेच, राज म्हणाला. 
३ दिवस तुम्ही या गोळ्या घ्या. गोळ्या कुठे मिळतील? राजने विचारले. खरं तर इथे जवळपास दोन-तीन मेडिकल स्टोअर्स आहेत, परंतु ती आता बंद झाली असतील. तुम्हाला ह्या गोळ्या इंदिरानगर मध्ये मिळतील. 
डॉक्टर इंदिरानगर किती दुर आहे? मला इथली काहीच माहिती नाही. मी आय. टी. त काम करतो आणि कालच बेंगलोरला आलो.  
डॉक्टरांनी राजकडे निरखून बघितले. साधारणतः सहा फूट उंच, गोरा वर्ण, पिळदार शरीरयष्टी, ब्रॅंडेड कपडे, कुणावरही छाप पडेल असे प्रसन्न व्यक्तिमत्व. 
मी माझ्या जवळच्या गोळ्या देते म्हणत डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनचा कागद परत घेत, त्यांच्याकडील गोळ्या राजला दिल्या. डॉक्टर तुमची फी आणि या गोळ्यांचे मिळून किती पैसे द्यायचे? राजने विचारले. तुम्ही आधी बरे व्हा, फीचे आपण नंतर बघू असे म्हणणाऱ्या डॉक्टर नेहा खूपच सुंदर होत्या. गोरा वर्ण, मध्यम उंची, सडपातळ शरीर यष्टी, खांद्यावर विसावणारे दाट मोकळे केस, घारे डोळे, डाव्या गालावर पडणारी मोहक खळी, अगदी अप्रतिम सौंदर्य. 
राज, तुम्हाला बरं वाटलं तर तसं सांगायला आणि काही त्रास असेल तर दाखवायला म्हणून ३ दिवसांनी, संध्याकाळी या. मी नऊ वाजेपर्यंत क्लिनिकमध्ये असते, मी तुमची वाट पाहीन, नक्की या. 
थँक्स डॉक्टर नेहा, असे म्हणत उठणाऱ्या राजची  निघण्याची इच्छा होत नव्हती आणि नेहालाही राजने जावे असे वाटत नव्हते. दोघांनी एकमेकांची मने पहिल्या भेटीतच जिंकली होती. गुड नाइट, बाय म्हणताना एकमेकांचा धरलेला हात सोडायची किंवा सोडवायची दोघांचीही इच्छा होत नव्हती.
भारत-पाक क्रिकेट मॅचमुळे, सात वाजेनंतर पेशंट नव्हते. एरवी नेहाने क्लिनिक बंद केले असते, परंतु आज राज येणार होता, ती राजची आतुरतेने वाट पाहत होती. नेहाला गेले तीन दिवस, तीन महिन्यांसारखे वाटले. नऊ, साडेनऊ अगदी दहा वाजले तरी राज आला नाही. शेवटी नाराजीनेच तीने क्लिनिक बंद केले. 
नेहा रोज राजची वाट पहायची पण त्यानंतर राज आलाच नाही. राजची अचानक झालेली भेट नेहासाठी स्वप्नवत ठरली. पहिल्याच भेटीत तीचे मन राजवर जडले होते. राजची प्रसन्न मुद्रा मनात घर करून बसली होती. अनेक स्थळं आली पण नेहाला एकही पसंत पडले नाही कारण एक न एक दिवस राज भेटेल अशी भोळी भाबडी आशा तीला होती.
नेहाने दिलेल्या गोळ्यांनी राजला खूप फरक पडला होता. नेहाला भेटायची राजला देखील आतुरता होती पण नियतीला ते मान्य नव्हते. राजच्या ऑफिसमधुन मेसेज आला, या विकेंडला तुम्हाला अमेरिकेला जायचे आहे. राज लगबगीने घरी पुण्याला परतला, कशीबशी तयारी केली आणि अमेरिकेत पोहोचला. कितीही प्रयत्न केला तरी राजच्या मनातून नेहा जात नव्हती. मनात सारखे तिचेच विचार.
काही दिवसांनी राजची रीनाशी ओळख झाली. दोघेही एकाच ऑफिसात आणि राहायला देखील एकाच सोसायटीत. रीना जितकी सुंदर तितकीच धीट नी बोलकी. राज-रीनाची छान मैत्री जमली पण तरीही राज नेहाला विसरला नव्हता. साधारणत: वर्षाने रीनाने लग्नाबद्दल राजला विचारले परंतु राजने स्पष्टपणे नकार दिला. राजने कसलाही आड पडदा न ठेवता रीनाला नेहाबद्दल सांगितले.
राज मग तू नेहाला कॉन्टॅक्ट का करत नाहीस? रीनाने विचारले. 
रीना, कॉन्टॅक्ट करायला फोन नंबर लागतो, माझ्याकडे तो देखील नाहीये राज केविलवाणेपणे म्हणाला. 
रीनाने तिच्या बेंगलोरच्या एका मैत्रिणीला राजने सांगितलेल्या एरियात पाठवले परंतु नेहाचा नंबर मिळाला नाही, तीने तेथील क्लिनिक बंद केले होते.
ऑफिस मधील वेळ कामात निघुन जायचा, संध्याकाळचा वेळ रीना बरोबर गप्पा गोष्टीत करण्यात जायचा पण रात्री नेहाच्या आठवणीने राजला झोप यायची नाही. कधी नेहा स्वप्नात यायची तर कधी ती जवळ असल्याचा भास व्हायचा. बेंगलोरहून पुण्याला परतण्याआधी नेहाला न भेटण्याचा त्याला सतत पश्चाताप होत होता.
दोन वर्षांनी राज आणि रीना क्लायंट मीटिंगसाठी मुंबईला आलेत. संध्याकाळी गप्पा मारत, आईस्क्रीम खात खात फिरत असताना रीना एका गंजलेल्या आणि अर्धवट तुटलेल्या खांबावर धडकली. राजने तीला जवळच्या क्लिनिकमध्ये नेले. 
डॉक्टर प्लीज रीनावर तातडीने उपचार करा, राज काकुळतीने म्हणाला. काळजी करू नका, मी बघते, तुम्ही बाहेर बसा, तोंडावरील मास्क नीट करत डॅाक्टर म्हणाल्या. जखम बरीच खोल होती, डॉक्टरांनी तातडीने टाके टाकले आणि इंजेक्शन दिले.
तुमचं लग्न झालंय का? डॉक्टरांनी रीनाला विचारले.
नाही अजुन, २ महिन्यांनी आहे रीना ऊत्तरली.
तुम्ही अगदी अनुरूप, राजबिंडा आणि काळजी घेणारा जोडीदार मिळवला, डॅाक्टर म्हणाल्या. 
डॉक्टर, मला राजशी लग्न करायला आवडले असते परंतु साहेबांचे हृदय आधीच कोणी तरी चोरले आहे.
कोण आहे ती भाग्यवान सुंदरी? डॉक्टरांनी विचारले.
२ वर्षांपूर्वी त्याला बेंगलोरला भेटली होती. तुमच्याच प्रोफेशन मधली आहे, त्याला फक्त नांव माहित आहे, तिचा फोन नंबरही त्याच्याकडे नाही. तिचा शोध घ्यायचा त्याने खुप प्रयत्न केला, परंतु तिने बेंगलोर मधील क्लिनिकची जागा बदलली. त्याला खात्री आहे की, एक ना एक दिवस ती त्याला भेटेल आणि तो तिच्याशी लग्न करेल.
ठीक आहे, तुम्ही राजला आत बोलवा. डॉक्टरांनी प्रिस्क्रीप्शन देत औषधे कशी घ्यायची, टाके कधी काढायचे आणि काय काळजी घ्यायची याविषयी राजला सविस्तर सांगितले. 
डॉक्टर फी किती द्यायची? राजने विचारले. 
राज तुम्हाला मागच्या वेळेची आणि आजची अशी दोन्ही वेळची फी द्यायची आहे असे म्हणताना डॉक्टरांनी चेहऱ्यावरील मास्क बाजूला केला. 
राज डॅाक्टरांकडे एकटक बघत राहीला आणि विशेष म्हणजे ते समजूनही डॅाक्टर काहीच बोलल्या नाहीत. 
रीना हीच माझी नेहा, जिला दोन वर्षांपूर्वी पहिल्या भेटीतच मी माझे हृदय दिले म्हणत राजने नेहाला मिठीत घेतले. राज काय करतोस? अरे हे क्लिनिक आहे, आणि माझ्यासमोर माझी पेशंट बसलेली आहे, नेहा म्हणाली. 
नेहा, मी पेशंट नाही तर तुम्हा दोघांची मैत्रीण आहे असे म्हणत रीनाने राज आणि नेहाला जवळ घेतले.
नेहा, दोन वर्षांपूर्वी तू राजवर उपचार केलेस, आज माझ्यावर उपचार केलेस. आज माझ्यामुळे तुम्हा दोघांचे, दोन वर्ष लांबलेले दुखणे एका क्षणात बरे झाले. माझी फी म्हणून तुम्ही दोघांनी माझ्या लग्नाला यायचे, तुमच्या लग्नाची अनाउन्समेंट करायची आणि मी तुमच्या लग्नात तुम्हा दोघांची खास मैत्रीण म्हणून मिरवणार. आहे कबुल?
राज आणि नेहाने टाळ्या वाजवत, मोठ्या आनंदाने माना डोलावल्या. रूक्ष क्लिनिक अचानक चैतन्यमय झाले. बऱ्या झालेल्या असंख्य पेशंट्सचा आनंद अनुभवणाऱ्या क्लिनिकने आज डॉक्टर नेहाच्या चेहऱ्यावरील निखळ आनंद प्रथमच अनुभवला होता. 
चला छान सेलिब्रेट करूया! शांततेचा भंग करत रीना म्हणाली.

- दिलीप कजगांवकर, पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...