मंगळवार, २ सप्टेंबर, २०२५

2222. माहेरची साडी

 गरीबी हा शापच आहे एक प्रकारचा. आपलं जीवन कसंबसं जगत असताना लोकांच्या घरची उष्टी काढत, धुण्याभांड्यातून त्यांचा मळ काढून त्यांचा संसार चमकवणाऱ्या या गरीबांना मात्र ते मोलकरीणच समजतात व तशीच वागणूक ही त्यांना देतात. त्यांना काम दिले, त्यांच्या श्रमाचा मोबदला दिला म्हणजे आपण खूप मोठ्ठे काम केले, उपकार केले असा मालक मालकीणींचा आविर्भाव असतो. पण त्यात जर माणुसकीचा ओलावा असता तर दोन्ही कडे समाधानाचा झरा वाहिला असता. असो. या गरिबांना काही अडचण आली, आजारपण आलं तर त्यांना खरंतर या मालकांकडून मदतीचा हात दिला गेला पाहिजे. पण यात ही बऱ्याच ठिकाणी हात आखडता घेतला जातो आणि त्यांच्या अडचणीत अजून भरच पडते. पण परमेश्वर आहे व तो ठरल्या वेळी नक्कीच आपले नेत्र उघडतो याची प्रचिती आजची सत्यकथा वाचल्यावर येते. 
     लेखिका या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त निवृत्त शिक्षिका आहेत. कुणाची रोजनिशी (डायरी) वाचू नये असं म्हणतात पण लेखिकेच्या रोजनिशी (डायरी) च्या पानांना आपल्यापर्यंत पोहचवण्याचे काम त्यांचे विद्यार्थी  यांनी आनंदाने केले आहे ज्यातून आदर्श शिक्षक कसा असावा किंवा असावी याचा प्रत्यय येतो. 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

      २०१० साली मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. अनेक जुने विद्यार्थी भेटायला येत होते. एका दिवशी, संध्याकाळी शाळा सुटून गेली होती, मी ऑफिसमध्ये एकटीच काम करत होते, सोबत लिपिका (क्लार्क) जोशीबाई आवरावर करत होत्या. इतक्यात, "बाई, आत येऊ का ?" म्हणत राहुल बायकोला घेऊन आत आला. 
 "अरे बापरे ! किती वर्षांनी दिसतो आहे ! कसा आहेस, बाळा ?" असं म्हणत, त्याला पाणी देण्यासाठी उठले तर म्हणाला, "बाई, पाणी नको. आत्ता घरूनच आलो आहे. आणि, काय हो बाई, शाळा सुटली ना ? मग तुम्ही अजून इथे काय करताय ? सर्व कामं बंद करा आणि चला बघू ताबडतोब आमच्याबरोबर." 
 म्हटलं, "अरे, थोडं काम आहे. आत्ता नाही येता येणार. काय काम ते सांग तर खरं."
 माझी कामाची सबब त्याला परिचीत होती, लटक्या रागाने तो म्हणाला, "पण तुम्हाला माहितीये ना, मी अमेरिकेत असतो ते. तब्बल पाच वर्षांनी भारतात आलोय. उद्या सकाळीच परत जायचंय मला. आजच सकाळी समजलं, तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. म्हणून बायकोला घेऊन आलो. तुम्हाला तुमच्या आवडीची साडी घ्यायची आहे. चला, चला, उठा पाहू लवकर," असं म्हणून तो उभा राहिला. 
 मी त्याला खाली बसायला सांगितलं, "अरे, उद्या तुला जायचंय. तुला घाई असेल. उगाच वेळ नको वाया घालवू. एवढ्या घाईत आहेस. तू भेटायला आलास यातच मला साडी मिळाली, असं समज." असं म्हणून त्याची समजूत घालू लागले पण तो ऐकायला तयार नव्हता. शेवटी त्याने पैसे भरून एक पाकीट माझ्या हातात दिलं आणि म्हणाला, "बाई, या सर्व पैशांची एकच साडी घ्या, मोठ्ठा पुरस्कार मिळालाय माझ्या बाईंना, मग साडीपण मोठ्ठीच हवी." 
 "नक्की," असं म्हणून त्याच्यासाठी कॉफी मागवली. कॉफी पिऊन, नमस्कार करून दोघे निघून गेले आणि डोळ्यांतले आनंदाश्रू पुसत मी पुन्हा कामाला लागले. 
 पाचच मिनिटांत, माझ्या वर्गातल्या विक्रांतची (नाव बदललेले) आई मला भेटायला आली. आठवडा झाला, तो शाळेत येत नव्हता. शेजारी राहणाऱ्या मुलांना विचारलं तर तो आजारी असल्याचे समजलं. 
"आता विक्रांत कसा आहे?" असं म्हटल्यावर त्या रडायला लागल्या. खुर्चीत बसून त्यांना शांत होऊ दिलं. धुण्याभांड्याची कामं करून खंगलेल्या शरीराचं मुटकुळं करून त्या खुर्चीत बसल्या होत्या. त्यांच्याशी बोलताना कळलं की विक्रांतला रक्तातली कावीळ झाली होती. आधी डॉक्टरांना निदान झालं नाही, आता तब्येत आणखी बिघडली म्हणून ऍडमिट करायला सांगितलं होतं. म्हणून जिथे जिथे त्या काम करत होत्या, तिथून पैसे गोळा करत होत्या. परंतु खूपच कमी पैसे मिळाले होते त्यामुळे त्या खूपच निराश झाल्या होत्या. समोरच, राहुलने मला दिलेले पैशांचे पाकिट होतं. ते मी तसंच उचललं आणि त्यांच्या हातात दिलं, म्हटलं, "बघा, एवढे पुरतील का हो ? कमी पडले तर आणखीन देते." 
त्या नको नको म्हणत होत्या. मी नोटा मोजल्या. तब्बल पाच हजार रुपये होते ते. त्यांना ४,००० रुपये कमी पडत होते. मी सगळेच पैसे त्यांच्या हातात ठेवले, त्यांच्या डोक्यावर हात ठेवला, म्हटलं, "आपला विक्रांत लवकर बरा होईल, अजिबात काळजी करू नका, रडू नका. बघा, तुम्हाला लागणारे पैसे परमेश्वराने माझ्याकडे आधीच पाठवून दिले होते. हे पैसे माझे नाहीत, तुमचेच आहेत. माझा एक विद्यार्थी नुकताच येऊन देऊन गेला." 
'परमेश्वर आहे' या गोष्टीवर माझा विश्वास होताच, तो आणखी दृढ झाला. खरंच, याला योगायोग म्हणायचं की परमेश्वरी कृपा ? काहीही म्हणा, पण आज मला परमेश्वर दिसला त्या आईच्या डोळ्यात. तो आनंद, ते समाधान मला पाच हजाराच्या साडी मिळालं असतं का? नक्कीच नाही.
हे सगळं घडत होतं जोशी बाईंच्यासमोर. पाच मिनिटात, त्यांनी एक पत्र सहीसाठी माझ्यासमोर आणलं. मी त्या पैशाचं काय केलं ते त्यात लिहून 'एका गरजवंताची गरज भागवल्याबद्दल' राहुलचे त्यात आभार मानले होते. माझं काही एक न ऐकता, ते पत्र त्यांनी राहुलच्या घरी पाठवलं. 
दुसऱ्या दिवशी सकाळीच राहुलचा फोन आला. तो रात्री खूप उशिरा घरी आला होता. "बाई, पत्र वाचून तुम्हाला साष्टांग नमस्कार करावासा वाटला," असं म्हणाला, पण सकाळची लगेचचीच फ्लाईट असल्याने भेटायला येऊ शकणार नव्हता.
 "आईकडे साडीसाठी पैसे देतोय, बरं का !" हे त्याचे वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच मी त्याला म्हटलं, " अरे, तुझ्या साडीच्या पैशाने केवढा आनंद मला दिलाय, याची कल्पना तू करूच शकत नाहीस. मला साडी मिळाली, बरं का !" यावर तो छान हसला. त्याला प्रवासासाठी शुभेच्छा देऊन मी फोन ठेवला. 
खरंच, अशी माहेरची साडी मिळणारी, जगात, माझ्याइतकी भाग्यवान कुणी असेल का हो?

लेखिका- सौ गीता वासुदेव नलावडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...