“ बाबा, काय हे.. शिट.. मला लाज वाटतेय सगळ्याची…” अनुराग चिडला होता..
“ अनुराग. तुला आता नाही कळणार रे.. माझ्या वयाचा होशील ना तेंव्हा समजेल कदाचित.." बाबा
“ बाबा, या वयात लग्न करणार तुम्ही..अहो काय म्हणतील लोक ! तुमची सून काय म्हणेल..अजून वर्ष पण झालं नाही माझ्या लग्नाला..”
“ हे बघ, तुझी आई जाऊन तीन वर्षं झाली. मी फार एकटा पडलो रे. या वयात सोबत हवीशी वाटते. कसं सांगू तुला. ही गरज मानसिक जास्त आहे..”
“ बाबा, म्हणून काय पासष्ट वयात कुणी लग्न करतं का? काहीतरीच तुमचं.. माझा विरोध आहे या गोष्टीला. मला मुळीच चालणार नाही हे.”
“ तू शांतपणे विचार कर..मग आपण ठरवू काय ते..आता हा विषय बंद..तू हवं तर सारिकाशी बोल..”
“याचा अर्थ तुम्ही सगळं ठरवूनच आलात. मग मला विचारायचं नाटक तरी कशाला. करा काय वाट्टेल ते. “ पाय आपटत अनुराग आत निघून गेला.
सदाशिवनी गोष्ट छेडली खरी पण त्यांना खूप अस्वस्थ वाटू लागलं. कुणीच कसं समजून घेत नाही आपल्याला. स्त्रिया बोलून मोकळ्या होतात. पण पुरुषांचं काय? मित्र सुद्धा मस्करीच करतात. ज्याचं जळतं त्यालाच कळतं म्हणतात हेच खरे. अनुराग आणि त्याची बायको सारिका सकाळी ऑफिसला जायचे. ते येईपर्यंत संध्याकाळ व्हायची. दिवस त्यांना खायला उठायचा. एकटेपणा हा एक मोठा आजार असं त्यांना वाटायचं. कारण बाकी आजारांवर औषध असतं पण एकाकीपणाचं काय करायचं आणि यामुळे भविष्यात नक्कीच काही ना काही आजार नक्कीच होऊ शकतात. एखादी मुलगी असती आपल्याला तर तिनं समजून घेतलं असतं.
त्यांना आपल्या बायकोची, सुवर्णाची खूप आठवण झाली. ती असे पर्यंत त्यांना कधी तिचं महत्व कळलं नाही. सदाशिवराव तसे मुळातच तापट वृत्तीचे. स्वतःचे म्हणणे खरे करणे हा त्यांचा स्वभाव. सुवर्णाने खूप समजून सांगायचा प्रत्यन केला पण त्यांच्यात फरक असा पडला नाही..मग हळूहळू त्या शांत होत गेल्या आणि अनुराग मधे त्यांनी आपलं मन गुंतवून घेतलं. अनुरागची शाळा, अभ्यास सगळं त्या बघायच्या. शक्यतो सदाशिवराव घरी असले कि तो खेळायला धूम ठोकायचा. बापाची आणि मुलाची गट्टी कधी जमलीच नाही. त्यानं कधी बाबांना उलटून उत्तर दिलं नाही पण कधी मायेनं जवळ ही जात नसायचा. आई आणि बाबा यांच्यातील दुरावा त्या बालमनाला जाणवला असावा. सदाशिवराव आपल्याच तोऱ्यात असायचे. नोकरीत असेपर्यंत त्यांना कधी हे जाणवले ही नाही.
सुवर्णाला पहिला हार्ट अटॅक आला तेंव्हा मात्र ते गडबडले. त्यांची सेवानिवृत्ती जवळ आलेली. हॉस्पिटल मधे असेपर्यंत जेमतेम चार दिवस त्यांनी रजा टाकली. सगळं काही अनुराग बघत होता.
“अरे अनु, तुझी नवी नोकरी..तू जा ऑफिसला..आहे ना इथे नर्स..”
“आई, नोकरी पेक्षा तुझी तब्बेत महत्वाची आहे मला.”
“ ठीक आहे..जशी तुझी मर्जी.. किती शहाणा आहेस बाळा तू..” सुवर्णा गहिवरली.
“ बाबा कुठे आहेत.. बसलेत का बाहेर..?”
“ ते गेले नेहमीप्रमाणे ऑफिसला. जसं काही त्यांच्याशिवाय ऑफिस चालणारच नाही. आई नको काळजी करू. मी आहे ना.”
सुवर्णाला वाटलं. निदान अशावेळी तरी काही धड वागतील ते. पण नाहीच. चुकून ही त्यांनी तिच्या जवळ बसून धीर दिला नाही. इतकी कसली गुर्मी. इतकी वर्ष अशा माणसाबरोबर संसार केला. एखाद्या प्राण्याला पण माया वाटेल पण हा माणूस निव्वळ आत्मकेंद्रित .तिला स्वतःचीच लाज वाटली. कसे काय राहिलो आपण याच्या बरोबर. किळस आली तिला. पण त्यातल्या त्यात एवढंच की त्यांना कसलंही व्यसन नव्हतं आणि नोकरी मात्र टिकून होती आणि घरात पैसे देण्याविषयी काही कुरबुर नव्हती. एका गोष्टीसाठी मात्र तिनं त्यांचे उपकार मानले. अनुराग सारखा मुलगा. नावासारखा प्रेमळ. त्याच्याकडे पाहून जगण्याची उमेद मिळाली तिला. वरून कितीही सावरलं तरी मनातल्या जखमा भरून येत नाहीत. आतल्या आत सुवर्णाचा जीव प्रेमासाठी आसुसलेलाच राहिला. बीपी, शुगर सगळ्यांनी ठाण मांडलं शरीरात आणि एक दिवस आला हार्ट अटॅक.
“अनुराग.. ऐकतोस का रे..माझं काही खरं नाही..मला तुझी काळजी वाटते..”
“ आई, जास्त नको बोलूस. त्रास होईल तुला. तू आत्तापर्यंत बाबांकडून काही अपेक्षा केली नाहीस ना. आता ही या गोष्टीचा त्रास करून घेऊ नकोस.”
“खरंय रे बाळा. तुला आणि मला त्यांनी कधी आपलं मानलेच नाही कधी. तू मात्र आपल्या बायकोला असे वागवू नकोस. तिला समजून घे. परक्या घरातून आलेली मुलगी. तिला आपल्या घरात रुळायला वेळ लागेल. बाबांचा स्वभाव ही असा.” अनुरागने आईचा हात हातात घेतला आणि विश्वासानं दाबला. पण सुवर्णा त्यातून वाचू शकली नाही. ती गेली तेंव्हा ते ऑफिसला होते. चार दिवसांवर रिटायरमेंटचा दिवस होता आणि बायको गेली. त्यांच्या कार्यक्रमावर पाणी फिरले म्हणून त्यांना वाईट वाटलं. ए कूण काय जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हेच खरं. अनुरागनं स्वतःला सावरलं आणि नोकरीवर रुजू झाला. घरी स्वयंपाकाला दोन्ही वेळेला बाई ठेवली. सदाशिवराव पण रिटायर झाले. आता करायचं काय. ना मित्र. ना गोतावळा. कुरकुऱ्या स्वभावामुळं कुणाशी कधी जमलंच नाही. आता राग तरी कुणावर काढणार. अनुरागचं त्याच्या मित्राच्या बहिणीशी लग्न झालं आणि सारिका घरात आली.
बाबांना हवं-नको बघायची ती. पण दोघंही तशी कोरडीच वागायची. कामापुरतं बोलणं. मॉर्निग वॉकला गेल्यावर वयस्कर जोडी पाहिली की त्यांना सुवर्णाची आठवण यायची. एकेक किस्से आठवत राहायचे. कितीही रागावले तरी ती त्यांचं सगळं व्यवस्थित करायची. तिच्या डोळ्यातलं पाणी कधी दिसलं नव्हतं त्यांना. आता सदाशिवरावांना याची जाणीव होऊ लागली. तिच्या शेवटच्या दिवसात ही ते कधी तिच्याजवळ बसून बोलले नाही. सतत आपल्या तोऱ्यात. मिळालं काय आयुष्यात? ना प्रेम..ना माया. .आपलं म्हणून कुणीच नाही. नातं असलं तरी अशा दुराव्यामुळं कधी ते फुलत नाही. पण आता या गोष्टीचा उपयोग काहीच नव्हता. सुवर्णा पुन्हा कधीच परतून येणार नव्हती त्यांच्या आयुष्यात.
सदाशिवरावांची पुन्हा लग्न करण्याची इच्छा ऐकून अनुराग आणि सारिका विचारमग्न झाले. अनुराग तर आईच्या आठवणीने विव्हल झाला. त्या दोघांनी एक निर्णय घेतला. सदाशिवराव नेहमीप्रमाणे घरी आले. बेल वाजवली तरी दार उघडेना कुणी. दारावर लावलेल्या चिठ्ठीकडे त्यांचं लक्ष गेलं. चावी शेजारी आहे. चावी घेऊन त्यांनी दार उघडलं आणि घरातली सामसूम पाहून त्यांना कससंच झालं. टेबलवर थर्मास होता चहाचा. सदाशिवराव पाणी प्यायले आणि चहा कपात ओतला. एक घोट घशात गेल्यावर त्यांना बरं वाटलं. थर्मासखाली एक पाकीट होतं. घाई-घाईनं त्यांनी उघडलं आणि वाचायला सुरुवात केली..
बाबा,
घरं तुमचं आहे. आई असेपर्यंत तुम्ही स्वतःचं खरं करत आलात. तिच्या शेवटच्या दिवसात पण तुम्हाला ऑफिस महत्वाचं वाटलं. खूप एकटी होती ती. पुन्हा लग्न करून दुसऱ्या स्त्रीला एकाकी करू नका बाबा. घर दोघांचं असतं. नाही समजणार तुम्हाला माझी खंत. तुमची मर्जी. आता ही तुम्ही तुमचा निर्णय घ्यायला समर्थ आहात. मी आणि सारिका घर सोडून जात आहोत.कधीही हाक मारा मी येईन. बाबा आहेत तुम्ही माझे. काळजी घ्या. -- अनुराग
चिठ्ठी वाचली आणि सदाशिवराव उन्मळून पडले.
सपना जकातदार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा