मंगळवार, २ सप्टेंबर, २०२५

2253. गुलमोहर

 "दादा नेहमीच्या जागी चहाची टपरी नाहीये."
ड्रायव्हरच्या बोलण्याने माझी झोपमोड झाली. नेहमीचे काम उरकून घरी परतताना राजूच्या टपरीवर मी हमखास चहा पिण्यासाठी थांबायचो. आलं किसून घातलेला त्याच्याकडचा चहा खरोखरच लाजवाब असतो.
मी गाडीतून खाली उतरून ड्रायव्हर जे म्हणाला त्याची खात्री करून घेत असताना रस्त्याच्या पलिकडील बाजूला असलेल्या पंक्चरवाल्याच्या दुकानातून एका मुलाने मला हात दाखवून थांबायला सांगितले. त्याच्या हातातील अवजारे खाली ठेवून तो रस्ता ओलांडून माझ्या गाडीपाशी आला आणि म्हणाला, साहेब, मी ओळखले तुम्हाला. राजू आता मोठा माणूस झालाय. गावातील मारुतीच्या मंदिराजवळ त्याने छोटं हाॅटेल सुरू केलंय. तुम्ही जा तिकडे. तो नक्की भेटेल. असं म्हणून तिथे जाण्याचा रस्ता त्या मुलाने मला सांगितला. मी घड्याळात पाहिलं वाजले किती ते आणि मनांत विचार केला की अजून कमीतकमी कमी अर्धा पाऊण तास तरी जाणार. जाऊ का नको हा विचार करत असताना माझा ड्रायव्हर मला म्हणाला की "दादा जाऊन येऊ. नाही गेलो तर तुम्हाला चुटपुट लागून राहील".
मुख्य रस्त्यावरून ड्रायव्हरने डावीकडे जाणाऱ्या छोट्या गल्लीत गाडी घेतली आणि मारूतीचे मंदिर शोधत आम्ही निघालो. दहा पंधरा मिनिटांत आम्ही त्या मंदिरापाशी पोहोचलो.
"राजू उपहारगृह" नावाची पाटी दृष्टीस पडली. गाडीतून उतरून सावकाश चालत मी तिथे पोहोचलो. गल्ल्यावरच्या माणसाकडे मी राजूची चौकशी केली.
"मालक आत किचन मध्ये आहेत. आपण बसा ना. मी बोलवतो त्यांना" असं म्हणून तो माणूस आतल्या बाजूला गेला.
" सर तुम्ही" मला अचानक आलेलं बघून राजूला आश्चर्याचा धक्काच बसला होता.
हो मीच. आज ह्या बाजूला कामाला आलो होतो. घरी परतताना तुझ्या टपरीजवळ गाडी थांबवली तेव्हा समजलं की तू नवीन हाॅटेल सुरू केलंय म्हणून.
तिथल्या टेबलाजवळ मी आणि माझा ड्रायव्हर बसलो. राजूने लगेच बिसलेरी ची बाटली आणून ठेवली आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या.
"सर हे सगळं घडण्याचे कारण तुम्ही आहात. आजवर जेव्हा जेव्हा तुम्ही टपरीवर आलात तेव्हा टपरी पेक्षा काहीतरी मोठं सुरू करण्याची हिंमत आणि जिद्द तुम्ही माझ्या मनांत जागवलीत. त्या आधारे मी माझ्या मेव्हण्यांशी बोलून हे छोटे हॉटेल सुरू करायचा निर्णय घेतला. तुम्ही पूर्वी केलेली थोडीशी आर्थिक मदत आणि मेव्हण्याच्या आशिर्वादाने हे धाडस मी केले आहे तीन महिन्यांपूर्वी. सुरवातीला जम बसायला वेळ लागला पण आता सुरळीत सुरू आहे. माझ्या शेजारच्या दादाला गल्ल्यावर बसवला. तो बिचारा शिकून देखील नोकरी नाही म्हणून घरीच असायचा. मग त्यालाच विचारले आणि तो तयार झाला. चहा कॉफी बरोबर आता वडापाव भजीपाव आणि कांदा बटाटा भजी बनवतो मी. चटणी अशी झणझणीत बनवली आहे की तिच्या चवीची सवय लागून गिऱ्हाईक आपोआप वाढली माझी.
आज पहिल्यांदाच आलात तुम्ही. काही न खाता नाही सोडणार मी तुम्हाला".
राजू नाराज होऊ नये म्हणून नेहेमीच्या आल्याच्या चहा व्यतिरिक्त मी भजी मागवली. राजू म्हणाला तशी चटणी खरोखरच झणझणीत होती.
नाही नाही म्हणता तासभर होऊन गेला. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन मी तिथून निघालो.
सर थांबा जरा असं म्हणून माझ्या पाया पडून राजूने माझा आशिर्वाद घेतला आणि म्हणाला सर, जोवर तुमच्या सारख्या भल्या माणसांच्या प्रेमाचा, आपुलकीचा आणि मार्गदर्शनाचा #गुलमोहर# बहरलेला राहील तोवर माझ्या सारख्या गरीबाघरच्या अर्धवट शिक्षण घेतलेल्या मुलांना आयुष्यात भीषण वास्तवतेचे चटके कधीच नाही बसणार. तुम्ही दिलेला शाब्दिक आधार, खचून न जाता दिलेली लढण्याची जिद्द आणि असलेल्या परिस्थितीतून कमीतकमी त्रासात सुखरूप बाहेर पडण्यासाठी केलेले मार्गदर्शन मी कधीच विसरणार नाही. मी आज तुम्हाला वचन देतो की माझ्यासारख्या असणाऱ्या गावातील इतर मुलांच्या आयुष्यात देखील  मी तुमच्या सारखाच गुलमोहर बनायचा निश्चित प्रयत्न करीन आणि त्या मुलांमार्फत हे काम असंच पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांना सर्वोतोपरी मदत करीन. 
राजूचं बोलणं ऐकून मला गहिवरून आलं. मी त्याला जवळ घेऊन आशिर्वाद दिला आणि सावकाश पावलं टाकत मी माझ्या गाडीच्या दिशेने निघालो.

© सतीश बर्वे
     २७.०८.२५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...