तासन् तास हातात मोबाईल आणि त्याच्या स्क्रीनवरून स्क्रोल करणारी हाताची बोटं. इंस्टाग्राम, युट्युबवरील रिल्स आणि शॉर्ट्स पाहण्यात आपला किती वेळ जातो हेच आपल्याला कळत नाही. आजकाल इंस्टाग्राम रिल्स, टिकटॉक व्हिडिओ आणि यूट्यूब शॉर्ट्स हे आपल्या मनोरंजनाचा अविभाज्य भाग बनलेत. काही सेकंदांचे असणारे हे व्हिडिओ आपला फक्त वेळच खात नाहीयेत तर त्यांचा आपल्या मानसिक आरोग्यावर आणि दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होतोय.
भारतात २०२० साली टिकटॉक या लोकप्रिय शॉर्ट व्हिडिओ अॅपवर सरकारने बंदी आणली. त्यानंतर इंस्टाग्रामची लोकप्रियता झपाट्याने वाढली. युट्युबनेही 'शॉर्ट्स' नावाचा शॉर्ट व्हिडिओ प्रकार सुरु केला आणि त्यालाही भारतीय प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आजघडीला इंस्टाग्राम रिल्स पाहण्याचं सर्वाधिक प्रमाण भारतात आहे. भारतातील सरासरी ३८ कोटी लोक प्रतिदिन इंस्टाग्राम रिल्स पाहतात. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या अमेरिकेत १६ कोटी लोक प्रतिदिन रिल्स पाहतात.
रिल्स अतिशय वेगवान आणि आकर्षक पद्धतीने बनवलेल्या असतात ज्यात कमीत कमी वेळात जास्तीतजास्त माहिती सांगितली जाते. वेळेचा अभाव असल्यामुळे ही माहितीही थोडक्यात सांगितली जाते आणि त्यामध्ये नाविन्य, वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न केलेला असतो. सोशल मीडियाचा अल्गोरिदमही असा तयार केलेला असतो की आपल्या आवडीच्या विषयांवरील रिल्स आपल्याला सतत दिसत राहतात. रिल्स पाहण्याचं प्रमाण किती आहे हे आकड्यांमधून पाहिलं तर त्याचा आवाका किती आहे हे कळू शकतं. इंस्टाग्राम रिल्स आणि युट्युब शॉर्ट्स स्टॅटिस्टिक्सनुसार आजघडीला जगभरातून प्रतिमहिना २०० कोटी लोक इंस्टाग्राम, युट्युब शॉर्ट्स पाहतात. प्रतिदिन १४०० कोटी वेळा रिल्स पाहिल्या जातात तर युट्युब शॉर्ट्ससाठी हा आकडा ७०० कोटी इतका आहे. प्रत्येक मोबाईल वापरकर्ता त्याच्या एकूण स्क्रीनटाईमपैकी सरासरी ३८ मिनिटे इंस्टाग्राम वापरतो. आज जगाचा प्रतिदिन १.७६ कोटी तास इतका वेळ रिल्स पाहण्यात जातोय.
रिल्सच्या व्यसनाला तरुण पिढी बळी का पडतेय ?
रिल्सच्या व्यसनाला बळी पडणाऱ्यांमध्ये तरुण वर्गाची संख्या जास्त आहे असं समोर आलंय. इंस्टाग्राम रिल्स स्टॅटिस्टिक्सनुसार, भारतातील तरुणवर्ग (वय वर्ष १८-२४) सर्वाधिक रिल्स पाहतो. भारतातील एका तरुण इंस्टाग्राम वापरकर्त्याची प्रतिदिन सरासरी ४४ मिनिटं रिल्स पाहण्यात जातात. यावर कुणीही म्हणेल की दिवसभरातला पाऊण तास मनोरंजनात गेला तर त्यात काय एवढी चिंतेची गोष्ट आहे! पण समजून घ्या, याच तरुण वयात मानवी मेंदूची 'रिवॉर्ड सिस्टीम' विकसित होत असते. म्हणजे एखादं काम केलं की त्यातून मिळणारं समाधान, आनंद इत्यादी. या भावना उत्तेजित करण्याचं काम डोपामाईन हे रसायन करत असतं. सततच्या रिल्स पाहून मेंदू 'डोपामाईन लूप'मध्ये अडकतो. रिल्स पाहून मिळणारं क्षणिक समाधान व्यसनात कधी बदलतं याची पाहणाऱ्याला जाणीवही होत नाही.
काय आहे हा डोपामाईन लूप ?
स्क्रीनवरील एक स्वाईप म्हणजे एक कार्य पूर्ण केलं असं मानलं, तर त्यासाठी आपला मेंदू ते कार्य पूर्ण करण्याचं बक्षीस म्हणून डोपामाईन शरीराला देतं. त्यामुळे साहजिकच कार्य पूर्ण केल्याचं समाधान मिळतं. आता रिल्सचा कालावधीच काही सेकंदांचा असल्यामुळे सतत स्वाईप करून जास्तीत जास्त डोपामाईन मिळवणं सोपी गोष्ट बनून जाते. रिल्स पाहून कमी कष्टात आनंद आणि समाधान मिळत राहतं आणि काही काळात त्याचीच सवय लागून जाते. दारू, सिगारेट अथवा तंबाखूच्या व्यसनामागेही हेच डोपामाईन लूप काम करतं.
रिल्स मुळे 'पॉपकॉर्न ब्रेन' तयार होतो ?
रिल्स सतत आणि वेगाने बदलत असतात. त्यामुळे एका गोष्टीवर जास्त काळ लक्ष टिकवून ठेवण्याची क्षमता कमी होते. यामुळे इतर कामात सातत्य ठेवण्यात अडचण येते. वाचन किंवा कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करणं कठीण होत जातं. रिल्सचा भडिमार होत राहिल्याने एकाग्रता, ग्रहणक्षमता आणि स्मृतीवर परिणाम होतो. शिक्षणातील प्रगतीवरही त्याचा परिणाम होतोच. तज्ज्ञांच्या मते यामुळे 'पॉपकॉर्न ब्रेन' नावाचा एक प्रकार विकसित होतो. थोडक्यात, मनाची अशी अवस्था जिथे विचार क्षणाक्षणाला बदलत राहतात आणि मन एकाही गोष्टीवर स्थिर राहत नाही.
सतत रिल्स पाहत राहिल्याने कोणत्या समस्या उद्भवतात ?
सतत रिल्स पाहिल्याने माहितीचा अतिरेक तर होतोच, पण मानसिक थकवाही येतो. रिल्स पाहणं थांबवलं तर अस्वस्थता येते आणि सतत नवीन रिल्स पाहण्याची गरज वाटत राहते. याला 'फियर ऑफ मिसिंग आउट' म्हणजेच जेन-झी भाषेत फोमो असं म्हणतात. यामुळे वापरकर्ते सतत रिल्समध्ये गुंतलेले राहतात आणि त्यांची सतत स्क्रोल करण्याची सवय वाढतच जाते. शिवाय, रात्री झोपण्यापूर्वी रिल्स पाहण्यासाठी मोबाईलचा जास्त वापर झाला तर डोळे मोबाईलच्या ब्लु लाईटच्या संपर्कात येतात. त्यामुळे मेलाटोनिन हार्मोनची पातळी कमी होते, परिणामी झोप येण्यास उशीर होतो. पुढे जाऊन झोपेच्या अभावामुळे निद्रानाश, थकवा आणि मूड स्विग्ज होऊ शकतात.
रिल्स आपल्याला भावनिक बधिर बनवत आहेत ?
कित्येकदा रिल्सचं आपल्याला व्यसन लागलंय हेच समजत नाही आणि लोक या डिजिटल व्यसनाच्या आहारी जातात. आपल्याला रिल्सचं व्यसन लागलंय हे ओळखायचं कसं? तर तज्ज्ञांच्या मते प्रयत्न करूनही रिल्स पाहणं थांबवता न येणं हे त्याचं सर्वात ठळक लक्षण आहे.
सतत मोबाईल हाताळणं, इन्स्टाग्राम फेसबुकवर रिल्स स्क्रोल करत राहणं आणि त्यासाठी झोप, जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक स्वच्छतेकडे (अंघोळ, शौच इत्यादी) दुर्लक्ष करणं, सोशल मीडिया वापरायला न मिळाल्यास चिडचिड होणं, सोशल मीडियाचा वापर केला नाही तर अस्वस्थ वाटणं, मित्र-परिवारापासून दूर राहणं, स्वतःमध्येच गुंग राहणं, लोकांशी ऑफलाईन बोलताना अडचण येणं, सार्वजनिक ठिकाणी जाणं कमी होऊन अलिप्त राहणं ही रिल्सचं व्यसन लागल्याची लक्षणं असू शकतात. रिल्सच्या व्यसनामुळे भावनिक बधिरताही येऊ शकते. एखाद्या घटनेविषयी, गोष्टीविषयी मनात कोणत्याही भावना नसणं हेही त्यामुळे घडू शकतं. रिल्सच्या या व्यसनाचा परिणाम काम, शिक्षण, नाती, सामाजिक जीवन यावर पडताना दिसून येतो. शाळा, कामाच्या ठिकाणी कार्यक्षमता कमी होताना, गुणवत्ता ढासळताना दिसून येते. नात्यांकडेही दुर्लक्ष होऊन वाद वाढू शकतात. शिवाय रिल्स पाहणं थांबवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला तरी ते असफल ठरणं हे रिल्सचं व्यसन लागण्याचं लक्षण मानलं जातं.
रिल्स हा व्हिडिओप्रकार कितीही मनोरंजक असला तरी त्यांचा आपल्या मानसिक, सामाजिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डिजिटल जगात वावरत असताना रिल्सचं सेवन जागरूकतेने करणं आणि आपल्या सवयींवर जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवणं आता गरजेचं बनलं आहे. स्वतःला किंवा ओळखीच्या कोणालाही रिल्सचं व्यसन किंवा तशी लक्षणं दिसत असल्यास त्यावर चर्चा करणं, समुपदेशन करणं, तज्ज्ञांचा सल्ला घेणंही तितकंच महत्वाचं आहे.
- ऑगस्ट 2025 अनुभव मासिकातील लेख (© मन्सूर मुल्ला )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा