मंगळवार, २ सप्टेंबर, २०२५

2237. अन आत्ता छोटी आत्या झालीय

      तशी ती माझ्याहून पाच वर्षांनी लहान.ती मला दाद्या म्हणायची आणि मी तिला छोटी म्हणायचो.लहानपणी "तुझ्या गळा,माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा"असं म्हणता म्हणता आम्ही एक- मेकांची गळपट्टी पकडायचो.काही वेळातच गुंफलेल्या माळा तुटून पडायच्या आणि छोटीच्या मोठ्या डोळ्यातून पाणीदार मोती टपटप पडायचे.मग आई मध्येच पडायची आणि मला झाडूनं बदडून काढाची.मग मी तिच्यावर रूसून बाहेर पडायचो. 
     पोटात कावळे ओरडू लागल्यावर हळूच घरात शिरायचो तर छोटी,रडून रडून लाल झालेलं नाक खिडकीत खूपसून उपाशीपोटी माझी वाट पहात पेंगत बसलेली असायची.मी दिसताच लगबगीनं आत जाऊन जेवणाचं ताट घेवून यायची आणि ते माझ्या समोर ठेवत म्हणायची "खाऊन घे दाद्या आता,आज तुझ्या आवडीचं केळीचं शिक्रण केलय बघ."
       छोटी शाळेत शिकत होती. त्या दरम्यान माझं पदवी पर्यत शिक्षण झालं होतं आणि मला नोकरीही लागली होती त्यामुळं घरात माझ्यासाठी वधू संशोधन सुरू होत. तेंव्हा मी जाहीर करून टाकलं, छोटीच लग्न झाल्या शिवाय मी लग्नाला उभा राहणार नाही अन्  झालही तसचं. म्हणूनच छोटी माझ्या लग्नात तिच्या नवर्‍यासह सासरच्या आणि माहेरच्या गोतावळ्यात करवली म्हणून तोऱ्यात मिरवत होती.
     सुरवातीला आमच्या नवरा-बायकोकडे छोटीचं बारीक लक्ष असायचं. अधुनमधुन बायको आणि माझ्यात होणाऱ्या भांडणात ती हक्कान मधे पडायची. सुखी संसाराची गुपित उलगडत राहायची आणि अस बोधामृत पाजताना बर्‍याच वेळा मलाच झापायची. पण बायकोपुढे माझ्यात नसणाऱ्या गुणासह माझा दादा किती साधा आणि भोळासांब आहे हे न थकता सांगत राहायची. वहिनीशी तिची चांगलीच गट्टी जमून राहीली होती. सासुला सासुबाई म्हणण्यापेक्षा आईचं म्हटलं तर कसं फायद्याच असतं याचा कानमंत्र ती वहिनीच्या कानात हळुच सांगायची. त्याच बरोबर आईलाही न विसरता बजावायची...
"हे बघ, मी तर आता सासुरवाशीण झालेय पण माझ्या जागेवर आलेली सूनचं तुझी आता मुलगी आहे."
आई नंत्तर वडीलही निघून गेले तेंव्हा छोटी माझ्या गळ्यात पडून खूप खूप रडली आणि म्हणाली...
"दाद्या, आता तुच माझा बाबा..." त्यावर मीही पटकन बोलून  गेलो. "आणि छोटी, तूच माझी आई... " त्या दिवसापासून मी तिचा बाबा झालो आणि ती माझी आई झाली.
     माझ्या पडत्या काळात छोटीच पाठीशी असायची. सुखात आणि दुःखात माझ्या पाठीशी मायेचा, विश्वासाचा आणि आपुलकीचा हात छोटीचाच असायचा. तर प्रत्येक संकटात तीच हक्काचा आधार द्यायची. लहानपणी रक्षाबंधनला ओवाळणीच्या ताटात मी कॅटबरीच चॉकलेट ठेवलं नाही की नाकाचा शेंडा फुगवून बसणारी छोटी बाबांच्या प्राॅपर्टीवरच्या हक्क-सोडपत्रावर सही करताना मी घेतलेली एक साडी आणि अबोलीच्या गजऱ्यात खुष झाली होती. पण त्यावेळी डोळ्यात पाणी आणून माझा हात हातात घेऊन ती जे काही बोलली ते मी कधीच विसरलो नाही म्हणाली...
"दाद्या, ही बाबांची प्राॅपर्टी नाही, तर त्यांनी शुन्यातून निर्माण केलेला स्वर्ग आहे. हा अनमोल खजिना नशिबान तुला  मिळालाय. त्याला जीवापाड जपून ठेव, वाढवं आणि त्यात राहणाऱ्या सगळ्यांना आनंदात ठेव."
ज्या घरात ती जन्मली, खेळली, बागडली, लहानाची मोठी झाली ते तिचं माहेरच अंगण तिला कधीच परकं वाटू नये म्हणुन मी सर्वाथानं प्रयत्न करत राहिलो. पण, जगरहाटीच्या दुनियादारीत कुठंतरी उणीव रहात होती आणि काळ कुणासाठी थांबत नसतो हे खरचं  आहे.
     दिवसा मागून दिवस जात होते. पहाता पहाता छोटी दोन मुलांची आई झाली. मलाही मुलं झाली. तिची-माझी मुलं मोठी झाली. ती, तिचा नवरा, मुलं आणि संसारात गुरफूटून गेली. मीही रिटायर झालो अन् त्याच वेळी जाणवलं, ती केवळ छोटी राहिलेली नव्हती तर ती छोटीची, "छोटी आत्या" झालेली होती आणि मी, दाद्याचा दादामामा कधी झालो हे मलाही समजलच नव्हतं. आता आमच्यात बहिण-भाऊ या नात्याबरोबरच आत्या आणि मामा नांवाच नवीन नातं रूजू लागलं होतं. छोटी आता माझ्या पेक्षा तिची वहिनी आणि भाचे यांच्यामधेच रमलेली असायची. पण त्यांचा तो आनंद सोहळा पाहून मीही सुखावत होतो. 
     माझ्या मुलांच्या लग्नात अगदी वधुसंशोधना पासून साखरपुडा ते मुहूर्तमेढी पर्यत सगळ्याच कार्यक्रमात छोटी आत्या चाच मान मोठा होता. घरात नव्यानं आलेल्या सुनेला म्हणजे तिच्या भाच्याच्या बायकोला बाजुला घेवून ती भाच्याचं कौतुक सांगायचीच पण त्याच बरोबर "तुझ्या देवगुणी सासर्‍यालाही जप" अस डोळ्यात पाणी आणून सांगायला विसरायची नाही. उपजतच असलेल हे नात्यांच नाजुक रोप हळू-हळू उमलत राहीलं, वाढत राहिलं, पसरत राहिलं. त्याला प्रेम,आपुलकी आणि जिव्हाळयाच्या फांद्या फुटत राहिल्या आणि त्यावर विविध रंगाची भावफुल कधी बहरली कळालच नाही.
     आता छोटीच्या आणि माझ्याही घरात नातवंड खेळू लागली होती. नवीन पिढी त्यांच्या नव्या जगात व्यस्त होती. माहेरात तिचं लेकीचं स्थान होतचं पण त्याचं रूपांतर आता आत्याच्या नात्यात झालं होत. पण बदलणारी नाती, वाढत चाललेल वय यामुळं तिची माहेरची ओढ तसूभरही कमी झाली नव्हती. कदाचित उतार वयामुळे त्या ओढीत वेगळीच खोली आणि ओलावा जाणवत होता. खरंतर आयुष्याच्या याच वळणावर तिला माहेरच्या प्रेमाची, जिव्हाळ्याची आणि मायेची गरज होती. म्हणतात ना "माय मरो पण माहेरची माया न मरो !!!"
पण खर सांगू?  छोटीच पुर्वीच माहेर आणि आत्ताच माहेर यात खूपच फरक पडलाय. यात तशी कुणाचीच चुक नाही पण दुनिया दारीच्या बाजारात नकळत आलेली ही अलिप्तता आणि परके पणाचा भाव तिच्या जिव्हारी लागतोय. छोटीची ही घालमेल मला दिसतेय, जाणवतेय पण त्याच दुनियादारीच्या चक्रात अडकलेल्या मला "कालाय तस्मै नमः" असं म्हणून स्वतःलाच समजावण्या शिवाय दुसरा पर्याय नाही. छोटी आता थोडीशी वार्धक्याकडे झुकू लागलेली आहे. तरीही ती माझ्यासाठी कायम आणि कायम छोटीच आहे आणि मी तिचा दाद्याच आहे. म्हणूनच लहानपणी आम्ही गुंफलेल्या मोत्यांच्या माळा आजही ताज्या टवटवीत आहेत अगदी जश्याच्या तश्या.
यासाठीच त्या जगदीशाचं मनापासून आभार आणि पुर्नजन्म ही संकल्पना खरी असेल तर जन्मोजन्मी आमची ही बहिण-भावाची जोडी अशीच सलामत राहो हिच त्याच्या चरणी प्रार्थना.

(नात्यांच्या ऋणानुबंधातून हरवत चाललेल्या आत्या या मायाळू पात्राचा हा शब्दसुमन हार तिच्या आणि माझ्या तमाम भाच्यांना समर्पित.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...