मंगळवार, २ सप्टेंबर, २०२५

2223. सासू आणि सून..अतिशय नाजूक पण अनोखं नातं

       एक स्त्री लग्न करून एका नवीन घरात पदार्पण करते. घराच्या कानाकोपऱ्यात, भिंतींवर, वस्तूंवर तिचा हात फिरतो आणि परकं म्हणता म्हणता ते हळूहळू तिचं  स्वतःचं कधी होऊन जातं हे तिलाही कळत नाही. त्या घरातली माणसं तीची होतात, त्या घराचे नोकरचाकर तीचे होतात त्या घरातलं अंगण तिचं होतं, अंगणातली झाडं  तिची होतात, झाडांची पानं फुलं ही तिची होतात. या सगळ्यावर ती खूप प्रेम करत असते आणि म्हणून ती ते आपलं स्वतःचं मानत असते. मग हळूहळू  'माझं' चे रूपांतर 'स्वामित्व' मधे होऊ लागते. कधीकधी ही स्वामित्वाची भावना इतकी प्रबळ होते की आपल्या राज्यात दुसर्‍यांचे आगमन हा उगाचच  'शिरकाव' वाटू लागतो. 
आत्तापर्यंत तुम्हांला समजलं असेल ही 'दुसरी' व्यक्ती कोण? हो बरोबर ओळखलंत...सून. 
काही दिवसांपूर्वी मला एका सासूबाईंचा फोन आला. म्हणाल्या मला मदत करा, मी खूप गुंतत चालली आहे. या विचारातून कशी बाहेर पडू कळत नाहीये.
मी म्हटलं मला नीट सांगाल का?
त्या म्हणाल्या  'दोन महिन्यापूर्वी माझ्या मुलाचं लग्न झालं. नविन सून घरात आली आणि लगेच लॉकडाउन सुरू झालं. नविन जोडप्याला कुठे फिरायला ही जायला मिळालं नाही. त्यांना दोघांना एकमेकांना वेळही देता आला नाही. मला खरच त्याचे वाईट वाटतेय पण का कुणास ठाऊक पण मला बरेही वाटतेय की आपला मुलगा आपल्या सोबतच राहिला. सूनही बरोबर राहील. ते एकमेकांना वेळ देतील पण मलाही त्यांच्यासोबत वेळ घालवता येइल. सुरवातीला ठीक वाटले पण नंतर नंतर आत कुठेतरी तुटल्यासारखं वाटायला लागलं ओ... काहीतरी सुटल्यासारखं वाटतेय. आपलं राज्य गेलं, आपला डाव संपला असं काहीसं वाटायला लागले आहे. सूनबाई छान आहे. घराला अगदी आपलंसं केलं तिने थोड्याच दिवसात पण मला तेच खटकतंय ओ... का असं? 
तिची विचार करण्याची पद्धत वेगळी, तिचं रहाणीमान वेगळं, तिचं जेवण बनवण्याची पद्धत वेगळी, घर लावणं, सजवणं याची पद्धत वेगळी. ती सगळं करते पण तिच्या पद्घतीने. मला हे पचवणं थोडं कठीण जातय. माझं लेकरू आता माझं राहिलं नाही, माझं घर आता माझं राहिलं नाही असे काहिसे विचार आताशा मनात यायला लागले आहेत. डोकं भणभणतं ओ माझं. मला सांगा माझं कुठे चुकतंय.
मी म्हटलं 'पहिले तुम्ही शांत व्हा बरं, इतकं काही झालेलं नाहीये आणि तुमचं इतकंही काही चुकलेलं नाहीये.
मला एक सांगा तुमच्याकडे बाग आहे?  त्या बागेत झाडं तुम्ही स्वतः लावली. बरोबर? तुम्ही ती रोपटी कुठूनतरी आणून तुमच्या अंगणात लावली असतील ना? 
त्या अगदी उत्साहाने म्हणाल्या ' हो तर... एक एक रोपटं मी  स्वतः आणून आमच्या बागेत लावलं आहे. 
मी म्हटलं 'तुम्ही झाडांना पाणी घालता खत घालता म्हणजे नक्की कूठे घालता? झाडाला की मातीला?
त्या म्हणाल्या 'मातीला'... 
मी विचारलं 'का? मातीला का घालता? थेट त्या रोपट्यांना का नाही घालत ? 
त्या म्हणाल्या ' अहो मातीला पाणी घातलं तर त्या रोपट्यांच्या मुळांना ती पकडून ठेवेल आणि मग ते रोपटं छान रुजेल ना, मातीत खत घातलं तर ते अन्न मुळातून झाडाला पोहोचेल ना'
मी म्हटलं  'अगदी बरोबर आहे  पण म्हणजे त्या दुसरीकडून उपटून आणलेल्या छोटयाशा रोपट्याला आपल्यात सामावून घेण्याची जबाबदारी मातीची आहे आणि  म्हणून त्या मातीला आपण खतपाणी घालून तेवढं सक्षम करतो. बरोबर ?
त्या क्षणभर गप्प होत्या. कदाचित त्यांना त्यातला मतितार्थ कळत होता. 
मी पुढे म्हणाले  'आपल्या घरात येणारी दुसर्‍या घरची मुलगी ते रोपटं आहे आणि आपण माती. आपली जबाबदारी पहिली. तिची जबाबदारी असतेच, यात शंकाच नाही आणि आपल्या संस्कृतीत ती निभवण्याचे धडे तिच्याकडून लहानपणापासूनच गिरवून घेतलेले असतात. पण मग तरीही हे रोपटं रुजायला वेळ का लागतो? कारण माती कधीकधी आपला धर्म सोडून वागते. मातीचा धर्म आहे रोपट्यांचे पोषण करून त्यांच्या मुळांना आपल्यात सामावून घेणे, स्वतःला घट्ट करून, त्या छोटया छोटया नाजूक मुळांना घट्ट पकडून त्यांना वाढण्यास, रोपट्याचे वृक्षात रूपांतर होण्यास मदत करणे. माती कधीही असा विचार नाही करत की ही माझी हद्द आहे, इथे दुसरं कुणी आलेलं मला चालणार नाही.
त्या हसल्या आणि म्हणाल्या 'समजतंय मला' 
मी त्यांना हसून म्हणाले, 'अहो आपण फक्त कर्म करायचं, धर्म निभवायचं आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे कायम लक्षात असू द्यायचे की आपण सून आपल्या मुलाचा संसार फुलवण्यासाठी आणत आहोत तर ती तेच करणार आणि आपण तिला ते फुलवण्यासाठी मदत करायची आहे कारण आता आपली भूमिका बदलली आहे, आता आपला धर्म मातीचा आहे.  मला त्यांना एवढंच सांगून चालणार नव्हतं. हे समजवलेलं शेवटपर्यंत टिकावं म्हणून मला त्यांच्यावर थोडे औषधोपचार करणं जरुरी होतं.  
आपलं मुल,आपलं घर आपलं राहिलं नाही ही काहीतरी तुटल्याची, काहीतरी मागे सुटल्याची भावना, त्यातून येणारा एकटेपणा, एकटेपणातून आलेले नैराश्य, विचारांचा गुंता, भविष्याची चिंता, आपण असे का वागतो असे वाटून येणारा अपराधीपणा आणि या सगळ्यामुळे जडलेला निद्रानाश या सगळ्यावर त्यांना औषधं दिली.
त्या जाता जाता मला म्हणाल्या ' तुम्ही या मातीला नुसतं खतपाणीच घातले नाही तर तिला तिचा धर्म सुद्धा शिकवलात.
मी त्यांना म्हणाले 'याचे श्रेय कदाचित माझ्या आईला जाईल कारण लहानपणापासून मी तिला माती होउन दुसर्‍यांना सामावून घेताना पाहिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...