* समुद्रमंथनातून जसं हलाहल विष बाहेर पडलं, तशी अनेक रत्ने बाहेर पडली. त्यातील एक होतं, "पारिजातक" ❗
* द्वारकेत सत्यभामेने कृष्णाकडे हट्ट धरला की, मला तो पारिजातक माझ्या अंगणात हवा, किती छान सुवास आहे त्याला. तो पारिजातक माझ्या अंगणातचं लावा ❗
* कृष्ण हसला, त्याने समजुतीच्या स्वरात सत्यभामेला सांगितलं, सत्यभामे, पारीजातक हा अमूल्य आहे. त्याचा सुवास जितका मनमोहक, तितकं त्याचं बहरणं सोप्पं नाही. पारिजातक एका जागेवरून दुसऱ्या मातीत हलवला तर रुजत नाही आणि रुजला तर, याची फुलं मालकीच्या अंगणात पङत नाहीत. पण स्त्री हट्टापुढे कृष्णाचं काही चालेना ❗
* रुक्मिणीनेही तात्काळ ते झाडं सत्यभामेच्या अंगणात लावायची अनुमती दिली. सत्यभामेला खूप आनंद झाला पारिजातक तिच्या अंगणी लागला, रुजलाही. पण बहर मात्र सगळा रुक्मिणीच्या अंगणात पडू लागला. आता सत्यभामेला कळून चुकलं, आपण नको तो हट्ट करून बसलो ❗
* फुलं तर गेलीचं, पण आपण सुखालाही मुकलो आणि पर्यायाने कृष्ण पुजेलाही दुरापास्त झालो आणि पश्चातापा शिवाय तिच्याकडे काहीच उरलंही नाही ❗
गोष्ट साधी, सोपी आणि सरळ, पण..
* आयुष्यात माणसाने कुठला हट्ट धरावा आणि त्यापायी आहे ते ही सुख गमवावं, यासारखं दुर्दैव नाही. कृष्णाने आयुष्यभर सगळ्यांना हेच सांगितलं आहे ❗
* जे आपलं असेल ते नशिबाने तुमच्याकडे येईलचं, वाट पहा.
हव्यासाने मात्र जे जवळ आहे, तेही गमावून बसाल ❗
* नशीब व आयुष्य आहे तसे स्वीकारा. त्यात बदल करायचा प्रयत्न केला तर त्याचं मूळ अस्तित्व तर बदलतच, पण त्याच बरोबर तुमच्याकडे येतं ते फक्त नैराश्य. युधिष्ठीर, दुर्योधन, द्रौपदी आणि अगदी पितामह भिष्मही यातुन सुटले नाहीत ❗
* आपल्या हक्काची गोष्ट नसताना तिचा अट्टहास करणे किंवा त्या गेलेल्या गोष्टींचा मनात अहंकार धरणे, या दोन्ही गोष्टी माणसाला शुन्य करतात. भगवंताने प्रत्येकाला काही ना काही कारणाने वेगवेगळे घडवलेय सगळी कडे समानता येऊ शकत नाही आणि आपणही हा अट्टाहास करणं चुकीचं असते ❗
* कृष्णनीती हेच सांगते. सर्व काही प्रेमाने जिंकता येतं, पण जिथे हव्यास आला की त्या गोष्टी आयुष्यात येऊनही कोणासही निरर्थकचं होतात ❗
* राधा कृष्णप्रेमात आकंठ बुडालेली होती, संसार सागरही तिने त्याच तंद्रीत पार केला. मीरेची भक्ती इतकी, की तीने राजयोग टाळुन कृष्ण भक्तीत आयुष्य कंठलं आणि योगायोगाने या दोघींनाही 'कृष्ण' भरभरून मिळाला. तिथे तक्रारीला जागाचं नव्हती❗
* तीच गोष्ट रुक्मिणीची. कृष्ण जन्म सोडून, कलियुगातही भीमेकाठी २८ युगांपासुन, पांडुरंगा सोबत एका विटेवर उभी ठाकलीये. अजून "कृष्णसंग" काय हवा❓
* सत्यभामेला पती म्हणून लाभलेला कृष्ण कधी कळलाचं नाही. कृष्ण जवळ आहे, याही पेक्षा इतर गोष्टी माझ्याकडे नाहीत, याचं वैषम्य तिला जास्त होतं. त्यामुळेचं आयुष्याचा जोडीदार कृष्ण असुनही, तिला तो भेटलाच नाही❗
* कृष्ण अर्जुनाला, विदुराला, इतकच काय अगदी कर्णालाही भेटला. कारण त्यांच्या अंतर्मनात कृष्ण होता, त्यावर श्रद्धा होती. श्रद्धेने विनासायास सर्वांना कृष्णलीलेत सामावुन घेतलं❗
* कृष्णाने त्याच्या पायाशी कधी कुणाला येऊ दिलं नाही. कारण त्याच्या जवळ जो गेला, त्या प्रत्येकाला त्यानं हृदयस्थ केलं. त्यासाठी त्याच्यावर अढळ श्रद्धा हवी. केवळ भक्तिमार्गाने कृष्ण भेटेल की नाही हे माहित नाही, पण त्यावर श्रद्धा ठेवली तर तो नक्कीचं सर्वांना हृदयस्थ करतो❗
* भक्ती आणि श्रद्धेत हाच तो फरक आहे. भक्ती स्वार्थी असते, इच्छा पूर्ण झाली तर भक्ती पुढे कशात रूपांतरित होईल हे आपण जाणतो व मनोइच्छित पूर्ण नाही झालं तर, देवही बदलला जातो❗
* भक्ती म्हणजे अंधविश्वास, त्याचं खरं रुप काय ते नाही सांगु शकतं. पण श्रद्धा म्हणजे कृष्णाचं, कृष्णा वरच्या चिरंतन विश्वासाचं नातं. मग त्याला फलित, मुक्ति, असे काहीही म्हणा. आणि म्हणुनचं कृष्णं दिसायला कितीही अवखळ, सोपा, सरळ वाटला तरी, त्याला समजणं वाटत तितकं सोपं नाही. त्यासाठी मनापासून कृष्ण अनुभवावा लागतो, कृष्ण जगावा लागतो, आणि मुख्य म्हणजे कृष्ण हृदयी उतरवावा लागतो. नाही तर.. सत्यभामेसारखा पश्चात्ताप, रुखरुख नित्याचीचं पदरी येईल ‼️
|| कृष्ण जगावा लागतो ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा