1) ती आणि तो गेल्या आठ वर्षांपासून लिव्ह इन मध्ये रहात होते. हळूहळू त्याचं तिच्यावर स्वामित्व गाजवणे सुरू झाले. तो आपली काळजी करतो बघून सुरवातीला तिला ते आवडलंही होतं पण नंतर नंतर मात्र त्याचा होणारा अतिरेक तिला नकोसा झाला. त्यामुळे त्यांच्यात वरचेवर भांडणं होऊ लागली. शेवटी कंटाळून तिने त्याच्यासोबत ब्रेकअप केलं. आठ वर्षांचा सहवास क्षणात मोडला. कुठलेही कायद्याचे झंझट,पैशांचे देणंघेणं न करता दोघं वेगळी झाली. पटलं तर सोबत रहायचं नाहीतर वेगळे व्हायचे. आजकालच्या तरूणाईमध्ये हा सिंपल फंडा जोर धरू लागलाय.
2) त्या दोघांनी लिव्ह इन मध्ये रहायचे ठरवले या अटीवर की आपण जर एकमेकांच्या पसंतीवर उतरलो तर लग्न करू अन्यथा नाही. दोन वर्ष सोबत राहिले. एकमेकांना समजून घेतले(?) आणि शेवटी लग्न केले. लग्नानंतर मात्र सहा महिन्यांत वेगळे व्हायचा निर्णय घेतला कारण लग्नानंतर आलेली बंधनं दोघांनाही नको होती.
3) ती आणि तो एका कार्यक्रमात भेटले. तो तिच्या सौंदर्यावर तर ती त्याच्या गलेलठ्ठ पगारावर भाळली. बंधनात अडकण्या अगोदर आपण सोबत काही महिने रहावे असे ठरले. हा तिचा तिसरा पार्टनर तर ती त्याची चौथी पार्टनर. सात महिने सोबत राहिल्यानंतर दोघांनी वेगळे व्हायचे ठरवले कारण त्याला तिचं इतर पुरुषांसोबत बोलणे आवडायचे नाही तर तिला त्याचे इतर स्त्रियांशी फ्लर्ट करणे आवडायचे नाही. दहा ठिकाणी तोंड मारण्याची लागलेली सवय सोडणे दोघांनाही जमणार नव्हते.
4) दोघेही उच्चशिक्षित. भरगच्च पगार कमावणारे. पाहूनदेखून लग्न करणे म्हणजे आउटडेटेड समजणारे. आईवडिलांपेक्षा आपल्याला जास्त कळते हा टेंभा मिरवणारे. आईवडीलांनी सगळं त्यांच्यावर सोडलं. दोघं सोशल मिडियावर भेटले.ओळख झाल्यावर लिव्ह इन मध्ये आले. ती प्रॅक्टीकल तर तो इमोशनल. एकदम विरोधाभासी समिकरण. टिकणे अशक्य. झाले ब्रेकअप. ती त्यांच्या भाषेत मुव्ह ऑन झाली तर तो मनातून कोसळला. वर्षभर मनोविकार तज्ञांकडे खेटा घातल्या तेव्हा डोकं जागेवर आलं. आईवडिलांनी शोधून दिलेल्या मुलीसोबत लग्न केलं आज सुखात आहे.
5) दोघे एकाच कंपनीत. ती हसरी, खेळकर, भावनिक तर तो आत्मकेंद्रित आणि मुलखाचा प्रॅक्टीकल. रोज भेटता भेटता एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे काही कमिट करण्याअगोदर आपण चार पाच महिने सोबत राहू असा त्याचा आग्रह तर तिचा त्याला नकार. शेवटी त्याने तिला जळविण्यासाठी ऑफिस मधल्या दुसरी सोबत सुत जमवले. आपण याच्यासोबत लग्न करून आपल्या आयुष्याशीच प्रताडणा केली असती. बरे झाले पहिलेच कळले म्हणून आपण वाचलो तिने मनोमन आपल्यावर झालेल्या संस्कारांचे आभार मानले. ती बदली मागून दुस-या ठिकाणी गेली. आज एका गोजिरवाण्या मुलीची आई आहे.
वैशाली गोस्वामी
कधी कधी कोणाचा स्वभाव आयुष्यभर त्याच्यासोबत राहूनही कळत नाही मग एकमेकांना समजून घेण्याच्या नावावर लिव्ह इनमध्ये रहाण्याचा जो गोंधळ घातला जात आहे तो कितपत योग्य आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा