मंगळवार, २ सप्टेंबर, २०२५

2201. नावात काय आहे ?

      पॅसेंजरने उतरुन मी स्टेशनबाहेर आलो. डाॅक्टरांना सकाळी दहा वाजता भेटायचं होतं आणि आताशी नऊ वाजले होते.माझ्याकडे अजून एक तास शिल्लक होता . मला भुक लागली होती. मी स्टेशनजवळची हाॅटेल्स पाहिली पण ती एकजात सगळी गचाळ होती. मला आठवलं ज्या डाॅक्टरांकडे जायचं होतं त्यांच्या जवळच एक समर्थ रेस्टॉरंट होतं.मी एकदोनदा तिथं चहा प्यायलो होतो.तिथल्या गरमागरम पदार्थांच्या वासाने मला तेव्हा नाश्ता करायची इच्छा झाली होती. पण घाईत असल्याने मी नाश्ता केला नव्हता. आज मात्र माझ्याकडे वेळच वेळ होता शिवाय मला भुकही लागली होती. माझी पावलं आपसूकच त्या हाॅटेलकडे वळली.हाॅटेल बऱ्यापैकी मोठं होतं.स्वच्छही दिसत होतं पण तरीही तिथं अजिबात गर्दी नव्हती. वीसपंचवीस टेबलपैकी फक्त दोन टेबलवर दोन माणसं बसली होती. मागेही मी आलो तेव्हाही या हाॅटेलमध्ये गर्दी नव्हती. या हाॅटेलची क्वालिटी वाईट तर नाही? नाही तर अगदी मोक्याच्या ठिकाणी असूनही तिथं गर्दी का नसावी? प्रश्न पडून मी घुटमळलो आणि दुसऱ्या हाॅटेलमध्ये जाऊ असा विचार करुन मी पायऱ्या उतरणार तेवढ्यात गल्ल्यावरच्या माणसाने आवाज दिला." काहो साहेब काय हवं होतं?" 
" काही नाही नाश्ता करायचा होता " 
" अहो मग या ना.आलूवडा आहे,मिसळ आहे.भजी,पोहे ,चहा,काॅफी सगळं आहे.या सगळं गरम मिळेल " 
मी थोड्या नाराजीनंच आत येऊन एका टेबलवर बसलो
वेटर लगबगीने पुढं आला.
" काय आणू साहेब?" त्यानं विनम्रतेनं विचारलं 
" गरम काय आहे?"
" मिसळ एकदम गरम आहे.बाकी वडा ,भजेही ताजे आहेत"
" एक मिसळ आण "
तो गेला आणि दोनच मिनिटात मिसळपाव घेऊन आला‌. सोबत दही ,चिरलेला कांदा, लिंबाची फोड आणि एका मोठ्या वाटीत मिसळीचा रस्सा. मिसळीचा वास तर खुप छान येत होता. मी कांदा टाकून मिसळीचा घास घेतला. मस्तच होती मिसळ.पावही एकदम साॅफ्ट आणि ताजे होते. मिसळ खाताखाता मी हाॅटेलमध्ये नजर टाकली. हाॅटेलच्या भिंती आणि फर्निचर जुनं दिसत होतं.यामुळे तर लोक इथं येत नसावेत? पण ती शक्यता मी फेटाळून लावली.ब ऱ्याच गावातली यापेक्षा जुनी आणि गचाळ हाॅटेलं जोरात चालत असलेली मी पाहिली होती. याचं हाॅटेलच्या पुढच्या चौकात एक ब्रजवासी नावाचं हाॅटेल होतं. तेही गचाळच होतं पण तिथं नेहमीच गर्दी दिसायची. काही हाॅटेल्सचं नशीबच वाईट असतं. नाहीतर इतकी चांगली चव असतांना लोकांनी याकडे पाठ नसती फिरवली. मिसळ खाऊन झाल्यावर मी चहा मागवला. गवती चहा टाकल्यामुळे तोही खुप चांगला होता. मी तिथं पडलेलं मेनू कार्ड पाहिलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सगळ्या पदार्थांचे रेटस् बरेच कमी होते. मी खाल्लेली मिसळ तर फक्त तीस रुपयाची होती. इतका छान चहा तोही फक्त दहा रुपयाचा होता.
मी पैसे द्यायला काऊंटरवर आलो. चाळीस रुपये देऊन तिथल्या माणसाला म्हणालो.
" मिसळ आणि चहा दोन्हीही छान होते " 
तो कसानुसा हसला मग म्हणाला 
" येत जा साहेब. तुम्ही मागेही एकदोनदा येऊन गेले होते ना?" 
" हो. बरोबर. चहा प्यायला आलो होतो " 
त्यानंतर जेव्हा जेव्हा मलकापूरला गेलो. तेव्हा तेव्हा त्याच हाॅटेलमध्ये जाऊन मी नाश्ता केला. तिथले सगळेच पदार्थ रुचकर होते. चहा तर नंबर एक होता. पण हाॅटेलमध्ये नेहमी दोनतीनच गिऱ्हाईक बसलेले दिसायचे. मला त्याचं खुप वाईट वाटायचं. एक दिवस हे हाॅटेल नक्की बंद पडणार याबद्दल माझ्या मनात शंका उरली नाही. मध्ये तीनचार महिने कंपनीनं मला मराठवाड्याचं काम दिलं त्यामुळे मलकापूरला जायला मला जमलं नाही. चार महिन्यांनी मी परत मलकापूरला गेलो.समर्थ हाॅटेलमध्ये जाऊनच नाश्ता करायचा हे मी ठरवलं होतं. त्यानुसार तिथं गेलो तर समर्थ रेस्टॉरंट कुठंच दिसेना. त्याजागी आता हाॅटेल गुजरात दिसत होतं. म्हणजे माझी शंका खरी ठरली होती. नावासोबत अर्थातच हाॅटेलचं बाह्यस्वरुपही बदललेलं दिसत होतं. आता आलोच आहे तर इथंच नाश्ता करु या विचाराने मी आत घुसलो. काऊंटरवर वेगळाच माणूस बसलेला दिसत होता. याचा अर्थ स्पष्टच होता. पुर्वीच्या मालकाने हे हाॅटेल कुणा गुजराती माणसाला विकलं होतं. आतमध्ये खुप गर्दी होती. एकही टेबल रिकामं दिसत नव्हतं. काय करावं याचा विचार करत असतांनाच वेटर आला. त्यानं मला एका माणसाला सरकावून बसायला जागा करुन दिली. हाॅटेलचा लूक पुर्णपणे बदलला होता. भिंतींना नवीन वाॅलपेपर लागले होते. फर्निचर नवीन दिसत होतं. मी मेनू कार्ड बघितलं. पुर्वीच्या टिपीकल भजे, मिसळ, बटाटावडा या पदार्थांसोबत आता खमण ढोकळा, पुरीभाजी,मसाला डोसा, इडली, मेदूवडा असे बरेच पदार्थ नवीन दिसत होते. पदार्थांचे रेटसही तगडे दिसत होते. मागील रेटपेक्षा जवळजवळ दुप्पट. मी मिसळ ऑर्डर केली. एकंदरीत वातावरणावरुन आणि गर्दीवरुन मराठी माणसाला धंदा जमत नाही हे अनेकांचं मत मलाही योग्य वाटू लागलं. मिसळ आली. त्यासोबत नेहमीचाच कांदा दही वगैरे मालमसाला होता पण खाण्याच्या प्लेट्स, चमचे वगैरे आकर्षक दिसत होते. मी चव घेतली. ती पुर्वीसारखीच छान होती. याचा अर्थ आचारी बदलला नव्हता. यावेळचा चहा मसाला घालून केलेला होता. तोही छानच होता. चला मालक बदलला तरी चव तीच पुर्वीची आहे याचं मला समाधान वाटलं. फक्त यावेळी मला दुप्पट पैसे द्यावे लागणार होते याची कुठंतरी खंत वाटत होती. मी काऊंटरवर पैसे द्यायला गेलो आणि चमकलोच. मघाशी तिथं बसलेला माणूस बाहेर उभा होता आणि काऊंटरवर पुर्वीच्या समर्थ रेस्टॉरंटचा माणूस बसलेला होता. मला पाहून तो हसला
" नमस्कार साहेब" 
" नमस्कार.तुमच्या मालकाने हे हाॅटेल गुजराती माणसाला विकलंय का?"
" नाही तर. मीच या हाॅटेलचा मालक होतो आणि आहे " 
" तुम्ही गुजराती आहात का?"
तेवढ्यात कस्टमर पैसे द्यायला आले म्हणून मी बाजूला सरकलो. कस्टमर गेल्यावर मी परत तोच प्रश्न त्याला केला.
" नाही मी मराठीच आहे "
मी कोड्यात पडलो.
" पण मग तुम्ही हाॅटेलचं नाव का बदललं?"
परत एकदा कस्टमर आले. पैसे देण्याघेण्यात परत पाच मिनिटे गेली. कस्टमर मराठी आहेत हे दिसूनही हा माणूस त्यांच्याशी हिंदीत बोलत होता.
" साहेब याला कारण आपली मराठीच माणसं आहेत " तो सांगू लागला " दोन वर्षांपूर्वी हे हाॅटेल टाकलं तेव्हा मोठ्या हौसेनं हाॅटेलचं नाव समर्थ ठेवलं. वाटलं आपली मराठी माणसं स्वामी समर्थांचं नाव पाहून हाॅटेलला येतील. खुप जोरात चालेल आपलं हाॅटेल. पण हाॅटेलचं नाव मराठी , मालकही मराठी म्हणजे हे हाॅटेलही कमी दर्जाचं असा समज आपल्या मराठी माणसांनी करुन घेतला. तुम्हांला सांगतो साहेब आपल्या मराठी माणसांना मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा, मराठी खाद्यपदार्थांचा जराही अभिमान नाही. तो जर असता तर मुंबईत नव्वद टक्के हाॅटेल्स परराज्यातील लोकांची दिसली नसती. तिथंच काय इथे मलकापूरातही परक्या लोकांचीच हाॅटेल्स जास्त आहेत आणि हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती निर्माण होतेय. महाराष्ट्राचे काय स्वतःचे खाद्यपदार्थ चांगले नाहीत? "
कस्टमर आले तसा तो थांबला. कस्टमर मराठी दिसत होते पण ते त्याच्याशी हिंदीत बोलत होते. ते गेल्यावर तो म्हणाला " बघितलं साहेब माणसं मराठी होती पण हिंदीत बोलत होती. का? कारण आम्हांला मराठी भाषेचा अभिमानच नाही. महाराष्ट्रात असूनही तुम्ही मराठी माणसाशी हिंदीत बोलता. मराठी भाषा काय नाॅन स्टँडर्ड आहे? मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय म्हणे आणि इथे आम्हांला मराठीत बोलायचीही लाज वाटते. मराठी लोकांची मानसिकताच वाईट आहे साहेब." 
त्याचे मुद्दे मला पटत होते. बरेच मराठी डाॅक्टर्स मी मराठी आहे हे माहीत असूनही माझ्याशी हिंदी किंवा इंग्रजीत बोलायचे आणि माझ्यासारख्या एम.आर.ना फार्मा कंपन्यांचे प्राॅडक्टस् विकायचे असल्याने त्यांच्याशी आम्हांला नाईलाजास्तव हिंदीत बोलावं लागायचं.
" खरंय तुमचं म्हणणं " मी म्हणालो " बघा ना मराठी माणसं मराठी गाणी ऐकत नाहीत, मराठी चित्रपट पहात नाहीत. फक्त हाॅटेल्सच नाहीत तर जवळजवळ सगळे व्यवसाय नाॅन मराठी लोकांच्या ताब्यात गेले आहेत. आपल्याकडचे कॅटरर्स पहा. बहुतेक राजस्थानी आहेत. फॅक्टरीतले कामगार  बिहारी आहेत. महाराष्ट्राची म्हणजे मराठी लोकांची राजधानी असूनही मुंबईत हिंदीच बोलणारे जास्त सापडतात. मराठी माणसांसोबत मराठी भाषाही मुंबईतून हद्दपार होतेय " 
" अहो साहेब मुंबईचं सोडा. आमच्या विदर्भातही तेच होत चाललंय. एक दिवस बघा महाराष्ट्राचं मंत्रीमंडळ आणि मुख्यमंत्रीही परप्रांतीयच असणार आहे आणि ही संधी आपले आपापसात भांडणारे मराठी आमदारच त्यांना देणार आहेत हे नक्की " 
" पण काहो तुम्ही हाॅटेल गुजरात हे नाव कसं ठेवलंत ?"
" तुम्ही पाहीलंच की हाॅटेल फारसं चालत नव्हतं. कामगारांचे पगार सुद्धा करणं मला कठीण होऊन बसलं होतं. हाॅटेलमधले मराठी वेटर्स , कामगार सोडून गेले. गंमत बघा साहेब आपले मराठी कामगार मारवाडी, सिंध्यांकडे कमी पैशात निमुटपणे काम करतात. पण मराठी माणसाकडे जास्त पगार मिळूनही नखरे करतात. खाडे मारतात, मालकाला जमेल तसं छळून घेतात. माझी आई गुजरातची. त्यामुळे गुजराती भाषा आणि गुजराती पदार्थ आम्हांला चांगले येतात. मी हे हाॅटेल टाकतांना माल काढणारा मुख्य कारागीर मराठी ठेवला होता. पण तो दारु पिऊन यायचा आणि खुप खाडे करायचा म्हणून त्याला काढून मी गुजरातमधून कारागीर बोलावून आणला .तो मात्र मेहनती आणि इमानदार होता. माझ्या पडत्या काळातही तो मला सोडून गेला नाही. त्यानंच मला हाॅटेलचं नाव गुजरात करण्याचं सुचवलं. एकंदरीत परिस्थितीमुळे मलाही ते पटलं. मग मी नाव तर बदललंच पण आतलं इंटिरिअरही बदलून टाकलं. त्याच कारागीरानं गुजरातमधले कामगार बोलावून घेतले. आता माझ्याकडचा सगळा स्टाफ गुजराती आहे. हे लोक कधीच मराठी माणसांसारख्या दांड्या मारत नाहीत, दारु पिऊन येत नाहीत, पगार उशीरा दिला म्हणून भांडणं करत नाहीत. सध्या सगळं सुरळीत चालू आहे. हाॅटेलचं नाव गुजरात ठेवल्यामुळे लोकांना हाॅटेल उच्च दर्जाचं वाटून ते इथंच नाश्ता,चहाला येतात "
" खरंय. सध्या तर बसायला जागा मिळत नाहिये " मी हसत म्हणालो तसा तोही हसला .
" तुम्हांला ते पुढच्या चौकातलं ब्रजवासी हाॅटेल माहीत आहे का?"
" हो. माहितेय पण मला ते आवडत नाही.गचाळ आहे " 
" बरोबर. तरीही त्याच्याकडे अगोदर खुप गर्दी असायची. आता तिकडचे गिऱ्हाईक आपल्याकडे यायला लागलेत " 
मी घड्याळाकडे पाहिलं. मला आता निघायला हवं होतं. साडेदहाची डाॅक्टरांची अपाॅइंटमेट होती. मी बिलाचे ८० रुपये काढून त्याच्यासमोर ठेवले. त्यानं ४० रुपये मला परत केले. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिल्यावर तो म्हणाला 
" असू द्या साहेब.तुम्ही आमचे जुने कस्टमर आहात."  
मी ४० रुपये परत करत म्हणालो
" तुम्ही हाॅटेलचं नाव गुजरात केलं आता मराठी माणसांची मानसिकता सोडून गुजराती लोकांसारखे व्यवहारी व्हा. धंदा म्हणजे धंदा. कस्टमर कुणीही असो. नो डिस्काउंट " 
त्यानं हसून ४० रुपये गल्ल्यात टाकून दिले. त्याच वेळी तिथं आलेल्या दोनतीन कस्टमरचेही पैसे त्यानं घेतले. ते गेल्यावर तो  म्हणाला
" साहेब पुढच्या महिन्यापासून आपण वरच्या मजल्यावर जेवणाची व्यवस्था करतोय. पंजाबी, गुजराती,मारवाडी ,जैन सगळ्या प्रकारच्या थाली मिळतील.या कधी जेवायला "
" आणि महाराष्ट्रीयन थाळीचं काय?"
तो हसला
" काय करता साहेब. आपल्या मराठी माणसाला आपलं घरचं जेवण हाॅटेलमध्ये नको असतं. त्यांना हाॅटेलमध्ये जे जेवायला आवडतं तेच आपल्याला ठेवावं लागणार ना !" 
अर्थातच त्याच्या या युक्तिवादावर माझ्याकडे उत्तर नव्हतं.
बडिशेप खाऊन मी निघालो.
रविवारी माझ्या घरी पाहूणे येणार होते. बायको मला म्हणाली." अहो उद्या त्या बिकानेर स्वीट मार्ट मधून एक किलो श्रीखंड घेऊन याल " 
" का आपल्या जवळच्या दत्त डेअरीतही चांगलं श्रीखंड मिळतं. तिथून का नाही आणायचं? " 
" नको तिथलं नको. राजस्थानी लोकांकडचे सगळे पदार्थ चांगले असतात " 
" अहो मॅडम मराठी लोकांकडचे पदार्थ चांगले नसतात ही मानसिकता सोडून द्या आता. आपलेही लोक चविष्ट पदार्थ बनवतात. तू स्वतः मराठी आहे. तू काय चवदार पदार्थ बनवत नाहीस? दत्त डेअरीचा मालक मराठी असला तरी त्यांचं श्रीखंड बिकानेरवाल्यापेक्षा जास्त चांगलं असतं.आणि एक गोष्ट लक्षात घे. श्रीखंड हा महाराष्ट्रीय पदार्थ आहे. तो मराठी माणसं चांगला करतील की राजस्थानी? तूच तर म्हणतेस ना की इडली,डोसा साऊथ इंडियन जितका चांगला करतात तितका आपला नसतो. छोले भटूरे पंजाबी लोक जसे बनवतात तसे आपल्याला जमत नाहीत. मग हीच बाब श्रीखंडाला का लागू होत नाही?" 
या प्रश्नावर बायको निरुत्तर होणार हे मला माहीत होतं. झालंही तसंच. माघार घेत ती म्हणाली 
" ठिक आहे, दत्त डेअरीतून आणा. "

© दीपक तांबोळी
    9209763049
( ही कथा कोणताही बदल न करता शेअर करण्यास हरकत नाही.माझ्या पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी कृपया वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...