मंगळवार, २६ मार्च, २०२४

1000. गोष्ट खूप छोटी असते आणि होतं असं कधीकधी

 ■ गोष्ट खूप छोटी असते हो.... ■
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
तुम्ही गाडीतून जातांना, 
न उतरता रस्त्यावरच्या माणसाला एखादा  पत्ता विचारला तर 
बऱ्याचदा तो मिळतच नाही, 
पण उतरून जर, दादा पत्ता सांगता का ? 
असं विचारलं, तर काहीतरी हिंट नक्कीच मिळते.
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

स्टेशनवर तुम्हाला सोडायला आलेल्याला, 
घरी पोचल्यानंतर तुम्ही फोन केला नाही. 
तर फारसं बिघडत नाही.पण फोन केला, 
तर नातं नक्कीच जुळतं.
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

अंधारात तुम्ही कधी पाय अडखळुन पडलात, 
तसाच मागचाही पडू शकतो.
 तिथेच थोडं थांबून मागच्याला सावध केलं तर 
अंधारातही त्याचे डोळे बोलतात.
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

आपापलं सामान घेऊन तर 
सगळेच रेल्वेचा दादर चढतात. 
पण त्याही वेळी एखाद्या आजीचा हात धरून
 तिला मदत केली तर, तिने घट्ट धरलेला हात 
आपली आई आठवून देतो.
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

घंटागाडीत तुमचा कचरा घेणारा 
तुम्हाला रोजच भेटतो. 
कधी त्याला ग्लोव्ह्ज द्यायचे. 
कधी skin चं मलम देऊन टाकायचं.
गोष्ट खूप छोटी असते हो,पण करायची.

कमी जागेत बाईक पार्क करतांना 
तिरक्या स्टॅंडवर न लावता, सरळ स्टॅंडवर लावून 
मागच्यालाही थोडी जागा ठेवली. 
तर त्याचं thank you ऐकायला मस्त वाटतं..
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.

किराणा दुकानाच्या गर्दीत, तिने घेतलेल्या सामानाचा ढीग
 पाहणाऱ्याने त्या ताईची पिशवी आपण धरून ठेवली,
तर सामान नीट ठेवणं तिला सोप्पं जातं.
माणसा-माणसांतील निष्कारण असलेली बंधनं गळून पडतात.
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची !

■ होतं असं कधीकधी...!! ■
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
खूप महत्वाच्या मीटिंग मध्ये असतो आपण.
बऱ्याच वर्षांनी अचानक एका जवळच्या मित्राला आठवण येते आपली.
इच्छा असूनही कॉल उचलू शकत नाही आपण.
संध्याकाळी घरी आल्यावर आठवण येते.
परत कॉल करावा तर बोलायला विषय नसतो आपल्याकडे.
टाळतो आपण कॉल करायचा.
त्याचा दोन दिवसानंतर मेसेज येतो.
'तुझ्या ऑफिस बाहेर होतो. भेटलो असतो.'
जुन्या आठवणी काढत बसतो आणि  मन रमवतो त्यातच.
स्वतःला खोटं खोटं समजावत !
होतं असं कधी कधी....!!!
🍁🍁🍁

कडक उन्हात सिग्नलला बाईक उभी असते आपली.
रस्त्याच्या कडेला एक वृद्ध जोडपं असतं मागत लोकांना.
माया,कणव दाटून येते मनात आपल्या..
'कसं आपल्या आई वडिलांना लोक असं वाऱ्यावर सोडत असावेत??' 
पाकिटात हात जातो.
शंभराची नोट लागते हाती.
व्यवहार जागा घेतो ममतेची.
समोरचा म्हातारा ओळखतो. बदलतो.
"दहा दिलेस तरी खूप आहेत पोरा."
तो सुटका करतो आपली पेचातून.
आपल्याच नजरेत आपल्याला छोटं करून.
होतं असं कधी कधी....!!!

🍁🍁🍁
दिवाळीचे पाहुणे असतात जमलेले.
आज कामवाली येणार की नाही याची धाकधूक असते.
तिच्या असण्याने आपण किती निवांत आहोत याची जाणीव होते अशा  वेळी.
दुपारची जेवणे उरकून गप्पा रंगात आलेल्या असतात.
ती येते.
काम आटोपते.
तिच्या मुलांना राहिलेली बासुंदी द्यावी का ह्या संभ्रमात असताना, 
कामवाली एक डब्बा देते हातात आपल्या.
चिवडा लाडू असतो त्यात.
"तुम्ही दर वेळा देता... आज माझ्याकडून तुम्हाला..."
'कोण श्रीमंत कोण गरीब', हा विचार सोडत नाही पिच्छा आपला.
होतं असं कधी कधी....!!!
🍁🍁🍁

ढाराढूर झोपेत असतो उन्हाळ्याचे गच्चीवर.
आई उठवते उन्हं अंगावर  आल्यावर.
अंगात ताप असतो तिच्या.
आपण सुट्टीचा आलोय घरी म्हणून उसनं बळ आणते अंगात ती.
मेसच्या खाण्याने आबाळ होत असेल म्हणून 
चार दिवस होईल तेवढे जिन्नस पोटात आणि 
उरलेले डब्यात भरून येतात आपल्यासोबत.
दिवस उलटतात.
वडिलांचा एके रात्री फोन येतो...
"काम झालं असेल तर आईला एक फोन कर. आज तिचा वाढदिवस होता..."
कोडगेपणा म्हणजे हाच तो काय.!
चडफडत facebook च्या virtual मित्राना केलेले  birthday विश आठवतात.
लाजत तिला फोन करतो.
"आमचा कसला रे या वयात वाढदिवस? तू जेवलास ना?? तब्येतीला जप बाबा."
ती बोलते.
कानात गरम तेल ओतल्याचा भास होतो.
अश्रूंचा मुक्त वावर होतो डोळ्यांतून.
काहीतरी खूप खूप दूर जातंय आपल्या पासून असं जाणवत राहतं.!
खरंच, होतं असं कधी कधी..!
     ~~●●○○○●●~~

सोमवार, २५ मार्च, २०२४

999. चुक कुठे झाली ?

        एक खूप हुशार मुलगा होता. संपुर्ण शैक्षणिक आयुष्यात पहिल्या क्रमांकावर उत्तीर्ण होत राहिला. सायन्स मध्ये नेहमी 100% मार्क मिळवले. अशी बहुतेक मुलं इंजिनियरींग साईडला जातात. म्हणून त्याची ही निवड आय.आय.टी. चेन्नई मध्ये झाली. तेथून त्याने बी. टेक. ची पदवी मिळवली. पुढील शिक्षणासाठी तो अमेरिकेला गेला आणि यूनिव्हर्सिटी ऑफ़ कॅलिफोर्निया मधून तो एम. बी. ए. झाला. आता इतके शिक्षण घेतल्यावर तेथे चांगली नोकरी तर मिळतेच. तो तेथेही नेहमी टॉपरच राहिला. तेथेच नोकरी करायला लागला. त्याचे पाच बेडरूमचे घर होते. चेन्नईच्याच एका खूपच सुंदर मुलीशी त्याचे लग्न झाले. एका माणसाला आपल्या जीवनात अजून काय पाहिजे? शिकून सवरुन इंजिनियर झाला, अमेरिकेत स्थाईक झाला, मोठ्या पगाराची नोकरी, बायको, मुले, सुखच सुख....
      पण दुर्भाग्याने आजपासून चार वर्षांपूर्वी त्याने तेथे अमेरिकेत, आपल्या पुर्ण परिवारासह आत्महत्या केली. आपली पत्नी आणि मुलांना गोळी मारून स्वतःला ही गोळी मारून घेतली. काय चूक झाली होती? शेवटी असं काय घडलं? गडबड कुठे झाली? हे पाऊल उचलण्याआधी त्याने आपल्या पत्नीशी विचारविनिमय केला होता, मग एक लांबलचक सुसाईड नोट लिहिली आणि आपल्या या कृतीचे समर्थन केले आणि या परिस्थितीत हाच एक सर्वोत्तम मार्ग होता असे लिहीले. त्यांच्या या केसचा आणि सुसाईड नोटचा कॅलीफोर्निया इन्स्टीट्यूट आॅफ क्लिनीकल फिजीकाॅलाॅजी ने ‘काय चूक झाली ?' हे माहीत करण्यासाठी अभ्यास केला. सर्वात आधी कारण काय होते ते सुसाईड नोट मधून आणि मित्रांकडून माहीत केले. अमेरिकेच्या आर्थिक मंदीमुळे त्याची नोकरी गेली. बरेच दिवस रिकामे बसून रहावे लागले. नोकरी शोधत राहीला. मग आपला पगार कमी करत गेला आणि तरीही नोकरी मिळाली नाही, घराचा हप्ता थकला, रस्त्यावर येण्याची वेळ आली. काही दिवस कुठल्याशा पेट्रोल पम्पावर तेल भरायचे काम केले. वर्षभर हे सर्व सहन केले आणि शेवटी पति पत्नीने मुलांसह आत्महत्या केली. तज्ज्ञांनी या घटनेचा सार असा काढला की या माणसाची मानसिकता फक्त यश मिळवणे यासाठीच तयार झालेली होती, परंतु अपयशाचा सामना कसा करायचा याचे शिक्षण त्याला मिळालेच नव्हते. आता त्याच्या जीवनावर सुरुवातीपासून नज़र टाकू या. 
    अभ्यासात खूप हुशार होता, नेहमी पहिल्या क्रमांकावरच उत्तीर्ण झाला. अशा बऱ्याचशा पालकांना मी ओळखतो. ज्यांची हीच इच्छा असते की त्यांच्या मुलाचा वा मुलीचा नेहमी पहिलाच क्रमांक यावा, त्यांच्याकडून कधीच चूक होऊ नये. चूक झालीच तर जसे खूप मोठे पाप केले आहे आणि त्यांने पहिला यावे यासाठी ते काहीही करायला तयार असतात. मग अशी मुलं काहीशी जास्तच अभ्यासू असतात म्हणून खेळणे, कूदने, फिरणे, लढणे, भांडणे, मारामारी अशा संधी बिचाऱ्यांना फारच कमी मिळतात. बारावी उत्तीर्ण होऊन आले तर इंजीनियरिंग कॉलेजचे ओझे लादले जाते बिचाऱ्यांवर, तेथून निघाला तर एम. बी. ए. आणि अजून शिकतच आहे तर मोठ्या पगाराची नोकरी. आता मोठा पगार म्हटला की जबाबदारी पण मोठी म्हणजे मोठे मोठे  टार्गेटस्. हे जग फार कठोर आहे. आणि हे जीवन वेगवेगळ्या परिक्षा घेते. आपली कॉलेज ची डिग्री आणि मार्कशीटशी त्याला काही देणेघेणे नाही. तेथे किती मार्क मिळवले याच्याशी काही फरक पडत नाही. हे जीवन आपली वेगळी प्रश्नपत्रीका समोर ठेवते. आणि सर्व प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरचे असतात, वेडेवाकडे, बिनबुडाचे, आणि दररोज परीक्षा घेते, कुठलेही वेळापत्रक नसते. 
     एका इंग्रजी कादंबरीत एक गोष्ट वाचली होती. एक मेंढीचे पिल्लू आपल्या आईपासून दूर निघून जाते. पुढे जाऊन आधी म्हशींच्या कळपात घेरले जाते. त्यांच्या पायांखाली चिरडले जाण्यापासून कसेतरी वाचते. आता थोडेच पुढे चालले होते की एक कोल्हा त्याच्याकडे झेपावतो. कसेतरी झुडपांमध्ये घुसून ते आपला जीव वाचवते तर समोरून लांडगे येताना दिसतात. खूप वेळ झुडपांमध्ये लपून बसते, कसं तरी आई जवळ परत येते व म्हणते, "आई, तेथे तर खूप भयानक जंगल आहे." There is a Horrible Jungle out There. अशा या खतरनाक भयाण जंगलात जिवंत टिकून रहाण्याचेही प्रशिक्षण मुलांना जरूर द्या.
विशेष म्हणजे मुलांना फक्त पुस्तकी किडा बनवू नका. मुलांना अभ्यासा बरोबरच धार्मिक, व्यावहारिक, सामाजिक संस्कार देणं ही गरजेचे आहे. प्रत्येक परिस्थितिला आनंदाने व धैर्याने सामोरे जाण्याची क्षमता व त्यातून उभारण्याचे ज्ञान आणि मानसिकता मुलांमध्ये असणे आवश्यक आहे. शेवटी आपली मुलं आपलीच आहेत ना !

998. खरी कमाई

हॅलो बाबा
हं बाळा काय रे? बरा आहेस ना? आत्ता अचानक फोन केलास
मी बरा आहे हो. ऐका ना, मला कॅंपस इंटरव्ह्यूमध्ये एका कंपनीचा कॉल आलाय. मी इथे चौकशी केली. कंपनी चांगली आहे असे माझे सिनियर आणि सर म्हणत होते. पगार ही बरा आहे. काय करू? त्यांना उद्या पर्यंत उत्तर द्यायचे आहे.
अरे एवढी घाई कशाला करताहेत ते?
बाबा, त्यांच्याकडे दोनच पोस्ट आहेत. माझा मित्र पण आहे. तो अॉलरेडी हो म्हणालाय. मी हो म्हणालो तर ते कंपनीवाले आणखी इंटरव्ह्यू घेणार नाहीत. 
बर बर एक काम कर. मला कंपनीचे डिटेल्स आणि तुझा पे स्केल वगैरे माहिती पाठव. मी इथे चौकशी करतो आणि तासाभरात कळवतो.
हो बाबा. मी पाठवतो माहिती.
ठेऊ फोन?
अरे या नादात तुझे अभिनंदन करायचे राहून गेले. बाळा तुझे मनापासुन अभिनंदन ! असाच यशस्वी हो!
थॅंक्यू बाबा. बाबा तुमच्यामुळे तर मी इंजिनिअर झालो. माझे यश फक्त तुमच्यामुळेच तर मिळाले आहे. 
असू दे रे. तू पण मन लावून अभ्यास केलास. बर तू माहिती पाठव. मी चौकशी करून परत फोन करतो.
बर बाबा, बाय बाबा.
आमचा फोन झाल्यावर लगेचच मनिषने माहिती पाठवली. मी ही माझ्यापरीने चौकशी केली. मनिष च्या आईलाही फोन केला. तिला त्याचा फोन आधीच आला होता. ती पण म्हणाली की मला योग्य वाटत असेल तर मनिष ने होकार द्यावा नोकरीला. मनिषला मिळणारा पे स्केल पाहून तर मी थक्क झालो. एवढी वर्षे नोकरी करून मला जेवढा पगार मिळतो आहे जवळपास तेवढाच त्याला सहा महिन्याच्या ट्रेनिंगनंतर मिळणार होता. मी त्याला फोन करून ग्रीन सिग्नल दिला. त्याचे परत अभिनंदन केले. लवकर घरी यायला बजावले. मी ही आज लवकरच निघालो. घरी जाताना पेढ्यांचा बॉक्स आणि मनिषच्या आवडीचे पॅटिस घेऊन घरी आलो. घरी हिने देखील त्याला आवडतो म्हणून गोडाचा शिरा केला होता. मनिष घरी आला तो हवेत तरंगतच
"आई आलो ग!"
आल्या आल्या तो आईच्या गळ्यात पडला. तिच्या आणि माझ्याही डोळ्यात आनंद मावत नव्हता. हातपाय धुवून त्याने देवासमोर पेढा ठेवला आणि आम्ही पण एकमेकांना पेढा भरवला. हिच्या माहेरी आणि माझ्या आईबाबांनाही लगेचच आनंदाची बातमी कळवली. फायनल इयरचा रिझल्ट लागला की एका आठवड्यात अॉफिस जॉईन करायचे होते. यथावकाश मनिष इंजिनियर झाला. चांगले डिस्टिंक्शन मिळाले. त्याला नोकरी लागली तेव्हा मी त्याला एक सल्ला दिला होता. 
"हे बघ आता तू कमवायला लागणार आहेस. स्वतःचे पैसे मिळताहेत म्हणून वाट्टेल तसे पैसे खर्च करू नकोस. पैसे नीट गुंतव. कोणा सीए चा सल्ला घे. नीट बचत कर. मी म्हणणार नाही की मजा करू नकोस पण वायफळ खर्चही करू नकोस. बघ पटतय का ते."
"बाबा याबाबतीत मी तुमचं ऐकेन पण एका वर्षानंतर ! पहिले एक वर्ष मी मला हवे तसे पैसे खर्च करणार आहे. मग मात्र तुम्ही म्हणाल तशी मी बचतही करीन आणि वायफळ खर्च ही करणार नाही."
ही आमचे बोलणे ऐकतच होती. ती ही म्हणाली. "अहो, करू दे त्याला मनाप्रमाणे. इतकी वर्षे कधी कसला हट्ट केला नाही की इतर मुलांसारखा आपल्याला कधीही खर्चात पाडलेले नाही. कसलाही क्लास न लावता. त्याने हे यश मिळवलेन ना? मग वागू दे जरा मनासारखे."
"बर बाई तुम्ही मायलेक काय माझे ऐकणार आहात ! करा तुमच्या मनासारखे !"
बघता बघता मनीष कंपनी जॉईन झाला. पहिले सहा महिने ट्रेनिंग होते. सुरुवातीला निम्मा पगार मिळणार होता. तरीही नाही म्हटले तरी चाळीस हजार त्याला मिळणार होते. पहिल्या महिन्याच्या पगारात त्याने हिला आणि त्याच्या दोन्ही आज्यांना साडी आणली. मग काय तिघी एकदम खुश. आजुबाजूला आणि नातेवाईकांना फोन करुन तिघींनी मिरवून झाले. पुढच्या एक दोन महिन्यात त्याने स्वतःसाठी काही कपडे घड्याळ घेतले. माझ्यासाठी मात्र त्याने काहीच आणले नव्हते. हिने एकदोनदा छेडल्यावर, "मी बाबांना काय देणार ! त्यांना ते आवडेल का?" अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन तो मोकळा झाला. मी कितीही चेहऱ्यावर दाखवले नाही तरी मनात थोडा नाराज झालो होतो. मी छानछौकी नाही करत पण म्हणून एखादा शर्ट तरी तो नक्कीच आणू शकला असता. काहीशा नाराजीनेच मी स्कूटरला किक् मारली आणि कंपनीत निघालो. आज नेमके खूप ट्रॅफिक होते. ऊनही चांगलेच जाणवत होते होते. कसाबसा घामाघूम होत मी आॉफीसला पोचलो.आज माझे कामात लक्ष लागत नव्हते.
   आमच्या लग्नानंतरचे दिवस आठवत होते. मी घरातला मोठा मुलगा नव्हतो. पण नेहमी मोठ्यानेच काय सगळ्यांचा मक्ता घेतलाय का? असे म्हणून दादाने घरातून अंग काढून घेतले. धाकट्या दोघी तर खूपच लहान होत्या. मी नोकरीला लागल्यावर दादा वैनीने वेगळे बिह्राड केले. चारपाच वर्षात माझेही लग्न झाले. त्यानंतर वर्षभरात बाबा रिटायर्ड झाले. मग बहिणींची शिक्षणं त्यांची लग्नं करून देण्यात माझ्याकडची पुंजी शुन्यावर आली उलट थोडे कर्जच काढावे लागले. त्यातच मनिष जन्माला आला. मनिष थोडा मोठा होत नाही तर बहिणींची बाळंतपण त्यांचे सणवार सगळे यथास्थित करायला हवेच होते. या सगळ्यात मनिषला काही कमी पडू नये यासाठी आम्ही दोघेही सतत धडपडत होतो. त्याला चांगल्या शाळेत प्रवेश घेतला. घराला हातभार लावण्यासाठी हिनेही ट्यूशन घ्यायला सुरुवात केली. कशीबशी बचत करून लग्नानंतर पंधरा वर्षानंतर आम्ही जरा मोठे घर घेतले. आईबाबांनी जुन्याच घरात राहायचे ठरवले. पण आम्हाला मात्र मोठ्या हौसेने नवीन संसार थाटून दिला. हळूहळू मनिषही मोठा होत होता. त्याचे शिक्षण, इतर छंद, घराचे हप्ते यातच पगार कसा कापरासारखा उडून जायचा.  मनिषही हुशार होता. उत्तम मार्क मिळवून त्याने चांगल्या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेतली.मन लावून अभ्यास केला. अतिशय गुणी आणि मनमिळाऊ आहे मनिष. मग तो असा कसा मला विसरला? मला काही सुचतच नव्हते. माझ्या मित्राजवळ मी मन मोकळे केले. तर तो म्हणाला, "अरे ही आजकालची मुलं, तुला सांगतो एकदा का नोकरीला लागली की शिंग फुटतात यांना आईबाबांना विसरूनच जातात आणि त्यात जर एखादी छोकरी आली त्यांच्या आयुष्यात तर मग काय बघायलाच नको!  असे प्रसंग आता आपल्या आयुष्यात येत राहाणार तू मन घट्ट कर."
आपला मनिष पण असाच असेल? आपल्याला विसरेल? मी अगदी भांबावून गेलो होतो. म्हणतात ना काळ हे सगळ्या समस्यांवरचा रामबाण उपाय आहे. तसेच माझ्या बाबतीत झाले. जसजसे दिवस जाऊ लागले तसतशी माझी सलही बोथट होऊ लागली. मनिषला नोकरीला लागून  बरोबर दहा महिने झाले. आज कसलीशी सार्वजनिक सुट्टी होती. मी घरीच एक कादंबरी वाचत आराम करत होतो. मनिष तयार होऊन निघाला. मी त्याला हटकले, 
"काय रे तुला पण सुट्टटी आहे ना मग आत्ता कुठे निघालास?"
"काही नाही जरा मित्राकडे जाऊन येतो. आम्ही बऱ्याच दिवसात भेटलो नाही ना. दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत येतो परत." असे म्हणत तो घराबाहेर पडलाही.
मला परत मित्राची वाक्य आठवत होती याला एखादी खास मैत्रिण असेल का? हा तिलाच भेटायला गेला असावा. मी स्वैपाकघरात जाऊन हिच्या मागे भुणभुण सुरु केली." त्याच्यावर लक्ष आहे का तुझं? कुठे जातो, कोणाकडे जातो तुला तरी माहीत असतं का? "
"अहो, लक्ष ठेवायला आता काय तो लहान आहे का? चांगला मोठा झालाय. तुमचं आपलं काहीतरीच. जा बघू ते पुस्तक वाचा. उगीच नसते विचार करत बसू नका." ही तर माझ्यावरच रागावली.
मी परत वाचायला लागलो. इतक्यात मनिषच्या मित्राचा फोन आला," हॅलो काका, मी प्रथमेश बोलतोय, मी एक पत्ता तुम्हाला मेसेज करतोय त्या पत्त्यावर मनिषने तुम्हाला दोघांना लवकरात लवकर बोलावलय. या हं लवकर आम्ही वाट बघतोय.' इतकेच बोलून त्याने पटकन फोनच ठेऊन दिला. त्याला परत फोन लावला तर एंगेज येत होता आणि मनिषचा तर फोन स्विच ऑफ होता. आम्ही दोघेही अक्षरशः हादरून गेलो होतो. त्यातल्या त्यात एक गोष्ट दिलासा देणारी होती की प्रथमेशने कोणत्यातरी शॉपिंग कॉंप्लेक्सच्या जवळचा पत्ता दिला होता. एखाद्या दवाखान्याच्या किंवा हॉस्पिटलचा नाही. मनिषने का बोलावले असेल आणि त्याने का फोन केला नाही मला काही समजतच नव्हते. आता तर प्रथमेशचा फोन पण स्विच्ड ऑफ होता. हिला हातातला स्वैपाक तसाच अर्धवट ठेवून तयार व्हायला सांगितले. मी घरात होते तेवढे सगळे पैसे बरोबर घेतले. खिशातले क्रेडीट कार्ड चाचपून पाहिल. देवाचा धावा करीत स्कूटरला किक मारली आणि प्रथमेशने सांगितलेल्या पत्त्यावर पोचलो. तिथे तो आमची वाटच पाहात होता.
अरे प्रथमेश मनिष कुठेय? त्याला काही झाल नाहिये ना? मला काय झालय ते सांग. "मी प्रथमेशवर प्रश्नांचा भडिमार केला.
" हो हो काका सांगतो. ही स्कूटर पार्क करा या बाजूला. तो बघा मनिष रस्त्यापलिकडे तुमची वाटच पाहातोय".
समोरच्या बाजूला मनिष हसतहसत आम्हाला यायला खुणावत होता. त्याला सुखरूप पाहिल्यावर आमच्या दोघांच्या जीवात जीव आला.
आम्ही रस्ता पार करून त्याच्या जवळ गेलो. त्याने माझ्या हातात एक चावी दिली आणि जवळच रिबीनींनी सजवलेल्या एका नव्या कोऱ्या आय टेन गाडीपाशी आम्हाला घेऊन गेला. भर रस्त्यात मला नमस्कार करून म्हणाला, "बाबा हे माझ्या पगारातून तुमच्यासाठी आणलेलं गिफ्ट, तुम्हाला वाटले असेल ना की याने सगळ्यांना काहीना काही आणले आपल्या पगारातून मग मलाच का नाही. बाबा तुमची गिफ्ट आणायला एक पगार पुरला नसता ना म्हणून थांबलो. रागावू नका, तुम्हाला न विचारताच एवढी मोठी खरेदी केली. तुम्ही रोज स्कूटरने अॉफिसला जाता ना आता उद्यापासून मस्त गाडीने जा. ऊन पण लागायला नको आणि पाठ पण दुखायला नको. आणि हो मी एक महिन्याच्या ड्रायविंग क्लासचे पैसे पण भरले आहेत."
अभिमानाने आणि आनंदाने माझा ऊर भरुन आला होता. समोरचा रस्ता, बाजूची गाडी सगळे सगळे धूसर दिसत होते.फक्त मनिष स्पष्ट दिसत होता. तो माझ्यापेक्षा इंचभर जास्तच ऊंच आहे हे मान ताठ करून त्याच्याकडे बघताना मला पुन्हा एकदा जाणवले.

डॉ. समिधा गांधी

997. कठोर बापाच्या अशक्य परीक्षेची कहाणी

      ६वी किंवा ७वीत असेन. शाळेत एक नकाशा विकणारा आला होता. गोल पुठ्ठ्याचा भारताचा नकाशा, त्यावर वेगवेगळ्या खाचा असलेला अजून एक पुठ्ठा. वरचा पुठ्ठा फिरवून एक खाच कोणत्याही राज्यावर आणली की इतर खाचांमधे त्या राज्याची राजधानी, लोकसंख्या अशी भरपूर माहिती मिळणार. हरखून गेलो प्रात्यक्षिक बघून. १५ रू किंमत. कसं बोलावं घरी? १५ रुपये! अभ्यासाचीच तर गोष्ट, पण ही मागणी आगाऊ आहे, जास्तीची आहे याची बोच होती. संध्याकाळी उशिरा भित भित बाबांना गळ घातली. बाबांनी २-४ वाक्यं घेतली आढेवेढे घ्यायला. नंतर सरळ ऑफर दिली. तू १५ पानं (पाठ पोट, अर्थातच) शुद्धलेखन करून दाखव. नकाशा तुझा.
      मला आजही तो क्षण आठवतो. त्या क्षणी "बाबांनी अशी अशक्य कोटीतील/अनावश्यक/किचकट अट का ठेवली? सरळ हो किंवा नाही म्हणून मोकळे का झाले नाही?" हा विचार नाही आला मनात. पहिला होता पोटात आनंदाचा गोळा, नकाशा मिळू शकतो ही शक्यता. हा य ला ! दुसरा विचार होता, आपण किती वेडे आहोत. लवकर विचारलं असतं तर १५ पानं लिहायला वेळ अजून मिळाला असता. आता कमी वेळात करून घ्यावं लागणार. ती संध्याकाळ-रात्र झपाटल्यागत लिहीत सुटलो. रात्री ११:३० पर्यंत जागलो. एवढ्या उशिरा झोपणं म्हणजे गहजब होता. पण बाबांनी दुर्लक्ष केलं तिकडे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, उरलेलं लिहून काढलं. बाबांनी ऑफिसला जाण्याआधी तपासलं. ३-४ चुका झाल्या होत्या. मोठाले गोल केले त्यावर. प्रत्येक गोलागणिक तो गोल नकाशा अशक्यप्राय होत होता. पण बाबांनी शांतपणे वही खाली ठेवली, डोक्यावरून हात फिरवला, १५ रुपये दिले आणि ऑफिसला निघून गेले.
     विजयी पताक्यागत नकाशा घरी आणला मी संध्याकाळी. पुढे कित्येक वर्षं तो नकाशा जपून ठेवला होता मी. एवढा प्रिय का होता कळत नव्हतं. पण खास होता. १५ पानांमुळे? की बाबांच्या परीक्षेत पास झाल्यामुळे? की खरंतर परीक्षेत पास झालोच नव्हतो तरी बाबांनी बक्षीस दिल्यामुळे? की डोक्यावर फिरवलेल्या हाताची आठवण म्हणून? मी बाप झाल्यावर कळालं मला. परीक्षा १५ पानं शुद्धलेखन लिहून होण्याच्या रिझल्टची नव्हतीच. हव्या असलेल्या गोष्टीसाठी झोकून देऊन झपाटल्यागत प्रयत्न करतो की नाही याची होती. त्यात मी मेरिटमध्ये आलो, म्हणून बाबा खुश झाले. या प्रसंगात मला आईचं विशेष कौतुक वाटतं. बाबांनी अशी काही अट ठेवल्यावर "कशाला लेकराला लिहायला लावता? १५ रुयांची तर मामलत आहे !" असं म्हणून बाबांना माझ्या नजरेत व्हिलन केलं नाही आईने. आईने काहीच हस्तक्षेप केला नाही. खरंतर आमच्याकडे मला शिस्त अशीच आईबाबांनी आळीपाळीने लावली आहे. आईसुद्धा कमी कठोर नव्हतीच कधी. माझ्यात जे काही चांगलं आहे ते त्या दोघांनी अश्या लहानमोठ्या प्रसंगांत पेरलेलं. वाईट जे काही आहे ते त्यांनी पेरलेलं काहीतरी मी धड उगवू दिलं नाही म्हणून. आपली मुलं मोठी होत असताना ती १५ रुपयांच्या बक्षिसाची परीक्षा बदलेली आहे. आता कदाचित १५०० चं असेल काहीतरी. मला काळजी १५ की १५०० ची नाही. माझ्यासारखे बाप ती कठोर, अशक्यप्राय, क्रूर परीक्षा घेण्याची छाती बाळगून आहेत का याची मला काळजी वाटते. आमच्या मुलांची कठोर परीक्षा घेता येणं आणि आम्हाला ती घेऊ दिली जाणं हीच आमची परीक्षा आहे. बापाने कठोर असणं आणि कुटुंबाने त्यांचं कठोरत्व स्वीकृतच नव्हे महत्वपूर्ण आहे हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. अख्ख्या समाजातच हा अवेअरनेस आवश्यक आहे. पुढची पिढी त्याशिवाय घडणार नाही. कठोर बाप अन त्यांच्या दमदार पोट्ट्यांसाठी....

996. अश्रूंना मानलं शत्रू !

     नाशिकच्या काठे गल्ली भागातील लिफ्ट नसलेल्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर संदेश आणि अंजली नारायणे हे दांपत्य राहतं. दोघंही अंध. अंजली गुजराथी घरातली, तर संदेश मराठी. अहमदाबादमध्ये फिजिओथेरपीचं शिक्षण घेत असताना दोघांची ओळख झाली. पुढं 2001 मध्ये तिचं रूपांतर विवाहात झालं. दोघं नाशकात फिजिओथेरपीचा व्यवसाय चालवू लागले; पण त्यात चरितार्थ भागेना, मग वेगवेगळ्या परीक्षा देत राहिले. त्यातूनच बडोदा बॅंकेत आधी अंजलीला आणि पुढं संदेशला नोकरी मिळाली. जगण्याची लढाई अन् निसर्गाचं चक्र एकाच वेळी पुढं जात होतं. ज्या निसर्गानं अंधत्व दिलं, त्यानंच मातृत्वही दिलं. गर्भवती असताना सर्वसामान्य स्त्रीप्रमाणंच पोटातल्या बाळाच्या हालचाली जाणवायच्या. मातृत्वाची सुखद जाणीव व्हायची. यथावकाश एका बाळाला जन्म दिला. डॉक्टारांना विचारलं, "बाळ सगळीकडं पाहतंय ना? त्याला नीट दिसतंय ना?' तो सगळं टकमक पाहात असल्याचं डॉक्टमरांनी सांगितल्यावर आनंदाला पारावार उरला नाही; पण मातृत्व लाभल्याचं सुख अनुभवतानाच आता या बाळाला वाढवायचं कसं? या चिंतेचं काहूरही मनात उठलं. संदेशची आई- सासूबाई-मदतीसाठी धावून आल्या. बाळंतपणानंतर महिनाभरानं त्याही परत गेल्या. त्या घरातून गेल्या अन् झोळीत झोपलेलं बाळ थोड्या वेळानं उठलं. झोळीतून त्याला काढताना पलंगाची दांडी त्याला लागली. त्यानं हंबरडा फोडला. दोघांनाही दिसत नसल्यानं बाळाला काय झालं, हे समजण्याचा प्रश्नाच नव्हता. मन सैरभैर झालं. डोळ्यापु ढंचा अंधार दसपटीनं वाढल्यासारखं वाटू लागलं. बाळाला छातीला लावलं अन् आतल्या खोलीत जाऊन ढसढसा रडले. काही वेळानं भानावर आले. बाळाच्या आयुष्यात उजेड पेरण्यासाठी मला अंधाराला कवटाळून चालणार नव्हतं. मनाशी निर्धार केला. हे रडणं शेवटचंच !
     असहाय्यतेच्या अशा अश्रूंना इथून पुढं शत्रू मानायचं. त्यांना जवळ फिरकूही द्यायचं नाही. त्यासाठी "मला खंबीर बनव', अशी ईश्वराला प्रार्थनाही केली. त्या क्षणापासून आजपर्यंत जवळपास दहा वर्षं झाली.त्यांनी मागं वळून पाहिलं
नाही. "बाळाचं नाव नचिकेत ठेवलं. एके दिवशी बाळाला आंघोळ घालू लागले; पण मी ओतत असलेलं पाणी त्याच्या नाका-तोंडात जात होतं. बाळाचा आवाज येईना, तेव्हा मला याची जाणीव झाली. त्याला पालथं करून पाणी काढलं. या आणि अशा प्रसंगातून त्याला सांभाळण्याची एक पद्धत ठरवून घेतली. बाळानं शी-शू केल्यावर त्याची स्वच्छता करता यावी, म्हणून त्याला लंगोट बांधलेला असायचा. शू केल्याचा वास येताच आम्ही त्याचा लंगोट बदलायचो. शीसाठी एक वेळ मी ठरवून घेतली होती. त्या वेळेत त्याला मी संडासमध्ये न्यायची. शीचा वास येताच लंगोट काढून त्याला स्वच्छ करायची आणि दुसरा लंगोट बांधायची. कपड्यांच्या रंगांचा विषयच नव्हता. त्यामुळं शर्ट- पॅंटची वेगवेगळी बटनं मी स्पर्शानं ध्यानात ठेवायची. अंदाजानं साऱ्या गोष्टी करत असे."
"त्याच्यासाठी स्वतःच पेज तयार केली. घाटा बनवला. फळांचा रस काढला. हातावर केळांचा कुस्करा केला. बाळाला भरवताना चमचा वापरला नाही. स्वतःचं एक बोटं बाळाच्या ओठाच्या कडेला ठेवून दुसऱ्या हातानं त्याला भरवत असे. बाळाच्या गळ्याभोवती कापड बांधायची; जेणेकरून त्याच्या कानात पेज, रस जाऊ नये. नचिकेत सात-आठ महिन्यांचा असताना त्याला भरवण्यासाठी चमचा घेतला होता. तो माझ्या हातून पडला. नचिकेत दुडदुडत गेला आणि त्यानं माझ्या हातात चमचा आणून दिला. तेव्हा आनंदाश्रूंनी भरलेले डोळे बाळाची प्रतिमा मनोमन अनुभवत होते...!" 
     "नचिकेत दीड वर्षाचा असताना खेळता खेळता घराबाहेर गेला. बराच वेळ झाला तरी तो आला नाही. मला वाटलं गच्चीवर गेला असेल. मी तिकडं धावले. गच्चीचा प्रत्येक कोपरा, सगळा कठडा चाचपून पाहिला; पण तो सापडला नाही. गल्लीतही शोध घेतला. आमची धावाधाव शेजारच्या काकूंच्या कानावर गेली. अनिकेत त्यांच्या घरात
खेळत होता. त्यांनी त्याला माझ्याकडं दिलं आणि अक्षरशः माझा जीव भांड्यात पडला. तेव्हापासून घराचा दरवाजा आम्ही उघडा ठेवत नाही. अनिकेतच्या पायातील पैंजणाची घुंगरं मला त्याच्या हालचालींची जाणीव करून द्यायची. त्याच्या भावना, संवेदना मला घुंगरांच्या आवाजातूनच कळायच्या." नचिकेत अडीच वर्षांचा असताना त्याला नाणी-नोटांची ओळख करून दिल्याचं सांगून त्या म्हणाल्या, "पुढे नचिकेत "आई' म्हणू लागला. आमचं बोट धरून चालू लागला. आता तो साडेनऊ वर्षांचा झालाय." आनंदनिकेतन'मध्ये चौथीत शिकतोय. आई-वडील म्हणून त्याचा सांभाळ करतानाच त्याला संस्कार मिळावे, म्हणून मी आजही त्याच्या कानाजवळ रामरक्षा म्हणते. तो स्वतः धार्मिक पुस्तकं वाचून दाखवतो. पोळ्या भाजायला मदत करतो. तांदूळ निवडून देतो. रोजची भाजी चिरतो, दूध आणतो. बाजारात खरेदीला गेल्यावर कपड्यांचे रंग, भाजीपाला, दुकानातल्या वस्तू कशा आहेत, हेही सांगतो.''
"आता नचिकेतला काय करायचं ठरवलं आहे,' "नचिकेत चांगला नागरिक व्हावा, यासाठीच आमची यापुढची सारी धडपड राहील...नचिकेतनं मला मातृत्व दिलंय खरं; पण आता नचिकेतच आमची आई झालाय...! पूर्वी तो आमच्या बोटाला धरून चालायचा...आता आम्ही दोघं त्याच्या बोटाला धरून चालतोय..!''

995. वय वाढतयं

     आज सकाळपासून तिचं मन भूतकाळात धावतयं. तिच्याच आयुष्याचा मागोवा घेतयं. खूप वर्षांपूर्वी तिने घेतलेला एक ‘हटके’निर्णय आणि त्यानंतरचा तिचा जीवन प्रवास आज तिला उलगडून लोकांसमोर ठेवायचाय. आज गावातल्याच एका संस्थेने ‘प्रमुख वक्त्या’  म्हणून तिला बोलावलय. विषय आहे ‘ अविवाहित  राहण्याचा निर्णय: किती सोपा, किती कठीण?’
     अविवाहित राहण्याचा निर्णय घेऊन तिला आता ३५ वर्षे झालीत. ती आता ६५ वर्षांची. ऐन तिशीत तिने अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला होता. खरंतर, तिच्या घराने  तिच्यासाठी  वरसंशोधन तिच्या बावीसाव्या वर्षीपासूनच चालू केले होते. पण तरीही काही ठोस कारण नसूनही, तिशी ओलांडून गेली तरी तिचे लग्न जमले नवते. त्या आठ वर्षात तिने खूप नकार पचवलेही होते आणि काही नकार दिलेही होते. पण प्रत्येक वेळी दोष मात्र तिलाच दिला गेला होता. नकार मिळाला की तिचं रूप, रंग, वजन, उंची असं काहीतरी दोषी असायचं आणि नकार दिला की तिच्या ‘अपेक्षा’ दोषी असायच्या.  तिच्या अपेक्षा ‘अवाजवी’ असून तिने तडजोड केलीच पाहीजे. या बाबतीत पूर्ण घराचे एकमत होते. शेवटी कंटाळून तिने लग्नच न करण्याचा निर्णय घेतला. थोडे दिवस सगळ्या घराने त्रागा केला पण ती ठाम राहिली. घरातले ‘कांदेपोहे ‘कार्यक्रम तिने बंद करून टाकले. हळूहळू  घर नॉर्मल झाले. 
     एकदा हा निर्णय घेतल्यावर मात्र तिने सर्व  प्रथम तिच्या ऑफिसच्या प्रगतीवर लक्ष केंद्रीत केले. आपण भक्कम पणे स्वतःच्या पायावर उभे असायला पाहीजे, हे तिने ठरवून टाकले. डिपार्टमेंटच्या परीक्षा दिल्या. ती हुशार आणि कष्टाळू होतीच. सगळी कामे तिने शिकून घेतली. घरी जायची खूप घाई नसल्यामुळे तिला ते सहज शक्यही होत होते. प्रमोशन मिळवत ती खूप लहान वयात खूप मोठ्या पोस्टवर पोचली.  त्यामुळे तिला आर्थिक स्थैर्य  मिळाले. तिचे राहणीमान सुधारले. करीअर सांभाळत असतानाच तिने तिचा भ्रमंतिचा छंद जोपासायला सुरवात केली. फिरण्याची आवड असलेल्या काही ग्रुपची ती मेंबर झाली. पर्यटनामुळे तिचे अनुभव विश्व समृद्ध होत गेले. त्या अनुभवांचे शब्दांकन करताना तिलाच तिच्यातली लेखिका सापडली. तिच्या नावावर सहा सात पुस्तकेही प्रसिद्ध झाली. तिला लेखिका म्हणून ओळख मिळाली. त्यामुळे तिला सामाजिक कार्यक्रमाची बोलावणी येऊ लागली. अशाच एका कार्यक्रमासाठी ती एका अनाथाश्रमात पोहोचली आणि त्यानंतर ती प्रत्येक आठवड्याच्या सुट्टीला तिथे जातच राहीली. हळूहळू तिचा सामाजिक कार्याचा उत्साह आणि कार्यपद्धती यामुळे तिची  तिथे विश्वस्त म्हणून नेमणूक झाली. एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून ती ओळखली जायला लागली. अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम तिने तिथे राबवले. त्या उपक्रमांना प्रसिद्धी मिळाली. तिच्या विचारांना महत्व आले. बर्‍याच संस्था तिला निमंत्रित करू लागल्या.आजचे निमंत्रणही त्यातलेच. 
    विचारांच्या तंद्रीतच ती कार्यक्रमाला पोचली. आपला निर्णय आणि  त्यानंतरचा प्रवास उलगडून सांगून  समारोप करताना ती म्हणाली, “ वय वाढतय म्हणून, समाजाच्या भीतीने, मनाविरुद्ध ,लग्न फक्त करायचं म्हणून  करण्यापेक्षा स्वतंत्र आयुष्य काढण्याचा निर्णय मी घेतला. त्याचा मला अजिबात पश्चाताप  होत नाहीयं. कारण मी एक वेगळ्या प्रकारे समृद्ध, अनुभवसंपन्नच आयुष्य काढले. माझ्या भ्रमंतीतून खूप जग पाहिले, जीवाभावाची माणसे जोडली, लिखाणातून निर्मितीचा आनंद मिळाला. सामाजिक कार्यातून काही दुःखी चेहर्‍यांवर हास्य फुलवता आले. मुख्य म्हणजे लग्न न करताही मी प्रत्येक क्षण समरसून जगले. कठीण प्रसंग आले नाहीत असे नाही, पण त्यावर मात करू शकले. मनासारखा जोडीदार मिळाला तर लग्न हा आयुष्य समृद्ध करणारा अनुभव असेलच. पण मनासारखा जोडीदार मिळाला नाही तर मात्र लग्न हा शाप ठरू शकतो. मनाविरुद्ध केलेले लग्न निभावणेही सोपे नसतेच आणि तडजोडीला मर्यादा असतात. त्यामुळे स्वतःचा स्वभाव, स्वतःच्या क्षमता ओळखा आणि निर्णय घ्या. मी तो घेतलाय. लग्न हा अनुभव महत्त्वाचा आहेच, पण फक्त लग्न हाच अनुभव महत्त्वाचा नाहीये. त्याशिवाय सुद्धा एक परिपूर्ण आयुष्य मी काढलंय,प्रत्येक जण काढू शकेल. त्यामुळे मी एवढंच सांगेन की मनाविरुद्ध लग्न करू नका. ते निभावणेही सोपे नाहीच आहे.आयुष्याच्या वाटचालीत ज्या टप्प्यावर मनासारखा जोडीदार मिळेल, तेंव्हा तोही अनुभव घ्याच, पण लग्नाची वाट पाहण्यात अडकून पडू नका.”
तिला जे सांगायचंय ते लोकांपर्यंत पोहोचलयं हे तिला टाळ्यांच्या कडकडाटाने कळून चुकले. 
          
यशश्री
यशोधरा शकुंतला श्रीकृष्ण

994. परीक्षा

 "आई खुप आनंदाची बातमी आहे. मला ९८ टक्के मिळाले." आईला मिठी मारत मानस म्हणाला. सुनिताच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू उभे राहीले." खुप खुप अभिनंदन बेटा. तुझ्या कष्टाचं चीज झालं. बाबांना सांग लवकर. त्यांनाही खुप आनंद होईल."
मानसने लगेच सुभाषला फोन लावला. आपला रिझल्ट सांगितला.
"अरे वा खुप मस्त. अभिनंदन बेटा. मी आलोच घरी." सुभाष म्हणाला .
मानस हा सुभाष-सुनिताचा एकुलता एक मुलगा. दोघांच्या आशा, स्वप्नं सगळी मानसभोवती केंद्रित झालेली. दहावीच्या परीक्षेत त्याला चांगले मार्क मिळावे यासाठी शहरातल्या एका नामांकित क्लासमध्ये त्याला अँडमिशन करुन दिली होती. खरं तर दोघांच्या खाजगी नोकऱ्या. क्लासची महागडी फी त्यांना परवडत नव्हती. तरीसुद्धा स्वतः वर्षभर काटकसर करुन त्यांनी मानसला कोणतीही अडचण येऊ दिली नव्हती. सुभाष घरी आला. येतांना त्याने पेढे आणले होते. मानसला जवळ घेऊन त्याने त्याला पेढा खाऊ घातला.
"बाबा आमच्या क्लासच्या सरांनाही पेढे द्यायचे का?"
"हो मग ! अरे त्यांच्यामुळे तर तुला इतके छान मार्क्स मिळालेत. चल जाऊया आपण त्यांच्याकडे"
दोघंही बापलेक पेढे घेऊन मानसच्या क्लासमध्ये पोहोचले. क्लासमध्ये खुप गर्दी होती. रिझल्ट लागलेल्या विद्यार्थ्यांचे पालक सरांना भेटायला आले होते.
"अरे ये ये मानस आणि मनःपूर्वक अभिनंदन.९८ टक्के मिळाले ना?" सरांनी मानसला पहाताच त्याला हाक मारुन जवळ बोलावलं.
"हो सर. थँक्यू सर." मानस म्हणाला.
"सर हे घ्या पेढे. तुमच्यामुळे मानसला एवढं मोठं यश मिळालं" सरांना पेढे देत सुभाष आनंदाने म्हणाला.
सरांनी पेढे घेतले आणि हसत म्हणाले.
"सुभाषभाऊ पुर्ण शहरात आपला क्लास टाँपवर आहे. अहो २५ मुलांना ९५%च्यावर, ५० मुलांना ९० च्यावर आणि ३० मुलांना ८०% वर मार्क्स आहेत." 
मानसला आठवलं या क्लासमध्ये ९वीत ८०%असलेल्यांनाच प्रवेश मिळाला होता. याचा अर्थ सगळी स्काँलर मुलंच इथे घेतली जात होती. ही मुळातच स्काँलर असलेली मुलं अर्थातच चांगले मार्क्स मिळवणारच होती. त्याला प्रश्न पडला 'मग या मुलांच्या यशात क्लासचा रोल काय होता? आणि कमी टक्के असलेल्या मुलांनी चांगल्या क्लासमध्ये शिकायचंच नाही का? हुशार नसलेल्या मुलांनी मग जायचं कुठे?'
"सर ९वीत ७०% मिळालेल्या माझ्या मित्राच्या भावाला आपल्या क्लासमध्ये अँडमिशन मिळेल?" मुद्दामच त्याने सरांना विचारलं
"अजिबात नाही. आपण आपल्या क्लासचा दर्जा उच्च ठेवलाय मानस आणि आपण तो मेन्टेन करतो. अशा कमी टक्के मिळालेल्या मुलांना प्रवेश देऊन आपल्याला आपल्या क्लासचं नांव खराब करायचं नाहीये " सर आत्मप्रौढीने म्हणाले.तेवढ्यात इतर पालक आत शिरले तेव्हा मानस आणि सुभाषने सरांचा निरोप घेतला.
रिझल्ट लागला. आता अँडमिशनची प्रक्रीया सुरु झाली. ११वी-१२वी करुन मेडीकलला जायची मानसची इच्छा होती. आपल्या मुलाने डाँक्टर व्हावं असं सुनीता-सुभाषचंही स्वप्न होतं. शहरातल्या एका नामांकित काँलेजमध्ये वार्षिक १५ हजार रुपये भरुन मानसने प्रवेश घेतला. मानसचा काँलेजला जायचा  पहिलाच दिवस म्हणून सुनिता मुद्दामच घरी राहिली. मानस काँलेजला गेला आणि दोन तासातच परत आला.
"अरे ! काँलेजला गेला नाहीस?" सुनीताने विचारलं.
"अगं गेलो होतो. पण दोनचारच मुलं आली होती. त्यामुळे पिरीएडस् होऊ शकले नाहीत. माझा मित्रही आला होता. तो म्हणाला आजकाल काँलेज कुणीच अटेंड करत नाहीत. फक्त प्रँक्टिकलला येतात"
"अरे मग शिकणार कसं?"
"काँलेजमध्ये चांगलं शिकवत नाहीत म्हणून सगळी मुलं क्लासेस लावून घेतात."
"अरे मग काँलेजची आपण एवढी फी भरतो ती कशासाठी?"
"फक्त नावासाठी आणि परीक्षा देण्यासाठी. चांगल्या काँलेजमधून शिकलो हे सांगण्यासाठी."
" ते काही नाही. तू काँलेजची लेक्चर्स अटेंड करत जा."सुनीता रागाने म्हणाली.
"अगं आई आम्ही गेलो होतो प्राचार्यांना भेटायला. ते म्हंटले किमान दहा तरी मुलं येऊ द्या क्लासमध्ये, मग पाठवतो प्राध्यापकांना. त्यांचं म्हणणं आहे की विद्यार्थीच बसत नाहीत लेक्चर्सना. आम्ही तर तयार आहोत"
" बापरे म्हणजे काय आता क्लासेस लावायचे?"
" काही इलाज नाही आई.मेडीकलला जायचं म्हंटल्यावर क्लासेस तर लावावेच लागतील."
सुनीताने कपाळावर हात मारुन घेतला. आधीच दोघांची तुटपुंजी कमाई त्यात हा नवीन खर्च. संध्याकाळी सुभाष घरी आल्यावर मानसने सगळा किस्सा त्याला सांगितला.
"ठिक आहे. लावून घेऊ आपण क्लास. पण लावायचा कुठे? चांगले क्लासेस कोणते आहेत?" सुभाषने विचारलं.
"हो मी काढलीय माहिती. तुम्हाला वेळ असेल तर जाऊन यायचं का?"
"जावंच लागेल. शिकण्यासाठी हे आता सर्व करावंच लागणार आहे"
दोघं एका क्लासमध्ये पोहोचले. बाहेर बसलेल्या रिसेप्शननिस्टने मार्क्स विचारले.त्यांनी सागितल्यावर ती म्हणाली.
"ठिक आहे. आमची ११वी, १२वी मिळून १,८०,००० फी आहे एका टप्प्यात भरली तर !. तुम्ही चार टप्प्यातही भरु शकता. पण मग ५० हजाराचे चार टप्पे. अशी फी होईल दोन लाख."
" बापरे एवढी फी? देतात मुलं एवढी फी?" सुभाषने आश्चर्याने विचारलं.
ती हसली आणि मग्रुरीने म्हणाली.
"देतात का? अहो सर आमची १२० विद्यार्थ्यांची कँपँसिटी आहे. ११५जागा भरल्यात. तुम्ही घाई केली नाहीत तर तुमच्या मुलाला अँडमिशन मिळणं मुश्किल आहे. मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी खर्च हा करावाच लागतो आणि सगळेच पालक तो आनंदाने करतात."
तेवढ्यात एक मुलगी आईवडिलांसोबत चौकशी करण्यासाठी आली. रिसेप्शनिस्टने तिला मार्क्स विचारले. तिने ७५ टक्के सांगितल्यावर ती म्हणाली.
"साँरी ८५ टक्क्यांच्या खाली आम्ही अँडमिशन देत नाही. पण आम्ही तुला वेटींगवर ठेवू.आमच्या उरलेल्या पाच जागा भरल्या नाहीत तर आम्ही तुला काँल करु. "मुलीचा चेहरा पडला. तिचे पालक रिसेप्शनिस्टला विनवण्या करु लागले.
"अहो एकदा सांगितलं ना तुम्हाला." रिसेप्शनिस्ट त्यांच्यावर खेकसत म्हणाली. "मी काही करु शकत नाही म्हणून"
"अहो पण इथे वाट बघत बसलो तर बाकीचे क्लासेस फुल्ल व्हायचे. मग तिथेही अँडमिशन मिळणार नाही." त्या मुलीचे वडिल काकुळतीने म्हणाले.
"साँरी. तुम्ही सरांना भेटू शकता.पण काही फायदा होईल असं वाटत नाही."
तो संवाद ऐकून मानसला काय वाटलं कुणास ठाऊक तो त्या रिसेप्शनिस्टला म्हणाला.
"मँडम तुम्ही यांना अँडमिशन द्या. मला नाही घ्यायची अँडमिशन" तिथे बसलेले सगळे लोक त्याच्याकडे अवाक होऊन बघू लागले.
"अरे मानस असा काय करतोस? अँडमिशनसाठीच तर आलो ना आपण?" सुभाष आश्चर्यचकीत होऊन म्हणाला.
"नाही बाबा. आपण फक्त चौकशीसाठी आलोय. चला आपण बाहेर जाऊया." आणि तो उठून बाहेरही पडला. सुभाषही हतबल होऊन त्याच्यामागे बाहेर पडला.
"मानस काय वेडेपणा चालवलाय? अरे  आपल्या शहरातला सर्वात नावाजलेला क्लास आहे हा आणि तू...."
"नावाजलेला आहे कारण ते हुशार मुलांनाच प्रवेश देतात. बघितलं ना तुम्ही त्या मुलीला क्लासची खरी गरज होती. तिला ते प्रवेश देत नव्हते आणि बाबा मला इतका महागडा क्लास लावायचाच नाहिये. आपण एखादा नवा क्लास बघू. ते फी कमी घेतात आणि नांव मिळवण्यासाठी चांगलंसुध्दा शिकवतात."
"तू पैशांची काळजी नको करुस मानस. तुला डाँक्टर करायचं आमचं स्वप्न आहे. प्रसंगी आम्ही स्वतःला गहाण ठेवू पण तुला कसलीच कमी पडू देणार नाही."
मानस हसला
"मला समजतंय ते बाबा पण त्याची काहीच गरज नाही. चला आपण दोनतीन क्लास बघू आणि फायनल करु."
तीन क्लासमध्ये चौकशी केल्यानंतर चौथ्या क्लासमध्ये त्यांनी प्रवेश नक्की केला. मानससारखा हुशार मुलगा आपला क्लास जाँईन करतोय हे पाहून क्लासवाल्यांनाही आनंद झाला. मानस काँलेजमध्येही तीनचार वेळा जाऊन आला पण पिरीएडस् कुणीच अटेंड करत नव्हतं याचं त्याला दुःख होत होतं. एकदा केमिस्ट्रीच्या प्रँक्टिकलला सगळे विद्यार्थी जमले.आज सगळ्यांशी बोलायचं असं मानस ठरवूनच आला होता. प्रँक्टिकल संपल्यावर व्हरांड्यात जमलेल्या मुलांकडे तो गेला.
"मित्रांनो तुमच्यापैकी क्लास कुणी नाही लावलेला?"
सगळे एकमेकांकडे पाहू लागले. एक मुलगा म्हणाला
"अरे वेड्या सायन्सचा स्टुडंट क्लास लावणार नाही असं कधी होईल का?"
"आम्ही नाही लावला क्लास. का काय झालं?"
सगळ्यांच्या नजरा त्या आवाजाकडे वळल्या.चारपाच गरीब घरची मुलं समोर उभी होती.
"का? तुम्ही का नाही लावला क्लास?"मानसने विचारलं.
"आम्ही १५किमी. वरच्या एका खेड्यात रहातो. घरची परीस्थिती एवढी चांगली नाहिये. आमच्यापैकी कुणाचे वडील शेती करतात तर कुणाचे छोटेमोठे उद्योग किंवा नोकऱ्या. क्लासची महागडी फी आम्ही नाही भरु शकत."
"मग तुम्ही पिरीएडस् का नाही अटेंड करत?"
"आम्हांला खेड्यावरुन बसने किंवा सायकलने यावं लागतं. त्याला आमची तयारी आहे. एकदोनदा आम्ही येऊन पाहीलं. पण इथे कुणी येतच नाही हे पाहून आम्हीही येणं सोडलं."
"अरे आपण एवढी फी भरतो काँलेजची ती कशासाठी? वरुन आपण महागडे क्लासेस लावतो. आपल्या आईवडिलांवर आपण किती ओझं टाकायचं?"
"आम्ही नाही अटेंड करणार पिरीएडस्. काही चांगलं शिकवत नाही." मध्येच एक मुलगी ठसक्यात म्हणाली. मानस तिच्याकडे किंचित रागाने बघत म्हणाला.
"मला सांगा क्लासमध्येही शंभर शंभर विद्यार्थी असतात. तिथेही कोणं आपल्याकडे वैयक्तिक लक्ष देतं? आणि मी,ज्यांना काँलेज फीमध्ये सवलत मिळते किंवा ज्यांचे आईवडिलच श्रीमंत आहेत,त्यांच्याबद्दल बोलतच नाहिये. मी मध्यमवर्गीय किंवा गरीबांबद्दल बोलतोय."
ती मुलगी तावातावाने तिथून निघून गेली.
"अजून कुणाला पिरीएडस् अटेंड करायची इच्छा आहे?"मानसने विचारलं.
"आमची"चारपाच मुली एकदमच म्हणाल्या. मानसने सगळी मुलं मोजली.१५-१६भरली.
"चला तर मग, आपण प्राचार्यांकडे जाऊ.उद्यापासून पिरियडस् सुरु करायची त्यांना विनंती करु."
दुसऱ्या दिवसापासून काँलेजमध्ये पिरीएडस् सुरु झाले. मानस सकाळी काँलेजला तर संध्याकाळी क्लासेसला जाऊ लागला. त्याचा क्लास अत्याधुनिक होता. क्लासमध्ये १२५ विद्यार्थी असल्यामुळे मागच्या मुलांना सरांचा आवाज ऐकू जायचा नाही. त्यांच्यासाठी टिव्ही आणि स्पिकर्सची व्यवस्था होती. मानस प्रश्नं विचारायचा. पण बरीच मुलं शंका असूनही एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये आपलं हसू होऊ नये म्हणून प्रश्नंच विचारत नव्हती. याउलट काँलेजमध्ये कमी विद्यार्थी असल्यामुळे सरांचं प्रत्येक मुलामुलीकडे लक्ष असायचं. हळूहळू मानसच्या लक्षात आलं की काँलेजमध्येही चांगलं शिकवल्या जातंय. क्लासमध्ये त्याच विषयाची पुनरावृत्ती होत असल्याने सगळ्या विषयांवर चांगली पकड बसत चालली होती.
मानसच्या क्लासमध्ये सगळे विषय शिकवल्या जात होते.पण बहुतांशी मुलांनी वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळ्या ठिकाणी क्लासेस लावले होते. ही मुलं काँलेजमध्ये न जाता या क्लासमधून त्या क्लासमध्ये जाण्यात दिवसभर अडकून पडायची. या अशा फिरण्याने त्यांना थकवा तर यायचाच शिवाय अभ्यासही व्हायचा नाही.  मानस तसा काही फार हुशार मुलगा नव्हता. आपण एकपाठी नाही आणि मेहनतीशिवाय आपल्याला पर्याय नाही ही गोष्ट तो जाणून होता. संध्याकाळी क्लासहून परतल्यावर रात्री उशीरापर्यंत दिवसभरात झालेल्या अभ्यासाची उजळणी करणं आणि नोट्स काढण्याचं काम तो करायचा. घरकामं करुनही मेरीटमध्ये येणाऱ्या मुलींच्या बातम्या त्याने वाचलेल्या होत्या त्यामुळे आईला तो नेहमी घरकामात मदत करायचा. त्याचे वडील रात्री नऊ वाजता घरी यायचे.अर्थातच त्यांच्या वाटेची बाहेरची कामंही त्यालाच करावी लागायची. मानसची त्याबद्दल कोणतीही तक्रार नव्हती. घरची आर्थिक परिस्थिती आणि आईवडिलांच्या आशा आपल्यावरच केंद्रित झाल्या हेही तो जाणून होता. सुनीताला त्याच्या समंजसपणाचं खुप कौतुक होतं.मानसच माझी मुलगी आणि मुलगा आहे असं ती अभिमानाने लोकांना सांगायची. सहामाही परीक्षा झाली. मानसला त्यात ८५ टक्के मिळाले. मराठी माध्यमात शिकलेल्या मानसला इंग्रजी माध्यमातले विषय थोडेफार जड जाणारच होते. सुभाषला मात्र थोडीफार चिंता वाटू लागली होती. एक दिवस तो मानसला म्हणाला.
"अजूनही चान्स आहे मानस ,हा क्लास सोडून दुसरा चांगला क्लास लावून घे."
"बाबा क्लास कितीही चांगला असला तरी सगळेच विद्यार्थी काही मेरीटमध्ये येत नाहीत .शेवटी क्लासचा फायदा आपण कसा करुन घेतो ते आपल्यावर अवलंबून असतं. तुम्ही काही काळजी करु नका. वार्षिक परीक्षेत मला चांगले मार्क्स मिळतील. नाहीच मिळाले तर बघु"
सुभाष काही बोलला नाही पण त्याचं मन मात्र अस्वस्थच होतं.
 एक गोष्ट मानसच्या लक्षात येत होती ती म्हणजे क्लासमध्ये १२५ विद्यार्थी असल्याने कुणाही विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिल्या जात नव्हतं. त्यातच परीक्षेच्या गुणांना केंद्रीत करुन शिकवल्या जात होतं. विषयाचं सखोल ज्ञान मिळावं असं ना तर क्लासवाल्यांना वाटत होतं ना विद्यार्थ्यांना ! शिक्षणपद्धतीच अशी होती की जास्तीत जास्त मार्क्स पदरात पाडून घेण्यावर भर दिल्या जात होता. अशा प्रकारच्या शिक्षणामुळेच काँपी करण्यासारखे शाँर्टकट्स विद्यार्थी अवलंबत होते.
    वार्षिक परीक्षा सुरु झाली तसं मानसवर आईवडिलांच्या अपेक्षांचं प्रचंड दडपण आलं. खरं तर अकरावीच्या मार्क्सचा काहीही फरक पडणार नव्हता पण बारावीत आपण काय दिवे लावणार आहोत हे त्या मार्क्समुळेच कळणार होतं. मानसने रात्रीचा दिवस केला आणि परीक्षा दिली. रिझल्ट लागला.मानसला ८८टक्के मिळाले. ते मार्क्स पाहून सुभाष-सुनीताचे होश उडाले.
"बघ मानस तुला आम्ही म्हणत होतो चांगला क्लास लाव. पण तू ऐकलं नाहीस. बघितलं ना काय झालंय ते!" सुनिता रडवेली होत म्हणाली.
"अगं आई क्लासवर काहीही नसतं. जो क्लास बाबा लावायचं म्हणत होते त्या क्लासचा रिझल्ट आमच्या क्लासपेक्षाही कमी आहे. आमच्या क्लासमध्ये मी दुसरा आलोय. पहिल्या नंबरच्या मुलालाही ९०टक्के आहेत.एवढं काही वाईट घडलेलं नाहीये.अजून एक वर्ष बाकी आहे. होईल प्रगती." मानस वैतागून म्हणाला.
"अरे पण बेटा मेडिकलच्या द्रुष्टीने इतके मार्क्स पुरेसे नाहियेत. शिवाय आता "नीट"चीही परीक्षा असेल. त्यादृष्टीने चांगला क्लास लावणं आवश्यक नाहीये का?"सुभाषने विचारलं.
"बाबा तुमचीच काय सगळ्यांचीच ही मानसिकता झालीये की क्लास लावल्याशिवाय चांगले मार्क्स मिळत नाहीत म्हणून. आपला आत्मविश्वास कमी पडतो म्हणून आपल्याला तसं वाटतं. तुमच्या काळातही डाँक्टर, इंजीनियर, शास्त्रज्ञ झालेत. कधी त्यांनी क्लासेस लावलेत?"
"अरे बेटा,तो काळ वेगळा होता. त्यावेळी इतकी जीवघेणी स्पर्धा नव्हती. आजकाल पाँईंट फाईव्ह मार्कांनी अँडमिशन हुकतात." सुभाष त्याला समजावत म्हणाला.
"मान्य आहे बाबा मला.पण मेडिकलला अँडमिशन नाही मिळाली तर आभाळ थोडीच कोसळणार आहे? दुसऱ्याही शाखा आहेत. आर्ट्स ग्रँज्युएट आय.ए.एस.होऊन कलेक्टर बनतात. काँमर्सवाले चार्टर्ड अकाउंटंट बनून डाँक्टर इतकाच पैसा कमवतात. इंजीनियरींगच्या अनेक अशा शाखा आहेत जिथे खोऱ्याने पैसा मिळू शकतो. अहो अंगठाछाप लोक आमदार, खासदार बनतात." बोलताबोलता मानस हसला पण सुभाष-सुनीता गंभीर होते.
"मानस हा गमतीचा मुद्दा नाहिये. डाँक्टरांचं स्टेटस काही वेगळंच असतं. तू डाँक्टर व्हावंस असं आमचं स्वप्न आहे. त्याकरीता आम्ही काहीही करायला तयार आहोत. बरं तू आता कुठे क्लास लावणार आहेस?"सुनिताने विचारलं.
"मी कुठेच क्लास लावणार नाहीये आई. मी घरीच अभ्यास करणार आहे"
"काय?"दोघंही जवळजवळ ओरडलेच." काय वेडबीड लागलंय का तुला?"
" नाही आईबाबा.काँलेजमधले लेक्चर्स रेग्युलर अटेंड केले आणि घरी नियमित अभ्यास केला तर क्लासची गरजच नाहिये. क्लास अटेंड करण्यात दिवसातले बहुमुल्य चारपाच तास वाया जातात असं माझ्या लक्षात आलंय. आपण ओपन कँटगरीत येतो बाबा. आपल्याला मेडिकलला प्रचंड पैसा लागणार आहे. क्लासच्या अवाढव्य फीमध्ये तो घालवणं योग्य नाही. मी सगळा सारासार विचार केलाय. तुम्ही काही काळजी करु नका. मला मेडिकलला नक्की अँडमिशन मिळेल." आणि तो उठून त्याच्या रुममध्ये निघून गेला. सुभाष-सुनीता त्याच्याकडे बघतच राहिले.
     काँलेज सुरु झालं आणि एक नवाच प्राँब्लेम उभा राहिला. ज्या विद्यार्थ्यांनी अकरावीत क्लासेस लावले नव्हते त्यांनी बारावीत क्लासेस लावून घेतले आणि हे विद्यार्थी काँलेजमधल्या लेक्चर्सला गैरहजर राहू लागले. ज्या मुलांना काही महत्वाकांक्षा नव्हती, फक्त ग्रँज्यूएशन करायचं होतं तीच मुलं  फक्त काँलेजमध्ये हजर रहायची. पण त्यात नियमितपणा नव्हता.अर्थातच लेक्चर्स अनियमित होऊ लागली. मानस मग काँलेजच्या लायब्ररीत जाऊन अभ्यास करु लागला. पण अनेक मुद्दे त्याला समजायचे नाहीत.बरीच गणितं सुटता सुटत नसायची. अडचणी वाढत चालल्या होत्या. त्याच्या मनाची घालमेल वाढायला लागली.आपण क्लास सोडून चुक केली असं त्याला वाटू लागलं. एक दिवस तिरीमरीत त्याने प्राचार्यांचं आँफिस गाठलं. आपल्या आर्थिक परीस्थितीची,आईवडिलांच्या अपेक्षांची आणि क्लास सोडल्याची माहिती प्राचार्यांना दिली. त्यांनी मानसला खुर्चीत बसायला सांगितलं.
"तुझ्या धाडसाचंं मला कौतूक वाटतं मानस. मागील वर्षी तुझ्याच पुढाकारामुळे आपण लेक्चर्स सुरु केल्याचं मला आठवतंय. विषय समजण्यात अडचणी येतातच. पण तू काळजी करु नकोस." त्यांनी बेल वाजवून शिपायाला बोलावलं. सगळ्या विषयाच्या प्राध्यापकांना बोलावून घेतलं. मानसकडे बोट दाखवत ते म्हणाले
"या मुलाने काँलेजमध्ये चांगलं शिकवतात म्हणून क्लास सोडला.आणि आता विद्यार्थीच येत नाहीत म्हणून आपलीही लेक्चर्स होत नाही.माझी तुम्हांला विनंती आहे की त्याला केव्हाही अडचण आली तर त्याला मार्गदर्शन करावं"
"सर आम्ही केव्हाही तयार आहोत. लेक्चरला विद्यार्थी नसले की आम्ही रिकामेच असतो."बायोलॉजीचे प्राध्यापक म्हणाले."आणि मानस तू अगदी माझ्या घरीही आलास तरी चालेल" सगळे प्राध्यापक त्याला मदत करायला तयार आहेत हे पाहून मानसचा जीव भांड्यात पडला.एक प्रश्न मार्गी लागला होता. फिजिक्सच्या प्रँक्टिकलला मानसची परीस्थिती सगळ्या विद्यार्थ्यांना कळली. बऱ्याच जणांनी त्याला मुर्खात काढलं. पण ज्या मुलीकरीता त्याने तो नावाजलेला क्लास सोडला होता ती मानसकडे आली आणि म्हणाली.
"मानस आमच्या क्लासच्या नोट्स खुप चांगल्या असतात. मी त्या तुला आणून देईन.पण तू म्हणतो ते खरंय. या क्लासेसचा नुसता बाजार झालाय आणि इतकं दमायला होतं बघ. हा क्लास झाला की तो क्लास. तो झाला की हा क्लास. अभ्यास करायचीही इच्छा उरत नाही घरी गेल्यावर. पण काय करणार? आईवडिलांच्या आग्रहाखातर यावं लागतं. आपल्या स्कोअरची चिंता आपल्यापेक्षा त्यांनाच जास्त असते."
मानसला आपल्या आईवडिलांची आठवण झाली. म्हणजे सगळीकडे पालकांचा प्रश्न समान होता तर !
  मानसची सहामाही आठवड्यावर राहिली आणि सुनीता काविळीने आजारी पडली. उपचार सुरु होते पण सुनिताला काम करवेना. स्वयंपाकघरात तर उभं सुध्दा रहावत नव्हतंं इतकी मळमळ सुटायची. सुभाष तर सकाळी नऊला गेला की रात्री नऊलाच परतायचा. घरात कामाला कधीच बाई नव्हती. शेवटी सगळ्या कामांची जबाबदारी मानसवरच पडली. कपडे धुणं,भांडी स्वच्छ करणं, आईसाठी बिनातेलाच्या भाज्या करणं, स्वतःसाठी आणि वडिलांसाठी वेगळ्या भाज्या करणं. घराची साफसफाई हे सगळं त्यालाच करावं लागत होतं. या सगळ्या गडबडीत त्याचा अभ्यास मात्र जेमतेमच होत होता. सुनिताला ते कळत होतं. तिने या कामासाठी बाई मिळवण्याचाही प्रयत्न करुन पाहिला. पण सणवाराचे दिवस असल्याने बाईही मिळेना. परीक्षा सुरु झाली. रात्रीची जागरणं,सकाळी पहाटे उठून सर्व कामं करुन मानस परीक्षेला जायचा.तो पेपर देऊन आला की सुनिता त्याला कसा गेला पेपर असं विचारायची. तो चांगला गेला म्हणायचा पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तिला सगळं काही सांगून जायचे.
"माझ्यामुळे तुझा अभ्यास होत नाही ना मानस?"एक दिवस तिने त्याला विचारलंच.
तो हसून तिच्या शेजारी बसला. तिचा हात हातात घेऊन म्हणाला.
"असं काही नाहिये आई आणि ही परीक्षा काही महत्वाची नाहिये. चालतंच थोडंफार. आम्ही आजारी पडलो की तू घेतेच ना आमची काळजी. मग एखादेवेळी आम्ही तुझी घेतली तर बिघडलं कुठं?"
त्याचा समजुतदारपणा पाहून तिला भडभडून आलं.
"दुसरी वेळ असती तर काही वाटलं नसतं रे. ऐन परीक्षेच्या वेळी असं व्हावं. वाईट वाटतं रे"आणि ती रडू लागली.
"नको रडू आई"तो तिला जवळ घेऊन म्हणाला.
"वार्षिक परीक्षेला मी चांगली तयारी करेन. त्यावेळेस मात्र तू एकदम फिट रहायचं हं! आणि सुटीही घ्यायची दहाबारा दिवस"
"हो रे घेईन मी. पण आम्हांला निराश तर करणार नाही ना मानस?"
"नाही गं आई.तू बरी झालीस की मी जोमाने अभ्यासाला लागणार आहे.बरं तू आता कर आराम.मी थोडा वेळ अभ्यास करुन स्वयंपाकाला लागतो"   
       दैवयोग पहा मानसची परीक्षा संपली आणि सुनिताला बरं वाटायला लागलं. कमीतकमी दिवाळी तरी आनंदात जाईल एवढंच समाधान सुनीताला वाटत होतं. सहामाहीचा रिझल्ट लागला.मानसच्या अपेक्षेप्रमाणे त्याला ७५ टक्के मिळाले. पण सुभाष-सुनीताला जबरदस्त धक्का बसला. सुनीताच्या आजारपणामुळे त्याला कमी मार्क्स मिळतील याची त्यांना कल्पना होतीच पण मानस इतका खाली येईल असं त्यांना वाटलं नव्हतं.त्याला वाईट वाटेल म्हणून ते त्याला चकार शब्द बोलले नाहीत.
एक दिवस मानस घरी नसतांना सुभाष सुनीताला उद्वेगाने म्हणाला.
"मला वाटतं आपण आता मानसकडून अपेक्षा करणं सोडून दिलं पाहिजे."
"करतोय हो तो प्रयत्न, मध्येमध्ये अडचणीच अशा आल्या की त्याचाही नाईलाज होता."
"त्याने तो क्लास सोडायचा मुर्खपणा करायला नको होता. घरी अभ्यास झाला नाही तर तिथे तरी होऊ शकला असता" सुभाष नाराजीने म्हणाला.
"हो ते तर खरंच आहे. मलाही त्याचा तो निर्णय पटलेला नाही. पण जाऊ द्या आपण त्याला काही बोलायचं नाही. बघताय ना आजकाल मुलं थोडंसं कुणी वाईट बोललं की लगेच जीवाचं बरंवाईट करुन घेतात. जाऊ द्या नाही डाँक्टर झाला तर इंजीनियर तर नक्कीच होईल."
"आजकाल इंजीनियर तर कुणीही होतंय गं. बघितलं ना कसा बाजार मांडून ठेवलाय राजकारण्यांनी इंजीनियरींगचा. दरवर्षी लाखो इंजीनियर्सचं प्राँडक्शन होतंय. नोकऱ्या कुठे आहेत या इंजीनियर्सना?"
"पण मेडिकलमध्येही तर सगळी अनिश्चितता आहे.अगोदर एम.बी.बी.एस.करायचं. मग एम.डी. त्यानंतर कोट्यावधी रुपये खर्च करुन दवाखाना टाकायचा. तो चालला तर ठीक आहे नाही तर एखाद्या मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटलला नोकरी करायची. मँनेजमेंटच्या हुकमानुसार पेशंटच्या जीवाशी खेळायचं.सगळा जीवघेणा प्रचंड पैशाचा खेळ. आपल्याला जमेल असं वाटतंय तुम्हांला? आपण अशी मध्यमवर्गीय माणसं. ना कुठलं रिझर्व्हेशन ना कुठल्या सवलती."
सुभाषने एक निश्वास सोडला.
" खरंय तुझं म्हणणं. मानसची परीक्षा झाली की आपली परीक्षा सुरु होणार आहे. कधीकधी विचारांनी झोप लागत नाही."
"म्हणूनच तर म्हणतेय ,नको आपण मानसवर प्रेशर आणायला. आपल्या अपेक्षांचं ओझं त्याच्यावर लादायला. नाही मेडिकल तर इंजीनियरींग करेल."
"आपल्यावेळी किती छान होतं ना सुनीता ! अभ्यासाचं,अपेक्षांचं कोणतंच ओझं नसायचं. साधं ग्रँज्युएट झालं तरी नोकऱ्या लागायच्या. पगार कमी असला तरी आपण समाधानी होतो."
" तसे आताही आपण समाधानी आहोत. फक्त मानसच्या भवितव्यासाठी आपण बैचेन झालोय. त्या बिचाऱ्याची एकच चुक आहे की तो एकुलता एक आहे. त्यामुळे आपल्या आशाअपेक्षांचा केंद्रबिंदू तोच आहे. ही त्यालाही जाणीव आहे. म्हणून त्याच्यात अकाली प्रौढत्व आलंय. भाऊबहिण कुणी असतं तर त्याला मन तरी मोकळं करता आलं असतं.आपल्याजवळ तो खुलत नाही. त्याचा ताण त्याच्या चेहऱ्यावर आजकाल दिसू लागलाय."
"ठिक आहे यापुढे आपण त्याला अभ्यासाबद्दल काही विचारायचं नाही. जसं होईल तसं."
"तो तसाही सिन्सीयर आहे" सुनीता म्हणाली "मग आपण उगीचंच त्रास का द्यायचा"
तेवढ्यात मानस आला आणि त्यांचं बोलणं खुंटलं.
   परीक्षा जवळ आली तसा मानस अभ्यासात गुरफटून गेला. त्याच्या मित्रांचे आता क्रँश कोर्सेस सुरु झाले होते. या कोर्समध्ये नेमकं काय शिकवलं जातं याबद्दल मानसला उत्सुकता होती. पण प्रचंड फी देऊन हे क्लास लावणाऱ्या मित्रांना विचारणंही त्याला योग्य वाटत नव्हतं. इंटरनेटवरुन तो जमेल तितकी माहिती घेत होता पण त्याच्या मनाचं काही समाधान होत नव्हतं. आजकाल त्याचा आत्मविश्वासही डळमळीत होत चालला होता. एके रात्री १२ वाजता सुनीता पाणी प्यायला उठली. मानसच्या खोलीत उजेड पाहून तिने खोलीचं दार सहज ढकलून पाहिलं. मानस टेबलवर डोकं ठेवून रडत होता.सुनीता लगेच त्याच्याजवळ गेली.
"मानस.काय झालं? का रडतो आहेस." तिने चिंतातूर होऊन विचारलं. त्याने आईकडे पाहून डोळे पुसले. सुनीताने त्याच्या डोक्यावर हात फिरवला. तसा रडवेल्या स्वरात तो म्हणाला.
"खुप टेंशन आलंय आई.खुप भीती वाटतेय परीक्षेची."
"बेटा असं घाबरुन कसं चालेल परीक्षेला? ही तर फक्त बारावीची परीक्षा आहे.अजून पुढे कितीतरी परीक्षा द्यायच्या आहेत तुला. तुला सांगू माणसाचं आयुष्य हीच एक परीक्षा आहे. शैक्षणिक परीक्षा आटोपल्या की माणसाची जीवनाची परीक्षा सुरु होते. नोकरीसाठी लेखी परीक्षा, इंटरव्ह्यू सुरु होतात. नोकरी लागेपर्यंत बेरोजगारीचा काळ सहन करणे हीसुद्धा एक परीक्षाच असते. नोकरी लागल्यानंतर ती टिकवून ठेवणं, त्यात बढती मिळवणं ही परीक्षाच असते. नोकरीत बस्तान बसल्यावर चांगली बायको किंवा नवरा मिळवणं, लग्नानंतर एकमेकांशी जमवून घेणं हीही एक परीक्षाच. मग मुलं होतात. त्याचा सांभाळ करणं, त्यांच्यावर चांगले संस्कार करणं,ती सगळ्या क्षेत्रात पुढे जातील, त्यांची प्रगती होईल यासाठी प्रयत्न करणं. शिक्षण झालं की त्यांच्या नोकरी-व्यवसायासाठी प्रयत्न करणं या सगळ्या परीक्षाच तर आहेत बेटा"
मानस काही बोलला नाही. पण कुठेतरी त्याच्या काही काळजात ते भिडत होतं.
"इतकं आयुष्य कठीण असतं आई?"त्याने विचारलं. सुनीता हसली.
"नाही रे बाळा. एकदा या परीक्षांची सवय झाली की त्यांचं काही वाटेनासं होतं. म्हणूनच म्हणते टेंशन घेऊ नकोस. मी आणि तुझ्या बाबांनी मेडिकलचा हट्ट सोडलाय.नाही जमलं मेडिकलचं तर इंजीनियरींगला अँडमिशन घ्यायची. आता रिलँक्स हो. झेपेल तेवढाच अभ्यास कर. अभ्यास करुनकरुन आजारी पडलास तर ते जास्त महागात पडेल. चल झोप आता"
मानसला एकदम हलकंहलकं वाटू लागलं. मनावर आलेलं मळभ नाहिसं झालंं. एक नवीन उत्साह, उमेद जागृत झाली.
"आई मलाही इंजीनियरींगपेक्षा मेडिकल आवडतं. मी प्रयत्न करणार आहेच. पण नाही जमलं तर प्लीज नाराज होऊ नका"
" नाही होणार.चल पुरे कर अभ्यास." मानस प्रसन्न मनाने झोपायला गेला.
  परीक्षा सुरु झाली. मानसच्या मनावरचं अपेक्षांचं ओझं उतरल्यामुळे मानसचं डोकं उत्तमरित्या काम करत होतं.परिक्षेची भिती नाहीशी झाली होती त्यामुळे प्रत्येक पेपर त्याला सोपा वाटत होता.  परीक्षा संपल्यावर सुभाषने त्याला विचारलं.
"किती मिळतील असं वाटतंय तुला?"
"इंजीनियरींगला अँडमिशन मिळेल एवढे नक्की मिळतील."
सुभाष काही बोलला नाही पण मनातून तो नाराज झाला. मानसने मेडिकलसाठीच प्रयत्न करावे असं त्याला अजूनही वाटत होतं पण सुनीता आणि त्याचं ठरल्याप्रमाणे त्याने शांत रहाणंच पसंत केलं.
रिझल्टचा दिवस उजाडला. सुनीताच्या उरात धडधड होऊ लागली. आपला अपेक्षाभंगच होणार आणि तसा झाला तर आपण मानसला काहीतरी बोलून बसू या भितीने सुभाष कामावर निघून गेला. अकरा वाजता घरातलं नेट व्यवस्थित चालत नाही म्हणून मानस सायबर कँफेवर निघून गेला. सुनीता घरातच थांबली.विपरीत रिझल्ट लागला तरी तिने मनाची तयारी करुन ठेवली होती. पण मानस आणि सुभाषच्या प्रतिक्रिया कशा रहातील या कल्पनेने तिचा थरकाप उडत होता.
   बारा वाजले. अजून काहीच कळत नव्हतं. सुनीता बैचेन झाली.मानसला फोन करण्यासाठी तिने मोबाईल उचलला. तेवढ्यात मोबाईलच वाजला.अपरिचित नंबर होता.तिने धडधडत्या काळजाने तो उचलला.
"काकू मी मानसचा मित्र बोलतोय.मानस कुठेय?"
"अरे तो सायबर कँफेवर गेलाय रिझल्ट बघायला. का काय झालं?"
"अहो काकू तुम्हांला कळलं नाही?"
"का...काय कळलं नाही?"सुनीताने अधीरतेने विचारलं.
"अहो काकू मानस पुर्ण जिल्ह्यातून पहिला आलाय आणि महाराष्ट्रातून दुसरा. पार्टी पाहिजे हं काकू"
"काय म्हणाला तू? परत एकदा सांग."सुनिताच्या डोळ्यात अश्रु जमा होऊ लागले.
"काकू मानस महाराष्ट्रातून दुसरा आणि जिल्ह्यातून पहिला....."
सुनिताने पुढचं ऐकलंच नाही मोबाईल तसाच ठेवून ती मोठमोठ्याने रडू लागली. तेवढ्यात फाटक वाजलं. तसंच रडत रडत तिने दार उघडलं. मानस बाहेर उभा होता. त्याचे डोळे रडवेले दिसत होते. आईलाही रडतांना पाहून त्याने तिला "आई"म्हणून मिठी मारली आणि तोही रडू लागला.
" तुला कळलं ना आई?" त्याने रडतारडता विचारलं.
"हो बाळा कळलं मला !खुप खुप अभिनंदन बेटा."
फोन वाजला. सुनीताने तो घेतला. सुभाष बोलत होता."सुनीता मला आताच कळलं मानसबद्दल. पोराने स्वप्न पुर्ण केलं आपलं." पुढे त्याला बोलता येईना.
"बोलताय त्याच्याशी?"
"नाही मी घरी यायला निघालोय. कधी एकदा त्याला भेटतोय असं झालंय. आल्यावरच बोलतो त्याच्याशी"
सुनीताने फोन ठेवला. पण नंतर फोन सातत्याने वाजू लागला. मानसचे मित्र,नातेवाईक, परिचित आणि वर्तमानपत्रांचे वार्ताहर सर्वांना मानसशी बोलायचं होतं. कोणताही क्लास न लावता त्याने इतकी उत्तुंग भरारी घेतलीच कशी हे सर्वांना जाणू घ्यायचं होतं. थोड्या वेळाने सुभाष आला.भरलेल्या डोळ्यांनी त्याने मानसला जवळ घेतलं.
"बारावी तर झाली.आता "नीट"ची परीक्षा राहिलीये. एक टेन्शन अजून बाकीच आहे" सुभाष म्हणाला.
"काही काळजी करु नका बाबा. माझी "नीट"ची तयारी झालीय. उद्यासुध्दा मी परीक्षा देऊ शकतो आणि नक्कीच चांगला स्कोअर करु शकतो."मानस आत्मविश्वासाने म्हणाला.
प्रेस फोटोग्राफर आले. मानसला पेढा भरवतांना सुनिता -सुभाषचे फोटो निघू लागले. मागच्या वर्षभरातील घटना मानसच्या डोळ्यासमोरुन सरकू लागल्या.आणि आयुष्यातली एक अवघड परिक्षा उत्तीर्ण केल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकू लागलं.

© दीपक तांबोळी
    9503011250
(ही कथा माझ्या " हा खेळ भावनांचा " या पुस्तकातील आहे. कोणताही बदल न करता  शेअर करण्यास माझी हरकत नाही. माझ्या पुस्तकांबद्दलच्या अधिक माहितीसाठी क्रुपया वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा )

शनिवार, २३ मार्च, २०२४

993. विश लिस्ट

"हॅलो...ग्लोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. कॅन्सर वॉर्ड, हेड नर्स प्रमिला बोलते आहे ! मी आपली काय मदत करू शकते ?" 
फोनची रिंग वाजताच रिसीवर कानाला लावत नेहमीच्याच यांत्रिक पद्धतीने प्रमिला मावशींनी उत्तर दिलं. पण समोरून कोण बोलतंय हे समजताच तो यांत्रिक पणा नाहीसा झाला. चेहऱ्यावर प्रसन्न हास्य पसरलं आणि अत्यंत प्रेमळ स्वरात त्यांनी विचारपूस केली 
 " अंजली ??? कश्या आहात तुम्ही ? " 
" हो हो. काल रात्रीच अविनाश सरांचा फोन आला होता , आणि सगळं साहित्य आज सकाळीच त्यांनी पाठवून दिलंय ..ऑफिस मधल्या माणसासोबत. काही काळजी करु नका. आम्ही सगळी तयारी करू. दुपारीच डेकोरेशन करून घेऊ. हो. वॉर्ड बॉय पण आहेत मदतीला. चालेल..!
नाही. केक तुम्ही आणणार असं अविनाश सरांनी सांगितलं, काका ?? ते ठीक आहेत.आज जरा थकल्या सारखे वाटत आहेत , अहो काल किमो होती ना सहावी, मग त्रास होणारच !   
बाकी सगळं ठीक आहे. या मग तुम्ही पाच वाजता.बाय...गुड डे.."
असे संवाद झाले आणि फोन ठेवून प्रमिला मावशी वॉर्ड मध्ये राऊंड मारायला गेल्या. मध्ये मध्ये बाकीच्या नर्स , वॉर्ड बॉय यांना सूचना देत होत्या , पेशंटस्  ची विचारपूस करीत होत्या. आणि मग चार वाजल्या पासूनच ..त्या खास वॉर्ड मध्ये सजावट सुरू झाली. फुगे,रिबिनी लावण्यात आल्या काही उत्साही मंडळींनी बर्थ डे पार्टीच्या त्रिकोणी टोप्या आणल्या होत्या. कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी निकराची लढाई करणाऱ्या या सगळ्या वीरांच्या नेहमी सुतकी आणि गंभीर वातावरण असलेल्या या " कॅन्सर वॉर्ड"  मध्ये आज वेगळंच चैतन्य निर्माण झालं होतं , एक निराळा उत्साह जाणवत होता आणि त्याचं कारण ही सर्वांना ठाऊक होतं. वयाने सर्वात ज्येष्ठ , पण मनाने चिरतरुण असलेल्या सदा हसतमुख.. अंजली ने ' लाफिंग बुद्ध ' असं नाव पाडलेल्या" मनोहर काकांचा " वाढदिवस !!  पाच वाजता तर तिथला उत्साह , ते चैतन्य अगदी शिगेला पोहोचलं  होतं. अविनाश , अंजली इतर चार पाच जण भला मोठा केक घेऊन तिथे आले !  बाकीचे पेशंट देखील मग मनोहर काकांच्या पलंगा भोवती गोळा झाले आणि या खास प्रसंगासाठी आवर्जून निमंत्रित. मनोहर काकांचे खास मित्र आणि एके काळचे ऑफिस सहकारी जयवंत साने देखील तिथे आले. एक जण चाकू घेऊन आला. अंजली ने चटकन एक त्रिकोणी टोपी काकांच्या डोक्यावर ठेवली. काका  किलकिल्या डोळ्यांनी तो केक पाहू लागले.  औषधं आणि कीमो थेरपी यामुळे  फु्फुसांच्या कॅन्सर ने ग्रस्त मनोहर काका आता थकून गेले होते पण स्वभावातला मिश्किल पणा व विनोद बुद्धी मात्र तशीच शाबूत होती. 
" अरे काय रे  हे ???  फक्त केक आणलाय पोरांनो.. माझं गिफ्ट कुठाय ? " एक डोळा बारीक करीत ते गमतीने म्हणाले.
" काका... मी तर केक घेऊन आले बघा..  यांनीच गिफ्ट आणलं नाही " काकांच्या लाडिक आरोपांना अविनाश कडे वळवत अंजलीने स्वतः ची बाजू मांडत सुटका करून घेतली.
"अहो काका... असं काही नाही हं..... मी ऑफिस मधून डायरेक्ट इकडं आलो बघा, त्यामुळे.... " अविनाश स्पष्टीकरण देऊ लागला..
" अरे असू दे पोरांनो .. गंमत केली मी... कसलं गिफ्ट घेणार आता..." मनोहर काका म्हणाले..
" हां .... नो नो. तसं नाही बरं.. गिफ्ट नाही हे कोण म्हणलं?? तुमचं सर्वात स्पेशल गिफ्ट आज तुम्हाला मी देणार आहे आज ...तुमच्या विश लिस्ट मधलं नंबर वन.... " 
अतिशय प्रसन्न पणाने हसत ...मनोहर काकांचे हात हातात घेत अविनाश म्हणाला..
" रियली ?? काय म्हणतोस ?? म्हणजे लंडन ??? खरं की काय ?   आशुतोष चा फोन आला होता ?? " 
प्रचंड अविश्र्वासाने मनोहर काका विचारते झाले. कित्येक दिवसात न दिसलेली एक वेगळीच चमक आत्ता त्यांच्या डोळ्यात दिसत होती. प्रमिला मावशी देखील आश्चर्याने पहात होत्या..
" येस... अगदी बरोबर ! यू आर गोईंग टू लंडन .. व्हिसा चं काम दोन एक दिवसात होईल ..आणि मग " हाताने विमान हवेत उडाल्या सारखं दर्शवत अविनाश म्हणाला आणि काकांच्या चमकत्या डोळ्यात टचकन  पाणी आलं....
" अरे पण मला फोन का नाही केला आशुतोषने? साधं विश पण नाही केलं सख्खा मुलगा असून " काका आता किंचित व्यथित झाले होते.
अविनाश ने गडबडून अंजली कडे पाहिलं आणि पुन्हा त्यांची गाडी रुळावर आणत म्हणाला " अहो आला होता की फोन. पण इथे हॉस्पिटल मधला फोन तिकडे लांब ..या प्रमिला मावशी च्या डेस्क वर.. शिवाय  तुम्ही झोपला होता. मग तिथे कसे जाणार ?  म्हणून मग माझ्या मोबाईल वर केला होता फोन त्याने. थांबा मी त्याला करतो फोन..बोला तुम्ही " असं म्हणत अविनाश ने खिशातून फोन काढला.
" हो रे त्या मेल्या इंजेक्शन ने झोप फार येते.." चुटपुट करीत काका उत्तरले..
अविनाश ने फोन लावून दिला आणि मनोहर काका बोलू लागले. आता बोलताना त्यांना दम लागत होता. आवाज कापरा होत होता." व्यवस्थित ऐकू येतं नाही रे !! नेटवर्क कमी आहे का पहा जरा " असं म्हणत फोन पुन्हा अविनाश कडे दिला आणि सर्वांसमक्ष शर्ट च्या बाहीला डोळे पुसले. आता पुन्हा वातावरण बदल आवश्यक होता. कारण सगळेच जरासे भावनावश झाले होते..मग अंजली ने सूत्रं हातात घेतली.
" काका बास झाली रडारड. लाफिंग बुध्द हसतानाच बरा वाटतो. केक कापा बघू आता खूप भूक लागली आहे " 
आणि मस्त पैकी हश्या पिकला तिथे. काका ही डोळे हसत हसत चाकू घेऊन केक कापण्यासाठी सज्ज झाले..
पण तेव्हढ्यात अविनाश अंजलीला चिडवत मिश्किल पणाने म्हणाला
" हे बघा काका... ह्या अंजली ने केक वर लावलेल्या मेणबत्ती चा आकडा... बहात्तर...!??? अंजली... काका काय एव्हढे म्हातारे वाटतात तुला ?? आणि पुन्हा एकदा सगळी मंडळी हसायला लागली.
" अरे त्यात काय अविनाश... एज इज जस्ट अ नंबर... हे पहा " 
असं म्हणत गालातल्या गालात हसत काकांनी सात आणि दोन या आकड्यांच्या मेणबत्त्यां ची आदला बदल केली आणि तिथे सत्तावीस चा आकडा तयार झाला.  आणि सर्वांनी जोरदार हसत टाळ्या वाजवल्या. शिट्ट्या मारल्या. हॅप्पी बर्थडेच गीत गायलं गेलं. आणि एका वेगळ्याच उत्साहात. ती जगा वेगळी पार्टी पार पडली सात सव्वा सात ला पांगापांग झाली. अंजली व अविनाश हॉस्पिटल मधून बाहेर पडले, प्रमिला मावशी नेहमी प्रमाणेच डेस्क वर पोहोचल्या. आणि तो वॉर्ड पुन्हा एकदा मूळ स्वरूपात आला.  शांत .. स्तब्ध !!! 
    त्यानंतर साधारण आठवड्या भराचां कालावधी लोटला असेल.  दरम्यान एकदा अविनाश हॉस्पिटल मध्ये जाऊन मनोहर काकांवर  उपचार करणाऱ्या डॉ. परांजपे ना भेटून काकांच्या विमान प्रवास करण्याच्या क्षमते बद्दल चाचपणी करून आला होता. रात्री उशिराअर्थात मध्यरात्री सुमारे अडीच वाजता अविनाश चा मोबाईल खणखणला. डोळे चोळत त्याने स्क्रीन वर पाहिलं तर " प्रमिला मावशी - ग्लोबल " हा नंबर झळकला. त्याला एकदम आठवलं की ' या आठवड्यात प्रमिला मावशींची नाईट  शिफ्ट आहे ' क्षणभर डोळे मिटून त्याने कॉल उचलला आणि बाकी काहीही न बोलता शांतपणे विचारलं
" हां मावशी ...किती वाजता ?"
याला काय एखादं कर्ण पिशाच्च वगैरे तर वश नाही ना ? असं वाटून प्रमिला मावशी एकदम दचकून म्हणाल्या... " दहा मिनिटं झाली सर पण ,पण तुम्हाला कसं?"
त्यावर शांतपणाने अविनाशने उत्तर दिलं " अहो साहजिक आहे मावशी. रात्री अडीच तीन वाजता तुम्ही काही ख्यालखुशाली विचारायला तर फोन नाही ना करणार ? आणि इन्फॅक्ट बुधवारी डॉ परांजपेनी मला तशी कल्पना दिली होती काकांबद्दल , एनी वे ..आम्ही निघतोच " 
आणि त्यानंतर शार्प पंचविसाव्या मिनिटाला, ग्लोबल हॉस्पिटल च्यां पार्कींग स्लॉट मध्ये गाडी पार्क करून अविनाश आणि अंजली आत जात होते, लिफ्ट ची वाट न पाहता झरझर पायऱ्या चढून ते वर गेले. मनोहर काकांच्या पार्थिवा भोवती नर्सेस, ऑन ड्युटी डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी उभे होते, अविनाश आणि अंजलीला पहाताच प्रमिला मावशी चटकन पुढे आल्या.
"आज सकाळ नंतर त्यांनी काहीच खाल्ल नव्हतं ! गोळ्या, इंजेक्शन काही नको म्हणाले.
 या तुमच्या इंजेक्शन मुळे मला झोप लागत नाही ! आज मला एकदम गाढ झोपायच आहे. अशी तंबीच स्टाफ ला देऊन टाकली होती त्यांनी." रुमालाने डोळे पुसत प्रमिला मावशी सांगत होत्या.  मनोहर काकांचा कॅन्सर आता " बियोंड क्युअर " झाला होता हे.   डॉ परांजपेनी सांगून टाकलं होतच.. पण अर्थात एखाद्याचा मृत्यू हा किती ही गृहीत किंवा पूर्व कल्पित असला तरीही जात्या जीवाचा वियोग हा नेहमीच चटका लावून जाणारा असतो.  तसच अवघ्या दीड दोन महिन्यांच्या ऋणानुबंधा नंतर या हसतमुख मनोहर काकांचं जाणं धक्कादायक नसलं तरी ही चटका लावून जाणारं नक्कीच होतं. पण आतून प्रचंड वेदना सोसणाऱ्या या अंजली च्या " लाफिंग बुद्धाच्या " चेहऱ्यावर मात्र आत्ता ही ते तसच मिश्किल स्मित दिसत होतं. ते पाहून डोळ्यात पाणी तरारालं असलं तरीही अंजलीच्या ओठांवर नकळत एक वेगळच स्मित उमटलं. हॉस्पिटल चे सगळे सोपस्कार उरकून सकाळी सात वाजता अंतिम विधी साठी पार्थिव ' वैकुंठ ' ला न्यायचं ठरलं. त्या प्रमाणे मग अंॅबुलन्स च्या पाठोपाठ ..जाण्यासाठी अविनाश आणि अंजली गाडीत बसले तेव्हढ्यात युनिफॉर्म बदलून प्रमिला मावशी आल्या
" सर मी पण येते...तुमच्या सोबत "
"नो प्रोब्लेम मावशी .आम्ही मॅनेज करू. ऑफिस मधल्या चार पाच जणांना मी  तिकडे बोलावलंय." अविनाश त्यांना समजावत म्हणाला.
"तसं नाही सर..पण काकांसाठी तुम्ही जेव्हढं केलंय आणि करताय ते मला नसेल जमलं पण निदान त्यांच्या शेवटच्या प्रवासात तरी."
"ओह् !! सॉरी ....ठीक आहे मावशी .... बसा...." त्यांच्या साठी कारचा दरवाजा उघडत अविनाश म्हणाला....आणि गाडी सुरू केली.  थोडा वेळ एक विचित्र जीवघेण्या शांततेत गेल्या वर प्रमिला ताई बोलू लागल्या.
"अविनाश सर, अंजली सध्याच्या युगात कोणी सख्ख्या आई बापासाठी जेवढं करीत नाही तेवढं तुम्ही काकां साठी केलं.  तुमच्या मुळे शेवटचे काही दिवस तरी ते आनंदात आणि समाधानात जगले.  लंडन ला जाण्याचं स्वप्न अर्धवट राहिलं खरं पण मनातून मात्र ते कधीच ती हवाई सफर करून आले होते..." त्यावर गाडी चालवत चालवत ..किंचित हसून अविनाशने उत्तर दिलं" अहो ते कामच आहे आमचं आणि आपल्या छोट्याश्या कृतींनी एखाद्या मरणासन्न अवस्थेत असलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एखादं स्मित उमटलं तर ती किती मोलाची गोष्ट?" कधी मनोहर काका तर कधी एखाद्या यशोदा काकू. नाही तर मग ते इरफान चाचा किंवा आठ वर्षांचा प्रतीक असेल. प्रमिला मावशी. अहो मनोहर काकांनी आयुष्य भर बँकेत इमाने इतबारे चाकरी केली, आयुष्य उत्तरार्धात.  मनासारखं जगता यावे या साठी  व्ही आर एस घेतली. सगळं कसं ठीक चालू होतं , एकुलता एक मुलगा आशुतोष इंग्लंड मध्ये नोकरीस गेला तो तिकडेच स्थायिक झाला कायमचा ! बरं  "मी एकदा स्थिर स्थावर झालो की मग तुम्हाला दोघांना तिकडे बोलावून घेतो."  या त्याच्या वचनाला भुलून काकांनी आयुष्य भराची जमापुंजी त्याला देऊन टाकली आणि मग कधी नोकरी मुळे. तर कधी सुट्टी नाही मिळत. अशी टोलवाटोलवी करून त्याने मनोहर काकांना झुलवत ठेवल. काकांनी हे सगळं पण त्यांच्या स्वभावानुसार हसत खेळत सहन केलं.
कदाचित त्यांना स्वतः सोबत घेऊन जाणारा  कॅन्सर देखील त्यांनी त्या मानाने सहज पचवला, पण खऱ्या अर्थाने ते तुटले. खचले ते दहा वर्षांपू्वी. जेव्हा त्यांची अर्धांगिनी सोबती व आधार  असलेल्या प्रभा काकू अचानक त्यांना या जगात एकटं सोडून गेल्या तेव्हा. हा धक्का मात्र तर काही पचवू शकले नाहीत.  कॅन्सर तर एक निमित्त होतं, पण हे एकटेपण त्यांना आतून पोखरत होतं. पण कधी तरी आशुतोष मला लंडन ला घेऊन जाईल या आशेवर ते शेवटच्या घटका मोजत होते. लंडन दौरा ही त्यांच्या विश लिस्ट मधील टॉप विश होती. हे सगळं ऐकून प्रमिला मावशी स्तब्ध झाल्या आणि पुन्हा एकदा गाडीत ती जीवघेणी शांतता. 
"अहो पण त्या दिवशी तर आशुतोष..म्हणजे त्यांच्या मुलाशी ते बोलले ना. त्यांच्या वाढ दिवशी ?" प्रमिला ताईंनी आश्चर्य वाटून शांतता भंग करीत प्रश्न केला. अंजली आणि अविनाश नी एकमेका कडे पाहिलं आणि या वेळेस अंजली ने त्यांचं शंका निरसन केलं 
" आता काय सांगणार मावशी?. काकांना थोडं कमी ऐकू येतं याचा गैर फायदा आम्ही घेतला आणि तोही त्यांना वाईट वाटू नये म्हणून." 
पण अजून ही प्रमिला मावशी च्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह कायम होतं.
" म्हणजे ? मला नाही समजलं " त्या विचारत्या झाल्या.
" अहो आशुतोष गेले कित्येक वर्ष त्यांच्याशी बोलला नाहीये. इन फॅक्ट आमच्या कडे त्याचा नंबर पण नाहीये. आशुतोष म्हणून आमच्या ऑफिस मधला संदीप त्यांच्या शी बोलला त्यादिवशी !!! त्यांना  जरा बरं वाटलं. बस् तेव्हढाच काय तो हेतू होता."  अविनाश ने उलगडा केला.
आता गाडीत मागच्या सीट वर मान मागे टेकवून प्रमिला ताई विचार करू लागल्या आणि म्हणाल्या
" अविनाश अंजली धन्य आहात तुम्ही. अतिशय पुण्याचं कार्य करीत आहात.पण हे सगळं तुम्ही कसं करता? आय मीन स्वतःचे नोकरी व्यवसाय हे सगळं सांभाळून कसं जमवता हे ? बरेच दिवस मनात असलेलं कुतूहल शमावण्याचा प्रयत्न करीत प्रमिला ताईंनी विचारलंच..
"मावशी. अहो प्रत्येक व्यक्ती च्या मनात काही सुप्त इच्छा असतातच.  बस त्याची तीव्रता प्रत्येकाच्या स्वभावा नुसार कमी जास्त असते आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याचा मृत्यू डोळ्या समोर दिसत असतो.  तेव्हा हातात शिल्लक राहिलेल्या किंवा मग हातातून निसटून जाऊ पाहणाऱ्या  मोजक्या क्षणात त्याला खूप जगायचं असतं.." विश लिस्ट " मधील टॉप विश पूर्ण करायची असते. आणि ती जर पूर्ण झाली तर ते सुख. तो आनंद डोळ्यात साठवून मृत्यूच दुःख थोडस हलक करून तो या जगाचा निरोप घेतो.  आणि हेच कार्य करण्या साठी आम्ही ही संस्था स्थापन केली आणि त्याला नाव दिलं " विश लिस्ट अनलिमिटेड ". आमच्या या संस्थेत कोणी कोणाचा बॉस नाही आणि कोणी कोणाचा नोकर नाही. कोणी पगार मागत नाही अन् कोणाला फायर केलं जात नाही. उलट कधी तरी स्वतः च्या खिशातून पैसे द्यावे लागतात  तर कधी काही दानशूर व्यक्ती सामाजिक संस्था आर्थिक मदत देतात.  आपापले नोकरी व्यवसाय आणि संसार सांभाळून अर्धा शनिवार व रविवार ह्या कार्या साठी आम्ही सगळे वाहून देतो. मग वेगवेगळ्या हॉस्पिटल किंवा संस्था अथवा व्यक्तींकडून  कॅन्सर , थॅलेसेमीया सारख्या  दुर्धर आजाराने ग्रस्त काही रुग्णांबद्दल माहिती आम्हाला मिळते आणि मग  जमेल तसं या  रुग्णांची एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. अशीच सगळी ही   ध्येय वेडी मंडळी  म्हणजे आमचं भांडवल आणि ह्या मृत्यू शय्येवर पहुडलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर उमटलेलं हास्य आणि आशीर्वाद हे आमचे बोनस आणि प्रॉफिट !!!   मग आम्ही एका  यशोदा मोहिते काकूंना शेवटची इच्छा म्हणून काश्मीर ला नेऊन आणलं तर कॅन्सर च्या माऱ्या पुढे क्लीन बोल्ड होण्या आधी प्रतीक या लहान मुलाला चक्क सचिन तेंडुलकर ची भेट घडवली. इरफान शेख आयुष्य भर मक्का मदिना जाण्यासाठी झुरत होते त्यांची ती सोय करून दिली आणि त्या हज यात्रे हून परतत असतानाच त्यांनी विमानात प्राण सोडले. असे अनेक प्रसंग अनुभव गाठीशी आहेत. मावशी एखाद्याच्या मृत्यू नंतर ते पिंडाला कावळा शिवणे वगैरे गोष्टींवर माझा विश्वास नाही. अहो त्या पेक्षा जिवंत पणी त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ना ?" अविनाशचं हे सगळं बोलणं ऐकता ऐकता वैकुंठ च्या कमानीतून गाडी आत कधी शिरली हे समजलच नाही.  मग तिथले सगळे विधी संपवून परत निघे पर्यंत नऊ वाजून गेले होते. सगळेच थकले होते. प्रमिला मावशींना त्यांच्या घरी सोडून अविनाश आणि अंजली पुढे गेले. अर्थात तो पर्यंत हे सगळं अचाट ऐकुन त्यावर कस व्यक्त व्हायचं? हे प्रमिला मावशींना समजत नव्हतं. त्या शांत पणाने  घरी गेल्या.  मग शांती निकेतन कॉलनीत कुंदन अपार्टमेंट च्या गेट पाशी  म्हणजे अंजलीच्या घरापाशी गाडी थांबली. आणि तिला निरोप देता देता अविनाश म्हणाला 
" बाय अंजली. सी यू..आणि हो !! आज ऑफिस ला नाही आलीस तरी  चालेल.  शनिवार असला तरीही."
" पण अविनाश...." अंजली च वाक्य पूर्ण होण्या आधीच अविनाश हसून म्हणाला
"आय नो. आज तुमची वेडिंग अनिव्हर्सरी आहे. एन्जॉय युवर डे आणि राघव ला पण शुभेच्छा सांग . माझ्या कडून.." 
" थॅंक यू .... इन फॅक्ट आय सजेस्ट ..इथ पर्यंत आला आहात तर वर चला ...मस्त कॉफी करते ..यू रीयली निड वन कॉफी आणि राघव पण घरीच आहे ...त्याच्या शी ही भेटणं होईल... प्लीज... ! " अंजली आग्रह करीत म्हणाली.
"धन्यवाद या आमंत्रणासाठी पण आज नको.  मी असाच थोडा वेळ ऑफिस मध्ये जाऊन जरा बसणार आहे. मुक्तांगण संस्थेचे पराडकर येणार आहेत आणि नंतर ' होम मिनिस्टर ड्युटी' रेल्वे स्टेशन ला जायचयं. सासू बाई यायच्या आहेत.
" चेहऱ्यावर खोटे खोटे रडू दाखवत अविनाश म्हणाला आणि दोघे ही खळखळून हसले. दुसरे दिवशी रविवार बऱ्याच दिवसांनी  " विश लिस्ट अनलिमिटेड " ची जवळ जवळ सगळी टीम ऑफिस मध्ये जमली होती, काही नवीन केसेस आल्या होत्या त्यावर चर्चा सुरू होती तेव्हढ्यात अविनाश आणि अंजली ची चौकशी करत जयवंत साने काका तिथे आले आणि गळ्यातल्या शबनम पिशवी तून एक पाकीट काढून अविनाशकडे सोपवले
" काय आहे हे काका ? " ते पाकीट न्याहाळत अविनाश ने विचारलं
"अहो तीन दिवसांपूर्वी मनोहर ने मला दवाखान्यात बोलावून घेतलं, त्याच्या एकंदरीत बोलण्यावरून आता मात्र त्याने कॅन्सर समोर शस्त्र म्यान केली होती हे समजलं होतं." येताना माझं चेक बुक पण आण रे जया " अशी सूचना ही केली होती.  मग दोन चेक फाडून सही करून माझ्याकडे देत तो म्हणाला " हा चेक ठेव.  माझा दवाखान्याचा खर्च यातून दे आणि हा दुसरा चेक अविनाश अंजली च्या संस्थेला देऊन टाक. माझ्या वाढदिवसाच्या पार्टीचे रिटर्न गिफ्ट रे ! असो. माझी लंडन वारी तर अवघड दिसत्ये आता..पण या पैशातून दुसऱ्या कोणाची तरी.  "विश" पुरी करा म्हणावे." 
तो चेक हातात घेऊन अविनाश ने पाहिलं आणि आश्चर्याने त्यानें डोळे मोठे केले. पाच लाखाची रक्कम त्यात लिहिली होती. बाकी अश्याच आशिर्वाद आणि ऋणानुबंध यांच्या भांडवलावर " विश लिस्ट अनलिमिटेड " चे काम व्यवस्थित चालू होते. आणि  नंतर असच पुढील शनिवारी संध्याकाळी ही सगळी टीम ऑफिस मध्ये बसली असताना. प्रीतम आणि संदीप आले त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव होते.
" काय रे बाबांनो काय झालं ? तुम्ही शाश्वत हॉस्पिटल ला जाणार होतात ना? "
त्यांचे चेहरे न्याहाळत अविनाश ने विचारलं
" होय सर. तिकडूनच येतोय आम्ही." प्रीतम ने उत्तर दिलं.  तो तसा नवखा होता या संस्थेत.
" सर आम्ही त्या रागिणी देसाई काकूंना भेटलो ! चार दिवसांपूर्वीच तिसरा अटॅक येऊन गेलाय त्यांना !  एक वॉल्व पूर्ण कामातून गेलाय.  शिवाय स्थूलपणा आणि  मधुमेह आहेच. हृदय फक्त  पंचवीस टक्के क्षमतेने कार्य करतय."
प्रीतम ने धडाधड अहवाल सादर केला.
" ओह. सो सॅड ! " चुटपुट व्यक्त करीत अविनाश ने विचारलं.
" मग काय विश आहे त्यांची ? " 
" जरा अवघड आहे सर " भाबडे पणाने प्रीतम म्हणाला तसं सगळ्यांनी त्याच्या कडे रोखून पाहिलं.
" अरे सांग तरी..." अविनाश ने अधीर पणे विचारलं..
 " सर त्या म्हणताहेत हवं तर मी माझा सगळा बँक बॅलन्स. राहतं घर तुमच्या नावे करते पण मरण्या पूर्वी मला " त्यांच्यासोबत डिनर डेट वर जायचयं."  वातावरणात अजून ही सस्पेन्स कायम होता. " पण कोणासोबत डिनर डेट वर जायचयं त्यांना ? " आता अंजली ला राहवेना.  सगळ्यांची तोंड आळी पाळीने पहात प्रीतम शांत पणे उत्तरला 
.
.
.
.
 " सुपरस्टार रजनीकांत सोबत "

 #संदर्भ आणि साभार संकल्पना : असंच पुण्याचं कार्य करणारी  " मेक अ विश फाउंडेशन " आणि त्यातील ध्येयवेडी मंडळी.

©️ सागर जोशी पुणे ✍️

992. भिंतीत बाबांचे हात

      बाबा भिंतीला धरून (भिंतीला हात लावून )चालत रहायचे .ते जसं जस भिंतीला हात लावत त्या त्या ठिकाणाचं रंग पुसट होत राही व मळकट होत रहायचे. ते पाहून माझ्या बायकोच्या  चेहऱ्यावरचे भाव बदलत असताना मी बघत होतो . त्या दिवशी बाबांचं डोकं दुखत होतं की कोण जाणे त्यांनी डोक्याला तेल लावले होते  आणि त्याच हाताने भिंतीला धरून चालत राहिल्याने  हाताचे ठसे भिंतीवर उमटले असावेत .आणि ते पाहून माझी बायको माझ्यावर जाम भडकली .मला पण काय झालं होतं कुणास  ठाऊक  मी तडक  बाबांच्या रूम मध्ये जाऊन म्हणलो "बाबा तुम्ही भिंतीला हात न लावता चालण्याचा प्रयत्नच करणार नाही का ?" माझा आवाज जरा उंचच झाल्या सारखे मला वाटलं. ८०वर्षाचे  माझे बाबा माझ्या कडे बघितले. एखादा लहान मुलगा आपली चूक झाली असावी असा चेहरा बाबांचा झाला होता. त्यांनी मान खाली घालून गप्प बसले . छे 'हे मी काय केलो  ! मी असं म्हणायला नको होतं असं मलाच वाटायला लागलं. माझे स्वाभिमानी बाबा तेव्हां पासून मौन  झाले आणि भिंतीला हात लावून चालणं सोडून दिले. पुढे दोन चार दिवसांनी ते असेच चालत असताना तोल जाऊन पडले .आणि  अंथरुनच धरले .पुढे दोन दिवसांनी त्यांनी आपली इह लोक यात्रा सम्पविली .
      भिंतीवरच्या त्या हाताचे ठसे पाहून मला माझ्या छातीत काही तरी अडकल्या सारखं वाटत राहिलं. दिवस ,दिवस पुढे उलटत राहिले .माझ्या बायकोला भिंती रंगवून घ्यावे असे वाटू लागले. रंगविणारे आले सुद्धा ! आमच्या "जितू" ला आपले आजोबा म्हणजे प्राण प्रिय. भिंती रंगविताना आजोबांच्या हाताच्या ठस्यांना सोडून रंगविण्याचा हट्टच धरला. शेवटी ते रंग काम करणारे म्हणाले, सर तुम्ही काही काळजी करू नका  त्या ठस्याच्या भोवतीने गोल करून छान पैकी डिजाईन करून देतो. तो तुम्हालाही आवडेल .शेवटी मुलाच्या हट्टा पुढे काही चालले नाही. पेंटरने व्यवस्थित ठसे तसेच ठेवून भोवतीने सुंदर डिजाईन करून दिला. पेंटरची  आयडिया सर्वानाच आवडली. घरी येणारे पाहुणे , मित्र मंडळींना पण आवडले  त्यांनी या कल्पनेची खूप स्तुती करून जाऊ लागले . आणि पुढे जेव्हां जेव्हां भिंती रंगवण्याचे काम होत गेले तेव्हां तेव्हां त्या हाताच्या ठस्या भोवती डिजाईन बनविला जाऊ लागला. सुरु सुरूला मुलाच्या हट्टा  पायी हे जरी करत राहिलो तरी आमचाही व्यामोह वाढत गेला. 2 दिवस, महिना वर्ष पुढे सरकत चालले. जितू (मुलगा )मोठा झाला. त्याचं लग्न झालं. तसं मी माझ्या बाबांच्या स्थानावर येऊन पोहचलो .बाबांच्या एवढा नसलो तरी सत्तरी ला येऊन लागलो होतो. मलाही तेव्हां भिंतीला धरून चालावं असं होऊ लागलं. पण मला तेव्हांच आठवलं किती चिडून बोललो होतो बाबांना ! म्हणून चालताना भिंती पासून थोडं अंतर ठेवूनच चालत राहिलो. त्या दिवशी रूम मधून बाहेर पडत असताना थोडासा तोल गेल्या सारखं झाल्याने आधार घेण्या साठी भिंती कडे हात पसरणार तोच मी माझ्या मुलाच्या बाहू मध्ये असल्याचे जाणवलं 
"अहो बाबा  बाहेर येताना भिंतीला धरून यायचं ना ? आता तुम्ही पडता पडता थोडक्यात वाचला " मुलाचे वाक्य कानावर पडले. मी  जितूच्या मुखा कडे पाहत राहिलो . त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती पण द्वेष नव्हता. तिथेच जवळच्या भिंतीत बाबांचे हात मला दिसले. माझ्या डोळ्या समोर बाबांचं चित्र उभं राहिलं. त्या दिवशी मी  ओरडून बोललो  नसतो तर बाबा अजून जगले असते असे वाटू लागले. आपोआप डोळ्यात पाणी साचू लागले. तेवढ्यात तिथेच जवळ थांबलेली 8 वर्षाची नात  धावत आली. आजोबा, आजोबा  तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवून चला म्हणत हसत हसत माझे हात आपल्या खांद्यावर घेऊन निघाली. हॉल मधील सोफ्यावर बसलो .लगेच नातीने आपलं ड्रॉईंग बुक दाखवत, आजोबा आज माझ्या क्लास मध्ये ड्रॉईंग परीक्षा झाली, मला फर्स्ट प्राईझ मिळाली असे म्हणत ड्रॉईंग बुक दाखवू लागली. 
हो का ? अरे व्वा  दाखव बघू कोणता ड्रॉईंग आहे तो ? म्हटल्यावर ती ड्रॉइंग च  पेज उघडून दाखविली. आमच्या भिंतीवरच्या बाबांच्या हाताचे चित्र आहे तसाच काढून भोवतीने सुंदर नक्षी काढली होती. आणि म्हणाली टीचर विचारल्या हे काय आहे? म्हणून. मी सांगितले  हे माझ्या बाबांच्या आजोबांच्या हाताचे चित्र आहे; आमच्या घरच्या भिंतीवर हे चित्र कायमचं कोरून ठेवलाय. 
टीचर म्हणाल्या, मुले लहान असताना असे भिंतीवर चित्र काढत असतात.  भिंत भर रेघोटे. हाता पायाचे चित्र काढत राहतात. मुलांच्या आई वडलांना त्यांचं कौतुक वाटतं. त्यामुळे मुलांवर त्यांचं प्रेमही वाढत राहतं. टीचर आणखी म्हणाल्या आपण पण आपल्या वयस्क आई वडिलांवर,आजी आजोबावर असेच प्रेम करत राहायला पाहिजे .त्या मला व्हेरी गुड श्रिया असे म्हणून कौतुक केल्या. असं श्रिया (आमची नात ) गोड गोड बोलत राहिली  तेव्हां  मला माझ्या नाती पुढे मी किती लहान आहे असं वाटू लागलं. मी माझ्या रूम मध्ये आलो .दरवाजा बंद केलो आणि बाबांच्या फोटो पुढे येऊन "मला क्षमा करा बाबा मला क्षमा करा "असे म्हणत मन हलकं होई पर्यंत रडून  घेतलो  .आणि वरचेवर असच रडून बाबांची क्षमा मागत राहिलो.

शुक्रवार, २२ मार्च, २०२४

991. सांजवेळ

      हि बाई सतत फोनवर काय बोलते? आपल्या पेक्षा बरीच मोठी आहे. इतका जर नातेवाईकांशी सम्पर्क दांडगा असेल तर इथे कशाला आली ह्या वृद्धाश्रमात? असे अनेक प्रश्न आशाबाईच्या उदासमनात दहा दिवसांपूर्वी आलेल्या नवीन रूम पार्टनर विषयी सुरू होते. आज संध्याकाळी विचारूच तिला असं त्यांनी ठरवलं.
      तिन्ही सांजेला त्या छोट्याश्या रुममधल्या देवळीत दिवा लागला. मंद धुपाने खोली दरवळली. खिडकीतुन नजरे आड होणारा सूर्य आणि पसरत जाणारा काळोख. दोघींच्या खुर्च्या खिडकीजवळ होत्या. आशाबाई म्हणल्याच आजींना,"आजी एक विचारू का खरंतर माझ्या आणि तुमच्या वयात असेल 30 एक वर्षाच अंतर मी 60 तुम्ही. ती अंदाज लावते हे बघत आजीच हसुन म्हणल्या, मला 85 सुरू आहे ग." आजीच्या उत्तराचा धागा पकडत आशा म्हणाली, "इतकं वय आहे मग असे राहिलेच किती दिवस म्हणुन इथे येऊन पडल्या आणि फोनवर इतक्या बोलत असता म्हणजे सगळ्यांशी तर सम्पर्क चांगला दिसतो. कुणीही सांभाळलं असत ना?"
आजी हसत म्हणाल्या,"का माझी पार्टनरशीप आवडत नाही ए का तुला?"
     तशी आशा चपापुन म्हणाली, "तसं नाही उलट मी स्वतःला तपासून बघायला लागले तुमच्याकडे बघुन. मला इथं आणुन सोडलं म्हणून मी रुसले. रागावले नातेवाईकांवर कोणाशी बोलत नाही फोन घेतच नाही. पण तुम्ही तर सारख्या खुशाली विचारता. आशीर्वादाची फुले देता.म्हणून म्हंटल आज विचारावंच इथे येणं काय हौशीने का?"  आजी म्हणाल्या, "कसं असतं ना आशा जो पर्यंत सहज स्वीकार करायला आपण शिकत नाही तो पर्यंत आपण कशातूनच आनंद घेऊ शकत नाही. प्रत्येकाच आयुष्य असतं ग आपण आपलं जगुन घेतो आणि पुढच्या पिढीचं जगणं आपल्या काळाशी जोडत बसतो. खरंतर त्यांनाही समजुन स्वीकारलं तर छान पळू शकते हि नात्यांची गाडी पण जुन्या नव्याची तुलना ह्यातच निर्माण होतात दुरावे. अहंकारांच्या वेली फोफावत राहतात कारण आपण सोडून दयायला शिकत नाही. मोह ग खरंतर आपला संसार सुन आली कि सम्पला हे आधी स्वीकारता आलं पाहिजे ना. तिची सुरवात आणि आपला शेवट ह्याची सांगड घालता आली नाही कि हे वादविवाद मग त्या पिढीने कधी जगायचं. अग जबाबदाऱ्या समजतात त्यांनाही आणि चुकून शिकण्यासाठी तुम्हाला आधी सोडावं लागत ना पण तुम्हीच घट्ट धरून बसता मग नाईलाजास्तव इथे येणारे वाढतात. तू हि अश्याच वादातून आली हे कळलं आहे मला."
    आशा आजीच्या बोलण्याने आत्मचिंतनात हरवली. ह्या सहा महिन्यांपूर्वीच सगळं डोळ्यासमोर आलं. दोन वर्षापूर्वी आलेली सुन आणि मग चहा पासुन ते स्वयंपाकापर्यंत आपण सतत आपलंच चालवलेलं अहं भाषण. खरंतर नोकरी करून सगळं करत होती शिकत होती पण आपल्याला सत्ता सुटत नव्हती मग विकोपाला गेलेले वाद. चढलेले स्वर. सगळं मुलाच्या आवाक्या बाहेर आणि मग झालेला हा निर्णय. खरंच आजी म्हणते तसं स्वीकारता आलं असतं ना. आपण आधार बनायला हवं होतं पण आपल्या सहजतेने न स्वीकारणाऱ्या स्वभावाने आपण इथे येऊन पडलो.पण आजी ती तर स्वीकारते मग ती का इथे?"
    "आजी तू का इथे?" आशाचा प्रश्न ऐकून आजी म्हणाली, "मी नातसुनापर्यंत बदल स्वीकारले. त्यामुळे आनंद घेत होते जगण्याचा पण आता शरीर साथ देत नाही. आपल्याकडून त्यांना काही अपेक्षा नाहीत तरी आपल्याला आता तिथे त्रास होतो. त्यांच्याकडून नाही आपलाच त्यांना. आपलं रात्री बेरात्री होणारं जागरण, लघवीचे त्रास. तरी सकाळी उठून आपण आरामात घरी आणि ते बिचारे जाणार नोकरीवर मग मीच हट्ट केला. इथे चोवीस तास सेवा आहे मैत्रिणी आहे. करमणूक,जेवण सगळं मिळतं थोडी त्यांनाही मोकळीक मिळते आपल्यापासून. आपण जन्म दिला म्हणजे स्वतःच्या आनंदाच्या सीमा हरवून सतत आपल्याच उश्या पायथ्याशी लेकरांनी बसावं अशी मानसिकताच होऊ दिली नाही मी. त्यामुळे हे इथे येणं स्वतःहून स्वीकारल कुठलेही राग, लोभ मनात न आणता. आपल्यामुळे कोणाचे जगणे कंटाळवाणे व्हावे असं मला मुळीच वाटत नाही उलट आपली आठवण ह्या धुपाच्या सुगंधा सारखी दरवळत राहणारी असावी. राख होऊन पडली आहे ग पण दरवळ मनाला आनंद देणारी. हो ना"
  आशाने बंद करून ठेवलेला फोन सुरू केला, "सुनबाई आलीस का ऑफिसातून? मी इकडे आनंदात आहे. रोज फोन करत जाईल. ठेवते फोन,..."
     आजीने आशाचा हात हळुवार दाबला. दोघी डोळ्यातून हसल्या आणि एकच श्लोक उच्चरला
"अनंते ठेविले तैसेची राहावे 
  चित्ती असू द्यावे समाधान."
 धुपाची दरवळ आणि खिडकीतुन  रेंगाळत दिसणारा संधीप्रकाश बरंच काही सांगुन गेला.
     
 ©️स्वप्ना मुळे (मायी) औरंगाबाद

990. नवी नवरी नि जुनी नवरी

    कालच ओळखीत एका ठिकाणी भेटायला गेले होते. नुकतच लग्न झालं होतं त्यांच्या मुलाचं. साधारण महिना झाला असेल, लग्नानंतरचे सगळे सोपस्कार होऊन रुटीन लाईफ सुरू झाले होते. सहजच विचारलं सून बाई  कुठायत? तेवढ्यात ती आलीच ऑफिस मधून. एक छानसं स्माईल देऊन आलेच सांगून आत पळाली, मनात म्हंटलं, ही कशाची येते आता, दोन गोष्टी करून निघुया आपणच त्यांना म्हणत होते मी. आता तुम्हीच या श्रम परिहाराला माझ्याकडे. सून कपडे बदलून आली सुद्धा बाहेर. थेट आमच्यात येऊन बसली. म्हणाली, हो नक्की येतील, पण  तुम्ही बसा आता आल्याच आहात तर. मस्त पोहे खाऊन जा, आणि पुढल्या वेळी ठरवून जेवायलाच या. मला आश्चर्य वाटलं. मीही सुखावले, दिलखुलास दाद दिली, तिचं माझ्या स्टाईल नि कौतुकही केलं, तीही खुलली, म्हणाली, तुम्ही बसा बोलत. मी पोहे घेऊन येतेच. त्यांच्याकडे वळून म्हंटलं, वाह काय लकी आहात हो, काय गोड आहे सून  तुमची. त्या म्हणाल्या, अग हो तुझाच  पॅटर्न युज करतेय, "प्रेम द्या नि प्रेम घ्या." अरे वाह ,मस्त परिणाम साधलात की, नक्की काय केलंत?
     त्या म्हणाल्या, विशेष काही नाही गं... ती हनिमूनवरुन आल्यावर तिला पूर्ण आराम दिला. म्हंटलं तू सात दिवस पूर्ण आराम कर. सगळी कामाची पद्धत, वेळा, बारीक बारीक लक्ष देऊन फक्त बघ. करू ही नको नि बोलुही नको, जे आवडेल ते आवडलं या काँलम मध्ये, जे नाही आवडलं ते नाही आवडलं या काँलम मध्ये मात्र कारणासाहित लिही, आणि एक सात दिवस कमी वाटले तर  सांग. आपण जास्ती दिवस ठेवू, ती नको म्हणत होती, पण मी ऐकलेच नाही. अगदी त्याच सात दिवसात तिनी मला कोणत्या नि कशा प्रकारे मदत करावी अशी माझी अपेक्षा आहे हे मी लिहून ठेवलं. झालं सात दिवस अगदी मजेत घालवले, मी काम करत असतांना ती माझ्या अवती भवती राहिली आणि मला कळाले, हिला माणसे आवडतात, मी काम करताना कधीच बेडरूम मध्ये जाऊन बसली नाही, मग मीही तिच्याशी बोलत बोलता तिच्या सवयी आवडी निवडी जाणून घेतल्या, आपल्या घरच्या पद्धती, रीती रिवाज, आला गेला, कामाच्या वेळा कशा सांभाळायच्या, हे ती बोर होणार नाही इतपतं तिला समजेल असं ऐकवलं. तीही आवडीने ऐकत होती टिपण करत होती, घर आवरताना मध्ये मध्ये तिच्याहीआवडी सांगत होती, एकंदर ती उत्साहात होती. मग मीही खुष होते. सात दिवस अगदी मजेत गेले. तिला माझं एकूण एक काम आवडलं गं, आमची गट्टी तिथेच जमली, आम्ही एकमेकींची टिपणं वाचली नि मुख्य म्हणजे तीच लक्षात ठेवून वागतोय. तिला स्वयंपाकात खूप इंटरेस्ट होता पण अजिबात सवय नव्हती. तेव्हा ती म्हणत होती, तुम्ही शिकवलत तर मीही तयार होइन, तुम्ही सकाळी करा नि संध्याकाळी मला सगळं शिकवा. पुन्हा दुसऱ्या दिवशीची तयारी माझ्याकडून करून घ्या म्हणजे तुम्हालाही बरे नि मी ही शिकीन. आणि हे असं सगळं १५ -२० दिवस झाले चाललंय, पण मस्त चाललंय आमचं. ऐकूनही खूप छान वाटलं, इतक्यात गरमागरम पोहे आलेच. तिच्या लाघवी, खेळकर हास्य विनोदाने पोहे आणखी रुचकर लागले. खूप बरं वाटलं,पाहून ऐकून.
     हल्ली होतंय काय, सासू सुना एकमेकींशी अशा दिलखुलास बोलताना दिसत नाहीत. वाटतं, दोघीनिही एकमेकींना समजून घ्या. एकमेकींची मतं जाणून ऐकून घ्या. एकमेकींना आधार वाटेलअशा वागा. एकमेकींचे दोष पटकन दाखवून भांडत बसण्यापेक्षा छोट्या छोट्या गुणांचीही दखल घ्या ती ही मनापासून. आपापली मते एकमेकिंवर लादू नका, सकारात्मकतेने नीट प्रेमाने, आपलेपणानी सांगा, एकमेकींच्या चूका नीट समज देऊन पदरात घ्या. सर्वात महत्वाचे म्हणजे एकमेकींचा आदर करा. घर कामाची वाटणी आपला वेळ आपल्या क्षमता बघून नीट समजून उमजून केलीत तर खटके उडणारच नाहीत. सासुनेही येता जाता स्वपुराण न लावता, टोमणे न मारता, माझं अच्छ नि माझं तच्छ. हे सांगत बसण्यापेक्षा दोघी मिळून सुवर्ण मध्य साधून सुनेशी जवळीक निर्माण होईल असेच पाहावे. सगळी कामं एकदम न लादता टप्या टप्यानी सांगावीत. नवीन घरात रुळतांना तिलाही वेळ द्यावाच लागेल. संयम आणि प्रेम असेल तर अपेक्षित यश मिळलेच, पण थोडा काळ जाऊ द्यावाच लागेल. सुनेने सुद्धा वागता-बोलताना नीट विचार करावा. सतत माहेरच्या कौतुकाचे टूमणे लावण्यापेक्षा सासरीही आपुलकीने राहावे. अगदी एखादा पाहुणा आल्यावर जसे आपले त्याच्याकडे सगळे लक्ष असते, अगदी तसेच किंबहुना त्यापेक्षा जास्त लक्ष सुनेकडे सगळ्यांचेच म्हणजे धुणी भांडी, केर लादी करणाऱ्यां बायकांपासून ते थेट शेजारीपाजारी नि आला गेला ही निरखून बघत असतात सुनेकडे. हीच तर खरी कसोटीची वेळ असते. याच वेळी नीट जबाबदारी नि मर्यादा ओळखून वागावे. एखादे काम जास्तीचे पडले तर कुरकुर न करता आनंदाने करावे. घरातले वातावरण आपल्यामुळे बिघडणार नाही किंवा आपल्या वागण्या बोलण्याने कुणी दुखावणार नाही आणि कुठला सिनही क्रिएट होणार नाही याची दक्षता घ्यावी. हसून खेळून सगळ्यांशी प्रेमळ संवाद साधण्याचा प्रयत्न करावा. मने जिंकून घ्यावी.
     कित्येक सासवांना काही करावे लागत नाही. तरी सुनेशी सूर जुळतच नाही. कधी त्या सुनेशी प्रेमाने वार्तालाप करीतच नाहीत. सून सगळं करत्येय, तर चार शब्द  तिच्याशी प्रेमाने आपलेपणानी बोला, जवळीक साधा, तिच्या आवडीनिवडीची कदर करून तिच्यासाठी एखादी अगदी क्षुल्लक गोष्ट केलीत तरी खूप सुखावेल ती, नि दोघीमध्ये एक घट्ट वीण तयार होईल प्रेमाची. सासू-सून या एकमेव कारणाने वेगळी चूल मांडण्याचा साधा विचारही मनात येणार नाही. परिवार एकसंघ नि एकछती राहील, (अर्थात मनाने नाहीतर लोक म्हणतात आम्ही एकत्र राहतो पण खरं म्हणजे मनं कधीच दूर गेलेली असतात,) आणि या माय लेकी नाही, सासुसूना आहेत असं सांगावं लागेल लोकांना. सासू- सून या नाजूक नात्याला रेशीम गाठी म्हणायचे असेल, तर दोघींच्याही वागण्यात रेशीमता हवी. म्हणजे नवी नवरी आली तर तिचे स्वागतच होइल आणि जुनी नवरी सुद्धा अज्जिबात दुखावणार नाही. "रिश्ता वही सोच नई" शेवटी दोघीनीही एकच लक्षात ठेवायचं, नाती जोडण्यासाठी, जुळवण्यासाठी आपली या पदावर पोस्टिंग झालीय, तेव्हा नाती जोडत, जुळवत सासू-सुनेच्या जोडगोळीत गोडी  ठेवा.

989. अमेरीकेतील चिमण्यांचे पुण्यातल्या मैत्रीणीशी ह्रदयस्पर्शी नाते.

     तो दिवस मला आजही आठवतोय. मला रात्री अचानक एक वाजता फोन आला. मी भर झोपेतून खडबडून जागा झालो होतो. मोबाईल हातात घेतला व नंबर पाहीला तर तो परदेशी कॉल असल्याचे समजले. मी मोबाईल रिसिव्ह केला व हॅलो बोललो. समोरून एक महिला बोलत होती व डिस्टर्ब केले म्हणून क्षमा मागत होती. आपण कोठून बोलताय विचारले तर अमेरिकेतून बोलत आहे असे सांगितले. काय विशेष विचारले तर त्या सांगू लागल्या की आपला चिमण्यांविषयी संभाषणाचा इको फ्रेंडली क्लब वरील फेसबुक पेज वर अपलोड केलेला व्हिडिओ पाहीला व तो खुपचं भावला व रहावलेच नाही म्हणून आपणास फोन केला. पुढे त्या बोलू लागल्या व त्यांची त्यातील काही वाक्य मात्र काळजाला भिडणारी होती व त्या वाक्यांनी माझ्या शरीरावरील रोम खडे झाले होते. त्या सांगत होत्या पुण्यामध्ये माझे लहानपण गेले अगदी लग्न होईपर्यंत मी तेथे  खुप खेळले बागडले. वडीलांनी घराच्या आवारात पक्षांसाठी खुप झाडे लावली होती. ते पक्षी पाहुन त्यांच्या विषयी खुप कुतुहल वाटायचे.  त्यांच्या प्रेमात मी कधी पडले समजलंच नाही. या प्रेमाचे रूपांतर आमचे मैत्रीत झाले. त्यांना मी रोज खाण्यासाठी धान्य टाकायची. त्या सुरूवातीला धान्य टाकताच क्षणी उडून जायच्या व मी तेथून निघून गेले की मग टाकलेले धान्य टिपुन खायच्या. या खेळात मी व त्या अगदी फार जवळ जवळ येत गेलो. आता त्या माझ्या हातात धान्य पाहीले की कधी कधी हातावरच येऊन बसायच्या. धान्य टाकायला उशीर झाला की जोर जोराने चिवचिवाट करायच्या. अगदी मुलाने हट्ट करावा तशा त्या हट्टी होत चालल्या होत्या. मी कुमारीका अवस्थेत आता या चिमण्यांची आई झाले होते. त्यांच्या जेवण पाण्याची काळजी मी रोज घेत असे व त्यांच्याशी संवाद साधत असे. मला माहीत नाही पण कोणत्या जीवनाची हि पुण्याई कामी आली होती माहीत व यांची सेवा करण्याचे मला भाग्य लाभले होते. पुढे माझे  शिक्षण पूर्ण झाले. आई वडीलांनी माझे लग्न करून दिले. लग्नानंतर मी पतीसोबत अमेरीकेला रहायला गेले. चिमण्याचा सहवास मिळत नसल्याने मी पहिले खूप उदास व्हायची. कधी कधी तर हातात धान्य घेऊन व्हरांड्यात यायची व नाराज होऊन माघारी फिरायची कारण अंगणात चिमण्याच नसतं.
     अमेरिकेत वर्षातील ४ महिने तर सुर्य दर्शन घडने कठिणच होते. बर्फ बारी सुरू झाली होती त्यामुळे पक्षी पहायला मिळायचे परंतु आपल्या सभोवताली नेहमीच चिवचिव करणा-या चिमण्या मात्र पहायला मिळणे दुर्मिळच होत. लग्नाचे दोन वर्ष चिमणी सारखे भुर्कुन कधी उडुन गेले कळलेच नाही.  एके दिवशी बाल्कनीत फिरत असताना अचानक माझी नजर एका जागेवर खिळुन राहीली. अमेरिकेतील तो क्षण तर माझा आयुष्यात अतिशय आनंद देणारा ठरला. चक्क मी समोर अंगणात चिमणी पाहत होते. मला तर या दृष्यावर  विश्वासच बसत नव्हता. आता ती चिमणी रोजच दिसू लागली होती. मी त्या दिवसापासून अंगणात ती चिमणी रोज धान्य वेचुन खायला यावी व मला पहायला मिळावी म्हणून तीला धान्य टाकु लागले. ती एकच चिमणी रोज दिसायची. मी पण.. एक त एक म्हणून धान्य टाकण्याचा नित्यक्रम चालूच ठेवला. कालांतराने दोन, तीन, चार अशा चिमण्या वाढत गेल्या व मी धान्य टाकतच गेले. आता त्यांची व माझी चांगली ओळख निर्माण झाली होती व त्यांना पण माझा लळा लागला होता. ८ महिन्यांत त्यांची संख्या जवळपास १५ / २० झाली होती. आता त्या माझ्या व मी त्यांच्या चांगलीच परीचयाची झाली होती. गॅलरीत बसुन हाताच्या अंतरावर त्या धान्य टाकताना बसु लागल्या होत्या. आता मी  अंगणात धान्य टाकण्याऐवजी त्यांना गॅलरीत धान्य टाकत होते व त्या तेथे येऊन खाऊ लागल्या होत्या. माझी धान्य टाकायची वेळ अगदी त्यांच्या परीचयाची झाली होती. मी दरवाज्याची कडी काढायला खोटी की त्या आवाजाने ते तेथे हजर होत असत. आता त्यांनी माझ्या घराच्या शेडच्या आवारातच त्यांनी घरटी केली होती. बर्फ पडायला सुरुवात झाली होती. भयंकर पडणा-या बर्फात या कशा राहतील समजत नव्हते. थंडीचा जोर वाढला होता. त्या दिवशी धान्य टाकायला मला थोडा उशीर झाला होता. दरवाजावर  सारखा टक टक आवाज येऊ लागला. दरवाजा का वाजतोय समजायला मार्ग नव्हता. दरवाजा उघडला तर समजले की चिमण्या दरजावर चोची आपटत होत्या व धान्य मागत असल्याचा संकेत देत होत्या कारण बर्फाने सगळा परिसर पांढराशुभ्र होऊन गेला होता व त्यांच्या पोटापाण्याचा गहन प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर मी त्यांचा धान्य घालण्याचा नियम कधीच मोडला नाही व  कधी कधी दरजावर मुद्दाम त्यांचा चोचीचा आवाज ऐकण्यासाठी मी उशीर करायची . दोन वर्षांत त्यांची संख्या जवळपास ६०/७० वर पोहचली. खूप आनंद झाला मला हे सर्व पाहून व अनुभवून. आता मी एकटी नव्हते तर आमचं कुटुंब जवळपास ७२ सदस्यांच झाले होते. गेल्या महिन्यात मी अचानक आजारी पडले. मला उठणे बसणे कठीण झाले. पती या कठीण काळात माझी सेवा करायचे. त्यांना खायला घालायचे माझ्या लक्षातच आले नव्हते व ना कधी दरवाजावर टकटक झाली. आजारपणात मला माहित नाही पण कसा काय विसर पडला कळलेच नाही. जवळपास ४ दिवस मी बेडवरून उठू शकले नव्हते. आज ५ व्या दिवशी मी स्वतः उठून बसले व बाथरूममध्ये जाऊन आले. तर लगेच दरवाजावर टकटक सुरू झाली. मला तर हे ऐकून आश्चर्याचाच धक्काच बसला. गेली ४ दिवस यांनी कधीच दरवाजावर टकटक केली नव्हती. कसं बरं समजलं असेल त्यांना की मी आजारी आहे? व आपण दरवाजा वाजवून या आजारी आईला  सतावने उचित नाही म्हणून. आज फक्त घरात उठून बसले तर लगेच दरवाजा ठोठावला. असे कसे घडले असेल? कोणत शास्र यांना आवगत असेल बरं? याच विचारात गेली कित्येक दिवस मी होते. याच उत्तर मला अनेक दिवसांनी मिळाले. आज आपला व्हिडिओ पाहण्यात आला आणि पक्षांना खरोखरच व्हायब्रेशन समजतात याची खात्रीच पटली. मी मला रोखुच शकले नाही तुमच्या त्या व्हिडिओ मधील विधान ऐकुन व लागलीच आपणास फोन केला. 
    पंधरा ते वीस मिनिटे दिपालीजी बोलत होत्या. त्यांचे कानावर पडणारे शब्द अंगावर काटे उभे करत होते. आनंद याच गोष्टीचा वाटत होता की एक चिमणी पासुन ६० ते ७० चिमण्यांचा गोतावळा दिपाली ताईंनी अन्नदाता म्हणून उभा केला होता तो पण परदेशात. ताई तुमचे पक्षांच्या पाठीशी सदैव असेच प्रेम राहो व आपला हा गोतावळा अतिशय मोठा होत राहो व आपल्या हातुन त्यांना सदैव अन्नदान मिळत राहो हीच सदिच्छा. आज आपण मला चिमणी पक्षांचं आगळवेगळ रुप दर्शन घडवलत़ त्याबद्दल निश्चितच ऋण व्यक्त करतो. आज जागतिक चिमणी दिन या आपल्या सर्व चिमण्या ताईंना जागतिक चिमणी दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे नक्कीच द्याल ही सदिच्छा व्यक्त करतो.
   मित्रांनो पक्षांचे जतन आणि संवर्धन हाच पिकांवर परिणाम करणा-या किडींवर नियंत्रण उपाय आहे. त्यामुळे त्यांचे जतन करा व त्यांना उन्हाळ्यात पाणी व अन्न ठेवत चला.
    
✍️ रमेश खरमाळे, माजी सैनिक 
       ८३९०००८३७०

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...