म्हातारं खोड घरात असलं ना, की संस्कारांचा वटवृक्ष बहरल्याशिवाय राहत नाही. मला अजूनही आठवते माझी बसण्याची पद्धत सुद्धा आजीने शिकवलेली होती, मुलींनी कसं बसावं? कसं वागावं? याचं बाळकडू तिच्या वागणुकीतून किंबहुना वेळोवेळीच्या बोलण्यातून नकळत आपोआपच अंगवळणी पडत गेल. मुलगी वयात आल्यावर वडील, काका, मोठे भाऊ, सर्व पुरुष वर्गाशी मर्यादा ठेवून कसं राहायचं हे संस्कारातून घडत होत आमच्यावर. मला कधीच आठवत नाही की आम्ही वडिलांसोबत सुद्धा इतके फ्री राहिलेलो, वडील म्हटलं की एक प्रकारची आदर युक्त भीती मनात असायची. वडील कामावरून घरी यायच्या आत आईचे घर झाडून स्वच्छ केलेलं, आवरलेलं असायचं. दुपारभर घरात रेंगाळलेल्या माझ्या मैत्रिणी, वडील यायच्या टायमाला न सांगताच त्यांच्या त्यांच्या घरी गेलेल्या असायच्या. वडील घरात असले की एक वेगळीच दहशत असायची," सातच्या आत घरात" मग हा नियम सगळ्यांनाच लागू व्हायचा.पूर्वी वडिलांचे शिक्षण जेमतेम असले, कमाई पोटापुरती असली तरी बाहेर साधी नोकरी करणारा बाप सुद्धा आपल्या घरात ,"राजा माणूस" असायचा.
हल्ली स्त्री पुरुष समानतेच्या ओघात, घरातल्या सर्वच पात्रांना हवे ते स्वातंत्र्य दिले जाते. मुलगा मुलगी एक समान च्या नादात मुलींना सुद्धा नको ते फ्रीडम दिले जाते. कपड्यांचे, वागण्याचे, पार्टीचे, सहलीचे, सगळ्याचेच मनमुराद स्वातंत्र्य ! फ्रॉक सावरून सर्वांसमोर बसणारी कन्या आता बिंधास्त मांडीच्या वर छोटी चड्डी घालून घरात थाटात सर्वांसमोर मिरवतीए. आता सर्वांनीच नजरा बदलल्यात काळानुसार. चालतंय सगळं म्हणत म्हणत. पूर्वी तलप आली की देशी दुकानात गुपचूप दोन पेग मारून, घरी येऊन झोपणारा, तोंडाचा वास येऊ नये म्हणून बोलण्याचे टाळणारा, बाप आता सर्रास घरी पार्ट्या करू लागलाय. यात स्त्री वर्ग सुद्धा मागे नाही. हल्ली सगळेच घेतात म्हणत. हळूहळू लगाम लूज होत चाललाय. अहो बाबा, अहो नाना, ओ अण्णा ची जागा आता ",ए पप्पा ",ए बाबा, ए डॅडी ने कधी घेतली कळलं सुद्धा नाही. मुलींवर ,आपत्यांवर विश्वास टाकून स्पर्धात्मक युगात त्यांना कॉन्फिडंट बनवण्याच्या नादात, आपलं मूल ओवर कॉन्फिडंट बनून काहीही करू लागले याचं भान काही काही पालकांना राहिलेले नाही. पूर्वीचा नजरेतला धाक कुठे लोप पावलाय कुणास ठाऊक? डोळ्यांच्या धाकात राहणारे आपत्य आता आपल्याच आई-बाबांच्या डोळ्यात धुळ टाकू पाहते. आज हे सर्व लिहिण्या मागचं कारण असं की, नुकतेच घडलेले वेताळ टेकडीवरील प्रकरण. त्या मुलींची अवस्था पाहून अस्वस्थ झाले मी खूप. फ्रीडम फ्रीडम करत करत भरकटणाऱ्या या मुली, स्वतःच्या हाताने स्वतःची राख रांगोळी करून घेत आहेत. ना घरातल्यांचा धाक, ना कपड्यांचे भान, न समाजाची तमा, न कशाचे देणे घेणे. ना बोलण्याला लगाम. बिनधास्त, निडर, निर्लज्जपणाचा कळस झालाय! स्वातंत्र्याचा स्वैराचार म्हणायला हरकत नाही. यासाठी दिली का पालकांनी मुभा? यासाठी पाठवले का विश्वासाने गावाबाहेर?? या मुलींनी असे का केले असावे हा प्रश्न छळत होता मला? मग न राहून असे वाटते खरच आधीची काही बंधनं च योग्य होती. आधीची बेडी चुकीची नव्हतीच. आधीची मर्यादाच बरी होती. ती लक्ष्मण रेखा का आखली असेल? याचे कारण आता मात्र कळत होतं. पूर्वी शाळेच्या सहलीला जाण्यासाठी सुद्धा रडून रडून परमिशन मिळायची. आता मात्र पालकच आपल्या पाल्यांना बाहेरच्या प्रांतात शिकायला पाठवायचा आग्रह धरत आहेत. आज पाहिलं तर काय अवस्था झाली पुण्याची. बाहेरून शिकायला आलेली काही मंडळी विद्येच्या माहेरघराची स्वकृत्याने वाट लावत आहेत आणि स्वतःची सुद्धा !! याला जबाबदार कोण ?? यात दोष कुणाचा?? मनोमन वाटतं यात दोष फक्त आणि फक्त अवेळी दिलेल्या स्वातंत्र्याचा. यात दोष वेळीच न केलेल्या संस्कारांचा. यात दोष पालकांनी मुलीवर टाकलेल्या विश्वासाचा. यात दोष संयम नसल्याचा. आज समस्त पालक वर्गाला सांगावेसे वाटते ( मी सुद्धा एक पालकच आहे) मुलींना फ्रीडम नक्कीच द्या, पण त्याचा स्वैराचार नको. पाल्याला बाहेर शिकायला नक्की पाठवा, पण सोबत संस्कारांची शिदोरी दयायला विसरू नका. मर्यादेची बाळगुटी लहानपणापासूनच आठवणीने द्या. कपड्यांचे स्वातंत्र्य नक्कीच असावे, पण पुढे आपला पाल्य जगासमोर उघडा पडणार नाही याची काळजी मात्र घ्या. मुलींना स्त्रियांना सक्षम नक्की च बनवा पण स्त्रित्वावर तडा नको आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे, प्रत्येक घरात नातीला, फ्रॉक सावरून बस म्हणणारी आजी मात्र असू द्या !!
मुली म्हणजे किंमती रत्नं असतात त्यांना सांभाळलचं पाहिजे तेही संस्कारक्षम बनवून.
जयहिंद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा