सोमवार, १८ मार्च, २०२४

977. तो आणि ती

      महिनाच झाला होता दोघांचं लग्न होऊन. लग्न झाल्यावर लगेचच तो तिला आपल्यासोबत गावावरून शहरात घेऊन आला. आठवडा गेला तिला इथल्या वातावरणात रुळायला. तसे छान वाटलं तिला हेही शहर ! पण हल्लीच एक समस्या तिला जाणवत होती.
"तुम्हाला माझी अजिबात काळजी नाही. ती नाक्यावरची टवाळ मुले माझ्यावर कमेंट पास करत होती आणि तुम्ही माझ्यापासून काही अंतरावरच होता तरीही सर्व ऐकूनही तुम्ही काहीच नाही केलं. काही झालेच नाही अश्या पद्धतीने तटस्थ राहिलात आणि आता माझ्या मागे घरी आलात." तिच्या रागाचा पारा तो घरात आल्या आल्या चढला. त्या मुलांच्या वागण्याचा जेवढा त्रास झाला नाही एवढा त्याच्या तिथे शांत राहण्याचा झाला होता.
"राग आलाय?" तो मात्र शांतच.
"हो, खूप राग आला आहे तुमचा. नवरा म्हणजे बायकोची ढाल असतो. बाहेरच्या लोकांपासून, वाईट नजरांपासून, येणाऱ्या संकटापासून वाचवत असतो. पण तुम्ही मात्र कधीच माझ्या पुढे उभा राहत नाही." तिच्या डोळ्यात एकदम हताश भाव होते. मागे एकदा खाली पाण्याच्या नळाजवळ सुद्धा अशीच भांडण झाली. तो मात्र तेव्हाही शांतच होता.
"स्त्री स्वतः एक तळपती तलवार असते, तिला पुरुषाच्या ढालीची गरज नाही. पण हे कदाचित तू विसरली आहेस. आज मी होतो म्हणून तू माझ्याकडून मदतीची अपेक्षा केली पण उद्या मी नसेल तेव्हा? तेव्हा काय करशील?" त्याने अगदी शांतपणे म्हटले आणि ती निशब्द झाली.
"तुम्ही नसाल तेव्हा म्हणजे? कुठे जाणार आहात तुम्ही? काहीही बोलता..." तिने मात्र आता अजूनच चिडून म्हटले. म्हणजे त्याच समजावणे पटलं होतं पण शेवटचं वाक्य काही आवडले नव्हते. दुसऱ्या दिवशी नाक्याजवळून येताना नेमकं आजही त्या टवाळ मुलांनी तिला पाहून गाणी म्हणायला सुरुवात केली. आणि आज सुद्धा रस्त्याच्या बाजूला तो आपल्या मित्रांसोबत बोलता बोलता तिच्याकडे पाहत होता. तिने त्याच्याकडे पाहिले तर त्याची नजर आत्ताही तेच सांगत होती जे त्याने काल सांगितले. काही झालेच तर तो सोबत असणार आहे तिला हेही माहित होतं आणि मग अचानक धीर एकटवुन तिने त्या टवाळ मुलांकडे अतिशय रागात पाहिले. नेहमी खाली मान घालून जाणारी ती आज चक्क रागात आपल्याकडे येतेय पाहून ती सर्व मुले चपापली. सर्वांवर एक नजर टाकून तिने त्यांच्या मोरक्याला सरळ एक कानाखाली लावली तसे बाकीचे तिघे गडबडले.
"ये..." त्यातला एक जण ओरडून अंगावर येऊ लागला तसे तिने त्यालाही मागे ढकलले.
"आवाज खाली करायचा. खूप गाणी म्हणता येतात ना तुम्हाला. आता तुमचा गाण्यांचा एक कार्यक्रम पोलीस स्टेशनला करून दाखवा. तिथल्या इन्स्पेक्टरला सुद्धा कळूदेत तुमच्यात किती टॅलेंट आहे." बोलून तिने इशारा केला तसे दोन पोलीस कॉन्स्टेबल पुढे आले. तिने आज ह्या मुलांना धडा शिकवायचे ठरवले होते त्यामुळे ती आधीच पोलीस स्टेशनला जाऊन मदतीला पोलिसांना घेऊन आली होती. आता मात्र त्यांची चांगलीच तंतरली आणि ते चौघेही तिची माफी मागू लागले. पोलिसांनी त्यांना यावेळी त्यांच्या आईवडिलांना बोलावून त्यांना सक्त ताकीद दिली आणि त्यांचं कमी वय पाहता अजून एक संधी दिली. सर्व काही निस्तरून घरी यायला तिला वेळच झाला होता पण जशी ती घरात आली त्याने तिच्यावर फुलांची उधळण केली.
"अहो काय हे?" तिच्या चेहऱ्यावर आश्चर्ययुक्त हसू होतं.
"आज एक लढाई जिंकली आहेस तू...स्वागत तर असच व्हायला हवं." त्याने म्हटले आणि कौतुकाने तिच्याकडे पाहून नंतर तिच्या कपाळावर ओठ टेकवले. त्यानंतर गाडी चालवायला शिकणे असूदेत नाहीतर, बँकेतील काही व्यवहार किंवा अजून काही निर्णय घेणे असूदेत त्याने कधीच ती स्त्री आहे, तिला काय कळतंय असा विचार करून तिला मागे राहू दिले नाही. उलट तिला हे सगळं यायला हवं यासाठी तो नेहमी आग्रही राहिला. लवकरच दोघांच्या आयुष्यात दोन सुंदरश्या राजकुमाऱ्या आल्या कारण तिने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला होता. दोघेही आपल्या आयुष्यात फार सुखी होते.
काही वर्षानंतर...
"आई, ही घे रिबीन आणि शॉपचे उदघाटन कर." तिच्या पंचवीस वर्षाच्या एका मुलीने तिच्या हातात कात्री देऊन म्हटले. आज दोन्ही बहिणींनी मिळून एक दुमजली फॅशन बुटीक सुरु केले होते. तिने कात्री घेऊन रिबीन कापली आणि आत येऊन समोर असलेल्या गणपतीचे पूजन करून नंतर शेजारी असलेल्या त्याच्या हार घातलेल्या फोटोसमोर सुद्धा समई पेटवली.
"थँक्स आई ! आज आम्ही जे आहोत ते फक्त तुझ्यामुळे. नाहीतर आम्ही फक्त पाच वर्षाचे होतो तेव्हा बाबा एका अपघातात गेले. पण बाबा गेल्यानंतर सुद्धा तू हिंमतीने आम्हाला मोठे केलेस. आमच्या शिक्षणात कसलीही कमी पडू दिली नाही. आज आपल्या तिघींचे घर सुखरूप आहे ते फक्त तुझ्यामुळे."
"मग थँक्स तर तुम्ही मला नाही तर तुमच्या बाबांना म्हणायला हवे. कारण त्यांनीच तर मला जाणीव करून दिली होती की स्त्रीला पुरुषांच्या ढालीची गरज नाही. ती स्वतःच एक तळपती तलवार आहे. आयुष्यभर तेच लक्षात ठेवून तुमचे बाबा गेल्यावर सुद्धा लोकांच्या वाईट नजरांपासून आणि असंख्य संकटापासून स्वतःला आणि तुम्हाला वाचवत आले. ते हयात असताना त्यांनी ज्या ज्या गोष्टी शिकवल्या त्या सर्व गोष्टीचा ते गेल्यावर फायदा झाला मला नाहीतर या शहरात माझा टिकाव लागणे अशक्य होते. आणि आज मी सुद्धा तुम्हाला तेच सांगेल, कोणाच्या हातातली बाहुली नाही तर तलवार व्हा आणि हे जग जिंका." तशी तिच्या दोन्ही मुलींनी तिला मिठी मारली. दोघीही आईप्रमाणे एकदम धाडसी, कष्टाळू होत्या त्यामुळेच तर इतक्या कमी वयात दोघीनी स्वतःच इतकं मोठं बुटीक सुरु केलं होतं तेही आपल्या हिंमतीवर !

समाप्त

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...