रिलेशनशीप किंवा नातं यासंदर्भातला एक वास्तवात घडलेला वेगळाच प्रसंग आज मला सांगायचा आहे. माझ्या मोठ्या भावाचा मित्र त्याचं नाव विलास हा दक्षिण आफ्रिकेत काम करत होता. भारतातून दक्षिण आफ्रिकेत त्याचं सतत जाणं येणं होत असे. या प्रवासात त्याची मैत्री एका एअर होस्टेसशी झाली. मैत्रीचं रुपांतर बऱ्याचदा होतं तसं प्रेमात झालं. मग गोष्ट लग्नापर्यंत गेली. त्यामुलीनं विलास दादाला तीच्या घरी नेलं. तीचे वडील आर्मीत मोठे अधिकारी म्हणून रिटायर्ड झाले होते. अत्यंत उच्च शिक्षित आणि श्रीमंत अशा घरातून ती आली होती. आमचा विलास दादा तीच्या वडिलांशी बोलला. त्यांनी त्याचं चांगलं स्वागत केलं. भेट झाल्यानंतर मात्र विलासदादाने त्या मुलीला लग्नासाठी नकार दिला. आम्हा सर्वांनाच तो धक्का होता. मात्र नकार देण्याचं जे कारणं त्याने सांगितलं ते फारच विचार करायला लावणार होतं. तो म्हणाला त्या मुलीचा आणि माझा Socio-economic class match होत नाही. त्यामुळे लग्न झालं तरी ते टिकणार नाही. माझं कुटुंब, त्यांच्या अपेक्षा आमचं गावातलं घर हे मला माहित आहे. त्यामुळे नंतर सगळा नासोडा होण्यापेक्षा आधीच नाही म्हटलेलं बरं. दोन आयुष्यं आणि कुटुंब वाचतील. त्याचं वाक्य होतं. ’यार! आपण पैसा कितीही कमावून घेऊ पण तो क्लास नाही आणू शकत.’’ किती महत्वाचं वाक्य आहे हे. समज दाखवणारं. (कृपया इथे साम्यवाद आणू नये ही विनंती)
थोडक्यात काय तर लग्न टिकण्यासाठी, नातं दीर्घकाळ सुंदर राहण्यासाठी केवळ प्रेम पुरेसं नाहीये हे त्याला लक्षात आलं होतं. काही दिवसांपासून सोशल मीडियावर दोन सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या संसारातल्या अत्यंत खाजगी गोष्टींची खूपच चर्चा सुरू आहे. बी.आर.चोप्रांच्या महाभारतमध्ये कृष्णाच्या भूमिकेनं अजरामर झालेले सुप्रसिद्ध अभिनेते नितीश भारद्वाज यांचा घटस्फोट झाला. त्यांची आयएएस बायको तीच्यावर नितीश भारद्वाज यांनी केलेले आरोप आणि तिने केलेले प्रत्यारोप याचा बराच गाजावाजा झाला. अभिनेते रवीद्र महाजनींवर त्यांच्या पत्नीनं लिहिलेल्या पुस्तकाचीही चर्चा झाली. त्यातलं खरं काय खोटं काय यात आपण जायला नको. आजच्या घडीला घटस्फोट वाढले आहेत. ते का वाढले आहेत आणि लग्नासारखी सुंदर गोष्ट जर टिकवायची असेल तर काय करायला हवे.
आज मुली मेरीट लिस्टमध्ये मुलींची संख्या जास्त आहे, मुली आर्थिक दृष्टया स्वावलंबी होत आहे. म्हणजे पोशिंदा, मालक वगैरे हा पुरुषाचा रोल होता आणि त्याने पुरुषाला मिळणारं महत्व होतं ते संपायला लागलं आहे. होम लोन काढताना दोघंही घराचे हप्ते भरत असतात, कधी कधी बायकोचं उत्पन्न हे नवऱ्यापेक्षा जास्त असतं. कुठलंही लग्न हे तेव्हाच रोमँटिक, सुंदर होतं जेव्हा ते आदर्शवादासोबत वास्तववादावर आधारलेलं असतं. ज्या लग्नातला व्यवहार मजबूत त्या लग्नातला रोमान्स आणि प्रेम टिकण्याची शक्यता जास्त. उदाहरणार्थ एखाद्या श्रीमंत माणसाच्या मुलीनं पळून जावून एखादया गरीब, टिनाच्या शेडमध्ये राहणाऱ्या मुलाशी लग्न केलं तर चार दिवस पहिला उन्माद ओसरेपर्यंत ते टिन बोचणार नाही. उन्हाळ्यात घामाच्या धारा निघाल्यावर लगेच प्रेमाचे पाय जमिनीवर लागतील.(यातल्या अपवादांबद्दल मी बोलत नाहीये). तेव्हा लग्न टिकण्यासाठी आणि एकूण आयुष्यातही प्रेम पुरेसं नाहीये. प्रेम हे आवश्यक आहे पण ते पुरेसं नाहीये. (necessary but not sufficient) विवाहसंस्था आणि कुटुंबसंस्था या दोन्ही संस्था सुंदर आहेत, गरजेच्या आहेत आणि त्यांच्या निरोगी अस्तित्वावर समाजाचं मानसिक, भावनिक स्वास्थ्य अवलंबून आहे. तेव्हा लग्न करताना तो प्रेम विवाह असो व घरच्यांनी ठरवून केलेला विवाह असो त्यातले जगण्याचे पैलू लक्षात घ्यावे लागतील.
आता जगण्याचे पैलू कोणते, तर त्यात तुमची जीवनशैली आहे, तुम्ही लवकर उठता की उशीरा उठता, थोडक्यात सूर्यवंशी की चंद्रवंशी. हे यासाठी की भारतात लग्न हे केवळ एका व्यक्तीशी होत नाही तर ते कुटुंबाशी होतं. मग सासू-सासरे नाराज होणार काय हो मुलगी सकाळी ९ वाजता उठते. थोडक्यात सासू-सासरे दोन्हीकडचे यांची मत महत्वाची ठरतात. जेवणाच्या सवयी काय, खर्च करण्याच्या सवयी काय. आवडी-निवडी काय. आमची एक मैत्रिण फार अप्रतीम वाचक होती. पुस्तक विकत घेणे ही तीला गुंतवणूक वाटत होती तर तीच्या सहचराने पुस्तकं म्हणजे रद्दी असा रिमार्क दिला होता. दुसरी मैत्रिण गझलप्रेमी होती तीच्या नवऱ्याला गझल म्हटलं की, डिप्रेशन यायचं...या टोकाच्या विरोधाभासातही नातं सुंदर करता येतं पण त्यासाठी मग सामंजस्य हवं. एकमेकांच्या जीवनशैलीचं, मूल्यांचं, आणि गुण-दोषांचं आकलन हवं. त्याप्रती आदर हवा. त्या आकलनातून मग बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. लैंगिक गरजांविषयी, आवडी-निवडींविषयी पण मोकळेपणानं बोलणं गरजेचं आहे. अनेकदा या मुद्यावरुन जोडप्यांमध्ये प्रचंड तणाव असतो आणि तो भलतीकडेच निघतो आणि भांडणं विकोपाला जातात. घर खर्च कोण करणार, मुलं कशी वाढवणार, स्वत:च्या लहानपणी मनावर झालेले आघात, घर आणि करिअर संदर्भातल्या कल्पना व स्वप्न याविषयी बोलणं गरजेचं आहे. कायम कुठे सेटल होण्याची इच्छा आहे याविषयासंदर्भातली स्पष्टताही खूप गरजेची आहे. मुख्य म्हणजे आपल्याला आपली स्पष्टता येणं गरजेचं आहे आणि ती आल्यावर समोरच्याला ती मधाळ-कणखरपणे सांगणे हे ही तितकेच आवश्यक आहे. बऱ्याचदा असं होतं की, मुलाला मुलगी किंवा मुलीला मुलगा इतका आवडला असतो की, त्या नादात ते सांगितल्या जात नाही. बघूयात नं पुढे, काय होतंय..असा विचार केला जातो तो पुढे फार घातक ठरतो.
एक अरेंज्ड मॅरेजमध्ये मुलाला मुलगी खूप आवडली होती. साखरपुडा झाला. बोलता बोलता मुलीला मुलगा म्हणाला, ‘आई विचारत होती की, मुलीला स्वयंपाक येतो नं? तर मी आईला उत्तर दिलं की, तीला स्वयंपाक येत नसेल तर मी करीन’’. यावरुन त्या मुलीला वाटलं की, मुलगा फारच उदारमतवादी आहे. मुळात मुलाने मुलीला खूश करण्यासाठी ते म्हटलं होतं. लग्न झाल्यावर मुलीला लक्षात आलं की याची अपेक्षा तर हातात चहा आणून दयावा अशी आहे. तीला फसवणुकीचा फिल आला. थोडक्यात काय तर जी गोष्ट तुम्ही कायम, आय़ुष्यभर करु शकणार नाही ती सुरूवातीलाच नाही म्हणा. त्याने गोडवा कायम राहतो.
शेवटी लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे वरील सर्व मुद्द्यांची चर्चा मुला-मुलीनं लग्नाआधी करणं गरजेचं आहेच पण ती केल्यानंतरही काही गोष्टी मागे राहू शकतातच आणि त्यासाठी कन्सिडरेशन शिवाय पर्याय नाही. भारतीय समाजाचं ते फार देखणं वैशिष्ट्य आहे. एकमेकांना सोबत घेऊन चालणं, काही गोष्टी सोडून देणं हे शहाणपण गरजेचं आहे. समोरच्याला आवडत असेल आणि फार कष्ट पडणार नसतील, डिसकम्फर्ट नसेल तर स्वत:त बदल करण्याची तयारी पण ठेवावी लागते. समोरच्याच्या निजतेचा स्वीकारही करावा लागतो.
आणि
न मैं तलाश करु तुम में जो नही हो तुम
न तुम तलाश करो मुझ में जो नही हूँ मैं
हे दोन्ही बाजूनी समजलं की सोपं होऊन जातं. शेवटी आपल्याला नातं टिकवायचं आहे, सुंदर करायचं आहे.
🙏🏻😌
वसुंधरा काशीकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा