मंगळवार, १९ मार्च, २०२४

984. खरा श्रीमंत

  साहेब, रहमान चाचा वारला. काल गावाहून आलेल्या फोन वरून देशपांडे वकिलांनी सौम्य आवाजात सांगितलं.
''अरेरे ...कसं काय ?" 
आजारी वगैरे होता काय ?'  
मी आवाजात शक्य तेव्हढा धक्का आणि दुःख ठेवायचा प्रयत्न करीत म्हटलं. माझी अर्ध्या तासात बोर्ड मीटिंग होती आणि तशी ही बातमी थोडीशी दुःखदायक असली तरी मला संभाषण चार दोन वाक्यांच्या पलीकडे वाढवायचं नव्हतं. अर्थात रहमानचाचा नंतर गावची ती शेती कोण बघणार हा प्रश्न माझ्या डोक्यात लगेच आला. पण ते आताच विचारणं प्रशस्त दिसणार नाही म्हणून मी थोडा थांबलो. 
नाही साहेब, तसा काही फार आजारी नव्हता. पण मी फोन फक्त हेच सांगायला नाही केला", देशपांडे काहीतरी गुपित सांगावं तसं बोलले.
'म्हणजे ?'  मी सावधगिरीचा पवित्रा घेऊन विचारलं.
'म्हणजे साहेब तो इतकी वर्ष तुमची ही वडिलोपार्जित शेती बघायचा. तुम्ही इतक्या वर्षां पासून गाव सोडून आता मुंबईत राहता. दोन दोन वर्ष इकडे चक्कर सुद्धा मारीत नाही. 
तरी मी तुम्हाला म्हणायचो की थोडी चौकशी असू द्या शेतीची. त्याच्या एकट्याच्या भरवशावर इतकी मोलाची शेती टाकणं योग्य नव्हतं.'
'पण झालं काय?' 
मी देशपांडेच्या नमनाला कंटाळून आता काहीशा अधीरपणे विचारलं.
'साहेब, रहमान चाचा मरताना बहुतेक मृत्युपत्र अन जमिनीचे काही कागद करून गेला. परवा मला त्याचा फोन आला होता. म्हटला, जागेचे काही कागद पाठवतोय. ते केवळ साहेबां समोर उघडा. मला वाटलं कुठे गावाला वगैरे जाणार असेल. म्हणून मी काही फार विचारलं नाही. आता अचानक तो काल वारला.' आता मी थोडा चरकलो. पैशांपायी जवळची माणसं सुद्धा बदलतात. रहमान चाचा तर माझ्याशी काही खूप जिव्हाळ्याचे संबंध असणारा सुद्धा नव्हता.  म्हणजे मला आठवतं तेव्हापासून, अगदी आमच्या वडिलांच्या काळा पासून तो आमच्या शेतीवर काम करतोय. पण जसे बालपणी आमच्या वाड्यातले नोकर चाकर प्रिय झाले, त्यांच्या आठवणी राहिल्या तशा रहमान चाचाच्या आठवणी काही फार नव्हत्या आणि प्रिय तर नव्हत्याच. लहानपणी गावाकडे आमचा मोठा वाडा होता. वडिलांची भली मोठी जमीन होती. घरात नोकर चाकर होते. नांदतं घर होतं. पण मी वाड्याचा एकुलता एक वारस मात्र पुढे शिकलो. शहरात गेलो. पुढे परदेशात. नंतर मुंबईत परत येऊन स्थायिक झालो. मी सुरु केलेली कंपनी भरभराटीला आली. आता मुंबईत सुखी, समृद्ध आणि परिपूर्ण असं माझं आयुष्य आहे. बायको ममता आणि मुलांसोबत उच्चभ्रू राहणीमान आहे. मधल्या काळात आई गेली, नंतर वडीलही.  माझा गावाकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता. मग हळूहळू दुरवस्थेला चाललेला वाडा विकून टाकला. फक्त शेती राहिली. ती सुद्धा रहमान चाचा ने आग्रहवजा विनंती केल्याने. आधीपासून शेती तोच पाहायचा. त्याने म्हटल्याने शेती ठेवली. नाही तर ती सुद्धा विकली असती. वर्षभर शेती तो करायचा आणि वर्षा अखेरीस हिशेब आणून द्यायचा. ममता म्हणायचीच, 'अहो कशाला ठेवताय ती शेती ? काय मिळतंय त्यातून ? वर्षाला चार पाच लाख ? आणि तेही रहमान चाचा सांगतो म्हणून तेव्हढे. त्यापेक्षा ती विकून कुठेतरी शेअर्स मध्ये टाका.'. हिशेब कधी मी बघितला नाही तरी कधी कधी मला वाटायचं की खरेच इतकेच पैसे आले असतील का ? रहमान चाचा वडील गेल्यानंतर तेव्हढ्याच इमानाने सगळं करतोय का ?' देशपांडे वकील मला अधून मधून म्हणायचे 'अहो जरा लक्ष द्या. सगळंच त्याच्यावर टाकून मोकळे होऊ नका'. पण तरी ही मी शेती विकली नाही. विकून तरी काय मोठे पैसे येणार होते ? माझ्या सध्याच्या जीवनमानात ती रक्कम काही खूप मोठी नव्हती. पण रहमान चाचाला नक्कीच असेल. खरं तर रहमान चाचा आमच्याकडे कसा आला याची कुणालाच फारशी माहिती नव्हती. माझ्या लहानपणी केव्हातरी एकदा तो त्याच्या मुलखात दुष्काळ पडला म्हणून आला असं म्हणतात. एकटाच आला होता, कुणी कुटुंब नाही की मुलं बाळं नाहीत. वाड्यात येऊन वडिलां कडे हात जोडून म्हणाला 
'काही काम असेल तर द्या'. 
त्याची विनंती करण्याची पद्धत काही फार नम्र नव्हती. सहा फूट उंची, करारी चेहरा आणि अगदी दगडी निश्चल भाव. वडिलांनी म्हटलं 
'काय काम करशील ?'
'जे सांगाल ते. पण शेतीवर आधी काम केलं आहे मी' रहमान चाचानं तशाच थंड चेहऱ्यानं स्तब्धपणे उत्तर दिलं आणि वडीलानी एव्हढ्या सगळया नोकर चाकरात आणखी एक, म्हणून त्याला शेतावर कामाला लावून घेतलं. रहमान चाचा शेतावर सुरवातीला मजुरीची काम करीत राहिला.  पण तो कामसू होता. आणि बुद्धीनं तल्लख होता. त्याला लिहिता वाचताही येत होतं. त्यामुळे  नुसती मजुरी सोडून तो हळूहळू शेतसारा भरणे, शेतमाल नीट मोजून देणे, तालुक्याच्या ठिकाणी जाऊन कधी शेतमाल विकून येणे, जमिनीच्या मशागतीपासून, खत, पेरणी, फवारणी, कापणी हे सगळं मनापासून काम करायला लागला. वडिलांच्या मनात तो भरला आणि मग त्यांनी दोन तीन वर्षांनी त्याला हळूहळू पूर्ण शेती सांभाळायला सांगितली.  शेती मोठी होती आणि वडिलांना इतरही कामं खूप होती. मग रहमान चाचानेच शेती सांभाळली. तसं त्यानं गावात दूर एक स्वतःचं एक छोटंसं खोपटं बांधलं होतं. पण तो राहायचा दिवसभर शेतावरच. झोपायलाच काय तो त्याच्या खोपटवजा घरी जायचा. आम्ही कधी वडिलां सोबत शेतीवर गेलो तर वडिलांना अगदी लवून नमस्कार करायचा आणि वडिलांनी त्याची काही वास्तपुस्त केली तर 'आपकी दुवा साहेब' एव्हढंच म्हणायचा. 
    मी त्याला कायम शेतीत काम करताना नाहीतर निवांत वेळी आकाशाकडे एकटाच दूर दूर पाहत चिलीम ओढताना बघितलंय . पण त्याचा तो निश्चल करारी चेहऱरा, कधीही न केलेले स्मित आणि कधीही माझ्याशी जवळीकीने वागण्याच्या नसणाऱ्या आठवणी यामुळे मला तो कधीच प्रिय झाला नाही. वडील गेल्यानंतर पुढेही तो आमची शेती करीत राहिला. मला वर्षाचा हिशेबही देत राहिला. सुरवातीला हंगाम आला की गावाकडून मुंबईला कुणी येणारा असला तर पोती दोन पोती गहू, कधी भाज्या असं पाठवायचा. पण ममता म्हणाली, 'अहो कुठं ठेवू हे धान्याचे पोते आणि भाज्या या फ्लॅटमध्ये ?'. मग मी रहमान चाचाला तसं कळवलं. त्यानेही चकार शब्द न काढता ते बंद केलं. पण वर्ष संपलं की काय तो पाच सहा लाखांचा हिशेब देत राहिला. मी कधी फार खोलात जाऊन तो तपासाला नाही. मी कंपनीच्या वाढीत गुंतलो होतो आणि अशा फुटकळ रकमांकडे लक्ष द्यायला मला वेळही नव्हता. पुढचा मार्ग खडतर आणि लांबलचक असेल हे मला कळून चुकलं. कदाचित रहमान चाचाचा चुलत भाऊ किंवा त्याचे कुठले नातेवाईक उद्या तिथे गावी आले असतील आणि दंडेली करतील हे पण मी गृहीत धरलं.  रात्री झोप काढली आणि सकाळची फ्लाईट पकडून विमानतळावर उतरलो. आधीच सांगून ठेवलेल्या टॅक्सीने गावाकडे निघालो. दोन अडीच तासांचा प्रवास तेथून. गेल्या दोन तीन वर्षात आलो नव्हतो इथे. मागे एकदा आलो होतो ते ममता आणि मुलांसकट. म्हणजे समर हॉलीडे साठी जिथे जाणार तिथून मुद्दाम आडवाट करून बायको मुलांना नेलं होतं गाव आणि शेत बघायला. पण त्यांना काही फार आवडलं नाही. उन्हाळा होता. घामाच्या धारा लागल्या. पुस्तकात वाचतो किंवा चित्रपटात पाहतो तसं काही रमणीय, आल्हाद दायक वगैरे नाही वाटलं त्यांना. गावी आता फारसं कुणी ओळखतंही नव्हतं. थोडंफार शेतात फिरून आणि दगडी चेहऱ्याच्या रहमान चाचाला भेटून आम्ही लगेच एअरपोर्ट कडे रवाना झालो होतो तेव्हा. ते आठवत आठवत आणि प्रवास करीत माझी गाडी गावात पोचली.  ठरलेल्या ठिकाणी देशपांडे वकील वाट पाहत होतेच. त्यांनी खबरदारी म्हणून दोनेक लोक पंच म्हणून पण बोलावले होते. सुरवातीला चहा वगैरे घेऊन आणि औपचारिक बोलून ते म्हणाले,
'साहेब, उघडतो ही कागदपत्रं .. '
'हं' मी नुसताच हुंकार भरला. मी आता पुढच्या कायदेशीर लढाईला मानसिक दृष्ट्या तयार झालो होतो.
देशपांडेंनी पाकीट उघडलं. 
त्यात दोन तीन कागद होते. स्टॅम्प पेपर वर काहीतरी लिहिलेले. बऱ्याचशा पावत्यांचा एक गठ्ठा होता. सोबत एक पत्रासारखं पानभर काहीतरी लिहिलेलं होतं रहमान चाचाच्या हस्ताक्षरात. ते देशपांडेंनी पहिल्यांदा वाचायला घेतलं. 
रहमान चाचाने लिहिलं होतं,
साहेब , 
नमस्कार .... 
माझी आता उमर होत चालली. कधी मी हे जग सोडून अल्लाला प्यारा होईन माहिती नाही. जगात माझं कुणी नाही. माझ्या तरुणपणी आमच्या मुलखात दंगा झाला होता. त्यात माझी बायका पोरं मारली गेली. मग मी जीव वाचवत अन लपत छपत तुमच्या गावात आलो आणि तुमच्या वडिलांकडे आलो. त्यांनी आसरा दिला. मग मी तुमच्याकडेच राहिलो. जी काय रोटी सब्जी खाल्ली ती तुमचीच आणि या अंगात जे रक्त आहे तेही तुमचंच. आयुष्यभर तुमची शेती सांभाळली. बडे साहेब गेल्यावर पण मी तुम्हाला विकू दिली नाही. पण आता जास्त दिवस जगेन असं वाटत नाही. मला हे सगळं बोलता नसतं आलं तुमच्याशी म्हणून  लिहून ठेवतो. शेतीची सगळी कागदं, शेत साऱ्याच्या पावत्या, सात बारा उतारे, सगळं या मंदी आहे. पण सोबत एक कागद करून ठेवला आहे. माझं छोटंसं झोपडं आहे गावाच्या भितर. माझ्या स्वतःच्या कमाई तून मी जागा घिऊन बांधलेलं. मी गेल्यावर कुणीही बळकावून घेईन. माझा दूरचा नातेवाईक येतो कधी कधी मुलखातून. पण तो नशापाणी करतो. मला आवडत नाही तो. त्याची पण नजर असेल याच्यावर कदाचित. त्याला पण द्यायचं नाही मला ही जागा अन झोपडं. आता मी गेल्यावर ही शेती विकली तरी हरकत नाही. तुमचं आयुष्य निराळं आहे साहेब आणि मी गेल्यावर कोण एवढी देखभाल करेल या शेतीची ?. तुमची रोटी खाऊन आयुष्य काढलं. माझ्या खोपटाची जागा अन वर जे काय बांधलं ते सगळं मी तुमच्या नावानं करतो आहे. त्याची किंमत तुमच्या साठी काय खूप नसणार. पण तुमच्याकडेच कमावून बांधलं होतं. तुम्हालाच परत करतो. जागेचे कागदपत्र एकदम शाबूत करून ठेवले आहेत. मी गेल्यावर भलत्या सलत्यानं जागेवर कब्जा करू नये म्हणून मुद्दाम हे लिहून ठेवलं आणि वकिलाच्या हवाली केलं. 
अल्लाह खैर ...
खुदा हाफिज ...'
     बस्स, एव्हढंच लिहिलं होतं. मी ते ऐकत दूरवर कुठेतरी पाहत राहिलो. काय बोलावं, काय विचार करावा हे कळलं नाही. शहरात राहून राहून माणसातल्या वाईटपणावर माझा जास्त विश्वास बसत चालला होता हे कुठेतरी अंतर्मनात उमगलं. इतर कंपन्यांशी स्पर्धा, त्यात एकमेकाला नामोहरम करण्याचे डावपेच, क्लाएन्टसशी बेरकी पणाने केलेल्या डील्स, कधी कधी सफाईदार खोटं बोलून आणि नकली हसून वाढवलेले व्यावसायिक संबंध आणि या सगळ्या सर्कल मध्ये वावरताना ममताने पाहिलेली मुखवट्यांची दुनिया यात कुठेतरी आम्ही सच्चेपणावरचा विश्वास घालवून बसलो होतो. माझी आणलेली शेतीच्या कागदपत्रांची बॅग माझ्या हातातच राहिली.  देशपांडेंचा चेहरा डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखा झाला. त्यांना कदाचित पुढं कोर्ट कचेरी होईल, आणि एक मोठं काम वर्षानुवर्षे मिळेल असं वाटलं असावं. त्यांचा भ्रमनिरास झाला. त्यांनी ते घराचे कागद हताशपणे माझ्या कडे दिले. त्याकडे पाहत आणि थोडा वेळ तसंच बसून मी देशपांडेंना विचारलं,
'काय किंमत असेल रहमान चाचाच्या घराची ?'
देशपांडे नुसतेच हसले अन म्हणाले,
'काय किंमत असणार. या खेड्यातलं छोटंसं खोपटं ते. बांधकाम तर काही किमतीचं नाहीच. जागेचीच काय ती किंमत असणार.'
'तरी पण, किती असेल ?' 
मी मुद्दाम विचारलं.
'आता खेड्यात काय किंमत जागेला? बक्कळ जागा आहे इथं. असेल फार फार तर पंधरा वीस हजार.' देशपांडेनं काहीतरी तुच्छ सांगावं तसं सांगितलं. मी एकवार माझा खिसा चाचपला. सेक्रेटरी ईवाॅनने दिलेली माझ्या फ्लाइटची रिटर्न तिकिटं खिशात होती. त्याचंच भाडं पंधराएक हजार असणार. मला एका क्षणात गरीब झाल्या सारखं वाटलं. आणि मग मी एका श्रीमंत माणसाच्या घराचे ते कागद आणि ते लिहिलेलं पत्र नुसताच पाहत बसलो. ही सत्य घटना असुन सगळी नांव अगदी तीच आहेत. पण मूद्दाम हून गावाच नांव लिहील नाही. पण अजूनही अशी माणसे  या भूमीवर आहेत पण जिवंतपणी  आपण ती ओळखू शकत नाही.
समाप्त .....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...