सोमवार, ११ मार्च, २०२४

941. जीवनाची संध्याकाळ

 सकाळी दहा साडेदहाच्या सुमारास दारावरील बेल वाजली. मी दार उघडले. नेहमीप्रमाणे दारासमोर शेजारचे काका उभे.
“बोला काका...”
“थोड्या वेळात अँब्युलन्स येतेय. तेंव्हा तुझी मदत लागेल.” त्यांनी म्हटले.
“अँब्युलन्स? का? काय झाले?” मी जरा काळजीच्या सुरात विचारले.
“हिला केअर सेंटर मध्ये दाखल करतोय आम्ही.” त्यांनी उत्तर दिले.
“ओह..!!!”
“ते खूप नावाजलेले केअर सेंटर आहे. मी स्वतः जाऊन पाहणी करून आलोय. तिथे दाखल करण्यात आलेल्या पेशंटला सगळ्या वैद्यकीय सुविधा दिल्या जातात. जेवणही चांगले असते. सगळ्या पेशंटला त्यांच्या जागेवर जेवण नेऊन दिले जाते. आठवड्यातून दोन दिवस वैद्यकीय तपासणी केली जाते. पेशंटच्या मनोरंजनासाठी अनेकदा वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमही ठेवले जातात. फक्त पेशंटच्या घरच्यांना काही नियम पाळावे लागतात. म्हणजे आठवड्यातून दोनदाच एका ठराविक वेळेत, ठराविक वेळासाठी तुम्ही पेशंटला भेटू शकता.” काकांनी सांगितले.
“ओह... छान.”
“बरे पैसेही जास्त नाहीयेत. महिन्याला xxxx भरायचे. मग सगळी काळजी तेच लोक घेतात.”
“अरे वा... मग तर छानच की... तसेही आता तुम्ही एकटे काय काय करू शकणार ना...” मी म्हटले.
“हो ना...”
“काकूंचं वय काय असेल आता?” मी विचारले.
“मागील महिन्यात ८० क्रॉस केलं तिनं... मीही ८५ क्रॉस केलंच की. माझ्याच्याने नीट जिना उतरायचा तर १० मिनिटे लागतात. जो पर्यंत तिला चालता फिरता येत होते तोपर्यंत गोष्ट वेगळी होती. पण तिला पॅरेलिसिसचा अॅटॅक आला आणि सगळंच बदललं.” काहीशा खिन्नतेने ते म्हणाले.
“खरंय... असो... गाडी आली की सांगा मला.” मी म्हटले आणि काका माघारी वळले. माझ्या मनात अनेक विचारांचे काहूर उठले. चार अतिशय यशस्वी मुलांची आई आज वृद्धाश्रमात दाखल होणार होती. ओह... सॉरी... त्याला वृद्धाश्रम नाही म्हणायचे. केअर सेंटर म्हणायचे.
वर्ष २००० साली आम्ही इथे राहायला आलो. आमच्या बिल्डिंग मधील शेजाऱ्यांच्या ओळखी होत होत्या. त्यावेळी एक फ्लॅट कायम बंद असायचा. नंतर माहित झाले की त्या फ्लॅटमध्ये एक वयस्कर दांपत्य राहते. ते सहा महिने त्यांच्या मुलाकडे बँगलोरला असतात आणि सहा महिने इथे येतात. कालांतराने ते सुट्टीसाठी आले. ओळख झाली आणि त्यांच्या काही सवयी समोर येऊ लागल्या.
बहुतेक २००२ ची गोष्ट असावी. उन्हाळ्याचे दिवस होते. आमचे नुकतेच रात्रीचे जेवण उरकले होते. आईचे घरातील आवरणे चालू होते तेवढ्यात दार वाजले. मी दार उघडले. समोर काकू.
“मावशी आहे का घरात?” काकूंनी विचारले.
“कोण मावशी?”
“म्हणजे तुझी आई रे...”
“तुम्ही तिला मावशी म्हणतात?” मी काहीसे गोंधळून विचारले.
“होय...”
“आई... समोरच्या आज्जी आल्या आहेत.” मी ओरडून सांगितले.
“काय रे? मी काय तुझी आजी आहे?” त्यांनी विचारले.
“माझी आजी जिवंत असती तर तुमच्याच वयाची असती.” मी.
“मला नाही आवडत कुणी आजी म्हटलेले.” त्यांनी स्पष्ट सांगितले.
“अरे वा... हे बरंय. मी माझ्या आजीच्या वयाचा व्यक्तीला आजी म्हणायचे नाही आणि तुम्ही तुमच्या मुलीच्या वयाच्या व्यक्तीला मावशी म्हणणार?” मी म्हटले आणि त्यांना राग आला. त्या तशाच मागे फिरल्या आणि त्यांनी त्यांच्या घराचे दार जोरात लावून घेतले. तेवढ्यात आई तिथे आली.
“काय रे... कोण होतं?” आईने विचारले आणि मी तिला सगळा किस्सा सांगितला.
“झालं... आता मला त्या कायम मावशी म्हणणार... मागे मी त्यांना एकदा बोलताबोलता म्हटलं होतं तुमची मोठी मुलगी माझ्यापेक्षा फक्त दोन वर्षांनीच लहान आहे, तर त्या दिवसापासून त्यांनी मला मावशी म्हणायला सुरुवात केली. आणि आजच्या या प्रसंगामुळे त्या अजूनच चिडतील.” आईने म्हटले आणि तिचे ते बोल खरेही ठरले. शेवटपर्यंत काकूंनी माझ्या आईला मावशी म्हणूनच हाक मारली. आणि त्यांचे पाहून काकाही माझ्या आईला मावशी म्हणू लागले. अर्थात त्या दिवसापासून आमच्या साठी काका आणि काकू हे बिट्ट्या आणि बिट्टी बनले.
त्या प्रसंगानंतर जवळपास सहा सात महिने त्यांनी अबोला धरला होता. पण शेवटी शेजारी म्हटल्यावर किती दिवस एकच गोष्ट लावून धरणार ना? परत एकमेकांशी बोलचाल चालू झाली. त्याच काळात मी नोकरी सोडली. त्यामुळे मी घरात जास्त दिसू लागलो. येता जाता काकू त्यावरून टोमणे मारू लागल्या. कधी कधी मी चिडून उत्तर दिले की त्यांच्या चेहऱ्यावर कुटील हास्य यायचे.
एक दिवस दुपारच्या वेळी मी घरी टीव्ही बघत बसलो होतो. तेवढ्यात काकू गप्पा मारण्यासाठी घरात आल्या.
“काय रे... आजून नाही लागली का तुला नोकरी?” त्यांनी प्रश्न केला.
“नाही अजून...” मी म्हटले. तेवढ्यात आई स्वयंपाकघरातून बाहेरच्या खोलीत आली.
“काय हो? तुम्ही काही बोलत नाही का याला? कायम घरात बसलेला असतो ते...” त्यांनी माझ्या आईला म्हटले. भयंकर संताप आला मला. पण काही करूही शकत नव्हतो. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा ते छद्मी हास्य आले.
“यात तुमचा दोष आहे.” काकूंनी आईकडे बघत म्हटले.
“माझा दोष?”
“होय... मुलं लहान असतानाच त्यांना भविष्यासाठी तयार करायचे असते. मी बघा बरं... पोरं लहान असतानाच त्यांना शिकवले. ‘पैसा आहे तर सगळे आहेत, पैसा नाही तर कुणी नाही.’ आज बघा माझी मोठी मुलगी गडगंज श्रीमंत आहे. मोठा मुलगा औरंगाबादला नामांकित कंपनीत खूप मोठ्या हुद्द्यावर आहे. लाखांमध्ये कमावतो. दुसरा मुलगा बँगलोरला कंपनीत डायरेक्टर आहे. त्याच्या हाताखाली शेकड्यांनी लोक काम करतात. महिना दीड लाख कमावतो. त्याची बायकोही नोकरी करते. तिचाही पगार लाखात आहे. आणि सगळ्यात लहान मुलगी, नोकरी करत नसली तरीही अंगावर अडीच तीन लाखांचं सोनं घालते. माझ्या मुलांपैकी प्रत्येक जण आज यशस्वी आहे.” त्यांनी सांगितले.
“अरे वा... छानच.” माझी आई म्हणाली.
“तुम्ही तुमच्या मुलांना पैशाचं महत्व सांगितलं नाही म्हणून आज ते घरी बसले आहेत.” काकू म्हणाल्या.
“होय... बरोबर आहे. मी माझ्या मुलांना पैशाचं महत्व पटवून दिलं नाही पण नाती कशी जपावीत हे सांगण्याचा आवर्जून प्रयत्न केलाय. आणि मला खात्री आहे, आम्हाला आमच्या उतारवयात कधीही एकटं राहण्याची वेळ येणार नाही.” आई म्हणाली तशा काकू दरवाजाच्या दिशेने निघाल्या. दारातून बाहेर पडल्या आणि एकाएकी मागे वळल्या.
“आम्ही आमच्या मर्जीने एकटे राहतोय हो... आमच्या पोरांनी नाही आम्हाला बाहेर काढलं. आणि जरी काढलं तरी सगळ्या कामासाठी बाई लावण्याची ऐपत आहे माझ्या नवऱ्याची.” काहीशा गुश्शातच त्यांनी सुनावले आणि त्यांच्या घरात प्रवेश करत जोरात दार बंद करून घेतले.
“आई... आज चक्क तू सुद्धा?” मी काहीसे हसत आईला म्हटले तसे आईच्या चेहऱ्यावर स्मित आले.
“मग काय करणार? माणसाने ऐकून तरी किती घ्यायचे? आज त्यांचे हातपाय धड आहेत म्हणून ही मिजास आहे. पण उद्या हातपाय थकल्यावर यांना नाती आठवतील आणि त्यावेळी त्यांना समजेल, मुलांना फक्त व्यवहारी बनवणे म्हणजे संस्कार नव्हेत. पैसा महत्वाचा आहेच पण त्यापेक्षा महत्वाची नाती असतात. आणि नात्यांपेक्षाही जास्त महत्वाचे असते तुमचे आचरण.” आईने सांगितले.
तेवढ्यात दारावर टकटक झाली आणि आठवणींची लिंक तुटली.
“मिलिंद... गाडी आली आहे.” काकांनी म्हटले आणि मी घाईतच काकांच्या घरात प्रवेश केला. अर्थात मला काहीच करावे लागले नाही. अँब्युलन्ससोबत जे दोन जण आले होते त्यांनी काकूंना चादरीसकट उचलले आणि गाडीत नेऊन झोपवले. तोपर्यंत बिल्डिंग मधील इतरही अनेक जण अँब्युलन्सभोवती गोळा झाले होते. काकूंचे जसे माझ्याकडे लक्ष गेले त्यांनी मला जवळ बोलावले. तसा मी खूप काही हळवा माणूस नाहीये. पण काकूंचा तो अवतार मला बघवला नाही. त्यांच्या डोळ्यातून पाणी वहात होते.
“तुम्ही काही काळजी करू नका काकू... तिथे तुमची काळजी जास्त चांगल्याप्रकारे घेतली जाईल. आणि एकदा थोडे बरे वाटू लागले की परत याल इथे.” मी नजर फिरवत म्हटले.
“नाही रे... मला नाही वाटत मी आता इथे परत येईन. आज तुझ्या आईची खूप आठवण येते आहे. तुझ्या वडिलांची काळजी घे. तशी तू घेशीलच म्हणा. तुझ्या आईने तुम्हा मुलांना तशी शिकवणच दिली आहे. आणि हो... तिथे भेटायला येत जा. आपली माणसं जवळ असतील तर बरं वाटतं.” त्यांनी म्हटले.
“नक्कीच काकू... माझा नंबरही तिथे देऊन ठेवा. आणि कधीही वाटलं तर मला फोन करा, अर्ध्या तासात मी किंवा मकरंद तिथे हजर असू.” मी म्हटले. तेवढ्यात काकूंचे सगळे समान बरोबर घेऊन काकांसोबत त्यांची लहान मुलगी घराला कुलूप लावून खाली आले आणि अँब्युलन्समध्ये बसले. ते दोघेही बसल्याबरोबर ड्रायव्हरने अँब्युलन्सचा दरवाजा लावून घेतला आणि चिरपरिचित भोंगा वाजवत अँब्युलन्स नजरेआड झाली.
मी माघारी वळलो त्यावेळी मनात फक्त एकच विचार होता. याला दैवगती म्हणावे की कर्मभोग? चार गडगंज श्रीमंत मुलांची आई आज केअर सेंटरमध्ये दाखल होत होती आणि चारपैकी फक्त १ मुलगी त्यांच्या सोबत होती. खरंच का पैसा इतका महत्वाचा आहे की ज्यापुढे नाती खुजी ठरतील? आणि जीवनाच्या संध्याकाळी मुबलक पैसा जवळ असूनही काका काकू यशस्वी की अयशस्वी?

- मिलिंद जोशी, नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...