तू हो पुढं सामान घेऊन, मी येतोच गाडी पार्क करुन.आधीच ट्रँफिकमुळे उशीर झालाय, किती नंबर प्लँटफार्मवर गाडी लागतीय. याची परत एकदा खात्री करुन घे. मी आलोच गाडी लावून. नवऱ्याच्या सुचना ऐकता ऐकता तिने पर्स खांद्यावर लटकवली. ट्राँली बँगचे बटन दाबून हँडल खेचून झपझप स्टेशनच्या दिशेने चालायला लागली. मोबाईल वर एकदा मेसेज बाँक्स ओपन करुन प्लँटफार्मची नंबरची खात्री करुन घेत तिने मोबाईल पर्समध्ये टाकून दिला. दोन दिशेने फरफरणारी ओढणीची टोकं एका हातात धरुन ती चटचट पावलं वाजवत चालू लागली. लग्नासाठी निघालेली, त्यामुळे बँग चांगलीच जड झाली होती. सरकत्या जिन्यावर मोठी बँग टाकत हँडबँग आणि खांद्यावरची पर्स सावरत गाडी प्लँटफार्मवर लागली असल्याचा अंदाज घेत होती. तिचीच ट्रेन प्लँटफार्मवर उभी होती. मिळते की नाही या विचाराने तिचा चालण्याचा वेग वाढत होता. आत्ता या क्षणी फक्त गाडी आणि आपलं गाडीत चढणं इतकंच भान तिला उरलं होतं आणि ती शेवटीची पायरी उतरता उतरता गाडीची शिटी आणि गार्डच्या शिटीने ती वेगात समोरच्याच बोगीपाशी गेली.
तो दाराशी उभा होता, दोन हात डब्याच्या हँडलवर ठेवून गाडी सुटायची वाट बघत होता तिची लगबग त्याने क्षणात हेरली. डब्याच्या पायरीवरुन खाली उतरत त्याने तिची बँग पटकन पुढं होऊन हातात घेतली आणि दारातून आत सरकवली. हातातली हँडबँग तिने चालता चालता आत टाकली. खांद्यावर जडावलेल्या पर्समुळे तिचा खांदा भरुन आला होता. हात मोकळा होता क्षणी पर्स हातात घेण्याचा प्रयत्न केला, पण नेमकी ओढणी त्यात गुंतली. गाडी हलकासा धक्का देत सुरु झाली होती. त्याने ओढणी सहित तिची पर्स हातात घेत तिला आत डब्यात लोटले आणि तिला कव्हर करत बोगीचे एक हँडल धरत आत चढता झाला. काही क्षणात खुप काही घडून गेलं. ती घाबरली, गोंधळलेली होती. धपापत्या उराने तिने आपण बोगीत सामानासहित चढल्याची खात्री करुन घेतली. पोहचायला उशीर झाला होता याची तिला कल्पना होतीच. पण इतकं हातघाईवर येण्याइतका झाला असेल,असं काही तिला वाटलं नव्हतं. तो ही शांतपणे आपण काय अन् किती धाडस केलं हे क्षणभर आठवत राहिला.
दोघांच्या मध्ये बँगा. अन् त्या अरुंद आडव्या पँसेजमध्ये दोन अनोळखी माणसं समोरासमोर उभी होती. तो पटकन सावध झाला. रिलँक्स हो जाईए. आप सुरक्षित है. लंबी सांस लिजिये. त्याने तिला रिलँक्स करायचा प्रयत्न केला. तिची पर्स आणि त्यात अडकलेली ओढणी त्याने तिच्या पुढे धरली. अनवधानात किती अस्तावस्त झालो आपण. तिने पटकन ओढणी भोवती गुंडाळली. तो शांतपणे तिला म्हणाला, "जल्दबाजी मे हो जाता ऐसा कभी. आपको आपकी बोगी और बर्थ नंबर पता है ना?" तिला पटकन आठवेना तिकीट/मोबाईल कोणत्या कप्प्यात टाकले आहे ते. पर्समध्ये हात घालून ती धुंडाळू लागली. आपके तिकीट पर देख लेना. वर्ना मेसेज देख लेना.
हो हो. बघते बघते. आपण दारात उभे आहोत या जाणीवेनी ती खजील होत म्हणाली. मगाशी वाचलेला मेसेज तिला काही केल्या आठवेना. आराम से काम लो. तो शांतपणे तिला म्हणाला. तिचा उडालेला गोंधळ तिच्या चेहऱ्यावरुन वहात होता. देख लेना. तो हिंदी भाषिक असावा. ती थोडी भानावर आल्याक्षणी तिला जाणवलं. तिने त्याच्या पुढेच मेसेज धरला. अगली बोगी है मँम. चलिये मै आपको आपके बर्थ तक छोड देता हूं.
नाही नको असले कसलेही आढेवेढे न घेता ती त्याच्या मागे चालती झाली. इतक्यात मोबाईल वाजला. गाडी मिळालीय. थोड्या वेळाने करते फोन. तिने नवऱ्याला सांगून मोबाईल बंद केला. त्याने तिला तिच्या बर्थपाशी आणून सोडले. बँग व्यवस्थित खाली लावून दिली. काफी भारी है मँडम आपकी बँग.
हां शादी के लिये जो जा रही हूं ना. ती पहिल्यांदाच एक मोठं पुर्ण वाक्य बोलली. कहां तक का सफर है आपका? तिने उतरायचं ठिकाण सांगितलं. कोई बात नही. मै उसके आगे जानेवाला हूं. मदद के लिये मै रहुंगा. आप आराम किजिये अब..तो त्याच्या बोगीच्या दिशेने चालता झाला. तिला एकदम एकटं वाटलं. अवघ्या पाच सात मिनिटात कुठलाही ओळखीचा धागा नसताना. त्याने तिच्यासाठी जे केलं. ते आठवताना. ती मनाशीच वैतागली. कुणाचे काय ऋणानुबंध असतात काय ठाऊक ध्यानीमनी नसताना ते बंध असे त्या वेळेपुरते भोवती येतात आणि विरुन देखील जातात. आता ती पुर्ण रिलँक्स झाली होती. घरी फोन करुन तिने प्रवास व्यवस्थित सुरु असल्याचे सांगितले.भाऊ भावजयेला गाडी वेळेत आहे, सकाळी पोहचते सांगून तिने झोपायचा प्रयत्न केला. काही सेकंदाने गाडी मिळाली. कदाचित तो नसता तिथं तर इतकं सामान घेऊन आपण चढुच शकलो नसतो. केलेल्या मदतीचा तो काही गैरफायदा तर नाही घेणार ना. तिचं स्त्रीसुलभ मन कातरलं. आपण मुर्खासारखे लग्नाला जातोय हे बोलून बसलोत. तिने खाली वाकून बँगेचे कुलूप चाचपडले. पर्स अगदी छातीशी धरुन ती झोपायचा प्रयत्न करु लागली. आजुबाजुच्या पँसेंजर्सची रात्र सुरु झाली होती. बसून राहण्यापेक्षा माणसं आडवं होऊन मोबाईल मध्ये घुसणं जास्त पसंद करतात. तिने ही तेच केलं. कधीतरी तिला झोप लागून गेली.
मँडम उठीए आपका स्टेशन आनेवाला है. तो तिच्या पायापाशी येऊन तिला हाक मारत होता. ती खडबडून जागी झाली.बापरे. काय झोप लागावी. काय विचार करत असेल हा माणुस आपल्याबद्दल. निष्काळजीपणाचा कहरच झाला आपल्याकडून. तिने स्वतःला व्यवस्थित करुन रजयीतून अंग बाहेर काढलं. विस्कटलेले केस क्लचर मध्ये बांधले. अगले दस मिनिट मे आपका स्टेशन आयेगा. आप फ्रेश होकर आईये. मै आपका बँग दरवाजे तक पहुचां देता हूं. ती पटकन तोंडावर पाणी मारुन आली.
रहने दो. भैया भाभी आनेवाले है स्टेशन पर. आपको क्यों तकलिफ दूं? ठिक है म्हणत तो तिच्या बर्थवर बसला. कुठे कशासाठी असली जुजबी चौकशी होईपर्यत गाडीचा स्पीड कमी झाला. तिने बँगेचा हँडल ओढत बँग दारापाशी नेण्याचा प्रयत्न केला. टू टायरचे केबिनदार उघडायला तो पटकन पुढं आला. बिलकुल दो मिनिट का हाँल्ट है यहांपर. त्याने तिला सावध केलं. तिने हसून होकार भरला. गाडी थांबली तरी अजुन प्लँटफार्मवर दादा वहिनाचा पत्ता नव्हता. तिने दारातून आजुबाजुला नजर टाकली. पण छे दोघं नुकतेच प्रवेशद्वारातून आत येत होते. तो दारापाशी होताच. ती उतरताच त्याने तिची बँग, हँडबँग पटकन खाली ठेवली आणि तो गाडीत चढुन गेला. दादा जवळ पोहचेपर्यंत गाडी सुरू ही झाली. तो दारातून तिच्याकडे बघत होता. ती देखील कालपासून त्याने तिच्या नकळत तिच्यासाठी केलेल्या गोष्टीत गुंतून गेली. अरेच्या त्या व्यक्तीला साधे धन्यवाद ही नाही दिले आपण. साधं नावगाव ही नाही विचारले आपण, उलट त्याच्याबद्दल साशंक झालो. तिला एकदम अपराध्यासारखे वाटले. प्लँटफार्म संपत आलेल्या बोगीच्या दारातून तो अजूनही तिच्याकडे बघत उभा होता. तिचा हात तिच्या नकळत उंचावला गेला. लांब गेलेला त्याचा चेहरा नक्कीच सुखावला असणार. पण तिला तो चेहरा दिसला नाही. प्रतिसाद देणारा त्याचा हालता हात मात्र दिसला.
कोण भेटलं बाई तुला ओळखीचं गाडीत? दादाने विचारताच ती उसासली. कोण होता कोणास ठाऊक. पण कोणता तरी जुना ऋणानुबंध नक्कीच असणार. त्याशिवाय उगीचच का कोण इतकी निर्हेतूक मदत करेल. आत्मियता दाखवेल. खुप अनोळखी चेहऱ्यातही खुपदा ओळख लपलेली असते. फक्त आपल्याला तिचा साक्षात्कार उशीरा होतो इतकंच !
@सौ. विदुला जोगळेकर,
डॉ. सुनील इनामदार, संग्रहक,९८२३०३४४३४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा