गुरुवार, १४ मार्च, २०२४

952. शेंदरीमूर्ती

  "आता डोळ्यात सारखं पाणी येऊ द्यायचं नाही, भोग म्हणत पुढे चाललं कि सोपं जातं स्वीकारणं. चला मागच्या खोलीतल राहिलेलं सामान बांधून घेऊ. अजूच्या, सूनबाईच्या आठवणी सगळ्या देऊन टाकल्या ना मावशीबाईंना. नकोच ते काही डोळ्यासमोर. खरं अशी काय वाईट कर्म केले होते आपण म्हणून हे दिवस आले. एवढं बोलुन नारायणरावही धोतऱ्याच्या सोग्याला डोळे पुसू लागले तश्या नलिनीबाई लगबग उठत त्यांच्या जवळ गेल्या आणि म्हणाल्या, "अहो मला म्हणता रडू नको आणि आता स्वतःच चला सावरा स्वतःला, तेवढं तरी बरं घराला चांगली किंमत आली. पण काही म्हणा घर विकावं वाटत नाही ए हं."
    नारायणराव रडणं थांबवत म्हणाले,"काय करू शकतो ग या वयात आपण. त्या हॉस्पिटलशी चांगल्या ओळखी म्हणून बिलं तरी थांबवली दोन महिन्यासाठी. घरासाठी गिऱ्हाईक बघायला वेळ तरी मिळाला. हो नाही करत आपण म्हंटलेल्या रकमेवर तयारही आहे समोरची पार्टी. मिळालेल्या रकमेतून ऐंशी टक्के रक्कम सगळी देणी होतील. उरलेल्या पैशात जगायचं आहे आपल्याला.
    "होईल हो सगळं नीट गणपती बाप्पा बघेल ना. आता मात्र नारायणराव जोरात हसायला लागले. "अजुनही तुझा गणपती बघणार का आपल्याला? अग हट्टाने मागच्या अंगणात त्याच छोटं देऊळ बांधलं. किती थाट केला त्याचा अगदी दुरून दुरून लोकं येतात सगळ्यांचे नवस पूर्ण होतात आणि आज त्याला सोडून जायची वेळ आली तरी तुला अजून वाटतं तो आहे म्हणून. तुझ्या अंधळ्या श्रद्धेला काय करू मी ?? अग 50 वर्षाचा मुलगा आपला गेलाय. सगळं त्याच कुटुंब अपघातात गेलं आणि जाताना त्यांचा हॉस्पिटलचा खर्चच भागवून आपण रस्त्यावर आलोय. तो काय बघेल आपल्याला. जाऊ दे मला फार बोलायचं नाही आता या विषयावर. तुला त्याच्यासाठी चतुर्थीचे मोदक करायचेत ते कर आणि चल सामान बांध. जोशींनी ती तिसऱ्या मजल्यावरची पत्र्याची खोली रिकामी करून ठेवली आहे, कमी भाड्यात आता वरचीच खोली मिळणार ना."
   "धकवू कसं तरी, शेवटी त्याला काळजी. नलुबाईच्या ह्या वाक्यावर आता ते काहीच बोलले नाही.सामान बांधत बसले. हॉलमधले उंचावर लावलेले मुलगा,नातू आणि सुनेचे फोटो काढायचे बाकी होते. बंगला सामानसह विकला होता पण आपलं सामान तर न्यावंच लागणार होतं.
       छान मोदक बनवून नलुबाई मागच्या दराने मंदिरात गेल्या. दुर्वाची जुडी आणि लाल फुल त्या शेंदरी मूर्तीवर ठेवलं आणि त्यांना एकदम रडू फुटलं. आजपर्यंत तू होतास पाठीशी मग बळ येत गेलं सगळ्या संकटांना तोंड द्यायला.आता तुला सोडून जायची सुद्धा वेळ आली. आता कसं करू?? असे मूक प्रश्न मनातुन त्याच्याकडे बघून त्या बोलत होत्या. लग्नाच्या वेळी आजोबांनी हि मूर्ती हातात ठेवली होती आणि सांगितलं होतं हि देवघरात नाही तर देऊळ उभं करणारी मूर्ती आहे. मी पण म्हंटले मग घरच असं कर कि तुझं देऊळ पण उभं राहिल. खरंच लग्नानंतर वर्षभरात झालेली भरभराट. त्याने काही कमी पडू दिलं नाही. .मग आपणही त्याच्या थाटात,सेवेत खंड पडू दिला नाही.पण आज हि वेळ आली. हे सगळं विचारचक्र सुरू होतं आणि नारायणरावांनी हाक मारली,"नलू लवकर ये, माझा स्टूल पकड डगडगतोय. नलूबाईंनी धावत जाऊन स्टूल पकडला.फोटो काढण्यासाठी ते वर चढले होते. पहिले सुन मग नातू ह्यांचे फोटो काढले. तिसरा फोटो काढणार तेवढयात ब्रोकर गिऱ्हाईकाला घेऊन आला. नारायणराव खाली उतरले. नलुबाई पाणी घेऊन आल्या. आलेलं कुटुंब अगदी तरुण होतं. दोन गोड मुली आणि तीस पस्तिशीच ते जोडपं. .नारायणराव म्हणाले,"मला आज सगळे चेक मिळाले तर बरे होईल समोर लगेच द्यायचे आहेत. तेंव्हा त्या जोडप्यातली ती म्हणाली,"हो पण आमची अट आहे एक,रजिस्ट्री मध्ये मागची खोली आणि मंदिर तुमच्याच नावे ठेवू या.
   नारायणराव म्हणाले,..."नुसत्या ह्या तीन खोल्यांसाठी गिऱ्हाईक नकोच आहे मला कारण ह्याची किंमत माझं दवाखान्याचं बिल चुकवू शकत नाही. मी बोललो होतो ब्रोकरशी." तुम्ही कल्पना दिली ना ह्यांना म्हणून तर आज सौदा फायनल समजलो आपण. "ब्रोकरही जरा गडबडला. तेवढ्यात ते जोडपं बाहेर उठून गेलं .नलूबाई देवळाकडे बघत म्हणाल्या,"आता हे तरी जमू दे रे लोकांची देणी द्यायची आहेत. नको वाटतं ते उसनं जगणं. माघाशी त्यांनी वाहिलेलं फुल एकदम पडलं मूर्तीच्या डोक्यावरून. एरवी त्यानां आनंद व्हायचा कौल दिला म्हणायच्या पण आता .त्यांनी दुर्लक्षच केलं. आम्हाला तुला सोडून जायची वेळ आली आणि कौल कसले देतोस असं मनात त्या पुटपुटल्या.  ते जोडपं आत आलं,..सगळ्या रकमेचे चेक त्यांनी नारायणरावांपुढे धरले,..पण अट मात्र कायम आहे आमची, ते दोघे म्हणाले "तुम्ही मागच्या खोलीत राहा." नलुबाई म्हणाल्या,"पण का?"पैसे देताय मग कशासाठी हे??तेंव्हा त्या जोडप्यातली स्त्री म्हणाली, "ह्या फोटोतल्या सरांमुळे आज माझं घर होऊ शकतंय, आज आम्ही दोघे कमावते आहोत, पण मी जेंव्हा घरात आले आणि फोटो पहिला मला माझे जुने दिवस आठवले. मी फिस भरू शकत नव्हते म्हणून मला कोचिंग क्लास मध्ये येऊ देत नव्हते. मी चोरून खिडकीच्या अडून क्लास बघायचे तिथून सरांची गाडी जायची एक दिवस सरांनी ते बघितलं. ते त्या क्लासच्या मॅनेजरला बोलले सगळी फिस माझ्या डोळ्यासमोर भरली. माझ्या डोक्यावर हात ठेवला म्हणाले," खुप शिक मोठी हो...."मला परत कधी ते भेटले नाहीत. आज योग आला पण दुर्दैवाने फोटोत भेटले. मी खरंतर ऋणात आहे त्यांच्या पण मला संधी मिळते तर एवढं तेरी करू द्या. ती नलुबाईच्या गळ्यात पडली. सामान मागच्या खोलीत गेलं. नलुबाई देवळात आल्या. सोंडेमागून प्रसन्न हसणाऱ्या गणेशाला म्हणाल्या, "आयुष्याची दोरी प्रत्येकाची ठरलेली म्हणून लेक, सून गेल्याचे तुला बोल लावले नाही पण तुझ्या कर्तव्याला बोल लावले मी तुला सोडून जायची वेळ आली हे सांगितलं तर तू दाखवलासच तुझा चमत्कार. खरंच तू आहेसच विघ्नहर्ता. आयुष्यातलं दुःख विसरायला नवीन जगणं पुढ्यात आलं होतं. मूर्तीपुढे नलुबाईंनी दिवा लावला. .त्या प्रकाशात शेंदरी मूर्ती आणखीनच तेजस्वी दिसत होती !

©स्वप्ना मुळे(मायी)छ. संभाजीनगर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...