गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२५

1744. दृष्टिकोन आणि वास्तव

 काल परवा एक संदेश व्हॉट्स्ॲपवर पाहिला.  एका लाकडी फळीवर ४/५ वाकडे खिळे होते आणि एक खिळा सरळ होता. जो सरळ खिळा होता त्यावर हातोडीचा दणका मारताना दाखवले होते आणि खाली लिहिले होते.
 "वाकड्यांना सोडून जे सरळ असतात त्यांनाच ठोकले जाते."
हे वाचले व मनात विचार आला हे खिळे जन्मतःच  वाकडे असतील का?  मग मी एका हार्डवेअरच्या दुकानात जाऊन १०० ग्रॅम खिळे घेतले ते सगळेच सरळ होते. 
मी दुकानदारास विचारले,  "भाऊ, वाकडे खिळे नाहीत का?" 
त्याचे उत्तर, "दादा, कारखान्यातून सर्वच खिळे सरळ येतात. फक्त हातोडीचा चुकीचा दणका किंवा खिळ्याची प्रहार सहन करण्याची क्षमता कमी असल्याने हे खिळे वाकतात." 
मग मी विचारले की, "मग ह्या वाकड्या खिळ्यांचे करायचे काय?"
तर तो सहजतेने बोलला,  
"साहेब, यांना पहिले जमिनीवर आणा. मग हातोडीने हळूहळू सरळ करा. जोरात घाव घालू नका, ते तुटतील बिचारे. एकदा सरळ झाले की मग त्यांना परत हळूहळू भिंतीत ठोका.  एकदा जर त्याचा वाकडा भाग भिंतीत गेला की मग हाच अर्धा ग्रॅमचा खिळा १० किलो वजन धरुन ठेवेल." परंतु तसे न करता तुम्ही त्याची जबाबदारी दुसऱ्यावर सोपवता व त्याला खुशाल मोकळे सोडता ( फेकून देता ). बरं, फेकल्यावरसुद्धा तो खिळा काय करतो? तर
चालती गाडी पंक्चर करणे, चालणा-याच्या पायास रुतून जखम करणे असे उपदव्याप करतो. 
     त्या अशिक्षिताने माझे डोळे उघडले आणि कोणताच खिळा हा जन्मतः वाकडा नसतो.  त्याच्यावर योग्य संस्कार न झाल्याने तो वाकतो आणि जर आपण त्याला तसेच फेकून दिले तर त्यापासून चांगल्या चांगल्या गाड्या पंक्चर होऊ शकतात. ही गोष्ट मन्युष्य जातीलासुद्धा लागू होते. म्हणून त्याला प्रेमाने सरळ करा व जबाबदारी द्या तो निश्चितच निभावेल ही जाण मला झाली. दृष्टीकोन बदलला आणि वास्तवाची जाणीव आली.

1743. थोडा अंधार हवा आहे

    हल्ली सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठला असेल तर तो म्हणजे कधी अंधारच होत नाही. सगळीकडे इन्व्हर्टर असतात आणि अगदीच नसले तरी लोकं दुसऱ्या सेकंदाला मोबाईलचा लाईट लावतात आणि अंधार घालवतात.  त्यामुळे दुसऱ्या क्षणी तुम्हाला तुमच्या पुढचं, आजूबाजूचं दिसू लागतं. पण तिथेच खरा प्रॉब्लेम आहे.
      मला आठवतं आहे, आमच्या लहानपणी इन्व्हर्टर, मोबाईल नव्हते. मेणबत्त्या, कंदील हे ऑपशन्स होते. पण कधी रात्री लाईट गेले तर दुसऱ्या सेकंदाला आजीचा आवाज यायचा. "कोणीही जागचे हलू नका. आहे त्या जागेवर बसून आपापले डोळे २ मिनिटे घट्ट बंद करा आणि आम्ही डोळे घट्ट मिटायचो. मग २ मिनिटांनी आजीचा आवाज यायचा. आता हळूहळू डोळे उघडा आणि आपोआप अंधारात दिसू लागेल. आणि खरंच मगास पेक्षा आता थोडं दिसू लागलं असायचं. मला अजूनही याचं अप्रूप आहे. मुळात अंधारात असताना डोळे का मिटायचे, त्याने काय होणार पण डोळे मिटून उघडले की दिसू लागायचं हे खरं. मला वाटतं की जुन्या पिढीला हीच सवय होती कि अंधारात असलो की अजून घट्ट डोळे मिटून आत डोकावायचे. स्वतःचे डोह धुंडाळायचे. आपल्या जाणिवा, नेणिवाचे झरे मोकळे करायचे आणि मग वाटा स्पष्ट होत असाव्यात / दिसत असाव्यात आणि आपणच शोधलेली आपली वाट असेल तर मग ती सुकर होते, त्याचं ओझं होत नाही आणि त्या वाटेवरचा प्रवास समाधान देणारा असतो.
      माझ्या आजोबांचा पण लाईट गेले की एक आवडता डायलॉग होता. "अंधारात रस्ता दिसतो आणि उजेडात फक्त खड्डे दिसतात. दिवे येई पर्यंत तुमचे रस्ते शोधा." लहानपणी मला हा विनोद वाटायचा पण हल्ली आजोबा आठवतात, त्यांचं वाक्य आठवतं आणि आता कुठे त्याचा अर्थ ६० वर्षांनी थोडाफार कळतो. स्वतःच्या तरुणपणी परिस्थितीच्या अंधारात त्यांनी कष्ट सोसले, वार लावून जेवले, शिकले, नोकरी केली, आपला रस्ता शोधला . स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मुलांना इंजिनिअर केलं, त्याची फळं आम्ही उपभोगतोय. कधी नव्हे तर परवा खूप वेळ लाईट गेले, इन्व्हर्टर बंद पडला तर किती चिडचिड. डेटाचा स्पीड थोडा कमी झाला आणि लॅग आला तर त्रागा. पिझ्झा अर्ध्यातासात डिलिव्हर नाही झाला तर फ्री ची मागणी. उजेडात फक्त  खड्डे दिसतात हेच खरं.
     पण हल्ली अंधारच होत नाही. मुळात अंधारच माहित नाही. आजूबाजूला सारखा लाईट असतो पण तो एनलायटन करू शकत नाही आणि डोळेच कघी न मिटल्यामुळे आत डोकावायची वेळच येत नाही. इन्व्हर्टर / मोबाईलच्या लाईटने आजूबाजूचं दिसतं आणि फक्त आजूबाजूचं दिसलं तर फक्त स्पर्धा वाढते. पण वाट काही सापडत नाही. वाट सापडायची असेल तर आत डोकावता आलं पाहिजे. आपापले डोह धुंडाळता आले पाहिजेत.  अंधारात तळाशी पोहोचणं सोपं होतं असावं. म्हणून अधून मधून थोडा मिट्ट अंधार हवा आहे.

1742. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला

 प्रिय सखी,
     आज तिसरा दिवस. खरं तर तुला भेटायला येताना काळजावर दगड ठेऊनच आले होते. हर्षद गेला तेव्हा मी बाहेरगावी होते. जेव्हा समजलं तेव्हा थोडा धक्का बसला. पण हे अपेक्षित होतंच. नाही का? एक स्वार्थी मन असंही म्हणालं..चला..!! किमान तुझी तरी सुटका झाली..! पण दुसऱ्याच क्षणी आठवण झाली. तुझ्या हर्षदवरच्या प्रेमाची. किती तरी वेळा तुझ्या माहेरच्यांनी देखील तुला सांगितलं होतं, की बस्स आता ! किती सहन करणार आहेस. सोड त्याला. तू शांतपणे सगळं ऐकून घ्यायचीस. तुला कळत होतं. हर्षदचं चुकतंय. त्याचं अति प्रमाणात दारु पिणं. तु किंवा तुझ्या सासूबाई काही बोलल्याच तर पूर्वी फक्त चिडून बोलणारा हर्षद हल्ली आरडा-ओरड करण्यापर्यंत तर कधी अगदी हात उगरण्यापर्यंत पोहचला होता. तो यातून बाहेर पडावा यासाठी किती प्रयत्न केलेस तू.. खूप सहनही केलंस.. पण कधी त्याच्यापासून दूर गेली नाहीस..! मला आठवतं.. त्याचं दुखणं वाढत गेल्यावर एकदा तू माझ्याकडे आली होतीस.. माझ्या गळ्यात पडून खूप-खूप रडली होतीस.. जीवाच्या आकांताने म्हणत होतीस, “मला हवाय गं तो.. खूप खूप हवाय.. तो नशेत माझ्याशी चुकीचा वागतो म्हणून मी पूर्ण शुध्दीवर असताना त्याच्यापासून दूर नाही जाऊ शकत.. कसाही असू देत.. अगदी अंथरुणावर झोपून असला तरी चालेल.. पण मला हवा आहे तो..!!” आपण सर्वांनी कमी प्रयत्न केले  का गं.. पण नाहीच आलं यश..!
      हा निव्वळ योगायोग असावा का, की हर्षद लहान असतानाच तुझे सासरे देखील असेच गेले. तुझ्या सासूबाईंनी एकटीने त्याला लहानाचा मोठा केला. कडक शिस्तीत शिकवला. स्वत:च्या पायावर त्याला उभं केलं. नवऱ्याच्या बाबतीत जे झालं ते मुलाच्या बाबतीत होऊ नये म्हणून पराकोटीचे प्रयत्न केले. पण शेवटी वळणाचं पाणी वळणावरच गेलं. सखे, मला आठवतं. मागे मी एकदा तुझ्या घरी आले होते, तेव्हा तुझ्या आजेसासू मला म्हणाल्या, “माझी नातसून चांगली आहे. नेटाने संसार करतेय. माझ्या सूनेने मात्र मुलाला खाल्लं..!” इतिहासाची पुनरावृत्ती होणार. हेच वाक्य आता तुझी सासू तुझ्याबद्दल बोलेल की काय या विचाराने माझ्या अंगावर काटा आला होता. तुझ्या काळजीने मन तुझ्याकडे ओढ घेत होतं. पण तुला पांढऱ्या कपाळाने, बिगर मंगळसूत्राचं पहावं लागेल या विचाराने पाय दगड झाले होते. 
      मार्गशीर्ष महिन्याचं हळदी-कुंकू करायचं म्हणून आपण आवर्जून बाजारात गेलो होतो. तू मोठ्या हौसेने काचेच्या हिरव्या बांगड्या घातल्या होत्यास. मी तुला काकूबाई म्हणून चिडवत असून सुध्दा तू त्याकडे दूर्लक्ष करत हसत म्हणालीस, “असू देत.. आहे मी काकूबाई ! पण मला आवडतं असं सौभाग्याचं लेणं. हिरवी साडी, हिरव्या बांगड्या, नाकात नथ, कपाळावर ठळक चंद्रकोर. मला शक्य झालं तर रोजसुध्दा एवढी नटेन मी.” त्याच बांगड्या फोडून सुना केलेला हात कसा बघायचा. तुझं कसं सांत्वन करायचं यासाठी शब्दांची जुळवाजुळव करतच मी तुझ्या घरी पोहचले. तुझ्या सासूबाई बाहेरच बसल्या होत्या. मला बघून हंबरडाच फोडला त्यांनी. किती आठवणी. किती अपेक्षा. किती सुख-दु:ख. काय-काय नसेल आठवत त्या माऊलीला. जाणाऱ्या माणसाचं बरं असतं. सगळ्या त्रासातून सुटका करुन घेतो तो. सहन करावं लागतं ते मागे राहणाऱ्यांना. हतबल. हताश होऊन..! जाणारा जातो. मागच्याने कितीही आवाज दिला तरी परत न येण्यासाठी..! 
     दु:खाचा आवेग थोडा कमी झाल्यावर त्या मला तुझ्याकडे घेऊन येऊ लागल्या. फार कष्टाने एक-एक पाऊल उचलत होते. समोरचं सगळंच धूसर होत होतं. नाही. मी तुला विधवेच्या रुपात नाही पाहू शकत. माझी सखी..विधवा..नाही.. नाही.. हे शक्य नाही.. तुझ्या खोलीत आले. तू समोर बसली होतीस. मोठं वादळ यावं आणि त्यात सगळं काही नष्ट व्हावं. त्यानंतरचं जे चित्र असेल तशी काहीसी दिसलीस तू मला. मी दिसताच धावत येऊन तू मला बिलगलीस.  पण.. पण तुझ्या कपाळावर तेच भलं मोठं कुंकू होतं. होय…खरंय.. मला भास होत होता का.. मी डोळे नीट पुसले आणि पुन्हा तुझ्याकडे पाहिलं. होय कुंकू आहे. हातात आपण भरलेल्या त्या हिरव्या बांगड्याही तशाच आहेत. गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवी. सगळं सगळं आहे. माझ्या डोळ्यातले प्रश्न तुझ्या सासूबाईंना कळले असावेत. त्या म्हणाल्या, "माझा मुलगा नालायक निघाला यात माझ्या सूनेची काय चूक? जे दु:ख मी भोगलं ते तिच्या वाट्याला कधीच नाही येणार. कुणी काही म्हणू देत. मी नाही पुसू देणार तिला कपाळावरचं कुंकू. विधवेचं जिणं जगणार नाही ती ! नवरा गेला म्हणून तिच्या आयुष्यातून रंग कधीच हद्दपार नाही होणार. ती जशी त्याची बायको होती तशी माझी सून आहे. अर्णवची आई आहे आणि मूळात ती "ती" आहे. तिला स्वत:चं अस्तित्व आहे. ते असं पुसणार नाही."
     सखे, हर्षदच्या जाण्यापेक्षाही जास्त तुझ्या भविष्याविषयी जी काळजी वाटत होती ती सगळी काळजी. सगळी चिंता मिटली. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेतेय..! आता मी निर्धास्त आहे.

 © Madhuri Ivare Pawar

1741. गा प्रकाशगीत

      परवाच्या दिवशी एक सुंदर व्हिडिओ पाहण्यात आला. त्या व्हिडिओत दोन माणसे बोलताना दाखवली होती. त्या व्यक्तींची नावे त्यात दाखवली नाहीत. पण मला तो व्हिडिओ फार आवडला. जीवनाचे सत्य तो सांगून जातो. त्यातील एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे बहुधा डेव्हिड शॅड्स ( David Shands )असावा. तो दुसऱ्या एका तरुण व्यक्तीशी बोलत होता. झाडांवरून त्यांची चर्चा सुरू होती. डेव्हिड त्या तरुणाला म्हणत होता," तुला माहिती आहे का झाडांची वाढ दोन दिशेने होत असते? जमिनीच्या वरच्या बाजूला आणि जमिनीच्या खाली सुद्धा. "
तो तरुण आश्चर्यचकित होऊन ऐकत होता. खरंतर झाडे जेवढी जमिनीवर वाढतात तेवढीच ती जमिनीखाली देखील वाढतात हे सत्य मला माहीत नव्हते असे नाही. पण तो व्हिडिओ पाहिल्यानंतर ती गोष्ट मला अधिक तीव्रतेने जाणवली कारण यापूर्वी मी तसा विचारच केला नव्हता. मग झाडांबद्दल बोलताना डेव्हिड केवळ झाडांबद्दलच नव्हे तर जीवनाचे सत्यही उलगडू लागला. तो म्हणाला," आपल्याला सर्वांना जमिनीच्या वर वाढणारे झाड दिसते, त्याला येणारी फळे फुले दिसतात. आपण आनंदीत होतो आपल्याला फळे देणारा वृक्षच माहिती असतो. पण ही फळे किंवा फुले देणारा वृक्ष स्वतःला जमिनीत गाडून घेतो तेव्हाच आपल्याला तो फळे किंवा फुले देऊ शकतो. 
झाडांच्या या दोन दिशेने होणाऱ्या वाढीसाठी त्यांनी दोन शास्त्रीय शब्द वापरले. त्यातील एक होता Gravitropic तर तर दुसरा शब्द होता Phototropic. पहिल्या शब्दाचा अर्थ म्हणजेच जमिनीच्या खाली गुरुत्वाकर्षणाचा सामना करत वाढणारा झाडाचा भाग आणि दुसऱ्या शब्दाचा अर्थ म्हणजे जमिनीचे वर सूर्यप्रकाशात वाढणारा झाडाचा भाग. आपल्या सगळ्यांना हा जमिनीच्या वर वाढणारा झाडाचा भाग दिसतो झाड हळूहळू मोठे होत जाते त्याला फुले फळे येऊ लागतात. डेव्हिड म्हणतो, " Fruit system is very similar to the route system. " जेवढे झाड वर वाढते आणि पसरते तेवढेच त्याला जमिनीखाली देखील वाढावे आणि पसरावे लागते. झाडाचे बी जमीन भेदून एकदा वर आले की मग त्याला विरोधाचा सामना करावा लागत नाही. आता त्याचा सामना वेगळ्या गोष्टींशी असतो म्हणजे ऊन, वारा, वादळे, पाऊस यासारख्या नैसर्गिक गोष्टींशी. पण त्याच वृक्षाच्या मुळांना जमिनीखाली वाढताना मात्र अनेक प्रकारच्या विरोधाचा सामना करावा लागतो. जमीन कठीण असू शकते, खाली कठीण असा खडक असू शकतो, अंधार तर असतोच. ओलावा असेल किंवा नसेल. पण जमिनीखाली वाढताना मुळांना या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो, अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. जमिनीच्या वर वाढायचे असेल, आपला विकास करून घ्यायचा असेल तर या सगळ्या अडचणींना तोंड द्यावेच लागते. त्यासाठी जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असावी लागते. 
     फुले आणि फळे देणारे झाड सर्वांनाच आवडते. अशी झाडे सर्वांनाच हवी असतात. पण ही फुले फळे देण्यासाठी त्या वृक्षाने स्वतःला जे अंधारात गाडून घेतले, ते कोणाच्या लक्षात येत नाही. मानवी जीवनाला देखील ही गोष्ट लागू होते. आपल्याला जीवनामध्ये अनेक यशस्वी माणसे दिसतात. ती उच्च पदावर पोहोचलेली असतात, त्यांचा पैसा, त्यांचे ऐश्वर्य, त्यांचे दैदीप्यमान यश सर्वांनाच दिसते. आपल्यालाही आपण तसेच व्हावे असे वाटते. पण या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी जे कष्ट केलेले असतात, ते फार कमी लोकांच्या लक्षात येतात. वृक्षाचा जमिनीखाली अंधारात वाढणारा भाग लोकांना जसा दिसत नाही, तसेच यशस्वी लोकांनी यशस्वी होण्यासाठी घेतलेले कष्ट, त्यांनी केलेल्या अपयशाचा सामना, जीवनातील अनेक अडचणींना दिलेले तोंड याची फारशी दखल आपण घेतलेली नसते. 
     रात्रीच्या वेळी आकाशात लखलखणारे एखाद्या नक्षत्र आपले लक्ष वेधून घेते, आपल्याला आकर्षित करते. पण सभोवताली असणाऱ्या अंधाराचा भेद करून त्या नक्षत्राचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचलेला असतो. आपल्या भोवती असणाऱ्या अंधाराचा सामना त्या नक्षत्रालाही करावा लागतो, तेव्हाच त्याचे तेज जगाला दिसते. कोणत्याही महान व्यक्तीचे जीवन आपण पाहिले तर त्यांना या अंधाराचा अडचणींचा सामना करावा लागला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांना केवढ्या प्रचंड विरोधाचा आणि मानहानीचा सामना करावा लागला हे आपल्याला माहिती आहे. लालबहादूर शास्त्री, सर विश्वेश्वरय्या यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांना घरच्या अत्यंत कठीण आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला. विपरीत परिस्थिती असतानाही शिक्षण घ्यावे लागले. महर्षी कर्वे यांनी देखील अशाच विपरीत परिस्थितीत शिक्षण घेतले. पण या सगळ्यांनी आपण ज्या परिस्थितीत आणि समाजात वाढलो त्याची जाणीव ठेवून पुढे आपल्या परीने समाजाचे ऋण फेडले  
     संतांचे जीवन देखील यापेक्षा वेगळे नाही. संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना समाजाचा केवढा छळ सहन करावा लागला. संत तुकारामांना देखील लोक निंदेला तोंड द्यावे लागले. छत्रपती शिवाजी महाराजांनी तर आपले स्वराज्य अक्षरशः शून्यातून निर्माण केले. या सगळ्या महान व्यक्तिमत्त्वांनी अंधाराचा, संकटांचा, समस्यांचा सामना करण्याची इच्छाशक्ती दाखवली नसती तर जीवनात ते यशस्वी होऊ शकले नसते. आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांनीही अत्यंत विपरीत परिस्थितीत शिक्षण घेतले. प्रसंगी वर्तमानपत्र टाकण्याचे काम त्यांना करावे लागले पण शिकण्याची जिद्द त्यांनी सोडली नाही. त्यांचे वडील तर एक सामान्य नावाडी होते. नाव चालवताना वल्हे मारावे लागतात. शक्ती लावून त्या वल्ह्यांच्या सहाय्याने पाणी मागे सारावे लागते, तेव्हा कुठे नाव पुढे जाते. जीवनातही असेच वल्हे मारून कठीण परिस्थितीचे, समस्यांचे पाणी मागे सारावे लागते तेव्हा कुठे जीवनाची नाव यशाच्या दिशेने वाटचाल करायला लागते.
      सूर्यप्रकाशात फुललेल्या, फळलेल्या वृक्षाकडे आपली नजर जाते आणि ते साहजिक आहे. पण त्याने जमिनीखाली स्वतःला गाडून घेऊन अंधाराचा जो सामना केलेला असतो, त्याची जाणीव देखील ठेवणे आवश्यक आहे. हे रहस्य आपल्याला लक्षात आले तर जीवन जगण्याची एक नवीन दृष्टी आपल्याला मिळते. आपल्या जीवनातील अडचणींवर, संकटांवर मात करण्याची शक्ती मिळते. जयवंत कुळकर्णी यांनी गायलेले एक सुंदर गीत मला याप्रसंगी आठवते. ते म्हणतात 
अंधाराची खंत तू कशाला करिसी रे
 गा प्रकाश गीत.
     आपणही अंधाराची खंत न करता प्रकाश गीत गात जावं. मग आपलाही जीवनवृक्ष फळाफुलांनी बहरल्याशिवाय राहणार नाही.

 © विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

1740. भरलेल्या आभाळातली एक सोनेरी कडा

 "काहीही करा डाॅक्टर !  पण माझ्या मुलाला आणि नव-याला वाचवा हो. त्या दोघांशीवाय माझं काहीच नाहीये " म्हणत, वैदेही हुमसत - हुमसत डाॅक्टरांशी बोलत होती.
"हे बघा ताई !  आम्ही आमचे प्रयत्न करतच आहोत पण अपघात खुप मोठा झालाय आणि तुम्ही तर सगळं बघतच आहात." म्हणत डाॅक्टर हताशपणे तिथून निघून गेले. 
       वैदेही कितीतरी वेळ डाॅक्टरांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहातच बसली होती. हतबलता काय असते याचा जवळून अनुभव घेत वैदेही तीथल्याच एका खुर्चीवर मटकन बसली. समोरच असलेल्या आयसीयूच्या बाहेरून दिसणाऱ्या काचेकडे ती शुन्यात नजर लाऊन बसली होती. अचानक काहीतरी व्हावं आणि भयानक अपघातातून तिचा मुलगा आणि तिचा नवरा वाचावा एवढीच तिच्या मनाची हाक होती. दिवसांमागून दिवस जात होते. डाॅक्टरांचे प्रयत्न चालूच होते. आतापर्यंत सतत हाॅस्पीटलला येऊन नातेवाईकही आता कंटाळले होते, वैदेहीला सासू-सासरे नव्हते आणि बरेच नातेवाईक येऊन भेटून जात होते पण आपलं म्हणावं असं कोणी नव्हतं. वैदेहीचे आईवडील होते, त्यांनी तीला बराच आधारही दिला होता पण शेवटी त्यांनाही त्यांची कामं होतीच की, असं कीती दिवस ते तीला सोबत करणार होते म्हणून स्वतः वैदेहीनेच त्यांना जायला सांगितलं. आता सगळे खटाटोप ती स्वतः च करत होती शेवटी लोकांची मदत तीला कीती दिवस पुरणार होती?. सोबतीला कोणी नसूनही एक आई आणि एक बायको तिथे तग धरून होते. कोणा एकाचंही दु:ख तीला सहन होणारं नव्हतं. तिने अजूनही आशा सोडली नव्हती.
       एव्हाना पंधरा-सोळा दिवसात तिला हाॅस्पीटलमधलं आणि त्या बाहेरचंही बरंच काही माहित झालं होतं. ती संध्याकाळी थोड्या वेळासाठी हवापालट करायला हाॅस्पीटलच्या बाहेर यायची. तिथे जवळच बरीच बैठी घरं होती अाजूबाजूला बरीच झाडं असल्याने तिथे तिचं मन प्रसन्न व्हायचं. समोरच बसायलाही जागा असल्याने वैदेही तिथपर्यंत जात काही वेळ त्या जागी बसायची. तीचं मन तर भरलेलंच होतं पण आता रोज -रोज रडूनही काय होणार आणि तीच स्वत: खचली तर तीच्या नव-याला आणि मुलाला कोण बघणार म्हणत ती रोजच्या ह्या लढाईला लढण्यास सज्ज व्हायची. वैदेही तीच्या भावनांमधे गुंतली होती. तितक्यात अगदीच कर्कश्य आवाजात परत 'तेच' सगळं सुरू झालं.
"कशाला जनमलास रं तू,..मरत का न्हाईस ? आईबापाला खाल्लंस अन् हितं येऊन मामालाबी गिळलास अपशकूनी कुठला" म्हणत, समोरच्या एका बैठे घरातून ती बाई रोज त्या मुलाला मारायची. मुलगा साधारण आठ वर्षाचा होता. आतापर्यंत तिथल्या लोकांच्या बोलण्यातून वैदेहीला इतकं समजलं होतं की, ती बाई त्या मुलाची मामी आहे आणि त्या मुलाला सगळे किश्या म्हणत होते. ह्या सात-आठ दिवसात जवळजवळ वैदेही हाच प्रकार रोज पहात होती. त्या मुलाला त्याची मामी शिव्या घालत रोज मारायची आणि ते आठ वर्षाचं निरागस लेकरू, मार खात रोज बाहेर येऊन हमसाहमशी रडायचं. किश्या मार खाऊन झाल्यावर हमसाहमशी रडत वैदेही जवळच काही अंतरावर बसायचा अाणि नजर शुन्यात ठेऊन आज ना उद्या ही परिस्थिती बदलेल याची वाट पहायचा. कितीतरी वेळा वैदेही आणि किश्याची नजरानजर व्हायची. कोणी कोणाचं दु:ख कमी करावं म्हणत त्या दोघांचे डोळे एकमेकांशी बोलायचे. बराच वेळ झाला की वैदेही उठायची आणि जाताजाता पुन्हा एकदा मागे वळून जेंव्हा पहायची तेंव्हा किश्या तीच्या पाठमोऱ्या अाकृतीकडे पहात केविलवाणा झाल्यासारखा वैदेहीला भासायचा. आनंद वाटता येत असतो पण दु:खाचे वाटेकरी खुप कमी असतात निदान आपलं दु: ख कोणालातरी कळतयं हेच खुप मोठं असतं.
       वैदेही हाॅस्पीटलला पोहोचली हताश नजरेने आयसीयूच्या काचेतून तिने आत डोकावलं तर तिचा नवरा आणि मुलगा होते त्याच परिस्थितीत शांतपणे बेडवर पहुडले होते. एक दीर्घ सुस्कारा सोडत वैदेही परत बसली. किश्याचा चेहरा काही केल्या तिच्या नजरेसमोरून जात नव्हता. दिवसेंदिवस तीची बेचैनी वाढतच होती. असेच अजून काही दिवस गेले. रोज तेच आयसीयू ,वैदेही आणि किश्या. किश्याचा मार कधी चूकतच नव्हता. त्याला वाचवायला शेजारी यायचे पण उपयोग नव्हताच "इतकं गुणी पोरगं, असंच मार खात मरणार म्हणत शेजारीही त्याच्यासाठी हळहळायचे." पण किश्याचे भोग काही केल्या संपत नव्हते आणि वैदेहीची अस्वस्थता अजूनच वाढत जात होती. महीना होत आला आता पण आज काहीतरी रोजच्यापेक्षा वेगळं झालं होतं. 
      सकाळपासूनच डाॅक्टरांची टीम आयूसीयूत टिकून होते. वैदेहीने काचेतून आत डोकावताच तिच्या मनात धस्सsss झालं. आज काहीतरी सोक्षमोक्ष लागेल ह्या भीतीने तीची बोबडी वळत होती. डाॅक्टरांचे अथक प्रयत्न चालूच होते आणि वैदेहीची पापणी लवत नव्हती. एव्हाना दुपार झाली नव-याजवळच्या माॅनीटरवरची रेष सरळ झाली झाली तितक्यातच मुलाची स्थितीही गंभीर झाली. नवरा गेल्याचं दु:ख करावं का निदान मुलगातरी वाचावा याची भाबडी आशा करावी म्हणत तीची नजर आता मुलावर खिळून होती. आभाळ गच्च भरलं होतं. पाऊस कधी धो धो करत कोसळेल याची शाश्वती नव्हती. संध्याकाळ होत होती डाॅक्टरांचे प्रयत्न चालूच होते आणि अखेर मुलाजवळच्या माॅनीटरवरचीपण रेष सरळ झाली आणि डाॅक्टरांनी मान हलवली."
      वैदेहीने एक आर्त किंकाळी फोडली. ती हाॅस्पीटलमधून बेभान होत बाहेर पळू लागली अंधार वाढला होता. ती रोजच्या ठिकाणी आली. आजही किश्या मारच खात होता मार खात तो आणि वैदेही समोरासमोर आले. किश्याचं भरलेलं मन अजूनच बेभान झालं आणि तो रडतच वैदेहीकडे पाहू लागला. आज मात्र किश्याच्या रडण्यात वैदेहीचा सुरही मिसळला होता इतके दिवस अॅक्सीडेंट झालेल्या शरीराशी झुंजणारा तिचा नवरा आणि मुलगा तिच्या हातून निसटले होते. आभाळ गच्च भरुन आलं होतं किश्या मार खाऊन रडत होता अचानक वैदेहीने जाऊन किश्याला मिठी मारली. दोघांनाही जगण्यासाठीची एक नवीन उमेद मिळाली होती. भरुन आलेल्या आभाळात सोनेरी कडा आली. पाऊस कोसळत होता अन् त्यांची मिठी घट्ट होत गेली.

समाप्त.

©Sunita Choudhari.
आपलं नातं कधी, कुठे, कोणाशी आणि कसं जुळेल कोणीच सांगू शकत नाही. एकीकडे कोणीतरी हातून निसटत होतं तर एकीकडे कोणाशी तरी दु:खाचं नातं मजबुत होत होतं. वैदेही आणि किश्याला आता एकमेकांचा आधार होता. अाभाळ जरी भरलेलं असलं तरी त्याला एक सोनेरी किनार असतेच नाही का? अाजची कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवाल,  मला असंच वाचत राहण्यासाठी फाॅलो नक्की करा. धन्यवाद .
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉✨

1739. आत्तू

      ऑफिसमध्ये होते आणि नेहाचा मेसेज आला. आत्तू, आमच्या नव्या घराचा ताबा मिळालाय. तुझी खूप आठवण आली किल्ल्या घेताना.  मेसेज बघता क्षणी मी फोन लावला तिला. खूप उत्साहात होती पोर. आवाजात नुसता आनंद भरलेला. काय सांगू आणि किती सांगू असं झालं होतं तिला. मी म्हंटलं, फोटो पाठव घराचे. 
नाही, तू प्रत्यक्ष यायला हवंस बघायला. 
मी येईनच गं, पण तुमचं सगळं काम झालं, की सजवलेलं घर पाहायला येईन. तोवर फोटो तर पाठव. 
फोटो कशाला, थांब विडियो कॉल करते. ठेव फोन.
      पुढच्याच क्षणाला विडियो कॉल आला आणि घरभर नाचून तिने घराची प्रत्येक खोली, प्रत्येक कोपरा, open terrace, अगदी संडास बाथरूमची पण सैर घडवून आणलीन. छान होतं घर, चौदाव्या मजल्यावर. बक्कळ हवा, उजेड, उत्तम वस्ती, सगळंच छान होतं. पोरीचा आनंद बघून आनंदाश्रू तरळले डोळ्यात माझ्या. मी अकरावीत असताना, नेहा आली आमच्या आयुष्यात. भाऊ आणि वहिनीची सोनपरी. आई, बाबा, मी, दादा आणि वहिनी. त्यात नेहाची गोड भर. घराचं गोकुळ करणारी. दादा आणि वहिनी नोकरीनिमित्त दिवसभर बाहेर, त्यामुळे मी, आई आणि नेहा, आमचा दिवसभर धुडगूस घरात. तिचं तान्हेपण शब्दशः जगले मी. तिनं  इवल्याशा मुठीत धरलेलं माझं बोट अजूनही तसंच आहे. मी बारावीत गेल्यावर ती वर्षाची झाली आणि माझा अभ्यासच होईना झाला. सारखी आपली तिच्यात रमलेली मी. शेवटी आई ओरडली आणि मी अभ्यासिकेत जायला लागले अभ्यास करायला, तेंव्हा कुठे बारावीत तगले.  तेंव्हापासून, ती आणि मी अविभाज्य. माय मरो मावशी जगो म्हणतात. इथे आत्या जगो, एवढाच  बदल, तिच्या दृष्टीने.
      माझं लग्न ठरलं आणि मी घरातून जाणार या कल्पनेनंच हतबल झालेली नेहा, मला अजून आठवतेय. सात आठ वर्षांची असेल ती तेंव्हा, पण गाल फुगवून बसायची, माझा होणारा नवरा, म्हणजे आदित्य घरी आल्यावर. तुझी आत्या चोरून नेणारे असं तो म्हणाला, की इकडे पाझर फुटायचे नुसते. पण आवडायचा आदित्य काका तिला. त्याच्या हळुवार वागण्याने, त्याने पण आपलसं करून घेतलं तिला. माझ्या लग्नाच्या दिवशी तर ती एवढी धाय मोकलून रडली ती, की माझा पाय अडखळला, डोळे डबडबले आणि शेवटी तिची बालमिठी निग्रहाने दूर करत, मी धावतच गाडीत बसले. काळीज पिळवटून टाकणारा तो क्षण आठवला की आज हसू येतं. पण तेंव्हा तो प्रसंग फार कठीण होता. 
     माझ्या लेकाचा जन्म झाला आणि तिचा आनंद गगनात मावेना. त्याच्या नावाची चर्चा घरात सुरू असताना, ठरलेलं नाव सोसायटीभर सांगत फिरणारी परकरी ती, अजूनही आठवतेय मला. त्याच्याशी खेळताना आणि मला आता भाऊ झालाय असं सगळ्यांना तोंडभर हसून सांगणारी ती, कशी विसरणार मी? नंतर माझा संसार, माझी नोकरी, माझा लेक यात मी गुरफटले, भेटी थोड्याश्या दुरावल्या, पण ते जपलेलं नातं मात्र अक्षय्य राहिलं. रक्षाबंधन, भाऊबीज तर होतेच, पण इतर सण सुद्धा आम्ही जमेल तसे एकत्र साजरे करत असू. जपत असू आमच्या नात्याचे धागे आम्ही, जिवापाड. तिची शाळा, कॉलेज, पुढचं शिक्षण यात आत्तूची जागा इतर बऱ्याच गोष्टींनी घेतली, पण एक कोपरा मात्र अजूनही माझ्यासाठी राखीव होता. उत्तम शिकली ती, बँकेत छान नोकरी लागली तिला आणि तिच्या ट्रेकिंग ग्रुप मधला कानडी राघवेंद्र भावला तिला. CA असलेला, मूळचा मंगलोर जवळच्या एका गावातला, पण आता पुण्यात नोकरीनिमित्त आलेला. त्याचे आई, बाबा आणि तो, भाड्याच्या 2 BHK मध्ये रहात असलेले. लाडकी आत्या म्हणून हे गुपित प्रथम मलाच सांगावंसं वाटलं होतं तिला, हेच तर आमच्या नात्याचं इंगित होतं. यथावकाश ते सगळ्यांना कळलं आणि आमचं छोटसं कुटुंब न्हाऊन निघालं आनंदाच्या कारंज्यात. राघवेंद्रशी बोलताना एकच दुर्दम्य इच्छा दिसली मला त्याच्या बोलण्यात, ते म्हणजे पुण्यात घर हवं आणि ते चौघांचंही  हवं. नेहाचीही तीच मनीषा. लगेच मूल होऊ न देता, मनाशी जपलेलं घराचं स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांचा ध्यास. दोन्हीकडच्या मोठ्यांची मदत, दोघांनी घेतलेलं कर्ज, या सगळ्याची मिळवणी होऊन आज नेहा नव्या वास्तूची स्वामिनी झाली होती. अभिमान मला, कारण मी जगले होते तिच्या सोबत, प्रत्येक क्षण. तिच्या आकांक्षांची साक्षीदार म्हणून. तिच्या सुखाचे कवडसे अनुभवले होते मी. 
     नात्यांचा दुरावा अनुभवण्याच्या आजच्या काळात नेहाचं आणि माझं हे नातं अगदी आगळंवेगळं. समरसून जपलंय ते नातं आम्ही. माझ्या ऑफिसमधल्या मैत्रिणींना सुद्धा हे ठाऊक आहे. त्या कौतुक करतात आमचं. म्हणतात, प्रेम दिलं तर प्रेम मिळतं, दामदुप्पट. तू साक्षी आहेस. नेहाच्या नव्या घराचा विडियो बघताना, पापण्या ओलावल्या माझ्या. धूसर झाली चित्रं, पण मला झालेला आनंद तिला जाणवला. आत्तू, तुझंच घर आहे. कधीही ये हक्काने माहेरपणाला, असं ती म्हणाल्यावर मात्र मला सार्थक झाल्यासारखं वाटलं माझ्या जगण्याचं. तिच्या सासूचाही फोन आला, या चार दिवस मुक्कामाला, असं  अगत्याचं निमंत्रण देणारा. भरून पावले मी.
अशीच जपायची असतात नाती, दोन्ही बाजूंनी, नाही का? तरच समरस होता येतं एकमेकांच्या भावविश्वात. 

पराग गोडबोले

1738. उपरती

       क्षमा काकू व गोविंदकाका ठाण्यातील श्रीरंग सोसायटीत  रहात होते.  याच घरात सिद्धेश व सिद्धीचा जन्म झाला. दोघांत दोन वर्षांच अंतर होतं. घर नुसतं मुलांच्या किलबिलाटाने भरलेलं असायचं. भिंतींवरती रेघोट्या, चिमणपाखरं, आई, बाबा, आजी,आजोबा, बागुलबुवा, जोकर. काय मनाला येईल ते रेखाटलेलं पिल्लांनी. क्षमाताईंची सासू भजनाचे क्लासेस घ्यायची, देवळात. त्यामुळे घरातलं सगळं क्षमाकाकूच पहायच्या. सासऱ्यांच व तिचं छान जमे. दोघांनाही गोष्टीची पुस्तकं वाचण्याची फार आवड. सासरे क्षमा काकूला छान छान पुस्तकं आणून देत वाचायला. दोघं पुस्तक वाचून झालं की त्या गोष्टींतल्या पात्रांवर चर्चा करीत. क्षमा काकूंची सासू सुगरण होती. ती वेळ असला की क्षमाला पारंपारिक पदार्थ शिकवे. क्षमाला ते येत असायचे पण तरीही ती परत सासूच्या क्रुती पाही. त्यातलं नवीन काही असेल ते शिकून घेई. सासूलाही मग तिचं अप्रूप वाटे कारण त्यांच्या भजनीमंडळात एकेकजणी आपापल्या सुनेचे पराक्रम सांगून टीपं गाळत. क्षमाची सासू क्षमासारखी गुणी सून लाभल्याबद्दल देवाचे आभार मानी. सिद्धीही आजीसोबत भजनीमंडळात कधीमधी जाई. तिलाही भजनाची,भक्तीगीतांची आवड निर्माण झाली. आज्यांसोबत तीही गाणी गाई. शाळेत ऑफ पिरियडला बाई सिद्धीला भक्तीगीतं म्हणायचा आग्रह करीत. 
     सिद्धी तिच्या मधुर आवाजाने भक्तीगीतं गाई. पुरा वर्ग भक्तीरसाने भारावून निघे. बाई मग पालक सभेला क्षमा काकूंचे कौतुक करीत. किती छान संस्कार करत अहात तुम्ही सिद्धीवर असं म्हणीत. क्षमाकाकू घरी आल्यावर सिद्धीचं कौतुक आधी तिच्या आजीला सांगत मग आजी म्हणे,"आहेच माझी नात लाख गुणाची"आणि सिद्धीला तुप भरलेला खजूर देत. तो सिद्धीचा अगदी फेवरेट होता. सिद्धेशला आजोबांसोबत बुद्धीबळ खेळायला फार आवडे. बुद्धीबळातले बरेच डावपेच आजोबांनी त्याला शिकवले होते. शाळेत होणाऱ्या बुद्धीबळ स्पर्धांमध्ये सिद्धेशला कधी पहिला कधी दुसरा नंबर मिळे तर कधी त्याचा नंबर हुकला तरी आजोबा त्याला त्याचं काय चुकलं,कोणती खेळी करायला हवी होती हे समजावून सांगीत. खरंच आजीआजोबांमुळे क्षमाकाकू व गोविंदकाकांना मुलांची चिंता नव्हती. मुलांवर आपसूक संस्कार होत होते. हळूहळू मुलं मोठी झाली. नातवाच्या लग्नात आजी नऊवारी नेसली होती. सगळा साजश्रुंगार केला होता. आजोबांनीही कोट,टोपी घातली होती. द्रुष्ट लागण्यासारखा जोडा दिसत होता, आजीआजोबांचा. नवी सून, मोना घरात आली. मोना दिसायला सुंदर होती. आजीआजोबा तीर्धयात्रेला गेले. क्षमाकाकूंनी सासूसासऱ्यांच्या प्रवासाची, तिथे लागणाऱ्या औषधांची, सुक्या खाऊची, कपड्यांची सगळी व्यवस्था तयारी करुन दिली.
     मोनाने हनिमूनहून परतल्यावर तिच्या सासूसासऱ्यांना ट्रीपला पाठवलं. तिने वरच्या फळीवरचे पितळी डब्बे काढले. त्यातलं सामान फरशीवर भिंतीच्या कडेने ठेवलं. मग ती खालच्या भांडीवाल्याकडे गेली. त्याला सांगितलं की वरती ये व काही तांब्यापितळेची भांडी आहेत ती घेऊन जा. मोनासोबत तो भांडीवाला आला. त्याने पितळ, तांब वजन करुन घेतलं व मोनाला पैसे दिले. त्यातून मोनाने नाजूक महागडा कपबशी सेट व डिनर सेट घेतला. काही दिवसांनी क्षमाकाकू व गोविंदकाका घरी परतले. क्षमाकाकूंना त्यांची जुनी कपबशी मिळेना. मोना तेवढ्यात नवीन कपबशीतून चहा घेऊन आली व तिने जुन्या कपबशा व काही भांडी भांडीवाल्या बाईंना दिल्या म्हणून सांगितलं. क्षमाकाकूंच्या लक्षात आलं की पितळी डबे, तांब्याचे हंडेही कुठे दिसत नाहीत. मोनाला त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह समजलं. तिने मग किती चतुराईने ती भांडी खालच्या भांडेवाल्याला विकली व त्यांचे किती पैसे मिळाले ते क्षमाकाकूंना  सांगितलं. त्यातून आलेल्या पैशातून किती छान क्रोकरी घेतली ती दाखवली.
     क्षमाकाकूंच्या डोळ्यांत तरळलेलं पाणी मोनाला दिसलच नाही. मोनाने सासरीही तिच्या माहेरसारखा एक कुक स्वैंपाकाला ठेवला. गोविंदकाकांना क्षमाकाकूंच्या हातचा स्वैंपाक आवडे. पुर्वी ते क्षमाकाकूंना कुठे भाजी निवडून दे, कुठे खोबरं खवून दे अशी मदतही करायचे. मोनाने त्या दोघांचही स्वैंपाकघर त्यांच्यापासून हिरावून घेतलं. कधी बाथरूम ओला राहिला तर मोना सासूला लगेच सुनावे, 'मला सुका वाळलेला बाथरुम आवडतो. अशी ओल ठेवत जाऊ नका. कधी हॉलमध्ये गोविंदकाकांचा एखादा टीशर्ट दिसला तरी मोना हॉलमध्ये कपडे ठेवणं कसं मेनरलस असतं हे सुनावे. सिद्धेशला यातली काहीच माहिती नसायची कारण सिद्धेशसमोर मोना अगदी सासूसासऱ्यांची आज्ञाधारक सून असल्याची बेमालूम भूमिका करी. सिद्धेश तिच्यावर फार खूश होता. मोनाला काही बोललं तर मोना गाजावाजा करेल म्हणून दोघं म्हाताराम्हातारी तोंड दाबून सूनवास सहन करीत होती. थोड्याच दिवसांत क्षमाकाकूंचे सासूसासरे तीर्थयात्रेहून परत आले. दोनच दिवसांत आजीला घरातला कसनुसा बदल जाणवला. त्यांनी मोनाला सुनावलं, 'या घरात आली आहेस तू सून म्हणून. एकतर पाण्यासारखी मिसळून जा या घरात पण या घरावर, घरातल्या माणसांवर कुरघोडी करायचा प्रयत्न करु नको. मोनाला रागच आला. मोना आजीला अद्वातद्वा बोलू लागली.
      सिद्धेश घरी आला तेंव्हा तिने त्याला सगळं तिखटमीठ लावून सांगितलं. सिद्धेशला तर संसारापेक्षा बुद्धीबळाचा खेळ सोप्पा वाटू लागला. आजोबांनी सिद्धेशला सांगितल, 'अरे राजा, संसार सोप्पा नसतो. मोनाही चांगली मुलगी आहे पण आपल्याकडचं वातावरण व तिच्या घरचं वातावरण यात तफावत आहे. तू काळजी करु नकोस. थोड्या दिवसांत सगळं ठीक होईल." पण मोना ऐकायला तयार नव्हती. मोनाने वेगळं रहाण्याचा हट्टच धरला. सिद्धेशने तिला फार समजावून सांगितल पण मोना ऐकेना. शेवटी सिद्धेशने जवळच एका बिल्डींगमध्ये वनबीएचके बुक केला. मोना घरातून बाहेर पडली तेंव्हा क्षमाला फारच वाईट वाटलं. आजुबाजूची, शेजारपाजारची लोकंही आपापसात कुजबुजू लागली. मोनाचा कुक तिच्यासोबत गेला. क्षमाच्या सासूने क्षमाची समजूत काढली.  मोनाकडे आत्ता तिचा भाऊ, आई येऊन दोन दोन महिने राहू लागली. आठवड्यातून दोनदा तरी बाहेरचं जेवण, झोमेटो,स्वीगी..हे सगळं सिद्धेशच्या पचनी पडत नव्हतं पण त्याचा नाविलाज होता. घराचे हफ्तेही भरावे लागत होते. मोनाला पैशाची कदरच नव्हती. तिचं शॉपिंग वारेमाप असायचं. शेवटी त्या दोघांत खटके उडायला सुरुवात झाली व एकेदिवशी सिद्धेशशी भांडून मोना माहेरी निघून गेली. चार दिवस माहेरी तिचं कौतुक झालं. मग तिथे ती अडचण ठरु लागली. तिच्या मतांना आत्ता तिथे पूर्वीसारखी किंमत नव्हती. इकडे सिद्धेश घराला टाळं घालून आईकडे चावी देऊन त्याच्या नवीन प्रोजेक्टसाठी अमेरिकेला गेला. खरंतर तो मोनालाही सोबत घेऊन जाणार होता पण मोनाच्या सततच्या भांडणांमुळे त्याने यातलं मोनाला काहीच कळवलं नाही. मोनाच्या भावाने प्रेमविवाह केला व मोनाची वहिनी, रुता घरात आली. रुताशीही मोनाचे पटेना. दोघींची भांडणं होऊ लागली. रुताला मोना ही एक अडगळ वाटू लागली. 
      मोनाचे वडीलही मोनाला आधीसारखे पैसे देईनात. शेवटी नाविलाजाने मोनाने एक नोकरी शोधली व थोड्याच दिवसांत भाड्याचं घर घेऊन राहू लागली पण आजुबाजूची लोकं तिच्याकडे संशयाने पाहू लागली. गल्लीतल्या पोरांना मोना म्हणजे चिडवण्यासाठी एक आयतं सावज मिळालं. मोनाला काय करायचे ते समजेना. तिथे जवळच रहाणाऱ्या यशोदा अक्कांनी त्या पोरांना चांगलच दमात घेतलं व मोनाला सांगितलं की कोणी जरी तुझ्या वाट्याला आलं तर मला नक्की सांग. मी बघते त्याचं. यशोदा अक्का मोनाकडे घरकाम करु लागल्या. मोनाकडून यशोदाअक्कांना तिची कैफीयत कळली. आत्ता मोनाला तिच्या पुर्वीच्या वागण्याचा पश्चात्ताप होत होता. तिला मनापासून सिद्धेशची व सासरच्या साऱ्या माणसांची माफी मागायची होती. यशोदाअक्का तिला म्हणाल्या, 'बाळा तुला उपरती झाली नं मग झालं तर. तू खरंच जा तुझ्या सासरी. ती लोकं तुझं आनंदाने स्वागत करतील.'
      यशोदा अक्कांच्या सांण्याप्रमाणे मोना परत सासूसासऱ्यांकडे गेली. क्षमाकाकू सासऱ्यांना जेवायला वाढत होत्या. दारात मोनाला पहाताच त्यांनी तिला बसायला सांगितलं. सरबत आणून दिलं. आजोबांनी क्षमाकाकूंना मोनासाठी पान वाढावयास सांगितलं. मागचं काहीच न काढता, मोना सासूसासरे, आजीआजोबांसोबत जेवली. क्षमाकाकू म्हणाल्या, "थोडा वेळ लवंड,मग तुला तुमच्या घराची चावी देते.'
     मोनाचे डोळे भरून आले. आजीने तिची हनुवटी उचलली तसं मोनाला अजुनच भरुन आलं. मोना आजीच्या गळ्यात पडून रडू लागली. आजीला म्हणाली, 'आजी मी फार चुकीचं, उद्धट असं वागले तुमच्याशी व सिद्धेशशीही. मी आत्ता तुमच्यासोबतच रहाणार. उलट बोलणार नाही.' आजीचा सुरकुतलेला चेहरा आनंदाने बहरला. आजीने मोनाच्या पाठीवरुन हात फिरवला. आजोबा म्हणाले, 'आज बासुंदीचा बेत करा. माझी नातसून परत घरी आली आहे. हा आनंद आपण साजरा करूया व आपला एकत्र फोटो सिद्धेशला पाठवूया.'

- गीता गजानन गरुड,आंब्रड.

1737. भक्तीची आणि आस्थेची लाज

   सत्यकथा....
    अयोध्येतील गोष्ट. एक संत अयोध्येत श्री रामायण कथा करीत होते. दररोज एक तास असं यांचं प्रवचन होत असे. यासाठी मोठी गर्दी जमत असे. लोकं अगदी आनंदाने तल्लीन होत ही रामकथा ऐकत असत.या संत महोदयांचा एक नियम होता. दररोज कथा सुरू करण्याआधी ते, "या हनुमंत जी स्थानापन्न व्हा" असं म्हणून हनुमानाचं आवाहन करीत आणि मग एक तास प्रवचन करीत असत. 
     ही श्री रामकथा ऐकण्यासाठी दररोज एक वकील यायचा. हे प्रवचन ऐकताना त्याच्याही मनातील भक्तिभाव उचंबळून येत असे पण एकदा या भक्तिभावावर तर्कसंगती शिरजोर झाली. त्याला वाटलं की हे महाराज रोज "या हनुमानजी स्थानापन्न व्हा" असं म्हणतात खरं पण काय खरंच हनुमानजी येत असतील ! हा असा विचार करता करता या वकिलाने त्या संताला शेवटी विचारलंच, "महाराज, तुम्ही रामायण खूप सुंदर सांगता. तुमच्या प्रवचनामुळे मनाला खूप आनंद मिळतो पण तुम्ही दररोज एक आसन हनुमानजींसाठी ठेवता आणि त्यावर त्यांना बसायला सांगता. मला एक सांगा, त्यावर खरंच हनुमानजी येऊन बसतात का?" यावर ते साधुमहाराज म्हणाले, नक्कीच. मला पूर्ण खात्री आहे की रामकथा सुरू आहे म्हणजे हनुमानजी इथे नक्कीच येत असणार. यावर तो वकील म्हणाला, महाराज, हे असं नुसतंच म्हणून चालणार नाही. हनुमानजी इथे येतात, याचं कुठलंतरी प्रमाण द्या. तुम्ही लोकांना प्रवचन सांगत आहात, चांगली गोष्ट आहे पण तुम्ही तुमच्यासमोर स्वतः हनुमानजी उपस्थित आहेत हे सांगून लोकांना चुकीच्या पद्धतीने प्रभावित करीत आहात. तुम्हाला हे सिद्ध करावेच लागेल की हनुमानजी तुमची कथा ऐकायला येतात.  वकिलाला या महाराजांनी खूप समजावलं. आस्था हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे. हा भक्त आणि भगवान यातील प्रेमरस आहे. यात साक्ष, प्रमाण देणे या गोष्टी आणणं चुकीचं आहे. यावर ते महाराज हे ही म्हणाले की, जर तुम्ही म्हणत असाल तर मी प्रवचन बंद करतो किंवा तुम्ही कथेसाठी येणं बंद करा. 
    महाराज समजावत राहिले पण वकिलाने त्यांचं काहीच ऐकलं नाही. तो म्हणाला की बरेच दिवस झाले तुम्ही हनुमानजी येत असल्याचा दावा करीत आहात. तुम्ही हीच गोष्ट बाकी ठिकाणी पण करीत असणार. त्यामुळे हनुमानजी कथा ऐकायला येतात हे तुम्हाला सिद्ध करून दाखवावेच लागेल. दोघांमधला हा वाद खूप वाढला. अगदी विकोपाला गेला. शेवटी त्या साधू महाराजांनी माघार घेतली आणि म्हणाले, हनुमानजी इथे येतात की नाही हे उद्या मी सिद्ध करून दाखवीन. उद्या जेव्हा कथा सुरू होईल तेव्हा एक प्रयोग करीन. ज्या आसनावर मी हनुमानजींना बसण्यास सांगतो ती गादी तुम्ही आज तुमच्या घरी घेऊन जा. उद्या येताना गादी बरोबर घेऊन या. मग मी तुमच्यासमोरच गादी आसनावर ठेवीन आणि कथा सुरू करण्यापूर्वी हनुमानजींना बोलावीन. मग तुम्ही ही गादी उचलून वर धरा. जर ही गादी तुम्हाला उचलून वर धरता आली, तर समजा की हनुमानजी इथे नाहीयेत. यासाठी वकील तयार झाला. महाराज पुढे म्हणाले की, दोघांपैकी जो पराजित होईल तो काय करणार? हे ही ठरवा. कारण ही शेवटी सत्याची परीक्षा आहे. यावर वकील म्हणाला की मी जर गादी उंचावू शकलो नाही तर मी माझी वकिली सोडून देईन आणि तुमच्याकडून दीक्षा घेईन. पण जर तुम्ही पराजित झालात तर तुम्ही काय कराल? यावर तो साधू म्हणाला, मी कथावाचन सोडून तुझ्या कार्यालयाचा शिपाई होईन. 
    दुसर्‍या दिवशी कथेसाठी खूप मोठी गर्दी जमली. जे लोक दररोज कथा ऐकायला अजिबात येत नव्हते ते ही भगवंताची भक्ती, विश्वास, प्रेम याची परीक्षा बघायला तिथे आले. प्रवचनाची जागा तुडुंब भरली. साधू महाराज आणि वकील दोघेही श्री रामकथेच्या ठिकाणी आले. वकिलाने आपल्याबरोबर गादी आणली होती. ती आसनावर ठेवली गेली. त्या महात्म्याने भरल्या डोळ्यांनी मंगलाचरण म्हटले आणि मग म्हणाले, "या हनुमंत जी स्थानापन्न व्हा." हे असं म्हणताच साधू महाराजांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. ते मनातल्या मनात म्हणाले, प्रभू हा माझा नाही तर रघुकुलाच्या रितीचा, परंपरेचा प्रश्न आहे. मी एक अतिशय साधारण व्यक्ती आहे. माझ्या भक्तीची, आस्थेची लाज राखा. मग त्यांनी वकिलाला बोलावलं आणि म्हणाले की तुम्ही पुढे या आणि गादी उचलून वर धरा. तिथे जमलेले सगळे लोक श्वास रोखून आता पुढे काय घडणार याकडे बघू लागले. 
     वकील महोदय उभे राहिले आणि पुढे येत त्यांनी गादी उचलण्यासाठी म्हणून हात पुढे केला पण वकिलाला गादीला हातही लावता आला नाही. त्याने तीन वेळा प्रयत्नपूर्वक हात पुढे केला पण तिन्ही वेळा त्याला अपयश आलं. हे दृश्य ते महात्मा बघत होते. वकिलाला गादी धरणं तर दूरची गोष्ट पण ते गादीला स्पर्शही करू शकत नाहीयेत.वकिलाने तीन वेळा प्रयत्न केला आणि तिन्ही वेळा त्याला भयंकर थकवा आला. तो घामाने भिजला आणि शेवटी त्या वकिलाने साधू महाराजांच्या चरणांवर लोटांगण घातलं. वकील म्हणाला, महाराज, गादी उचलणं तर दूरची गोष्ट, कसं काय ते माहीत नाही, प्रयत्न करूनही साधा माझा हातही गादीपर्यंत पोहोचू शकत नाहीये. तेव्हा मी माझा पराभव मान्य करीत आहे. 
     त्या दिवशी तिथे श्रद्धा आणि भक्ती, आणि त्याबरोबरच केलेल्या साधनेत किती शक्ती असते हे सिद्ध झालं. देवाची मूर्ती ही पाषाणाचीच असते पण भक्ताचे भाव त्या मूर्तीत प्राणप्रतिष्ठा करतात आणि प्रत्यक्ष देव त्या मूर्तीत वास करायला येतात. भक्तीची ही शक्ती आहे आणि ही सामान्य बुद्धीच्या पलिकडची गोष्ट आहे.

🔆🔅🔅🔆🚩🔆🔅🔅🔆
  🔅 जय श्रीराम जय हनुमान🔅
🔆🔅🔅🔆🚩🔆🔅🔅🔆

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२५

1736. शिव शंकर म्हणजे कोण ?

कृपया लेख माझ्या नावासहीतच शेअर करा. कारण माझा हा लेख नोंदणीकृत आहे ! 

     @ बऱ्याच वेळेला श्री शिवशंकर हे संपूर्ण निळ्या रंगात दाखवले जातात. ते संपूर्ण निळे नसून आपण रामदास स्वामी लिखित लवथवती विक्राळा ही आरती नीट म्हंटली किंवा ऐकली तर आपल्या लक्षात येईल की ते "कर्पुरगौरा भोळा...." म्हणजे कापरासारखे पांढरे शुभ्र आहेत. त्यांचा फक्त कंठ निळा आहे. त्यांचा संपूर्ण परिवारच  "पांढरा शुभ्र" आहे. त्यांचा वास आहे तो हिमालय पांढरा शुभ्र, त्यांच्या जटेतील गंगा पांढरी शुभ्र, त्यांची पत्नी "गौरी" नावातच गोरेपणा आहे तीही गोरीच आहे नावाप्रमाणे, त्यांच्या समोरील नंदी [ या नंदीची आत्यंतिक अवस्था म्हणजे "आ"नंदी" किंवा "आनंद". ] हाही पांढरा शुभ्र. हा नंदी आपण जर आकाशामध्ये पहायला गेलो तर “वृषभ” राशीत आहे.  शिवमंदिराला "गाभारा" असे म्हणतात. किंवा गर्भ गृह असेही म्हणतात. अर्थ स्पष्ट आहे. इथे निर्मिती प्रक्रिया चालते. रस्त्यावरून जाताना शिव पिंड दिसत नाही. त्यासाठी आत गाभारयात म्हणजे "आत मनात" उतरावे लागते. बाहेर असलेले कासव हेच सांगते की मी जसे संकट आल्यावर माझे पाय आत ओढून घेते तसे देवाची भक्ती करायची तर मनाला आत ओढून घेऊन त्याचे बाहेरचे मोह, विषय, षडरिपू यांचे सारे दरवाजे बंद करा. आणि आत या. मग तुम्हाला आपोआप "तो" दिसेल. तसेच हे कासव सांगते की माझ्यासारखी तुमच्या मनाची बाहेरच्या विषया कडील धाव मंद करा, थांबवा. 
"शं" "कर" म्हणजे कल्याण करणारा.
      शिव = शव = इ / शव म्हणजे शंकर आणि इ म्हणजे शक्ती, पार्वती. जो पर्यंत शिव हे शक्तीयुक्त नाहीत तो पर्यंत ते शव म्हणजे प्रेतासमान निर्बल आहेत. म्हणून शिव हे अर्ध्या भागात पार्वती असलेले दाखवतात. त्याचाच दुसरा अर्थ की प्रत्येक एका गोष्टीत थोडीशी दुसरी गोष्ट असते. चायनीज अक्यूपंक्चर मध्ये असे एक चिन्ह आहे. हा शिव आणि त्यांची बायको "शीवी" हे दोघे बिघडले की "आपण चिडल्यावर देतो ती "शिवी" होते.  त्यांच्या प्रत्येक नामाला खूप काही अर्थ आहे. ते आपण पुन्हा कधीतरी नक्की बघू..
     @ श्री शिवाच्या भालावरील चंद्र म्हणजे ज्ञानेश्वरांनी वर्णिलेले चंद्रामृताचे तळे आहे. हे मेंदूत असते. योगातील जी सतरावी कला आहे त्यात हे तळे कलंडून त्यातून अमृत स्त्रवते. वैज्ञानिक भाषेत म्हणायचे झाले तर मेंदूतील "Thalamus " ही ग्रंथी म्हणजे "सूर्य आणि "HypoThalamus "म्हणजे चंद्र होय. ज्या योग्याच्या मेंदूतील हा "चंद्र" पूर्ण कलेने प्रकाशत असतो तो सर्व विषयांचा जाणकार होतो. त्याच्या शरीराला "कुंडलिनी जागृती" मुळे एक विदीर्ण अवस्था आणि देहाची अआत्यान्तिक आग ही या चंद्राने शमते. तसेच शिवाचा तिसरा डोळा म्हणजे दोन भुवयांच्या मध्ये, आतल्या बाजूला असलेली "Pineal " ग्रंथी होय. या ग्रंथीचे वैशिष्ट्य म्हणजे उन्हात गेल्यावर ही ग्रंथी कार्यरत होते. म्हणजेच ती "Photo Sensitive "  असते. याचाच अर्थ तिला "प्रकाश दिसतो". म्हणजे जो योगी प्रचंड साधना करून असा महासिद्ध होतो, परमहंस होतो त्याची ही प्रकाशाने जागृत होणारी ग्रंथी "महाजागृती" मिळून सारया जगातील [ त्रिलोकातील] भूत. वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळातील सारया गोष्टी  त्या महायोग्यापुढे, त्याच्या "तिसरा डोळा अर्थात Pineal Gland पुढे दृग्गोचर होतात. एका साधकाने शंकर बनायचे आहे..... साधना करून. 
     @ वेगळ्या भाषेत शंकर म्हणजे कोण हे सांगायचे तर ते अणु केंद्रकातील "Neutron " आहेत. की जो अधिक, वजा असा कोणताही विद्युत भार नसलेला असा शिवशंकरांनसारखा एक  "विरागी, उदासीन" असा कण असतो. तो कोणत्याही रेण्वीय रचनेत प्रत्यक्ष भाग घेत नाही, पण त्याचे अस्तित्व आवश्यक सुद्धा असते आणि त्याची संख्या बदलली तर त्या अणूचे आणि त्या अणुमुळे बनलेल्या रेणूचे गुणधर्म बदलतात. असो. यामध्ये प्रोटोन हे विष्णू आणि इलेक्ट्रोन हे ब्रह्मा असे म्हणता येईल. अणु आणि रेणूंची रचना ही कमळा रमाणेच दाखवली जाते. आता त्यात खोलात जायला नको. अजून त्यांचे एक रूप हे विष्णू हे [त्रिविक्रम अर्थात tin पावलात जग व्यापणारे] उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव आणि त्यामधील कोणताच ध्रुव गणला जात नसलेला एक भाग असे "तीन" पावलात जग व्यापणारे "चुंबक", ब्रह्मा हे या चुंबकीय शक्तीला मायेची उपाधी लागल्याने निर्माण झालेली विद्युत, वीज किंवा वात आणि श्री शंकर हे या तिघांव्यतिरिक्त उरलेले "शेष" म्हणून "गुरुत्वाकर्षण" शक्ती ही होय. या "गुरुत्वाकर्षण" शक्तीच्या "शेष नागावर" चुंबकीय शक्ती किंवा श्री विष्णू हे पहुडलेले असतात आणि त्यांच्या नाभीतून ब्रह्मदेव म्हणजे मायेच्या उपाधीने निर्माण झालेले विद्युत क्षेत्र हे होय. एका शापामूळे शंकरांना पृथ्वीवर मूर्ती रुपात न पूजले जाता "पिंड" किंवा "लिंग" स्वरूपात राहावे लागते आहे. शिव हा शब्द " विश" [म्हणजे प्रवेश करणे- विसा हा इंग्रजी शब्दही या वरूनच आला आहे अगदी अर्थासहित... ] या शब्दावरून आला आहे, आणि तो अक्षरश: त्याच्या कामाच्या स्वरूपावरूनच घेतला गेला आहे. त्याचा संबंध मी इथे सरळ सरळ न देता आपण तो पुढील संपूर्ण वर्णन वाचून लावून घ्यावा अशी विनंती करतो.
      इथे जाता जाता एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती ही की, "विष्णू" हा शब्द "विष" या संस्कृत धातू वरून आला आहे. आणि या पोटफोड्या "ष" वाल्या "विष" या धातूचा अर्थ " व्यापून रहाणे " असा आहे. विष्णू हे हे जग व्यापून रहातात.  "पिंड" या शब्द जे सूक्ष्मात आहे तेच स्थुलात आहे, जे पिंड म्हणजे एक "पेशीत" आहे तेच देहात आहे आणि अणुरेणूत आहे तेच ग्रहमाला, आकाशगंगानमधेही आहे हे दर्शवतो. लिंग आणि अंग असे देहाचे दोन भाग असतात. अंग हे मुख्य असते. शिवलिंग हे वरील लिंग आणि ज्यावर ते लिंग आहे ती शाळुंका अशा दोन भागांनी बनलेले असते. हे स्त्री आणि पुरुषांच्या मिलनाचे प्रतिक आहे. त्यातून वाहणारे पाणी हे पवित्र नसून त्याज्य असते. ते पिवू किंवा अंगावर उडवून घेऊ नये. आणि म्हणूनच ते ओलांडायचे नसते. शंकरांच्या प्रदक्षिणेला "सोमसूत्री" प्रदक्षिणा असे म्हणतात. म्हणजे जिथे शाळुंका संपते तेथ पर्यंत जाऊन पुन्हा उलट फिरून उलट्या बाजूने शाळून्के पर्यंत जाऊन पुन्हा समोर येणे. इथे १ प्रदक्षिणा पूर्ण होते. प्रदक्षिणा म्हणजे- प्र- पुढे जाणे आणि दक्षिणा म्हणजे आपल्या उजव्या बाजूला....आपल्या उजव्या बाजूला म्हणजे सव्य गतीने अथवा Clock Wise Direction  ने पुढे जाणे म्हणजे प्रदक्षिणा... पृथ्वी,चंद्र, ग्रह, तारे, अणु, रेणू हे सगळे गतिशील आहेत. आणि तेही फिरत आहेत मग आपणही जर योग्य पद्धतीने फिरलो तर एक विधायक, निर्मितीक्षम आणि जीवन बदलून टाकणारे कार्य करत असतो. म्हणून प्रदक्षिणा करायची.
      शंकरांची पिंडी ही स्त्री पुरुष मिलनाची प्रतिक असल्याने आणि पूर्वीच्या ऋषीनच्या अभ्यासानुसार त्यातून होणारी आत्यंतिक उर्जा निर्मिती ही रजस्वला म्हणजे पाळी चालू असलेल्या स्त्रियांच्या दृष्टीने घातक असल्याने त्यांनी शिव मंदिरात जाऊ नये असा दंडक होता. त्यात स्त्रियांना कमी लेखण्याचा प्रश्नच नव्हता. आता सर्वांनाच जसे माहित आहे की पिरामिड च्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामूळे त्यातून अत्यंत अचंबित करणारी उर्जा निर्माण होते. त्यात भाजी, फळे, दुध कित्येक दिवस खराब न होता रहाते. ब्लेडला परत धार येते, आरोग्या साठी उपयोग होतो...वगैरे...त्या प्रमाणेच शिवपिंडीच्या वैशिष्ठ्यपूर्ण आकारा मूळेही प्रचंड उर्जा निर्मिती होते. 
     आपण जर नीट पाहिले तर सध्याच्या अणुभट्टीची रचना आणि कार्य हे देखील बरोबर शिवपिंडी प्रमाणेच  चालते. त्यातही फिजन पद्धतीने अणु उर्जा निर्माण केली जाते आणि भोवती फिरवलेले पाणी गरम होते ते वापरून उर्जा निर्माण केली जाते, हेही पाणी त्याज्यच असते. अशीच उर्जा शिवपिंडीतही तयार होत असते. सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखीप्रवण क्षेत्रात शंकरांची "बाराही ज्योतिर्लिंगे" आहेत. "ज्योती" या नावातच तेथील अग्नी दिसून येतो आहे. शिव पिंडीवरील भस्माच्या तीन पट्ट्यांमध्ये वेडेवाकडेपणा आला की पृथ्वीच्या पोटात काही हालचाल चालू आहे असे अनुमान लावीत असत. पूर्वी ऋषीनी असे अनेक वेगवेगळे प्रयोग केले होते. पिंडी मधेही ५ तत्वाननुसार आकाशलिंग, वायूलिंग, अग्निलिंग, जललिंग आणि भूलिंग किंवा पृथ्वीलिंग असे ५ प्रकार आहेत. आपल्याला माहित असलेल्या रामायणातील गोष्टीप्रमाणे श्री शंकरांनी रावणाला दिलेले लिंग हे "भूलिंग" होते. त्यामुळे ते त्याने पृथ्वीवर ठेवल्यावर पृथ्वीरूप होऊन गेले अर्थात चिकटले.      
 
सर्प- जागृत झालेली कुंडलिनी शक्ती....हिचे वर्णन साडेतीन वेटोळी घालून बसलेला सर्प असेच आहे. 

त्रिशूल - हा शब्द त्रि म्हणजे तीन आणि शूल म्हणजे टोचणे, टोचणारे हत्यार अशा अर्थाने झाला आहे. यात तीन काय तर १] त्रिलोक- भू- पृथ्वी, भुव: पृथ्वीवरचे अंतराळ आणि स्व: म्हणजे स्वर्ग, २] त्रिदोष अर्थात वात, पित्त आणि कफ ३] तीन मुख्य रिपू म्हणजे शत्रू - काम, क्रोध आणि लोभ या सर्वांवर विजय मिळवत्या साठी ज्याने हे जे साधनेचे हत्यार धारण केले आहे ते म्हणजे त्रिशूल.   

डमरू- साधकाला आपल्या "नादाने" मंत्रमुग्ध करणारे हे डमरू वासने पासून सोडवते. हे वाजवताना चुकले तर त्यातील दोरयाला टोकाशी असलेल्या गाठी वाजवणारयाला जोरात लागतात. त्यामुळे एकाग्रता आणि कुशलता अतिशय आवश्यक. शिवाय ते चामड्यापासून बनवलेले असते. साधकाने त्याचे शरीर असेच उत्तम "ताणायचे" असते की त्यातून योगध्वनी निघावा. 

गंगा- गं [ गम ] आणि गा अशा दोन शब्दांपासून हा शब्द बनला आहे. गम म्हणजे वेगाने फिरणे आणि "गा" म्हणजे धारण करणे, तिला रूप प्राप्त होणे होय. हे वेगाने फिरणारे जलतत्व शिव शंकरांच्या जटेत म्हणजे गुरुत्वाकर्षणामध्ये धरले जाऊन स्थिर होते. आणि नंतर मग "धरे" वर म्हणजे पृथ्वीवर सोडले जाते. पण इथे या गं चा उच्चार मधे “म”कार न घेता “न”कार घेऊन अनुनासिक असा म्हणजे नाकात करायचा आहे. 

शिव शंकर जे वाघ्रचर्म परिधान करतात ते साधना करताना धारण केले तर साप, विंचू जवळ येत नाहीत. शरीरामध्ये उब रहाते. साधना करताना निर्माण होणारी वीज धरतीमध्ये निघून न जाता शरीरात फिरते. 

रुद्राक्ष - शंकरांचा डोळा म्हणून ओळखले जाणारे हे फळ त्यावरील कमी अधिक रेघांमुळे एकमेकांपेक्षा वेगळे ओळखले जाते. हवेतील साधकाला आवश्यक लहरी शोषून घेणे हे यांचे काम. याचे पाणी हृदय रोगांवर गुणकारी आहे. 

भस्मलेपन- भस्मामध्ये वनस्पती मधील अनेक गुणकारी द्रव्यांची "Oxides " असतात. जी पोटात घेण्याने आणि शरीराला वरून लावल्याने गुणकारी सिद्ध होतात. तसेच भस्म शरीराला वरून लावल्याने शरीराचे थंडीपासून आणि आसपासच्या किडे, विंचू यापासून संरक्षण  होते. अर्थात ह्या सारया गोष्टी जे साधक रानावनात साधना करतात त्यांच्यासाठी आहेत. तुम्ही घरात असा सगळ्या अंगाला भस्म फासून फिरण्याचा प्रयोग केलात तर घरची मंडळी, पत्नी, मुले चिंचेच्या फोकाने फटकावून घरातून हाकलवून देतील.......हाहाहा......     

खडावा- पायातील लाकडी खडावा घालून फिरणे हे अतिशय अवघड असते. पाय, बोटे चालता येणार नाही इतके दुखतात. मनावर विजय मिळवण्यासाठी आणि तेथील अक्यूप्रेशरचे बिंदू दाबले जावेत म्हणू या खडावानचा उपयोग केला जातो. खडावा वापरल्याने पोट, पौरुष ग्रंथी, आणि मेंदूचे काम सुधारते. 

कमंडलू- स्वत:च्या शक्तीने भारीत केलेले पाणी यात ठेवले जात असे. याचा वैशिष्ट्यपूर्ण आकारही यातील पाण्याची शक्ती वाढवण्या साठी उपयुक्त असाच असतो. 
 
आपले ऋषी मुनी हे फार मोठे संशोधक होते. फक्त त्यांची परिभाषा वेगळी होती. आपली आजची विज्ञानाची परिभाषा वेगळी म्हणजे मुख्यत:ग्रीक आहे. पण म्हणून ऋषी हे चुकीचेच होते असे अभ्यास न करता म्हणणे अत्यंत चुकीचे ठरेल. त्यांनी लिहून ठेवलेल्या ग्रंथातील अर्थ नेहमीच्या आणि आजच्या काळाशी सुसंगत असा, शोधून काढणे हे आपले परमकर्तव्य आहे. 

शिव शंकर हे तिन्ही काळ, त्रिलोक, जन्म, स्थिती आणि मृत्यू या तीनही अवस्थांना जिंकणारे आहेत म्हणून ते त्रिशूलधारी. अणु अवस्थेत ते "विरागी, संन्यासी म्हणजेच "Neutron"  म्हणजे जे Neutral राहतात...[विष्णू हे प्रोटोन आणि ब्रह्मा हे इलेक्ट्रोन]. त्यांचे "तांडव नृत्य" अणुगर्भात सततच चालू असते. 

शिवलिंगाची २२ नावे आणि मंत्र पुढीलप्रमाणे:- 
निधनपतये नमः।
निधनपतान्तिकाय नमः।
ऊर्ध्वाय नमः।
ऊर्ध्वलिङ्गाय नमः।
हिरण्याय नमः।
हिरण्यलिङ्गाय नमः।
सुवर्णाय नमः।
सुवर्णलिङ्गाय नमः।
दिव्याय नमः।
दिव्यलिङ्गाय नमः।
भवाय नमः।
भवलिङ्गाय नमः।
शर्वाय नमः।
शर्वलिङ्गाय नमः।
शिवाय नमः।
शिवलिङ्गाय नमः।
ज्वलाय नमः।
ज्वललिङ्गाय नमः।
आत्माय नमः।
आत्मलिङ्गाय नमः।
परमाय नमः।
परमलिङ्गाय नमः।

गोपाल तपाणि उपनिषदात शिवलिंगाची महत्ता अद्भुत पद्धतीने सांगितली गेली आहे. 

तत्र द्वादशादित्या एकादश रुद्रा अष्टौ वसवः सप्त मुनयो ब्रह्मा नारदश्च पञ्च विनायका वीरेश्वरो रुद्रेश्वरोऽम्बिकेश्वरो गणेश्वरो नीलकण्ठेश्वरो विश्वेश्वरो गोपालेश्वरो भद्रेश्वर इत्यष्टावन्यानि लिङ्गानि चतुर्विंशतिर्भवन्ति॥

अर्थात: बारा आदित्य, अकरा रुद्र, आठ वसु, सात ऋषी, ब्रह्मा, नारद, पांच विनायक, वीरेश्वर, रुद्रेश्वर, अंबिकेश्वर, गणेश्वर, नीलकण्ठेश्वर, विश्वेश्वर, गोपालेश्वर, भद्रेश्वर आणि २४ अन्य शिवलिंगांचा इथे वास आहे!!!! 

मी लिहिलेली शिवस्तुती :- 

ओम नम: शिवाय, घुमू दे, मनात रे देवा, 
या विश्वाचा तू "कर्ता" "धर्ता" संहारक देवा  !! धृ !! 

मन रमू दे साधनेत जे विषयी रमलेले, 
आता तरी रे राहो नामी, दिन जे उरलेले,
घडू दे सेवा जन्मो जन्मी, नको मोक्षाचा मेवा.....!! १ !!     

तूच गुरुंचा आद्य गुरु तुज, हर, भैरव  म्हणती, 
लवकर होसी प्रसन्न भक्ता, आशुतोष जपती,
गौरीशंकर, कैलासनाथा, शंभू महादेवा .....!! २ !! 

अवतरलासी पृथ्वीवरती, "ज्योती" स्वरूपाने , 
धावे मागून पार्वतीमाता तुडवीत भवराने, 
कलादास मी प्रार्थित प्रभुजी, पदी मजसी ठेवा....!! ३ !! 

ठेवा- २ अर्थ- १] राहू देणे, ठेवणे २] मिळकत, साठवण, पुंजी
भवराने - २ अर्थ - १] या भौतिक जगातील दु:खाची राने २] भंवर- भुंग्याप्रमाणे या फुलावरून त्या फुलावर शोधत शोधत जाणारी पार्वती माता. 
आशुतोष- आशु- लवकर/ तोष- प्रसन्न होणे, प्रसन्न होणारा ...म्हणून जो लवकर प्रसन्न होतो असा तो म्हणजे शंकर.

शिवरात्र ही शिवशंकर यांच्या जवळ सुलभतेने नेणारी रात्र आहे. आणि महाशिवरात्र तर अजून उत्तम. “ओम नम: शिवाय” हा सोपा, सुलभ मंत्र तुम्हाला या महाशिवरात्रीच्या उपासनेने उत्तम फल देईल. या सोप्या मंत्रात आजच्या कलियुगातला अनुसरून अर्थात आजच्या युगात वासना खूप वाढलेली असल्याने आणि या वासनेचा संबंध पृथ्वीतत्वाचे मूलाधार चक्र आणि जलतत्वाचे स्वाधिष्ठान चक्र यांच्या जास्त येत असल्याने पृथ्वी तत्वाचे बीज “श” आणि जलतत्वाचे बीज “व” हे यात वापरलेले आहे. “य” हे जसे अक्षर आहे तसा तो तरंग सुद्धा आहे. आणि हे “य” हे अक्षरच मंत्राला त्याच्या योग्य जागी नेत असते म्हणून ते प्रत्येक मंत्रात असतेच. [ जसे ओम गं गणपत”ये” नम”, ओम हुम हनुमत”ये” नम” वगैरे वगैरे........] नम म्हणजे मी नमन करतो. माझ्यातील “मी” काढून टाकतो. माझे मन “न”मन” म्हणजे मनरहित करतो. ओम हे ब्रह्माचे वाचक अक्षर अथवा शब्द आहे. तो आदी ध्वनी आहे. “शि” मध्ये “ई” हे शक्ती देणारे अक्षर [ स्वर ] म्हणजे शिवाची कार्यकारी शक्ती इथे सोबत आहेच. त्यामुळे तुम्ही ओम नम: शिवाय म्हंटले की शिवशंकरान बरोबर पार्वती मातेची उपासना झालीच. या मंत्राच्या जपाने मन शांत होते. वासना कमी होतात. शरीरातील उष्णता कमी होते. आणि उपासना, जप जसजसा वाढत जाईल तसतशी प्रगती होत जाते. मनाला अपार आनंद मिळतो.   
मित्रांनो तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या उपासनेसाठी खूप खूप शुभेच्छा.          
   
नेहमीच आपला मित्र, 
कवी Dr हेमंत उर्फ कलादास,
श्री. हेमंत उद्धव सहस्रबुद्धे, 
मोबाईल नंबर - 7620750034 
लेख लिहिला दिनांक- ०५/०३/२०१६ शनिवार

1735. नवी सुरवात

     पायाची जखम तशी बरी होत आलेली. हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमध्ये आज त्याचा चौथा दिवस होता. कधी एकदा आपल्याला डिस्चार्ज मिळतोय असं त्याला वाटतं होतं.फार दिवस राहून पार कंटाळून गेला होता. तेवढ्यात त्याला ती नर्स दिसली, हातात ट्रे घेऊन ती ड्रेसिंगच सर्व सामान त्यात होतं. काहीतरी गडबड होतेय, ही नेहमीची नर्स नाही हे त्याने मनोमन जाणले. गेली कुठे म्हणायची ही. का आज सुट्टी घेतली? विचार करत तो खजिल झाला. आपल्याला दुरावलेल्या बायकोबद्दल असा विचार करताना त्याच्या मनात प्रश्चताप वाटतं होता. ही नर्स सुजाता त्याची बायको होती आणि आपल्या चुकीमुळे आपण तिच्या आयुष्यातून दूर झालो होतो. विचार करताना त्याला आता खरचं खूप वाईट वाटतं होतं. तो विचारात असताना नर्स आली. तिनं व्यवस्थित पायाची जखम धुऊन नवीन बँडेज पट्टी बांधली. पायाचं हाडात अजून वेदना जाणवत होत्या.ती निघून गेली तेव्हा तो पुन्हा विचारात हरवला.
         ***
"सुहास "
आवाज ऐकला आणि तो जागा झाला आणि पहातचं राहिला.
समोर सुजाता उभी होती. क्षणभर गोंधळून गेला तो.
काय बोलावं त्याला कळेना.
"कसं वाटतंय आता?"
"बरं वाटतंय." तो बोलून गेला.
"डिस्चार्ज मिळालाय आज."
"दवाखान्याचं बिल?"
"मी पेड केलं सगळं."
आश्चर्य वाटलं त्याला.
"एक विचारू?
"विचार ना."
"हे सगळं कशासाठी?"
ती काही बोलली नाही.
अगदी निरुत्तर राहिली.
"तू थांब मी रिक्षा बघून आले."
जे घडतंय ते त्याच्या दृष्टीने कल्पनेच्या बाहेरचं होतं.
सहा महिन्याचा काळ आठवला त्याला. सुजाताबरोबर त्याचं छान आयुष्य चाललेलं. घरात आई आणि बायको सोडली तर कुणी नव्हतं. सर्व काही सुखात होतं. नंतर काही घडलं त्याला तो स्वतः जबाबदार होता. तिथं नोकरी करत होता, तिथं पुजाची ओळख झाली. तिच्यात पूर्ण गुंतून गेला. आई आणि बायको यांचा त्याला विसर पडला. आपल्या घराला तो कायमचा दुरावला. पुजासोबत तो रहात असला तरी त्यांचे काही महिने सुखात गेले. तिच्या तापट स्वभावाची खूप उशिरा कल्पना आली. घरात किरकोळ कारणावरून भांडण व्हायला लागली. याचा परिणाम असा झाला, पूजा त्याच्या आयुष्यातून कायमची निघून गेली. त्याच्या आयुष्यात अंधार दाटला होता. पुन्हा माघारी घरी जायची त्याला आता लाज वाटतं होती. अशा विचारात चालत असताना टेम्पोची पाठीमाघून धडक बसली. सुदैवाने तो त्यातून वाचला पण पायाला गुडघ्याला दुखापत झाली. तिथल्या जमवाने जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केले. योगायोगाने सुजाता नर्स म्हणून तिथंच जॉब करत होती. वाईट तिलाही वाटलं. पण ती डगमगली नाही. सर्व काही विसरून तिनं तिचं कर्तव्य पार पाडलं.आठ दिवस... आठ दिवस तिनं मनोभावाने त्याची सेवा केली. सारं काही त्याला आता या वेळेला आठवत होतं.
पर्स सावरत हॉस्पिटलच्या दारात येताना त्याला सुजाता दिसली. बहुतेक जाण्यासाठी रिक्षा बघून आलेली असावी.
जवळ आली.
"चल निघायचं आता."
सुहास गप्प.
"काय म्हणते मी?"
तो तिच्याकडे पहात राहिला. तिलाही दिसून आलं, त्याच्या चेहऱ्यावर एक उदासपण होतं.
"माझी लायकी नाही त्या घरात यायची "तो बोलून गेला.
"तू शांत रहा, आता कसलाही विचार करू नको."
"अगं पण....."
"बोलू नकोस सगळं माहितीय मला, ही वेळ नाही बोलायची."
"आई काय म्हणेन?"
"मी समजावते सगळं त्यांना."
"पण नको माझ्यामुळे पुन्हा वादळ त्या घरात."
"दुसरा मार्ग आहे का कुठला, साधं तुला अजून नीट चालता येत नाही."
शेवटी त्याचा नाईलाज झाला. किती मोठं मन केलं होतं सुजाताने. सगळं होऊनही घराचं "घरपण "ती आजही जपत होती. सुजाताच्या आधार घेऊन तो हॉस्पीटलच्या बाहेर आला. रिक्षा तयार होती. सावकाश सुजातानं त्याला आत बसवलं. ती स्वतः बसली. साधारण वीस मिनिटात रिक्षा कॉलनीच्या बाहेर थांबली. सुहास अजून विचारात हरवलेला होता. रिक्षा थांबली तसं त्यानं समोर पाहिलं, त्याचं घर त्याला दिसलं. तो तसाचं पहात राहिला. सुजाताचं लक्ष गेलं. "पहातो काय असं तुझंचं घर आहे "
"माझं घर!"
"तुझं घर, माझा जेवढा हक्क आहे तेवढा तुझाही हक्क आहे या घरावर."
थोडसं हास्य त्याच्या चेहऱ्यावर फुलून राहिलं. रिक्षाचे बिल तिनं दिलं. सावकाश सुहासला तिनं बाहेर घेतलं. चालताना त्याला आधारासाठी त्याचा एक हात स्वतःच्या खांद्यावर घेतला. सावकाश पावलं टाकीत दोघं चालू लागली. त्यांच्या आयुष्याची जणू " नवी सुरवात झाली होती.

 @ शेखर ठोंबरे. सोलापूर

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५

1734. जीवनदान

 " ती..ती दोन नंबर ची साडी दाखवा बरं...ती मोरपंखी...." 
मधुरा ने साडी च्या दुकानातील सेल्समन काकांना त्यांच्या मागच्या रॅक कडे बोट दाखवत सांगितले.
" ही घ्या ताई...मस्त चॉईस आहे तुमचा..अगदी उठून दिसेल तुमच्यावर." काकांनी सराईतपणे हे ' ग्राहकांना खुश करणारे वाक्य' आणि ती साडी. दोन्ही एकदमच मधुरा समोर प्रस्तुत केलं.
साड्या खरेदी हा एक संशोधनाचा स्वतंत्र विषय आहे. "ह्याच रंगात जरा वेगळा पॅटर्न दाखवा ना..." आणि " ह्या पॅटर्न मध्ये काही वेगळा रंग आहे का?" ह्या तमाम स्त्री वर्गाच्या अतृप्त मागणीवर चर्चा अडकलेली दिसताच दुकान मालक "अरे राजाराम...तो काल सुरत हून नवीन माल आलाय. त्यातलं पॅकेट फोडून ताईंना माल दाखव बरं " असा रामबाण तोडगा काढत आदेश देतो. मग अगदी जुनाच माल असला तरी बघणारी ताई अगदी खुश. रविवारचा दिवस असल्याने दुकानात बऱ्यापैकी गर्दी होती. अर्थात मधुरा एकदम क्लिअर आणि फिक्स चॉईस ठरवून आली होती. मोरपंखी रंगाची शिफॉन ची साडी बस् ! 
त्यामुळे तिची खरेदी पटकन झाली सुद्धा ! हा खास चॉईस तिच्या आई साठी होता,अर्थात प्रसंग ही तसाच होता.
तिची आई म्हणजेच उर्मिला ताई किर्लोस्कर यांची एकसष्ठी होती आठ दिवसांनी आणि मोरपंखी रंग हा उर्मिला ताईंचा सर्वात आवडता रंग ! 
काऊंटर ला बिल पे करत असतानाच" एक शाल हवी आहे चांगली ...मोरपंखी रंगाची " 
हे वाक्य तिच्या कानावर पडले. आवाज ओळखीचा होता ....प्रमिला मावशी चा.. हो प्रमिला मावशीच होती ती.. ! 
तिने बघून ही न बघितल्या सारखं केलं आणि पैसे देऊन, साडीची बॅग घेऊन ती तिथून बाहेर पडली. 
प्रमिला मावशी ला पाहून उगीचच मूड गेल्या सारखा झाला तिचा. पण अर्थात तिच्याकडे विचार करण्यासाठी फारसा वेळ ही नव्हता. आईच्या एकसष्ठीच्या सोहळ्याच्या तयारीची खूप कामं राहिली होती. खूप मोठ्या आयोजनाचा घाट तिने आणि तिच्या मोठ्या भावाने म्हणजेच मयुरने घातला होता. रीतसर हॉल बुक केला होता. कॅटरिंगवाला, सजावटवाला  हे सगळं झालं होतं. आमंत्रण आणि इतर खरेदी सध्या सुरू होती. उर्मिला आणि प्रमिला या दोन्ही बहिणी सांगली च्या गाव भागात राहणाऱ्या आबासाहेब आणि राधा ताई चिटणीस यांच्या कन्या. दोघींमध्ये तीन वर्षांचे अंतर , उर्मिला लहानपणा पासूनच दिसायला अतिशय देखणी , चुणचुणीत आणि हुशार होती , शिवाय घराण्यात जन्मलेली पहिली मुलगी म्हणून लाडाकोडात वाढली , तिला ' राणी ' हे सार्थ बिरूद देखील प्राप्त झालं 
आणि खरोखरच ती एका परीकथेप्रमाणे आयुष्य जगली, जे हवं ते विना सायास मिळत गेलं , सर्व हट्ट प्रेमाने पुरवले जात होते. 
त्या मानाने तिच्या पाठीवर जन्मलेली प्रमिला तशी उपेक्षितच राहिली , सतत थोरल्या बहिणीच्या छायेत वावरत राहिली . जन्मजात सहनशील , बुजरा आणि भिडस्त स्वभाव आणि त्या दुष्काळात तेरावा महिना म्हणजे गव्हाळ वर्ण  घेऊन आलेली प्रमिला कायम मोठ्या बहिणी सोबत होणाऱ्या तुलने मुळे दबलेल्या अवस्थेतच जगली.  ऊर्मी ताई ने वापरून जुने झालेले कपडे, वह्या पुस्तके आदि वस्तू
 "चांगलेच तर आहेत की, कुठं खराब झालेत ?" अश्या समजुती सोबत तिने कोणती ही तक्रार न करता हसत हसत लहान पणी स्विकारले. ऊर्मी ताई कत्थक शिकायची पण तुटलेले घुंगरू तिच्या पायात टोचू नये म्हणून ते गोळा करण्याचा आटापिटा प्रमिला करायची , ताई च्या बॅडमिंटन च्या क्लास च्या वेळी तिची किट सांभाळायची . उर्मिला ला लहानपणा पासूनच खूप मैत्रिणी होत्या , मैत्रिणी घरी आल्या की बाहुला बाहुली च्या लग्ना पासून , भातुकली आणि इतर सगळे खेळ खेळताना प्रमिला ची भूमिका मात्र एक मदतनीसाचीच असायची.
हायस्कूलला दोघी जायला लागल्या तसं आबा साहेबांनी दोघींना एक सायकल घेऊन दिली. अर्थातच ती शिकण्याचा पहिला मान उर्मिलेचा. पण तिला ती सायकल काही केल्या जमेना. कधी पॅंडल मारायची तर बॅलन्स सुटायचा. बॅलन्स जमला तर वेग जुळत नव्हता .मग सायकल ची सिट पकडून तिला आधार देत मागे पळायचं काम अर्थातच प्रमिलाच असायचं. सायकल चालवण्याचा अपयशाची उर्मिलाची चिडचिड मात्र प्रमिलेवर निघायची. प्रमिला मात्र कोणी ही न शिकवता स्वतः हून सफाईदार सायकल चालवायला शिकली. त्याचा  जळफळाट आणि ईर्ष्या उर्मिलेला सहन होण्या पलीकडची होती. त्या रागातून तिने एकदा प्रमिला सायकल चालवत असताना हळूच मागच्या चाकावर लाथ मारून तिला खाली पाडले आणि "वाटेत दगड आला आणि ती पडली" अशी आवई उठवून दिली. त्या अपघातात प्रमिला रस्त्या कडेला असलेल्या एका खड्ड्यात पडली आणि पाय सायकलच्या चेन मध्ये अडकल्याने घोट्या जवळचे एक नाजूक हाड अश्या पद्धतीने तुटले की तो पायाचा अधू पणा तिला कायमस्वरूपी आला. 
      यथावकाश मुली मोठ्या झाल्या आणि तमाम वधू पालकांना  असणारी लग्नाची काळजी आबासाहेब आणि राधाताईंना देखील लागली. पण अपेक्षेप्रमाणे देखण्या आणि हुशार असलेल्या त्यांच्या ' राणी साठी ' म्हणजेच उर्मिला साठी अनेक स्थळं स्वतः हून चालून आली. अखेर बराच चोखंदळ पणा आणि नखरे झाल्यावर उर्मिलाने पुण्याच्या गर्भ श्रीमंत किर्लोस्कर कुटुंबाच्या एकुलत्या एक मुलाला म्हणजे राजीवला होकार दिला. एव्हढ्या मोठ्या घराण्यात मुलगी द्यायची आणि सोयरिक जमवायची याचं दडपण चिटणीस कुटुंबाला होता. पण " राणी" सगळं व्यवस्थित निभावेल ही खात्री ही होती. झालं ही तसच. धूमधडाक्यात लग्न झालं ,आणि हळू हळू संपूर्ण किर्लोस्कर घराची सत्ता उर्मिलाने आपल्या ताब्यात घेतली. ती या घराची देखील राणी झाली. यथावकाश ' मयुर ' आणि ' मधुरा ' च्या रूपाने एक समृद्ध आणि सुखी चौकोनी कुटुंब देखील आकारास आलं.
     इकडे या सगळया धामधुमीत प्रमिला मात्र सर्व गोष्टीतून विरक्त होत गेली. तिची ऊर्मी ताई सासरी गेली तशी ती ही एकटी पडली. तिला लग्न, संसार या बाबतीत आधी पासूनच रस नव्हता. तिने लग्नाला स्पष्ट नकार दिला आणि लगेचच "ती आहेच जरा पहिल्या पासून जरा विक्षिप्त आणि विचित्र"   किंवा " नाही तरी तिला कोण पसंत करणार आहे?" असे नातेवाईकांचे टोमणे कधी कधी तिच्या मागे तर कधी कधी चक्क तोंडावर तिला ऐकावे लागले. तिचा स्वभाव, पायाचा अधूपणा किंवा रूप हा तिचा दोष नव्हता. हे आबा साहेब आणि राधा ताईंना समजत होत पण वयानुरूप थकल्यामुळे ते ही हतबल झाले होते.  सुखी संसारात मग्न असलेल्या उर्मिलेने ही यात फारसा रस दाखवला नाही. त्यामुळे ह्या सर्वातून बाहेर पडण्यासाठी जेव्हा प्रमिलाने मनुष्य सेवेचं व्रत स्वीकारून नर्स बनण्यासाठी पुण्यातील सुकन्या नर्सिंग कॉलेज मध्ये जाण्याचा आयुष्यात केलेला "एकमेव  आग्रह" आबा साहेबांनी देखील लगेच मान्य केला. तो करताना कदाचित तिच्या सुखापेक्षा कसल्या तरी सुटकेचा निःश्वास त्यांनी टाकला होता. प्रमिला पुण्यात नर्सिंग कॉलेज मध्ये रुजू होऊन वर्ष झालं तरी ती तिच्या ऊर्मी ताईला भेटू शकली नव्हती. कारण उर्मिला कधी फॉरेन टूर तर कधी वेगवेगळ्या क्लब आणि मंडळांच्या कार्यक्रमांत व्यग्र असायची. आता मधुरा शिक्षण संपवून एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होती तर मयुरचे लग्न नुकतेच झाले होते. राजीव त्याच्या उद्योग व्यवसायात पूर्ण बुडालेला होता. प्रमिला कुठे आहे ? काय करते ? ह्याची कशाला कोण काळजी करेल ? इकडे प्रमिला तिच्या मेहनती ,कष्टाळू स्वभावामुळे लवकरच एका मोठ्या इस्पितळात हेड नर्स बनली होती आणि 
त्यांच्याच स्टाफ क्वार्टर मध्ये राहत होती. एकसष्ठी च्या कार्यक्रमा च्या आमंत्रण पत्रिकांची यादी बनवताना उर्मिला ताईंनी प्रमिला मावशीचे नाव सुचवताच मधुराने नाक मुरडत नाराजी दर्शविली 
"अग असू दे. काही ही झालं तरी ती बहीण आहे माझी आणि पुण्यातच राहते. शिवाय कार्यक्रमाला सगळे घरातले नातेवाईक येतील. तसं बरं दिसत नाही पाठव तिला पण कार्ड " अशी मधुराची समजूत उर्मिला ताईनी काढायचा प्रयत्न केला.  अर्थात मुलांच्या मनात स्वतः च्या बहिणीची विक्षिप्त, विचित्र अशी प्रतिमा बिंबवण्यास उर्मिला ताईच कारणीभूत होत्या. त्याच त्या दोघींचे बालपण आणि त्या काळातील घटना सांगून आपण कसे तिला सांभाळण्याचा प्रयत्न केला हे समजावायच्या. कुठल्या ही घरगुती समारंभात किंवा सोहळ्यात प्रमिला कधीच येत नसे किंवा सर्वांशी फटकून, आलिप्त राहायची ,त्यामुळे मुलांच्या मनात देखील ही भावना दृढ झाली होती. पण अखेर उर्मिला ताईंच्या आग्रहामुळे मधुराने निमंत्रण पत्रिका प्रमिला मावशी कडे पाठवून दिली होती.
     आता एकसष्ठी चा सोहळा चार दिवसांवर आला होता. घरात धामधूम सुरु होती. जय्यत तयारी करण्यात आली होती. एकसष्ठी साठी खास बनवलेले दागिने उर्मिला ताई घरातच गळ्यात घालून पहात होत्या आणि अचानकच त्यांना छातीमध्ये जोरात कळ आली आणि त्या जागीच कोसळल्या. क्षण भर कोणालाच काही समजलं नाही आणि मग एकच गोंधळ उडाला. तोंडावर पाणी मारून बघितलं, काही प्राथमिक उपचार करून बघितले पण त्या काही शुद्धीवर आल्या नाहीत. तत्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना मोठ्या इस्पितळात दाखल केले गेले. उर्मिला ताईंना उच्च रक्त दाबाचा त्रास होताच, त्याशिवाय लेफ्ट वेंट्रीक्युलर हायपोट्रॉफी चा म्हणजेच एल वी एच आजार ही होता म्हणजेच हृदय पूर्ण कार्य क्षमते नुसार काम करीत नव्हते ! किर्लोस्कर कुटुंबाच्या आर्थिक आणि सामाजिक वजनामुळे  त्यांच्या नेहमीच्या फिजिशियन सोबतच एक सुसज्ज आणि अनुभवी हृदय रोग विशारद डॉक्टरांची संपूर्ण टीम आता त्यांना वाचवण्या साठी प्रयत्नांची शर्थ करीत होती. पुण्यातले सर्वात अनुभवी डॉक्टर डॉ. हेमंत भागवत परिस्थिती वर लक्ष ठेवून होते. त्यांनी राजीव, मधुरा आणि मयुरला केबिन मध्ये बोलावले 
" काय झालं सर ? आई कशी आहे ? तिला बर वाटेल ना ? " 
केबिन मध्ये आल्या आल्या मधुरा ने प्रश्नाची सरबत्ती सुरू केली
" होल्ड ..होल्ड..." तिला थांबवत डॉक्टर म्हणाले 
"हे पहा एक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला कुठल्याच भ्रमात ठेवू इच्छित नाही. आपल्याला ठाऊक आहेच की त्यांच्या हृदयाची कार्य क्षमता एल वी एच मुळे खूपच कमी झाली आहे. त्यामुळे सर्जरी करून देखील हृदयाला असणारा धोका टळणार नाहीये."
" मग डॉक्टर...आता काय उपाय आहे ?"
राजीव चा धीर आता सुटू लागला होता 
" सांगतो " डॉ भागवत त्याच धीर गंभीर सुरात पुढे बोलू लागले.
" हा त्यांना आलेला अटॅक एक  अॅडवान्स कार्डिओमायोपथी आहे म्हणजे एंड स्टेज कंडीशन." 
" डॉक्टर काही तरी उपाय असेल ना पण यावर? तुम्ही खर्चाची काही काळजी करू नका. फक्त आई ला यातून वाचवा." 
डॉक्टरांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच मधुरा रडवेली होत म्हणाली .
" बेटा इथे पैसा महत्त्वाचा नाही. योग्य आणि वेळेत केलेले उपचार महत्त्वाचे असतात ! यावर एकच उपाय आहे तो म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट करणे." 
डॉक्टरांनी तिला समजावले.
"पण सर आता हार्ट ट्रान्सप्लांट सहज शक्य असत ना? तुम्ही प्लीज ते अरेंज करा " हात जोडून विनवणी करत राजीव म्हणाला 
"तुमचं खरं आहे मिस्टर किर्लोस्कर पण ते वाटतं तेव्हढ सोपं नसतं. त्या साठी सुटेबल  हार्ट डोनर, तो ही जवळच्या जवळ उपलब्ध असायला हवा. शिवाय वेळ खूप महत्त्वाचा असतो. डोन्ट वरी आम्ही ऑलरेडी डोनर रिक्वेस्ट पाठवली आहे. संपूर्ण नेटवर्कमध्ये अजुन आठ ते दहा तासात सुटेबल डोनर उपलब्ध होईल अशी आशा आहे ! गुड लक." असे म्हणत टेबल वरचा स्टेथोस्कोप गळ्यात अडकवून  किर्लोस्कर कुटुंबाला अस्थिर, तणावात ठेवून डॉ भागवत केबिन मधून बाहेर पडले. इकडे मात्र सर्व जण काळजीत बुडाले, कार्यक्रमा साठी आलेले नातेवाईक, मित्रमंडळी सगळे हॉस्पिटल मध्ये हजर झाले. देवाचा धावा सुरू झाला. राजीव किर्लोस्कर आपल्या ओळखी आणि नेटवर्क वापरून हार्ट डोनर साठी प्रयत्न करू लागले 
"बाबा...चला डॉक्टरांनी बोलावलंय आपल्याला " हे मयुरचे वाक्य ऐकुन मधुरा आणि राजीव एकदम दचकून भानावर आले. 
"बहुतेक त्यांना डोनर मिळालाय " हे पुढचं वाक्य ऐकुन तर दोघांनी अक्षरशः डॉ. भागवतांच्या केबिनकडे धावच घेतली. 
"गुड न्यूज मिस्टर किर्लोस्कर. फायनली वी हॅव गॉट सुटेबल डोनर ऑफ हार्ट फॉर युवर वाईफ. कंडिशनिंग झालं की आपण लगेच ऑपरेट करू शकू."
आता मात्र तिघांच्या आनंदाला आणि आनंदाश्रु ना पारावार उरला नाही, ते घळा घळा वाहू लागले. डॉक्टरांचे आभार कसे मानावे हेच त्यांना समजेना आणि केवळ कृज्ञतापूर्वक हात जोडले गेले. त्याच रात्री उशिरा उर्मिला ताईंचे ऑपरेशन यशस्वी झाले ! आता आठ दहा दिवस हॉस्पिटल मध्ये राहून मग त्या घरी परतणार होत्या. दरम्यान ज्या डोनर व्यक्ती ने उर्मिला ताईंना हे 'जीवन दान"  दिले  त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना भेटून या कधी ही न फिरणाऱ्या उपकारा बद्दल आभार मानण्यासाठी आणि जी काही आर्थिक मदत लागेल ती करण्यासाठी माहिती घ्यायला. राजीव,मधुरा  आणि मयुर हॉस्पिटल प्रशासना च्या कार्यालयात गेले पण 
"माफ करा मिस्टर किर्लोस्कर पण ज्या डोनर चे हृदय तुमच्या मिसेस ना ट्रान्सप्लांट केलंय त्यांच्या इच्छे नुसार त्यांचे नाव आम्हाला गुप्त ठेवावे लागेल. त्यांनी केवळ हृदयच नव्हे तर किडनी आणि डोळे देखील दान केलेत आणि शरीर देखील आमच्या मेडिकल कॉलेज साठी डोनेट केलय." असं त्या हॉस्पिटल च्या चीफ मेडिकल ऑफिसरने त्यांना सांगितले. हे ऐकुन तिघांना ही खूप भरून आले. वाईट ही वाटले पण त्यांनी अखेर खूप आग्रह केल्यावर ते सांगायला तयार झाले 
"ज्या व्यक्तीने त्यांचे हृदय दान केलं आहे त्या आमच्या हॉस्पिटलच्याच हेड नर्स होत्या. प्रमिला मावशी. आय मिन प्रमिला चिटणीस." हे ऐकुन मधुरा चा श्वास आणि आवंढा दोन्ही गळ्यातच अडकले. राजीव आणि मयुर ला ही प्रचंड धक्का बसला होता ! 
काय बोलावं हे सुचेना , 
" आर यू श्युअर? " अविश्र्वासाने मयुर ने विचारले 
" येस ऑफ कोर्स. प्रमिला मावशी आमच्याच स्टाफ होत्या. रविवारी त्या कुठे तरी कपड्याच्या दुकानात गेल्या होत्या तिथून येताना त्यांच्या रिक्षाला एका टेम्पोची धडक बसली. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. इथे त्यांना ब्रेन डेड अवस्थेतच दाखल करण्यात आलं होतं. त्या आमच्या हॉस्पिटल मध्ये बरेच वर्ष काम करीत होत्या. त्यामुळे आम्ही त्यांना वाचवण्या साठी शर्थीचे प्रयत्न केले. पण दुर्दैवाने त्यांच्या त्या अवस्थेतून आम्ही त्यांना बाहेर काढू शकलो नाही आणि त्यांनी काही वर्षांपूर्वी त्यांनी केलेल्या इच्छा पत्रा नुसार त्यांचे अवयव दान करण्यात आले."
मधुरासाठी हे सर्व ऐकणे आता कानात तप्त शिसाचा रस ओतल्या प्रमाणे होत ! "
प्रमिला मावशी?  आपण जीला कायम तिरस्कृत केलं, टाळलं. तिने आईला हे जीवन दान दिलं? आणि रविवारी हा अपघात झाला म्हणजे आपल्याला साडीच्या दुकानात ती भेटल्यावर तिथून परतत असताना तिच्या वर हा काळाचा घाला घातला गेला होता ! " ही चुटपुट. अपराधी पणाची भावना तिला आता सहन होत नव्हती. ती रडतच तिथून बाहेर पळाली. 
     अखेर दहा दिवस रुग्णालयात काढल्यावर उर्मिला ताईना डिस्चार्ज मिळाला. घरी आल्यावर त्यांचं स्वागत करण्यास सगळे हजर होते. मृत्यूला पराभूत करून आल्या बद्दल त्यांचं कौतुक होत होते. मधुरा आतल्या खोलीत गेली आणि एक मोरपंखी शाल आणून आई ला पांघरली आणि स्वतः चे ओले डोळे पुसले. हीच शाल प्रमिला मावशी ने रविवारी तिच्या ऊर्मीताई साठी घेतली होती. प्रमिला मावशी च्या सहकारी नर्स ने मधुरा कडे आणून दिली होती.
मधुराला ही ती शाल पांघरलेल्या आईकडे पाहून जाणीव झाली की आयुष्य भर केवळ " सहन" करणारी प्रमिला मावशी जाता जाता तिच्या आई ला हे अमूल्य " जीवन दान " करून देऊन गेली होती. तिची आई जरी नावाने असली तरी ..प्रमिला मावशी खऱ्या अर्थाने  कर्माची ' राणी ' होती.

1733. तिची निवड

      सोनाली सारख्या गोड मुलीला गोलू हे नाव कसं पडलं कोणजाणे.. पण ज्या मोजक्या मंडळीना तिला गोलू हाक मारायचा अधिकार आहे त्यात आम्ही दोघे येतो.ती आमची लाडकी आहे म्हणून सांगत नाही, पण आमची गोलू खरच गोड आहे, उमाच्या शब्दात सूंदर आहे जरा तोंडावर ताबा ठेवला तर तिच्यात अजूनही फरक पडेल पण तसा फरक पडण्याची सध्या तरी चिन्ह दिसत नाही. कारण एकटी उमा बोलून बोलून किती बोलणार? तिच्या घरी तिचे पप्पा जी बोलतील ती पूर्व दिशा धरली जाते पण ते घरी असतात कुठे? आजी आहे जी गोलूला सकाळी नऊ वाजता सुद्धा उठवताना तिच्या अंगावर अजून एक चादर घालते. अजूनही ती महतप्रयासाने उठल्यावर तिला भिजवलेले बदाम खायला घालते. पप्पाना आपल्या बिझनेस मधून डोकं वर काढायला वेळ नाही. याचा अर्थ त्याना आपल्या गोलूची काळजी नाही असं नाही. पण तिच्या भविष्याचा विचार त्यानी आधीच करून ठेवलाय. त्यांच्या तोलामोलाच्या घराण्यात प्रताप धारगळकरशी तिचं लग्न पक्कं ठरवलय.हे गोलूला माहीत नाही असं नाही. पण वेळ आली की बघू असा गोलूचा संथ अँटिट्युड आहे. उगाच अत्ता पासून कशाला पप्पांसारख्या हटवादी माणसाशी दोन हात करा? असा तिचा सवाल आहे.
     उमाला म्हणूनच तिची काळजी वाटते. कारण सिद्धार्थ तळपदे तिला खूप खूप आवडतो हे त्याला सोडून आम्हा सगळ्याना माहीत आहे. आणि सिद्धार्थ सारखा सामन्य घरातला मुलगा तिच्या पप्पाना फुटी आँख भावणार नाही याची ती सोडून आम्हाला कल्प्ना आहे. म्हणूनच सिद्धार्थ तिला भाव देत नाही. ज्या गावाला जायचंच नाही त्या गावचा रस्ता विचारयचाच कशाला ? या मताचा तो आहे आणि आपल्या मतावर ठाम आहे. त्याच्या मते गोलूम्ह्णजे एका श्रीमंत घरातली लाडावलेली सुस्तावलेली गब्दुल मांजर आहे. आणि अशी मुलगी आपल्याला परवडणार नाही. सिद्धार्थ मुळातच जरा गंभीर कणखर मुलगा आहे त्याच्या वर लहानपणापासूनच जबाबदारीचं जोखड आहे आणि त्याची त्या बद्दल काही तक्रार नाही. उलट त्याला आपल्या माणसांबद्दल प्रचंड आत्मियता आहे. ज्याला तो आपला मानतो त्याची जबाब्दारी तो स्विकारतो. म्हणूनच गोलू सारख्या लाडावलेल्या जडावलेल्या मुलीला आपली म्हणून त्याला नं झेपणारी जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यायची नाही असं तो वारंवार म्हणून स्वता:ला बजावतो. पण खरं सांगू त्याला सुद्धा आमची गोलू खूप खूप म्हणजे खूप आवडते.पण ती समोर आल्यावर त्याला काय होतं माहीत नाही तिला तो मांजर म्हणत असला तरी तो कायम बोक्यासारखा तिच्यावर फिसकारत असतो. या उलट धारगळकरांचा प्रताप. आपल्याला लग्न या मुलीशी करायचय म्हंटल्यावर तो अत्तापासूनच गोलूला फुलासारखं जपायचा सराव करायला लागला.
    प्रताप तसा हार्मलेस आहे, साधासरळ आहे.तो ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलाय. आयता हातात आलेला घरचा बिझनेस गोलूशी लग्न झाल्यावर विनासायास आणखी वि्स्तारणार असेल तर कोण कशाला हरकत घेईल आणि प्रताप सारखा मुलगा तर नाहीच घेणार. गोलूला हाच प्रश्न पडला की हा माझी इतकी मर्जी सांभाळायला धडपडत असताना मी त्या सिद्धार्थ साठी का व्याकूळ होते? जो सतत मला हडत हुडूत करतो, मला भाव देत नाही... माझा पाण उतारा करण्याची एक संधी सोडत नाही. घराला गरज म्हणून जेंव्हा उमाने गायनाचे क्लासेस सूरू केले तेंव्हा ही गोलू गाणं शिकायला म्हणून आमच्याकडे आली आणि तेंव्हा सिद्धार्थ तबल्याची साथ करायला म्हणून यायचा.  तेंव्हा गोलूचा आवाज सूंदर उगीच तुलना करत नाही पण साधारण माणिक बाईंच्या गाण्याची आठवण यावी त्या धाटणीचा. तिच्या पप्पाना हिचं गाणं बजावणं मान्य नव्हतं पण आजीच्या हट्टापुढेत्यांचं तेंव्हा काही चाललं नाही. पण कोणतीही गोष्ट गांभिर्याने करायचा तिचा स्वभाव नाही 
      त्यात ते गाणं अधांतरीच राहिलं पण आमच्याशी असलेला रुणानुबंध अबाधीत राहिला शिवाय दोघं त्यांच्या नकळत एकमेकांसाठी या घराला धरून राहिले. हा सुप्त हेतू त्या दोघांच्याही लक्षात आला नाही. पप्पांच्या आँफीसमधल्या संगणकांची मरम्मत सिद्धार्थच्या फर्म तर्फेच होत असायची पण पप्पाना हाँजी हाँजी करणारे नमुने जमवायची सवय त्याना आमचा बाणेदार सिद्धार्थ तळपदे  कसा परवडणार? तो आमच्याकडे येतो म्हंटल्यावर त्यानी गोलूला आमच्या घरी येण्यावर रोक लावली होती. पण त्याना घोळात घेऊन गोलू आमच्याकडे यायचीच. सिद्धार्थला तिचा हाच स्वभाव आवडत नाही म्हणजे तेंव्हा आवडायचा नाही. बिझनेसमनची मुलगी ती अशीच डिप्लोमँटीक वागणार असं तो तिरसटून म्हणायचा पण जेंव्हा घरात प्रतापशी साखरपुड्याची चर्चा रंगायला लागली तशी गोलू अस्वस्थ झाली. काय तो निर्णय घेणं गरजेचं होतं सिद्धार्थ त्याविषयी बोलायला तयार नव्हता तिच्या हट्टी अहंकारी बापाशी दोन हात करण्यात मला माझी जिंदगानी वाया घालवायची नाही. माझ्यावर भावंडांची जबाबदारी आहे. तिला काय? फक्त या घरातून त्या घरात जायचय शेवटी तिच्यावर हुकुमत तिच्या पप्पांचीच राहणार. मान राखणं वेगळं आणि मर्जी राखणं वेगळं जे प्रतापला जमेल ते मला जमणार नाही. जी तोफ डागायची ती सिद्धार्थने डागली पण यावेळी दोघे भांडले नाहीत. तू तू मैं मैं झाली नाही. कारण सोनाली अंतर्मूख झाली विचार करायला लागली आणि शेवटी तिने निर्णय घेतला तिने पप्पाना सरळ सांगितलं प्रताप चांगला मुलगा आहे पण नवरा म्हणून मी त्याचा विचार करू शकत नाही. पप्पा म्हणाले तू विचार करूच नकोस तुझी आईपण फार विचार करायची म्हणून आमचं पटलं नाही. हे वैभव सोडून गेली आता काय प्राध्यापकी करत दिवस कंठतीये. आईची आठवण झाल्यावर तर गोलू अधिकच व्याकूळ झाली. निर्णय घ्यायचा हाच क्षण होता हीच वेळ होती पण तिला सिद्धार्थचा सपोर्ट नव्हता, आम्हीही काही करू शकत नव्हतो पण उमाने तिच्या आईची मदत घेतली माधवी सिद्धर्थला भेटायला तयार झाली भेटली पण तो तेच म्हणाला जाणीव नावाची गोष्ट असते जी बाहेरून लादता येत नाही इंजिक्षनने मनात भरता येत नाही. तुमच्या मुलीला सुखाची स्वय आहे. तिला सुखात राहुदे. माझ्याशी लग्न म्हणजे पावलो पावली तडजोड आहे जे तुमच्या मुलीला जड जाईल तिच्या सूखासाठीच मी तिला नाकारतोय
    प्रतापने पण तिला समजावलं अगं हळू हळू तुला माझी सवय होईल. आणि सवयीने तू सूखात राहयला शिकशील. शेवटी लाईफचा गेम हा सेफलीच खेळावा लागतो. तिच्या साखरपुड्याची तारिख ठरल्यावर सिद्धार्थ बाहेरगावी निघून गेला म्हणजे पप्पानीच तशी योजना आखली आणि सिद्धार्थ त्या नुसार दूर गेला. गोलू अगदी एकटी पडली. पप्पा तर इरेस पडल्यासारखे वागत होते आणि थोडं फिल्मी वाटेल पण आमच्या गोलूने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला ती असं काही पाऊल उचलेल हे आम्हाला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं सकाळी सकाळी आजीचा फोन आला आम्ही दोघे धडपडत गोलूच्या टोलेजंग घरात गेलो तेंव्हा तिला हाँस्पिटल मधे हलवायची गडबड चालू होती. झोपेच्या गोळ्या घेऊन गोलू मोकळी झाली होती पण तिचा जिव मोकळा होत नव्हता. पप्पा हताश झाले होते. गोलूला तिच्या मामाच्याच हाँस्पिटल मधे हलवलं बातमी बाहेर पसरू नये म्हणून खबरदारी घेतली जात होती पप्पा हताश झाले होते प्रताप अपराध्यासारखा उभा होता. हीची आई घर सोडून गेली पण ही तर जगच सोडून जायला निघाली. अरे इतका का मी जल्लाद आहे? आपल्या मुलीला सुखाच्या राशीवर बघायचं स्वप्न पाहिलं तर काय बाप म्हणून मी चुक आहे का? असं काय काय पप्पा हातवारे करत बोलत होते मला वाटत आपल्या मुलीवर आपलं किती किती निरातिशय प्रेम आहे याची त्याना पहिल्यांदीच जाणीव झाली होती. गोलू सगळ्या रागा लोभाच्या पलिकडे गेली होती तिला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू होते डाँक्टरमामानी चोवीस तासांची मुदत दिली होती आम्ही दोघे रामरक्षा म्हणत तिथे बसून होतो ज्या ज्या मंडळीना बातमी कळ्त होती ती ती पप्पांभोवती जमत होती आणि पप्पाना गोलूशिवाय कोणीच नको होतं
     परमेश्वराची कृपा की गोलू वाचली फक्त एकच फार वाईट झालं. गोलूचे डॊळे गेले त्या जहाल गोळ्यानी गोलूचे प्राण दृष्टीच्या बदल्यात परत केले होते. आपण आंधळे झालोय हे तिला सांगितलं नव्हतं कोणी सांगायचं कसं सांगायचं हेच कळत नव्हतं ती शुद्धीवर आली तशी तिला साधारण कल्पना आली असावी पण ती कोणाशीच बोलत नव्हती. डाँक्टर प्रतापला म्हणाले तुलाच जास्त समजून घ्यावं लागणार आहे. तो म्हणाला मी कशाला? आम्ही म्हणालो अरे लग्नानंतर तुलाच तिला सांभाळायचय. जपायचय. तो भेदरून म्हणाला माफ करा पण भावनेच्या भरात नको तो निर्णय मी घेणार नाही. एका अंधळ्या मुलीबरोबर संसार करायची माझी तयारी नाही. आम्ही म्हणालो अरे तुझं प्रेम आहे ना तिच्यावर? तो म्हणाला प्रेम आहे म्हणून कायएका अंधळ्या मुलीचा मी स्विकार करू? 
प्रतापला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आमचा हिरो तणतणत हाँस्पिटल मधे आला सगळे गोलूशी गोड गोड बोलत असताना कंटिन्युटी सांभाळत तो गोलूवर खेकसला. " हा काय मुर्खपणा आहे. बापाला ठणकाऊन सांगता येत नाही म्हणून काय आत्महत्या करायची? एव्हढा जिववर आलाय? तुला काय वाटलं तू माझ्यासाठी जीव दिल्याचं कळल्यावर मी तुझी पूजा करेन? आयुष्य कधीच कोणासाठी अडून राहत नाही. गोलू शांतपणे म्हणाली पण माझं आयुष्यच काय माझा प्रत्येक क्षण तुझ्याशिवाय अडतोय सिद्धार्थ. मेले असते तर सगळेच प्रश्न सुटले असते आता नव्याने विचार करायला हवा. 
     आता नव्याने विचार काय करायचा? गोलू म्हणाली माझे डोळे गेले आता या अवस्थेत मी तुझी आणखी जबाबदारी वाढवणार नाही, प्रताप अत्ता नाही म्हणाला पण तू तर कधीच हो म्हणाला नव्हतास. व्याकूळ होत सिद्धार्थ म्हणाला गोलू तुला खरच काही कळत नाही. एका ’हो” वर सगळं तोलून धरत होतीस?  आपण खूप भांडत होतो हे मान्य्पण खरं सांग माझ्या मनातलं गूज तुला कधीच जाणवलं नाही?  आयुष्यात पहिल्यांदी तो तिला गोलू म्हणाला होता.गोलू स्वत:ला सावरू शकली नाही ती रडायला लागली तो मायेनं तिला जवळ घेत म्हणाला अगं कशाला रडतेस? डोळे गेले वाईट झालं पण आता ती फार मोठी गोष्ट नाही माझे डॊळे आहेत ना..तू माझ्या डोळ्यानी जगाकडॆ बघ तसं ही दाखवल्याशिवाय तुला काही दिसायचच नाही कारण कधी लक्षपुर्वक काही करायची सवयच नाही. आपल्या वेडेपणाची शिक्षा मिळाली असं समज आणि जे आहे ते मान्य करून टाक.  जे आहे ते मान्य करून टाक म्हणजे? पप्पा कडाडले. मझी तरणीताठी पोर आंधळी झालिये..
सिद्धार्थ शांतपणे म्हणाला हो ! पण ती जिवंत आहे तुमच्या समोर आहे हे काय कमी आहे? पण ती पुढचं आयुष्य कसं काढेल? तू करशील तिच्याशी लग्न? सिद्धार्थ म्हणाला त्यासाठीच तर धावत आलो मी, माझ्याशिवाय तुमच्या पोरीला कोण समजून घेऊ शकतं? काळजी करू नका मी जबाबदारीला भीत नाही आणि गोलू माझी नुसती जबाबदारी नाही माझं प्रेम आहे. माझं पहिलं प्रेम. सिद्धार्थचं बोलणं ऐकून पप्पाना अश्रू आवरता आले नाहीत. बेटा मी चुकलो सवयीने तुझं सूख कशात आहे हे सुद्धा मीच ठरवायला गेलो. या पोराने माझे डोळे उघडले मला क्षमा कर
     पप्पानी जोडलेले हात हातात घेत गोलू म्हणाली, पप्पा आधी तुम्ही मला क्षमा करा. मी तुम्हाला रडवलं आधी आत्मह्त्या केल्याचं नाटक केलं आणि मग मामाच्या मदतीने डॊळे गेल्याचं नाटक केलं. हा प्लँन अचानक सुचला आणि मामानी नं भिता मला साथ दिली आजीचाही सहभाग होताच. मला माहीत होतं माझी निवड कशी योग्य आहे हे मी दहा पानी निबंध लिहूनही तुम्हला कळलं नसतं. ते याने इथे येऊन दोन मिनिटात सिद्ध केलं. कधी कधी खूप खूप आनंद झाला तरी बोलता येत नाही. तसं झालं वातावरणात एक तृप्तीची शांतता पसरली मग कोण काय म्हणालं कोण काय म्हणालं  हे सांगत बसत नाही. पण जे झालं ते परमेश्वर कृपेने छानच झालं.

चंद्रशेखर गोखले 

1732. मनोमिलन

      सूनबाई ! आज ताक करायला घ्या. साय खूप साठली. दही आंबट झालेय. सासूबाईंचा सकाळी सकाळी सुचनावजा आदेश ! 
हो सासूबाई. शरयू पण एक सुपर वूमन असल्याचा आवेशाने बोलली. आजचा रविवार जरा निवांतच होता. ब्रेकफास्ट आवरून थोड्या वेळाने स्वयंपाकाचे पाहू म्हणून मधल्या वेळेत पटकन ताक करून घ्यावे, आणि सासूबाईंना तरंगलेला लोण्याचा गोळा दाखवावा म्हणून शरयू कामाला लागली. गेली २८ वर्षे बँकेची नोकरी , धावपळ यातून नुकतीच तिने VRS घेतली. १५ दिवस जरा कागदपत्रे सुपूर्द करण्याच्या कामात गेली, आणि आता मस्तपैकी रिलॅक्स जीवन जगायच्या मूडमध्ये हवेत तरंगू लागली. विचार करता करता. पटकन पाच मिनिटात उरकावे तर कसलं काय अन फाटक्यात पाय !!  माझं नशीबच फुटकं म्हणायची वेळ शरयू वर आली. अचानक हँड ब्लेंडर काम करेंनासे झाले, फूड प्रोसेसरनि मान टाकली, फक्त मिक्सर चालू झाला. तर त्याचे भांडे पण रागारागात आपटून जरा हतबल झाले होते. म्हटलं चला चालू आहे ना !! तसेच त्याला चिरंजीवांनी सेलो टेप लावून दिले. पहिला बार उडवला, अन जणू काही ती आत बसून लपून कृष्णासारखी दही, लोणी खाते असा अवतार झाला. पूर्ण चेहऱ्यावर दही उडाले. चिरंजीवांनी खो - खो हसत, आपल्या बाबांना आवाज दिला.
नवरोबा तर काय रविवारी दिवसभर सोफ्यावर बसून आई शी गप्पा !! ( आठवड्याचा बॅकलॉग भरून काढायचा असतो ना ! सुट्टीच्या दिवशी या श्रावण बाळाला. आईशी गप्पा मारून ) न्युज पेपर, आणि TV चा रिमोट हातात घेऊन होते. असो. ते जरा धावतपळतच किचनमध्ये आले आणि हिचा अवतार बघून. बस एक फोटो म्हणून मोबाईल आणायला धावले, तसे शरयुने रागारागाने किचनच्या सिंकमध्येच तोंडावर पाण्याचे फवारे मारले. इकडे सासूबाईना अंदाज आला काय घडले याचा !! त्या ही गालातल्या गालात हसत होत्या. वरून पुन्हा बसल्याजागी. अग !! सोड ते रवीने घुसळ. पटकन लोणी निघेल बघ,  शेवटी काय जुने ते सोने कामाला आले.. पण म्हटल्या नाहीत !! दे मी बसल्या बसल्या करते म्हणून. आज जणू काही सगळ्यांनी माझ्याशी असहकार शरयुने ही मग जिद्दीने सगळी कामे उरकली आणि दुपारची वामकुक्षीकडे पळाली. आजचा निम्मा दिवस यातच गेला.  या गुस्स्यात होती. आणि ठरवले  आज संध्याकाळी एकटीच जवळच्या पार्कमध्ये जाऊन संध्याला भेटायचे तसा निरोप तिला सेल वर दिला.
    संध्याकाळी सहा वाजता आवरून शरयू तयार झाली, तसे सिद्धार्थने अंगावर शर्ट - पँट चढवला ....चला आज कुठे जायचे !! शरयू ने रागातच त्याला उत्तर दिले. मी मैत्रिणीला भेटायला एकटीच जाणार तुमचे आपले चालू द्या उगाच त्यात व्यत्यय नको, त्याला तेच हवे होते. तेवढ्यात वाद नको म्हणून शरयूचे सासरे म्हणाले, चल मी तुला जाता जाता सोडतो. पार्क येताच ती उतरली. सासऱ्यांनी सांगितले "सुनबाई तुमच्या गप्पा झाल्या की सांगा. मी येताना तुम्हाला न्यायला येतो नाहीतरी मला दोन तास लागणारच आहेत मित्राकडून यायला ."
मनात ती म्हणाली चला, सासऱ्यांची ढाल पुढे करून मस्त दोन तास संध्या बरोबर गप्पा - खाणे उरकू.
पार्कमध्ये संध्या वाटच पहात होती शरयूच्या चेहऱ्यावरून तिने अंदाज काढला, आज  काहीतरी बिनसले घरात !! आणि आता आपल्याला एक तास निमूटपणे बसून ऐकावे लागणार. बोलून मोकळी झाली शरयू की मग तिला काय ते सांगू !! शरयूने दिवसभर घरातल्या घडामोडी अन पाढा वाचला. संध्या गप्प बसून ऐकत होती. अखेर तिलाच राहवले नाही व ती बोलली. झाले का शरयू तुझे  बोलून. आता थोडे मी काय सांगते ते ऐक.
    हे बघ शरयू !! तुझ्या सासूबाई ही सर्व्हिस करत होत्या. सिद्धार्थ सारखा हुशार नवरा तुला मिळाला. तो ही एकुलता एक मुलगा आहे देशपांडे  यांचा !! आणि तुझा मुलगा अथर्वच्या संगोपनासाठी तुझ्या सासूबाईंनी VRS घेतली हे विसरू नकोस. त्याही घरचे सगळे पाहून नोकरी करत होत्या. तुझे सासरे तर देवमाणूस. शांत आणि संयमी व्यक्तिमत्व !! उलट तू खूप नशीबवान आहेस. एवढे वर्ष त्यांनी घरदार, अथर्वला नीट सांभाळले, कसलीही कुरबुर न करता आणि आता तुला वाटतेय का त्यांना घरात बसून काय काम आहे. आज तूच एवढी चिडतेस, पण आता त्यांनाही थोडी विश्रांतीची गरज आहे. त्यांच्या वयोमानापरत्वे !! त्यांच्या जागी तुझ्या आईला ठेवून बघ !! काय विचार करशील !! आणि बरं. जमेल तश्या त्या तुला मदत करतातच ना !! तुम्हा दोघांमध्ये कधी लुडबुड नाही. तुला हवा तसा मोकळेपणा, स्वतःची स्पेस मिळतेच ना...! मग आता थोडी कामे पडली तर चिडू नकोस. तू आनंदी राहिलीस घरात तर घरदार सुखी - समाधानी !! घरात भांड्याला-  भांडे लागता काम नये.  तशा त्या आणि बाबा ही आधुनिक विचारसरणीचे आहेत असे कुटुंब मिळायला भाग्य लागते. तू एवढी वर्षे सर्व्हिस करत असल्याने घरात कामाच्या जबाबदाऱ्या तुझ्यावर अशा जास्त कधी पडल्या नाहीत म्हणून तुझी चिडचिड होतेय बाकी काही नाही. उलटपक्षी आता दोघी सासू -सूना मस्त एन्जॉय करा  एकमेकींचा सहवास.. एखादा सिनेमा, नाटक,  प्रदर्शन बघायला जात जा !! काही वेळेस त्यांनाही शॉपिंगला ने तुझ्या बरोबर !! आणि हो... जरा थोडे त्यांच्याशी गोड बोलून त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढव !! बघ कशा त्या खुश होतील !! शेवटी काय ग. बाईची जात. दोन प्रेमाचे शब्द ऐकायला आसुसलेली असते !! बघ पटतंय का मी काय सांगते ते !!
    तेवढ्यात शरयूला बाबांचा फोन आला. मी निघतोय जाऊया का घरी? तसा. शरयूने संध्याचा निरोप घेतला, आणि डोळ्यात पाणी आणून बोलली. संध्या थँक्स डिअर. आज खरंच तू माझे डोळे उघडलेस !! तुझा हा मोलाचा सल्ला मी  चांगलाच लक्षात ठेवीन !! आणि हो. या सुट्टीत आपण वीणा वर्ल्ड च्या वुमन स्पेशल टूर वर जाऊया !! आपण दोघी, आपल्या सासवा आणि आई. दोघी मैत्रिणी एकमेकांचा निरोप घेऊन निघाल्या.
शरयू प्रसन्न मनाने घरी परतली, तर तिच्या सासूबाई आणि त्यांचा श्रावणबाळ मिळून बटाटेवडे करत होते. दार उघडताच वड्याचा घमघमाट सुटला !! तिने धावतच येऊन सासूबाईंना मिठी मारली. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वहात होते. सिद्धार्थ, बाबा, आणि अथर्व या दोघींचा मनोमिलन सोहळा कौतुकाने पहात होते. I am sorry Aai ! तशा तिच्या सासूबाईंनी हळूवार डोळे पुसत तिला आदेश दिला. चल आता पटकन गरमागरम वडे खाऊन घे ! भूक लागली असेल तुला !! दिवसभराचा ताण - तणाव दूर होऊन अख्खी फॅमिली गप्पात रंगून गेली आणि सिध्दार्थने आईकडे बघून हळूच डोळे मिचकावले 

©️®️सौ राजश्री भावार्थी, पुणे.

( #अनुरव_दिवाळी_अंक_२०२० व #कुबेर_संवादिनी प्रकाशित कथा )

1731. काय चुकलय माझं?

    वैशूने अत्यंत आनंदाने सर्वात आधी भावाला call लावला. दादा अरे मी कंपनीची सीईओ झाले. लगेच मला अत्यंत सन्मानाचे असे चे स्मार्ट वुमन ॲवॉर्ड ही मिळणार आहे. वहिनीलाही सांग आणि तुम्ही सगळे या माझ्या ॲवार्ड कार्यक्रमाला. मी तुम्हाला कळवते तसे. अरे वा अभिनंदन तुझे. म्हणत भावाने फोन ठेवला सुध्दा. आई बाबांची ची खूप आठवण येतेय. आज असायला हवे होते ते. माझे हे यश पाहायला. दादा नाराज आहे अजूनही. सारखा म्हणतो आई  केव्हढी आठवण काढत होती तुझी जाताना. सगळा जीव तुझ्यात अडकला होता तिचा. पण तू  यायला उशीर केलास. " 
    दादाची आजची रुक्षता तिला चांगलीच जाणवली. ती त्यावर विचार करीत असतानाच तिचा मोबाईल वाजला आणि अभिनंदनाचे एका मागून एक फोन यायला लागले. दुसऱ्या दिवशी तिने तिच्या कौटुंबिक whatsapp समुहांवर ही आनंदाची बातमी शेअर केली. तीन मामा, एक मावशी, चार काका, काकू, एक आत्या ,सगळी आते मामे चुलत भावंड. सगळ्यानी congratulation करीत तिला दाद दिली पण त्या व्यतिरिक्त काहीच नाही कुणी साधा फोन सुध्दा केला नाही. आई गेली तिच्या सोबत सगळी नाती सुध्दा संपलीत की काय? या विचाराने तिला अस्वस्थ केले. आज लवकर जायचय. मिटींग आहे. तीने आवरायला घेतले. ती केबीन मधे चेअरवर जाऊन बसली. मिटींग आटोपली तशी स्मिता मॅडम नी रजेचा अर्ज दिला. इतके दिवस कुठे जाताय? मामाकडे त्याच्या मुलीचे लग्न आहे जरा चार दिवस आधी जाते. तेव्हढीच माझी मदत होईल ना तयारीला. वेळेवर गेले की काय काम करणार न. मामाशी असलेले त्यांचे नाते आणि आजवर मामाने त्यांच्यासाठी केलेल्या गोष्टी सांगत त्या म्हणाल्या.
       आपण ही जाणीव ठेवायला हवी ना. आई वडील असो वा नसो या नात्यानी जर आपल्याला विचारायला हवे असेल तर आपण ही त्याना वेळ द्यायला हवा. स्मिता मॅडम गेल्या  आणि तिला एकदम आई आठवली. सारखी सांगायची. वैशू,  अग आपल्या माणसांसाठी वेळ काढावा ग थोडातरी. सगळ्या मामा काका आत्या मावशीची केव्हढी लाडकी होते मी. उच्च शिक्षणाच्या निमित्याने ती पुण्यात आली तशी आई कायम फोनवर सांगायची. मामा काकाला एक फोन कर. मावज बहिणीला मुलगा झाला मावशी शी बोल जरावेळ.  काकूची आई गेली परवा. तर मामे भावाला फर्स्ट क्लास मिळाला. प्रत्येकाच्या घरातल्या विशेष प्रसंगाना अधोरेखित करुन ती सतत मला फोन करण्यासाठी बजावायची. मी ही तिला हो म्हणायचे पण विसरायचेच. पण मामा काका आत्या मावशी मात्र शिक्षण होईपर्यंत नौकरी लागल्यावर सुध्दा आवर्जून फोन करणार. वाढदिवस किंवा माझ्या प्रत्येक यशाच्या वेळी माझे कौतुक माझ्यासाठी आर्वजून काहीतरी वस्तू आणणं सणावाराला अगदी आठवण ठेवून मला विचारणं. माझे कौतुक करणं. कामाच्या नी यशाच्या धुंदीत हे सगळं हळूहळू बंद होत चाललय हे लक्षातच आले नाही माझ्या. 
      दादाचे आणि माझे लागोपाठ लग्न झाली. या तीन वर्षात तर माहेरच्या नात्यातील माझी गुंतवणूक तर जणू संपूनच गेलीय आणि सासरी सुध्दा वेळ नाही ही सबब कायमच. खरच सासरी माहेरी कुठेच राहिले नाहीत आपले संबंध भांडण नाही कुणाशी पण नात्याचा स्नेहबंध ही नाही ना राहिला. तिला तिची वहिनी आठवली. सगळ्या नातेवाईकान्मधे अगदी प्रिय होती ती. अगदी माझ्या आईसारखी.  वाढदिवसाला आवर्जून फोन सणावाराला भेट देणं. तिच्या घरी कायम सगळ्यांच येणजाणं. ॲवार्ड कार्यक्रमाला सगळे येतीलच त्यावेळी नक्की संवाद साधायचा. वैशुने मनोमन ठरवले. ॲवार्ड कार्यक्रमाचा दिवस वैशू स्टेजवर. ॲवार्ड घेतेय. तिने समोर पाहिले तर फक्त सगळे निमंत्रित. आप्त कुणीच नाही. टाळ्या वाजत होत्या. पण त्या मनापासून होत्या का? लग्नानंतर  आई तिला एकदा  म्हणालेली. एका ती ची गोष्ट सांगतेय तुला.  नीट ऐक. विचार कर गोष्टीचे नाव आहे "निर्णय" पण मला वाटतं या गोष्टीचे नाव "भान" असायला हवे होते.  नाव असू दे काहीही त्यातला मतितार्थ  वेळीच लक्षात घे हो. सांगतेय ऐक जरा.  
    आज "ती"  यशाच्या उंच शिखरावर विराजमान झालीय. सहज म्हणून ती खाली पाहते. असंख्य दिसतात तिला पण तिच्यासाठी मनापासून टाळ्या वाजवणारे तिच्या कौतूक करणारे तिला कुठेच दिसत नाही. अगदी परवा परवा पर्यंत अवतीभवती असणारी सारी गेली कुठे? ती शोधू लागते. त्यांच्या आठवणीनी बेचैन होते. यशाची शिखरे चढतांना नकळतपणे एकेक हात सुटत जाताना दिसू लागतो. सगळे आहेत पण माझ्यापासून दूर खूप दूर गेल्यासारखे वाटताहेत. काय चूकल माझ ? माझा करीयरचा निर्णय? फोन वाजतोय माझा. अरे वा मावशीचा फोन 
thanks तू फोन केलायस फक्त. तुला काहीतरी विचारायचय मला. काय चुकलेय माझं?
हो सांगते ना.
    करीयर चा निर्णय चुकीचा नव्हता आणि नाही पण निर्णया मागे धावताना ज्यानी तुला निर्णयात साथ दिली त्या आपल्या माणसांसाठी थोडा तरी वेळ काढायला हवा ना. संवादाच्या हजारो माध्यमातून जगभर संवाद साधताना आपल्या माणसाना मात्र तू गृहीतच धरलस  अस नाही का वाटत तुला. निर्णय घेतला यश ही मिळाल पण निर्णय ते यश या प्रवासात माणस दूर गेली. भान महत्वाच ...😊 त्या गोष्टीतली  "ती" कधीतरी "मी"  असणार आहे हे आईला आधीच कळलेले का ? 

सौ साधना डोंगरे 😊🙏

1730. स्पर्श

     संध्याकाळचे सात वाजत आले होते, सारिका आता घरी येईलच या विचाराने राधिकाने झटपट आवरायला सुरुवात केली. अन दारावरची बेल वाजली. रियाने दार उघडताच " तायडे, कोल्ड कॉफी प्लिज " अशी आरोळी कानी पडणार या विचारात असतानाच दरवाजा आदळल्याचा आवाज आला अन सारिका तिच्या रूम मध्ये काही न बोलताच निघून गेल्याच तिने पाहिलं. १२ वर्षाच्या तिच्या लाडक्या भाचीशी रियाशी सुद्धा ती एक चकार शब्द बोलली नाही. आज इतकं काय बिनसलंय हीच की माझ्या लेकीशीही बोलली नाही? काय झालंय? राधिका काळजीनेच रिया ला घेऊन सारिकाच्या रुमपर्यंत पोहोचली. "सरे दार उघड, काय झालं?" तिच्या या प्रश्नावर सारिकाने दार उघडलं आणि "रियू तू जा जरा, मला ताईशी बोलायचंय." असं म्हणून तिने रियाला परत पाठवलं. मावशीचा रडवेला की रागावलेला विचित्र चेहरा पाहून रिया निमूटपणे मागे फिरली.
     सारिका एकदम खेळकर, बिनधास्त मुलगी होती. रोखठोक वागणारी; मुळूमुळू रडत बसणारी तर ती अज्जिब्बात नव्हती पण आज तिला पाहून राधिकाला एवढं नक्की कळलं, की काहीतरी चुकीचं घडलंय. पण बहिणीचा स्वभावही तिला माहित होता. लहानपणापासूनच असं काहीही वावगं घडलं की ती धुसफुसत रहायची , इकडचं तिकडंच, मागचं, पुढचं सगळं बोलून झालं की मग एकदम वीज कोसळल्यासारखी तडकायची, खऱ्या मुद्द्यावर यायची त्यामुळे राधिका वाटच पाहत होती की ती कधी बोलतेय. अन सारिकाने तोंड उघडलं... " ताई तुझी मुंबई. अज्जिब्बात सेफ नाहीये. किती अभिमान होता मला ह्या शहरावर. तुला मुंबईला देणार हे कळल्यावर सगळ्यात जास्त सुखावले होते ती मी. शिक्षण अन नोकरी इथेच करणार. हा हट्ट धरला. तू अन भाऊजी दोघांनीही मला आधार दिलात अन मी इथली झाले. अगदी स्मार्ट अन बोल्ड. ह्या शहरातल्या गर्दीमुळे अन रोजच्या धक्क्यांमुळे शिकत गेले, घडत गेले, सावरायला शिकले.
    नवीन अनुभव मिळवत गेले. मला वाटायचं की मी एकदम धाडसी झालेय आता. कोणालाही कुठंही सडेतोड करू शकेन. पण नाही ग. मी अजूनही घाबरट आहे ग. खूप विचित्र वाटलं मला आज. तुला माहितीय, आत्ता घरी येताना, त्या नेहमीच्याच गर्दीतून येत होते. माझे आज घातलेले कपडे बघ. सगळं ठीक आहे. मागून थोडा गळा अन पाठ फक्त उघडी आहे. म्हणजे तुमच्या त्या ब्लाउज मधूनही जेवढी पाठ दिसते त्यापेक्षाही कमी पाठ उघडी आहे ग माझी." तिचे हे असलं बोलणं सुरु झालं आणि राधिका मनातून पूर्ण घाबरली. काही अभद्र विचार मनात येत राहिले अन सारिकाच्या बोलण्याकडे ती कान, हृदय, मेंदू सगळं एकवटून ऐकू लागली. " ताई ताई. घरी येताना त्या गर्दीत पाठीवरून बोट फिरवली ग कोणीतरी. अगदी किळस आली मला तो स्पर्श. तो स्पर्श पुरुषाचा नव्हता ग. माझ्यासारख्याच स्त्री चा होता. एका तरुणीची बोटे होती ती. मागे वळून पाहिलं तर तिने ओठांचा चंबू करून डोळे मिचकावले. कोणी पुरुष असता तर थोबाड फोडलं असत ग. पण तिला पाहून गांगरून गेले ग मी. अन जीव मुठीत घेऊन पळत आले घरी. स्त्री म्हणजे. मायेचा, ममतेचा, प्रेमाचा स्पर्श इतकच माहित होतं आजपर्यंत. पण आजचा अनुभव, आजचा स्पर्श नवीन होता ग. " ती कितीतरी वेळ ताईच्या कुशीत लपून मुसमुसत, रडत राहिली. राधिका तिच्या डोक्यावरून, केसातून हात फिरवत राहिली. जे झालं ते फक्त विचित्र होतं, बदलत्या काळाचं, आयत्या मिळालेल्या पैशाचं किंवा न मिळालेल्या संस्कारांचं की एका घाणेरड्या मनोवृत्तीच प्रतीक होतं. ज्यावर चर्चा करून मनस्ताप होणार होता. त्यामुळे त्या क्षणाला राधिकाला तिच्या बहिणीला फक्त सावरायचं होतं. अन तिने नव्याने अनुभवलेल्या स्पर्शाच्या जखमा मिटवण्यासाठी, जुन्या स्पर्शाचा औषध म्हणून वापर करणं हातात होतं.
      बराच वेळ स्तब्धतेत गेल्यानंतर रियाने दार लोटलं... "आय एम सॉरी , मी तुमच्या दोघींचं बोलणं चुकून ऐकलं. मी खरं तर परत आले होते तुला पाणी द्यायला. तुझा चेहरा ठीक नाही वाटला मला. थकल्यासारखी वाटलीस पण इथपर्यंत आले अन तुझा रडताना आवाज ऐकला. घाबरून तिथेच थांबले. अन सगळं ऐकलं मावशी.  पण एक सांगू का. पुन्हा असं कधी घडल ना तर मग जो कोणी असेल त्याला एक पंच मारायला मागे पुढे पाहू नकोस. आम्हाला शाळेत विषयच आहे. पर्सनल सेफ्टी एज्युकेशन. चुकीचं काही घडतंय असं वाटलं तर विरोध सुरु करायचा. जे घडलंय ते वाईट आणि १०० टक्के चुकीचं होतं ना? मग त्याबाबत तू किळस वाटून घेण्याऐवजी तिला तिची जागा दाखवून द्यायला हवी होतीस. म्हणजे उद्या ती त्याचं गर्दीत दुसऱ्या कोणासोबत असं करायची हिम्मत दाखवू शकली नसती. बरं आता हे सगळं रडणं सोड अन बी ब्रेव्ह. झालं गेलं विसरून जा. अन कामाला लाग. तूच म्हणतेस असं..." त्या दोघी थक्क होऊन तिच्याकडे पाहत होत्या. किती तरी वेळ. जे स्वीकारायला त्यांना जमलं नव्हतं ते स्वीकारून त्यावर तोडगा देखील त्या १२ वर्षांच्या पोरीने काढला होता.
     कदाचित काळ, समाज जसा बदलतोय त्याला उत्तर म्हणून का असेना माणूसही तितकाच सामर्थ्यवान, स्वसंरक्षण जपणारा घडतोय. नवीन संघर्ष नवीन लढा. जमतोय.. नवीन पिढीला..🤔🤔

मयुरी चवाथे - शिंदे

1729. लग्नाची पहिली रात्र

     दोन दिवसाचे लग्न व तिसरा दिवस प्रवासाचा. सर्व दमले होते. पाहुणे देखील आपापल्या गावी परतले होते आणि लग्नानंतरची ती त्यांच्या मिलनाची पहिलीच रात्र होती. मनोहर फार आनंदात होता. रात्री तो आपल्या खोलीत गेला. त्याला अपेक्षा होती की हिंदी चित्रपटांच्या नायिकेसारखी त्याची नववधू देखील त्याची वाट बघत त्याला पलंगावर बसलेली दिसेल. पण माधुरी तर खुर्चीवरच बसली होती.
मनोहर तिच्याजवळ आला,‘ इथं अशी काय बसली आहे ?’
‘ मला काही महत्वाचं बोलायचं आहे. ‘ माधुरी म्हणाली .
‘आजच ? आत्ताच ? ‘
‘होय ! आजच आणि आत्ताच . ‘
'बरं बोल. काय सांगायचं आहे ?’
‘मी लग्नाला तयार नव्हते. ‘
मनोहर एकदम दचकला , ‘काय म्हणतेस तू ? वेड लागलाय का तुला? अगं परवाच आपलं लग्न झालं न? आणि आज तू हे काय म्हणतेस ? कोणी काही बोललं का तुला ? ’
‘ नाही . ‘
‘ मग? ‘
‘ मग काय , जे खरं आहे तेच मी तुम्हाला सांगतेय. हे लग्न मला मान्यच नव्हतं.
‘ अगं , मग हे लग्नाच्या अगोदर नाही का सांगायचं? इतक्या पुढे आल्यावर आता मागे फिरणे.. 
‘ माझा नाईलाज होता.‘
‘ म्हणजे ? ‘
‘ तुम्हाला हे तर ठाऊकच आहे की माझे आईवडील माझ्या लहानपणीच एका अपघातात वारले. काका-काकूंनी सांभाळले मला. काका तसे प्रेमळ होते. पण काकूंनी मला खूप छळले. स्वत:च्या मुलांबरोबर चांगली वागायची पण माझ्याशी मात्र सावत्रपणाने वागायची. घरातली सर्व कामं माझ्याकडून करवून घ्यायची. माझ्या प्रत्येक गरजांसाठी, आवडी-निवडी साठी मला नेहमीच मन मारून राहावे लागायचे. माझ्यामुळे काका-काकूंमधे सारखे वाद व्हायचे. काका-काकूंची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती व माझ्याही उत्पन्नाची काहीच सोय नव्हती. शेवटी काका-काकूंनी जमेल तसे माझे लग्न उरकून स्वत:ची मोकळीक करून घेतली. मलाही नाही म्हणायला सोय नव्हती म्हणून मीही कंटाळून लग्नाला तयार झाले. शेवटी माझ्याजवळ काही पर्यायच नव्हता. ‘माधुरी सांगत होती, ‘हालच सोसायाचे असतील तर कुठेही असो, काका-काकूंकडे कशाला? एकदाची त्या नरकातून सुटका होईल या विचाराने मी लग्नाचा विरोध केला नाही. ‘
‘ पण आता तर लग्न झालं ना ? ‘ मनोहरला काही उलगडा होत नव्हता .
‘ होय ! पण मला तुमच्याशी लग्न करायचं नव्हतं .‘ माधुरी म्हणाली .
‘ मग कोणाशी लग्न करायचं होतं ? ‘ मनोहर आता वैतागला . त्याचा आवाज थोडा वाढला होता.
‘ जोराने बोलून तुम्ही मला बोलण्यापासून थांबवू शकत नाही . शिवाय शेजारच्या खोलीत सर्वांच्या कानावर सर्व गोष्टी जातील . ‘माधुरी शांतपणे म्हणाली . मनोहरला माधुरीच्या व्यवहारचे फार आश्चर्य वाटत होते.
‘ अगं, पण मी माझ्या आईवडिलांचा एककुलता एक मुलगा . माझ्याबरोबर त्यांची सून म्हणजे तू ही आता त्यांच्या जगण्याची आशा आहेस. शिवाय नातेवाईक व इतर सर्वांना कळलं तर ते सर्व काय म्हणतील? ‘ शांतपणे तो म्हणाला.
‘तो तुमचा प्रॉब्लेम आहे.' तितक्याच शांतपणे माधुरी म्हणाली.
मनोहरचा पारा परत एकदा वाढला. पण त्याने स्वत:ला आवरले. पहिल्याच रात्री तमाशा नको. पण माधुरीच्या या असल्या वागण्याने तो दु:खावला. काय करावे हेच त्याला समजेना. काय बोलावे हे देखील कळेना. तीन दिवसांपूर्वीच उत्साहाने लग्न झाले आणि आज त्याची बायको त्याला म्हणते की हे लग्नच मुळात तिला मान्य नाही आणि याहीपेक्षा हे की तो तिची आवडच नाही. हा अपमानाचा घोट गिळत तो पलंगावर बसला. ‘हे बघ आता माझे प्रॉब्लेम्स आणि तुझे प्रॉब्लेम्स काही वेगवेगळे नाही. बरं, मला सांग मी तुझी आवड नाही याचा काय अर्थ घ्यावा? ‘ मनोहर ने तिला समजविण्याचा प्रयत्न केला .
‘ याचा एकच अर्थ . माझी आवड तुम्ही नाही. ‘ माधुरी शांतपणे म्हणाली .
‘ पण माझ्यात काय दोष आहे ? '
‘ तुमच्या गुणदोषांची विवेचना करण्यात मला रस नाही. ‘ माधुरी हळूच म्हणाली .
‘ खरं काय ते सांग. प्रस्तावना बरीच झाली . ‘ मनोहरला आता सहन होत नव्हते .
‘सांगते, ऐका. ‘ माधुरी बोलू लागली, ‘ माझं एकावर अतोनात प्रेम आहे. माझ्यासाठी तो ईश्वरच आहे. माझा देव आहे. हवं तर दैवत समजा. मी त्याला कधीही विसरू शकत नाही. मी त्याच्या प्रेमात गुंतले आहे. दिवस रात्र त्याचाच विचार करते. माझं प्रेम अगदी पवित्र आहे. जसं राधेचं प्रेम. जसं मीरेचं प्रेम. पण प्रेम झालं असलं तरी आम्हीं दोघं लग्न करू शकत नाही. काका-काकू माझ्या लग्नाची घाई करत होते म्हणून मी ठरविलं, की आमचं प्रेम जगात अमर करायचं. नावापुरता आपापला संसार रेटावा लागला तरी पण एक दुसऱ्याच्या प्रेमात पूर्णपणे बुडून जायचं. संसारच्या वेगवेगळ्या बंधनात असलो तरी एक दुसऱ्याच्या प्रेमात कमतरता पडू द्यायची नाही.'
‘ पण ही तर फसवणूक झाली ना ?'
‘ कोणाची ? ‘
‘ तुझ्याकडून माझी. तुझ्या प्रियकराकडून तुझी  आणि तुम्हां दोघांकडून सर्वांची व समाजाची देखील . ‘
‘ समाजाच्या तर कोणी गोष्टीच करू नये.  माधुरी शांतपणे बोलत होती. ‘समाजाने मला काय दिलं ?  समाजत आणि चारचौघात राहून देखील आजपर्यंत मी एकटीच जगतं आहे. माझे आईवडील गेल्यापासून सतत माझी फसवणूक होत आहे. काकांच्या मुलांमधे आणि माझ्यामधे कारण नसताना समाजानेच तर भेदभाव केला? असल्या समाजाची मी काळजी कशाला करायची? मला जो मानसिक आणि भावनिक आधार हवा होता तो माझ्या प्रियकराने मला दिलेला आहे. माझ्या प्रियकराने कोणाचीही फसवणूक केलेली नाही. त्याने सर्व नातीगोती केव्हाच मनापासून त्यागलेली आहे. खरं प्रेम करणारा माझा प्रियकर कोणत्याही बंधनांना मानतं नाही. उरला प्रश्न तुमचा तर माझंच स्वत:च लग्न तुमच्याशी एका दडपणाखाली झाल्याने माझ्याच बरोबर सर्वात मोठी फसवणूक झालेली असल्याने तुमच्याशी फसवणूक करण्याच्या मी परिस्थितीत देखील नव्हते.  मनोहरला बघीर झाल्यासारखं झालं. एक नववधू पहिल्याच रात्री तिचे संबंध कोणा तिसऱ्याशी असल्याची चक्क कबुली देत होती . नवल म्हणजे यासाठी तिच्या मनात कोणतीही खंत नव्हती. यालाच स्त्री स्वातंत्र्य म्हणतात का? काय करावं हे त्याला समजेनासं झालं. आई-वडिलांनी त्याच्या लग्नाची किती स्वप्न बघितली होती. लग्न ठरल्यापासून घरात नव्या सुनेची सतत चर्चा होत होती. आई-वडील तर नातवंडांच्या स्वप्नात देखील रमले होते. आता त्यांना या सर्व प्रकरणाची जराशीही कल्पना आली तर त्यांना किती धक्का बसेल? वडिलांचे तर नुकतेच बायपासचे ऑपेरेशन झालेले आहे. त्यांना तर हा आघात सहनच होणार नाही. आईदेखील खचून जाईल. चारचौघांना तिला सामोरे जाता येणार नाही. आजपर्यंत समाजात ताठ मानेने जगणाऱ्या त्याच्या आई-वडिलांचे काय होईल? नवीन नवरी त्याला लगेचच सोडून गेल्यावर लोकही त्याच्याबद्दल नाही-नाही ते बोलतील. या सर्वांना तो कसं काय तोंड देणार आहे ? या सर्व विचारांनी मनोहर फारच काळजीत पडला .
‘ मग आता पुढे काय? ’ मनोहरने विचारले. त्याच्या आवाजत वेदना होत्या.
‘ हे सर्व तुम्हाला सांगितल्यावर मी या खोलीत कशी काय थांबू शकते? ‘
‘ म्हणजे तू जाणार? ‘
‘ होय.'
‘ पण कुठे? ‘
‘ सध्या तरी माहित नाही. ‘
     थोडा वेळ दोघेही शांत बसले. मनोहर सारखा माधुरीकडे बघत होता. माधुरीची नजर खालीच होती. ती पायातल्या अंगठ्याच्या नखाने जमिनीवर मनातलं काहीतरी कोरीत होती. ती सर्व सांगून मोकळी झाली होती. आता मनोहरची निर्णय घेण्याची वेळ होती. काय करावे हाच विचार त्याला सारखा त्रास देता होता. त्याच्या मते, लग्ना अगोदरचे काही संबंध असले तर बहुदा सर्व मुली ते गुपितच ठेवतात व आपल्या संसारात रमतात. पुरुषही काही वेगळं वागत नाही. पण इथं तर पहिल्याच रात्री सर्व उघडकीस आलं होतं, आणि मुख्य म्हणजे त्याची बायको त्याला सोडून जाणार होती आणि याची तिला कोणतीही खंत नसल्याचे मनोहरला भासतं होतं. आयुष्यात येणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टींची तिला काही एक कल्पनाही नसली तरी ती काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीतच वाटत नव्हती. आता मार्ग मनोहरलाच शोधायचा होता.
‘हे बघ, मी तुझ्या प्रियकराला ओळखत नाही म्हणून मला त्याची बाजू माहित असणं शक्य नाही. पण त्यानं जे काही केलं ते कोणत्याही दृष्टीनं योग्य नाही. लहान वयातल्या बालिश प्रेमाचा गैरवापर केल्याचं मला जाणवत आहे. तू वेळीच सावध हो. त्याचा नाद सोड. नाही तर तुझी वाट सर्वात जास्त खडतर असणार आहे. 
‘प्रेमाच्या वाटेवर कितीही संकटं सहन करण्याची माझी तयारी आहे . ‘
आता मनोहर चिडला, ‘ तुला एकटीलाच सहन करावं लागणार आहे. जाऊ दे. जास्त चर्चा करण्यात काय अर्थ? आता असं कर. दोन-चार दिवस जाऊ दे. माझ्या आईबाबांना थोडं समाधान वाटू दे. मग मी तुला तुझ्या काकांकडे स्वत:च पोहचवून येईन. मग तुझा निर्णय घेण्यासाठी तू मोकळी राहशील. तोपर्यंत कुठंही या बाबतीत वाच्यता करू नको आणि काळजी तर मुळीच करू नको. एक नवरा म्हणून तुझ्या मनाविरुद्ध मी कधीही वागणार नाही. माझं प्रेम चारच दिवसांचं असलं तरी ते प्रगल्भ आहे. त्यात बालिशपणा नाही. तू पलंगावर शांत झोप मी झोपतो सोफ्यावर.  सकाळी मनोहरची झोप उशिराच उघडली. घड्याळात आठ वाजले होते. खोलीत माधुरी नव्हती. त्याला एकदम धस्स झालं. माधुरी कुणालाही न सांगता निघून तर गेली नाही ना या विचाराने तो अस्वस्थ झाला. घाईघाईने तो बाहेर आला आणि पाहतो तर काय, माधुरीचे स्नान नुकतेच झालेले वाटत होते. अर्धवट पुसलेले ओलसर केस मोकळेच होते. बाबा सोवळं नेसून पूजा करायला बसले होते. माधुरी बाबांसाठी पुजेची तयारी करत त्यांच्या जवळ बसली होती. एक-एक फुल वेचून माळा गुंफत होती. हे सर्व बघून मनोहरला फारच आश्चर्य वाटलं. माधुरीच्या चेहऱ्यावर एक वेगळचं तेज होतं. रात्रीच्या माधुरी पेक्षा ही माधुरी फारच वेगळी दिसत होती. मनोहरचा स्वत:च्याच डोळ्यांवर विश्वास बसतं नव्हता. बऱ्याच वेळ तो माधुरीला बघत तसाच उभा होता. बाबांचंच लक्ष त्याच्याकडे गेलं .
'सुनबाई , तुमचे यजमान उठले. त्यांच्यासाठी चहापाण्याच बघा. ‘ बाबा हसत म्हणाले .
मनोहर परत आपल्या खोलीत परतला. त्याला काही समजेचना. थोड्यावेळाने माधुरी चहा घेऊन खोलीत आली . चहा टेबलावर ठेऊन ती परत जाऊ लागली .
‘ थांब .’ मनोहर म्हणाला .
‘बाबांची पूजा आटोपली की येते . ‘ म्हणत ती निघून गेली.
मनोहरचे स्नान वगैरे आटोपले तो पर्यंत माधुरी खोलीत आलेलीच नव्हती. मनोहरला तिला बरच काही विचारायचं होतं. रात्रीची माधुरी व आत्ताची माधुरी यात त्याला बराच फरक जाणवत होता. थोड्यावेळाने आईनेच त्याला हाक दिली, ‘गरमागरम पोहे बनविले आहेत सुनबाईने. बाहेर ये. ‘ मनोहर बाहेर आला. माधुरीने त्याच्या हातात पोह्यांची प्लेट दिली.
‘ काय दादा....कुठं घेऊन जाणार आहेस वाहिनीला हनीमूनसाठी?‘ चुलत बहिणीनं त्याला विचारलं.
‘ कुठं ही नाही. ‘
‘ का रे ... ? वाहिनीला बाहेर नेणार नाही फिरायला ? ‘
‘ बाहेर तर नेणार आहे ... पण .. ‘ मनोहर आईकडे वळला ,’ उद्या किंवा परवा हिला माहेरी सोडणार आहे. ‘
‘ कां रे ... ? त्यांच्याकडून काही निरोप वगैरे आला आहे का? ‘ आईने विचारले .
‘ नाही...माधुरीचीच जायची इच्छा आहे. ‘ मनोहरने कटाक्षाने माधुरीकडे बघितले व म्हणाला, ‘ काल रात्री म्हणत होती. तिचं काही जरुरी काम आहे. तिला माहेरी जावं लागेल . ‘
आता सर्व जोरजोराने हसू लागले . मनोहरला गोंधळल्या सारखं झालं. त्याने माधुरीकडे बघितलं तर तीही हसत होती. त्याला कळेचना की सर्व कां हसत आहे ? तो रागाने म्हणाला , ‘हसायला काय झालं ? ‘
‘ काल कोणती तारीख होती? ‘ आईने विचारले.
‘ एक एप्रिल.‘ लगेच मनोहरच्या तोंडून निघाले.
‘ दादा , तू ‘ एप्रिलफूल ‘ बनला . ‘ चुलत बहिणीने त्याच्या पाठीवर धप्पा दिला.
‘ सुनबाईने सांगितलं सगळं आम्हाला. ‘ बाबा म्हणाले.
मनोहर आता आणखीनच चिडला, ‘ पण मग तो प्रियकर .... ? ‘
‘ गोपाळकृष्ण सोबत आणले आहे सुनबाईने. पूजेसाठी ठेवले आहे देव्हाऱ्यात. ‘ आई हसत म्हणाली.


अज्ञात लेखकास सादर समर्पित.

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...