शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

1717. अशी मुलं हवीत..घरोघरी

 मुलं शिकतात, चांगले गुण ही मिळवतात पण नोकरीचा शोध घ्यायचा हे फारच अवघड काम झाले आहे आजकाल. नाहीतर अजून जास्त अभ्यास करून स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण व्हावे यासाठी ढोर मेहनत करूनही यश मिळेलच याची खात्री नाही. कारण परिक्षा तर उत्तीर्ण होतात पण उपलब्ध जागांच्या तुलनेत उत्तीर्ण उमेदवारांची संख्या जास्त असल्याने वर्णी लागेलच याची शाश्वती नाही, वर्णी लागलीच तर ज्या क्षेत्रात काम करण्याची आवड आहे तेथेच नियुक्ती होईल याची शाश्वती नाही, आणि कर्मधर्मसंयोगाने तेही मिळाले तर आपल्या इच्छेनुसार काम करण्यास मिळेल याची शाश्वती नाही, हस्तक्षेप, नियमांचे जाळे वगैरे अडचणी असू शकतात, इच्छा नसलेल्या ठिकाणी बदली होऊ शकते वगैरे नकारात्मक बाजू आहेतच. अर्थात सर्वांच्या बाबतीत असेच होते असे नाही पण जर वेगळी वाट चोखंदळायची तर आजच्या कथेतल्या नायकाप्रमाणे वेगळा विचार करावा लागतो. बघा पटते का?   
"अशी मुलं हवीत.. घरोघरी.."

"सर, आमची गावाकडं जागा आहे. छोटं घर आहे. तिथं लाकडी घाण्यावरच्या तेलाचं प्रॉडक्शन सुरु करावं असं मला वाटतंय." हे ऐकताना मला खरं तर मनातून खूप आनंद होत होता. बारावीला विज्ञान शाखेत ८५ टक्के गुण मिळवलेला एक मुलगा असं स्वप्न पाहतोय, याचं एकीकडं आश्चर्य पण वाटत होतं आणि दुसरीकडं आनंद पण होत होता. 
"अरे, पण पुणं सोडून गावाकडे जाऊन रहायचं म्हणजे सगळं कठीण होईल." 
"सर, पण आता गावं पूर्वीसारखी राहिली नाहीयत. तिथं वीज आहे, इंटरनेट आहे, अमेझॉन, गुगल पे वगैरे सगळं चालतंय व्यवस्थित. मग त्यात काय वाईट आहे?" त्यानं त्याची बाजू मांडली. खरंच आहे. गावं पूर्वीसारखी राहिली नाहीत आता. उत्तम सुधारणा झाल्या आहेत. 
"अरे, पण तिथं मॉल नाहीत. चांगली हॉटेल्स नसतात. पाण्याची कमतरता असणार. मग कसं जमणार?" 
"सर, मॉलची गरजच नाही. पाण्याचं नियोजन करता येईल. ते कठीण नाही." तो म्हणाला. 
"पण हे लाकडी घाण्याच्या तेलाचं मधूनच काय सुचलं? अरे, मस्त मेडिकल ला जा, इंजिनिअरिंग ला जा. मोठं पॅकेज मिळेल. ते सगळं सोडून हे काय खूळ घुसलंय तुझ्या डोक्यात?" 
"सर, हे खूळ नाहीय. ह्या फिल्ड मध्ये प्रचंड करिअर आहे. जनरली पन्नास प्रकारची तेलं आपण तयार करु शकतो आणि त्याला खूप डिमांड आहे. इंडियन फूड स्टाईल अशी आहे की, आपल्याला ऑईल लागतंच. एकदम छोटंसं गाव असलं तरी तिथंही ऑईल लागणारच."
"अरे, हे सगळं मान्य. पण विकायचं कसं? तू दुकान काढणार आहेस का?" 
"नाही. दुकान कशाला लागतंय? माझा प्लॅनच वेगळा आहे." 
मी नुसतंच प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. तसा त्याला ग्रीन सिग्नल मिळाला. "हे बघा सर. दिवसाला साधारण ३०० ते ४०० किलो तेल आपण काढू शकतो. पॉलीथिन पॅकेजिंग करायचं नाही. पारंपरिक पद्धतीनं तेल स्टोअर करायचं. त्यात प्रीजर्वेटीव्हज अजिबात वापरायची नाहीत आणि तेलाचं शेल्फलाईफ आर्टीफिशियली वाढवायचं नाही. सिंथेटिक -बिंथेटीक, फिल्टर-बिल्टर काही नाही. शुद्ध भारतीय पारंपारिक पद्धतीचं तेल." तो इतक्या आत्मविश्वासानं हे सांगत होता की, मीच काय, पण कुणीही समोर असला असता तरीही तोही या सगळ्या प्रेझेंटेशन वर फिदाच झाला असता. तरीही मी दोरी जरा आणखी ताणली. 
"अरे,पण विकायचं कसं?"
"सर, मोठमोठे आहारतज्ञ सोबत घेऊन या तेलाचं टेस्टिंग करायचं आणि मगच प्रमोशन करायचं. लार्ज स्केल वर जायचंच नाही. स्मॉल स्केल युनिट ठेवायचं. म्हणजे लिमिटेड प्रॉडक्शन असलं तरीही क्वालिटी कंट्रोल होईल, डिमांड वाढत जाईल आणि कॉस्टिंग वाढवता येईल. त्यामुळं, विकण्याचं टेन्शन नाही." त्यानं झकासपैकी स्ट्रेट ड्राईव्ह मारला..! 
"पण मग आता काय करायचं ठरवलं आहेस?" 
"दर आठवड्याला वेगवेगळ्या ठिकाणचे लाकडी घाणे पहायला सुरुवात करावी लागेल. अगदी एखाद्या छोट्या गावातला घाणासुध्दा सोडायचा नाही. सगळ्यांचे फोटो काढायचे, सगळ्या नोंदी एकदम डिटेलमध्ये करायच्या. त्यांचं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट बघायचं आणि सगळा सर्व्हे झाला की आपला प्रोजेक्ट डिझाईन करायला घ्यायचा. दर आठवड्याला करत राहिलो तर वर्षभरात सगळं पेपरवर्क पूर्ण होईल. मग पुढची दोन वर्षं मी त्या कॉन्सेप्ट वर माझं काम करत राहीन. कारण, मेकॅनिक्स, रॉ मटेरियल, शेतकऱ्यांना भेटणं, स्टोअर हाऊस तयार करणं ही सगळी कामं करावी लागतील. मला सारखं गावी जावं लागेल. पण त्याला दुसरा ऑप्शन नाही." 
त्याचं जवळपास सगळं पक्कं ठरत आलं होतं आणि त्याच्या आत्मनिर्भर होण्याच्या योजनेत नाकारावं असं काही नव्हतंच. कुणीही मुलगी किंवा मुलगा जेव्हां उद्योजक होण्याचं ध्येय ठेवतो आणि त्यासाठी जो जो आवश्यक आहे, तो तो अभ्यास सर्वतोपरी करतो, त्याच्या बाबतीत मी व्यक्ती म्हणून आणि भारताचा नागरिक म्हणून अनुकूल असतोच. 
     पण या मुलानं केवळ स्वतः पुरताच विचार केलेला नव्हता. त्यानं स्वयंपाकासाठी लागणारं तेल, कच्चा माल, त्याचा पुरवठा, त्याचं अर्थकारण, रोजगाराच्या संधी, निकृष्ट दर्जाच्या तेलामुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्या या सगळ्याचा अभ्यास केला होता. भारतीय महिलांच्या स्वयंपाक करण्याच्या सवयींचा अभ्यास केला होता. हॉटेल व्यवसाय किंवा स्ट्रीट फूड क्षेत्रात तेल कसं आणि किती वापरलं जातं, याचा अभ्यास केला होता. चांगल्या गुणवत्तेच्या तेलाची वैशिष्ट्यं आणि खराब तेलाची वैशिष्ट्यं यातले फरक त्यानं नोंदविलेले होते.
      भारतातल्या वाढत्या वजनाच्या समस्या, पचनसंस्थेचे विकार, केसांच्या समस्या, हृदयविकार, रक्तदाबाशी संबंधित विकार अशा विविध समस्यांचा खाद्यतेलाशी असणारा संबंध तो शोधत होता. इंटरनेटवर वेगवेगळी कागदपत्रं वाचत होता. आणि बहुतांश भारतीय लोक गुणवत्तेला महत्त्व देण्यापेक्षासुध्दा स्वस्त किंवा महाग महत्त्व देतात, पण नेमकं कशाच्या तुलनेत महाग आणि कशाच्या तुलनेत स्वस्त हे त्यांना उमगलेलंच नसतं, असं निरीक्षण त्यानं नोंदवलेलं होतं. हे माझ्यासाठी फारच अविश्वसनीय होतं. पण तो त्याची डायरी मला दाखवण्यासाठी सोबत घेऊन आलेला असल्यामुळं विश्वास ठेवावाच लागला. अशा मुलांचं मला नितांत कौतुक आहे. 
"अरे, आता तुझं एवढं सगळं ठरलंय ना, मग आता माझी काय मदत हवीय तुला?" मी कौतुकानं विचारलं. 
"मदत मला नकोच आहे. काऊन्सेलिंगची खरी गरज माझ्या आई-बाबांनाच आहे. तुम्ही त्यांचंच काऊन्सेलिंग केलंत तर फार बरं होईल, असं माझं मत आहे. त्यासाठीच तर मी तुमची अपॉईंटमेंट घेऊन तुम्हाला भेटायला आलो आहे. तेवढी मदत तुमच्याकडून हवी आहे." तो शांतपणे उत्तरला. 
      मी अवाक्...!

लेखक- मयुरेश उमाकांत डंके.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...