शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

1700. प्रपोज

   कॉलेजमधले लेक्चर आटोपून रसिका गेटच्या बाहेर पडत होती. तिचे लक्ष रस्त्याकडे गेले. रस्त्याच्या डाव्या बाजूने एक भरधाव मोटार आली. एक मुलगी रस्ता ओलांडत होती.. तिचे त्या मोटारीकडे लक्षच नव्हते. ती मोटार तिला उडवणारच होती आणि डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच एक तरुण आला आणि त्याने तिला दूर ढकलले. मोटारीने करकचून ब्रेक लावल्याचा आवाज ऐकून सगळे रस्त्यावर धावले. मुलगी एका बाजूला पडली होती आणि तो तरुण रक्ताच्या थारोळ्यात ! रसिकाने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. तिला दरदरून घाम फुटला. छातीत धडधड होऊ लागली ..
" मॅडम काही होतंय का तुम्हाला? पाणी घ्या." 
गेटवर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांचा घोळका तिच्या पुढे जमला. रसिका थोडी सावरली. 
" मी ठीक आहे. एक रिक्षा थांबवता का माझ्यासाठी." 
रिक्षा आली. रसिका रिक्षात बसली... आणि निघाली.  
    दहा वर्ष झाली त्या घटनेला. पण अजूनही ती जेव्हा त्या कॉलेजच्या समोर येते, तो प्रसंग तिच्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो.... ती भरधाव मोटार, रस्ता ओलांडणारी ती, आणि तिला धक्का देऊन तिचे प्राण वाचवणारा आकाश! आणि.....आणि..... पुढचे सारे भयानक दृश्य... रक्ताचे थारोळे... त्याचा चक्काचूर झालेला पाय ....अॅम्बुलन्सचा सायरन.... तिच्यासाठी आपला पाय गमावलेला आकाश! रात्रीबेरात्री ती अजूनही दचकून उठायची.... अपराधीपणाची  भावना तिला दहा वर्षापासुन सतावत होती... आणि तरीही ती मुद्दाम त्याच शहरात आली होती...  त्या कॉलेजमध्ये नोकरी करत नसतानाही गेस्ट लेक्चरर म्हणुन मुद्दाम ती नियमित तिथे जात होती.... त्या यातना पुन्हा पुन्हा भोगत होती.... स्वतःलाच शिक्षा ती देत होती. तो प्रसंग तिने विसरावा म्हणून घरच्यांनी काय नाही केले.... पण तिला ते विसरायचेच नव्हते.... त्याचा रक्तबंबाळ पाय आठवून पुन्हा पुन्हा ती आपल्या मनाला घाव देत होती.. स्वतःचे हृदय रक्तबंबाळ करून घेत होती. 
      गावात कॉलेजची सोय नाही म्हणुन आपल्या लाडक्या लेकीला रसिकाच्या बाबांनी मुंबईच्या प्रसिद्ध कॉलेजमध्ये अॅडमिशन घेऊन दिले. कॉलेजच्याच होस्टेलमध्ये राहण्याची सोयही झाली. कॉलेजमधले दिवस फुलपाखरासारखे अलगद हवेवर स्वार होण्याचे! डोळ्यात स्वप्ने घेऊन झुलायचे! पहिले वर्ष सरले... दूसरे सुरूही झाले. फोनच्या येण्याने जणू सगळीकडेच मोठी क्रांती झाली होती. पत्र लिहिण्याचा ज़माना जाऊन फोनची घंटी सगळीकडे वाजू लागली होती...कॉलेजच्या समोरच असलेल्या एसटीडी बुथवर विद्यार्थ्यांची गर्दी होऊ लागली होती. रसिकाच्या घरीही फोन आला होता त्यामुळे ती आता घरी पत्र लिहिण्याऐवजी आठवड्यातुन दोन वेळा एसटीडीवरुन फोन करत असे...  आईबाबांचा आवाज ऐकून तिला बरे वाटायचे आणि त्यांनाही. एक मात्र व्हायचे साडेआठच्या पुढे एसटीडी रेट अर्धे होत असल्याने होस्टेलच्या मुलांची गर्दी मात्र बुथवर कायमच असायची. त्यामुळे नंबर येईपर्यंत रांगेत  ताटकळत उभे राहावे लागायचे. 
        रसिका दर बुधवारी आणि रविवारी घरी फोन करायची... तिचा नंबर लागेपर्यंत मग मैत्रिणींशी गप्पागोष्टी, हास्यविनोद व्हायचे. असेच एकदा मुलांच्या लाइनमध्ये तिला, तिच्याकडेच बघत असलेला तो दिसला... त्याची चोरी पकडली गेली  म्हणुन तो वरमला.. त्याने लगेच दुसरीकडे नजर वळवली. रसिकाला  हसू आले. पण नंतर हे नेहमीचेच झाले. त्यांचे एसटीडी बूथवरील एकमेकांकडे पाहणे, नजरानजर होताच  नजर हटवणे आणि परत एकमेकांकडे पाहणे.... बोलत कुणीच काही नव्हते... पण नजरभेट  मात्र वरचेवर होत होती. तिला नवल वाटायचे की तोही त्याच दिवशी त्याच वेळी बूथवर कसा येतो... 
"म्हणजे माझ्यावर पाळत ठेवतो की काय?".    मैत्रिणींनी माहिती काढली 
 " अगं, आपल्या होस्टेलचाच आहे. नवीन आलाय या वर्षी आसामहून . MSc ला आहे. आकाश नाव त्याचं." 
         रसिका आणि त्याची कॉलेजमध्ये भेट होण्याचा संबंधच नव्हता. ती त्याला जुनियर. तो एसटीडी बुथ मात्र त्यांची एकमेकांना बघण्याची खास जागा होऊन गेली. कधी-कधी होस्टेलच्या एखाद्या कार्यक्रमात नजरानजर व्हायची. त्याचा तो गोरा रंग, चिमुकले डोळे आणि मऊ मुलायम दिसणारे अगदी सरळसोट केस... उंची माफक पण त्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्वात कुठे कमीपणा येत नव्हता.. उलट त्या कपाळावर  रुळणार्‍या सरळ, रेशमी केसांमुळे तो अजूनच आकर्षक दिसायचा. त्याच्या चिमण्या डोळ्यांमध्ये रसिकाला तिच्याविषयी त्याच्या मनात असलेली कोमल भावना लगेच कळली होती. पण तो बिचारा खूपच लाजरा होता... नजरानजर झाली की लगेच दुसरीकडे नजर फिरवायचा. रसिकाला त्याच्या या गोष्टीचे हसूही यायचे आणि रागही यायचा. 
  " कसा आहे हा? याला मनातलं कधी कुणाला सांगता तरी येईल का?" 
 पण रसिकालाही तो आवडू लागला होता. दर बुधवारी आणि रविवार ती न चुकता एसटीडी फोन करायला जायचीच....तोही वाट बघत असायचाच. हळूहळू नजर चोरणं कमी झालं होतं. कधीतरी एखादं स्मितही दोघांत होऊ लागलं.... आणि ते वर्ष संपलं.         
      रसिकाचे  पदवीचे  शेवटचे वर्ष आणि आकाशचे MSc चेही शेवटचे वर्ष. रसिका कॉलेज सुरू व्हायच्या वेळीच आजारी पडली होती.... एक महिना कॉलेजला उशिरा आली. तिला पुन्हा पाहताच आकाश खूप आनंदाला. त्याने कुणाकडून तरी चौकशी केलीच होती तिची. ती आल्यावर त्याने पहिल्यांदा हिम्मत करून विचारले, 
" कैसी तबीयत है अब आपकी?" 
त्याचे ते शब्द पहिल्यांदा तिच्या कानावर पडले. उच्चाराची पद्धत वेगळी पण कानाला मात्र ते खूप गोड लागले. 
रसिका त्याच्याकडे पाहून नुसतीच हसली. 
        आता पुन्हा ते एसटीडी बुथवर भेटणं सुरू झालं. त्याच्याकडे बघताच रसिकाच्या हृदयात तरंग उठत.. त्याला एखाद्या वेळी उशीर जरी झाला तरी तिचा जीव वरखाली होई. एकदा त्याने तिला कॉफीसाठी विचारले....ती हरखून गेली. पहिल्यांदा अशी कुणाबरोबर तरी ती कॉफी घ्यायला गेली. ते अजूनही एकमेकांशी जास्त बोललेच नव्हते.... तो खूपच मितभाषी होता... पण त्यांच्या डोळ्यांची मात्र शब्दांपेक्षा जास्त संभाषणे होऊ लागली होती. त्याने तिला स्वतः बनवलेले तिचे एक सुंदर स्केच भेट दिले. 'एसटीडी बुथवर उभी असलेली ती' असे चित्र होते. चित्र अगदी हुबेहुब साकारले होते. किती सुंदर स्केच होते. ती तर त्याच्यावर फिदाच झाली. त्यांच्या भेटी वाढू लागल्या. तो आता तिच्याशी बरंच काही बोलू लागला....ते अजूनच जवळ येऊ लागले. रसिकाच्या मैत्रिणी तिला सावध करू लागल्या 
  "रसिका, जास्त पुढे जाऊ नकोस बरं...तो मुलगा आपल्या इथला नाहिये... त्यांचं सगळंच वेगळं...या नात्याला पुढे काहीच भविष्य नाही."
 रसिकालाही हे पटे, पण मन कुठं काबूत होतं तीचं. आकाशला बघताच ती मोहरून जाई... भाषा आणि संस्कृतिची  भिन्नता ती विसरून जाई. अजून कुणीच कुणाला मनातलं काही सांगितलं नव्हतं. पण न बोलताही त्यांना एकमेकांचं मन कळलं होतं. परीक्षा जवळ आल्या. कॉलेज संपायच्या आधी त्याने आपल्याला प्रपोज करावे असं तिला मनोमन वाटे.  गुढघ्यावर बसुन तो सगळ्यांसमोर आपल्याला मागणी घालत आहे, आणि आपण त्याच्या हातात हात देतो आहोत, असं स्वप्न ती बघत होती...किती स्वप्नाळू होती ती! 
               एके दिवशी नेहमीप्रमाणे ती फोन करायला नेहमीच्या दिवशी होस्टेलमधून बाहेर पडली... 
" आज उशीर झाला, आकाश वाट पाहून गेला तर नसेल? "
     या विचारात ती  रस्ता क्रॉस करून पलिकडच्या बुथवर जाण्यासाठी घाईत निघाली.... तिचे एका बाजूने येणार्‍या मोटारकडे लक्षही नव्हते.... आकाशने मात्र तिला पलीकडून पाहिले होते.... तो तसाच धावला.. क्षणात त्याने तिला गाडीच्या मार्गातून दूर ढकलले. ती वाचली... पण त्याला स्वतःला  वाचवायला तेव्हडा अवधी मिळाला नाही... मोटारचे चाक त्याच्या पायावरुन गेले आणि रक्ताच्या चिळकांड्या सगळीकडे उडाल्या. झालेल्या प्रकाराने पूर्ण कॉलेज हादरले. रसिकाला खूप मोठा धक्का बसला... ती बोलायचीच बंद झाली... तिचे आई वडील तिला घेऊन घरी आले. तीन-चार महिने ती त्याच अवस्थेत होती. आकाशचे पुढे काय झाले काही कळले नाही... खूप दिवसांनी समजले की त्याचा उजव्या पाय तुटला होता... तो कायमचा अधू झाला. रसिका हादरून गेली. तिने त्याचा पत्ता कॉलेजमधून मिळवला, कितीतरी पत्र लिहिली, पण उत्तर आले नाही... जो फोन नंबर होता तोही लागत नव्हता.  त्याच्या बरोबरीचे मित्रही  आपापल्या  दिशांना गेलेले होते.... तिची आणि त्याची कहाणी संपली होती.              
   दोघांच्या कहाणीचा करूण अंत झाला पण तितक्याच  दुःखद खुणा पाठीमागे उरल्या होत्या. त्या दुःखातही  रसिकाने पुढे  शिक्षण घेतले, लेक्चरर बनली, नोकरी सुरू झाली.... पण असा एकही दिवस नव्हता की, ती ज्या दिवशी तो प्रसंग आणि आकाशला विसरली होती. तिच्यामुळेच तर हे सर्व झाले होते. 
    "आपल्या एकुलत्या एक मुलाचा पाय जेव्हा आकाशच्या आई वडिलांनी बघितला असेल, तेव्हा त्यांना काय वाटले असेल.... तोच त्यांची एकमेव आशा होता...." 
    तिने त्यांचे जीवन उध्वस्त केले होते. तिने इंटरनेटवर, सोशल मीडियावर आकाशचा खुप शोध घेतला... पण काहीच कळले नाही. त्यासाठी ती परत मुंबईला आली.. इथे नोकरी पकडली... कॉलेजच्या संपर्कात राहिली... पण आकाश जणू तिच्या आयुष्यातून कायमचा गेला होता 
    रसिकाचे आई-बाबा तिला समजावून थकले.... पण तिच्या मनातील अपराधी भावना काही जाईना..ती लग्नालाही तयार होत नव्हती...एकच ध्यास तिने घेतला होता...आकाशला शोधण्याचा!          
आज पुन्हा कॉलेजच्या गेटबाहेर पडल्यावर , तिला तोच रस्ता दिसला. रस्त्याच्या पलिकडे आता एसटीडी बुथ नव्हता... मोबाईल क्रांतीमुळे  या पिवळ्या डब्याची कोणालाच गरज नव्हती...पण तिची नजर त्या जागेला साद घालत होती... तिथे आता स्टेशनरीचे दुकान होते.... रसिका बर्‍याच वेळा त्या दुकानाजवळ  जाऊन  बसायची... दोघांच्या त्या भेटी आठवून तिच्या चेहर्‍यावर हसू फुलायचे... पण भानावर येताच पुन्हा मनातला अंधःकार त्या सुखस्वप्नांची जागा घ्यायचा. ती कोलमडून जायची.                   
     आणि  अचानक एक आशेचा किरण तिला दिसला. कॉलेजचे गेटटुगेदर! पदवी आणि पदव्युत्तरच्या त्या वर्षीच्या विद्यार्थ्यांचे गेटटुगेदर होणार होते. शिवाय कॉलेजचा शतकपूर्ती समारंभही होणार होता. सगळ्या सोशल मीडिया आणि इंटरनेटवर  सर्व ठिकाणी पोस्ट टकल्या गेल्या .... रसिकानेही जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी जाईल याचा प्रयत्न सुरू केला. इतके वर्ष ती प्रयत्न करतच होती... पण आता तिचा उत्साह अजूनच दुणावला. समारंभाचा दिवस उगवला....तिची धडधड वाढली... 
 " येईल का आकाश? मला त्याची  माफी मागायची संधी मिळेल का?"
   ती सकाळपासून गेटजवळ उभी होती....शेकडो विद्यार्थी येत होते... आता आकाश आला तरी कसे ओळखणार? सगळे किती बदललेत इतक्या वर्षात!        
   कार्यक्रम सुरू झाला...तिचे कार्यक्रमाकडे लक्षच नव्हते... कित्येक मैत्रिणी भेटल्या, बोलल्या... पण ज्याच्या भेटीची आस होती, तो मात्र दिसला नाही. कार्यक्रम झाला.. अल्पोपाहार सुरू झाला. ती खट्टू होऊन एका कोपर्‍यातल्या खुर्चीवर बसली. तोच तिच्या पुढे खाण्याची प्लेट घेऊन एक तरुण आला. 
" आप अकेली क्यों बैठी है? कुछ खाना नहीं है क्या?" 
 बोलण्याची तीच ढब, तेच उच्चार! 
तिने आश्चर्याने वर पाहिले. काळा सुट , रूबाबदार व्यक्तिमत्व, हनुवटीवर व्यवस्थित राखलेली दाढी, डोळ्यांवर काळ्या फ्रेमचा चष्मा आणि त्या चष्म्यातून तिच्याकडे पाहात असलेले ते चिमणे डोळे ....... पुन्हा नजरभेट झाली... . तेच कपाळावर रुळणारे रेशमी सरळसोट केस.... तो आकाशच होता . 
      ती पटकन जागेवरुन उठली. तिने त्याच्या पायाकडे नीट पाहिले... पण तिला समजेना की, पाय ठीक आहे की नाही. त्याने तिचे भाव अचूक ओळखले. 
 "मैं चल के दिखाता हूँ." तो व्यवस्थित चालत होता. 
तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू बाहेर पडू लागले. 
" तुझा पाय .... ठीक झाला? मी तुझ्यासाठी रोज प्रार्थना करत होते... तू भेटावा, तुझी क्षमा मागावी म्हणुन काय नाही केले मी? कुठे गायब झाला होता तू?"
 "( हिंदीतून) त्या भयानक अॅक्सीडेंटने माझा पाय अर्धा तुटून गेला... कितीतरी दिवस मी हॉस्पिटलमध्ये होतो. नंतर मी गावी गेलो. पण त्याच वेळी आसाममध्ये मोठा पूर आला होता... आमचं सर्व नष्ट झालं... आम्हाला एका तात्पुरत्या कॅम्पमध्ये स्थानांतरीत करण्यात आलं. तुटलेला पाय, हातात आलेल्या कुबड्या आणि हरवलेली स्वप्ने घेऊन नाउमेद होऊन बसलो होतो मी. पण त्या कॅम्पमध्ये एका डॉक्टरांनी मला मार्ग दाखवला....माझा पुढचा इलाज होण्याच्या दृष्टीने शिक्षणा शिवाय पर्याय नाही हे मला पटवून दिले. परदेशी यूनिवर्सिटीत अॅप्लिकेशन केले,  मला प्रवेश मिळवायला मदत केली. काम करून शिकलो. डॉक्टरेट मिळवली.. तिथेच काम  सुरू केले. पायावर इलाज सुरू होताच.... पैसे साठवून इलाज पूर्ण केला. हा कृत्रिम पाय आहे. पण आता कसलाच अडथळा नाही. मी पूर्णपणे स्वतःच्या पायावर उभा आहे. "
       त्याची कहाणी ऐकून रसिकाला गलबलून आलं. पण एक प्रश्न तिला सतावत  होता 
 "तुला एकदाही वाटले नाही, की मला संपर्क करावा, मी तुझी वाट पाहत असेल,... की तुझ्या मनात माझ्या विषयी काहीच नव्हतं. माझ्यामुळे तुझी ही अवस्था झाली म्हणुनच ना?  "
 "असं बोलू नको रसिका.... तुझ्यामुळे नाही झाल गं ते! उलट तुझ्या प्रेमामुळेच मी हे दिव्य  पार पाडू शकलो...तुझ्या आठवणींशिवाय एकही दिवस गेला नाही.... आपण कधी एकमेकांजवळ आपल्या भावना व्यक्त केल्या नाहीत... पण आपली ह्रदये केव्हाच जोडली गेली होती. मी अपंग झालो होतो... पूर्ण ढासळलो होतो... तुझ्या लायकीचा तरी राहिलो होतो का मी? शिक्षण अर्धवट, पाय अर्धा, भविष्य अंधःकारमय..... कसा भेटू तुला? तुझ्यासमोर येण्याआधी मला स्वतःला  परत उभं करायचं होतं. म्हणून मी रात्रंदिवस लढत होतो. अखंड दहा वर्ष जळत होतो. "
  "आणि मी? मी त्या आगीत होरपळत होते त्याचं काय? या काळात, माझी काय अवस्था झाली होती माहीत आहे का?  आई बाबा माझं लग्न लावण्यासाठी किती धडपडत आहेत. मुलगाही शोधलाय आता परत. झालं असतं माझं लग्न म्हणजे? काय केलं असतं तू? "
 "तू केलं असतं दुसर्‍या कुणाशी लग्न? मला माहीत होतं, तू माझी वाट पाहत आहेस, म्हणून मला हुरूप येत होता... काही दिवसापुर्वी तुझी पोस्ट मी वाचली... तुझ्या शब्दानशब्दात माझ्याविषयी प्रेम वसलेले होते... आणि मी लगेच निघालो.. " 
         रसिका लाजली. दूर राहूनही ते दोघे एकमेकांसाठी जगत होते. 
 त्यांचा शोध संपला. ते दोघे कॉलेजच्या गेटमधून बाहेर आले... रस्त्याच्या पलीकडे नजर गेली... दोघांच्याही  नजरेला तो एसटीडी बुथ दिसत होता... लाइनमध्ये उभे राहिलेले ते दोघे... चोरून एकमेकांकडे पहात असलेली ती नजर .. मूकपणे प्रेमाला दिलेला तो दुजोरा... सगळं-सगळं त्यांना दिसत होतं. ते तिथे गेले. त्या जागेवर बसले. आकाशने हळूच एक पाकीट तिच्या हातात ठेवले. तिने उघडून पाहिले... त्याने रेखाटलेले चित्र! 
  एसटीडी बूथच्या जवळ एक मुलगा गुडघ्यावर बसुन एका मुलीला प्रेमाची मागणी घालत होता... आणि ती लाजून त्याच्याकडे पहात होती. 
    "हे चित्र मी खूप पूर्वीच मनातल्या कॅनव्हासवर काढून ठेवले होते. तेव्हा राहिलेली ही गोष्ट  आता पुर्ण करतो...." 
त्याने त्या चित्राप्रमाणे तिच्यापुढे अंगठी धरली. तिच्याही मनातील त्या वेळची सुप्त इच्छा आता पूर्ण झाली. शेवटी त्याने तिला प्रपोज केलेच. त्यांची कहाणी पूर्ण झाली. 

©अर्चना बोरावके "मनस्वी"
वाचकहो कशी वाटली माझी कथा? आवडल्यास कृपया नावासह शेयर करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...