गंगाधर पदवीधर झाले. मूळ गावापासून दूर, जिल्ह्याच्या सरकारी कचेरीत कारकून म्हणून रुजू झाले. मुळात गंगाधर यांचं बालपण कडक शिस्तीत गेलं होतं. त्यांचे वडील म्हणजे जमदग्नीचा अवतारच होते. नोकरीचं निमित्त झालं आणि एका अर्थाने गंगाधर वडिलांच्या दडपणातून मुक्त झाले. यथावकाश लग्न उरकलं. पत्नी म्हणून सुस्वरूप, संस्कारी सुलोचना लाभली. राजाराणीचा संसार होता. गंगाधर ‘सुलु, सुलु’ करत तिच्या मागे मागे असायचे. तिच्याशिवाय त्यांचं पानही हलायचं नाही. हे जरी खरं असलं तरी पित्याकडून मिळालेला एकमेव वारसा, ‘एकाधिकारशाही’ ते कसे विसरणार? त्यांच्या शब्दाला नाही म्हटलेलं त्यांना अजिबात खपायचं नाही.
सुलोचना मात्र एकत्र कुटुंबातील आणि चारचौघात वावरलेली व्यवहारी कन्या होती. तिने गंगाधरांच्या कलानेच घ्यायचं असं ठरवलं. गंगाधराच्या प्रत्येक निर्णयाला ‘पंत, तुम्ही म्हणाल तसं..’ ह्या नमनानेच ती सुरुवात करायची. ‘पंत’ म्हटलं की गंगाधर खुलून जायचे. त्यानंतर, ‘पण मी काय म्हणते..’ असं म्हणत ती त्यावरचे पर्याय सुचवायची. विविध फायदे सांगून झाल्यावर तिचं शेवटचं पालुपद असायचं, ‘पंत, मी फक्त सुचवायचं काम केलं. माझा आग्रह नाही. अर्थात अंतिम निर्णय तुमचाच.’ ही मात्रा लागू पडली.
घरातल्या कुकरपासून फ्रीजपर्यंत सगळ्याच वस्तु सुलोचनेच्या मनाप्रमाणेच घेतल्या गेल्या. एवढंच काय, तर मुलांच्या अॅडमिशन कुठल्या शाळेत घ्यायच्या, इथपर्यंतचे सगळे निर्णय कसलाही वादविवाद न होता सुलोचनेच्या मनाप्रमाणेच घडत गेले. सुलोचनेची ही शिताफी मात्र गंगाधरांच्या कधीच लक्षात आली नाही. गंगाधरपंतांना सदासर्वदा साहेबांच्या समोर मान खाली घालून 'हांजी हांजी' करत निमूटपणे सगळं ऐकावं लागायचं. त्यामुळे कचेरीत दाबून ठेवलेले मानापमानाचे कढ घरातल्या लोकांच्या समोर उफाळून यायचे. मुलं मोठं होत गेली तसं त्यांना गंगाधरपंतांचे वागणं खटकत राहायचं. सुलोचना मात्र वडील आणि मुलांच्यामधे एक सुंदर दुवा बनून राहिली. त्या नात्यांत कुठलीच कटुता येऊ नये म्हणून ती काळजी घेत राहिली. ‘हे बघा, बाबा तुम्हाला रागावत असतील, पण तुमच्या विषयी त्यांना खूप कौतुक आहे. प्रसंगी ते स्वत:कडे दुर्लक्ष करतात, पण सदैव तुमच्या भवितव्याचा विचार करत असतात. तुम्हाला ते कधी काही कमी पडू देत नाहीत ना? मग जास्त विचार करू नका. तुम्ही फक्त अभ्यासात लक्ष घाला.’ असं ती मुलांना सांगत राहायची. अधूनमधून ती गंगाधरपंताना ऐकू जाईल असं पुटपुटायची, ‘माझं नशीबच थोर म्हणायचं बाई. मुलं ह्यांच्या बुद्धिमत्तेवर गेली म्हणून बरं आहे. उत्तम गुणांनी तर उत्तीर्ण होताहेत. माझ्यावर गेली असती तर…ह्यांनी काय केलं असतं, ते देवच जाणे!’ हे ऐकल्यावर, पंतांचा मुलांवरचा राग थंड व्हायचा.
गंगाधरपंत असंच एकदा मूडमध्ये असताना म्हणाले, ‘बरं का, सुलु. माझे सगळेच मित्र एकजात जोरू के गुलाम आहेत साले. मी त्यांना सांगतो, लेको माझी बायको सुलोचनेकडे बघा. ती माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. मी सांगेल त्याला ‘तुम्ही म्हणाल तसं’ म्हणत असते.’ त्यावेळी सुलोचना गालातल्या गालात हसली. तिला पंतांचा भ्रमाचा भोपळा फोडायचा नव्हता. बघता बघता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. लेक सुचेता लग्न होऊन सासरी गेली. दिल्या घरी सुखी होती. कारण सुचेताचे सासू सासरे गाव सोडून शहरात यायला अजिबात तयार नव्हते. तीच त्या घरची राणी होती.
यथावकाश मुलगा अमेय उत्कृष्ट गुणांनी इंजिनियर झाला. चांगली नोकरी मिळाली. लवकरच कंपनीतल्या एका स्वरूप सुंदर मुलीशी विवाहाचा त्यांने प्रस्ताव मांडला. त्या स्थळात जागा ठेवण्यासारखं काहीच नव्हतं. लग्न यथासांग पार पडले. त्याच महिन्याभरात गंगाधरपंत हेडक्लार्क म्हणून सेवानिवृत्त झाले. साहजिकच सुलोचनेचं लक्ष गंगाधरपंतावरून अमेय आणि सून मानसीकडे केंद्रित झालं. ती सकाळी त्यांच्यासाठी न्याहरीच्या तयारीत असायची. अमेय आणि मानसी दुपारचं जेवण कंपनीच्या कॅन्टिनमधेच घेत असत. सदैव केंद्रस्थानी असलेल्या गंगाधरपंताना आपल्याकडे उपेक्षा होत असल्याच जाणवत होतं. एके दिवशी गंगाधरपंत कुठल्यातरी कारणावरून अमेयला आणि सुलोचनेला डाफरत होते, तेव्हा मानसीने त्या दोघांची बाजू घेऊन त्यांना तिथंच गप्प केलं. गंगाधरपंत संध्याकाळी नुकतेच फिरून येऊन कोचवर बसले. आजूबाजूला कुणीही नसल्याचं पाहून, मानसी त्यांना चहाचा कप देत म्हणाली, "बाबा, सकाळी मी जे काही बोलले होते त्याबद्दल मला माफ करा." हे ऐकताच गंगाधरपंतांचा राग निवळला.
मानसी लगेच पुढे म्हणाली, "बाबा, खरं तर त्यात तुमची काहीच चूक नाही. खरी चूक सासूबाईंची आहे. मुळात तुमच्या एकाधिकारशाहीला आणि एककल्ली प्रवृत्तीला त्याच जबाबदार आहेत. तुमच्या प्रत्येक गोष्टीला ‘तुम्ही म्हणाल तसं..’ असं म्हणत त्या तुमच्या अहंकाराला वारा घालत गेल्या. त्यामुळे कधीकाळी या घरात वादळ उठेल ह्याची त्यांना कल्पनाही नसावी. सासूबाईंनी इतकी वर्ष तुम्हाला खपवून घेतलं असेल. जर काहीही चूक नसताना, तुम्ही कुणाला काही बोललात तर मी ते खपवून घेणार नाही. आताच सांगून ठेवते, तुम्ही सुखात राहा, आम्हालाही सुखाने राहू द्या."
सुनेचं असं अनपेक्षित बोलणं ऐकून गंगाधरपंत क्षणभर चक्रावून गेले. त्यांच्या तोंडातून एक ब्र शब्दही फुटला नाही. गार झालेला चहा त्यांनी तसाच घशात ओतला. दाराआडून संभाषण ऐकत उभ्या असलेल्या सुलोचनेला मनस्वी आनंद झाला. गंगाधरपंत खोलीत यायच्या आतच ती कपाळाला बाम चोळून झोपेचं सोंग घेत बेडवर जाऊन पडली.
गंगाधरपंत बेडरूममधे आले. आजवर दिवेलागणीच्या वेळी कधी सुलोचना झोपल्याचं त्यांना आठवत नव्हतं. त्यांनी हळूवारपणे तिच्या कपाळाला हात लावला आणि बराच वेळ तिथल्या खुर्चीत विचार करत बसून राहिले. ‘माझ्यासारख्या एककल्ली माणसाला सुलोचनेनं इतकी वर्षे कसं सहन केलं असेल? स्वत:चं मन मारून ‘तुम्ही म्हणाल तसं’, असं म्हणत, दुसरं कुणी माझ्याशी संसार केला असता का? कसल्याही गोष्टीचा त्रागा नाही. आदळआपट नाही. या उलट ती मला समजून घेत शांत करत आलीय. मुलांच्यावर संस्कार करण्याचं काम आणि त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण धुरा तिनं एकटीने सांभाळली आहे. ती नसती तर..?'
भावनावश झालेले गंगाधरपंत हलक्या आवाजात म्हणाले, "सुलु, बरं वाटत नाहीये का तुला? डोकं दुखतंय का?"
तिनं हळूच डोळे उघडत विचारलं, "फिरून आलात का? चहा करून देऊ का तुम्हाला?" आणि उठून बसली.
गंगाधरपंत पटकन म्हणाले, "नाही, नको. मानसीने आताच करून दिलाय." असं म्हटल्यावर सुलोचना तोंडावर पाणी मारून देवघरात निरांजने पेटवून हात जोडून बसली.
संध्याकाळी काहीच न घडल्यासारखं रात्रीची जेवणं उरकली. शतपावली करून आल्यावर टीव्हीवरच्या बातम्या न ऐकताच गंगाधरपंत बेडरूममध्ये शिरले. उशीला पाठ टेकून विचारमग्न स्थितीत बसले. सुलोचना स्वयंपाकघरातील आवराआवर करून आली आणि शेजारी बसत म्हणाली, "काय पंत, आज मूड बिघडलेला दिसतोय. अहो, एवढे विचारमग्न व्हायला काय झालंय?"
त्यावर गंगाधरपंत काय बोलणार? सुनेनं जे सुनावलं, ते सांगायचं का सुलोचनेला? सूनदेखील काय चुकीचं बोलली? तिनं फक्त आरसा दाखवण्याचं काम केलं होतं. गंगाधरपंत पटकन म्हणाले, "अं, कुठं काय? काहीच नाही. असाच बसलो होतो."
सुलोचना त्यांचं अंतरंग ओळखून होती. ती हसत हसत म्हणाली, "आता जास्त विचार करत बसू नका. लवकरच आपल्या कुटुंबात आणखी एका सदस्याची भर पडणार आहे, आहात कुठे आजोबा? झोपा आता." ही आनंदाची बातमी ऐकून गंगाधरपंतांना त्या रात्री शांत झोप लागली.
एक नवी सकाळ. गंगाधरपंतांना अंतर्बाह्य बदलून गेली. ते सकाळच्या प्रहरी फिरायला जायला लागले. लवकरच त्या भागातल्या प्रभात मंडळाचे सदस्य झाले. वेगवेगळ्या मतांचे विचारमंथन त्यांच्या कानावर पडत होते. कित्येक दिग्गज लोकांच्या अनुभवाचा खजिना त्यांच्यासमोर रिता होत होता. आत्ममग्न झालेल्या गंगाधरपंतांना नकळत स्वत:चं खुजेपण जाणवत होतं, त्यामुळे हळूहळू ते विनम्र होत चालले होते. एके दिवशी सकाळी मंडळाच्या बैठकीत एक तरुण आला आणि हात जोडत म्हणाला, ‘मी विनय. माधवरावांचा मुलगा. बाबा काल पुण्याला गेले आहेत. येत्या सहा डिसेंबरला आईबाबांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस आहे. आम्ही त्या निमित्ताने हॉटेल ओपलमधे एक सोहळा आयोजित केला आहे. कृतज्ञता सोहळाच म्हणा हवं तर. सर्वांचेच आईबाबा मुलांच्या भवितव्यासाठी झटत असतात. माझे आईबाबा मात्र आजही आमचं जीवन सुसह्य करण्यासाठी प्रयत्न करत असतात. ते दोघे आमच्यासाठी आधारवड बनून ठामपणे उभे आहेत. तुम्हा सर्व ज्येष्ठ मंडळींनी त्या दिवशी अवश्य उपस्थित राहून आईबाबांना सरप्राइज द्यावं, अशी विनम्र प्रार्थना. मंडळाच्या नावे हे निमंत्रण.’
निमंत्रण अगत्याचं होतं. वेळ दुपारची होती. मंडळाचे सदस्य एका ठिकाणी जमले. दोन जाडजूड पुष्पहार घेऊन हजर झाले. माधवरावांच्या मुलाने आणि सुनेने त्यांचं अगत्याने स्वागत केलं. माधवरावांना मंडळाच्या सदस्यांची उपस्थिती अनपेक्षित होती. ते हरखून गेले. कार्यक्रमात मुलगा-सून, कन्या-जावई, नातवंडं यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. प्रीतीभोजनाचा आस्वाद घेऊन सगळेच जण घरी परतले. दुसऱ्या दिवशी माधवराव सकाळी मंडळाच्या मीटींगला हजर झाले. सगळ्याच सदस्यांनी त्यांच्या मुलाचं आणि सुनेचं कौतुक केलं. गंगाधरपंत म्हणाले, "माधवराव, तुम्ही भाग्यवान आहात. तुमचा मुलगा आणि सून खूपच चांगले आहेत."
माधवराव काहीसे गंभीर होत म्हणाले, "होय. ते दोघे खूप चांगले आहेत. आपण जन्मदात्या मातापित्यांचा प्रत्येक शब्द झेलत होतो. आता तो जमाना संपला. आजचं एक कटु सत्य सांगू का? आज प्रत्येक नात्यात तुम्हाला ‘युटिलीटी’ म्हणजे तुमची उपयोगिता सिद्ध करावी लागते. आपण त्यांच्याशी चांगले वागलो तरच ते आपल्याशी चांगले वागतात. जुनं फर्निचर जास्त कुरकुर करायला लागलं की आजकाल लगेच मोडकळीत टाकतात. तसंच जास्त कुरकुर करणाऱ्या आणि उपयोगिता नसलेल्या आईवडिलांना देखील नाईलाजाने वृद्धाश्रमात पाठवलं जातं."
माधवरावांच्या बोलण्याने सगळेच जण गंभीर झाले. माधवराव पुढे म्हणाले, "मित्रांनो, आजकाल मुलगा आणि सून दोघेही नोकरी करतात. आजच्या जीवघेण्या स्पर्धेत त्यांना तिमाही टार्गेट्सच्या चक्रात अक्षरश: पिळून निघावं लागतं. लठ्ठ पगार मिळतो पण त्यांना तणाव नावाच्या राक्षसाशी दोन हात करावे लागतात. ऑफिसातल्या ताणतणावाने ते पार थकून जातात. घरी आल्यावर तुमच्यामुळे कटकटी होत असतील तर ते कसे सहन करतील?
त्यांना पोटापाण्यासाठी ऑफिसातले ताणतणाव टाळता येत नाहीत. मग नाईलाजाने तुम्हाला दूर करण्या शिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो. एवढंच सांगतो, सावध व्हा. त्यांच्यावर बोजा बनून न राहता शक्य असेल तेवढी मदत करा. घरी कामवाल्या बायका असतात त्यांच्या कामावर लक्ष ठेवा. सांसारिक कटकटीतून त्यांना मुक्त करा. बाजारहाट करायचं काम आनंदाने करा. नातवंडांना सांभाळा. घरातलं वातावरण शक्य तेवढं आनंदी ठेवा. मग बघा, हे जुनं फर्निचरच ते अॅंटिक पीस म्हणून अभिमानाने जपतील. कधीच वृद्धाश्रमात जायची वेळ येणार नाही." त्यावर सर्व सदस्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या.
हल्ली घरात लागणारं सामान गंगाधरपंत ऑनलाईन ऑर्डर करून घरपोच मागवून घेत होते. संध्याकाळी सुलोचनेसोबत समोरच्या बागेत फिरायला जात होते. माघारी येताना ताज्या भाज्या आणि फळे घेऊन येत होते. ऑफिसातून सून घरी येताच, तिला फळांचा बाऊल देवून दूध पिण्यासाठी आग्रह करत होते. 'मानसी बेटा, आपल्या तब्येतीची काळजी घे,’ असं वारंवार सांगत होते.
गंगाधरपंतांचं हे नवं रूप पाहून सुलोचना हरखून गेली. गंगाधरपंत त्या रात्री भावविवश होत सुलोचनेला म्हणाले, "सुलु, या जगात तुझ्या इतकं मला समजून घेणारं कुणीही नाही. तू मला कधीही सोडून जाणार नाहीस म्हणून वचन दे, अगदी देवानं बोलवलं तरी!"
सुलोचना पंतांच्या हातावर हात ठेवत म्हणाली, "पंत, वचन देते. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मग तर झालं?"
सुलोचनेचा हातात असलेला हात दाबत गंगाधरपंत हळूच म्हणाले, "सुलु, आजपासून अख्खं राज्य तुझंच ! यापुढे सगळं काही तू म्हणशील तसंच होईल."
त्यावर सुलोचना खळखळून हसली आणि खट्याळपणे म्हणाली, "पंत, तुम्ही म्हणाल तसं...!"
लेखक - श्री. व्यंकटेश देवनपल्ली,
बेंगळुरू ९५३५०२२११२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा