ती दुपारी नदीवर कपडे धुवायला जाते हे मला माहीत होते म्हणून मी मोटरसायकल तिकडेच वळवली. मला पाहून घाइगडबडीत उठून साडी ठीक करत ती म्हणाली "बापरे ! तुम्ही इथे?"
"तुला भेटायला आलो."
"कशाला?"
"कशाला म्हणजे? मी माझ्या बायकोला भेटायला आलोय."
"अजून लग्नाला एक महिना बाकी आहे. काही सांगायचे आहे का अप्पांना ?"
"अगं हा गुलाब द्यायला आलो तुला." मी गुलाबाचे फुल तिच्या हातात दिले.
"फक्त फुल द्यायला इतक्या दूर ?"
"अगं आज रोज डे आहे. आज आपल्या प्रिय व्यक्तीला गुलाबाचे फुल देतात."
"माहित आहे मला. नंतर चॉकलेट देतात मग अस्वल देतात आणि मग मिठ्या मारतात."
" ते प्रेमाचीच रूपके सर्व "
"मला नाही आवडत असला प्रकार" ती फणका-याने म्हणाली
"बरं जाऊ दे. व्हेलेन्टाईनच्या दिवशी काय गिफ्ट देऊ तुला?"
"कशाला?
"माझी मर्जी. छानशी साडी?"
"नको. लग्नात पुष्कळ येतील साड्या"
"कानातले सोन्याचे."
"नको हरवले तर आपलेच नुकसान."
"सोन्याची अंगठी?"
"पुन्हा तेच?"
"मग काय देऊ?"
"काही महाग नको. आई कपडे धुण्याचा साबण देते तो खूप कडक असतो आणि त्याने फार आग होते हाताची. एक छानसा साबण द्याल आणून?"
मी कपाळावर हात मारला. "बस्स एवढच? उद्याच आणून देतो." बोलता बोलता माझे तिच्या हाताकडे लक्ष गेले. "दाखव तुझे हात" तिने दोन्ही हात दाखवले. हातांची चामडी निघालेली आणि तिनचार ठिकाणी फाटलेल्या भेगा. "बापरे!" म्हणत मी तिचे दोन्ही हात हातात घेतले. खरखरीत स्पर्श.तिने घाईघाईने हात मागे घेतले.
"काय करतायेत? कोणी पाहीले म्हणजे?"
"पाहूदे. बायकोचेच हात धरलेयत ना?"
"अजून झालेली नाही बायको आणि आमच्या खेड्यात आसे चालत नाही."
मी पुन्हा तिचे हात धरले आणि त्या खरबरीत हातावर हात फिरवीत म्हणालो." राणी प्रोमीसडेच्या अगोदरच मी प्रोमीस देतो .तुला खूप खूप सुखी ठेवेल"
तिच्या डोळ्यात अश्रू .
"तुम्ही जा आता इथुन नाहीतर मला रडू येईल."
"जातो. साबणाबरोबर एक मलम पाठवतो. त्याने तुझे हात मऊ होतील. मग आपल्या लग्नात तुझ्या हातावर छानसी मेदी काढु."
"मेंदी गो-या हातावर चांगली दिसते. काळ्यासावळ्या हातावर नाही"
"मला तु जशी आहे तशी आवडते. रंगाशी काही संबंध नाही,"
"बर..पण तुम्ही जा आता.बराच वेळ झाला येऊन."
"बरं जातो. पण रोज येईन तुला भेटायला."
"नको..नको.लोक काय म्हणतील. आता महीना तर राहीलालग्नाला. तेवढाही काढता येत नाही का?"
"नाही काढता येत."
तिने असहाय नजरेने माझ्याकडे पाहीले .
"ठीक आहे जातो. पण राणी तु व्हेलेंटाईनच्या आठवड्यातला एक दिवस विसरलीस"
"कोणता?"
"किस् डे.त्यादिवशी मी तुझा मुका घ्यायला येईन."
काहीही काय बोलता? म्हणून तिने दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला. मी हळूच तिचे हात चेह-यावरून दूर केले. मी दिलेला गुलाब तिच्या चेह-यावर फुलत होता.
©विवेक चंद्रकांत वैद्य .नंदुरबार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा