मित्राचा फोन आला. श्रीकांत अरे माझ्या माहितीतली एक मुलगी आहे. MCA झालीय तिचा रेझ्युमे पाठवतो बघ तुला उपयोगी वाटते का? मी अनेक वर्षे व्यवसाय करत असल्याने ओळखीतून एम्प्लॉयी घेणे नेहमीचेच आहे. अर्थात मला गरज असेल आणि त्याच वेळी कोणी पाठवले तर. यावेळी मला कोणी नको होते पण त्याने तिच्या घरची परिस्थिती सांगितली आणि त्याला म्हणालो पाठव तर बघतो कशी आहे ते. माझा गेल्या काही वर्षातला मुलाखत घेण्याचा अनुभव काही चांगला नाही. उमेदवारांना त्यांच्या शिक्षणातल्या तांत्रिक प्रश्नांचे नीट उत्तर देता येत नाही. हे पहिल्या वर्षात होते आता आठवत नाही. हे ऑप्शनला टाकले होते. शिक्षकांनी हा विषय नीट शिकवलाच नाही. स्वतः केवळ मजा मारली हे कोणीही सांगत नाही. हे प्रश्न आले नाहीत तर मी माझे प्रश्न विचारतो. तसा या मुलीला पहिला प्रश्न विचारला.
‘तू आज बँकेत १०००० रुपये १२ टक्के व्याजाने ठेवले तर ६ महिन्यांनी तुला किती रुपये मिळतील?’
मुलीने दीर्घ विचार केला. या प्रश्नाने तिच्या मनात बरीच खळबळ चालली असावी. फार वेळाने तिने उत्तर दिले ‘१ लाख रुपये.’ मी हल्ली अशा उत्तरांनी अवाक होणे सोडून दिले आहे. कारण माझ्या अनुभवात हे नेहमीचेच झाले आहे. तुझे चुकले आहे असे तुला वाटत नाही? मग तिने असा चेहरा केला की ज्या अर्थी सर म्हणतायत ‘तुझे काही चुकले असे वाटत नाही?’ त्या अर्थी आपण नक्की चुकलो असणार. मग मी बहुतेक चुकले असा चेहरा केला आणि परत ती विचार करू लागली आणि अजून एक प्रयत्न केला. मी तिला हा प्रश्न लिहून घे आणि आई वडिलांना घरी गेल्यावर उत्तर विचार असे सांगितले. दुसरा प्रश्न केला ‘एक कामगार एक खड्डा १० दिवसात करतो तर तोच खड्डा २ दिवसात करण्यास किती कामगार लागतील?’ याचे उत्तर मात्र तिने विचाराअंती ५ असे बरोबर दिले. मी फक्त इतकेच म्हणालो बघ हा उत्तर नक्की बरोबर आहे का? विचार कर, तर म्हणाली नाही बहुतेक चुकले आहे. आणि परत विचारात बुडाली. तिने बरोबर दिलेल्या उत्तराचा देखील तिला ठामपणा दाखवता आला नाही.
जावा, पायथन, sql आदी विषय शिकलेली ही मुलगी जिला या विषयातले सांगता आलेच नाही. सातवीचे गणित सोडवता आले नाही तेव्हा मी माझा सगळ्यात ठेवणीतला प्रश्न विचारला. ‘आईला मदत करतेस का?’ माझ्याकडे विचित्र नजरेने (काय माणूस आहे?) बघून म्हणाली. ‘हो करते. काय काय करते. भाजी चिरून देते. स्वयंपाकाची तयारी करते. म्हणजे मदत करते.’ ‘मुख्य स्वयंपाक आईच करते?’ ‘हो सर.’ मी म्हणालो काम सांगितल्यावर करते की नैमित्तिक काम म्हणून करते . ‘नाही. आईने सांगितल्यावर करते.’ मी विचारले, ‘पोळ्या?’ ‘पोळ्या नाही जमत.’ ‘का?’ ‘गोल होत नाहीत, कणिक पातळ होते.’ इतर ही काही कारणे दिली. ‘प्रयत्न किती केला?’ ‘नाही. फारसा नाही.’ मला गंमत वाटली. २०-२२ वर्षाची मुलगी MCA शिकली पण ना शिक्षण, ज्ञान नीट आत्मसात केले ना धड स्वयंपाकाचे स्कील मिळवले. तसे म्हणले तर MCA सारखी मास्टर्स डिग्री मिळवणे आणि पोळ्या करणे ही तुलना खरे म्हणजे होऊच शकत नाही. आजच्या स्वीगीच्या जमान्यात तर मी ‘पोळ्या येतात का?’ हा प्रश्न डबल ग्रॅज्युएट मुलीला विचारणेच मूर्खपणा आहे. तो मी केलाच. मी मुलीला समजावले तिचे वडील ड्रायव्हर, आई एका ठिकाणी पार्ट टाईम क्लार्क. आत्तापर्यंत ४ लाख रुपये शिक्षणावर खर्च केले. मुलगी शिकतेय म्हणून आई घरातली कामे सांभाळून नोकरी करते, पण मुलीला जबाबदारी देत नाही. मुलीला आता ना घरचे येते ना ज्ञान प्राप्त झाले. दोन्ही येत नाही. हे आजचे सर्वसाधारण चित्र आहे.
मी विचार केला एक गोल पोळी करणे ही इतकी सोपी आणि नगण्य गोष्ट आहे? की शिक्षण झाल्यावर ती करणे कमीपणा वाटावा? आणि आईला देखील आपल्या पदवीधर मुलीला पोळ्या करायला शिकवाव्यात असे वाटू नये.? मग मी पोळी करणे याची तांत्रिक बाजूवर विचार करू लागलो. मला स्वत:ला आईने माझ्या सातवीत मुलगा असून पोळ्या करायला शिकवले आज वयाच्या ६८व्या वर्षी देखील मी करू शकतो.
पोळी करताना. प्रथम जितकी माणसे जेवणार आहेत त्या अंदाजाने पीठ घेणे हे मेजरमेंट आहे. त्या पिठाच्या प्रमाणात योग्य मीठ आणि तेल टाकणे. मग पाणी टाकताना तयार होणाऱ्या कणकीच्या थिकनेसचा अंदाज घेत पाणी टाकत राहणे आणि ती त्याचा वेळी मळणे. योग्य थिकनेस आला की पाणी टाकणे थांबवून केवळ मळून कणिक एकजीव करणे. एकसारखे गोल उंडे करणे. तवा तापायला ठेऊन, पहिली पोळी थोडी गोल होईपर्यंत लाटून त्याला तेल लावणे व ३ पदराची पोळी करण्यास त्याचा त्रिकोण करणे. या त्रिकोणाचे गोल पोळीत रुपांतर करण्यासाठी वेगवेगळ्या दिशने लाटण्याने ठराविक दाब देत फिरवत राहणे. हे करत असताना पोळी पातळ वा जाड होणार नाही याचा अंदाज घेणे. पोळी सर्वदूर एक सारख्या थिकनेसची घडवून आणणे. मग तव्यावर टाकणे. पहिली पोळी ठीक आहे. पुढच्या पोळीला खाली वरीलप्रमाणे पोळी लाटायची आहे आणि त्याच वेळी तव्यावरच्या पोळीवर लक्ष ठेऊन योग्य तापमानावर न कच्ची ठेवता न करपवता भाजायची आणि योग्य भाजली की घरतल्या प्रेमाच्या माणसाला तव्यावरून चटका बसेल याची पर्वा न करता गरम गरम वाढायची. ती गरम पोळी खाताना त्या माणसाला बघून आपण तृप्त व्हायचे. ही कला नाही? हे स्कील नाही? यात ज्ञान नाही? यात गणित नाही? पोळी रोज एक सारखी करणे हे तंत्र नाही? ही पोळी वर्षानुवर्षे त्याच प्रकारे करून आपल्या प्रियजनांना रोज जेऊ घालणे यातला आनंद स्वीगीने पोळी मागवून मिळत असेल का?
मुलींनी केवळ घरकाम करावे अशा मताचा मी नाही. मी पोळीचे तत्वज्ञान सांगितले ते मुलीला लागू आहे तसे मुलांना देखील लागू आहे. ज्ञान मिळवताना दैनंदिन स्किल्स मिळवणे जरुरी आहे. ना घरचे येत ना शिक्षणात प्रगती होतेय अशा अवस्थेत तरुण वर्ग दिसतोय. लाखो रुपये फी घेऊन आपल्या संस्थेचा प्रगतीचा खोटा आलेख दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांना पास करण्याचा भ्रष्टाचार शिक्षण संस्था करतायत. हे ना पालकांच्या लक्षात येते ना विद्यार्थ्यांच्या. सत्य फक्त माझ्यासारख्या नोकऱ्या देणाऱ्यांना माहिती आहे. शेवटी घरी काम करतो का हा प्रश्न विचारण्याचा माझा उद्देश तिला वा त्याला एवीतेवी शिक्षणातले काहीही येत नसेल पण जबाबदारी घेण्याची जाण असेल, तर मी त्यांना मला लागते ते शिकवेन आणि काम करून घेईन हा असतो. पोळ्या येतात का? हा प्रश्न मला माझे उत्तर मिळवून देतो. शेवटी त्या मुलीने (मुलाने) ४-५ लाख रुपये त्या शिक्षण संस्थांच्या डोंबलावर घालून तिला (किंवा त्याला) काहीही येत नाही. मी मात्र अशा उमेदवारांना नोकरीवर ठेवले की पगार देऊन शिकवायचे हा माझ्यावर अन्याय नाही का? बरे तिला वा त्याला आपल्याला काहीही येत नाही याची जाणीव पण नसते. ती जाणीव मी करून देतो. सत्य त्यांच्या समोर उलगडतो. त्यांच्या भविष्यासाठी. ज्या मुलीला साधे व्याज काढता येत नाही तिला पायथन वा जावा वा sql येऊन व्याज काढण्याचा प्रोग्राम बँकिंग सॉफ्टवेअर लिहिताना कसा येईल? हा माझ्या पुढचा प्रश्न आहे. तसा पोळी आणि MCA अर्थाअर्थी संबंध नाही पण कोणतेही ज्ञान मिळवताना दैनंदिन स्कील कमी लेखून चालणार नाही. घर हे देखील एक जीवन ज्ञान देणारे स्किल्स देणारे Institution आहे. ही भावनाच नष्ट करण्यात आली आहे. आपल्या शिक्षणपद्धतीचे वाभाडे त्या उमेदवार मुलीने काढले. दोष तिचा नाही ती या व्यवस्थेची बळी आहे. आपण पास होतो म्हणजे आपण नोकारी मिळवण्या योग्य आहे हा तिचा आणि हा लेख वाचतील त्यांचा भ्रम मी दूर केला. बस इतकेच.
श्रीकांत कुलकर्णी
९८५००३५०३७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा