शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

1687. मुखवटा

 माधव आणि त्याची पत्नी शारदा आईच्या कॉटपाशी बसून होती.त्याच्या लक्षात आले होते, आईचा अंत जवळ आलाय. घरघर लागली होती. माधव आईच्या तोंडात पाणी घालत होता आणि शारदा बाहेर आलेले पाणी पुसत होती. पूर्ण रात्रभर ती दोघ झोपली नव्हती. त्त्यांची लग्न करून दिलेली मुलगी विद्या एक एक तासाने फोन करून चौकशी करत होती.पहाटे चारच्या सुमारास माधवच्या लक्षात आले, तोंडात घातलेले पाणी परत येते आहे. वरखाली होणारी छाती शांत झाली आहे, त्याने नाडी मिळते का ते पाहिले, त्याच्या लक्षात आले आपली आई देवाघरी गेली आहे. एक सुस्कारा सोडून तो उठला आणि त्याने कन्या विद्याला फोन करून सांगितले. 
विदया -बेबीआतेला कळवायला हवं ना?
माधव -या वेळेला तिला कळवलं तर ती चिडेल,माहित आहे ना तिचा स्वभाव? सकाळ झाली की मी कळवितो. बाकी सर्वाना तू कळव, मी दिनेश, उमेश यांना कळवितो.
माधवने त्याचे चुलत भाऊ दिनेश आणि उमेश यांना फोन करून आईच्या निधनाबद्दल कळविले.
    पहाटे पाच वाजता विद्या आणि तिचा नवरा जयंत आले.साडेपाच वाजता दिनेश आणि त्याची बायको आली.
दिनेश -बेबीला कळवलंस का? नाहीतर ती चिडायची.
माधव -नाही अजून, सकाळ होउदे.
एव्हड्यात दिनेशची बायको तनुजा बोलली 
"शारदाने तिला केलेला फोन आई आजारी आहे जास्त, भेटून जा म्हणून, पण आली नाही.
दिनेश -तिचा स्वभाव पहिल्यापासून असा झाला आहे, चिडकी झाली आहे ती..
एव्हड्यात उमेश आणि त्याची पत्नी रेश्मा येऊन पोहोचली. येताना त्याने अंतविधीसाठी लागणारे साहित्य आणले. त्या दोघानीं आपल्या काकीचे दर्शन घेतले आणि तो माधवला म्हणाला "बेबीला फोन कर बाबा, नाहीतर ती तेव्हडेच घेऊन बसायची.
त्याची पत्नी रेश्मा त्याला म्हणाली "नाहीतरी बेबीने संबंध ठेवलेत का कुणाशी? माधवभावोजी फोन करतात तिला, त्यावेळी मोजके दोन शब्द बोलणार, कुणाची चौकशी नाही की काही नाही. शारदा पण फोन करते अधूनमधून, काकीच्या आजारपणाबद्दल सुद्धा कळविले होते तिला, पण आली नाहीच शेवटी.
दिनेश -तिने राग मनात ठेवला, तिला दत्तक दिले ना प्रेमाआत्याला, त्याचा राग तिच्या मनात कायम राहिला.
तनुजा -पण सख्ख्या आत्याकडेच गेली ना ती दत्तक म्हणून, आणि तशी ती प्रेमा आत्याची खुप लाडकी होती म्हणे..
उमेश -सख्ख्या आत्याकडेच दिली तिला पण तिचे म्हणणे माधवला का दिले नाही दत्तक, तिलाच का दिले?
दिनेश -अरे खरं तर प्रेमा आत्याने काका काकीकडे बेबीला मागितले, तिला मुलीची आवड आणि लहान होती तेंव्हा पण प्रेमा आत्या माहेरी असली की तिचेच लाड करायची.
   सकाळचे सहा वाजले तसें माधवने बेबीला फोन लावला.बऱ्याच वेळ रिंग वाजल्यावर बेबीने फोन उचलला.
माधव -बेबी, वाईट बातमी आहे, आई पहाटे गेली.
पलीकडून शांतता. पुन्हा माधव बोलला 
माधव -तू येणार आहेस ना अंत्यदर्शनाला? वाट पाहू का?
बेबी -मला नासिकहुन यायला म्हणजे बारा वाजतील? तुम्ही माझ्यासाठी एवढा वेळ थांबणार आहात काय?
माधव -म्हणजे काय? तू मुलगी आहेस तिची..
बेबी -ठीक, मग मी येते.
बेबीने फोन ठेवला. माधवने बेबी येते आहे आणि बारा पर्यत पोहोचेल असे सांगितले. त्यावर रेश्मा म्हणाली "येते तर येउदे. पण एवढा वेळ ताटकळत राहायला पाहिजे.
शारदा -वाट पाहुयात तिची. ती कशीही वागली तरी आपण आपले कर्तव्य करायचे. शेवटी ती मुलगी होती आईची.
हळूहळू माधवचे नातेवाईक, शेजारी जमत होते. सर्वजण माधव, शारदा, विद्या यांना भेटून त्यांचे सांत्वन करत होते. दहा वाजता रेश्माने चहा करून सर्वांना दिला आणि सर्व मंडळी बेबीची वाट पहात राहिले, अकरा वाजता दिनेशने बेबीला फोन केला, तेंव्हा ती आणि तिचा नवरा मुंबईत शिरत होती आणि अर्ध्या तासात मुलुंडपर्यत पोचण्याचा अंदाज करत होती.
पावणेबाराला बेबीची गाडी मुलुंडमधील माधवच्या बिल्डिंगमध्ये आली. तनुजा आणि रेश्मा तिच्या गाडीकडे गेल्या आणि त्यांनी तिला उतरून घेतले. दिनेश आणि उमेशने बेबीचा नवरा उदय याला उतरून घेतले आणि घरात घेऊन आले.बेबी आपल्या आईच्या प्रेताकडे आली आणि पायाजवळ येऊन बसली. उदय पण पायाजवळ आला आणि नमस्कार करून खुर्चीवर बसला.
   बेबीच्या शेजारी येऊन शारदा, रेश्मा, तनुजा बसल्या.
थोडयावेळाने बाहेर शवाहिनी आली आणि माधवच्या आईची अंत्ययात्रा सुरु झाली.
आईचे विधी करून माधव, दिनेश, उमेश, जयंत वगैरे आले आणि थोडया वेळाने बेबी आणि उदय नाशिककडे जाण्यासाठी निघाले. ती निघताना माधव तिला म्हणाला "बेबी,आईच्या दिवसाला येतेस ना?
एक मिनिट विचार करून बेबी म्हणाली "दिवसांना जवळची माणसे येतात, मी परकी, मला या घरातून बाहेर काढलं माझ्या आईबाबांनी, आता कशाला येऊ मी?तिचे हें बोलणे ऐकून सर्वाना वाईट वाटले, माधवच्या डोळ्यात पाणी आले, शारदा पण रडू लागली. मग दिनेश तिला म्हणाला "बेबी, तू दत्तक गेली असलीस याचा अर्थ असा नव्हे की ती तुझी आई नव्हती, तिनेच तुला जन्म दिला आणि माधव, मी, उमेश तुझे भाऊच आहोत. तेंव्हा तू दिवसांना ये '.
तेंव्हा रागाने दिनेशकडे पहात ती गाडीत बसली.
बेबीच्या बोलण्याने सर्वजण व्यथित झाले, शारदाच्या डोळ्यातील पाणी आटेना. शेवटी उमेश बोलला "वहिनी, तू वाईट वाटून घेऊ नकोस. ती दुखावली आहे. सात वर्षाची असताना प्रेमाआतेने काकाकडे तिला मागितले, आतेला मूल नव्हतं, काकाने बहिणीच्या मनाचा विचार केला आणि तशी ती आपल्याच नात्यात आहे म्हणून काकीचा विरोध असताना सुद्धा तिला आपल्या बहिणीला दत्तक दिले, त्या वयात बेबीच्या मनात अढी बसली आहे आणि ती सहजा सहजी जाणार नाही '.
माधवच्या आईचे दिवस झाले, माधवणे बेबीला दिवसांची आठवण केली पण बेबी आली नाही.
पुन्हा नेहेमीप्रमाणे प्रत्येकाची नोकरीं, व्यवसाय रोजचे रुटीन सुरु झाले.
   माधव राहत होता, ते मुलुंड मधील छोटे घर त्याच्या वडिलांनी घेतलेले, म्हणून त्याच्या वडिलांच्या आणि त्यांच्या नंतर त्याच्या आईच्या नावावर होते. आई गेल्यानंतर ते छोटे घर आपल्यानावावर लावावे असा अर्ज माधवणे सोसायटीकडे दिला. सेक्रेटरीनी मासिक मिटिंगमध्ये निर्णय होईल, असा शब्द माधवला दिला.
पाच तारिखला सोसायटीची मंथलीमिटिंग म्हणून माधव मीटिंगला गेला. चेअरमन, सेक्रेटरी वगैरे माणसे हजर झाली आणि सेक्रेटरीनी माधवला विचारले "माधवसाहेब, तुमचा ब्लॉकला नाव लावायचा अर्ज आमच्यकडे आला आहे पण तुमची बहीण सीमा उदय पाध्ये हिने पण कुरियरद्वारे तिचेपण या इस्टेटीमध्ये सहहिस्सेदार असल्याचे कळविले आहे. यावर तुमचे काय म्हणणे आहे?"
माधवच्या घशाला कोरडं पडली. आपल्याकडे ही एव्हडीच जागा. दुसरी जागा घेण्याएवढी आपली परिस्थिती नाही, बेबीचा नासिकला मोठा बंगला, शिवाय मुंबईत वांद्रे भागात श्रीमंत भागात अपार्टमेंट, चार आलिशान गाड्या, मुलगा अमेरिकेत स्थायिक, तो आणि त्याची पत्नी भारतात येण्याची शक्यता नाही भरपूर पैसे, उदय म्हणजे नासिक भागातील श्रीमंत असामी, शिवाय बेबीला प्रेमआतेचे माहेरचे ठाण्यातील घर, पैसे सर्व मिळुनही तिला ह्या माहेरच्या टिचभर जागेचा हव्यास...
माधव डोकयाला, छातीला आलेला घाम पुसत सेक्रेटरीना म्हणाला "होय, सीमा उदय पाध्ये ही माझी सख्खी बहीणच, पण ती दत्तक म्हणून आतेकडे गेली, त्यामुळे..
"पण तिचा माहेरचा हक्क आपण हिरावून घेऊ शकत नाही, तिने जर सोसायटीकडे अर्ज केलंच नसता तर गोष्ट वेगळी होती '.
"ठीक आहे साहेब, तिचा अर्ज आला आहेच तर तिचे पण नाव चढवा 'असे म्हणून माधव बाहेर पडला.
माधव घरी आला आणि मटकन खुर्चीत बसला. शारदा जवळ आली आणि त्याला म्हणाली "काय झाले, नाव बदलणार ना?
"मोठी अडचण झाली आहे, बेबीने पण अर्ज केलंय, आपण पण त्या घरातील वारस आहोत म्हणून. आपलं नाव त्या घरावर चढवा '.
"अरे बापरे, मग?
"नियमांनुसार तिचे पण नाव येणारच. त्याना सांगितले तिचे पण नाव चढवा म्हणून '. वारसतपास करून तिचे नाव घायलाच हवे '.
"अहो पण बेबी एवढी श्रीमंत, तिची नासिक मुंबई, ठाणे सर्वठिकाणी घरे. राहायला कोणी नाही, श्री परदेशी..
"असे असले तरी तिला माहेरचा हिस्सा हवा तर दयायलाच लागेल '.
शारदा गप्प बसली. आता पुढे काय करणार, घराचे दोन भाग करणार की घरं विकून निम्मे पैसे घेणार,, हें तिला समजेना. तिने आपल्या लेकीच्या कानावर ही बातमी घातलीं. लेकीने आपल्या नवऱ्याला ही बातमी सांगतीली. तिचा नवरा जयंत म्हणाला "आई बाबांना काळजी करू नका म्हणावं, जागा विका, बेबीआतेला तिचे निम्मे पैसे द्या आणि इथे आपल्याकडे या '.
"पण आपली जागा केव्हडी?वन बिचके, पाचशे फिटाचा. त्यात आपण तिघे, अधूनमधून तुझे आईबाबा येतात इकडे, जागा पुरते काय?
"ऍडजस्ट करावे लागेल, नवीन जागा घेणे सध्यतरी शक्य नाही. तूझ्या आईबाबांना सांग, काळजी करू नका, इकडे या सरळ '.
तीन महिन्या नंतर ब्लॉकवर आईच्या जागेवर माधवचे आणि बेबीचे नाव चढले. बिल्डिंगचे सेक्रेटरी माधवला म्हणाले "माधवराव, तुमची बहीण भलतीच उतावळी झालेली दिसते, दर चार दिवसानंतर मला काम कोठवर आल, म्हणून चौकशी करत होती., शेवटी काल मी तिला कळवलं, तुमच काम झालेलं आहे, फ्लॅटवर तुम्हा दोघा भावंडचे नाव चढले आहे, तेंव्हा ती शांत झाली. पुढे काय करणार आहात तुम्ही? जागेचे दोन भाग करणार की विकणार?
"मी कसा विकू? मला राहायला जागा आहे कुठे?आता ती काय म्हणते तसें करायचे '.
आठ दिवसांनी बेबीचा माधवला फोन आला.
बेबी -माधव, आता तुझं आणि माझे नाव प्लॅटवर आले आहे, त्याचे दोन भाग केले तर कुणीच तेथे राहू शकणार नाही, तेंव्हा आपण तो प्लॅट विकून टाकू, मी गिऱ्हाईक पहाते. मला पैसे हवे आहेत."
माधवच्या अंगाचा तिळपापड झाला, खरं तो शांत, कधी कुणावर चिडणारा नव्हे, पण आज तो पण आतल्याआत संतापला होता,.. शारदा त्याला म्हणाली "काय म्हणते बेबी?
"काय म्हणणार, जागा विकून टाकूया म्हणते, मला पैशाची गरज आहे म्हणते... हिला पैशाची निकडं... सूड घेते आहे ती.. सूड.. तिला लहानपणी दत्तक दिले म्हणून.. माझा सूड घेते आहे... घेउदे.. मी काय करू शकतो..
मी दुबळा आहे, पैशाने आणि सरकारी नियम पण तिच्याच बाजूने आहेत.. सूड घ्यायचा आहे माझा.. मला का नाही दत्तक दिल म्हणून.. ठीक आहे... स्वतः गिऱ्हाईक पाहते म्हणते.. पाहूदे.
शारदा बिचारी रडत बसली, आता या वयात कुठे लेकीकडे जायचे म्हणून, आणि तिचे सासुसासरे तिच्याकडे आले म्हणजे.. काय करेल लेक आपली.
बेबीने फोन केला माधवला, ब्लॉकसाठी गिऱ्हाईक मिळाले आहे. तिच्या भाच्यालाच जागा हवी आहे, तो दोन दिवसात येऊन जागा पाहून जाईल.
त्याप्रमाणे बेबीचा भाचा येऊन जागा बघून गेला. पुन्हा बेबीचा फोन, तो पन्नास लाखाला जागा घयायला तयार आहे. प्रत्येकाला पंचवीस लाख मिळतील. हा व्यवहार करून टाकूया कारण मला एक महिण्यानंतर मुलाकडे परदेशीं जायचे आहे '
   माधव गप्प होता, काय होईल ते पहावे, असा विचार करत होता.
शेवटी पुढील महिन्याची दहा तारीख ठरली, या दिवशी रजिस्टर ऑफिस मध्ये जाऊन सह्या करून पैसे ताब्यात घ्यायचे. बेबीने माधवचे फोटो आणि आधारकार्ड, पॅनकार्ड पाठवायला सांगितले आणि आपण नऊ तारिखला मुंबईस येत आहोत, तयारीत रहावे असा निरोप दिला.
जागा विकायची आहेच, मुलीकडे जावे लागणार म्हणून शारदा काळजीत होती, पंचवीस लाखात कुठे जागा मिळेल का, या शोधात होती, शिवाय माधवची खाजगी नोकरीं, त्याला पेन्शन नाही, म्हणजे पुढील आयुष्य कसे काढायचे, हा पण प्रश्न होताच.
आठ तारीख पासून शारदा सामान बांधून तयारीत रहात होती. मोठी भांडी, गाद्या, जुने स्टोव्ह तिने गोणत्यात बांधले, घरातील मोठे फर्निचर बाजूला काढले, सासूची कॉट फोल्ड करून ठेवले. माधव पण तिच्या मदतीला होता.
नऊ तारिखला विद्या आईला मदत करायला आली, स्टॅन्ड वरचे डबे त्यानी खाली काढले. एव्हड्यात बेबी आणि तिचा भाचा घरात आले.
माधव डबे पुसत होता, विद्या गॅस कनेक्शन काढत होती, हें पाहून बेबी घरात गेली. तिने तिच्या आईच्या कॉटवरून हात फिरवला, ओट्यावरुन हात फिरवला आणि ती माधवला म्हणाली "माधव, शारदा तुम्ही कुठे जायचं नाही. या घरात माझे वडील राहिले, आईने संसार केला, मग शारदा तू आणि माझ्या भावाने संसार केला, एका मुलीला जन्म दिला, ते घर सोडून कुठे जायचं नाही.
तुम्हांला वाटतं असेल ही बहीण दुष्ठ, सूड घेते आहे आपला, गरज नसताना हें छोटेसे घर विकायला सांगते आहे, पण तसे नाही.
पण मी दुखावले गेले होते. सात वर्षाची असताना माझ्या बाबांनी मला आतेकडे दत्तक दिले, का मी मुलगी होते म्हणून? नाहीतरी आणखी पंधरा वीस वर्षांनी मुलगी तिला लग्न करून द्यायचे आहे म्हणून? मग माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठया असलेल्या माधवला का नाही दिले? तो वावंशाचा दिवा म्हणून?
माधव, मी मनातून रडत होते रे. आतेकडे सर्व होते पण आई नव्हती. माझे लहानपण आठवते, आई मला न्हाऊ घालायची. मऊ हाताने पाठ चोळायची, केसांचा गुंता सोडवायची, जेवणं भरवायची. आतेकडे बाई होती कामाला. ती आंघोळ घालायची, कपडे द्यायची, जेवणं दयायची पण आई म्हणजे ती बाई नव्हे..
मी दुखावले, मग या घरात यायला टाळू लागले. तुला खोटे वाटेल माधव, पण दर रक्षाबंधनाला तुझी राखी काढून ठेवायचे आणि कदाचित तू येशील म्हणून वाट पहायचे.
    बाबा गेले मग हल्ली आई गेली. आईच्या दिवसांना मी आले नाही कारण मला वाटतं होतं, या घरात माझा हिस्सा आहे कुठे, नाईलाजने मला आई गेली म्हणून कळवत असावेत, एक उपचार म्हणून. तुला खोटे वाटेल पण मी त्रिंबकेश्वरला जाऊन आईचे दिवस केले, माझे समाधान म्हणून.
मी या ब्लॉकमध्ये हिस्सा मागितला, तुला काय वाटते, मला खरंच हिस्सा हवा होता? अरे माणसे तोडून ह्या प्रॉपर्टी आणि पैशांना काय अर्थ आहे?
मला माझे समाधान करायचे होते की मला जरी दत्तक दिले असले तरी या घरावर माझा पण हक्क आहे तुझ्याएव्हडा. तो सिद्ध झाला, मला सर्व मिळाले.
माधव, शारदा मला घरं नको, पैसे नको.. काही काही नको.. पण तुम्ही सर्व हवी आहात. मला लहानपाणी "बेब्या 'म्हणून हाका मारणारा भाऊ हवा,"बेबीवन्स 'म्हणून हाक मारणारी वहिनी हवी आणि आते म्हणून हाक मारणारी भाची हवी, मुख्य म्हणजे हक्काचे माहेर हवे. माझ्या स्वभावामुळे मी सर्व गमावलंय,ते परत मिळवायला हवं.
माधव, उद्या आपण रजिस्टर ऑफिस मध्ये जायचे आहे ते या घराची विक्री करायला नाही तर मी हक्कसोडपत्र देऊन हें घर तुझ्याच नावावर करणार आहे, एव्हडंच नव्हे आतेने माझ्या नावावर केलेले ठाण्याचे घर मी विद्याच्या नावावर करणार आहे. त्याचीच ही कागदपत्रे आहेत.
  शारदा सदगदीत झाली, ती केंव्हा पुढे गेली आणि "बेबीवन्स 'म्हणत तिने बेबीला जवळ घेतले तिलाच कळले नाही, विद्या धावली आणि बेबीआते म्हणत तिला मिठी मारली.
माधव डोळे पुसत होता. त्याने प्रेमाने "बेब्या 'अशी हाक मारली.
बाजूला बसलेला बेबीचा भाचा हा कुटुंबसोहळा कौतुकाने पहात होता आणि डोळे पुसत होता.

प्रदीप केळुस्कर 9422381299 / 9307521152

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...