शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

1686. मनव्यवस्थापन

 मर्मबंधातली ठेव हि...
कितीही जपुन वागलं तरी काही लोक फक्त आपल्या चुकाच पकडायला बसलेले असतात. 
म्हणजे आपल्या ध्यानी मनी नसलेल्या गोष्टींनी सुद्धा नेहमीच कोणीतरी दुखावून घेत असतं.
 माणसं नेहमीच महत्त्वाची वाटतात आपल्याला,
 म्हणून आपण दरवेळी स्पष्टीकरणं देत राहतो. 
कधी चटकन माफीही मागुन टाकतो (आपल्या अहंकारापेक्षा माणसं महत्त्वाची हे तत्त्व डोक्यात ठेवून). पण हे सतत घडत राहीलं तर पोरखेळ होऊन बसतो आयुष्याचा.... 
जपुन तरी किती वागावं नेहमी? 
मग भीती तयार होते नात्यात!
अरे, आपण थोडंसं जरी वेगळं वागलो, बोललो, चुकलो तरी आपल्याला कोणी तरी सतत टपूनच असतं बोलायला!!!, 
आपल्याकडून नकळत काही गोष्ट घडली, जिच्यामागे कोणाला हेतुत: दुखावण्याचा उद्देश नसला तरी कोणी आपल्याबद्दल गैरसमज करून घेणार आहे, 
आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार आहे, 
ही टांगती तलवार डोक्यावर राहते. 
ही भीती मोठाल्या भिंती नात्यांत उभ्या करते. 
आतुन तुटण्याची प्रक्रिया कधीच सुरू झालेली असते, 
तरीही आपण नात्यांत चिवटपणे तग धरुन राहिलेलो असतो.
 (कारण आपल्याला आयुष्यात माणसांचं मोल फार अधिक वाटलेलं असतं.)
   
पण उंटाच्या पाठीवर शेवटची काडी कधीतरी पडतेच. 
असह्य होतात स्पष्टीकरणं, 
नको होतं वारंवार रिव्हर्स गिअरवर जाऊन कोणाची सतत समज काढत बसणं. 
ज्यांना आपल्या आयुष्यात थांबायचं आहे, ज्यांना आपण कोणत्याही अटी शर्तींशिवाय हवे आहोत, 
जी लोकं आपल्या असण्यावर प्रेम करतात,
 त्यांना आयुष्यात थांबु द्यावं, 
नव्हे तर आवर्जून वेळ देऊन नातं जतन करावं. 
पण जी लोकं आपल्या आयुष्यात येताना परतीचा दरवाजा उघडा ठेवुन आले आहेत, 
जे अस्थिर आहेत, 
पुढे जाऊन पुन्हा फार फार मागे येत आहेत अशा लोकांनी 
'मी तुमच्या आयुष्यातून जातो/जाते' म्हटल्यावर त्यांना थांबण्याचा फार आग्रहही करू नये. 
तसं केल्याने फार तर तेवढी वेळ टळु शकते.
 आजच मरण उद्यावर ढकलणं इतकाच त्याचा अर्थ!
 ज्यांना जायचंच आहे ते काहीतरी निमित्ताकारणे कधी ना कधी आपल्या आयुष्यातून जाणारच असतात. 
तेथे अडकून फार ऊर्जा वाया घालवत बसु नये. 
त्या नात्याला 'कृष्णार्पणमस्तु' म्हणावं आणि पुढे चलावं....
     
आपल्या वागण्याने कोणी दुखावेल का?, 
ही सततची भीती मनात बाळगण्याऐवजी हा विश्वास मनात असु द्यावा की,
 'जी लोकं माझी आहेत, 
जे माझ्यावर विनाशर्त प्रेम करतात' 
ती लोकं मला समजून घेतील. 
माझ्याकडून नकळत काही चुकलं, तरी मला चटकन आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार नाहीत. 
कारण त्यांना माहिती आहे की, माझी कृती आणि माझे शब्द यापेक्षा माझे त्यांच्याप्रती असणारे भाव जास्त महत्त्वाचे आहेत. 
ते निर्मळ आणि निरपेक्ष आहेत. 
अनवधानाने कधी एखादा अप्रिय शब्दही जातो मुखातून, 
मग आपल्याला वाटतं की माझ्या मनात नसताना अशी चुक झालीच कशी?
 आपली माणसं आपल्याला कानकोंडं होण्याची वेळ येऊ देत नाहीत.
 "'शब्द फसवे असतात. विश्वास माणसाच्या वृत्तीवर ठेवावा, 
तात्कालिक शब्दांवर नाही" हे ते जाणुन असतात. 
ते आपल्या अशा नकळत होणाऱ्या चुका समंजसपणे पोटात घालतात. 
 अशा माणसांसाठी मला कितीही पावलं मागे यावं लागलं तरी बेहतर! 
माझा अहंकार या नात्यांपेक्षा कधीच मोठा नसेल हे मनाशी असू द्यावं.
 (मलासुद्धा इतरांसाठी असं समंजस माणूस असायचं आहे हेही मनाशी पक्कं असू द्यावं.)...
      
'अतिविचार' हे एक विष आहे. 
 ह्याला काय वाटेल, तिला काय वाटेल आणि त्यांना काय वाटेल या विचारात आयुष्य संपून जातं, 
पण जगण्याचा आनंद काही घेता येत नाही.
 आपले हेतु शुद्ध असतील तर कोणाला काय वाटेल याचा आपण फार विचार करत बसु नये. 
ज्यांचं आपल्यावर प्रेम आहे, 
ते मोकळेपणाने आपल्या चुका सांगतील, आपले मुद्दे समजून घेतील आणि सुधारणेला संधी देतील. 
जे आपले नाहीत ते नेहमी आपली शेंडी कशी हातात सापडेल या प्रयत्नात राहतील....
 निमित्त काढुन नात्याचा कडेलोट करतील. 
नात्यांना मोकळेपणानं सामोरं जाऊयात.... आपलं कोण,
 परकं कोण हे काळाच्या परीक्षेत सिद्ध होतंच. 
त्यावेळी काय पकडुन ठेवायचं ?
आणि हातुन काय निसटू द्यायचं हे ठरवता यायला हवं फक्त.
So, Let it go ..!
Let it go ....!!
🙏ॐ🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...