मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५

1729. लग्नाची पहिली रात्र

     दोन दिवसाचे लग्न व तिसरा दिवस प्रवासाचा. सर्व दमले होते. पाहुणे देखील आपापल्या गावी परतले होते आणि लग्नानंतरची ती त्यांच्या मिलनाची पहिलीच रात्र होती. मनोहर फार आनंदात होता. रात्री तो आपल्या खोलीत गेला. त्याला अपेक्षा होती की हिंदी चित्रपटांच्या नायिकेसारखी त्याची नववधू देखील त्याची वाट बघत त्याला पलंगावर बसलेली दिसेल. पण माधुरी तर खुर्चीवरच बसली होती.
मनोहर तिच्याजवळ आला,‘ इथं अशी काय बसली आहे ?’
‘ मला काही महत्वाचं बोलायचं आहे. ‘ माधुरी म्हणाली .
‘आजच ? आत्ताच ? ‘
‘होय ! आजच आणि आत्ताच . ‘
'बरं बोल. काय सांगायचं आहे ?’
‘मी लग्नाला तयार नव्हते. ‘
मनोहर एकदम दचकला , ‘काय म्हणतेस तू ? वेड लागलाय का तुला? अगं परवाच आपलं लग्न झालं न? आणि आज तू हे काय म्हणतेस ? कोणी काही बोललं का तुला ? ’
‘ नाही . ‘
‘ मग? ‘
‘ मग काय , जे खरं आहे तेच मी तुम्हाला सांगतेय. हे लग्न मला मान्यच नव्हतं.
‘ अगं , मग हे लग्नाच्या अगोदर नाही का सांगायचं? इतक्या पुढे आल्यावर आता मागे फिरणे.. 
‘ माझा नाईलाज होता.‘
‘ म्हणजे ? ‘
‘ तुम्हाला हे तर ठाऊकच आहे की माझे आईवडील माझ्या लहानपणीच एका अपघातात वारले. काका-काकूंनी सांभाळले मला. काका तसे प्रेमळ होते. पण काकूंनी मला खूप छळले. स्वत:च्या मुलांबरोबर चांगली वागायची पण माझ्याशी मात्र सावत्रपणाने वागायची. घरातली सर्व कामं माझ्याकडून करवून घ्यायची. माझ्या प्रत्येक गरजांसाठी, आवडी-निवडी साठी मला नेहमीच मन मारून राहावे लागायचे. माझ्यामुळे काका-काकूंमधे सारखे वाद व्हायचे. काका-काकूंची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती व माझ्याही उत्पन्नाची काहीच सोय नव्हती. शेवटी काका-काकूंनी जमेल तसे माझे लग्न उरकून स्वत:ची मोकळीक करून घेतली. मलाही नाही म्हणायला सोय नव्हती म्हणून मीही कंटाळून लग्नाला तयार झाले. शेवटी माझ्याजवळ काही पर्यायच नव्हता. ‘माधुरी सांगत होती, ‘हालच सोसायाचे असतील तर कुठेही असो, काका-काकूंकडे कशाला? एकदाची त्या नरकातून सुटका होईल या विचाराने मी लग्नाचा विरोध केला नाही. ‘
‘ पण आता तर लग्न झालं ना ? ‘ मनोहरला काही उलगडा होत नव्हता .
‘ होय ! पण मला तुमच्याशी लग्न करायचं नव्हतं .‘ माधुरी म्हणाली .
‘ मग कोणाशी लग्न करायचं होतं ? ‘ मनोहर आता वैतागला . त्याचा आवाज थोडा वाढला होता.
‘ जोराने बोलून तुम्ही मला बोलण्यापासून थांबवू शकत नाही . शिवाय शेजारच्या खोलीत सर्वांच्या कानावर सर्व गोष्टी जातील . ‘माधुरी शांतपणे म्हणाली . मनोहरला माधुरीच्या व्यवहारचे फार आश्चर्य वाटत होते.
‘ अगं, पण मी माझ्या आईवडिलांचा एककुलता एक मुलगा . माझ्याबरोबर त्यांची सून म्हणजे तू ही आता त्यांच्या जगण्याची आशा आहेस. शिवाय नातेवाईक व इतर सर्वांना कळलं तर ते सर्व काय म्हणतील? ‘ शांतपणे तो म्हणाला.
‘तो तुमचा प्रॉब्लेम आहे.' तितक्याच शांतपणे माधुरी म्हणाली.
मनोहरचा पारा परत एकदा वाढला. पण त्याने स्वत:ला आवरले. पहिल्याच रात्री तमाशा नको. पण माधुरीच्या या असल्या वागण्याने तो दु:खावला. काय करावे हेच त्याला समजेना. काय बोलावे हे देखील कळेना. तीन दिवसांपूर्वीच उत्साहाने लग्न झाले आणि आज त्याची बायको त्याला म्हणते की हे लग्नच मुळात तिला मान्य नाही आणि याहीपेक्षा हे की तो तिची आवडच नाही. हा अपमानाचा घोट गिळत तो पलंगावर बसला. ‘हे बघ आता माझे प्रॉब्लेम्स आणि तुझे प्रॉब्लेम्स काही वेगवेगळे नाही. बरं, मला सांग मी तुझी आवड नाही याचा काय अर्थ घ्यावा? ‘ मनोहर ने तिला समजविण्याचा प्रयत्न केला .
‘ याचा एकच अर्थ . माझी आवड तुम्ही नाही. ‘ माधुरी शांतपणे म्हणाली .
‘ पण माझ्यात काय दोष आहे ? '
‘ तुमच्या गुणदोषांची विवेचना करण्यात मला रस नाही. ‘ माधुरी हळूच म्हणाली .
‘ खरं काय ते सांग. प्रस्तावना बरीच झाली . ‘ मनोहरला आता सहन होत नव्हते .
‘सांगते, ऐका. ‘ माधुरी बोलू लागली, ‘ माझं एकावर अतोनात प्रेम आहे. माझ्यासाठी तो ईश्वरच आहे. माझा देव आहे. हवं तर दैवत समजा. मी त्याला कधीही विसरू शकत नाही. मी त्याच्या प्रेमात गुंतले आहे. दिवस रात्र त्याचाच विचार करते. माझं प्रेम अगदी पवित्र आहे. जसं राधेचं प्रेम. जसं मीरेचं प्रेम. पण प्रेम झालं असलं तरी आम्हीं दोघं लग्न करू शकत नाही. काका-काकू माझ्या लग्नाची घाई करत होते म्हणून मी ठरविलं, की आमचं प्रेम जगात अमर करायचं. नावापुरता आपापला संसार रेटावा लागला तरी पण एक दुसऱ्याच्या प्रेमात पूर्णपणे बुडून जायचं. संसारच्या वेगवेगळ्या बंधनात असलो तरी एक दुसऱ्याच्या प्रेमात कमतरता पडू द्यायची नाही.'
‘ पण ही तर फसवणूक झाली ना ?'
‘ कोणाची ? ‘
‘ तुझ्याकडून माझी. तुझ्या प्रियकराकडून तुझी  आणि तुम्हां दोघांकडून सर्वांची व समाजाची देखील . ‘
‘ समाजाच्या तर कोणी गोष्टीच करू नये.  माधुरी शांतपणे बोलत होती. ‘समाजाने मला काय दिलं ?  समाजत आणि चारचौघात राहून देखील आजपर्यंत मी एकटीच जगतं आहे. माझे आईवडील गेल्यापासून सतत माझी फसवणूक होत आहे. काकांच्या मुलांमधे आणि माझ्यामधे कारण नसताना समाजानेच तर भेदभाव केला? असल्या समाजाची मी काळजी कशाला करायची? मला जो मानसिक आणि भावनिक आधार हवा होता तो माझ्या प्रियकराने मला दिलेला आहे. माझ्या प्रियकराने कोणाचीही फसवणूक केलेली नाही. त्याने सर्व नातीगोती केव्हाच मनापासून त्यागलेली आहे. खरं प्रेम करणारा माझा प्रियकर कोणत्याही बंधनांना मानतं नाही. उरला प्रश्न तुमचा तर माझंच स्वत:च लग्न तुमच्याशी एका दडपणाखाली झाल्याने माझ्याच बरोबर सर्वात मोठी फसवणूक झालेली असल्याने तुमच्याशी फसवणूक करण्याच्या मी परिस्थितीत देखील नव्हते.  मनोहरला बघीर झाल्यासारखं झालं. एक नववधू पहिल्याच रात्री तिचे संबंध कोणा तिसऱ्याशी असल्याची चक्क कबुली देत होती . नवल म्हणजे यासाठी तिच्या मनात कोणतीही खंत नव्हती. यालाच स्त्री स्वातंत्र्य म्हणतात का? काय करावं हे त्याला समजेनासं झालं. आई-वडिलांनी त्याच्या लग्नाची किती स्वप्न बघितली होती. लग्न ठरल्यापासून घरात नव्या सुनेची सतत चर्चा होत होती. आई-वडील तर नातवंडांच्या स्वप्नात देखील रमले होते. आता त्यांना या सर्व प्रकरणाची जराशीही कल्पना आली तर त्यांना किती धक्का बसेल? वडिलांचे तर नुकतेच बायपासचे ऑपेरेशन झालेले आहे. त्यांना तर हा आघात सहनच होणार नाही. आईदेखील खचून जाईल. चारचौघांना तिला सामोरे जाता येणार नाही. आजपर्यंत समाजात ताठ मानेने जगणाऱ्या त्याच्या आई-वडिलांचे काय होईल? नवीन नवरी त्याला लगेचच सोडून गेल्यावर लोकही त्याच्याबद्दल नाही-नाही ते बोलतील. या सर्वांना तो कसं काय तोंड देणार आहे ? या सर्व विचारांनी मनोहर फारच काळजीत पडला .
‘ मग आता पुढे काय? ’ मनोहरने विचारले. त्याच्या आवाजत वेदना होत्या.
‘ हे सर्व तुम्हाला सांगितल्यावर मी या खोलीत कशी काय थांबू शकते? ‘
‘ म्हणजे तू जाणार? ‘
‘ होय.'
‘ पण कुठे? ‘
‘ सध्या तरी माहित नाही. ‘
     थोडा वेळ दोघेही शांत बसले. मनोहर सारखा माधुरीकडे बघत होता. माधुरीची नजर खालीच होती. ती पायातल्या अंगठ्याच्या नखाने जमिनीवर मनातलं काहीतरी कोरीत होती. ती सर्व सांगून मोकळी झाली होती. आता मनोहरची निर्णय घेण्याची वेळ होती. काय करावे हाच विचार त्याला सारखा त्रास देता होता. त्याच्या मते, लग्ना अगोदरचे काही संबंध असले तर बहुदा सर्व मुली ते गुपितच ठेवतात व आपल्या संसारात रमतात. पुरुषही काही वेगळं वागत नाही. पण इथं तर पहिल्याच रात्री सर्व उघडकीस आलं होतं, आणि मुख्य म्हणजे त्याची बायको त्याला सोडून जाणार होती आणि याची तिला कोणतीही खंत नसल्याचे मनोहरला भासतं होतं. आयुष्यात येणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टींची तिला काही एक कल्पनाही नसली तरी ती काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीतच वाटत नव्हती. आता मार्ग मनोहरलाच शोधायचा होता.
‘हे बघ, मी तुझ्या प्रियकराला ओळखत नाही म्हणून मला त्याची बाजू माहित असणं शक्य नाही. पण त्यानं जे काही केलं ते कोणत्याही दृष्टीनं योग्य नाही. लहान वयातल्या बालिश प्रेमाचा गैरवापर केल्याचं मला जाणवत आहे. तू वेळीच सावध हो. त्याचा नाद सोड. नाही तर तुझी वाट सर्वात जास्त खडतर असणार आहे. 
‘प्रेमाच्या वाटेवर कितीही संकटं सहन करण्याची माझी तयारी आहे . ‘
आता मनोहर चिडला, ‘ तुला एकटीलाच सहन करावं लागणार आहे. जाऊ दे. जास्त चर्चा करण्यात काय अर्थ? आता असं कर. दोन-चार दिवस जाऊ दे. माझ्या आईबाबांना थोडं समाधान वाटू दे. मग मी तुला तुझ्या काकांकडे स्वत:च पोहचवून येईन. मग तुझा निर्णय घेण्यासाठी तू मोकळी राहशील. तोपर्यंत कुठंही या बाबतीत वाच्यता करू नको आणि काळजी तर मुळीच करू नको. एक नवरा म्हणून तुझ्या मनाविरुद्ध मी कधीही वागणार नाही. माझं प्रेम चारच दिवसांचं असलं तरी ते प्रगल्भ आहे. त्यात बालिशपणा नाही. तू पलंगावर शांत झोप मी झोपतो सोफ्यावर.  सकाळी मनोहरची झोप उशिराच उघडली. घड्याळात आठ वाजले होते. खोलीत माधुरी नव्हती. त्याला एकदम धस्स झालं. माधुरी कुणालाही न सांगता निघून तर गेली नाही ना या विचाराने तो अस्वस्थ झाला. घाईघाईने तो बाहेर आला आणि पाहतो तर काय, माधुरीचे स्नान नुकतेच झालेले वाटत होते. अर्धवट पुसलेले ओलसर केस मोकळेच होते. बाबा सोवळं नेसून पूजा करायला बसले होते. माधुरी बाबांसाठी पुजेची तयारी करत त्यांच्या जवळ बसली होती. एक-एक फुल वेचून माळा गुंफत होती. हे सर्व बघून मनोहरला फारच आश्चर्य वाटलं. माधुरीच्या चेहऱ्यावर एक वेगळचं तेज होतं. रात्रीच्या माधुरी पेक्षा ही माधुरी फारच वेगळी दिसत होती. मनोहरचा स्वत:च्याच डोळ्यांवर विश्वास बसतं नव्हता. बऱ्याच वेळ तो माधुरीला बघत तसाच उभा होता. बाबांचंच लक्ष त्याच्याकडे गेलं .
'सुनबाई , तुमचे यजमान उठले. त्यांच्यासाठी चहापाण्याच बघा. ‘ बाबा हसत म्हणाले .
मनोहर परत आपल्या खोलीत परतला. त्याला काही समजेचना. थोड्यावेळाने माधुरी चहा घेऊन खोलीत आली . चहा टेबलावर ठेऊन ती परत जाऊ लागली .
‘ थांब .’ मनोहर म्हणाला .
‘बाबांची पूजा आटोपली की येते . ‘ म्हणत ती निघून गेली.
मनोहरचे स्नान वगैरे आटोपले तो पर्यंत माधुरी खोलीत आलेलीच नव्हती. मनोहरला तिला बरच काही विचारायचं होतं. रात्रीची माधुरी व आत्ताची माधुरी यात त्याला बराच फरक जाणवत होता. थोड्यावेळाने आईनेच त्याला हाक दिली, ‘गरमागरम पोहे बनविले आहेत सुनबाईने. बाहेर ये. ‘ मनोहर बाहेर आला. माधुरीने त्याच्या हातात पोह्यांची प्लेट दिली.
‘ काय दादा....कुठं घेऊन जाणार आहेस वाहिनीला हनीमूनसाठी?‘ चुलत बहिणीनं त्याला विचारलं.
‘ कुठं ही नाही. ‘
‘ का रे ... ? वाहिनीला बाहेर नेणार नाही फिरायला ? ‘
‘ बाहेर तर नेणार आहे ... पण .. ‘ मनोहर आईकडे वळला ,’ उद्या किंवा परवा हिला माहेरी सोडणार आहे. ‘
‘ कां रे ... ? त्यांच्याकडून काही निरोप वगैरे आला आहे का? ‘ आईने विचारले .
‘ नाही...माधुरीचीच जायची इच्छा आहे. ‘ मनोहरने कटाक्षाने माधुरीकडे बघितले व म्हणाला, ‘ काल रात्री म्हणत होती. तिचं काही जरुरी काम आहे. तिला माहेरी जावं लागेल . ‘
आता सर्व जोरजोराने हसू लागले . मनोहरला गोंधळल्या सारखं झालं. त्याने माधुरीकडे बघितलं तर तीही हसत होती. त्याला कळेचना की सर्व कां हसत आहे ? तो रागाने म्हणाला , ‘हसायला काय झालं ? ‘
‘ काल कोणती तारीख होती? ‘ आईने विचारले.
‘ एक एप्रिल.‘ लगेच मनोहरच्या तोंडून निघाले.
‘ दादा , तू ‘ एप्रिलफूल ‘ बनला . ‘ चुलत बहिणीने त्याच्या पाठीवर धप्पा दिला.
‘ सुनबाईने सांगितलं सगळं आम्हाला. ‘ बाबा म्हणाले.
मनोहर आता आणखीनच चिडला, ‘ पण मग तो प्रियकर .... ? ‘
‘ गोपाळकृष्ण सोबत आणले आहे सुनबाईने. पूजेसाठी ठेवले आहे देव्हाऱ्यात. ‘ आई हसत म्हणाली.


अज्ञात लेखकास सादर समर्पित.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...