शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

1727. मुसाफिर

     तालुक्याजवळच्या त्या दिवशी जणू आक्रितच घडलं. म्हाताऱ्या बळवंता कुंभाराचा हरवलेला नातू नामदेव १७ वर्षांनी घरी परत आला. अचानक आणि अवचित.  म्हणजे तो तालुक्याच्या जत्रेत लहानपणी हरवला तेव्हा पाच वर्षाचा होता. त्या दिवशी बळवंताचा मुलगा विठू अन त्याची बायको एकुलत्या एका पोराला घेऊन जत्रेत गेले होते. दिवसभर फिरले. काहीबाही पाहिलं. झुल्यात बसले. छोटोमोठी खरेदी केली. विठूला जत्रेत गावचे काहीजण भेटले म्हणून तो त्यांच्याशी बोलत उभा राहिला. इकडे विठूची बायको एका दुकानात बिल्लोर, झांपर घेण्यात गुंतून गेली. लहानगा नामदेव तिच्याच पदराला धरून होता. पण काय झालं काय माहिती. दहा मिनिटांनी विठू दोस्तांशी बोलून आला तेव्हा नामदेव बायकोजवळ नव्हता. त्यानं बायकोला विचारलं तर ती सुद्धा कावरी बावरी होऊन 'आता इथंच तं होता' म्हणून पाहायला लागली. आजूबाजूचे दुकानदार, बघे गोळा झाले. 'नामदेव...नामदेव' म्हणत विठू अन त्याची बायको इकडे तिकडे ओरडायला लागले. भांबावल्यासारखी त्यांनी सगळी जत्रा पिंजून काढली. रडले, ओरडले. नामदेवाची माय ढोरासारखी हंबरली. दहा पंधरा वेळा ते जत्रेतल्या सगळ्या रस्त्यावर, दुकानात भणाणल्यासारखे फिरले. प्रत्येक माणसाला दहा वेळा विचारलं. जत्रेत दिसणाऱ्या प्रत्येक लहान पोराला तीनतीनदा बघितलं पण नामदेवचा काही पत्ता लागला नाही. विठू मटकन खाली बसला. नामदेवाची माय उसासे टाकत जोरजोरात रडत राहिली. संध्याकाळी तालुक्याच्या गावी पोलीस स्टेशनात दोन तास ताटकळत बसून तक्रार नोंदवली आणि रात्री उशिरा घरी परत आले.
     विठूच्या आईबापाचा म्हणजे बळवंत कुंभाराचा अन त्याच्या बायकोचा नातवात फार जीव होता. नामदेव पाच वर्षाचा होईपर्यंत वाढला तोच मुळी आजी आजोबाच्या अंगाखांद्यावर. विठू आपल्या खोपटाच्या समोरच्या अंगणात कुंभारकीचं काहीबाही काम करत राहायचा आणि त्याची बायको त्याला दिवसभर मदत करत राहायची, तेव्हा नामदेव आजी आजोबांच्याच सोबत असायचा. विठूच्या बायकोला लग्नानंतर लवकर पोर होत नव्हतं. लग्न होऊन सात वर्ष होऊन गेली तशी बळवंता आणि त्याच्या बायकोची चुळबुळ वाढली. शेवटी सुनेला दिवस गेले. पाहिलं अपत्य आणि तोही नातू झाला म्हणून बळवंता आणि त्याची बायको मनोमन खूष झाले. त्या छोटयाशा खोपटात बऱ्याच वर्षांनी टाहो ऐकायला मिळाला. जणू झाडाला पालवी आली. नामदेव हे नाव सुद्धा दोघांनीच ठेवलं त्याचं. बळवंताने आता कुंभारकीचं काम कमी करून बरंचसं विठूवर सोपवलं आणि तो अन त्याची बायको आपल्या छोट्याश्या संसारात नातवासोबत रममाण झाले. नामदेवाचा लळा त्यांना इतका लागला की त्याच्याशिवाय चैन पडेनाशी झाली. सकाळी उठल्यापासून त्याची आंघोळ, त्याचं खाणं, त्याच्याशी खेळणं, त्याचं जेवण, झोपणं, दुपटे बदलणं, त्याच्यासोबत बोबडं बोबडं बोलणं. त्यांचा अख्खा दिवस कारणी लागला. कधी कधी तर विठूची बायको 'नामदेवला माह्याकडं पन द्या थोडावेळ' म्हणून हसून सांगायला लागली. म्हातारे आजा-आजी जणू नामदेवाशी एकजिन्नस झाले. जणू ते दोन्ही म्हातारे जीव परत एकदा बालवयात पोचले. विठू अन त्याची बायको समाधान पावले. गरिबीच्या त्या छोट्याश्या संसारात आपली मीठमिरची खाऊन ते सगळं कुटुंब हसऱ्या मनानं जगत राहिलं. आणि मग जत्रेत हे असं अचानक अघटित घडलं. 
     रात्री उशिरा पोलिसात रिपोर्ट देऊन विठू अन त्याची बायको हवालदिल मनानं आणि पाणावलेल्या डोळ्यांनी घरी आले तेव्हा बळवंता कुंभार आणि त्याची बायको बाहेरच पडवीत बसले होते. आज दिवसभर नामदेव त्यांच्याजवळ नव्हता आणि तो आता कधी एकदा घरी येतो याची ते डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होते. पण विठूच्या बायकोनं  जसं आल्याआल्या सासूच्या गळ्यात पडून हमसाहमशी रडणं सुरु केलं तसा बळवंता हबकला. घाबरला. भांबावला. 'काय झालं ? काय झालं ? नामदेव कुठाय ?' म्हणून त्यांना विठूला विचारलं. रडत पडत अन डोक्याला हात लावत विठूनं सारी कहाणी सांगितली तसा म्हातारा बळवंता मुळापासून थरपटून गेला. त्याचा चेहरा रडवेला झाला. ओठ थरथरत राहिले. शरीर लटपटत राहिलं. त्याची म्हातारी बायको उन्मळून पडल्यासारखी छाती पिटत राहिली. म्हातारा बळवंता खोपटातून पडवीत आन पडवीतून खोपटात येरझारा घालत राहिला. रडक्या चेहऱ्यानं आकाशाकडे हात जोडत पुटपुटत राहिला. रात्र गेली. दिवस गेले. महिने गेले. नामदेव परत आला नाही. त्या लहान्याश्या झोपडीतल्या हसऱ्या संसारात भकासपणा आला. मख्ख चेहऱ्यानं विठू काम करीत राहिला. बायको डोळ्याला पदर लावून जगत राहिली. बळवंता मनाने खंगून गेला. त्याच्या बायकोनं नामदेव...नामदेव...करीत कायमचं अंथरूण पकडलं. दोघांना अन्न गोड लागेना. कशात मन रमेना. दुःखी चेहऱ्यानं आणि आर्त हृदयानं ते जगत राहिले. विठूनं बऱ्याच वेळा पोलीस स्टेशनात चकरा मारल्या, ताटकळत वाट पहिली, हात जोडून साहेबाची अजीजी केली. विहिरीत पडून मेलेल्या, अपघातात दगावलेल्या दोन चार पोरांची मृत शरीरं शवागरात पहिली. पण त्यात नामदेव कुठंच नव्हता. शेवटी हतबल होऊन अन थकून विठूनं प्रयत्न सोडून दिले. पण बळवंताला भारी विश्वास होता. नामदेव हरवला होता. त्याचा काही ऍक्सीडेन्ट वगैरे झाला नव्हता ना त्याचं काही विपरीत घडल्याची बातमी होती. म्हणून बळवंता प्रत्येक दिवस पडवीसमोरच्या रस्त्यावर नजर लावून बसायचा. हरवेलला माणूस एक दिवस घरी परत येणार यावर त्याची श्रद्धा होती. नामदेवाची आजी अंथरुणावर आणि बळवंता आकाशाकडे हात जोडीत देवाला प्रार्थना करीत राहायचे. वर्षे गेली. म्हातारी आजी खंगली. बोलता येत नव्हतं तेव्हाही तोंडातल्या तोंडात 'नामदेव...नामदेव' असं  पुटपुटत राहिली आणि मग एक दिवस झोपडीच्या दाराकडे नजर लावत लावत तिनं जीव सोडला. बळवंता आता एकदमच अकेला झाला. दोन वेळा अन्न गिळायचं आणि दाराकडे नजर लावून नामदेवाची वाट पाहत बसायचं एवढंच त्याला उरलं. बळवंता आता पंचाहत्तरीला आला तशी त्याचीही तब्येत ढासळली. थकलेल्या खाटेवर पांघरून गुंडाळून तो खोकत बसून राहायचा आणि हरवलेल्या नातवाची वाट पाहत राहायचा. खोकणं वाढलं आणि तब्येत जरा जास्त व्हायला लागली तेव्हा विठूनं गावाच्या डॉक्टरला दाखवलं. डॉक्टर म्हटला 'दमा खूप झालाय. वयानुसार जास्त नाही जगणार आता हे. आतापर्यन्त कसे टिकले हेच आश्चर्य !'. विठूच्या डोळ्यात पाणी आलं. बळवंता तरीही नामदेवाची वाट पाहत बसला. विठूला मनोमन वाईट वाटलं. म्हाताऱ्याचा जीव नातवात गुंतलाय हे त्याला कळून चुकलं. 'माजे डोले  निवन्याआधी नातवाची भेट करून दे राजा !' म्हणून म्हातारा बळवंता कधी कधी विठूला कळवळून म्हणायचा आणि अंथरुणावर पडून नातवाचं नाव पुटपुटत खोकणाऱ्या बापाकडे पाहत आपण काहीच करू शकत नाही याची विठू मनोमनी खंत करीत राहायचा. आणि आता हे अचानक आक्रीत घडलं !. नामदेव सतरा वर्षांनी परत आला !!
     मिसरूड फुटलेला वीस बावीस वर्षाचा तो जवान पोरगा, मळक्या कपड्यानिशी आणि खांद्यावरच्या एका जुनाट बॅगनिशी झोपडीजवळ आला तेव्हा म्हातारा बळवंता बाहेरच बसून सकाळचं ऊन खात खोकत होता. विठू अन त्याची बायको बाजूलाच काहीतरी काम करीत होते. मातीच्या ढिगाऱ्यात पाणी कालवणाऱ्या आईला तरण्या नामदेवाने हाक मारली. नामदेवाच्या आईनं हाक ऐकल्यासरशी चमकून बघितलं आणि एका क्षणात खूण पटावी तसा तिनं नामदेवाला ओळखला. हातातलं गाडगं जमिनीवर कोसळलं आणि ती धावत जाऊन नामदेवाला बिलगीत हमसाहमशी रडू लागली. विठू धावत आला आणि नामदेवाला कवेत घेऊन त्याला जणू लहान मुलासारखा कुरवाळू लागला. तिघांच्याही स्फुंदून रडण्याच्या गलका झाला तसे वाकळ पांघरून खोकत असणाऱ्या  बळवंताचे अंधुक डोळे चमकले. कान तीक्ष्ण करून आणि डोळे मोठे करून त्यानं समोर पाहिलं तसा नामदेव झेपावला आणि 'आबा...आबा' म्हणत त्याने बळवंताच्या म्हाताऱ्या शरीराला कवटाळून घेतलं. स्पर्शातून आलेली उब म्हाताऱ्या बळवंताला जाणवली. सतरा वर्षाआधीची स्पंदनं जणू पुनरिज्जीवीत झाली आणि 'नामदेव...नामदेव....कुठं होतास रे तू?' म्हणत बळवंता जणू लहान मुलासारखा स्फुंदून स्फुंदून रडू लागला. नामदेव म्हाताऱ्या बळवंताच्या डोक्यावरून हात फिरवीत जणू सतरा वर्षे माघारी जाऊन परत पाच वर्षाचा झाला. गावात बातमी पसरली आणि 'नामदेव परत आला....नामदेव परत आला' म्हणून हलकल्लोळ माजला. रडून पडून झाल्यावर आणि भावनांचे आवेग ओसरल्यावर मग नामदेवानं विस्फारल्या डोळ्यांनी जमलेल्या सर्वाना सगळी हकीकत सांगितली. जत्रेत आईचा पदर धरून उभा असताना कुण्या साधूनं त्याला पेपरमिटची गोळी देतो म्हणून आडोशाला नेलं आणि मग आणखी पुढे जत्रेबाहेर घेऊन गेला. तिथे आणखी चार पाच साधूसारख्या लोकांचा तांडा होता. त्यात आणखी दोन तीन लहान पोरं होती. मग तिथून ते मजल दरमजल करीत कुण्या कुण्या गावाला भटकत राहिले. लहानग्या नामदेवाने आधी त्रागा केला, रडला, भेकला. पण त्याचं कोण ऐकणार ? आधी साधू त्याला घेऊन भीक मागायचे. मग त्याला स्वतःला भीक मागायला शिकवलं. आधी चिडून, ओरडून, संतापून झाल्यावर हळूहळू लहान नामदेवाने हे जीवन स्वीकारलं. तसंही त्याला स्वतःच्या गावाचं नाव, आईबापच नाव काही काही माहिती नव्हतं. विचारणार कुणाला आणि सांगणार काय ? पण त्याच्या लहानपणाच्या पाच वर्षापर्यंतच्या काही स्मृती कायम राहिल्या. घर, बाहेरचं कुंभारकीचं काम, जत्रा अशा काही अंधुक आठवणी तेव्हढ्या तगून राहिल्या. आई बाप, म्हातारे आजा-आजी त्याला आठवायचे. डोळे भरून यायचे. इकडे तिकडे तो प्रयत्न करून पाहायचा. पण भल्यामोठ्या चक्रव्यूहात एखादा लहान पोरगा अडकावा आणि त्याला काही केल्या बाहेरचा रस्ता सापडू नये असं त्याचं झालं. सात आठ वर्षे अशी गेल्यावर त्यानं संधी साधून त्या तांड्यातून पळ काढला आणि मग विनातिकीट प्रवास करीत करीत कुठेतरी पोचला. तिथे हॉटेलमध्ये कामं, दुकानात कामं करीत जगत राहिला. पण आता तो लोकांना विचारपूस करायला लागला. नदीकाठचं घर, कुंभाराचं काम, घरचे आई-बाप, आजा- आजी आणि गावाजवळची जत्रा एवढ्या ऐवजाच्या भरवशावर आपलं हरवलेलं जग धुंडाळीत राहिला. त्याचं नशीब चांगलं की साधूंचा तांडा फार दूरच्या मुलखात न गेल्याने नामदेव कुण्या परक्या प्रदेशात नव्हता. असंच विचारत विचारत असता एकदा त्याला कुणीतरी सांगितलं की अमक्या अमक्या गावात एका कुंभाराचं पोर बऱ्याच वर्षांपूर्वी जत्रेत हरवलं होता. मग तो माग काढीत आला आणि असा अचानक तब्बल सतरा वर्षानंतर नामदेव घरच्यांना गवसला. नामदेवाची कहाणी ऐकून सगळ्यांचे डोळे पाणावले. त्या सतरा वर्षात बिचाऱ्यानं काय काय भोगलं हे ऐकून विठू, त्याची बायको तर तळमळलेच पण म्हातारा बळवंता थरथरून गेला. तरण्या नामदेवाला घट्ट धरून बसला. पण आता त्याच्या डोळ्यात अश्रू असले तरी आनंदाचे होते. चेहऱ्यावर इतक्या प्रदीर्घ वर्षानंतर थोडा तजेला आला. मग म्हाताऱ्याने घरची हकीकत सांगितली. आजी कशी त्याचं नाव घेत घेत गेली. त्याला कसा विश्वास होता की मरण्याआधी नामदेवाशी त्याची भेट होईल म्हणून आणि आता कसा तो सुखाने मारायला तयार आहे असं खूप काहीतरी म्हातारा बळवंता सांगत राहिला. जणू सतरा वर्षांआधी हरवलेलं हसू झोपडीत परत आलं. काही दिवसांचा सोबती असलेला बळवंता आता थोडासा सुधारल्यासारखा दिसू लागला. नामदेवाची पण दिनचर्या कायम झाली. गावात तो फारसा जात नसे. पाचच वर्षाचा असताना हरवल्याने त्याचे काही मित्र वगैरे नव्हते गावात. तसाही आता त्याला म्हातारा बळवंता आपल्या नजरेसमोरून हलूच देत नसे. थोडा जरी इकडे तिकडे गेला तरी 'कुठाय नामदेव....कुठाय नामदेव' म्हणून लगेच कावराबावरा होऊन भुणभुण करायचा. आणि नामदेवही बराच वेळ झोपडीतच बसून राहायचा. म्हाताऱ्या आजाची सेवा करायचा. त्याला चमच्याने खाऊ घालायचा. बशीने चहा पाजायचा. ओल्या कपड्याने त्याचं अंग पुसून द्यायचा. जणू बळवंता लहानगा नामदेव झाला आणि लहानपणी त्याने जे जे नामदेवाचं केलं ते नातू आता त्याच्यासाठी करू लागला ! आजा-नातूचं हे प्रेम पाहून विठू आणि त्याच्या बायकोचे डोळे भरून यायचे आणि आकाशाकडे मान वर करून अन हात जोडून ते देवाचे मनोमन आभार मानायचे. म्हाताऱ्या बापाला शेवटी मरता मरता का होईना पण देवाने नातू भेटवून दिला याचं त्यांना अतीव समाधान वाटायचं. 
      पण नामदेव आल्याने थोडी तब्येत सुधारली तरी बळवंता शेवटी म्हातारा झाला होता. त्याचा दमा वाढला होता आणि त्याचे दिवस शेवटास आले होते. काही दिवसात तो हे जग सोडणार हे उघड होतं. मृत्यची चाहूल लागली तसा बळवंता नामदेवाला जवळ घेऊन बसला. विठू आणि त्याची बायको जवळ बसले. नामदेवाचा हात हाती घेऊन बळवंता समाधानाने बोलला, 'नामदेवा...आता मी सुखानं जातो. आता मला कायबी दुख नायी. चिंता नायी. म्या मागितलं ते भंगवंतानं ऐकलं. तुजी भेट घालून देली. मी हासत हासत जाईन आता. फक्त एकच कर. मी मेल्यावर माज्या चीतेस्नी विठूसोबत तूबी आग दे ! माजा आत्मा सुखात राहीन !'. विठूसोबत भरल्या डोळ्यांनी नामदेवाने मान डोलावली आणि नामदेवाकडे समाधानाने पाहत पाहत बळवंताने त्याचा हात हाती घेऊन जीव सोडला. विठूच्या बायकोने डोळ्याला पदर लावला. विठू बापाला बिलगून रडू लागला. नामदेव मूक आक्रन्दन करीत राहिला. ज्या नातवासाठी तो म्हातारा जीव सतरा वर्षे तडफड करीत राहिला त्याला सोडून तो आता उडून निघून गेला होता. खेड्यातले लोक जमा झाले. क्रियाकर्म झाली. सगळी निरवानिरव झाली. दोन दिवस निघून गेले. आणि मग एके दिवशी सकाळी आपली बॅग भरून नामदेव तयार झाला आणि विठू अन त्याच्या बायकोजवळ येऊन म्हणाला,
'बरं.... निघतो मी आता !' 
विठूनं नामदेवाचे हात हाती घेतले. त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. थरथरत्या ओठानी आणि रडवेल्या स्वरांनी तो नामदेवाला म्हणाला,
'आयुष्यभराचे उपकार झालेत दादा. कशे फेडू तुमचे हे पांग ?'
विठूच्या खांद्यावर हात थोपटत नामदेव म्हणाला,
'कसले पांग दादा? तुमचा नामदेव सापडणं तर शक्य नाही पण या म्हाताऱ्या जीवाला समाधान लाभलं, सुखाने समाधानाने गेला. जीव टांगून राहिला नाही. अजून काय पाहिजे ?' 
डोळ्यात पाणी आणून विठू आन त्याची बायको नामदेवाला बोलले,
'आमी गरीब मानसं. तुमास्नी द्यायला पैका पन नायी आमच्याकडं. कदीबी कायबी काम आसल तर सांगा. धावत येऊ तुमच्यासाठी'
'पैका कशापायी विठूमाऊ ? तुमच्या घरी महिना दोन महिने राहिलो. तुमची भाकरी खाल्ली. म्हाताऱ्या आजाची माया मिळाली. पैक्याने विकत घेत येईल काय हे ?'. नामदेव बोलला. 
गहिवरल्या स्वराने विठूननं नामदेवाला विचारलं,
'आता कुठं जानार ?' 
' तुमची कहाणी कळल्यावर जसा तुमच्याकडे आलो तसंच पुढच्या तालुक्यात एक खेडं आहे तिथं जाणार. तिथेसुद्धा असंच घर आहे एक. आईबापाशी भांडण करून पोरगा लहानपणी पळून गेला तो आलाच नाही. आई आठवण काढत काढत शेवटाला लागली आहे. तिथं जातो. पोराच्या बापाला गावाबाहेर भेटतो. सगळी माहिती, घटना, मित्र, नातेवाईक, जुन्या आठवणी समजून घेतो. त्या म्हातारीचे डोळे समाधानानं मिटेपर्यंत थांबतो तिथं. मग परत पुढच्या गावी. नवं घर. नवी कहाणी. मुसाफिर माणूस आहे मी विठूमाऊ. फिरत राहणार असा !!' 
'पन एव्हढे उपकार....का करता सगळ्यांवर तुमी? ' विठूनं भरल्या डोळ्यांनी विचारलं.
'आहे अशीच एक कहाणी....सांगेन कधीतरी परत भेट झाली तर !' तो मुसाफिर हसून बोलला. 
विठूनं अन त्याच्या बायकोनं उपकृत होऊन हात जोडले आणि मग दुःखाच्या वाळवंटात आनंदाची फुलबाग फुलविणारा तो मुसाफिर हळूहळू सूर्यास्ताच्या दिशेने चालत चालत पार वेशीबाहेर दिसेनासा झाला. नव्या नावानिशी...नव्या कहाणीसाठी !!   

- हेमंत कोठीकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...