निनादच लग्न ठरलं होत. साखरपुडा झाला आणि सगळ्यांच्या शुभेच्छांचा आणि चेष्टा मस्करीचा वर्षाव सुरु झाला. घरामध्ये लग्नाची तयारी सुरु होती. असाच लग्नाच्या एका खरेदीनंतर तो आणि त्याचे आई बाबा निवांत बसले होते. आई तीन केलेली खरेदी दाखवत होती आणि दोघे नुसते ‘हो हो छान आहे’.अस म्हणत होते. बोलता बोलता आई म्हणाली
“अरे जरा श्वेता ला विचार तिला कोणता रंग आवडतो ते. परत उगाच नाराज नको व्हायला.अस पण आजकालच्या मुलींच्या आवडीनिवडी वेगळ्याच असतात.” आता बाबा निनाद कडे बघून हसले.
“आता तुझा ढोल होणार निनाद. तयार हो.”
“काय हो बाबा. काहीही.” अस म्हणून तो उठून त्याच्या खोलीत फोन charging ला लावायला गेला. बाबांचं बोलण आठवून त्याला हसू आल. ‘लग्न झाल्यावर आई आणि बायकोच पटल तर ठीक नाहीतर खरच आपला ढोल वाजतो रे बाबा’ अस एक मित्रान सांगितलेलं त्याला आठवत होत. आपल्याबाबतीत अस काही होणार नाही. आपली आई खूप प्रेमळ आहे. आणि श्वेता पण चांगली आहे, हसमुख आहे. त्यामुळे दोघींचं छान पटेल. शिवाय आई नेच तर पसंत केलय श्वेताला आपल्यासाठी. त्यामुळे असल काही आपल्या घरात होणार नाही. पण झाल तर? या विचाराने तो थोडा अस्वस्थ झाला. त्यासाठी आधी काय कराव लागेल ? याचा तो विचार करू लागला. त्याला काहीतरी सुचल आणि जे सुचल ते त्याने लगेच अमलात आणायचं ठरवलं आणि फोन उचलला. चार वाजता श्वेता निनादने सांगितलेल्या restaurant मध्ये पोचली. reception वर नाव सांगितल्यावर वेटरने तिला तिच्या टेबल जवळ नेले. ती तिथे पोचताच थोडा आश्चर्यचा धक्का बसला. तिच्या भावी नव-याऐवजी, भावी सासूबाई तिथे आधी येवून बसल्या होत्या. थोडी निराश झाली पण सासुबाईंकडे बघुन् मस्त हसली. त्यादेखील थोड्या आश्चर्याने तिच्याकडे बघत होत्या. त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसली .
“अग निनाद कुठेय ?”
श्वेता म्हणाली “ काहीच कल्पना नाही. मला त्याने आज सकाळी फोन करून इथे बोलावलं.”
“हो न. मला पण म्हणाला, तू घरून निघ. मी पोह्तोच तिथे. फोन केला आत्ता तर म्हणाला, बस मी आलोच.” सासूबाई म्हणल्य.
”काय चालत न या मुलाच्या डोक्यात ?काही कळत नाही”.यावर दोघीही हसल्या. तेव्हढ्यात वेटर एका trey मध्ये काहीतरी घेवून आला. मला काही नको,अस श्वेता म्हणणार तेवढ्यात वेटरने त्यांच्या टेबल वर दोन लिफाफे ठेवले. त्याच्यावर दोघींची नाव होती. हे काय आता ? अस म्हणत दोघींनी ते उचलले आणि फोडले . आतमध्ये एक पत्र होत निनादच्य हस्ताक्षरातल. दोघींनी जरास हसत ते वाचायला सुरुवात केली. पत्र वाचून झाल. दोघी सासू सुना थोड्या विचारात पडल्या. मग एकमेकींकडे पाहून अगदी मनापासून हसल्या.
“काय म्हणाव या मुलाला? पण पटतंय खर त्याच. त्याच ऐकावं म्हणतेय. तुला काय वाटतय ?”.
” मला पण असाच वाटतय आई . पण मला न खूप उत्सुकता आहे की तुमच्या पत्रात काय आहे?” श्वेता थोडी लाजत म्हणाली. “अग मला पण .. आधी मी माझ पत्र वाचते आणि मग तू तुझ वाच. ठीक आहे ?” सासूबाईनी विचारलं. श्वेताने नुसतीच समंती दर्शक मान हलवली.
प्रिय आईस ,
खूप वर्ष झाली तुला अस पत्र लिहून. पण मनातल सांगण्यासाठी पत्रासारख दुसर साधन नाही अस तू नेहमी म्हणतेस, तेव्हा म्हटलं तुला पत्रच लिहावं.मला नोकरी लागल्यापासून तूझी वधूसंशोधनासाठी गडबड सुरु झाली. श्वेताला बघुन आल्यवर तू म्हणालीस मला मुलगी पसंत आहे आणि माझ्यासाठी तेव्हाच मी श्वेताला होकार दिला होता. कारण तुझ्या पसंतीवर पूर्ण विश्वास आहे माझा. लग्नाची तयारी सुरु झाल्यापासून तू बरीच व्यस्त दिसतेस मोकळेपणाने बोलायला वेळच मिळत नाही म्हणूनच हे सविस्तर पत्र लिहितोय तुझ्यासाठी. जेव्हा मुलगी तिच्या आईवडीलाना सोडून सासरी येते तेव्हा तिची आई खूप रडते, आपल्या जीवाचा तुकडा एका अनोळखी ठिकाणी कायम जाणार म्हणून. मला वाटत, मुलाच्या आईला पण काहीस वाईट वाटत असणार. इतके दिवस आई -आई करणारा मुलगा आपल्याला विचारेल की नाही याचा विचार करून. पण माझ्या बाबतीत अगदी निश्चिंत रहा. मी आजही तुझा मुलगा आहे आणि शेवटपर्यंत तुझा मुलगाच राहीन. फक्त आता त्याच्यावर आणखी एका व्यक्तीला खुश ठेवण्याची जबाबदारी येईल इतकेच. श्वेताच्या घरात येण्यामुळे थोड्या गोष्टी बदलतील एवढच. तेव्हा एखादे वेळेस जर मी तुझ्या कोणत्या गोष्ट्साठी आत्ता वेळ नाही अस म्हणालो तर राग मानू नकोस. जस तुमची काळजी घेण माझ कर्तव्य आहे तसाच श्वेताच्या आईवडिलांचा पण आदर कारण माझ कर्तव्य आहे ही गोष्ट तू मान्य करशीलच याची खात्री आहे मला. तसा तुझा स्वभाव माहित आहे मला, अगदीच आल्याआल्या तू श्वेताला सगळ्या जबाबदा-या देवून मोकळी होणार नाहीस आणि सुरुवातीला तिला सगळ जमणारही नाही. हळूहळू या घरात रुळत, घराला समजून घेत जमेल तिला.श्वेता आणि मी दोघेही सुरुवात करणार तेव्हा आमच्या दोघांकडून काही चुका होणार. तशी ती हुशार आहे लवकर adopt करेलही पण नाहीच जमल तिला तर तू समजून घेशील याची खात्री आहे मला..पण तुझी मदतही लागेल, तशी तिने मदत मागितली तर मला काम सांगतेय असा राग मानु नकोस. तिच्या पद्धतीने ती काम करेल. तिच्या आवडीची भाजी करेल, तिच्या आवडीचे पडदे लावेल तेव्हा ,आता माझी आवड जुनी झाली किंवा मला काही किंमत राहिली नाही अस मानून नाराज होऊ नकोस. हे घर तिचही असेल,तिलाही थोड आपलेपणाची भावना जाणवण्यासाठी ते गरजेचे आहे. श्वेता आणि मी आम्ही दोघेही स्वत:चे निर्णय घेवू अर्थात घरातल्या मोठ्यांशी बोलूनच.आपण सगळे मिळून मस्त फिरायला जावू, एकमेकांबरोबर वेळ घालवू पण कधी कधी मी आणि श्वेता दोघेच फिरायला गेलो तर मी तुम्हा दोघांना विसरलो अस समजू नका. श्वेताच्या प्रत्येक गोष्टीच कौतुक कर अस म्हणणार नाही पण तिच्या चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन देशील तर ती तुला डोईजड ही होणार नाही आणि तुझ्यावर नाराजही राहणार नाही उलट तुम्हा दोघींचं नात अधिक घट्ट होईल. आई तशी तू खूप प्रेमळ आहेस. तू खूप प्रेम करतेस माझ्यावर, तसच तिच्यावर कर अस नाही म्हणणार मी,पण आई वडिलांना सोडून आलेल्या या नवीन मुलीला परक वाटणार नाही याची काळजी देखील घ्यावी लागेल आपल्याला. चुकलच काही तीच, तर शांतपणे तिच्याशी बोलून तिला सांग., नाहीच जमल तुला तरच मला सांग आणि हो तू मला स्वयंपाक घरात लुडबुड करू दिली नाहीस, पण मी स्वयंपाक शिकून घ्यावा म्हणतोय. तुम्ही तुम्हा दोघींना तेवढाच बदल. आणखी काय सांगू तुला. तू तशी खूप समजूतदार आहेस. नाती निभावण तुला खूप छान जमत. शेवटी तुला परत सांगेन मी तुझ्यासाठी तुझा लाडका मुलगा होतो आणि राहीन.
तुझाच लाडोबा निनाद .
श्वेता खूपच शांतपणे सगळ ऐकत होती. एवढा समजूतदार नवरा मिळाला म्हणून स्वतःच्या भाग्याचा हेवा वाटला तिला.. “अग तुझ पत्र वाचतेस न” या सासूबाई च्या आवाजाने ती भानावर आली. “हो वाचते” अस म्हणून तिने सुरुवात केली.
प्रिय श्वेता
आता एकमेकांबरोबर आयुष्य घालवायच म्हणजे मनातल्या गोष्टी मोकळेपणाने सांगाव्यात अस वाटत मला. माझ्या दृष्टीने लग्न म्हणजे दोन मनांच मिलन तर आहेच पण दोन घरामधल्या संस्कारच देखील. म्हणूनच माझ्या मनातल्या काही गोष्टी share करतो ज्या आपल्याला उपयोगी पडतील.
लग्न करून या तुझ्या नवीन घरात येताना तुला nervous वाटतंय, हे माहित आहे मला, पण घाबरू नकोस. मी आहे तुझ्यासाठी. आपण दोघे मिळून आपल सहजीवन आनंदी करू. एक गोष्ट सांगू जितकी तू बावरली आहेस, तितकच टेन्शन आईलाही आहे. जस तुझ्या आईला तू सोडून जाणार याच तुला दु:ख आहे ,तस आईला देखील आपला मुलगा थोडासा दुरावणार याची धास्ती आहे. आजपर्यंत तीच जग माझ्याभोवती होत. त्यामुळे कधी कधी मी तिला थोडा वेळ दिला तर समजून घे. Infarct मी तर म्हणतो की आपण दोघे मिळून एकमेकांच्या आई वडिलांना वेळ देवू समजून घेण्यासाठी..तुला सगळ्याच घरच्या जबाबद-या जमतील अस नाही, आपण दोघेही मिळून त्या हळूहळू उचलू. (अगदी स्वयंपाक घरातदेखील तुझी मदत करण्याचा माझा प्रयत्न राहील).पण आई बाबांना विश्रांती आणि मोकळा वेळ देण पण गरजेच आहे हे लक्षात ठेवूया. अगदीच मदत लागली तर त्यांना न लाजता सांगुयात..या वयात शरीर आणि मन दोन्ही थोडे कमकुवत होतात. तेव्हा आईच काही चुकल किंवा तुला नाही आवडल तर शांतपणे सांग. धारदार शब्द मनावर न दिसणारे पण कायम राहणारे आघात करतात कधी कधी. अगदीच बोलायचं काय हे सुचाल नाही तर मला सांग,मी समजावून सांगेन तिला. या घरासाठी तिने बरीच मेहनत घेतलीय आणि त्याबदल्यात कधीही कोणतीच अपेक्षा नाही ठेवली पण आपण अधूनमधून तिला कौतुकाचे धन्यवादाचे काही क्षण देवूयात. इथली प्रत्येक गोष्ट मनापासून सजवलीय. आता हे घर तुझपण होईल, तेव्हा तुलाही तुझ्या आवडीनिवडी प्रमाणे ते सजवाव वाटेल ते तू करच आपलेपणाने ,पण आईला विश्वासात घेवून. अगदी तुझ्या आईसारख नको वागवूस तिला एकवेळ, पण घरातली अनुभवाने मोठी व्यक्ती म्हणून तीच ऐकून घे कधीतरी. थोड त्या दोघांच, थोड आपल ऐकू बोलूयात, एकमेकांबरोबर सुसंवाद ठेवूयात आणि एकमेकांबरोबर आनंदाने राहुयात. आणखी काय सांगू तुला. जेवढ तुझ्या बद्दल माहित झालाय आत्तापर्यंत त्यावरून मला खात्री आहे तू या पत्र मागच्या भावना समजून घेशील.
तुझा सुख दु:ख्खाचा जोडीदार
निनाद
दोघीही एकमेकींकडे बघून अगदी मनापासून हसल्या आणि त्यांना हसताना बघून इतका वेळ त्यांना लांबूनच बघत असलेला निनाद देखील हसला.
एक घर, घरामधली नाती जपण, सांभाळण हे त्या घरातल्या स्त्रियांचंच नाही तर पुरूषांच देखील काम असत. दोघींमधला भांडणाचा विषय होण्यापेक्षा दोघीमधला दुवा बनू शकतात घरातील पुरुष.
आनंदी रहा. निरोगी रहा.
अज्ञात लेखकास सादर समर्पित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा