शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

1680. गुज_मनीचे

      सूर्य मावळतीला आला होता. अंगणातला पिंपळ सळसळत होता. ती सळसळ कानाला जाणवली तसं नानांनी वर पाहिलं. हिरवीकंच  पानं कशी झाडाला लगडून राहिली हॊती. वाऱ्याबरोबर लहरतं हॊती. त्याचं ते प्रसन्न रूपं नानांना शांतवून गेलं. मगापासून येराझारा  घालणारी त्यांची पाऊल न कळतं मंदावली.ते झाडाच्या खोडाशी विसावले. सत्तरी आली,जरी कमावलेलं शरीर  असलं तरी काळाची पाऊलं त्यांना आता जाणवतं हॊती. टक लावून ते त्या मावळणाऱ्या सूर्याकडे पहात होते. दुपारी प्रखर असणारं त्याचं तेज हळूहळू सौम्य होतं चाललं होतं.
क्षितिज पिवळ्या,केशरी रंगांनी झाकळून गेलं होतं.हळूहळू त्याचं ते अस्ताकडे जाणार लोभसवाण रूप नाना टक लावून बघत होते. अस्त सुद्धा इतका देखणा असू शकतो.
आता त्यांची नजर आकाशकडे वळली. पक्षी घरट्याकडे परतू लागले होते.त्यांना त्यांच्या घरट्याची ओढ लागली हॊती.त्यांची ती किलबिल कानाला सुखावतं हॊती. 
हं.. कालाय तस्मै नमः..म्हणतं  त्यांनी मावळत्या सूर्याला हात जोडले.
नानीची आतून येणारी हाक सुद्धा त्यांना ऐकू आली नाही.
शेवटी त्या बाहेर आल्या.
"काय म्हणतेय मी..येताय ना आत आता.?"
नाना भानावर आले.आता सूर्य पूर्ण कलला होता.
येऊन ते अंगणातल्या त्यांच्या लाडक्या आराम खुर्चीवर विसावले.
"काय झालंय आज? सांगा ना."
"काही नाही. काही कसं नाही. मी काय आज ओळखते का तुम्हाला. राजचा फोन आल्यापासून डिस्टर्ब आहात तुम्ही."
"काही नाही म्हणतो ना मी."
"चिडू नका. तुमची दुखरी नस मला माहिती आहे.
एवढं बोलावतोय जाऊन येऊ या ना चार दिवस."
"अजिबात नाही येणार मी. तुला जायचं तर जा तु."
"किती काळजी करताय. आहे ना कर्ता मुलगा हाताशी.
कमवतो आहे चांगला.फेडून टाकेल तो बँकेचं सारं कर्ज."
"नाही, अजिबात पटतं नाही मला ते."
"आपलीचं मुलं आहेतं ना ती. त्यांच्या शिक्षणासाठी तर घेतलं होतं कर्ज आपण."
"आपली मुलं??  एक आहे तो आपल्याचं विश्वात, आणि दुसरा..उनाड संगत लागली म्हणून जरा बोललो काय, घरं सोडून निघून गेला.अशी मुलं असतात का? आणि ती आपली जबाबदारी हॊती. मला ते अजिबात पटतं नाही.
पेन्शन जेमतेम पुरते. कसं फेडणार आपण ते ?कुठून आणणार पैसे? बँकेचा लकादा  लागलाय मागे.बघू, करू काहीतरी."
" राज, काय म्हणाला?"
"बघतो, कसं जमतंय ते. असं म्हणाला. होईल गं. काळजी नकॊ करुस. पाहिलीस का ती चंद्रकोर  कशी 
हळूच डोकवतेय."
नानी पण तिचं ते सौम्य सौन्दर्य बघण्यात रमल्या.
"काय चाललंय राजा, राणीचं?"बापूंनी आत येतं विचारलं.
"इश्श.. हे हो काय भाऊजी. काय करणार. तारे मोजतोय दोघे जण."
"येरे.. किती दिवसांनी आलास."
"हो, लेकीकडे गेलो होतो ना. आजचं आलो. राहवलं नाही.
तडक तुझ्याकडे आलो."
"चालू दया, तुमच्या मित्राच्या गप्पा. मी भाकरी टाकते. जेवूनच जा  आता."
"उगाचचं  त्रास."
"भाऊजी.."
"बरं. नो अपील."
नानी आत गेल्या.
"काय मित्रा.. कसं वाटलं नातवंडात. रमलास ना."
"हो रे, पहिले काही दिवस छान गेले. मग, आपली इथली ब्रम्हचऱ्याची मठीच छान वाटू लागली. लेकं सोडतं नव्हती. पण आलो काही तरी सांगून."
"तुझं कसं  चाललंय.?"
"बरं."
"म्हणजे.."
"काय सांगू, तुला तर सारं माहिती आहे. बॅंक आता लोन क्लिअर करा म्हणून मागे लागली आहे."
"मग.."
"एवढी पुंजी एकदम कुठून उभी करु?"
"अरे, तुला काय कमी आहे?एवढा ऑफिसर मुलगा आहे?"
"तुला म्हणून सांगतो. राजशी बोललो काल. पुसटशी कल्पना दिली. तर त्यानी सुरु केलं. नवीन घरं घेतलंय.
मुलांची शिक्षणं सुरु आहेत. महागाई किती वाढली आहे."
"अरे, पण दोघं नवरा, बायको दणकून कमवत असतील. आता I. T. वाल्याना खुप डिमांड आहे.तु सांग, 
"असं  त्यानं असं सांगितल्यावर काय बोलणार लाचारासारखं मागे लागणं मला जमणार नाही."
"आणि दीप, त्यांच काय? कळलं का कुठे असतो तो आता?"
"नाही, रे. घरं सोडून गेला. नंतर काही पत्ता नाही त्याचा."
"धीर नकॊ सोडूस. बघू काय करता येतं ते."
"चला, जेवायला."
नानीच्या बोलण्याने ते भानावर आले.
"किती चविष्ट जेवण झालंय नानी.तुमच्या हाताला किती चव आहे."
"पोटभर जेवा मग."
 नाना जेवत होते पण त्यांच लक्ष जेवणात नाही हे बापूंनी ओळखलं.
जेवण होताच ते म्हणाले, "नानी, शतपावली करून येतो आम्ही. चल रे नाना."
नाना नं बोलताच निघाले.
त्यांच्या डोक्यात वादळ धूमसतंय हे बापुना नसांगता कळतं होते. लहानपणापासून ओळखत होते ते एकमेकांना.
"नाना, बोल ना काहीतरी, किती मनात धुमसणार  आहेस तु."
"काय बोलू सांग. जेव्हा माणूस परिस्थितीशी लढून थकतो ना, तो परिवाराकडून अपेक्षा करतो, पण जेव्हा तो परिवारकडूनच हरतो तेव्हा त्यानं कुठे जायचं.असं वाटतं मुलं असून काय फायदा. काय फरक पडतो त्यांना.जेवढी आपली गरज, तेवढंच आपलं अस्तित्व आहे. झाडं वठलं तर पक्षी सुद्धा आपलं घरटं बदलतात. आता ह्या वयात कोण नोकरी देणारं.कोण मदत करणार."
"मित्रा.थांब. हारू नकोस. आपले दामले गुरुजी सांगायचे, जेव्हा सगळे रस्ते संपतात तेव्हा नवीन रस्ता उघडतो.देव दुसरा दरवाजा उघडल्याशिवाय पहिला दरवाजा कधीही बंद करत नाही.आठवतंय का. लोकं मदत करतील या भ्रमात राहू नकोस. स्वतःवर विश्वास ठेव.नक्की निघेल काहीतरी मार्ग. झोप आता शांत. उदया बघु."
"नाना.. अरे नाना."
"काय रे.. इतकी गडबड."
"चल जरा माझ्या बरोबर."
बापूंनी नानाला त्याच्या घराच्या मागे असलेल्या गोठ्यात नेलं.गोठा अनेक वर्ष रिकामाच होता. आडगळीच्या  सामानानी भरलेला.
"तुझ्या आबांची एक मोठी लाकडी संदुक हॊती ना इथे ?
कुठे आहे ती.?"
"काय करायचं त्या जुन्या गोष्टीचं."
"शोध बघू आधी तु."
सापडली. थांब, उघडूयात.
ती उघडताच सगळी अवजारे दृष्टीसं पडली.
"कळलं का काही. उमजतंय का नाना.?"
"हो, बापू. पण इतक्या वर्षांनी."
"जमेल सारं. करून तर बघू. धीर सोडू नकोस."
दोघं कामाला लागले. गोठ्याची डागडुजी झाली.
हत्यारांना धार झाली. ओळखीच्या हार्डवेअर मधुन उधारीने सामान आणले. दोघांनीही हुरूपानी काम सुरु केलं.
जमत होतं. नाही असं नाही. पण फिनिशिंग हवं तसं नाही.
काय करावं, ह्या विचारत असतांना नाना म्हणाले..
"अरे, ते gogle ना सगळी माहिती देतं म्हणे.."
"पण ते कोण डाउनलोड करून देणार.."
"थांब.. ऐ मुला."
रस्त्यावरून जाणाऱ्या एका कॉलेजच्या मुलाला थांबून त्यांनी विचारलं, लेका.. थोडी मदत करशील का.
"काय बाबा?"
"अरे, ते gogle का काय आहे, आम्हाला सांगशील का?"
इकडचा तिकडचा अंदाज बघत तो म्हणाला,"गडबड आहे जायची. संध्याकाळी येतो."
जाणाऱ्या त्याच्याकडे दोघं हताश बघत राहिले.
संध्याकाळी तो आला.
दोघांच काम चालूच होतं.
"हे काय करताय बाबा.?"
मग त्यांनी त्यांना त्यांच्या तुटपुंज्या ज्ञानाबद्दल सांगितलं.
नवीन प्रयोग करता येण्याची, असमर्थता  दाखवली.पैशाची चणचण  तर वातावरणात दिसतं हॊती. 
"बाबा. खुप नवीन माहिती तुम्हाला या ऑनलाईन माध्यमातून कळेल.मी करेन मदत."
मग तो रोज जमेल तसं येऊ लागला. नवीन माहिती, नवीन प्रयोग. सुंदर गोष्टी आकाराला येऊ लागल्या.
आटोपशीर, दणकट, जुन्या संस्कृतीशी मेळ घालणार ते फर्निचर  तयार होवू लागलं. आता मार्केटिंग.. त्यानं त्याच्यावरही तोडगा काढला. त्याचे मित्रही कामाला आले.
गोठ्याचं रूपांतर आता पारंपरिक अश्या आउटलेट मधे झालं. मुळातच तो जुना वाडा.. तिथलं प्रशस्त अंगण.
"बाबा.. अजून सुचवू एक?"
"बोल लेकरा.."
"बघा हं तुम्हाला पटलं तर.. तुमचं हे प्रशस्त अंगण आहे.
आपण इथे food जॉईंट उभारू. लोकं इथं खायला थांबतील. आणि आपलं फर्निचर ही बघतील.चालेल का..?"
"अरे पण ते करणार कोण, बघणार कोण.?"
"मी आहे ना.."मागून आवाज आला.
"नानी तु.."
"मग तुम्ही एवढं करताय, मग मी करू शकत नाही का.
घेते बायका हाताशी."
"लेकरा, पण तुझा हेतू काय..स्पष्टचं सांग."
"बाबा.. काय सांगू.माझंही असंच हसतखेळतं घरं होतं.
एक बहीण आणि मी. तिच्या सासरच्या हव्यासापोटी बाबाला सारं विकावं लागलं. बहिणींनी कंटाळून जीव दिला. धक्क्यानी आई, बाप गेले.नोकरी करून मी शिकतो आहे.तुमच्याकडे  बघितलं.आई, बाबा आठवले.माझा दुसरा कुठला हेतू नाही."
"अरेरे.. करू बरं आपण.लेकरा दूध पोळलं तर ताक सुद्धा जपून प्यावं लागतं रे."
सगळे कामाला लागले. रात्री उशिरा पर्यंत मुलं मदत करायची.हळूहळू माहिती पसरू लागली.
उत्तम दर्जाच्या आणि चविष्ट खाण्यामुळे पंचक्रोशीत रुचकर  हॉटेल हे सगळ्यांना माहिती झालं.
सहज फर्निचरच्या विभागात फिरतांना लोकांची खरेदी होऊ लागली. नवीन ऑर्डर मिळू लागल्या. नाना, नानी, बापू यांना वेळ पुरेना.
नानांनी बँकेचं राहिलेलं लोन सगळं फेडलं.
आता बॅंकच नवीन लोन घ्या म्हणून मागे लागली.
"अरे लेकरा.. एवढी मदत केलीस. काय देऊ तुला.?"
"बाबा, माझे आई, वडील आज ताठ मानेने उभे आहेत हेच माझ्यासाठी खुप आहे. मला काही नकॊ."
"बापू.."
"बसं काय दोस्ता, हेच ओळखलंस का मला.
आता हातातला  हात सोडू नकोस मात्र."
दोघंही गहिवरून गेले.
एक दिवस राज आला.
हे सगळं बघुन चकित झाला 
"बाबा, हे सगळं. हं.. हे सारं करायला कुणी सांगितलं होतं तुम्हाला. आम्ही होतो ना.."
"आता बोलतोय हे सारं. तुमच्या शिक्षणासाठी कर्ज घेतलं.
तु हात झटकून टाकले. दीप,तुझा भाऊ, शिक्षणात रस नाही, वाईट संगतीला  लागला त्याला बोललो तर घरं सोडून गेला. मुलं असून निपुत्रीकच आम्ही. असो, अंगात धमक असेल तर सारे होते. "
"चला, माझ्या बरोबर."
"आता, हा सगळा व्याप सोडून."
"कोण बघणार तुमच्याकडे नंतर?"
"त्याची काळजी तुला नकॊ."
"मग तो उपटसुम्भ.."
"म्हणजे हे ही तुझ्या कानावर आलं वाटतं."
"तुम्हाला फसवतोय तो. लाटतो आहे सर्व."
"तुम्ही जन्म दिलेली मुलं.तुम्ही काय केलंत रे. ह्या वयात मुला, नातवंडात  सुखात राहायचं सोडून आम्ही हे करतोय.
दुःख नाही त्यांच. जगरहाटी आहे ती. आई, बाप नसल्यच दुःख त्यालाच कळत ज्याला ते नाहीत. ही आमची स्वाकष्टर्जित मिळकत आहे. तु यात न पडलेला बरा."
राज न बोलताच तिथून निघून गेला.
"बाबा, का नाराज केलंत दादांना. ते बरोबर बोलत होते.
माझा काय संबंध?"
"हे बघ. तो माझा प्रश्न आहे कीनी. आपण असं करूयात.
तु इथं मॅनेजर म्हणून रहा. तुला ठराविक पगार देऊ. म्हणजे तुला ही ओझं नकॊ. आणि जवळच छोटंसं टेकनिकल स्कूल चालु  करू. शिकवू आम्ही जमेल तसं.
वृद्ध झालं म्हणून कुणी मोडीत निघू नये. आणि कुठल्याही वयात जरी शिकलं तरी कुठलीही कला कधी वाया जात नाही. हे तु आमच्याकडे बघुन शिकला असशील.
आणि, खरं सांगू, सगळं जग काही वाईट नाही.
आपला दृष्टिकोन सगळं ठरवतो. आपणच ठरवायचं की रडखडत  जगायचं की टवटवीत वार्धक्यात!
काय बापू..?"
म्हणतं नानांनी गल्ल्यावर पाहिलं.
टोपपदऱी साडीतली गल्ल्यावरची नानीची  प्रसन्न मुद्रा त्यांना बरंच सांगून गेली. स्वाभिमान न सोडता 
कष्टानी साधलेलं ते तपोधन  त्यांना समृद्ध करून गेलं.

©® मृणाल शामराज.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...