आजी तिचं आयुष्य तिनं केलेल्या आयुष्याच्या नियमाप्रमाणे जगली. सत्तरीत फुलांचे हार करून देवाला घालताना ती सुईत दोरा कसा ओवू शकायची हे तिचं तिलाच माहित! पोथी वाचताना डोळ्यातून आसवं का गाळायची हे पण तिचं तिलाच माहित. कामाच्या सरूबाईचा काळा निळा झालेला दंड बघून "सरू, सोड त्याला आता” म्हणून कडाकडा बोलताना ती रागवायची का हळवी व्हायची हे पण तिचं तिलाच माहित !
काही का असेना. तिच्यातील सच्चेपणा मात्र प्रत्येकाला जाणवत असे. स्वत:ला जे पटतं तेच करण्याची तिची जी धडपड चाले ती बघून घर दार थक्क होत असे. वयाला तिनं कधीच प्राधान्य दिलं नाही. जोवर हात पाय चालत आहेत तोवर आपण कुठलीही गोष्ट करू शकतो हा गाढा विश्वास तिच्याजवळ होता. वर्तमानपत्रात "तुमची आजी" सदर लिहणे काय, पंचाहत्तर वर्षाला स्पॅनिश भाषा शिकणं काय किंवा कराटेचा क्लास लावणं काय.. सारं तिला शोभून दिसायचं.
तिनं स्वत:च्या मृत्युपत्रात लिहून ठेवलं होतं की कुठल्याही परीस्थितीत मला हॅास्पिटलमध्ये नळ्या जोडलेल्या अवस्थेत ठेवू नका. काय वाट्टेल ते झालं तरी. मी माझं आयुष्य माझ्या पध्दतीने जगले आहे आणि माझा मृत्युपण मला हवा तसाच यावा अशी माझी इच्छा आहे! नैसर्गिक पणे येणारा मृत्यु शरीर सुध्दा फार त्रास न होता स्वीकारतं अशी तिची खात्री होती.
आता आजी ऐशीला टेकली होती. पण मनाने वाकली नव्हती. हल्ली शरीर मात्र तिच्या दुर्दम्य इच्छा शक्तीला दाद देत नव्हतं.
एक दिवस सकाळी रोजनिशी लिहित बसलेली असताना ती अचानक जमिनीवर कोसळली…त्या आवाजाने मुलगा व सून धावत आले! त्यांनी क्षणभर विचार केला व तिला ॲंब्युलन्स बोलवून जवळच्या हॅास्पिटलला नेले.
डॉक्टरांनी त्वरीत उपचार करून अर्धांगापासून होणारे नुकसान थांबवण्याचा प्रयत्न केला तरी शरीराची उजवी बाजू पहिल्यासारखी होऊ शकली नाही.. जीव मात्र वाचला होता.
आजी शुद्धीवर आली व स्वत:ला नळ्या जोडलेल्या स्थितीत हॉस्पिटल मधल्या ICU मधे बघताच तिला हे स्वप्न असावं असं वाटलं. तिने स्वत:ला एक चिमटा काढला..आणि हे स्वप्न नसून सत्य आहे याची तिला जाणीव झाली.
ती भडकली...
मुलगा येताच त्याला म्हणाली, “माझी काय इच्छा होती तुला माहित होतं.. पक्कं माहित होतं. माझ्या व ईश्वराच्या भेटीच्या आड येण्याचा अधिकार तुला कोणी दिला?”
“अग आई, तू कशामुळे पडलीस हे तरी बघायला नको का? बघ उजवा हात नीट चालत नाही या व्यतिरिक्त तू ठणठणीत आहेस.” मुलगा काकुळतीला येऊन बोलत होता. “आई, तुला वैद्यकिय उपचार दिले नसते तर तू कदाचित पूर्ण लुळी पांगळी झाली असतीस. त्याचा तुला किती त्रास झाला असता सांग बरं!” मुलगा समजूत काढत होता.
आजी काही बोलली नाही. ती घरी आली पण घरी आलेली व्यक्ती आजीपेक्षा कुणी वेगळीच होती. रोजनिशी लिहिण्यासाठी हात वळत नव्हता.. प्रसादाचा शिरा अन् खमंग परतलेल्या बेसनाचे लाडू शेजारी पाजारी पाठवता येत नव्हते.. सुईत दोरा ओवता येत नव्हता आणि पोथी वाचण्याआधीच आसवं गळत होती..तिच्यातलं चैतन्य हरपू लागलं होतं.. ती शुन्यात बघत अंथरुणात पडून रहात होती..
एक दिवस अशीच नैराश्यात पडून असताना तिनं खिडकीतून बाहेर बघितलं.. तीन पायावर चालणारा कुत्रा बघून तिला कौतुक वाटलं...फारसं उडता न येणारा एक पक्षी बागेत थोडं थोडं उडून चारा गोळा करत होता..नातवानं त्याच्या फोनवर हात नसलेला माणूस पायाने लिहताना दाखवला…
स्वत:चं दु:ख कुरवाळत बसणाऱ्या मनाचा तिला राग आला. आपण कोणी न्यारे नाही! झाडाची फांदी तुटते, पक्षी उडू शकत नाही, कुत्र्याचा पाय तुटतो पण म्हणून ते काही निराश होऊन पडून रहात नाहीत. याच निसर्गाचा आपण एक भाग आहोत. शरीर नाशवंत आहेच! पण मी म्हणजे माझं शरीर नाही!
ती उठली व पूर्वीसारखी तयार झाली.. सुनेनं आश्चर्याने तिच्याकडे बघितलं..
तिनं रोजनिशीची वही घेतली..डाव्या हातानं रोजनिशी लिहायचा प्रयत्न चालू केला. वेडीवाकडी लहान मुलासारखी लिहिलेली अक्षरे बघून मनापासून हसली..तिनं ठरवलं की डाव्या हातानेच इतकं सुंदर लिहायचं की सर्वांनी बघत रहावं. एकदा मनाने घेतलं की शरीर पण साथ देऊ लागतं.. डाव्या हाताने परत एकदा श्रीगणेशा सुरू झाला..जशी अक्षरं सुधारू लागली तशी तिच्या डोळ्यातील चमक वाढू वागली.
तिनं मुलाला जवळ बोलावलं.
“तुझं काही चुकलं नाही रे! माझी आई अशी पडली असती तर मी पण तिला लगेच डॅाक्टर कडेच नेलं असतं..तू नाही आलास माझ्या व ईश्वराच्या मधे..अजून ईश्वराला भेटायची वेळ आलेली नाही. रागाच्या भरात बोलले मी.. माफ कर मला!” मुलाच्या डोळ्यातून येणारं पाणी पुसत ती त्याला म्हणाली, “ज्या वयात उद्याची खात्री नाही त्या वयात सहा महिने मी नैराश्यात वाया घालवले!”
तिनं वर्तमानपत्रात पाठवण्यासाठी लेख लिहायला घेतला..
मृत्युला सामोरं जाताना..
नुकतीच मी वर जाऊन दार ठोठावून आले आहे. परत आले म्हणून चार गोष्टी सांगते..अर्धांगाचे निदान झाले आणि माझे मन भरकटले.
कसं मरण हवं असतं माणसाला? शांत, भीतीरहित, झोपेत, नकळत! डॉक्टर नको, हॉस्पिटल नको, नळ्या जोडलेल्या नकोत, व्हेंटिलेटर नको वगैरे लिहणं सोपं असतं..पण खरी इमर्जन्सी जेव्हा उद्भवते तेव्हा आपण कुठलाच निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नसतो..अशा परिस्थितीत आपला ज्याच्यावर पूर्ण विश्वास आहे अशा व्यक्तीला पुढचे निर्णय घेण्यासाठी नेमा. तुमचं मन वाचणारी अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असावी यासाठी हात पाय धड असताना सतत प्रयत्न करा. मुलगा, सून, नातवंड यांच्याशी अत्यंत विश्वासाचं नात आधीच निर्माण करा.
त्यानंतर मात्र जे घडेल तिच देवाची इच्छा होती हे समजून घ्या..पण इतरांवर व स्वत:वर रागवण्यात वेळ घालवू नका..
शरीर नश्वर आहे. असेना का! शरीराला झाली इजा, मला नाही हे सतत स्वतःला सांगा..तुम्ही म्हणजे तुमचे शरीर नाही. तुम्ही म्हणजे तुमची अर्धांगाने लुळी पडलेली बाजू नाही आणि तुम्ही म्हणजे तुमच्या व्याधी नाहीत हे समजून घ्यायचा प्रयत्न करत रहा.
जे त्याने दिले ते घ्यायचे व त्यातील सौंदर्य शोधायचं ! मला कधी वाटले नव्हते की डाव्या हाताने मी लिहू शकेन.
आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत जगायचं असतं..राग, लोभ, हेवे दावे, मान-अपमान यात वाया घालवायचं नसतं.
काल मी तीन पायावर चालणारा कुत्रा बघितला. तो नाही हो रडत बसत. तो उठून अन्नाच्या शोधात हिंडत होता मग आपण आपल्या शरीराकडे बघून का रडत बसायचे?
आलेला दिवस आनंदात घालवा. सांभाळून रहा.
- तुमची आजी
तिनं पेन बंद केलं व सुनबाईला सांगितलं, “आज मी शिरा करते ग.. नैवेद्याला! जमेल मला डाव्या हाताने करायला!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा