शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

1679. कर्मचारी

     एखाद्या क्षणी हा असा सगळ्यांचा उबग येतो. काही बिघडलेलं असतं म्हणून उबग येतो असं नाही. सगळं व्यवस्थित असतं आणि कुठंतरी काहीतरी, तरीही बिनसलेलं असते. ही शंभर टेबलं, तितक्याच खुर्च्या, ह्या गगनचुंबी फाइल्स, समोरचा हा टाइपरायटर- असंख्य फाइल्सना जन्म देणारा, पलीकडे त्या केबिन्स, बाहेर पट्टेवाले, टाळक्यावर फिरणारे फॅन्स, खणखणणाऱ्या घंटा, फोनच्या घंटा, व्हिजिटर्स, व्यापारी, टेंडर्स, कंत्राटदार.....
काय चाललंय हे सगळं?
कशासाठी?
दिवसाकाठी आपण हे एवढे कागद टाइप करतो.
"बिइंग गिव्हन टु अंडरस्टैंड..."
"युवर लेटर डेटेड..."
"इट कंटिन्यूएशन ऑफ माय प्रिव्हियस..."
"टेंडर्स आर विडंग इन्व्हायटेड."
त्याशिवाय कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट-जो सगळ्या जगाला समजतो पण त्याचा त्याला कळत नाही.
त्यानंतर चार्ज शीट म्हणजे तरी काय? तर मोठ्यात मोठ्या ऑफिसरच्या चुकीपायी लहानातल्या लहान माणसावर फोडलेलं खापर,
खरंच हे सगळं का? काय आहे?
कशासाठी?
ही एवढी माणसं का?
हे एवडं माणसाला छळणारे कागद तरी का? कागदाचा शोध ज्याने कुणी लावला असेल तो स्वतःला फार धन्य समजत असेल. पण जगात कागदासारखी भयानक गोष्ट नसेल. लाखो, करोडो कारकून जन्माला येण्याचं मूळ कारण-कागद.
सगळया जगातले कागद रातोरात नष्ट व्हावेत.
मजा येईल. ह्या ऑफिसात जास्त मोकळी हवा येईल. खिडकीतून जरा आकाश दिसेल.
फायली ठेवायला जागा नाही म्हणून आठांपैकी तीन खिडक्या बंद करून तिथे फायली रचल्या आहेत. गेल्या अकरा वर्षांत त्यातली एकही फाइल उघडण्याची वेळ आली
नाही. तरी त्या जपायच्या आहेत. आकाश नाही दिसलं तर काय बिघडतं? असा
साहेबांचा सवाल,
फार कंटाळलो. कंटाळा ही अजबच चीज आहे. तो एकदा आला की दुसरं काही येत नाही. कोणत्या तरी कवितेत, कुणा तरी कवीने म्हटलं, 'कंटाळ्याच्या दिवशी काय होतं- आधी कंटाळा येतो, मग कंटाळा येतो आणि मग कंटाळा येतो.'
"एक्सक्यूज मी."
मी भानावर आलो. डोळे उघडून पाहिलं. समोर एक अनोळखी गृहस्थ उभा. तोही कुठंतरी कारकुनी करीत असणार हे मी लगेच ओळखलं, कसं कुणास ठाऊक, मी अशी माणसं ओळखू शकतो. माणसाला कागदांचा आणि फायलींचा वास आला की तो कारकून हे समजतं. आणि असा हा कागदाचा वास मला येतोच.
एका दृष्टिक्षेपात मी काय काय टिपलं?
त्याचा काळा रंग, डोळ्यांचा चष्मा, नाकाखालच्या माफक मिशा, पांढरेशुभ्र दात. आणि गालाला पडणाऱ्या खळ्या. इतक्या देखण्या खळया, एका पुरुषाच्या गालाला पडताना मी प्रथमच पाहत होतो.
"मी एफ नॉर्थमधून आलो." (ही वॉज अ क्लार्क)
मी पटकन् त्याला बसण्यासाठी खुर्ची दिली.
"थॅन्क्स!"त्याने हसत आभार मानले.
गालाला खळया पडल्या.
"माझं नाव सातवळेकर,"
-मी माझं नाव सांगितलं.
"माझी तुमच्या डिपार्टमेंटला बदली झाली आहे."
"असं का? कधीपासून?"
"येत्या गुरुवारपासून."
"म्हणजे परवापासूनच की."
"होय. म्हणूनच आज अर्धा दिवस रजा घेऊन आलो. इथं हेडक्लार्क कोण आहेत?"
"आपण जाऊ या त्यांच्याकडे आधी चहा घेऊ या."
"चहा नको."
"का?"
"मी ऑफिसचा चहा घेत नाही."
"मग बाहेरून मागवतो. एखादं ड्रिंक?"
"नको. सवड असेल तर तुम्हीच बाहेर पडा."
"हेडक्लार्कला भेटून घेतो म्हणजे पुन्हा यायला नको मला."
"चालेल."
सातवळेकरला घेऊन मी हेडक्लार्क तांब्याकडे गेलो. आपल्याला बसायला जागा कोणती देणार हे सातवळेकरन विचारून घेतलं. रजेवर गेलेल्या चिपळूणकरांचे टेबल तांब्यांनी दाखवलं. मामुली प्रश्नोत्तरांनंतर आम्ही तांब्यांचा निरोप घेतला.
सातवळेकरला घेऊन मी चिपळूणकरांच्या टेबलापाशी आलो.
सातवळेकरने टेबलाची बारकाईने पाहणी केली. टेबलाला तीन ड्रॉवर्स होते. वरच्या ड्रॉवरमध्ये थोडी स्टेशनरी होती. मधल्या ड्रॉवरला कडी नव्हती आणि वरच्या ड्रॉवरला कुलूप नव्हतं. सर्वात तळातला ड्रॉवर उघडला तर तो रिकामा होता. त्यात फूटपाथवर मिळणाऱ्या दोन रुपये किंमतीच्या प्लॅस्टिकच्या चपला होत्या आणि ड्रॉवरमध्ये चॉकलेटी डाग पडलेले कागदाचे बोळे होते. चिपळूणकर तसा गलिच्छ माणूस. पानतंबाखूचं जबर व्यसन. आठ-आठ पानं आणायचा कागदात बांधून, आणि त्याच्या कागदाचे बोळे तळातल्या ड्रॉवरमध्ये फेकायचा. त्यात त्याचं टेबल नेमकं बंद केलेल्या खिडकीसमोर होतं. त्यामुळे पान थुंकायची वेळ आली की त्याला चालत चालत दुसऱ्या खिडकीपाशी जावं लागायचं,
"ही खिडकी कायम बंद असते का?"
"होय."
"का?"
"फाइल्स आहेत म्हणून."
"ह्या व्यवस्थित लावल्या तर खिडकी उघडता येईल?"
"कोण लावणार?"
सातवळेकर काही बोलला नाही.
हॉटलात चहा घेऊन आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
माणूस ही चीज मुळातच मला फार इंटरेस्टिंग वाटते. फार कुतूहलजनक, फार विविध आणि आदरणीय. त्यात नवा माणूस, नवी ओळख म्हणजे तर पर्वणीच! सातवळेकर चहा घेऊन माझा निरोप आणि 'कंटाळा' घेऊन गेला. त्याचे पांढरेशुभ्र दात आणि खळ्या मागे रेंगाळत राहिल्या.
गुरुवारी मी कामावर आलो तर ऑफिस निराळंच दिसायला लागलं. एकदा विचारांच्या तंद्रीत पाचव्या मजल्याऐवजी मी चौथ्या मजल्यावरच उतरलो होतो. तेव्हा सगळे असंच निराळं, निराळे वाटत राहिलं. म्हणजे निराळं होतंच ते तीच चूक पुन्हा झाली असणार असं वाटून मी जाणार तोच नेहमीचा शिपाई दिसला. त्यावरून आपण मजला चुकलो नाही ह्याची खात्री पटली.
"साहेब, आता झ्याक वाटतं की नाय?"
"निराळं वाटतंय. कशामुळे?"
"नव्या साहेबांनी खिडकी उघडली ही."
एका लहानशा गोष्टीन स्वरूपच पालटलं होतं ऑफिसचं. मी तिथच थबकलो.
सातवळेकरच्या टेबलावर एक प्लॅस्टिकचा आकर्षक टेबलक्लॉथ पसरलेला होता. टेबलाच्या डाव्या कोपऱ्यात एक आकर्षक फ्लॉवरपॉट होता. त्यात प्लॅस्टिकची फुलं ठेवली होती.
कुतूहलाने मी आणखीन निरखून पाहिले. टेबलाच्या ड्रॉवरला नवी कड़ी आणि नवं
कुलूप बसवलेलं. एका कुंकवाच्या टिकलीने बाईचा संपूर्ण चेहरा उजळून निघावा त्याप्रमाणे सातवळेकरच्या त्या टेबलाने ऑफिसचं रूपच पालटलं. उजळून निघालं.
माझं निरीक्षण चालू असतानाच सातवळेकर हात पुसत पुसत आला. कोपरापर्यंत हात आणि संपूर्ण चेहरा तो साबणाने धुऊन आला होता. मला साबणाचा वास जाणवलाच. तोंड धुताना त्याने चष्मा काढला होता. तो त्यामुळे एकदम निराळा वाटला. त्याचे डोळे मला मोठे झाल्यासारखे वाटले.
"गुड मॉर्निंग-"
"मुड मॉर्निंग-"
"किती वाजता आलात?"
"बरोबर दोन तासांपूर्वी."
"तुम्ही जागेचं स्वरूप बदलून टाकलंत."
"मला कोंदट जागा आवडत नाही. खिडकी ही उघडी टाकण्यासाठीच असते. तुम्ही इतके दिवस कसं काय सहन केलंत कोण जाणे!"
"आम्हाला इथं व्हॉइस नाही."
"तो आपण होऊन मिळवायचा असतो."
"कसा?"
"व्हॉइस चढवला की व्हॉइस मिळतो."
मी गप्प बसलो.
तांबे ऑफिसात आले आणि सातवळेकरच्या टेबलापाशी थबकून स्वतःच्या जागेवर गेले. टेबलक्लॉथ आणि फुलं त्यांना काट्यासारखी खुपत आहेत हे समजून आलं. त्यांनी प्यूनला बोलावलं.
"महादेव, ही फुलं कुणी आणली?"
"नव्या साहेबांनी."
"टेबलक्लॉथ?"
"त्यांनीच."
"का?"
ह्या प्रश्नाला काहीच अर्थ नव्हता. महादेव नुसता उभा राहिला. तेवढ्यात कायदेशीर
हरकत उपस्थित करता येईल असा मुद्दा तांब्यांना आठवला.
"खिडकी कुणी उघडली?"
"साहेबांनीच."
"तिथल्या फायली कुठं फेकल्या?"
"म्हाइत नाय!"
"त्या साहेबांना बोलव."
सातवळेकर तांब्यांसमोर जाऊन उभा राहिला.
"माझ्या परवानगीशिवाय इथं काहीही फेरबदल होता कामा नये."
"ऑलराइट"
"खिडकी का उघडलीत?"
"प्रकाश आणि हवा हवी म्हणून."
"ते मलाही समजतं. प्रकाशसाठी ट्यूबलाईट होती डोक्यावर."
"वीजकपातीचे दिवस आहेत. शिवाय नॅचरल प्रकाश...."
"तिथल्या फाइल्स?"
"पलीकडे लावून ठेवल्या आहेत."
"एकमेकांत मिक्स केल्यात?"
"त्यातली लागेल ती फाईल मागा. पाच मिनिटात देईन."
"कोणती फाइल केव्हा लागेल ते आत्ता कसे सांगू?"
"जस्ट अ मिनिट" असं म्हणत सातवळेकर पुन्हा आपल्या टेबलापाशी गेला. त्याने ड्रॉवरमधून एक कागद काढला आणि तो पुन्हा तांब्यांकडे गेला.
"मी हलवून दुसरीकडे ठेवलेल्या फाइल्सची ही यादी. लागेल ती फाइल मागा, मी देईन."
तांब्यांचा पुरता नाईलाज झाला.
चरफडत पण तरीही ताबा ठेवीत ते म्हणाले,
"ठीक आहे. तुम्ही जा आता."
रिवाजाप्रमाणे अकरा वाजता चहा आला. सातवळेकरने चहा घेतला नाही. तांब्यांसहित सगळ्यांचा चहा झाला आणि पाचच मिनिटांनी सातवळेकरचा चहा, झकासपैकी स्पेशल ट्रेमधून आला. युनिफॉर्ममधल्या वेटरला पाहून तो चहा बाहेरच्या हॉटेलातून मागवलाय हे लक्षात आलं.
तांबे जळजळत्या नजरेने सातवळेकरकडे पाहत होते. राग चहाचा नव्हता. हाताखालचा माणूस, ट्रेमधून चहा पितो, ह्याचा राग होता. अडवणार कुठं?
पण तिथंही मार्ग सापडला.
तांब्यांनी पुन्हा महादेवला हाक मारली.
"कुठं गेला होतास?"
"सातवळेकरांचा चहा सांगायला."
"उद्या मला सांगितल्याशिवाय जायचं नाही. तू ऑफिसची ड्यूटी कर. लोकांची खाजगी कामं करायची नाहीत."
आपण काहीतरी चक्रव्यूहासारखा पेच टाकला अशा आनंदात तांबे होते. पण दुसऱ्या दिवशी आपोआपच चहा आला. सातवळेकर हॉटलात काम करणा-या वेटरला स्टैंडिंग इन्स्ट्रक्शन्स देऊ शकत नव्हता काय?
"कसा आहे आमचा हेडक्लार्क?" मी एकदा सातवळेकरला विचारले.
"आमचा की आपला?"
"आपला म्हणा, पण कसा आहे?"
"सेंट परसेंट माणूस आहे. ह्यूमन बिइंग."
"वा! ह्याचा अर्थ काय?"
"राग, लोभ, द्वेष ह्यांनी परिपूर्ण आहे. म्हणूनच संपूर्ण माणूस आहे. अशा लोकांपासून कितपत सावध राहायचं हे समजते. मला नवल वाटत नाही."
"नवल न वाटो, पण ह्या जळण्यात काय अर्थ आहे? तुमच्या माझ्यासारख्या साध्या..."
"तिथंच गंमत आहे. तो का पंतप्रधानांवर जळेल काय? जाऊ दे. अशी माणसं असायचीच."
"तुमच्या टेबलक्लॉथकडे, फुलांकडे पाहत असतो सारखा."
"तरी टेबलाला कडी आणि कुलूप माझं मीच बसवलंय ह्याचा तर त्याला पत्ताच नाही."
"हे तर मलाही माहीत नव्हते."
"त्याला तसा किती वेळ लागतो? आणि त्यात खास कौशल्य पण नाही, डिपार्टमेंटने दोन स्कू बसवायला दोन महिने लावले असते. तोपर्यंत कदाचित माझी बदली पण व्हायची. जिथ काम करायचं तिथली जागा प्रथम जाऊन पाहण्याची माझी पद्धत तेवढ्यासाठीच आहे."
"प्रत्येक ऑफिसात तुम्ही अशीच पाहणी करत आलात?"
"होय."
"तांब्यांसारखी माणसं किती ठिकाणी भेटली?"
"तांब्यांचा काही अपराध आहे असं मी अजून मानत नाही. ह्याचं कारण अशा माणसांना जिंकणं फार सोपं आहे. एक दिवस माझ्याबरोबर त्यांच्यासाठीही ट्रे मागवला की संपलं."
"बस?"
"बस इतकंच. ह्यांचे राग-लोभ सामान्य तशाच अपेक्षाही सामान्य."
"असं का पण?"
"कारण इतक्या क्षुल्लक अपेक्षाही पुऱ्या झालेल्या नसतात."
सातवळेकरने तांब्यांना जिंकलं. चहाच ट्रे मागवून नाही तर काम करून, नीटनेटकेपणाची आवड सातवळेकरच्या प्रत्येक हालचालीत, विचाराआचारात दिसून यायची. चुरगळलेला फुलस्केप तो वापरत नसे. कागदाचं टोक जरी दुमडले तरी तो नवा कागद लिहायला घ्यायचा. त्यावर तो त्याचं मत सांगायचा. विमान जोवर जमिनीवर असतं तोवरच कसून तपासणी करायची असते. ते परफेक्ट झाल्याशिवाय उड्डाणाची परवानगी नाही. हवेत गेल्यावर काही घडलं तर इलाज नाही. त्याप्रमाणे माझ्या टेबलावरून जी वस्तू हलणार आहे ती परफेक्ट झाल्याशिवाय हलायची नाही. सातवळेकर त्याप्रमाणे प्रत्येक फाइल, स्टेटमेंट, टेंडर, बिल, त्याशिवाय काय असेल ते-ते विमानाप्रमाणेच वागवून पाठवत असे. फाइल दुरुस्तीसाठी परत सातवळेकरकडे पाठवण्याची संधी डोळयांत तेल घालून तांब्यांनी शोधली, पण ते जिंकले नाहीत. एक- दोन प्रसंगी तर केवळ सातवळेकरच्या नीटनेटकेपणामुळे तांबे बचावले, नाहीतर ऑफिसच्या बड्या  बड्या धेंडांच्या राजकारणात तांब्यांची मान नुसतीच सापडली नसती तर फिरकीच्या तांब्यासारखी कुणीतरी साफ फिरवून टाकली असती. चूक होणं हा प्रकारच सातवळेकरला पटायचा नाही. चूक होतेच कशी, हा त्यांचा ठरलेला प्रश्न असायचा. महादेवच्या हातून ऑफिसची डिंकाची बाटली फुटताच त्याला फैलावर घेतला तो सातवळेकरने.
"महादेव, बाटली कशी फुटली?"
"धक्का लागला साहेब."
"अरे पण धक्का कसा लागला?"
"चुकून लागला."
"धक्का काय चुकून लागायची गोष्ट आहे?"
"साहेब..."
"ती काय लॉटरी आहे चुकून लागायला?"
"कसा लागला?"
"साहेब, आता ते..."
तेवढ्यात पलीकडच्या टेबलावरचे तोंड म्हणाले,
"अहो सातवळेकर, ते सांगायचं म्हणजे आणखी एक बाटली फोडावी लागेल,"
सगळा स्टाफ हसला.
सौम्य स्वरात कुणीतरी म्हणालं,
"अहो, हे असं व्हायचंच."
नाइलाज म्हणून सातवळेकर गप्प बसला.
सबंध ऑफिसात त्याचं थोडंसं सूत जमलं ते माझ्याशीच. मनातली सगळी मळमळ तो माझ्याजवळ व्यक्त करायचा, परफेक्शनसाठी तो जीव टाकायचा आणि इतरांकडून त्याची ती भूक नेहमीच अपुरी राहायची.
मनातली सगळी खळखळ तो डायरीत व्यक्त करायचा.
आई-वडील, भाऊ-बहिणी, मित्र, आला-गेला सर्वांबद्दल पानच्या पानं मजकूर डायरीत लिहिला जायचा. गुन्हे माफक असायचे.
'पाहुणे आलेले असताना आई केरसुणी घेऊन बाहेर आली. तिने असं करायला नको होतं. धिस् क्रिएट्स ॲन इम्प्रेशन ऑफ इनडिसिप्लीन. तिला मी फायर केली.'
'काल पूर्वसूचना न देता मेहुणे दोन मुलांना घेऊन आले. मला बाहेर जायचं होतं. मी माझ्या कार्यक्रमात फरक केला नाही. मेव्हण्यांना, मी निघालो म्हणून राग आला. तरी मी बाहेर पडलो. ही शुड हॅव इन्टिमेटेड मी ऑन फोन अण्ड देन कम. मी तसं बोललो, फोन नंबर हरवला असे म्हणाले. नंबर असा हरवतोच कसा? धिस इज ड्यू टु बॅड हॅबिट्स.'
'धाकट्या बंधूचं पाकीट हरवलं. ब्लडी फूल! ही शुड हॅव बीन अटेंटिव्ह. पाकीट हरवतं ह्याचा अर्थ काय? त्याला फायर केलं.'
सातवळेकरने डायरी वाचायला दिली पण संकोचाने मीच सविस्तर वाचू शकलो नाही. जे वरवर वाचलं ते असं होतं. डायरी पिशवीत टाकत तो म्हणाला,
"माणसं अशी वागतात. काय करायचं?"
मी गप्प राहिलो. काय करणार?
आणि अचानक एके दिवशी सातवळेकरने धक्का दिला-
"मी उद्यापासून महिन्याच्या रजेवर जातोय."
"का?"
"माझे लग्न आहे."
"ओ, एवढं अचानक? आणि ही बातमी अशी सांगतात?"
"अगदी अचानक ठरलं."
"मुलगी मुंबईची का?"
"नाही, खानदेशातली आहे. सध्या इथ आली आहे."
"अगदी कडक इंटरव्यू घेतलात की नाही? कारण तुमच्या परीक्षेला उतरणं म्हणजे..."
"मी तिला नुसती पाहिली, लग्न आमच्या खानदेशातल्या काकांनी जुळवलं आहे आणि मला 'हो' म्हणावं लागलं आहे."
"पत्रिका वगैरे छापल्या."
"नाही तेवढा वेळच नाही राहिला."
आमचा संवाद इथं तुटला. मला जितकी उत्सुकता होती, तितकाच तो अलिप्त वाटला. लग्न या विषयावर बोलायला नाराज वाटला, त्याच्या त्या काहीशा उदास चेहऱ्याकडे पाहताना प्रश्न पडला. आज सातवळेकर डायरीत नोंद करताना काय करील? कशी करील?
सातवळेकर महिन्याची रजा घेऊन गेला खरा, पण पंधराव्या दिवशीच परतला. त्याने रजा लग्नासाठी घेतली आहे हे फक्त मलाच माहीत होतं. अर्जातल्या अनअव्हॉइडेबल डोमेस्टिक वर्क ह्याचा खरा अर्थ फक्त मलाच माहीत होता. लादलेल्या लग्नामुळे- अनअव्हॉइडेबल या शब्दाला निराळीच अगतिकता आली होती. गंमत म्हणजे त्याने मलासुद्धा लग्नाचं आमंत्रण दिलेलं नव्हतं.
तरीही तो पंधराव्या दिवशीच कामावर हजर होईल असं वाटलं नव्हतं.
लग्न हा नक्कीच जुगार आहे. तरीही दान नेहमीच मनाविरुद्ध पडतं असं थोडंच आहे? मनं जुळतात. आणि अनोळख्या मुलीशी रंग जमून घडीही झक्क बसते. लव्ह मॅरेजला मार्ग सारील अशी झक्क दिलजमाई होते.
इथ काय झालं असेल?
सातवळेकर गप्प होता. माझ्याशीसुद्धा बोलत नव्हता. तो पार बदलला होता. लग्नानंतर सगळेच बदलतात. पण हे बदलणं फार निराळं होतं.
सबंध दिवसात त्याने जागा सोडली नाही. ट्रेमधला चहा मागवला नाही अशा रितीने तीन दिवस गेले.
चौथ्या दिवशी ऑफिस सुटायच्या वेळेला तो माझ्या टेबलापाशी येऊन म्हणाला, "उद्या संध्याकाळी माझ्या घरी तुम्ही सह जेवायला या. आज तसं घरी सांगून ठेवा. कोणतंही कारण सांगू नका. जेवायला या आणि मेक इट ए पॉइंट टु मेक द फंक्शन अ सक्सेस."
त्याच्या डायरीतल्या कॉमेंट्सप्रमाणे मला त्याचं आत्ताचं बोलणं वाटलं.
माझ्या अपेक्षेप्रमाणे त्याचं घर होते.
स्वच्छ, नीटनेटकं, खोलीत धुळीचा कण नव्हता. पलंगावरच्या चादरीला एक सुरकुती नव्हती.
प्रवेश करताच जाणवल्या त्या ह्या दोन ठळक गोष्टी.
सातवळेकरने प्रसन्नपणे स्वागत केलं. त्याने पंखा सुरू केला. पंख्याची पाती स्वच्छ होती.
सातवळेकर, एक परवानगी द्याल का?"
"बोला की!"
"तुमचं घर मला संपूर्ण पाहायचं आहे."
"एकच तर खोली आहे. काय पाहणार तुम्ही."
"सी.बी.आय.चे लोक पाहतात तसं पाहायचे आहे."
"म्हणजे झडती घ्यायची आहे असं म्हणा."
"जवळजवळ तसंच."
"घ्या, झडती घ्या."
मी शेजारचंच कपाट उघडले, वरच्या दोन कप्प्यांत कपडे होते. त्या सगळ्यांच्या घड्या
नीटनेटक्या होत्या. ह्यात नवल नव्हते. कपाटाच्या दरवाजाना एक दोरी बांधली होती. त्यावर फक्त पायमोजे आणि रुमाल आणि दोन-तीन नेकटाइज लावले होते.
एका कप्प्यात निरनिराळ्या आकाराच्या बाटल्या होत्या.
अत्तराच्या कुपीपासून, वॉटरबरीज कंपाउंडच्या आकारापर्यंत सर्व प्रकार-आकार उपस्थित होते. त्यापैकी बहुतेक बाटल्या रिकाम्या होत्या. बाकीच्यात औषधं होती.
"इतक्या बाटल्या?"
"मला छंद आहे. फूटपाथवर स्वस्त मिळतात."
मी कोपऱ्यातली वही उचलली.
संपूर्ण सातवळेकर त्या वहीत अवतरला होता.
पहिल्या पानावर संपूर्ण स्वतःची माहिती होती. नाव, आडनाव, पूर्ण पत्ता, जन्मतारीख, विम्याचा पॉलिसी नंबर, रिस्टवॉच नंबर, कॉलर साइज, वजन, उंची- सगळे कॉलम भरलेले.
नंतर पानावर महत्त्वाची माहिती होती. प्रत्येक क्रमांकाची पहिली व शेवटची बस केव्हा सुटते त्या वेळा, महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळा, पोलिस, फायरब्रिगेडचे नंबर, सगळ्या हॉस्पिटलचे नंबर, महत्त्वाची औषधं, मलमं, एखाद्या ड्रगची अलर्जी असेल तर अँटिडोट्स....
झडती घ्यायचं ठरवूनही मी काय काय टिपणार?
एका चिरुटाच्या डब्यात कापूस आणि कान कोरण्यासाठी खराट्याचे हीर, एका डब्यात रबरबॅण्ड्स, पुड्याचा दोरा, छोटी कात्री, पेपर क्लीप्स, कपड्यांना लावायचे चिमटे, नेलकटर, लाल-निळी पेन्सिल, बॉलपेन रिफिल्स काय काय सांगावं? आपण ह्यातलं काहीच करू शकलो नाही ह्याची खंत वाटू लागली. त्याच्यापुढे मी फार छोटा ठरू लागलो.
माझं संशोधन मी थांबवले.
"ह्या मिसेस् सातवळेकर,"
पातळाचे ओचे सोडत वहिनींनी नमस्कार केला.
मित्रांचे विचार, अभिरुची, आवडनिवड हे सर्व पाहून त्यांच्या बायका कशा असतील
ह्याबाबत आपण काही अंदाज बांधतो. मनातल्या मनात आपण एक मूर्ती, शिल्पकलेतला गंधही नसताना, उभी करून मित्राला बहाल करतो. त्या सगळ्या मूर्ती भंगतात असा आजवरचा अनुभव आहे.
कधी कधी मूर्तीला लाजवील इतकी देखणी वहिनी समोर उभी राहते. त्यात आपल्या कल्पनाशक्तीचा पराभव होतो. तर कधी मूर्तीच्या आसपासही वहिनी फिरकू शकत नाही. कल्पनाशक्तीची तिचं कीव येते. इथं कीव करण्याइतपतही मी भानावर नव्हतो. डिट्टो माणसासारखेच अवयव, पंचेंद्रिय असणं म्हणजे माणूस नव्हे.
पानं घेतली ती स्वतः सातवळेकरनेच. पहिलं वाढप त्यानेच केलं.
उपस्थित असलेल्या संख्येपेक्षा दोन पानं जास्त होती.
"आणखीन कोण येणार आहे?"
"माझा चुलतभाऊ आणि त्याची बायको."
"चुलतभाऊ म्हणजे?"
"ज्यांनी लग्न जमवलं त्या काकांचा मुलगा. ही जागा त्याचीच होती. तो इथं नोकरी करायचा. पण आमच्या काकांनी एकाएकी शेतीवाडी करायचं ठरवलं. त्यांनी रातोरात मुलाला नोकरी सोडायला लावली. ते खानदेशात स्थायिक झाले. जाताना जागा मला देऊन गेले. कॉलेजचं शिक्षण केवळ ह्या जागेच्या जिवावर झालं."
"तुमचे आईवडील..."
"ती सगळी मंडळी आमच्या जुन्या जागेत ठाकूरद्वारला असतात."
फार वेळ न लावता पाहुणे आले. आले ते सरळ पानावरच बसले.
इकडच्या तिकडच्या काही रंजक, काही जुजबी, काही जरा कंटाळवाण्या अशा गप्पा चालू झाल्या. सातवळेकरांची बायको हवं-नको पाहत होती. आणि तेवढ्यात कोशिंबीर वाढता वाढता तिचा बराचसा भाग ताटाबाहेरच सांडला.
सातवळेकरचं रक्त तापलं.
"नॉनसेन्स!" तो एकदम ओरडला.
आमचे घास हातातच राहिले. त्याच्या बायकोने नजरेला नजर देत विचारलं,
"काय झालं?"
"यू शूड बी केअरफुल व्हाइल सर्व्हिंग."
"वाढताना सांडायचंच."
"शट् अप. आय कान्ट टॉलरेट धिस."
"सातवळेकर, जाऊ द्या हो."
तो शांत झाला. पण आता गप्पांना आणि जेवणाला रंग चढेना, चव लागेना. ह्या तणातणीतून स्थिरस्थावर होतो न होतो तोच आणखी एक प्रकार घडला. सौ. सातवळेकर माझ्या बायकोशी काहीतरी हलक्या आवाजात बोलली.
"काय म्हणालीस?" सातवळेकरने चढ्या आवाजात विचारलं.
"काही नाही, बायकाबायकांचं होतं."
"यू शुड लर्न मॅनर्स."
"ह्यात काय झालं?"
"इथं बाकीची मंडळी बसली आहेत. त्यांना काय वाटेल?"
"सातवळेकर, सोडून द्या. त्यांचं काहीतरी असेल." मी लटका प्रयत्न केला.
"दहा माणसांत दोघांचं स्वतंत्र काही असताच कामा नये." मला एवढं सुनावून, बायकोकडे पाहत तो म्हणाला,
"तू काय बोललीस हे आम्हाला सर्वांना समजायला हवं. तोपर्यंत मी जेवणार नाही."
"सकाळचा भात वाढावा का, एवढंच विचारलं मी त्यांना. वहिनींनी खुलासा केला.
"ह्यात मग लपवण्यासारखं काय होतं?" सातवळेकरचा सवाल.
"खास सांगण्यासारखं काय होतं?" वहिनींचा उलट प्रश्न.
"डोण्ट आर्ग्यू वुइथ मी. डू युवर जॉब. दॅट टू नीट्ली."
जेवणाचा, समारंभाचा विचका झाला.
त्यानंतर दोन दिवस सातवळेकर कामावर आला नाही. तिस‌‌ऱ्याही दिवशी तो आला नाही तेव्हा मी तांब्यांकडे चौकशी केली. त्यावर त्यांनी कुत्सितपणे विचारलं,
"अरे, तुमचे फास्ट फ्रेंड आणि तुम्हाला माहीत नाही?"
"काय झालं?"
"तुम्हाला माहीत नाही यावर आमचा विश्वास बसत नाही."
"सरळपणाने सांगायचं असेल तर सांगा नाहीतर गरज नाही." तांब्यांचा हुद्दा विसरून मी तडकून बोललो.
"सातवळेकरांची बदली झाली."
"ऑ? मध्येच?"
"चिपळूणकर उद्या रिझ्यूम होताहेत."
मी बेचैन झालो.
आता या जागेवर सातवळेकर दिसणार नाही. त्याने केलेले नीटनेटके, स्वच्छ रिपोर्ट्स, चुका नसलेले ड्राफ्टस्, स्वच्छ हस्ताक्षर, झोकदार सही आणि त्याहीपेक्षा सौंदर्यदृष्टी असणारा, उच्च अभिरूची जोपासणारा सातवळेकर उद्यापासून दिसणार नाही. त्या ठिकाणी पान खाणारा चिपळूणकर, ड्रॉवरमध्ये कागदाचे बोळे टाकणारा चिपळूणकर.
काण्ट इमॅजिन. एखादं अपत्य नुसत्याच गर्भारपणाच्या यातना भोगायला लावून, न जगता जातं तेव्हा वाटतं तसं झालं. जगायचा नव्हता तर गर्भ राहिलाच का? नऊ महिने पोटात नांदला का? आणि नंतर जगला का नाही?
हा प्रवास करून त्या जिवाने काय मिळवलं?
सातवळेकर चिपळूणकरला चार्ज द्यायला आला.
टेबलक्लॉथ, फ्लॉवरपॉट, फुलं त्याने पिशवीत भरली.
मी त्याच्याबरोबर बाहेर पडलो.
आम्ही गेटवे ऑफ इंडियापाशी आलो. कट्ट्यावर बसलो. तापलेला कट्टा आणि उदास
सातवळेकर,
"सातवळेकर..."
त्याने चष्मा काढला. खिशातून रुमाल काढला, पांढरास्वच्छ चौकोनी घडी घातलेला. मी रुमालाकडेच पाहत राहिलो.
मला वाटलं तो चष्मा पुसणार.
पण त्याने डोळे पुसले.
"सातवळेकर..."
"गड्या, आपलं लाइफ संपलं."
"सातवळेकर, इतके इमोशनल राहू नका. सगळं ठीक होईल?"
"म्हणजे नक्की काय होईल?"
"चांगलं होईल, अशा काही घटनांनी आयुष्य संपते काय?"
"तुम्हाला कोल्हापुरी चप्पल माहीत आहे ना?"
"मी वापरतोय ती."
"तिचा अंगठा तुटला की काय राहतं? आपण तरीही पाय घासत चालतोच. वाट संपवतोच. पण त्याला काय चालणं म्हणतात का?"
सातवळेकरने मला निरुत्तर केलं.
"माझ्या संसाराचं असंच होणार आहे. अंगठा तुटला की आपण चप्पल फेकून देत नाही. वारंवार शिवून वापरतो. अंगठा कधी दगा देईल ह्याची काळजी करत करत चालत राहतो. ऐसा है!"
"सातवळेकर, तुम्ही फार विचित्र आहात."
"म्हणजे काय?"
"सॉरी! मला विचित्र हा शब्द वापरायचा नव्हता. तोंडातून चुकून निसटला. कदाचित तुम्ही विचाराल, चुकून निसटतोच कसा?"
अस्वस्थ मनःस्थितीतही सातवळेकर हसला. मला जरा धीर आला.
"मी हेच सांगणार होतो." 
"काय?"
"तुम्ही इतरांकडून परफेक्शनची एवढी अपेक्षा करू नका."
"आणि त्यांच्या पंगतीत जाऊन बसा. ते कसेही वागले तरी सहन करा, असंच ना?"
"काही प्रमाणात."
"नाही जमायचं."
"मग फार दुःखी व्हाल."
"झालोच आहे."
"ह्यात काही अर्थ आहे का पण? जेवायला वाढतानाची गोष्ट घ्या, वाढताना सांडणारच."
"ह्याच विधानात दुःख आहे. डिंकाची बाटली फुटायचीच, वाढताना सांडणारच, हे
सगळं तुम्ही लोकांनी इतकं गृहीत धरलं आहे की त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही.
गुरुत्वाकर्षणाप्रमाणे झाडावरचं फळ खालीच पडणार हे जसं स्वाभाविक, तशा माणसाच्या सवयी तुम्ही स्वाभाविक मानता. हेच मला नेमकं मान्य नाही. दहा-दहा
वर्ष स्वयंपाकघरात घालवल्यावर एवढं स्किल अंगात यायलाच हवं."
"मान्य आहे, पण हे फार किरकोळ आहे. ह्याने आपलं संपूर्ण वैवाहिक जीवन बरबाद व्हावं- इतकं ते महत्त्वाचं आहे का?"
"दुःख वृत्तीचं आहे. सांडलं तर बिघडलं काय? असाच ह्यांचा युक्तिवाद असतो. अशा पार्टनरला हाताशी धरून, पर्वत पार करायचा आहे."
"होईल हो."
"नाही व्हायचा. तुम्हाला तेवढी एकच किरकोळ बाब माहीत आहे. इथे मालिका आहे मालिका!"
"तीसुद्धा संपेल."
सातवळेकरने मला समजणारच नाही अशा अर्थाचा चेहरा केला.
"मला फार यशस्वी संसार करायचा होता."
"अजून होईल."
"नाही व्हायचा. अगदी पहिल्याच दिवशी मला माझा संपूर्ण भविष्यकाळ कळून चुकलाय."
"काय घडलं असं?"
"आम्ही दोघं जेवायला बसलो. एकदम एका ताटात. तिने मला घास दिला. मी तिला. मी जोपर्यंत माझ्याच आनंदात होतो तोपर्यंत माझ्या ध्यानात आलं नाही. पण मग एकाएकी कळलं की तिचं जेवताना तोंड वाजतं. सहन होणार नाही असा मचमच आवाज होतो. मी तिला अत्यंत मार्दवतेने जाणीव दिली. तिने काय म्हणावं?"
"काय म्हणाल्या?"
"तेवीस वर्षांची मुरलेली सवय आहे. ती आता जायची आहे? मी म्हणालो, प्रयत्न कर. तर म्हणते, जमायचं नाही आणि तोंड वाजलं तर बिघडलं काय? मी काहीच बोललो नाही. त्या दिवसापासून दोघांनी एका पंगतीला बसायचं नाही असं ठरवून टाकलं." सातवळेकरने त्याचं निवेदन थांबवलं.
मी विचारात पडलो होतो. माझा चेहरा काहीसा उतरलेला पाहून सातवळेकर म्हणाला,
"जाऊ दे. मी तुम्हाला कशाला उगीच त्रास देऊ?"
"मला मुळीच त्रास होत नाही. विश्वासात घेऊन मला तुम्ही सगळं सांगताय ह्याचा मला आनंद होतोय, वाईट इतकंच आहे की, फार छोट्या चुकीने किंवा मुरलेल्या सवयीने सगळं आयुष्य संपल्याच्या तुम्ही गोष्टी करताय."
"तुम्हाला मी फक्त एकच गोष्ट सांगितली. प्रत्येक ठिकाणी मला अशीच डोकेफोड करावी लागणार आहे. वेणी घातल्यावर कंगव्याला हमखास केस तसेच राहतात. टूथपेस्टचं झाकण उघडं राहतं, झाकपाक कशी करतात ते तिला ठाऊकच नाही. विळीचं पातं तसंच उघडं ठेवून इतर कामे करते. आंघोळीहून परत आली तर नंतर बाथरूममध्ये पाय ठेववत नाही. मोरीत जमिनीवर तपेली ठेवली की मला फार राग येतो. एक ना दोन, किती सांगू? पंधरा दिवसांत तेरा वेळा दूध उतू गेलं. दूध तापत ठेवायचं आणि दुसरं काहीतरी करायचं. कुंकू लावायचं आणि ते कुंकवाचे हात पातळाला पुसायचे. किती सांगू? अशी ही मालिका सकाळपासून सुरु होते आणि ती मला आयुष्यभर भोगायची आहे."
"ह्या निष्कर्षाला तुम्ही येऊ नका. माणसं बदलतात. तुम्हीच त्यांना बदलायचं आहे. तो एक यज्ञ आहे. आव्हान आहे. ते स्वीकारा. पुरुषार्थ असणाऱ्यांनी छोटी आव्हानं स्वीकारायची नसतात. हे कार्य मोठं वाटत असेल तर ते पत्करा. त्या बदलतील."
"ती बदलायची नाही. असं केलं तर बिघडलं का, हीच जिथ भूमिका आहे तिथे जडलेली एकही सवय ती मोडायची नाही. त्या सवयी तिच्या अंगचाच एकेक भाग झाल्या आहेत. कमरेवर ज्याप्रमाणे..."
सातवळेकर इथंच थांबला. पुढचं सांगावं की नाही ह्याचा त्याला प्रश्न पडला असावा. शेवटी सगळं आहे हे सांगायचं असं ठरवत तो म्हणाला,
"तिच्या कमरेभोवती एखाद्या नागिणीने विळखा घालावा तसा काळाभोर पट्टा आहे. वर्षानुवर्ष एका ठिकाणी घट्ट परकर बांधण्यामुळे तो वण पडलाय. तेवडा भाग काचलाय. एवढया तरुण वयात, देहाची ही अवस्था! पहिल्या रात्री तो डाग पाहिला. मन विटलं. तिला जवळ घेतली की अंधारातसुद्धा मला तो नागिणीचा विळखा आठवत राहतो. आई-वडील तेव्हा काय झोपा काढत होते का कळत नाही. कसं राहायचं हे आयांनी मुलीना शिकवायचे असतं. अरे, बाई कशी हवी! केसांपासून पायाच्या नखापर्यंत बाई हवी. नितळ, स्वच्छ, आकर्षक, चटका लावणारी, घायाळ करणारी, वेड लावणारी, प्रत्येक अवयवात ती बाईच हवी आणि हे सगळं घरात शिकवलं जायला हवं. कारण दुसऱ्या माणसाचं सुख आणि एका नव्या कुटुंबाचं भवितव्य एका व्यक्तीवर अवलंबून असतं."
सातवळेकरला बोलता बोलता त्वेष आला. त्याच्या हाताच्या मुठी वळल्या. गळयावरच्या शिरा स्पष्ट दिसू लागल्या. पण दुसऱ्याच क्षणी त्याच्यातला ताण संपला. तो हताश झाला. गॅस संपलेल्या फुग्यासारखा खाली आला. एकदम त्याचा आवाज घोगरा झाला. त्याने पुन्हा चष्मा उतरवला. स्वच्छ घडीच्या रुमालाने डोळ्यांच्या कडा टिपत तो म्हणाला,
"कमरेवरच्या प‌ट्ट्याइतक्याच बाकीच्या सवयी अगदी पक्क्या झाल्या आहेत. नाऊ नो वन् कॅन हेल्प इट्. मला फक्त एकच कळत नाही, ज्याची आवडनिवड एक नाही, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक नाही, विचाराआचारात कुठेच साम्य नाही अशा दोन माणसांना नियती एकत्र का आणते? भुगोलापुरताच ज्या खानदेशाशी संबंध आला, त्याच्याशी मी असा जखडला का जावा?"
"तुमचे काका..."
"काका हे निमित्तमात्र. खेळ नियतीचाच. तिला हे असं मुद्दाम जुळवून आणून काय मिळालं?"
प्रश्न भेदक होता. फार खरा होता.
पण तितकाच अगतिक होता.
सातवळेकर गेला. माझं मनःस्वास्थ्य घेऊन गेला. अगदी प्रथम भेटला होता तेव्हा कंटाळा घेऊन गेला होता.
ह्या वेळेला मनःस्वास्थ.
आपल्या स्वतःचं आयुष्यच इतकं स्वतःला पुरून उरतं की त्यातून डोकं बाहेर खरं तर निघतच नाही. बायका, मुलं, नातेवाईक, प्रवास, आजारपण, टंचाई, महागाई, पाहुणे ह्या चक्रातच इतकी भोवळ येते की इतर सगळ्यांचाच विसर पडतो.
आत्ताच्या ह्या क्षणाचा आयुष्यात विसर पडायचा नाही असं नाही म्हणता म्हणता आपण सगळं विसरतो. संपूर्ण विसरलो नाही तर त्यातली तीव्रता ओसरते.
सातवळेकरला मी त्याच्या व्यथेसहित विसरलो. आपल्याला स्वास्थ्य असलं की इतरांचं कष्टप्रद आयुष्य विसरणं कठीण नसतं. असं कुणाच्या तरी आयुष्यात व्हायचंच असं म्हणत आपण गप्प असतो.
त्यानंतर सातवळेकर भेटला तो जवळजवळ पाच-सहा वर्षांनी. मेट्रोसमोर, तो समोर दिसताच-परवलीच्या शब्दाने दिंडी दरवाजा उघडावा त्याप्रमाणे त्याचं सगळं आयुष्य आठवलं. व्यथा आठवली. विचार आठवले. गेटवे ऑफ इंडियाजवळ बसून, चष्मा पुसणार असं वाटता वाटता डोळे पुसले- हे सगळं आठवलं,
अपराध्यासारखं वाटलं.
गेली पाच-सहा वर्षे माझी फारच स्वास्थ्याची गेली होती.
त्याची?
तरी तो, तसा मजेत दिसला.
त्याने माझा हात हातात घेऊन दाबला.
"कसं काय चाललंय?"
"मजेत!" त्याने पटकन उत्तर दिलं.
"आता इकडे कुणीकडे?"
"मेट्रोला जातोय."
"एकटाच?"
"नाही. बायको येणार आहे."
"व्हेरी गुड!"
"मुलीला ठेवणार तिच्या मामाजवळ, मी ऑफिसातून परस्पर आलो. ती आता यायला हवी."
सातवळेकर हे सांगत असतानाच त्याची बायको रस्ता क्रॉस करीत होती. पाच वर्षांत ती अवाढव्य सुटली होती. तिचं हे सुटणं तिलाच पेलत नव्हते. तिचं रस्ता क्रॉस करणं म्हणजेसुद्धा पलीकडच्या फूटपाथवरून नुसतं सुटणं' होतं. वाहनांकडे पाहायला तिला सवड नव्हती. गरज नव्हती. वाटल्यास इतरांनी थांबावं त्यांना त्यांच्या वाहनाची काळजी असेल तर. एक मोटार ब्रेक लावत थांबली, तर तीन टॅक्सीज तिला वळसे घालून गेल्या.
ती चालतच होती.
तिला ती साडी पुरत नव्हती. पुढच्या बाजूने ती चक्क तरंगत होती. तिचे केस आणखी आखूड झाले होते. कोणतंही निश्चित वळण देण्याच्या पलीकडे ते गेले होते. नाक आणि ओठ ह्यांच्यामध्ये घामाचे थेंब उभे होते. फ्रीजमधल्या पाण्याच्या बाटलीबाहेर जसे साठतात तसे. तिला त्याची दखलही नव्हती. कपाळ काहीसं तेलकट दिसत होतं. कपाळावर कुंकू ओघळलं होतं.
मी सातवळेकरकडे पाहिलं.
त्याने प्रसन्न चेहऱ्याने तिचं स्वागत केलं.
"गाडी मिळाली व्यवस्थित?"
"हो."
"विजया मामाजवळ राहील ना?"
"हो."
"ह्यांना ओळखलं का?"
"नाही."
"आपल्या घरी जेवायला आले होते."
मी नमस्कार केला. ती नुसती पाहत राहिली. तिने उलट नमस्कार केला नाही. तिच्याकडे फार वेळ बघवेना. तिच्या कानांत मोत्यांची कुडी होती. त्यातली डाव्या कानातली कुडी ओघळली होती. मंगळसूत्राच्या पुढे एखादी कार्डबोर्डची चकती टाकली असती तर कुडं असं लोंबकळलं नसतं. पाहायला नको होतं, पण ठसठशीत कळत होते. त्याला इलाज नव्हता. ब्लाऊजला हुक्स असावेत. त्यातला नेमका मधलाच राजीनामा देऊन गेला असावा. त्यामुळे त्या जागेचा ब्लाऊज दुभंगला होता. पाकळीच्या आकाराची फट पडली होती. पातळाच्या सुरकुत्या तिथं व्यवस्थित जमवल्या असत्या तर तेही लपलं असतं.
आश्चर्य असं की सातवळेकर शांत होता.
अशा अवतारातल्या बायकोला मेट्रोत नेणार होता.
"तू आत जाऊन बस, मी आलोच." असं म्हणत सातवळेकरने तिचं तिचं तिकीट तिला दिलं.
ती निघाली.
पाठीमागूनही ती तशीच, तितकीच अवाढव्य दिसत होती.
पातळ उचललेलं, पदर नुसता सोडलेला, कमरेजवळ पातळ परकरातून निसटलेलं. परकराचाच केवळ काही भाग दिसतोय असं नाही तर कमरेभोवतालचा तो काळ्या नागिणीचा पट्टाही. ब्रेसियरचं हुक लावल्यावरही उरणारे टोक ब्लाऊजच्या बाहेर लोंबकळतंय.
मी मान फिरवली.
सातवळेकरने ते ओळखलं.
"इट गोज लाइक दॅट अण्ड आय हॅड अक्सेप्टेड इट. तो समाधानाने म्हणाला.
मी गप्प होतो. काही विचारणारसुद्धा नव्हतो. पण सातवळेकरलाच सगळं सांगायचे होतं.
"पुष्कळ विचार केला आयुष्याबद्दलचा आणि एकदम उलगडा झाला. म्हणजे असं झालं अगदी. आपल्याला फार थकवा आल्यासारखा वाटतो. तरतरी वाटत नाही. उदास वाटतं. आपण सहज डॉक्टरकडे बी कॉम्प्लेक्स घ्यायला जातो आणि अचानक एका क्षणी समजतं की हा डायबेटिस आहे. मग काय? आवडणाऱ्या गोष्टींना कात्री लावायची, मन मारायचे आणि डायबेटिस सांभाळायचा. अगदी इतक्या अचानकपणे प्रकाश दिसला. त्यापूर्वी घटस्फोटाचा कायदा वाचला. वेड्याच्या इस्पितळापर्यंतही जाऊन आलो. उपाय मिळेना आणि यू वुइल नॉट बिलीव्ह, पण गंमत सांगतो. वर्षानुवर्ष एका रस्त्यावरून आपण जातो पण त्या रस्त्यावरचं एखादं दुकान आपल्याला एकदम नव्याने सापडतं तसा प्रकार घडला."
पुन्हा तो थांबला. प्रश्न न विचारता मी चेहऱ्यावरचं कुतूहल कायम ठेवलं होतं. गाणाऱ्या माणसाला जेव्हा स्वतःलाच उत्साह येतो तेव्हा 'दाद' येण्याची तो वाट पाहत नाही.
सातवळेकरचं तेच झालं. तो म्हणाला,
"लहानपणी आपण त्रिकोण हा त्रिकोणच आहे हे सिद्ध करण्यासाठी काय करत होतो? तर त्रिकोण हा चौकोन किंवा वर्तुळ आहे असं मानत होतो. मग तो वर्तुळ किंवा चौकोन कसा नाही, हे पटवण्याचा प्रयत्न करता-करताच त्याचं त्रिकोणत्व सिद्ध होत जायचं. तोच नियम वापरून मी हा थेअरम सोडवला. प्रत्येक बाबतीत विरोध असलेली बायको गळ्यात बांधणाऱ्या नियतीला मी शत्रू समजत होतो. मी मग एकदा म्हणालो, नियती ही मित्र मानू या. ती जर मित्र असेल, तर असली बायको पदरात बांधून तिला, आपल्याला काहीतरी शिकवायचं असेल. हे शिकवणं काय असेल? तर नीटनेटकेपणाचा आपल्याला अहंकार आहे, तो जायला हवा."
"असा विचार करता-करता जाणवलं, की बायको ज्या तऱ्हेने आयुष्याकडे पाहत आहे ते पाहणं तितकंच योग्य आहे. माझ्या दृष्टीने ते गाढवपणाचं असेल. पण जगण्याची ही दुसरी तऱ्हा हेही जीवनच आहे. जेवढे माझं विश्व खरं आहे तेवढंच तिचंही विश्व खरं आहे. आय काण्ट डिनाय इट्स एक्झिस्टन्स."
"ह्या सत्याचं दर्शन मला पडावं म्हणून नियतीने पार खानदेशातला पाट माझ्या प्रवाहाला जोडला. एरवी माणूस समानशीलाशीच सख्य जोडतो. न जमणाऱ्या माणसांना तो दूर सारू शकतो. म्हणजेच पर्यायाने, अस्तित्वात असलेल्या दुसऱ्या विश्वाला तो पारखा होतो. 'बायको' ही एकच व्यक्ती अशी आहे की, जिला आपण डावलू शकत नाही. वुई टॉलरेट हर. तिचं विश्व आपण मान्य करतो. एकदा हे मान्य केलं की स्वतः इतकीच आपण तिची काळजी करतो. आजारी माणसाप्रमाणेच तिचं पथ्यपाणी सांभाळतो. पूर्वी तिचं काही खपत नव्हतं. आताही खपतं असं नाही. पण खुपत नाही."
चित्रपट सुरू होण्याची बेल झाली.
सातवळेकरने पुन्हा माझा हात हातात घेऊन दाबला आणि तो म्हणाला,
"जीवनाला थोडक्यात दुसरे एक नाव दिलंय, सांगू का?"
"अवश्य."
"जीवन म्हणजे सहन."
मी हसलो.
"सातवळेकर मेट्रोत गेला आणि रस्ता क्रॉस करताना मी विचार करू लागलो, 'जीवन म्हणजे सहन' ह्या व्याख्येला मी का हसलो?
का हसलो?
दुसरं काय करणार होतो?
कथा समाप्त
--------------
- लेखक - वपु काळे 
संकलन 942001588

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...