"अजून थोडा वेळच हं सीमा! थोडा जोर लाव आणि मोठा श्वास घे बघू.." डॉक्टर सीमाला सांगत होते. पण ती जाम थकली होती. तिला आता आस लागली होती येणाऱ्या नव्या पाहुण्याची. गेले ९ महिने ९ दिवस पूर्ण घेऊन आज पहाटेच तिला प्रसवकळा चालू झाल्या. ती तिचे प्रयत्न सोडत नव्हती. गेले काही वर्ष तिने तिचे प्रयत्न सोडले नव्हते. फक्त त्या वेळचं प्रयत्न करण्याचं कारण वेगळं होतं. सीमा तिच्या घरची लाडाची मोठी लेक. आणि तिच्या पाठीवर दोन बहिणीच. आणि इथे मोहिते खानदानात सुशीलाबाई म्हणजे सीमाच्या सासूबाईंना दोन मुलगे. त्यांचं कुळ मोठं. सराफाचा धंदा आणि दोन्ही मुलं त्यातच होती. खूप छान चाललं होतं सगळ्यांचं. फक्त मोहिते कुटुंबाला मुलींचं वावडं होतं. ते बदलायचा तिने प्रयत्न केला आडून आडून पण काही साध्य झालं नाही.
सीमाच्या आधी तिच्या धाकट्या जावेने, सगुणाने, बाळंतपणासाठी नंबर लावला होता. ती आईकडे डिलिव्हरीसाठी जाईपर्यंत सुशीलाबाईंनी तिला अगदी हैराण करून सोडलं होतं. तिला नशिबाने मुलगा झाला खरा. तिला स्वतःला पहिली मुलगीच हवी होती. पण सासू आणि नवऱ्यापुढे सगुणाचं काही चाललं नाही. या सगळ्याचा धसका सीमाने घेतला. सगुणाच्या लेकाला हातात घेतल्यावर सीमाला पण मूल हवं असल्याची जाणीव झाली खरी पण मुलगी झाली तर या विचाराने ती घाबरली. हवं-नको करता करता अचानक सीमाला दिवस राहिले. सीमा मोहोरली. घर पुन्हा एकदा आनंदाने भरलं. "अरे वा! आता घरात दोन बाळकृष्ण असणार. दोघे भाऊ छान खेळतील या घरात" असं सुशिलाबाईंनी म्हणताच सीमा हिरमुसली. तिचा नवरा अमरला मात्र मुलगीच हवी होती अगदी सीमासारखी! नाकीडोळी नीटस, सावळी तरी स्मार्ट आणि समजूतदार. तो त्याच्या आईच्या मुलगाच हवा या अट्टाहासाच्या अगदी विरोधात होता. सीमाने एकदा अमरला त्याचा मूड बघून विचारलं. "आईंचा पहिल्यापासूनच असा हेका का आहे? मुली तर आईवडिलांचं कित्ती प्रेमाने करतात. आता आमचंच बघा ना आम्ही तिघी आईला किती जपतो.दोन्ही बहिणी परदेशात असल्या तरी त्यांचं इथे पूर्ण लक्ष असतं. उद्या आपल्याला मुलगा न होता मुलगी झाली तर काय करायचं? मला खूप टेन्शन आलं आहे हो!" त्यावर अमरने तिला समजावलं, "सीमा तू कसलाच विचार करू नकोस. काय करायचं ते मी बघतो. आईकडे तू अजिबात लक्ष देऊ नकोस. छोटासा जीव हातात आला की आई बघ कशी विरघळून जाते ते. तू फक्त आपल्या बाळाकडे लक्ष दे. माझ्या पिलूला छान खाऊ पिऊ घाल..ती बाहेर आली की मी आणि माझी लेक अशी एक टीम असणार. आणि त्यापुढे तू मात्र एकटी पडणार.." असं म्हणून त्याने विषयाला बगल दिली.
सातव्या महिन्यात सीमाचं डोहाळजेवण करण्याची वेळ आली तेव्हा तर सासूबाईंनी जाम पिडलं सीमाला. 'ओळखा पाहू' या खेळामध्ये रुपया न काढता अंगठी काढली म्हणून सुशीलाबाईंनी नुसता फुगवटा धरला. सीमाच्या आईला सुशीलाबाईंचा हा हेकेखोरपणा माहितीच नव्हता. पण कळून तरी काय उपयोग होता त्या काहीच करू शकत नव्हत्या सध्या तरी.. त्यांचं पाठीचं दुखणं असल्याने त्या सीमाचं बाळंतपण करू शकत नव्हत्या. "आता सीमाला काय भोगावं लागतं कोण जाणे. मी धडधाकट असते तर हा प्रश्नच आला नसता. मीच केलं असतं माझ्या लेकीचं बाळंतपण. पण देवाजीच्या आले मना...
जाऊदे त्या वेळेला जे होईल ते बघता येईल." असं मनात म्हणून त्यांनी देवाला प्रार्थना केली. पण मनात धाकधूक मात्र वाढली.
सीमाने अगदी जीवाच्या आकांताने आता शेवटचा जोर लावला आणि स्वतःची सुटका करून घेतली. डॉक्टरांनी तो इवलुसा जीव हातात धरला आणि सांगितलं, "अभिनंदन सीमा, तुमच्या घरी गोंडस परी आली आहे. छान आहे बाळ. काळजी नको..." असं म्हणून ते गेले आणि बाळाला पण स्वच्छ करायला, आंघोळ घालायला परिचारिका घेऊन गेली. डॉक्टरांचे शब्द सीमाच्या कानात शिसं ओतावं तसे आदळत होते. एकीकडे अपार आनंद तिला झाला होता. ती "आई" झाली होती. पण तो आनंद जास्त काळ टिकला नाही. तिला काय करायचं ते सुचेचना. सासूबाईंच्या तोंडावर असलेला राग तिला आता अधिक गडद भासायला लागला. मात्र खूप जोर लावला असल्याने आता तिला झोप लागली. बाहेर अमर आणि सगुणा ताटकळत उभे होते. सिस्टरने पहिला प्रश्न विचारला, " मिस्टर मोहिते. तुम्हाला हे पहिलं मूल का? की आधी कुणी आहे?" त्यावर अमरने लगेचच, "हो. पहिल्यांदाच . तुम्ही असं का विचारताय. सगळं ठीक आहे ना?" असं विचारल्यावर सिस्टरने सांगितलं, "बरं बरं हरकत नाही. अभिनंदन! तुम्हाला मुलगी झाली आहे. बाळ बाळंतिण दोघी सुखरूप आहेत. थोड्या वेळाने त्यांना लेबर रूममधून बाहेर आणतील. तेव्हा तुम्ही बघू शकता." अमरला तर ऐकताक्षणीच खूप आनंद झाला. "अहो मग इतक्या उशिरा असे अनेक प्रश्न विचारून काय सांगताय सिस्टर. माझ्या घरी परी आली आहे. माझी लक्ष्मी. मी खूप आनंदात आहे." असं म्हणून त्याने खिशातून ५००/- ची नोट सिस्टरला दिली आणि मिठाई आणून स्टाफ मध्ये वाटायला सांगितली. घरातले सगळे येऊन बाळाला बघून गेले पण दोन-तीन दिवस झाले तरी सुशीलाबाई बाळाला बघायला आल्याच नाहीत. तिची जाऊ सगुणा तेवढी हॉस्पिटलमध्ये ये-जा करत होती. तिला मुलींचं वेड होतंच. पण तरीही तिला दबक्या पावलांनी यायला लागायचं आणि डब्बा वगैरे देऊन लगेच जायची. सीमा ने एकदा धीर करून विचारलंच सगुणाला. "सगुणा तू अशी पळत पळत ये जा करत आहेस. सासूबाई चिडल्या असतील ना. त्यांचा हेका पूर्ण झाला नाही म्हणून. मी त्यांची अपेक्षा पूर्ण करू शकले नाही." त्यावर सीमाची जाऊ म्हणाली, " वहिनी, तुम्ही नका इतका विचार करू आत्ता. तब्येत चांगली राहिली पाहिजे तुमची. अहो तुम्ही छान विचार केलेत तर बाळाला दूध मिळेल. नाहीतर आमच्या राजकन्येला रडत ठेवलं तर मला नाही हो चालायचं. आणि खरं सांगू का? सासूबाई चिडल्या आहेत की नाही कुणालाच माहिती नाहीये. त्या बोलायचं टाळत आहेत या विषयावर. गप्प खोलीत बसून असतात." दिवसभर सगळी धावपळ अमर करत होता. सीमा पार सुकून गेली होती. शिवाय सीमाची आई एकदा येऊन नुसतीच बघून गेली. आजारी असल्याने आणि सीमाचे बाबा हयात नसल्याने तिला 'माहेरी चल' असं म्हणणं त्यांना परवडणारं नव्हतं. डॉक्टरांनी तीन दिवसांनी बाळ बाळंतिणीला तपासून घरी जायची परवानगी दिली आणि सीमाच्या पोटात भीतीने मोठा खड्डाच पडला. आता घरी आपलं स्वागत तर सोडाच पण तोंडं वाकडी झालेलीच बघायला मिळणार म्हणून मनातून आनंदलेली सीमा लगेचच शांत झाली. तिने तिच्या मनातली भीती अमरला बोलून दाखवली. पण अमर काहीच बोलला नाही. "बघू आपण काय ते. तू चल बघू आधी. आपली राजकन्या आता तिच्या घली जानाल. ते पन तिच्या लालक्या पप्पांसोबत. चला चला..." असं म्हणत अमर लेकीला घेऊन खोलीतून बाहेर पडला आणि पाठोपाठ सीमा ही निघाली.
गाडीतून घरी आल्यावर दीर, जाऊ, त्यांचा दीड वर्षांचा मुलगा आदित्य असे सगळे दारात स्वागताला उभे होते. हे दाराशी पोहोचताच सगुणा औक्षणाचं ताट आणि भाकरतुकडा ओवाळून टाकायला पुढे झाली आणि तेवढ्यात आतून आवाज आला. "थांब सगुणा. फक्त अमर आत येईल. पण तिला आणि तिच्या लेकीला आत येता येणार नाही. जी बाई घराण्याला वंश देऊ शकत नाही तिचं इथे काही स्थान नाही. त्यांना ओवाळून वगैरे आत घेण्याचा प्रश्नच येत नाही." आईचे हे शब्द अमरचं काळीज चिरत हृदयाला भिडले. आणि त्याने घरात टाकायला उचललेलं पाऊल परत उंबाऱ्याबाहेर घेतलं. तो आल्या पावली परत जायला निघाला. "अमर तू कुठे चाललास बेटा? तू ऐकलं नाहीस का? तू ये. तुला कुणीच नाही म्हणालं नाहीये यायला. तुझ्याशिवाय मी राहूच शकत नाही." आता मात्र अमरचा पारा चढला होता तरीही त्याने संयम बाळगला. आणि तो बोलायला लागला, " माझं तरी या घरात काय काम. जिथे माझी बायको आणि मुलगी तिथेच मी. मला वाटलं होतं गोंडस बाळ हातात आलं की तू बदलशील. पण छे! तू तर त्या निरागस जीवाला बघितलं ही नाहीस. आणि वाट्टेल ते बोलत आहेस. अगं आई, तू जशी माझ्याशिवाय राहू शकत नाहीस तसाच मी माझ्या या कोवळ्या लेकिशिवाय कसा राहू. अगं तुझे हे बुरसटलेले विचार किती काळ सोबत घेऊन जाणार आहेस. आता जमाना कुठे गेलाय. किती तो स्त्री जातीचा राग. आणि मी म्हणतो कशाला गं? तू विसरते आहेस की तू ही कुणाची तरी लेकच आहेस. आजीआजोबांनी त्या काळी तुला जन्म द्यायला नकार दिला असता तर तू तरी कशी राहणार होतीस. आणि तू एक स्त्रीच आहेस की. मुलगा फक्त त्याची नाती सांभाळतो. आजकाल तर ती ही नाही सांभाळत. कित्येक घरात सूनाच सगळं पाहतात. आपल्या सासुसासरे आणि आईवडील दोघांचं त्या करतात अगदी सहज. त्या आपल्या स्वभावाने कित्येक घरं जोडून ठेवतात. आणि मुलं त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवतात. त्यामुळे दिसताना ते छान दिसतात पण कर्तव्य स्त्रिया पार पाडतात. आपल्याच घरात अशी उदाहरणं आहेत की. माझी लेक नक्कीच माझं नाव उज्वल करेल. तिच्या स्वभावाने ती सगळ्यांना बांधून ठेवेल. फक्त एकच होईल की त्या सगळ्यांमध्ये तिची आजी मात्र नसेल. कारण काय तर तिच्या मते ती मुलगा नाही तर मुलगी आहे. पण मी एकच सांगतो मुली म्हणजे वंशाचा दिवा नाहीत असं तुम्ही मानत असलात तरी त्या शांतपणे देव्हाऱ्यात सतत तेवत राहणाऱ्या समया आहेत. त्यात पहिली बेटी म्हणजे धनाची पेटी आहे. पण दुर्दैव हे आहे की तुला हे कधीच कळणार नाही. असो तू माझी चिंता अजिबात करू नकोस. मला तुझा हा सगळा प्रकार आधीच माहिती होता. मी मागच्याच वर्षी जेव्हा आम्ही बाळाचा विचार करायला घेतला तेव्हाच एक घर घेतलं आहे. त्याचे हप्ते भरणं चालू आहे पण माझी लेक तिकडे मानाने वाढेल. मी फक्त तुला तुझे विचार कसे जुनाट आहेत. आणि त्याचं जोखड मी कधीही मानेवर वागवणार नाही हे सांगायला आलो होतो. तुम्हाला कधीही कुणालाही वाटलंच तर तुम्ही तिकडे आम्हाला भेटायला येऊच शकता. निघतो आम्ही."
असं म्हणताच अमर; सीमा आणि आपल्या गोंडस परीला घेऊन आत्मविश्वासाने निघाला. त्याची आई मात्र डोळ्यात घातलेल्या झणझणीत अंजनाने एका जागी गपगार झाली होती. आज तिला तिचाच मुलगा 'ठकास महाठक' असल्यासारखा वाटला. अमरला मात्र मणामणाचं ओझं उतरल्यासारखं वाटत होतं. कारण शेवटी काहीही झालं तरी त्याचा सामना खुद्द त्याच्या जन्मदात्रीशी होता. तो जिंकला तरी आईपासून तुटलं जाण्याचं दुःख त्याला होतंच. सीमा मात्र खुश होती. आता मुलगाच हवा हा अट्टाहास तिच्याकडे कुणीही करणार नव्हतं आणि मुलगी झाली म्हणून कुणी तिला टोकणार नव्हतं. आज तिला सासूबाईंना दुखावलं या भावनेपेक्षा तिच्या अमरचा अभिमान जास्त वाटत होता.
ll शुभं भवतू ll
(कृपया कथा आवडल्यास नावासकट जरूर शेअर करा ही विनंती. 😊🙏🏻)
सौ. अतुला प्रणव मेहेंदळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा