शिपाई दीपा जवळ येऊन म्हणाला, मॅडम साहेबांनी केबिन मध्ये बोलावले. घड्याळात पाहिले साडेदहा होत आले होते.
बापरे ! म्हणजे अर्धा तास लेट. नक्कीच बॉसची बोलणी खावी लागणार. चार दिवस झाले उशिर होतो. ते तरी किती आणि का adjust करतील?
चला दीपा आज बोलणी ऐकण्याची तयारी ठेवा. घोटभर पाणी पिऊन दीपा केबिन बाहेर टकटक करू लागली.
शेखर, तिचा बॉस yes coming म्हणताच, तीने केबिन चे दार ढकलुन आत प्रवेश केला.
सुरवातीलाच म्हणाली सॉरी सर थोडा उशिरच झाला !
थोडा !
अहो तब्बल अर्धा तास उशिर झाला तुम्हाला.
हो सर !
सॉरी सर !
उद्या पासून नाही होणार !
अहो चार दिवस झाले तुमचे असेच चालले .
शेवटी आज नाईलाजाने बोलावे लागले.
मला माहित आहे, तुम्ही आल्यावर कामात कुचराई करत नाही .
हुशार आहात .
कुणाचे काही अडले तर नीट समजून सांगता.
पण म्हणून रोज रोज असा उशिर चालणार नाही. नाहीतर मला तुम्हाला घरी बसवावे लागेल.
ती गयावया करून म्हणाली, सॉरी सर !
उद्या पासून नाही होणार असे.
मिस दीपा तुमच्या घरी काही प्रोब्लेम आहे का?
नाही सर !
तुमचे डोळे सांगतात, तुमची झोप बरोबर झालेली दिसत नाही. किंवा मग तुम्ही रडत तरी होता.
नाही सर असे काही नाही .
उद्या पासून वेळेत येते.
Ok या तुम्ही.
Thank you सर !
आता दीपा चार पाच दिवस वेळेत आली.
पुन्हा काय झाले कोणास ठाऊक , पण ती पुन्हा चार दिवस उशिरा आली.
बॉस तसा खडूस होता.
वेळेत सगळे लागायचे.
हे काम आत्ता म्हणजे आत्ताच व्हायला पाहिजे असा काहीसा त्याचा स्वभाव.
पण तितकाच मोठ्या मनाचा.
पुन्हा दीपाला यायला उशिर होतो. नक्कीच घरी काही प्रोब्लेम असावा.
आपण मागे विचारले तर नाही म्हणाली. बरोबरच आहे, कुणीही आपले पर्सनल प्रॉब्लेम असे बॉसला सांगणार नाहीच. त्यात दीपा खूप स्वाभिमानी ती तर नाहीच नाही.
मागच्या वेळी दीपा मुळे एक मोठे कंत्राट कंपनीला मिळाले. तिला म्हणालो तुझा पगार दोन हजार रुपये वाढवतो. तर म्हणाली सर आम्ही चार जण या प्रोजेक्ट वर काम करत होतो. प्रत्येकी ५०० रुपये वाढवून द्या. दोन हजार वाटल्या जातील.
प्रत्येकाला आपण काम केल्याचा आनंद आणि पुढचे काम करायला प्रोत्साहन मिळेल.
अशी ही दीपा!
आता बॉस विचार करू लागला . दीपा उशिरा का येते याची शहनिशा करायचीच.
बेल वाजवली. शिपाई आता आला.
सर बोलावले!
श्याम !
कल्याणला तु कुठे राहतो ?
सर लालचौकीला !
का सर?
दीपा मॅडम कुठे राहतात माहित आहे का ?
हो सर!
खडक पाड्याला
किती अंतर आहे तुझे आणि त्यांचे घर?
सर, दोन अडीच किलोमीटर असेल.
तुझ्यावर एक जबाबदारी टाकतो, करशील ?
हो साहेब?
काय काम आहे?
श्याम, तुला माहित आहे. दीपा आज काल रोज ऑफिसला उशिरा येते. लग्न झाले हे तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्रा वरून कळते. बाकी आपल्याला तिची काही माहिती नाही.
एक मुलगा आहे त्यांना. दहा वर्षाचा, पाचवीत आहे.
नवरा !
ते नाही माहित सर!
मागच्या आठवड्यात मी विचारले, घरी काही प्रोब्लेम आहे का? तर काही बोलली नाही.
श्याम , दीपा हुशार आहे. शिवाय कोणाचे काही अडले तर पट्कन मदत करते. कोणाला वेळ नसेल तर चक्क दिपाला काम सांगून मोकळा होतो. ती सुध्दा कधी नाही म्हणत नाही.
बर एखादे चांगले काम केले तर त्याचे श्रेय सगळ्यांना देते. अशी ही दीपा.
हो सर, दीपा मॅडमचे हे वैशिष्ठ आहे. त्या स्वतः कोणतेच क्रेडिट घेत नाही. सगळ्यांना सामावून घेतात.
तर मी काय म्हणत होतो ?
ह !
तु येत्या रविवारी दीपा कडे जा !
पत्ता आपल्या ऑफिस रेकॉर्डला आहे.
सर मला पत्ता माहित आहे. दीपा मॅडम एकदा सांगत होत्या.
गुड!
हे काम नक्की कर. अरे आजचा शुक्रवार, परवाच रविवार आहे.
तु जावून आल्यावर मला फोन करून नक्की सांग.
हो सर म्हणून तो बाहेर गेला.
शेखर विचार करू लागला, नेमका काय प्रॉब्लेम असेल या पोरीच्या घरी.
नवरा दारू पिऊन मारझोड करत असेल का ?
तेवढ्या दारावर टकटक झाली. येस coming, म्हणताच दीपा केबिन मध्ये शिरली.
सर आपली आज ४ वाजता मीटिंग आहे. ही मीटिंग सक्सेस झाली तर हे कंत्राट आपल्याला नक्की मिळणार.
नक्की मिळणार दीपा !
फार मेहनत घेता तुम्ही!
सर इथे मला पगार मिळतो. ज्यामुळे मी माझा उदरनिर्वाह करू शकते. त्यामुळे मेहनत तर घ्यावी लागेलच.
खरतर ही कंपनी म्हणजे माझ्यासाठी एक कुटुंब आहे सर. तुम्ही कुटुंब प्रमुख. फार मोठ्या जबाबदाऱ्या कुटुंब प्रमुख म्हणून तुम्हाला पार पाडाव्या लागतात. त्यात आम्हा कुटुंबातील सदस्यांचे हातभार तुमचा हा गाडा सुरळीत पार पाडायला मदत करतात.
बरोबर आहे तुमचे.
बर मीटिंग आपल्या ऑफिस ला आहे का बाहेर?
सर आपल्याच ऑफिस मध्ये. मीटिंगची सगळी तयारी झाली आहे. हे काम माझ्या कामाशी निगडित आहे. त्यामुळे निकम सरांनी सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवली !
Good !
म्हणजे सगळे काम चोख होणार !
प्रयत्न तोच असेल सर !
थँक्यू सर !
Welcome!
सर ! आता दोन वाजले, अजून दोन तास वेळ आहे. मी बाकीची तयारी करते.
Ok!
बरोबर चारला मीटिंग सुरू झाली. बोलल्या प्रमाणे दीपाने प्रेझेंटेशन खूप छान केले. सर्वच प्रभावित झाले. हे कंत्राट पण मिळाले. यात फक्त दीपा काम पाहत होती. त्यामुळे सगळे श्रेय तिलाच मिळाले. तरीही ती म्हणाली, मी वेळोवेळी सगळ्यांचे मार्गदर्शन घेत होते. त्यामुळे हे शक्य झाले.
रविवार उजाडला, श्याम बरोबर संध्याकाळी सहा वाजता दीपा कडे पोहचला. दाराजवळ पोहचला, त्याला मुलांच्या बोलण्याचा आवाज येत होता. बाहेर चार पाच चपलांचे जोड होते. श्याम गोंधळला, दारावर नावाची पाटी नव्हती. पण हेच दिपाचे घर त्याला पत्ता माहित होता.
त्याने दारावर टकटक केली. एका मुलाने दार उघडले.
दीपा मुलांचा क्लास घेत होती. श्यामला पाहून दीपाला आश्चर्य वाटले.
श्याम दादा तुम्ही ?
इकडे कसे ?
इकडे एका मित्रा कडे आलो होतो. तुम्ही मागे पत्ता सांगितला होता. विचार केला भेटून यावे.
या ! या !
बसा!
ती बसायला जागा शोधत होती. शेवटी बेडरूम च्या दाराजवळ तिने स्टूल ठेवला. त्यावर श्याम बसला. बेडरूम मधील दृश्य बघून तो जागीच स्थब्ध झाला. बेडरूम मध्ये एक म्हाताऱ्या आजी होत्या. त्यांचे पूर्ण शरीर थरथर कापत होते.
श्यामला कळेना हे नेमके काय आहे?
कोण असाव्या ह्या म्हाताऱ्या आजी?
किती दुरवस्था झाली त्यांची? एकच म्हणत होत्या, देवा सोडव लवकर यातून. पोरीला सुखी कर.
दीपा जवळ जाऊन म्हणाली, आई ! किती वेळा सांगितले दिवे लागणी होते, असे अभद्र बोलू नये !
आई तुम्हीच सांगायच्या न अश्या!
मग आता असे काय झाले? नेहमी अशुभ बोलता.
किती त्रास होतो तुला पाहते मी!
ना धड घरी !
ना धड ऑफिस मध्ये !
मुलगा असून नसल्यात जमा!
आई ! आई !
मी आहे न तुमची मुलगी!
आई मुलांना सुट्टी देते. मग बोलू आपण . आता तुम्ही शांत पडून राहायचे.
आई माझ्या ऑफिस मधून श्याम दादा आलेत. त्यांना चहा ठेवते. तुम्ही घेणार का?
नको ग!
काहीच पचत नाही !
मग ते जुलाब !
वेळीअवेळी !
तुला किती करावे लागते ? ऑफिस ला जायला उशीर होतो.
आई तूम्ही नका काळजी करू! माझे साहेब खूप चांगले आहे! त्यांना मी सगळे सांगितले. थोडा उशीर झाला तर ते adjust करतात !
श्याम त्या दोघींचे संवाद ऐकत होता.
त्यांच्या बोलण्यावरून नक्कीच त्या दीपा च्या आई नव्हत्या. बोलण्यावरून तरी सासुबाई वाटत होत्या.
क्लासवाल्या मुलांना सुट्टी दिली. दीपा ने चहा ठेवला.
श्याम मुद्दाम म्हणाला, दीपा ताई , ह्या तुमच्या आई का ?
म्हातारी लगेच म्हणाली, नाही ! नाही !
या अभागी पोरीची मी सासू आहे.
आई ? काय हे?
किती वेळा सांगितले सासू म्हणायचे नाही !
दीपा ताई चहा कडे बघत होत्या. तोवर म्हातारीने चालू केले, अरे हीचा नवरा, माझा मुलगा सागर , पाच वर्ष झाले आम्हाला सोडून गेला.
म्हणजे तो मेला नाही ह!
एका बाईला घेऊन पळाला.
अर्थात मीच त्याला घरातून हाकलून दिले.
हा बाहेर शेणखाऊन यायचा आणि या पोरीवर संशय घ्यायचा. दिवसभर ती घरी माझ्यासोबत असायची. खरतर तिला नोकरी करायची होती. पण आमचे हे धोंड ऐकायला तयार नव्हते. म्हणे बायकांनी नोकरी नाही घर सांभाळायचे. बिचारी गुमान घरात बसली.
गरोदर राहिली, तिने आनंदाने ही बातमी आपल्या नवऱ्याला सांगितली. तर याचे नवीनच, हे बाळ माझे नाही. कोणाचे तरी पाप तू माझ्या डोक्यावर मारते.
मी माझ्यापरीने खूप समजावून सांगत होते. अरे हे तुझेच बाळ आहे.
तू बाप आहे या मुलांचा !
पण तो कुणाचेच ऐकत नव्हता.
बघता बघता नऊ महिने लोटले. एका गोंडस बाळाला जन्म दिला तिने. त्याने त्या मुलाला पाहिले सुध्दा नाही. एकच , हे बाळ माझे नाही.
पाच वर्षात कधी त्याने पोरा चां लाड केला नाही. का कधी त्याचा पापा घेतला नाही. वैऱ्या सारखा वागायचा. वरून दीपा ला घालून पाडून बोलायचा. खूप संताप व्हायचा तीचा आणि माझा पण.
एक दिवस दोन बाजूंनी दोन वाजवल्या, हात धरला. म्हणाले निघ या घरातून !
जा तुझ्या रखेलला घेऊन राहा !
स्वतः शेण खातो !
तसच दुसऱ्याला समजतो !
निघ !
पुन्हा तुझे तोंड देखील दाखवू नको.
तेव्हाचा तो गेला, कुठे आहे ? काय करतो?
आम्ही कसे आहोत ? कशाचीही पर्वा नाही.
खरतर दीपाचे मला दुसरे लग्न करून द्यायचे होते. या नालायक पोराला घटस्फोट द्यायला सांगत होते मी.पण त्याचा पत्ता नाही आणि आता मला अश्या अवस्थेत सोडून ती काहीच करणार नाही.
फार गुणी पोर रे !
कधी वाटते या नालायक मुलाला जन्म दील्यापेक्षा दीपा सारख्या मुलीला जन्म का नाही दिला मी?
पुन्हा दीपा म्हणाली, आई उदरातून जन्म देणं म्हणजे आई होणे का?
आई! एका आईने आपल्या मुलीवर जितके प्रेम केले असते तितके कदाचित त्याहून जास्त प्रेम तुम्ही मला दिले.
प्रत्येक वेळी माझ्या पाठीमागे खंबीर उभ्या राहिल्या. कित्येक सासवा पाहून आणि ऐकून आहे मी. आपला मुलगा चुकतो हे माहीत असून सुध्दा सुनेला बोल लावतात.
पण तुम्ही माझी बाजू घेतली. कशाचाही विचार न करता, मुलाला घराबाहेर काढले. कदाचित माझी आई असती तरी हे असे करू शकली असती की नाही सांशक आहे.
आई ! मागच्या जन्मातले काहीतरी पुण्य असावे माझे. तुमच्या सारखी सासू मिळाली.
नाही दीपा, मागच्या जन्मात मी नक्कीच काहीतरी पुण्य केले जेणेकरून तुझ्या सारखी मुलीचा रुपात सून मिळाली.
एकुलता एक मुलगा म्हणून फार लाडाकोडात वाढवले आम्ही त्याला. त्याची परतफेड त्याने अशी केली.
ही पोरगी, शिकली असून सुध्दा नोकरी लागे पर्यंत लोकांची धुणी, भांडी जेवण बनवायचे काम करत होती. मला म्हणायची आई तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला नोकरी लागेल. तोवर मी हे काम करते. तुम्ही घरात बसून नातू सांभाळा.
सहा महिन्यात नोकरी लागली. हळूहळू पगार वाढला, आता तुमच्या कंपनीत नोकरी करते, पण तिची खूप धावपळ होते. मी पंधरा दिवस admit होते. घर , ऑफिस आणि दवाखाना सगळे कसे करत होती देवच जाणो. माझा नातू दिवसभर दवाखान्यात माझ्या जवळ राहत होता. ही ऑफिस सुटले की यायची. पुन्हा घरी जेवण बनवून माझ्या डबा घेऊन ,लेकाला घेऊन रात्री दवाखान्यात मुक्कामाला. सकाळी पुन्हा घरी, डबा घेऊन मुलाला माझ्या दिमतीला ठेऊन पुन्हा ऑफिस.
दहा बारा दिवस झाले सुट्टी झाली. सरकारी दवाखान्यात ठेव म्हणाले मी तर ऐकले नाही. दवाखान्याचे बिल,
आता हा औषध पाण्याचा खर्च झेपत नाही. मग आता शनिवार, रविवार दोन दिवस मुलांचे ट्युशन घेते. उसंत म्हणून नाहीच.
तेव्हढ्यात दीपा चहा घेऊन आली.
त्यांना उठवून टेकून बसवले, चहा गार करून त्यांना पाजून दिला.
चहा घेऊन श्याम उठला, दीपा ताई येतो मी !
काळजी घ्या !
काही मदत लागली तर हक्काने सांगा !
हो श्याम दादा !
नक्की !
श्याम बाहेर आला . लगेच साहेबांना फोन करून सगळी हकीकत सांगितली.
एकूण साहेब पण निःशब्द झाले. जे काम एक मुलगा, एक पुरुष करू शकत नाही. ते काम मुलगी बनून दीपा करते. फार अभिमान वाटला त्यांना दिपाचा.
दुसऱ्या दिवशी दीपाला पाचच मिनट उशिर झाला. ती घाबरली. बॉसला बोलले वेळेत येणार पण नाही जमले.
आईंना नेमकी त्याच वेळी संडास लागते. मग ते pot देणं, साफ सफाई यात वेळ निघून जातो.
बिचाऱ्या त्या भीतीने काही खायला मागत नाही.
विचारातच ऑफिसला पोहचली.
बॉस ने केबिन मध्ये बोलावून घेतले.
दीपा खूप घाबरली. आता नोकरी जाते की काय ? अशी भीती वाटू लागली.
तिच्या डोळ्यात अश्रू स्पष्ट दिसत होते. लपविण्याचा निस्फळ प्रयत्न चालू होता.
काय मग ?
आज पुन्हा उशिर ?
सॉरी सर !
दीपा!
उद्या पासून तुम्ही रोज अर्धा तास उशिरा यायचे!
सॉरी सर !
कशा बद्दल?
सर आज पुन्हा पाच मिनिट लेट झाले?
सर उद्यापासून नाही होणार उशिर!
सॉरी सर !
दीपा शांत व्हा !
हरकत नाही !
म्हणूनच तुम्हाला रोज अर्ध्या तासाची सवलत देतो !
दीपाला काहीच कळेना बॉस असे का बोलतो ??
ती अजिजिनी म्हणाली, सर!!! ऊद्या पासून मी अगदी वेळेवर येते. पण please मला नोकरी वरून काढू नका !
सर मी तुमच्या पाया पडते !
मला कामाची खूप गरज आहे!
नाहीतर !!!
नाहीतर काय दीपा?
नाहीतर माझी आई, औषधीविना मरून जाईल. तिचा मी आणि माझा ती एकमेव आधार आहे हो!
दीपा हमसून हमसून रडू लागली.
बॉस ने तिला बसायला सांगितले ,पाणी दिले. बेल वाजवली, श्याम केबिन मध्ये आला. श्याम एक कप अद्रक घालून कडक चहा सांग. दीपा मॅडम साठी.
श्याम समजून चुकला, सर नक्कीच आता दीपा ताई साठी काही तरी करणार.
दीपा पाणी घ्या !
शांत व्हा आधी !
हे medicleam चे फॉर्म.
यात तुमचे आणि तुमच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीचे नाव घाला . तुम्ही सही करा आणि फॉर्म सबमिट करा. ही नविन पॉलिसी आहे. यानंतर एक दिवस जरी तुम्ही किंवा तुमच्यावर अवलंबून असलेले कुणी ,कुठे admit झालात तर तुमचे सगळे पैसे यातून भरले जातील. आजच मी आपल्या सगळ्या स्टाफला ही दिवाळी गिफ्ट देणार आहे. यावर्षी बोनस कमी देईन. पण हे खूप गरजेचे आहे.
धन्यवाद सर !
चहा आला!
दीपा !
चहा घ्या !
आणि हो !
तुमच्या आई ! उर्फ सासुबाई आजारी आहेत. तेव्हा तुम्ही त्यांना बरे वाटे पर्यंत रोज अर्धा तास उशिरा या!!!
चालेल मला !
दीपा समजून चुकली, श्याम दादाला सरांनीच तिच्या कडे मुद्दाम पाठवले असणार. सहा महिन्यात कधीच श्याम दादा घरी आले नाही.
नेमके कालच का?
त्यात सर विचारत होते !
घरी काही प्रोब्लेम आहे का?
विचाराच्या तंद्रीतून चहा घेऊन बाहेर आली.
श्याम तिच्याकडे बघून फक्त हसला.
ती श्याम जवळ आली. श्याम दादा!
तुम्हाला काय वाटते ?
कशा बद्दल ?
त्याच्या बद्दल ?
श्याम म्हणाला !
दीपा ताई तो आहे !
नक्की आहे !
तुमच्यासाठी आपल्या साहेबांच्या रुपात !
होय श्याम दादा !
तो आहे, तुमच्या सारख्या प्रत्येक माणसाच्या रुपात !
आपल्या बॉस च्या रुपात !
आधारासाठी माझ्या सासूबाईंच्या रुपात!
देवा असाच कोणाच्या ना कोणाच्या रुपात उभा राहा !
स्वामी समर्थ यांचे वाक्य आठवले !
" भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे."
दीपा गोड हसली.
मनातल्या मनात पुटपुटत होती.
"तो आहे."
माझ्या "काव्यप्रभा" पेज वरून....
©️®️ सौ. प्रभा कृष्णा निपाणे कल्याण.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा