मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५

1733. तिची निवड

      सोनाली सारख्या गोड मुलीला गोलू हे नाव कसं पडलं कोणजाणे.. पण ज्या मोजक्या मंडळीना तिला गोलू हाक मारायचा अधिकार आहे त्यात आम्ही दोघे येतो.ती आमची लाडकी आहे म्हणून सांगत नाही, पण आमची गोलू खरच गोड आहे, उमाच्या शब्दात सूंदर आहे जरा तोंडावर ताबा ठेवला तर तिच्यात अजूनही फरक पडेल पण तसा फरक पडण्याची सध्या तरी चिन्ह दिसत नाही. कारण एकटी उमा बोलून बोलून किती बोलणार? तिच्या घरी तिचे पप्पा जी बोलतील ती पूर्व दिशा धरली जाते पण ते घरी असतात कुठे? आजी आहे जी गोलूला सकाळी नऊ वाजता सुद्धा उठवताना तिच्या अंगावर अजून एक चादर घालते. अजूनही ती महतप्रयासाने उठल्यावर तिला भिजवलेले बदाम खायला घालते. पप्पाना आपल्या बिझनेस मधून डोकं वर काढायला वेळ नाही. याचा अर्थ त्याना आपल्या गोलूची काळजी नाही असं नाही. पण तिच्या भविष्याचा विचार त्यानी आधीच करून ठेवलाय. त्यांच्या तोलामोलाच्या घराण्यात प्रताप धारगळकरशी तिचं लग्न पक्कं ठरवलय.हे गोलूला माहीत नाही असं नाही. पण वेळ आली की बघू असा गोलूचा संथ अँटिट्युड आहे. उगाच अत्ता पासून कशाला पप्पांसारख्या हटवादी माणसाशी दोन हात करा? असा तिचा सवाल आहे.
     उमाला म्हणूनच तिची काळजी वाटते. कारण सिद्धार्थ तळपदे तिला खूप खूप आवडतो हे त्याला सोडून आम्हा सगळ्याना माहीत आहे. आणि सिद्धार्थ सारखा सामन्य घरातला मुलगा तिच्या पप्पाना फुटी आँख भावणार नाही याची ती सोडून आम्हाला कल्प्ना आहे. म्हणूनच सिद्धार्थ तिला भाव देत नाही. ज्या गावाला जायचंच नाही त्या गावचा रस्ता विचारयचाच कशाला ? या मताचा तो आहे आणि आपल्या मतावर ठाम आहे. त्याच्या मते गोलूम्ह्णजे एका श्रीमंत घरातली लाडावलेली सुस्तावलेली गब्दुल मांजर आहे. आणि अशी मुलगी आपल्याला परवडणार नाही. सिद्धार्थ मुळातच जरा गंभीर कणखर मुलगा आहे त्याच्या वर लहानपणापासूनच जबाबदारीचं जोखड आहे आणि त्याची त्या बद्दल काही तक्रार नाही. उलट त्याला आपल्या माणसांबद्दल प्रचंड आत्मियता आहे. ज्याला तो आपला मानतो त्याची जबाब्दारी तो स्विकारतो. म्हणूनच गोलू सारख्या लाडावलेल्या जडावलेल्या मुलीला आपली म्हणून त्याला नं झेपणारी जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यायची नाही असं तो वारंवार म्हणून स्वता:ला बजावतो. पण खरं सांगू त्याला सुद्धा आमची गोलू खूप खूप म्हणजे खूप आवडते.पण ती समोर आल्यावर त्याला काय होतं माहीत नाही तिला तो मांजर म्हणत असला तरी तो कायम बोक्यासारखा तिच्यावर फिसकारत असतो. या उलट धारगळकरांचा प्रताप. आपल्याला लग्न या मुलीशी करायचय म्हंटल्यावर तो अत्तापासूनच गोलूला फुलासारखं जपायचा सराव करायला लागला.
    प्रताप तसा हार्मलेस आहे, साधासरळ आहे.तो ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलाय. आयता हातात आलेला घरचा बिझनेस गोलूशी लग्न झाल्यावर विनासायास आणखी वि्स्तारणार असेल तर कोण कशाला हरकत घेईल आणि प्रताप सारखा मुलगा तर नाहीच घेणार. गोलूला हाच प्रश्न पडला की हा माझी इतकी मर्जी सांभाळायला धडपडत असताना मी त्या सिद्धार्थ साठी का व्याकूळ होते? जो सतत मला हडत हुडूत करतो, मला भाव देत नाही... माझा पाण उतारा करण्याची एक संधी सोडत नाही. घराला गरज म्हणून जेंव्हा उमाने गायनाचे क्लासेस सूरू केले तेंव्हा ही गोलू गाणं शिकायला म्हणून आमच्याकडे आली आणि तेंव्हा सिद्धार्थ तबल्याची साथ करायला म्हणून यायचा.  तेंव्हा गोलूचा आवाज सूंदर उगीच तुलना करत नाही पण साधारण माणिक बाईंच्या गाण्याची आठवण यावी त्या धाटणीचा. तिच्या पप्पाना हिचं गाणं बजावणं मान्य नव्हतं पण आजीच्या हट्टापुढेत्यांचं तेंव्हा काही चाललं नाही. पण कोणतीही गोष्ट गांभिर्याने करायचा तिचा स्वभाव नाही 
      त्यात ते गाणं अधांतरीच राहिलं पण आमच्याशी असलेला रुणानुबंध अबाधीत राहिला शिवाय दोघं त्यांच्या नकळत एकमेकांसाठी या घराला धरून राहिले. हा सुप्त हेतू त्या दोघांच्याही लक्षात आला नाही. पप्पांच्या आँफीसमधल्या संगणकांची मरम्मत सिद्धार्थच्या फर्म तर्फेच होत असायची पण पप्पाना हाँजी हाँजी करणारे नमुने जमवायची सवय त्याना आमचा बाणेदार सिद्धार्थ तळपदे  कसा परवडणार? तो आमच्याकडे येतो म्हंटल्यावर त्यानी गोलूला आमच्या घरी येण्यावर रोक लावली होती. पण त्याना घोळात घेऊन गोलू आमच्याकडे यायचीच. सिद्धार्थला तिचा हाच स्वभाव आवडत नाही म्हणजे तेंव्हा आवडायचा नाही. बिझनेसमनची मुलगी ती अशीच डिप्लोमँटीक वागणार असं तो तिरसटून म्हणायचा पण जेंव्हा घरात प्रतापशी साखरपुड्याची चर्चा रंगायला लागली तशी गोलू अस्वस्थ झाली. काय तो निर्णय घेणं गरजेचं होतं सिद्धार्थ त्याविषयी बोलायला तयार नव्हता तिच्या हट्टी अहंकारी बापाशी दोन हात करण्यात मला माझी जिंदगानी वाया घालवायची नाही. माझ्यावर भावंडांची जबाबदारी आहे. तिला काय? फक्त या घरातून त्या घरात जायचय शेवटी तिच्यावर हुकुमत तिच्या पप्पांचीच राहणार. मान राखणं वेगळं आणि मर्जी राखणं वेगळं जे प्रतापला जमेल ते मला जमणार नाही. जी तोफ डागायची ती सिद्धार्थने डागली पण यावेळी दोघे भांडले नाहीत. तू तू मैं मैं झाली नाही. कारण सोनाली अंतर्मूख झाली विचार करायला लागली आणि शेवटी तिने निर्णय घेतला तिने पप्पाना सरळ सांगितलं प्रताप चांगला मुलगा आहे पण नवरा म्हणून मी त्याचा विचार करू शकत नाही. पप्पा म्हणाले तू विचार करूच नकोस तुझी आईपण फार विचार करायची म्हणून आमचं पटलं नाही. हे वैभव सोडून गेली आता काय प्राध्यापकी करत दिवस कंठतीये. आईची आठवण झाल्यावर तर गोलू अधिकच व्याकूळ झाली. निर्णय घ्यायचा हाच क्षण होता हीच वेळ होती पण तिला सिद्धार्थचा सपोर्ट नव्हता, आम्हीही काही करू शकत नव्हतो पण उमाने तिच्या आईची मदत घेतली माधवी सिद्धर्थला भेटायला तयार झाली भेटली पण तो तेच म्हणाला जाणीव नावाची गोष्ट असते जी बाहेरून लादता येत नाही इंजिक्षनने मनात भरता येत नाही. तुमच्या मुलीला सुखाची स्वय आहे. तिला सुखात राहुदे. माझ्याशी लग्न म्हणजे पावलो पावली तडजोड आहे जे तुमच्या मुलीला जड जाईल तिच्या सूखासाठीच मी तिला नाकारतोय
    प्रतापने पण तिला समजावलं अगं हळू हळू तुला माझी सवय होईल. आणि सवयीने तू सूखात राहयला शिकशील. शेवटी लाईफचा गेम हा सेफलीच खेळावा लागतो. तिच्या साखरपुड्याची तारिख ठरल्यावर सिद्धार्थ बाहेरगावी निघून गेला म्हणजे पप्पानीच तशी योजना आखली आणि सिद्धार्थ त्या नुसार दूर गेला. गोलू अगदी एकटी पडली. पप्पा तर इरेस पडल्यासारखे वागत होते आणि थोडं फिल्मी वाटेल पण आमच्या गोलूने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला ती असं काही पाऊल उचलेल हे आम्हाला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं सकाळी सकाळी आजीचा फोन आला आम्ही दोघे धडपडत गोलूच्या टोलेजंग घरात गेलो तेंव्हा तिला हाँस्पिटल मधे हलवायची गडबड चालू होती. झोपेच्या गोळ्या घेऊन गोलू मोकळी झाली होती पण तिचा जिव मोकळा होत नव्हता. पप्पा हताश झाले होते. गोलूला तिच्या मामाच्याच हाँस्पिटल मधे हलवलं बातमी बाहेर पसरू नये म्हणून खबरदारी घेतली जात होती पप्पा हताश झाले होते प्रताप अपराध्यासारखा उभा होता. हीची आई घर सोडून गेली पण ही तर जगच सोडून जायला निघाली. अरे इतका का मी जल्लाद आहे? आपल्या मुलीला सुखाच्या राशीवर बघायचं स्वप्न पाहिलं तर काय बाप म्हणून मी चुक आहे का? असं काय काय पप्पा हातवारे करत बोलत होते मला वाटत आपल्या मुलीवर आपलं किती किती निरातिशय प्रेम आहे याची त्याना पहिल्यांदीच जाणीव झाली होती. गोलू सगळ्या रागा लोभाच्या पलिकडे गेली होती तिला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू होते डाँक्टरमामानी चोवीस तासांची मुदत दिली होती आम्ही दोघे रामरक्षा म्हणत तिथे बसून होतो ज्या ज्या मंडळीना बातमी कळ्त होती ती ती पप्पांभोवती जमत होती आणि पप्पाना गोलूशिवाय कोणीच नको होतं
     परमेश्वराची कृपा की गोलू वाचली फक्त एकच फार वाईट झालं. गोलूचे डॊळे गेले त्या जहाल गोळ्यानी गोलूचे प्राण दृष्टीच्या बदल्यात परत केले होते. आपण आंधळे झालोय हे तिला सांगितलं नव्हतं कोणी सांगायचं कसं सांगायचं हेच कळत नव्हतं ती शुद्धीवर आली तशी तिला साधारण कल्पना आली असावी पण ती कोणाशीच बोलत नव्हती. डाँक्टर प्रतापला म्हणाले तुलाच जास्त समजून घ्यावं लागणार आहे. तो म्हणाला मी कशाला? आम्ही म्हणालो अरे लग्नानंतर तुलाच तिला सांभाळायचय. जपायचय. तो भेदरून म्हणाला माफ करा पण भावनेच्या भरात नको तो निर्णय मी घेणार नाही. एका अंधळ्या मुलीबरोबर संसार करायची माझी तयारी नाही. आम्ही म्हणालो अरे तुझं प्रेम आहे ना तिच्यावर? तो म्हणाला प्रेम आहे म्हणून कायएका अंधळ्या मुलीचा मी स्विकार करू? 
प्रतापला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आमचा हिरो तणतणत हाँस्पिटल मधे आला सगळे गोलूशी गोड गोड बोलत असताना कंटिन्युटी सांभाळत तो गोलूवर खेकसला. " हा काय मुर्खपणा आहे. बापाला ठणकाऊन सांगता येत नाही म्हणून काय आत्महत्या करायची? एव्हढा जिववर आलाय? तुला काय वाटलं तू माझ्यासाठी जीव दिल्याचं कळल्यावर मी तुझी पूजा करेन? आयुष्य कधीच कोणासाठी अडून राहत नाही. गोलू शांतपणे म्हणाली पण माझं आयुष्यच काय माझा प्रत्येक क्षण तुझ्याशिवाय अडतोय सिद्धार्थ. मेले असते तर सगळेच प्रश्न सुटले असते आता नव्याने विचार करायला हवा. 
     आता नव्याने विचार काय करायचा? गोलू म्हणाली माझे डोळे गेले आता या अवस्थेत मी तुझी आणखी जबाबदारी वाढवणार नाही, प्रताप अत्ता नाही म्हणाला पण तू तर कधीच हो म्हणाला नव्हतास. व्याकूळ होत सिद्धार्थ म्हणाला गोलू तुला खरच काही कळत नाही. एका ’हो” वर सगळं तोलून धरत होतीस?  आपण खूप भांडत होतो हे मान्य्पण खरं सांग माझ्या मनातलं गूज तुला कधीच जाणवलं नाही?  आयुष्यात पहिल्यांदी तो तिला गोलू म्हणाला होता.गोलू स्वत:ला सावरू शकली नाही ती रडायला लागली तो मायेनं तिला जवळ घेत म्हणाला अगं कशाला रडतेस? डोळे गेले वाईट झालं पण आता ती फार मोठी गोष्ट नाही माझे डॊळे आहेत ना..तू माझ्या डोळ्यानी जगाकडॆ बघ तसं ही दाखवल्याशिवाय तुला काही दिसायचच नाही कारण कधी लक्षपुर्वक काही करायची सवयच नाही. आपल्या वेडेपणाची शिक्षा मिळाली असं समज आणि जे आहे ते मान्य करून टाक.  जे आहे ते मान्य करून टाक म्हणजे? पप्पा कडाडले. मझी तरणीताठी पोर आंधळी झालिये..
सिद्धार्थ शांतपणे म्हणाला हो ! पण ती जिवंत आहे तुमच्या समोर आहे हे काय कमी आहे? पण ती पुढचं आयुष्य कसं काढेल? तू करशील तिच्याशी लग्न? सिद्धार्थ म्हणाला त्यासाठीच तर धावत आलो मी, माझ्याशिवाय तुमच्या पोरीला कोण समजून घेऊ शकतं? काळजी करू नका मी जबाबदारीला भीत नाही आणि गोलू माझी नुसती जबाबदारी नाही माझं प्रेम आहे. माझं पहिलं प्रेम. सिद्धार्थचं बोलणं ऐकून पप्पाना अश्रू आवरता आले नाहीत. बेटा मी चुकलो सवयीने तुझं सूख कशात आहे हे सुद्धा मीच ठरवायला गेलो. या पोराने माझे डोळे उघडले मला क्षमा कर
     पप्पानी जोडलेले हात हातात घेत गोलू म्हणाली, पप्पा आधी तुम्ही मला क्षमा करा. मी तुम्हाला रडवलं आधी आत्मह्त्या केल्याचं नाटक केलं आणि मग मामाच्या मदतीने डॊळे गेल्याचं नाटक केलं. हा प्लँन अचानक सुचला आणि मामानी नं भिता मला साथ दिली आजीचाही सहभाग होताच. मला माहीत होतं माझी निवड कशी योग्य आहे हे मी दहा पानी निबंध लिहूनही तुम्हला कळलं नसतं. ते याने इथे येऊन दोन मिनिटात सिद्ध केलं. कधी कधी खूप खूप आनंद झाला तरी बोलता येत नाही. तसं झालं वातावरणात एक तृप्तीची शांतता पसरली मग कोण काय म्हणालं कोण काय म्हणालं  हे सांगत बसत नाही. पण जे झालं ते परमेश्वर कृपेने छानच झालं.

चंद्रशेखर गोखले 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...