शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

1664. शिक्षा

    मी कोकण रेल्वेने प्रवास करत होते. मुद्दाम चार दिवस रजा घेतली होती. मुलीला सोबत आणले नव्हते, तिला तिच्या काकूच्या घरी सोडून आले होते. मी अचानक रजा का घेतली हे सुरजला समजत नव्हते.तो खोदून खोदून विचारत राहिला, मी उडवाउडवी करत राहिले.
"आईला भेटून येते.. बाबा पण फोन करत असतात, त्त्यांची तब्येत बरी नसते बऱ्याचदा, कुडाळला डॉक्टरांकडे घेऊन जाते.. आणि आराम करते चार दिवस पावसाकडे पहात.
नवऱ्याला आश्यर्य वाटतं होतं पण त्याच्या स्वभावाप्रमाणे तो गप्प बसला.
का चालले आहे मी गावी? हल्ली सतत स्वप्न पडते आणि आपली शाळा दिसत रहाते. शाळेच्या ग्राउंडजवळील मंदिर.. त्या देवाला नमस्कार करणारी नववी मधील मी आणि अचानक मागून पुढे शरीर स्पर्श करणारा हात आणि ओंगाळलेले हसू.. प्रतिकार करून पळून जाणारी मी.
एवढी वर्षे झाली तरी तो स्पर्श आपण विसरू शकलो नाही? ते घाणेरडे हास्य मनातून जात नाही? एका शिक्षकाकडून विध्यर्थ्याला अशी अपेक्षा नसते, तो धक्का होता म्हणून?
काय हवं होतं मला? शाळा सुटून पंधरा वर्षे झाली. मुंबईला येऊन आठ वर्षे झाली, लग्न करून सुरजची पत्नी झाले, त्याला पाच वर्षे झाली आणि राधिका पण चार वर्षांची झाली. तरी तो दिवस मनातून जात नाही.
मला त्या शिक्षकाला शिक्षा करता आली नाही,नाईकबाई आमच्या क्लासटीचर.. त्याना मी कल्पना दिली, बाई घाबरल्या आणि त्या हेडमास्तरकडे घेऊन गेल्या.
हेडमास्तरनी त्या शिक्षकाला बोलावले आणि जाब विचारला. तो शिक्षक सांगू लागला "तसा हेतू नव्हता माझा.. मी तिला हाका मारत होतो, तिचे लक्ष नव्हते, म्हणून मी तिच्या खादयाला धरून माझ्याकडे वळवत होतो.. पण ही ओरडली आणि पळाली.
मी ओरडून सांगितले "हे खोटे आहे, हे शिक्षक माझ्या मागूनपुढे हात घालत होते, मी ओळखले आणि ओरडले.
हेडमास्तरनी त्या शिक्षकाला वॉर्निंग दिली आणि विषय संपवला.
मी दुखावले गेले. त्या शिक्षकाला नोकरीवरून काढून टाकायला हवे होते असे मला वाटतं होते. मी नाईकबाईंना तसे सांगितले. बाईंनी मला समजावले "असे काढून टाकणे सोपे नसते.. पुरावे लागतात आणि ते देणे स्त्रीला कठीण असते, तू त्या देवळाकडे एकटी जाऊ नकोस.. कुणाला तरी सोबत घेऊन जा.
गेली सतरा वर्षे ही ठुसठुसणारी जखम आहे,ज्या गुरुजनांना आपण देवासमान मानतो, त्यानी असे करावे? त्या शिक्षकाचे हे चाळे सुरूच होते बहुतेक, कारण तीन वर्षांपूर्वी आई मला फोनवर म्हणालेली 'दहावीतील एका विद्यार्थिनीने त्याच शिक्षकाबद्दल आपल्या घरी तक्रार केलेली, तो शिक्षक त्या मुलीला वाईट हेतूने जवळ घेऊ पहात होता. त्या मुलीचे पालक शाळेत तक्रार घेऊन आले आणि मग अनेक पालक त्या शिक्षकाबद्दल बोलू लागले. शेवटी पालक शाळेवर मोर्चा घेऊन आले '.
आई म्हणालेली संस्थेने त्या शिक्षकाला निलंबित केले.
केवढा आनंद झाला आपल्याला. तीन वर्षे मी सुखाने झोपले.
माझी राधिका मोठी होतं होती. मी माझा संसार, नोकरी, नवरा आणि राधिका यात मग्न होते. आईबाबांची विचारपूस असतेच रोज.
हळूहळू गावातील शाळेतील तो प्रसंग मी विसरत होते. पण पंधरा दिवसापूर्वी आई फोनवर बोलली "अग, तो शिक्षक परत शाळेत हजर झाला.
मी ओरडले "का आणि कसा? संस्थेने त्याला निलंबित केलेले ना?
"हो पण,या शिक्षकांची संघटना असते ना, हा शिक्षक त्या संघटनेचा सेक्रेटरी.. ही संघटना कोर्टात गेली, त्या शिक्षकावर अन्याय झालाय म्हणून... कोर्टात केस चालली दोन वर्षे.. ज्या मुलीने तक्रार दिलेली.. ती पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला गेली, ती मुख्य पुरावा होती.. ती केस साठी हजरच राहिली नाही., सबब कोर्टाने त्या शिक्षकाला शाळेत हजर करून घेण्याचा आदेश दिला आणि तीन वर्षाचा पगार देण्याचा आदेश दिला, त्या आदेशानुसार तो शिक्षक शाळेत हजर झाला '.
आईने ही बातमी सांगितली आणि परत मी अस्वस्थ झाले. शिक्षक पेशाला कलंक असलेल्या या शिक्षकाला कसलीच शिक्षा होत नाही? आता तो सोकावलाय.. कोर्टाने  त्याच्यावरील आरोप मान्य केले नाहीत? मग याला शिक्षा कोण करणार?
गाडी कुडाळच्या दिशेने धावत होती... मी निघाले मग चार दिवस रजा घेऊन.. काय करणार होते मी?
मी घरी आले, आईबाबा वाटच पहात होते.
"अग अचानक निघालीस? राधाला पण नाही आणलंस?
"नाही, तिची शाळा आहे ना.. तिला तिच्या काकूकडे सोडून आले, मेघना पोचवणार तिला शाळेत.
"सहज आलीस ना?
"हो हो बाबा, तुम्हाला पहायला आले.डॉक्टरकडे जायचं आहे ना.. परवा जाऊ. उद्या शाळेत जाणार आहे.
"शाळेत काय काम काढलीस?
"नाईकबाई मुख्यधायपिका झाल्यात ना.. माझ्या क्लासटीचर ना त्या.. नववी दहावितल्या, त्यानी बोलवलंय शाळेत.
"मग जा.. गरम पाणी काढलंय.. आंघोळ करून घे.
आईच्या शेजारी रात्री झोपले. झोपेत पुन्हा पुन्हा पंधरा वर्षांपूर्वीचा प्रसंग येत राहिला.
सकाळी उठून आंघोळ करून शाळेत गेले. नाईकबाई मुख्यधायपिका असल्याचे कळले होते, त्यामुळे सरळ त्यान्च्या ऑफिसकडे गेले. मी दारावर टकटक केली, बाईंनी मला पाहिले आणि ओळखले पण 
"अग माधवी ना..ये ये.. मुंबईला असतेस ना.. तुझी आई भेटते बाजारात.. तुझी आणि अश्विनची चौकशी करत असते मी.
मी बाईंच्या पायाला हात लाऊन नमस्कार केला.
"होय बाई, आई सांगत असते तुमच्याबद्दल, तुम्ही हेडमास्तर झाल्याचे तिनेच सांगितले.
"हो, यां वर्षी मी निवृत्त होणार.. त्या आधीची ही दोन वर्षे हेड मास्तरची. मुलीला नाही आणलंस? तिला आणायचं ना आपली शाळा दाखवायला.
'तिला मुंबईतच ठेवलंय.. शाळा आहे आणि दुसरं म्हणजे इथे आली की परत जायला बघत नाही.
"हो, तेही खरच, बोल.. सहज आलेलीस ना.
"होय हो, म्हंटल तुमचा अभिनंदन करूया. बाई ते शिक्षक, संस्थेने निलंबन केलेले.. परत शाळेत आलेच ना?
"हो ग, आपली कोर्ट म्हणजे काय? पुरावा पाहिजे म्हणे..अशा गोष्टीना पुरावा कसा मिळेल,? तुला पण या शिक्षकाने त्रास दिलेला.. माझ्या लक्षात आहे ते.. तू रडत रडत तक्रार घेऊन आलेलीस. माझ्या लक्षात आहे ते.. मी आणि त्या वेळच्या हेडमास्तर नी तो विषय वाढवला नाही.. मला आज वाटते माझी चूकच झाली ती.. त्याच वेळी सर्व मुलांसमोर त्याला उघडा करायला हवे होते.. त्याच्यावर काही ऍक्शन घेतली नाही, म्हणून तो सोकावला.. परत परत किती मुलींना त्रास दिला असेल कोणजाणे.. बहुतेक मुली गप्प रहातात, त्याचा फायदा तो घेत राहिला.
"बाई, ते शिक्षक याच शाळेत आहेत ना? तीन वर्षे निलंबित झाले याची त्याना काही लाजशरम?
"कसलीही लाजशरम नाही त्याला.. त्याची संघटना पाठीशी आहे त्याच्या.. निर्लज्जसारखा शाळेत फिरतो.मला वाईट वाटते माधवी, एवढं करूनही याच्या अंगाला कोणी बोट लावलेलं नाही.
"बाई, तुम्ही बोलवता त्या शिक्षकांना, बघू मला ओळखतात का ते?
"तुला त्याला बघायची इच्छा आहे? कमाल आहे... मी बोलवते.
बाईंनी प्यूनला सांगून त्या शिक्षकाला बोलावणे पाठवले. 
त्या खोलीत एक मिनिट शांतता पसरली, फक्त पंख्याचा आवाज येत होता.
एवढ्यात खोलीचा दरवाजा उघडला. नाईकबाई त्या सरांना म्हणाल्या 
"ओळखता या बाईंना?
त्या सरांनी माझ्याकडे पाहिलं आणि ते हसले.
"ही माधवी न्हवे.. आता मोठी झाली.
मी चमकून पाहिलं, ते निर्लज्ज हसू.. नववीत डोक्यात गेलं होतं आणि गेली कित्येक वर्षे स्वप्नात येत होतं.. ज्या हसण्याचा मी तिटकारा केला होता आणि माझा पिच्छा पुरवला होता.... मी अवतीभवती पाहिलं.. टेबलाखाली स्टीलचा पाण्याने भरलेला जार होता.. तो मी पटकन उचलला आणि त्याच्या डोक्यात घातला..
"धाड.. धाड.. धाड.
एक वेळा, दोन वेळा, तीन वेळा.
बाई मोठयाने ओरडत होत्या,"
"अग, काय हे? काय हे?
बाहेरचा प्यून धावत आला आणि त्याने माझ्या हातातून जार काढून घेतला.
बाई थरथरत होत्या.
पण मी शांत होते. तो शिक्षक डोकयातून आलेले रक्त पुसत पुसत उठत होता.
"एवढ्या गोष्टी करूनही कोणी कसलीच शिक्षा केली नव्हती ना.. शेवटी मी शिक्षा केली... जा कुठे तो तक्रार घेऊन माझी.
तो शिक्षक रुमाल डोकयावर धरून पळून गेला.
बाई घाबरल्या होत्या. मी त्याना ग्लासातून पाणी दिल.
"अग, त्याने कुठे तक्रार केली तर..
"तो बिल्कुल तक्रार करणार नाही.. कारण तीन वर्षे निलंबित झालेला शिक्षक आहे तो. तो शाळेत हजर झाला पण तो काय आहे हे सर्वाना माहित आहे.
बाई, येते मी. परवा मुंबईस निघेन.
परत एकदा बाईंना नमस्कार केला आणि मी बाहेर पडले.
त्या दिवसापासून मला शांत झोप लागू लागली.

प्रदीप केळुस्कर 9307521152 / 9422381299

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...