शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

1724. ओळख

दारावरची बेल वाजली. समर्थ काका, काकू दुपारी सर्व आवरून रोजच्या प्रमाणे वामकुक्षी घेत होते.
"इतक्या उन्हात कोण आले असावे?"  
काका काकूंना म्हणाले. 
"मला कसे माहिती असणार?"  त्यासाठी दार उघडून बघावे लागेल ना! 
थांबा तुम्ही, मी बघते.
     नीला तुझी सर्वांना मदत करायची सवय कधी कधी खूप त्रासदायक ठरते. तेवढ्यात पुन्हा बेल वाजली.      कुणीतरी आले असेल. म्हणेल 
"काकू मला जरा बाहेर जायचे आहे, माझ्या मुलीला थोडावेळ तुमच्याकडे ठेऊन जाऊ का?"
 तू आपली हो म्हणणार खात्रीच त्यांना.
 "आता दार उघडू की तुमचं भाषण ऐकू."  काकू हसतच म्हणाल्या. 
 नाही नाही लवकर दार उघड. जाऊ द्या हो तसेही मला झोप फार कमी, दुपारी फक्त वामकुक्षी असते. नोकरी मुळे दुपारी झोपायची सवय नाही ना ! आता कॉलनीत सगळ्यांना माहिती मला लहान मुलांचा लळा आहे म्हणून ठेवतात. त्यांना विश्वास आहे, काकू चांगले सांभाळणार म्हणून. 
आपले नातवंड आपल्या जवळ असते तर नाही का सांभाळले असते?
तेवढ्यात पुन्हा बेल वाजली. अग बाई बघते कोण ते?
जा! जा! लवकर उघड. अर्जंट असेल ना त्यांना म्हणून बेल वर बेल वाजवली.
 नीला काकूंनी दार उघडले. एक पंचवीस सव्वीस वर्षाची मुलगी दारात उभी. हातात एक बाळ.
अगदी तान्हं वाटत होत.
कोण पाहिजे तुम्हाला?
"नीला समर्थ तुम्हीच ना?"
हो मीच. 
काय काम आहे?
काकू माझ्या नवऱ्याचा अपघात झाला. आत्ता त्यांच्या मोबाईल वरून पोलिसांनी फोन केला. काकू , इतके लहान बाळ घेऊन मी धावपळ नाही करू शकणार? शेजारच्या काकूंनी तुमचे नाव सांगितले आणि पत्ता पण. 
कोण काकु? 
अहो आम्ही तीनच दिवस झाले इथे राहायला आलो. मला तर त्यांचे आडनाव पण माहिती नाही. फोन आला तशी त्यांच्याकडे पळत गेले. तर त्या म्हणाल्या मला चारच्या गाडीने गावी जायचे आहे. मग त्यांनी तुमचे नाव आणि पत्ता सांगितला. म्हणून इथे आले.
बर! बर!
 जा तू. 
कोणत्या  हॉस्पिटलला ऍडमिट आहे तुझा नवरा?
काकू गडबडीत मी नाव विसरले. मोबाईल मध्ये पत्ता पाठवला. थांबा बघून सांगते.  तिने पर्स शोधली. काकू गडबडीत मोबाईल घरीच विसरले.
ठीक आहे, दे बाळाला! 
जा तू! 
आणि लवकर ये ग!
हो काकू!. 
असे म्हणून तिने बाळाला काकूंच्या स्वाधीन केले आणि ती वाऱ्याच्या वेगाने निघून गेली.
  नीला काकू बाळाला घेऊन आत गेल्या. काकांच्या झोपेला व्यत्यय नको म्हणून हळूच त्याला बेडवर टाकले. AC ने रुम थंडगार झाली होती तो बंद केला. बाळाच्या अंगावर पांघरून घातल आणि त्या बाळा शेजारी त्याला थोपटत बसल्या..
 AC बंद केल्याबरोबर काका उठले. डोळे उघडुन बघतात, बाजूला अगदी तांन्ह बाळ.
"नीला हे कोणाचं बाळ? इतकं लहान?"
अहो याच्या बाबांचा म्हणे अपघात झाला. इतक्या लहान बाळाला घेऊन कुठे फिरणार म्हणून तिच्या शेजारणींने म्हणे माझं नाव आणि पत्ता सांगितला. 
अरे व्वा! हे बर आहे. तिने स्वतः मदत केली नाही पण तुझा पत्ता दिला. 
अहो नाही, त्यांची म्हणे चारची ट्रेन आहे. गावी चाललेत म्हणे.
कुठे राहते ह्या बाळाची आई?
अहो गडबडीत मी हे तर विसरूनच गेले.
बर फोन नंबर तरी घेतला का?
नाही हो ! गडबडीत काही सुचलेच नाही.
बर तिचा चेहरा तरी आठवतो का?
 ती तर तोंडाला स्कार्फ बांधून होती. वरून डोळ्याला गॉगल.
किती भोळी ग नीला तू?
" समजा ह्या बाळाची आई त्याला घ्यायला आलीच नाही तर?"
"तिला हे बाळ नकोच असेल तर?"
"अहो काही काय बोलता?"
"का नाही येणार ती?"
अहो आपल लेकरू असच कोणाच्या स्वाधीन एक आई करेल का?
    तिच्या हालचाली वरून तरी ती खूप घाबरलेली दिसत होती. आणि बाळाला माझ्या स्वाधीन करतांना तिचं काळीज तुटत होत हो. अगदी नाईलाजाने ठेवत आहे असे वाटत होते. थोड्याच वेळात बाळ उठल. नीला काकू चहा करता करता बाळाच्या रडण्याने बेडरूम मध्ये आल्या.  त्याला आपल्या खांद्यावर धरून दूध गरम करायला घेतल. त्या बाळाच्या आईने दिलेली पिशवी हुडकली.
     अग बाई ! याच्या आईने बॉटल दिलीच नाही वाटते. चल मण्या आपण वाटी चमच्याने दूध पिऊ या असे म्हणत नीला काकू त्या बाळाला हॉल मध्ये घेऊन दूध पाजत बसल्या. ते बाळ सुध्दा शहाण्या बाळा सारखे चमच्याने दूध पीत होते.
अरे ही मुलगी का मुलगा काहीच माहिती नाही? 
डायपर काढून बघायला पाहिजे.
 त्यांनी  डायपर काढून पाहिले.
 अरे ही तर मुलगी आहे? 
 हे म्हणतात तसे हिच्या आईने मुलगी नको म्हणून तर तिला नाकारले नसेल ना? 
 का अनौरस संतती असेल ही?
पुढे अडचण नको म्हणून इथे आणून दिली ?
 शी! मी पण काय वेड्या सारखी विचार करते?
 येईल तिची आई. एक आई नाही आपल्या काळजाचा तुकडा असा टाकून देऊ  शकत.
 तेवढ्यात , नीला अग आज चहा मिळेल का? असे म्हणत हे हॉल मध्ये आले. 
 हो ठेवते. अहो ही उठली, रडत होती. तिला दूध पाजले. लबाड आहे ह!  बघा तुमच्याकडे कशी बघते? 
 आजोबा मला का घेत नाही जवळ असे म्हणत आहे.
 दे तिला माझ्याकडे आणि तू चहा ठेव. दोन तास झाले ना ग तिच्या आईला जाऊन. 
हो ना!
फोन नंबर तिने दिला नाही, तू घेतला नाही. 
 तिच्या नवऱ्याची तब्बेत कशी आहे हे ही कळायला मार्ग नाही. 
त्याचीच काळजी लागून राहिली मला पण.  बघता बघता संध्याकाळचे सात वाजले. सगुणा बाई पोळ्या करायला आल्या. हॉल मध्ये बाळ बघून, "काकू' हे इतकं तान्हं बाळ ठेऊन कोण बाहेर गेलं हो?"
 " बायकांना काही लाज शरम राहिलीच नाही वाटते" ,काकू सांभाळतात ना मग काय ठेवा काकु कडे?"  
"निदान त्या बाळाचे वय तरी बघायचे ना!"
 काकू तुम्ही पण ना! जरा कधीतरी नाही म्हणायला शिका बर.   
 सगुणा, मी तुझ्या काकूला तेच सांगत होतो.
 काकू, पण इतकं लहान बाळ कोणाचं हो! 
 अग ते तर तिलाही माहिती नाही.
 म्हणजे?
काकांनी दुपारी घडलेला किस्सा सांगितला.
काकू, मी आधी कपभर चहा करते आणि इतकं लहान बाळ कोणाचं चौकशी करून येते. आम्ही सगळ्या घरकाम करणाऱ्या बायका रोज एकत्र येत असतो. पाच सात मिनिट बोलून आपापल्या घराचा रस्ता धरतो.  आज मला पांडे काकूंकडे पाहुणे आलेत म्हणून उशीर झाला. सगुणा ने चहा घेतला.सगळ्या मैत्रिणीकडे चौकशी केली. कोणाकडे सुध्दा लहान बाळ नव्हते. मग सगळ्या जणी त्यांच्या आसपास कोणी तान्हं बाळ आहे का चौकशी करत होत्या. पण इतकं लहान बाळ कोणाच्याही आजूबाजूला नव्हतं. सगुणा घरी आली, काकू इतकं लहान बाळ जवळपास तरी कोणाकडेच नाही. काकू त्या बाईने विचारपूर्वक ते बाळ तुमच्या कडे आणून दिलं. मला नाही वाटत ती बाई परत येईल.
मी सुध्दा तेच बोलतोय सगुणा पण हिच्या लक्षात येतच नाही.
अग खरच तिच्या नवऱ्याचा अपघात झाला असेल. सिरियस असेल. येईल ती माझे मन सांगते.
सगुणाच्या पोळ्या झाल्या. काकू कुकर लावून जाते. तुम्ही बंद करा आणि काहीतरी भाजी करा. 
उशीर झाला, नाहीतर मीच करून दिली असते. घरी पोरं वाट पाहत असतात. 
जा अग ! करेन मी.
सगुणा गेली. काकू काका जेवले. बघता बघता दहा वाजले. बाळाच्या आईचा पत्ता नाही. आता काकूंना पण वाटायला लागले, या बाळाची आई काही येणार असे दिसत नाही. 
नीला, अग किती वाजले बघ? 
त्यांच्या आवाजाने काकू भानावर आला.
हो ना हो! 
मी पण तोच विचार करते.
आता काय करायचे हो?
मला तर वाटते पोलीस स्टेशनला जावून कंप्लेंट द्यायला पाहिजे.
घाई नको, तसेही बाळ चमच्याने दूध पिते. आज रात्रभर वाट बघू. उद्या सकाळी बघू काय करायचे ते.
ही पण झोपेला आली. अहो आपण पाळणा बांधू या का? नीरज लहान होता तेव्हा बांधला होता तसा. म्हणजे रात्री अपरात्री उठली तर हलवता येईल.
हो तसच करू. चल मदत कर जरा. नको ! थांबा ! मी शेजारच्या निलेशला बोलवून आणते.
 निलेशला पाळणा बांधता बांधता सगळा इतिहास सांगितला. त्यालाही आश्चर्य वाटले. इतक्या लहान बाळाला एक आई कसे काय असे दुसऱ्याकडे सुपूर्त करू शकते? नक्कीच काहीतरी गडबड आहे.  काका उद्या सकाळी पोलीस कंप्लेंट करून या.
 निलेश, ते बाळाला पण घेऊन जातील ना रे! हो, आणि त्याला अनाथालयात ठेवणार.
बाई ग ! "इतकं लहान बाळ कसं राहील रे !"
आपण त्यांना रिक्वेस्ट नाही करू शकत का? 
बाळाची आई मिळेपर्यंत बाळ आमच्या कडे राहील म्हणून.
नक्कीच करू शकतो. तिच्या वयाचा विचार करून ते तशी परवानगी सुध्दा देतील.
असच करू मग. 
 चला मन्या पाळण्यात झोपा. आणि आजी आजोबांना त्रास नाही द्यायचा बर का?
 गोड हसली, जणू म्हणाली "नाही देणार ह मी त्रास."
 निलेशने घरी जाऊन बायकोला सगळी हकीकत सांगितली. आणि शक्य तेवढी काका काकूंना मदत करायला सांगितली.  समर्थ काका काकू त्या  दोघांसाठी देवदूत होते.
     निलेश आणि निवेदिता यांनी लव्ह मॅरेज केले होते. त्यामुळे दोन्ही घरच्यांनी सबंध तोडून टाकले होते. अश्यातच निवेदिता गरोदर राहिली.  डिलिव्हरी च्या वेळी नीला काकूंनी पंधरा दिवस सुट्ट्या घेऊन निवेदिताची सुश्रुषा केली.  डिंकाचे लाडू सुध्दा नीला काकूंनी  तिला दोन महिने करून खाऊ घातले. एका आईचे प्रेम दिले त्यांनी निलेश आणि निवेदिताला. काकुंचे नातू परदेशात त्यामुळे नंदन वर त्यांची विशेष माया होती. सुट्टीच्या दिवशी दिवस दिवस भर तो काकूंकडे असायचा. काकूंच्या मदतीची सतत त्या दोघांना जाणीव असायची. निवेदिताने लवकर लवकर सगळे काम आवरले. नंदन शाळेत गेल्यावर काका काकुं सोबत पोलीस स्टेशनला गेली. काकूंनी पोलिसांना काल घडलेली घटना जशीच्या तशी सांगितली.  पोलिसांना कळून चुकले. कोणीतरी पाळत ठेवून आणि काकुं बद्दल माहिती काढून हा प्लॅन केला. साहेब इतकं लहान बाळ.  त्याची आई मिळेपर्यंत आम्ही या बाळाला आमच्या सोबत ठेऊ शकतो का?     तशी परवानगी आम्ही देत नाही. पण कधीकधी कायदा बाजूला ठेवून काही निर्णय घ्यावे लागतात. काकू तुम्ही ते बाळ तुमच्या जवळ ठेऊ शकता. पण बाळाची आई आली तर तुम्हाला ते तिला द्यावे लागेल.  चालेल, इतके लहान बाळ अनाथालयात द्यायला मन धजावत नाही. जवळ जवळ महिना झाला. बाळाच्या आईचा पत्ता नाही. आता पुढे काय हा प्रश्न सगळ्यांना पडला. परदेशातील मुले सुध्दा चिंतीत होती. आईने नवीनच व्याप मागे लावून घेतला असे त्यांना वाटत होते.
     एक दिवस नीला काकू निलेशला म्हणाल्या, निलेश ह्या बाळाची आई काही येत नाही. आणि ती जवळपास असेल तरीही तिला हे बाळ नको हे नक्की. आम्ही हे बाळ दत्तक घेतो. 
      काकू या वयात तुम्हाला इतक्या लहान बाळाचे करणे झेपेल का? अरे एक महिना झाला सांभाळतो आहेच ना.  आणि मी काही अजून म्हातारी झाली नाही. अरे त्या प्रवासाचा कंटाळा आला होता म्हणून दोघांनी निवृत्ती घेतली. 
हे मात्र अगदी खरे काकू.
आणि सगुणाला ठेवून घेऊ मदतीला. फार गुणी पोर आहे ती. 
खरच काकू, सगुणा बाई म्हणजे चोवीस कॅरेट पिवर सोनं... 
 काकू आपण पोलीस स्टेशनला जाऊन तशी रिक्वेस्ट करू. त्यांना सुध्दा काही प्रोब्लेम नसणार. एका अनाथ मुलाला चांगले घर मिळते. त्यात तुमच्याकडे पैश्याचा प्रोब्लेम नाही. फक्त वयाचा अडसर येऊ शकतो. त्यांनी परदेशातल्या आपल्या मुलाला, सुनेला तसेच मुलगी आणि जावई यांना मुलगी दत्तक घेण्याबद्दल सांगितले. आधी तर सगळ्यांनी नकारच दिला. पण काकू आपल्या निर्णयावर ठाम होत्या. तुम्ही दोघांनी प्रदेशातले ग्रीन कार्ड घेतले. आता तिकडेच स्थाईक होणार. तुम्हाला आमच्या प्रॉपर्टी मध्ये सुध्दा काडीचा इंटरेस्ट नाही. उलट आम्हाला पैसे पाठवत असता   नेहमी म्हणता तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचा योग्य तो निर्णय घेऊन दान करा. तुमचे नाव कायम स्मरणात राहील असे काहीतरी करा. मग मला सांगा काय हरकत आहे ही मुलगी दत्तक घ्यायला. तसेही तुम्ही दोन महिन्याने भारतात येणार आहात. सुबोध तेव्हा तुझ्या नावाने बाळ दत्तक घेऊ. बाबा म्हणून तुझे नाव . आम्ही आजोबा ,आजी. 
विचारांती सुबोध आणि संध्या. तसेच मुलगी संगीता आणि जावई संदेश यांना हे मान्य केले.
      मुलं भारतात आली. पाहिले दत्तक पत्र करून मुलीचे नाव  सरिता सुबोध समर्थ झाले. आणि ती खऱ्या अर्थाने या घरची सदस्य झाली. खूप लाघवी पोर होती. सगळ्यांचा तिचा खूप लळा लागला. तिला सोडून जातांना सगळ्यांना खूप त्रास झाला.  दिवस जात होते. आता तिला कळायला लागले. 
ती सारखी प्रश्न विचारायची. "आजी माझे बाबा मला इथे सोडून अमेरिकेत का गेले?" 
" मला का नाही दादा सारखे सोबत ठेवत. ?" 
काकू तिला समजावून सांगायच्या. अग आम्ही इथे दोघच राहिलो असतो ना म्हणून मग तुला आम्हीच इथे ठेऊन घेतले. दिवस जात होते. कधी ती अमेरिकेला तर कधी तिचे आईबाबा भारतात येत होते.  
    तिचे कॉलेज संपले.आता नोकरीच्या शोधात होती . एका ठिकाणी मुलखात द्यायला गेली. तिथे कोण जाणे तिला त्यांच्या एरियात मधील एक जण भेटला. आणि बोलता बोलता त्याच्या तोंडून तिचा भूतकाळ निघून गेला. ती आ वासून फक्त पाहात होती.
    मुलाखत झाली. तडक घरी आली आणि बेडरूम मध्ये जाऊन रडत बसली. सगुणा त्यांची मदतनीस तिला चहा घेऊन गेल्या. खूप दार वाजवले तरी ती दार उघडत नव्हती. शेवटी तिने काकूंना आवाज दिला. काकूंनी दार वाजवले. सरिता दार उघडत नव्हती. शेवटी काका म्हणाले. सरिता तुझी आजी चक्कर येऊन पडली. तशी ती ताडकन आजी आजी करत बाहेर आली.
घाबरून आजी काय झाले  विचारणार, तिला आजी सोफ्यावर बसलेला दिसली.
आजी तू तर बरी आहेस, आजोबा का बोलले तुला चक्कर आली म्हणून.
तु दार उघडत नव्हती. मग काय करणार. आजीचा तुला विशेष लळा आहे माहिती आहे मला. 
तु सांग तू का दार बंद करून बसली होती?  डोळे पण रडलेले दिसत आहे ? कोणी काही बोलले का?
आजी, आजोबा एक विचारू ? 
विचार ना बाळा काय झाले? 
"आजी मी तुझी नात नाही ना ग?"  
आता हे काय नवीन? 
आजी मला खर खर सांग. मला एका बाईने अगदी लहान असताना तुझ्याकडे आणून सोडले होते ना !
तुला कोणी सांगितले? आज मुलाखत द्यायला गेले होते एका कंपनीत. तिथे आपल्या ईकडचा एक मुलगा होता. मी त्याला ओळखत नाही. पण त्याने मला ओळखले आणि सर्व सांगितले.
अच्छा अस आहे तर... मग ऐक आम्ही तुला अनाथ आश्रमात ठेऊ शकलो असतो. पण एक दिवस तुझे संगोपन केले. इतकी गोड होती. शिवाय पैश्याची काही अडचण नव्हती. तुझे आत्ताचे बाबा, आणि आत्या दोघांनीही परदेशातले ग्रीन कार्ड घेतले. त्यांना तिकडेच राहायचे आहे. आम्हाला तिकडे करमत नाही. 
    नुकतीच दोघांनी VRS घेतली होती. कारण एकच, दोघांनी आता एकमेकांना वेळ द्यायचा. शेजारच्या सगळ्यांचा माझ्यावर विशेष जीव. त्यामुळे त्यांची लहान मुल हक्काने माझ्याकडे आणून ठेवत होती. तुझ्या आईला हे कुठून तरी कळले असणार. तिने बरोबर तुझ्यासाठी माझी निवड केली. मग पोलीस स्टेशन, तुझ्या आईचा शोध सगळे केले. कुठेच शोध लागला नाही. आश्रमात ठेवल्या पेक्षा आम्ही तुला आमच्या जवळ तुझी आई मिळेपर्यंत ठेवणार होतो. तुझी आई सापडली की तिच्या स्वाधीन तुला करणार होतो. पण तिचा शोध लागला नाही. मग ठरवलं आपल्या आयुष्यात तुझ येणं असेल, ही त्या वरच्याचीच इच्छा असावी. तुला दत्तक घेतले. आमचे वय बघून आम्हाला दत्तक मूल मिळाले नसते म्हणून मग सुबोधच्या नावाने दत्तक घेतले. मग तू आली आमच्या आयुष्यात नात म्हणून. आणि आमचं आयुष्य बदलून गेलं. 
    आता मला सांग, तू माझ्या मुलाची मुलगी नाही म्हणून त्याने तुला कधी असे जाणवू दिले का? तुझ्या आईने जेवढी माया केली असती तेव्हढी, मी तर म्हणते त्याहून जास्त माया तुझ्या या आईने केली. आम्ही तुझे खरे आजी आजोबा नाहीत हे तुला कधी जाणवले का ?
नाही ! 
मग मला सांग कोण कोणाची मुलगी आहे याने काय फरक पडतो.
अग कृष्णाने देवकीच्या पोटी जन्म घेतला पण त्याचे पालन पोषण यशोदाने केले. आम्ही तुझ्यासाठी यशोदा मैया..
आजी, आजोबा सॉरी..
खरच तुम्ही सगळे ग्रेट आहात. 
आम्ही ग्रेट आहोतच पण त्याहून ग्रेट तू आहेस. 
मी काय केले?
इतकी मोठी बातमी जेव्हा दुसऱ्या कडून कळते तेव्हा कोणतीही मुलगी सैरभैर झाली असती. आजी चक्कर येऊन पडली म्हटल्या बरोबर किती पट्कन बाहेर आलीस.
तेव्हा विचार केला का की ही कुठे माझी आजी आहे ?
 मरू दे ! मला काय करायचे?
सरिताने आजीच्या तोंडावर हात ठेवला. मरतील तुझे दुश्मन. 
सॉरी आजी!  पुन्हा नाही असा वेडेपणा करणार. कुणी काहीही सांगितले तरी.
माझी सख्खी आई जरी माझ्या पुढ्यात आली, तरी मी तिच्याकडे जाणार नाही. कधीच नाही. 
    काहीही मजबुरी असो. पण एक आई आपला पोटचा  गोळा असा कोणाच्या स्वाधीन करत असेल आणि स्वतःची त्यापासून सुटका करत असेल तर आई म्हणून मी तिची सुटका केलेली बरी. त्यामुळे मी सरिता सुबोध समर्थ हेच माझे नाव आणि हीच माझी "ओळख."
ये हुई ना बात!
अशी हिम्मत वाली पोरगी पाहिजे.
Proud of you बेटा असे म्हणत आजोबा आजी ने तिला मिठी मारली.
Love you आजुडी... म्हणत तीने आजीची गोड पापी घेतली.

माझ्या "काव्यप्रभा" पेज वरील एक कथा.
©️®️ सौ. प्रभा कृष्णा निपाणे
               कल्याण.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...